व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्मरण करण्याजोगा जन्म

स्मरण करण्याजोगा जन्म

स्मरण करण्याजोगा जन्म

“तुमच्यासाठी आज दावीदाच्या गावात तारणारा जन्मला आहे; तो ख्रिस्त प्रभु आहे.”—लूक २:११.

सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी बेथलेहेम गावात एका स्त्रीने एका बालकाला जन्म दिला. या बालकाचा जन्म किती महत्त्वाचा होता याची कल्पना त्या गावातल्या फार कमी लोकांना होती. पण, त्या रात्री रानात कळप राखणाऱ्‍या काही मेंढपाळांना देवदूतांचा समुदाय दिसला. त्यांनी या देवदुतांना असे गीत गाताना ऐकले: “ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांति.”—लूक २:८-१४.

या मेंढपाळांना मग देवदूतांनी सांगितल्यानुसार मरीया व तिचा पती योसेफ एका तबेल्यात आढळले. मरीयेने बाळाचे नाव येशू ठेवले होते आणि तिने त्याला तबेल्यात एका गव्हाणीत ठेवले होते. (लूक १:३१; २:१२) आज, त्या घटनेच्या दोन हजार वर्षांनंतर मानवजातीतील एक तृतीयांश लोकसंख्या स्वतःला येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणवतात. येशूच्या जन्माच्या वेळी घडलेल्या घटनांनी एका अशा कथेचे रूप घेतले आहे, जिची मानव इतिहासात इतर कोणत्याही कथेपेक्षा जास्त वेळा पुनरुक्‍ती झाली आहे.

स्पेन हा मुख्यतः कॅथलिक परंपरा जोपासणारा देश असून त्याला पारंपरिक उत्सवांचे माहेरघर म्हणता येईल. बेथलेहेमातील त्या विलक्षण रात्रीच्या स्मृतीप्रीत्यर्थ येथे अनेक परंपरा पाळल्या जातात.

स्पॅनिश नाताळ

तेराव्या शतकापासून, स्पॅनिश नाताळोत्सवाचे सर्वात ओळखीचे चिन्ह म्हणजे येशूच्या जन्माचे दृश्‍य. बरीच कुटुंबे, बाळ येशूला जेथे ठेवण्यात आले होते त्या गव्हाणीची लहानशी प्रतिकृती तयार करतात. मेंढपाळ व मागी लोक (किंवा “तीन राजे”) तसेच, योसेफ, मरीया व येशू यांना दाखवण्याकरता मातीचे लहान पुतळे वापरले जातात. शहरातील नगर कार्यालयाच्या इमारतीजवळ नाताळाच्या काळादरम्यान येशूच्या जन्माचे दृश्‍य असलेले मोठमोठे देखावे उभारले जातात ज्यात माणसाच्या आकाराच्या मूर्ती असतात. शुभवर्तमानातील येशूच्या जन्माच्या अहवालाकडे लोकांचे लक्ष आकर्षित करण्याच्या हेतूने फ्रान्सिस ऑफ असीसी याने इटलीत ही प्रथा सुरू केली होती. कालांतराने फ्रान्सिस्कन जोगींनी स्पेनमध्येच नव्हे तर इतर अनेक देशांत ही प्रथा लोकप्रिय बनवली.

इतर देशात ख्रिसमस फादर म्हणजेच सान्ताक्लॉज ज्याप्रकारे सर्वांच्या परिचयाचा आहे त्याचप्रकारे स्पेनच्या नाताळोत्सवात, मागी लोकांना महत्त्व आहे. जानेवारी ६ तारखेला स्पेनमध्ये दीया द रेएस (राजांचा दिवस) पाळतात; मागी लोकांनी बाळ येशूकरता भेटवस्तू आणल्या होत्या या प्रचलित धारणेमुळे त्या दिवशी मागी लोक स्पॅनिश मुलांना भेटवस्तू देतात. पण येशूला भेटायला किती मागी लोक आले होते याविषयी शुभवर्तमानांत उल्लेख नसल्याचे बऱ्‍याच लोकांना माहीत नाही. तसेच, राजे म्हणण्यापेक्षा त्यांना ज्योतिषी म्हणणे जास्त उचित आहे. * शिवाय, मागी लोक येशूला भेटायला आल्यानंतर, हेरोदने येशूला ठार मारण्याच्या हेतूने, बेथलेहममधील “जे दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाचे” मुलगे होते त्यांना ठार मारले. यावरून असे सूचित होते की येशूच्या जन्माच्या बऱ्‍याच काळानंतर मागी त्याला भेटण्यास आले होते.—मत्तय २:११, १६.

