व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सैतानाला वाव देऊ नका

सैतानाला वाव देऊ नका

सैतानाला वाव देऊ नका

“सैतानाला संधी देऊ नका.”—इफिसकर ४:२७, ईजी टू रीड व्हर्शन.

१. बऱ्‍याच जणांना दियाबलाच्या अस्तित्वाविषयी प्रश्‍न का पडतो?

 कित्येक शतकांपर्यंत अनेक ख्रिस्ती लोकांची अशी धारणा होती की सैतान म्हणजे डोक्यावर शिंगे व विभागलेले खूर असलेला, लाल कपडे घातलेला व एका मोठ्या काट्याने दुष्ट माणसांना नरकाच्या अग्नीत फेकणारा प्राणी आहे. बायबल मात्र या कल्पनांना दुजोरा देत नाही. पण साहजिकच, अशा प्रकारच्या गैरधारणांमुळे कोट्यवधी लोकांना प्रश्‍न पडतो की दियाबल खरोखरच अस्तित्वात आहे का? की सैतान म्हणजे केवळ माणसांतली दुष्ट प्रवृत्ती?

२. दियाबलाविषयी शास्त्रवचनांत काय सांगितले आहे?

बायबलमध्ये दियाबलाच्या अस्तित्वाविषयी प्रत्यक्ष साक्षीदारांची ग्वाही व पुरावा दिला आहे. येशू ख्रिस्ताने त्याला स्वर्गाच्या आत्मिक परिसरात पाहिले व पृथ्वीवर तो त्याच्याशी बोलला. (ईयोब १:६; मत्तय ४:४-११) शास्त्रवचनांत या आत्मिक प्राण्याचे मूळ नाव प्रकट करण्यात आलेले नाही पण त्याला दियाबल (मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ, “निंदक”) म्हटले आहे कारण त्याने देवाची निंदा केली. त्याला सैतान (अर्थ, “विरोधक”) असेही म्हटले आहे कारण तो यहोवाचा विरोध करतो. दियाबल सैतानाला “जुनाट साप” असेही म्हणण्यात आले आहे. हव्वेला फसवण्याकरता त्याने सापाचा उपयोग केल्यामुळे कदाचित त्याला असे संबोधित केले असावे. (प्रकटीकरण १२:९; १ तीमथ्य २:१४) त्याला ‘दुष्ट’ असेही म्हणण्यात आले आहे.—मत्तय ६:१३, ईजी टू रीड व्हर्शन. *

३. आपण कोणता प्रश्‍न विचारात घेणार आहोत?

आपण यहोवाचे सेवक आहोत, त्याअर्थी सैतानाचे, अर्थात एकाच खऱ्‍या देवाच्या मुख्य शत्रूचे आपण कोणत्याही प्रकारे अनुकरण करू इच्छित नाही. म्हणूनच आपण प्रेषित पौलाच्या या सल्ल्याकडे लक्ष दिले पाहिजे: “सैतानाला संधी देऊ नका.” (इफिसकर ४:२७, ईजी टू रीड व्हर्शन) सैतानाचे कोणते काही गुण आहेत ज्यांचे आपण अनुकरण करू नये?

कुख्यात निंदकाचे अनुकरण करू नका

४. ‘त्या दुष्टाने’ कशाप्रकारे देवाची निंदा केली?

‘त्या दुष्टाला’ दियाबल हे नाव देणे योग्यच आहे कारण तो निंदक आहे. निंदा करणे म्हणजे कोणाविषयी दुष्ट हेतूने, खोटे, व निंद्य असे विधान करणे. देवाने आदामाला आज्ञा दिली होती: “बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ति २:१७) हव्वेलाही याविषयी सांगण्यात आले होते पण एका सर्पाच्या माध्यमाने दियाबलाने तिला सांगितले: “तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” (उत्पत्ति ३:४, ५) ही यहोवा देवाविरुद्ध दुष्ट हेतूने केलेली निंदा होती!

५. दियत्रफेसला त्याने केलेल्या निंदेबद्दल जबाबदार धरणे योग्य का होते?

इस्राएल लोकांना निक्षून सांगण्यात आले होते: “आपल्या लोकांमध्ये चहाड्या [“निंदा”] करीत इकडे तिकडे फिरू नको.” (लेवीय १९:१६) प्रेषित योहानाने आपल्या काळातल्या एका निंदक व्यक्‍तीबद्दल असे लिहिले: “मी मंडळीला थोडेसे लिहिले; परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करीत नाही. ह्‍यामुळे मी आलो तर तो जी कृत्ये करितो त्यांची आठवण देईन; तो आम्हाविरुद्ध द्वेषबुद्धीने बाष्कळ बडबड करितो.” (३ योहान ९, १०) दियत्रफेस योहानाची निंदा करत होता आणि त्याकरता त्याला जबाबदार धरले जाणे योग्यच होते. कोणत्या एकनिष्ठ ख्रिस्ती व्यक्‍तीला दियत्रफेससारखे होऊन सर्वात मोठा निंदक सैतान याचे अनुकरण करण्याची इच्छा असेल?

६, ७. आपण कोणाविरुद्ध निंदा करण्याचे का टाळावे?

यहोवाच्या सेवकांविरुद्ध बरेचदा निंद्य विधाने व खोटे आरोप केले जातात. “मुख्य याजक व शास्त्री उभे राहून आवेशाने [येशूवर] आरोप करीत होते.” (लूक २३:१०) पौलावर मुख्य याजक हनन्या व इतरांनी मिळून खोटे आरोप केले होते. (प्रेषितांची कृत्ये २४:१-८) आणि बायबलमध्ये सैतानाला, “आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा,” असे म्हणण्यात आले आहे. (प्रकटीकरण १२:१०) सैतान ज्यांच्यावर दोषारोप करतो ते बंधू म्हणजे या शेवटल्या दिवसांत पृथ्वीवर असलेले अभिषिक्‍त ख्रिस्ती आहेत.

कोणत्याही ख्रिस्ती व्यक्‍तीने कोणाची निंदा करू नये किंवा कोणावर खोटा दोषारोप करू नये. पण एखाद्याविरुद्ध साक्ष देताना सगळी माहिती न काढता आपण बोललो तर हेच घडू शकते. मोशेच्या नियमशास्त्रानुसार, दुसऱ्‍याविरुद्ध खोटी साक्ष दिल्यास, खोटा आरोप करणाऱ्‍याला मृत्यूदंड दिला जाई. (निर्गम २०:१६; अनुवाद १९:१५-१९) शिवाय, यहोवाला ज्या गोष्टींचा वीट आहे त्यांपैकी एक गोष्ट “लबाड बोलणारा खोटा साक्षी” ही आहे. (नीतिसूत्रे ६:१६-१९) तेव्हा निश्‍चितच आपण सर्वात मोठा निंदक आणि खोटे आरोप करणारा सैतान याचे अनुकरण करण्याचे टाळले पाहिजे.

पहिल्या मनुष्यघातकाच्या मार्गांचा धिक्कार करा

८. दियाबल कोणत्या अर्थाने “प्रारंभापासून मनुष्यघातक होता”?

दियाबल मनुष्यघातक आहे. येशूने म्हटले: “तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता.” (योहान ८:४४) आदाम व हव्वा यांना त्याने देवाकडे पाठ फिरवायला लावली हे त्याचे पहिले घातकी कृत्य होते व तेव्हापासून तो मनुष्यघातक आहे. पहिले मानवी जोडपे व त्यांच्या संततीला त्याने मृत्यूच्या दरीत लोटले. (रोमकर ५:१२) हे कृत्य दुष्ट प्रवृत्ती नव्हे तर केवळ एक व्यक्‍तीच करू शकते याकडेही लक्ष द्या.

९. पहिले योहान ३:१५ यात सुचवल्याप्रमाणे आपण कोणत्या अर्थाने नरहिंसक बनू शकतो?