बाराव्या शतकापासून, काही स्पॅनिश नगरांत येशूच्या जन्माची घटना तसेच मेंढपाळांचे बेथलेहेमला येणे व नंतर मागी लोकांची भेट, नाटक रूपात प्रस्तुत करण्याची परंपरा चालत आली आहे. आजकाल, जानेवारी ५ तारखेला बहुतेक स्पॅनिश शहरांत काबालगाटा अर्थात एक मिरवणूक काढली जाते; या मिरवणुकीत “तीन राजे” शोभिवंत गाड्यांतून शहराच्या मुख्य रस्त्यांवरून, मिरवणूक पाहायला आलेल्या दर्शकांना मिठाई इत्यादी वाटत जातात. नाताळाचे पारंपरिक सुशोभित देखावे व वीयेन्सीकोस (नाताळाचे गीत) या सोहळ्याची रंगत अधिकच वाढवतात.

बहुतेक स्पॅनिश कुटुंबे नाताळाच्या आदल्या दिवशी (डिसेंबर २४) खास मेजवानी करतात. यात काही पारंपरिक खाद्यपदार्थ आवर्जून बनवले जातात; उदाहरणार्थ, ट्युरॉन (बदाम व मधापासून बनवलेला गोड पदार्थ), निरनिराळ्या आकाराची मिठाई, सुका मेवा, भाजलेले मटण, आणि मासे इत्यादींचा हमखास समावेश असतो. सगळे कुटुंबीय, दूर राहणारे देखील खास या मेजवानीच्या निमित्ताने एकत्र येतात. जानेवारी ६ तारखेला आणखी एक पारंपरिक मेजवानी असते. या दिवशी रॉस्काँ द रेएस म्हणजे चक्राच्या आकाराची “राजांची” केक खाण्याची प्रथा आहे; या केकमध्ये सहसा सॉरप्रेसा (लहानशी बाहुली) लपवून ठेवलेली असते. रोमन लोकांमध्येही अशा प्रकारची एक प्रथा रूढ होती; गुलामांपैकी ज्याच्या केकच्या तुकड्यात लपवलेली वस्तू सापडेल त्याला त्या एका दिवसापुरते “राजा” व्हायला मिळायचे.

“वर्षातला सर्वात आनंदाचा व धावपळीचा काळ”

स्थानिक रूढीपरंपरा वेगवेगळ्या असल्या तरीही, आज नाताळ हा जगातला सर्वात प्रमुख सण बनला आहे. वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया यात नाताळाचे वर्णन, “सबंध जगातील कोट्यवधी ख्रिस्ती व काही गैरख्रिस्ती लोकांचा वर्षातला सर्वात आनंदाचा व धावपळीचा काळ” असे केले आहे. पण हे उचित आहे का?

ख्रिस्ताच्या जन्माची घटना ही एक ऐतिसाहिक घटना होती यात शंका नाही. “ज्यांच्यावर [देवाचा] प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांति” सूचित करणारी घटना म्हणून स्वतः देवदूतांनी तिची घोषणा केली यावरूनच ही घटना किती महत्त्वाची होती हे दिसून येते.

पण स्पॅनिश पत्रकार ख्वॉन आर्यास एक मुद्दा लक्षात आणून देतात; ते म्हणतात, “ख्रिस्ती धर्माच्या सुरवातीच्या काळात येशूचा जन्म सणाच्या रूपात साजरा केला जात नव्हता.” हे खरे असल्यास, नाताळोत्सवाची सुरुवात कोठून झाली? येशूच्या जन्माचे व त्याच्या जीवनाचे स्मरण करण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता? पुढील लेखात तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरे सापडतील.

[तळटीप]

^ परि. 8 प्रोफेसर्स ऑफ द कंपनी ऑफ जीसस यांनी प्रकाशित केलेल्या पवित्र शास्त्रवचने—मजकूर व भाष्य, या ग्रंथानुसार “पर्शियन, मेदी आणि खास्दी लोकांमध्ये मागी लोक हे गूढवाद, ज्योतिषशास्त्र व वैद्यकीय शास्त्राचा पुरस्कार करणारा याजकांचा एक वर्ग होता.” पण मध्ययुगांपर्यंत, बाळ येशूला पाहायला आलेल्या मागी लोकांना, मेल्खियॉर, गास्पार आणि बाल्थाझार अशी अधिकृत नावे देण्यात आली होती. यांच्या अस्थी जर्मनीतल्या कोलोन शहरातील कॅथेड्रलमध्ये ठेवल्या आहेत असे म्हटले जाते.