इस्राएलला देण्यात आलेल्या दहा आज्ञांपैकी, “खून करू नको” अशीही एक आज्ञा होती. (अनुवाद ५:१७) ख्रिश्‍चनांना संबोधून बोलताना प्रेषित पेत्राने लिहिले: “खून करणारा, . . . असे होऊन कोणी दुःख भोगू नये.” (१ पेत्र ४:१५) त्याअर्थी यहोवाचे सेवक या नात्याने आपण कोणाचा खून तर करणार नाही. पण जर आपण एखाद्या ख्रिस्ती बांधवाचा द्वेष करत असू आणि त्याच्या मरणाची वाट पाहात असू तर नक्कीच आपण देवासमोर दोषी ठरू. प्रेषित योहानाने लिहिले: “जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करितो तो नरहिंसक [किंवा, “खुनी,” ईजी टू रीड व्हर्शन] आहे; आणि कोणाहि नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हांस माहीत आहे.” (१ योहान ३:१५) इस्राएल लोकांना अशी आज्ञा देण्यात आली होती: “आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको.” (लेवीय १९:१७) एखाद्या सहख्रिस्ती बांधवासोबत कोणताही मतभेद निर्माण झाल्यास, आपण लवकरात लवकर तो मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून मनुष्यघातक असणारा सैतान आपली ख्रिस्ती एकता नष्ट करू शकणार नाही.—लूक १७:३, ४.

लबाडीचा बाप असणाऱ्‍याचा दृढतेने विरोध करा

१०, ११. लबाडीचा बाप असणाऱ्‍या सैतानाचा दृढतेने विरोध करण्याकरता आपण काय केले पाहिजे?

१० दियाबल खोटे बोलण्यात तरबेज आहे. येशूने म्हटले: “तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.” (योहान ८:४४) सैतान हव्वेशी खोटे बोलला पण दुसरीकडे पाहता येशू या पृथ्वीवर सत्याविषयी साक्ष देण्याकरता आला. (योहान १८:३७) ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने जर आपण दियाबलाचा दृढतेने विरोध करू इच्छितो तर आपण खोटे बोलण्याचा व फसवणूक करण्याचा मार्ग अवलंबू शकत नाही. आपण ‘खरे बोलले’ पाहिजे. (जखऱ्‍या ८:१६; इफिसकर ४:२५) यहोवा ‘सत्यस्वरूप देव’ असून तो केवळ त्याच्या सत्यवादी साक्षीदारांनाच आशीर्वाद देतो. दुष्ट जनांना त्याचे नाव धारण करण्याचा मुळीच अधिकार नाही.—स्तोत्र ३१:५; ५०:१६; यशया ४३:१०.

११ सैतानाच्या खोट्या शिकवणुकींपासून मिळालेल्या आध्यात्मिक मुक्‍तीची जर आपल्याला कदर वाटत असेल तर आपण ख्रिस्ती विश्‍वासांना अर्थात ‘सत्य मार्गालाच’ धरून राहू. (२ पेत्र २:२; योहान ८:३२) “सुवार्तेचे सत्य” ज्यास म्हटले आहे, त्यात सर्व ख्रिस्ती शिकवणुकींचा समावेश आहे. (गलतीकर २:५, १४) ‘सत्यात चालत राहण्यावरच’ म्हणजे, त्याचे प्रामाणिकपणे अनुसरण करण्यावर व जो “लबाडीचा बाप” आहे त्या सैतानाचा खंबीरपणे विरोध करण्यावरच आपले तारण अवलंबून आहे.—३ योहान ३, ४, ८.

सर्वप्रथम धर्मत्याग्याचा प्रतिकार करा

१२, १३. धर्मत्यागी व्यक्‍तींशी आपण कसे वागावे?

१२ दियाबल बनलेला आत्मिक प्राणी एकेकाळी सत्यात चालत होता. पण येशूने म्हटल्याप्रमाणे, “तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही.” (योहान ८:४४) सर्वप्रथम धर्मत्याग करणाऱ्‍या सैतानाने ‘सत्यस्वरूप देवाचा’ सतत विरोध केला आहे. पहिल्या शतकातील काही ख्रिस्ती ‘सैतानाच्या पाशात’ पडले; म्हणजेच ते सत्यापासून पथभ्रष्ट होऊन किंवा विचलित होऊन सैतानाला बळी पडले. म्हणूनच पौलाने आपला सहकारी तीमथ्य याला अशा व्यक्‍तींना सौम्यतेने शिक्षण देण्यास सांगितले, जेणेकरून त्यांना पुन्हा आध्यात्मिक आरोग्य प्राप्त व्हावे आणि त्यांनी सैतानाच्या पाशातून मुक्‍त व्हावे. (२ तीमथ्य २:२३-२६) अर्थात, सुरवातीपासून सत्याला जडून राहणे आणि धर्मत्यागी मतांच्या पाशात न पडणेच केव्हाही उत्तम.

१३ दियाबलाचे ऐकल्यामुळे व त्याची लबाडी न झिडकारल्यामुळे पहिल्या मानवी जोडप्यानेही धर्मत्याग केला. मग, आपण धर्मत्यागी व्यक्‍तींचे ऐकावे का, त्यांचे साहित्य वाचावे का किंवा इंटरनेटवर त्यांच्या वेब साईट्‌सवरील माहिती वाचावी का? जर देव व सत्य आपल्याला प्रिय असेल तर आपण असे करणार नाही. आपण धर्मत्यागी व्यक्‍तींना आपल्या घरांत घेऊ नये किंवा त्यांना नमस्कारही करू नये कारण असे केल्याने आपणही त्यांच्या ‘दुष्कर्माचे भागीदार होतो.’ (२ योहान ९-११) ख्रिस्ती ‘सत्य मार्गाचा’ त्याग करण्याद्वारे, तसेच, ‘बनावट गोष्टी सांगून आपल्यावर पैसे मिळवणाऱ्‍या’ खोट्या शिक्षकांचे अनुकरण करण्याद्वारे आपण कधीही दियाबलाच्या फसवणुकीला बळी पडता कामा नये.—२ पेत्र २:१-३.

१४, १५. इफिसस येथील वडिलांना व आपला सहकारी तीमथ्य याला पौलाने कोणती ताकीद दिली?

१४ पौलाने इफिसस येथील ख्रिस्ती वडिलांना सांगितले: “तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्‍यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्‍ताने स्वतःकरिता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुम्हापैकीहि काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.” (प्रेषितांची कृत्ये २०:२८-३०) कालांतराने खरोखरच असे धर्मत्यागी आले व ‘विपरीत गोष्टी बोलू’ लागले.

१५ सा.यु. ६५ सालाच्या सुमारास प्रेषित पौलाने तीमथ्याला ‘सत्याचे वचन नीट सांगण्याचे’ प्रोत्साहन दिले. त्यासोबतच पौलाने असेही लिहिले, “अनीतिच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा; अशा वटवटी करणारे अभक्‍तीत अधिक सरसावतील; आणि त्यांचे शिक्षण काळपुळीसारखे चरेल; त्यांच्यापैकी हुमनाय व फिलेत हे आहेत; ते सत्याविषयी चुकले आहेत; पुनरूत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात, आणि कित्येकांच्या विश्‍वासाचा नाश करितात.” धर्मत्यागाला सुरुवात झाली होती! पौलाने पुढे म्हटले: “तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो.”—२ तीमथ्य २:१५-१९.

१६. सर्वप्रथम धर्मत्यागी सैतानाने अनेक कुयुक्‍त्‌या केल्या तरीसुद्धा आपण देवाला व त्याच्या वचनाला एकनिष्ठ का राहू शकलो?

१६ सैतानाने बरेचदा धर्मत्यागी व्यक्‍तींचा उपयोग करून खऱ्‍या उपासनेत भेसळ करण्याचा प्रयत्न केला आहे, पण अर्थातच त्याला यात यश आलेले नाही. १८६८ सालाच्या सुमारास चार्ल्झ टेझ रसल यांनी ख्रिस्ती धर्मजगतातील दीर्घस्थापित सिद्धान्तांचे काळजीपूर्वक परीक्षण करण्यास सुरुवात केली आणि त्यांना बायबलचा विपर्यास करण्यात आला आहे असे आढळले. रसल व सत्य शोधण्यास उत्सुक असणाऱ्‍या आणखी दोनचार जणांनी मिळून संयुक्‍त संस्थानांतील पेनसिलव्हेनिया राज्यातील पिट्‌सबर्ग शहरात एक बायबल अभ्यास गट स्थापन केला. त्यानंतरच्या जवळजवळ १४० वर्षांत यहोवाच्या सेवकांच्या ज्ञानात व देवावर व त्याच्या वचनावर असलेल्या त्यांच्या प्रीतीत वृद्धीच होत गेली आहे. सर्वप्रथम धर्मत्यागी सैतानाने अनेक कुयुक्‍त्‌या केल्या तरीसुद्धा विश्‍वासू व बुद्धिमान दासांनी आध्यात्मिक जागरूकता कायम ठेवल्यामुळे या खऱ्‍या ख्रिश्‍चनांना यहोवा व त्याच्या वचनाला एकनिष्ठ राहणे शक्य झाले आहे.—मत्तय २४:४५.

जगाच्या अधिपतीला कधीही तुमच्यावर वर्चस्व मिळवू देऊ नका

१७-१९. दियाबलाला वश झालेले जग म्हणजे नेमके काय आणि आपण त्यावर प्रीती का करू नये?

१७ आपल्याला पाशात पाडण्याचा सैतान ज्या आणखी एका मार्गाने प्रयत्न करतो, तो म्हणजे आपल्याला या जगावर, अर्थात, देवापासून दुरावलेल्या अनीतिमान मानव समाजावर प्रीती करण्यास उद्युक्‍त करण्याद्वारे. येशूने दियाबलाला “जगाचा अधिकारी” म्हटले व तो म्हणाला की “माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.” (योहान १४:३०) सैतानाने कधीही आपल्यावर सत्ता मिळवता कामा नये! अर्थात, आपल्याला जाणीव आहे की “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) म्हणूनच तर दियाबल, केवळ एक धर्मत्यागी उपासनेचे कृत्य करण्याच्या मोबदल्यात येशूला “जगातील सर्व राज्ये” देण्याचा प्रस्ताव मांडू शकला; अर्थात देवाच्या पुत्राने हा प्रस्ताव सरळसरळ धुडकावून लावला. (मत्तय ४:८-१०) सैतानाच्या नियंत्रणाखाली असलेले जग ख्रिस्ताच्या अनुयायांचा द्वेष करते. (योहान १५:१८-२१) तेव्हा प्रेषित योहानाने आपल्याला या जगावर प्रीती करू नका असे बजावून सांगितले यात काही आश्‍चर्य आहे का?

१८ योहानाने लिहिले: “जगावर व जगांतल्या गोष्टींवर प्रीति करु नका. जर कोणी जगावर प्रीति करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीति नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत; आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१५-१७) आपण या जगावर प्रीती करू नये कारण या जगाची जीवनशैली पापी देहाच्या वासना पूर्ण करणारी व यहोवा देवाच्या दर्जांच्या अगदीच विरोधात आहे.

१९ आपल्या मनात जर जगिक गोष्टींबद्दल प्रीती असेल तर आपण काय करावे? असे असल्यास आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे की त्याने आपल्याला जगिक गोष्टींबद्दल व त्यांच्याशी संबंधित दैहिक वासनांबद्दलचे हे आकर्षण आपल्या मनातून उपटून टाकण्यास मदत करावी. (गलतीकर ५:१६-२१) मुळात ‘आकाशातले दुरात्मे’ या ‘जगाचे [अदृश्‍य] अधिपती’ आहेत हे आठवणीत ठेवल्यास निश्‍चितच आपण “स्वतःला जगापासून निष्कलंक” ठेवण्याकरता झटू.—याकोब १:२७; इफिसकर ६:११, १२; २ करिंथकर ४:४.

२०. आपण या “जगाचे नाही” असे का म्हटले जाऊ शकते?

२० आपल्या शिष्यांच्या संदर्भात येशूने म्हटले: “जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहान १७:१६) अभिषिक्‍त ख्रिस्ती व त्यांचे समर्पित साथीदार नैतिक व आध्यात्मिक रितीने शुद्ध व या जगापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात. (योहान १५:१९; १७:१४; याकोब ४:४) हे अनीतिमान जग आपला द्वेष करते कारण आपण त्यापासून अलिप्त राहतो आणि ‘नीतिमत्त्वाचा उपदेश’ अर्थात प्रचार करतो. (२ पेत्र २:५) अर्थात, आपण मानव समाजातच राहात आहोत आणि त्यात व्यभिचारी, जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड व मद्यपी लोक आहेत. (१ करिंथकर ५:९-११; ६:९-११; प्रकटीकरण २१:८) पण जगात राहूनही आपण “जगाचा आत्मा” स्वतःत येऊ देत नाही, किंवा दुसऱ्‍या शब्दांत जगातील पाप करण्याच्या प्रबल प्रेरणेला स्वतःवर नियंत्रण करू देत नाही.—१ करिंथकर २:१२.

दियाबलाला वाव देऊ नका

२१, २२. इफिसकर ४:२६, २७ यात पौलाने दिलेला सल्ला तुम्ही कसा उपयोगात आणू शकता?

२१ ‘जगाच्या आत्म्याच्या’ प्रभावाखाली येण्याऐवजी आपण देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालतो; देवाचा आत्मा आपल्यामध्ये प्रीती व आत्मसंयम यांसारखे गुण उत्पन्‍न करतो. (गलतीकर ५:२२, २३) दियाबल आपला विश्‍वास कमकुवत करण्याकरता जे हल्ले करतो त्यांचा प्रतिकार करण्यास हे गुण आपले साहाय्य करतात. सैतानाची इच्छा आहे की आपण ‘जळफळावे व दुष्कर्म करावे’ पण देवाचा आत्मा आपल्याला “क्रोधाविष्टपणाचा त्याग” करण्यास मदत करतो. (स्तोत्र ३७:८) कधीकधी आपल्याला रास्त कारणांमुळे क्रोध येतो हे खरे आहे पण पौल आपल्याला असा सल्ला देतो: “तुम्ही रागावा, परंतु पाप करु नका, तुम्ही रागात असताना सुर्य मावळू नये, आणि सैतानाला वाव देऊ नका.”—इफिसकर ४:२६, २७.

२२ आपण क्रोधाविष्ट स्थितीत राहिल्यास पाप करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. आपण अशा मनःस्थितीत राहिल्यामुळे दियाबलाला मंडळीत कलह निर्माण करण्यास किंवा आपल्याला दुष्कृत्य करायला लावण्यास वाव मिळेल. म्हणूनच आपण इतरांशी झालेले मतभेत लवकरात लवकर, देवाला स्वीकार्य असणाऱ्‍या मार्गाने सोडवावेत. (लेवीय १९:१७, १८; मत्तय ५:२३, २४; १८:१५, १६) तेव्हा, आपण सदोदीत देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालण्याचा व आत्मसंयमाने वागण्याचा निर्धार करू या. क्रोधिष्ट होण्याचे रास्त कारण असले तरीसुद्धा त्याचे रूपांतर कटुता, शत्रूभाव व द्वेष यात कधीही होऊ देता कामा नये.

२३. पुढील लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांचा विचार करणार आहोत?

२३ आपण ज्यांचे अनुकरण करू नये अशा, दियाबलाच्या काही गुणांची आता चर्चा केली. पण काही वाचक विचार करत असतील: आपण सैतानाला भ्यावे का? तो ख्रिश्‍चनांचा छळ का करतो? आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये म्हणून आपण काय करावे? (w०६ १/१५)

[तळटीप]

^ परि. 2 टेहळणी बुरूज (इंग्रजी) नोव्हेंबर १५, २००५ अंकातील “दियाबल वास्तविक आहे का?” ही लेखमाला व सप्टेंबर १, २००१ अंकातील “दियाबल अस्तित्वात आहे का?” ही लेखमाला पाहावी.

तुमचे उत्तर काय आहे?

• आपण कधीही कोणाची निंदा का करू नये?

१ योहान ३:१५ यानुसार आपण नरहिंसक होण्याचे कसे टाळू शकतो?

• आपण धर्मत्यागी व्यक्‍तींबद्दल कसा दृष्टिकोन बाळगावा व का?

• आपण या जगावर प्रीती का करू नये?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

आपली ख्रिस्ती एकता भंग करण्यास दियाबलाला कधीही वाव देऊ नका

[१६ पानांवरील चित्रे]

आपण जगावर प्रीती करू नये असे योहानाने आपल्याला का आर्जवले?