व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘सावध राहा’

‘सावध राहा’

‘सावध राहा’

“भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवितो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.”—नीतिसूत्रे १४:१५.

१, २. (क) सदोममध्ये लोटला आलेल्या अनुभवावरून आपण कोणता धडा घेऊ शकतो? (ख) ‘सावध राहा’ या संज्ञेचा काय अर्थ होतो?

 अब्राहामने जेव्हा लोटला त्याच्या आवडीचा प्रदेश निवडून घेण्याची संधी दिली तेव्हा लोटची नजर ‘परमेश्‍वराच्या बागेसारख्या’ सर्वत्र भरपूर पाणी असलेल्या प्रदेशावर पडली. आपल्या कुटुंबासोबत स्थाईक होण्याकरता हेच सर्वात उत्तम ठिकाण आहे असे लोटला वाटले असावे कारण “यार्देनेची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली” आणि त्याने आपला डेरा सदोमापाशी दिला. पण दिसते तसे नेहमीच नसते. कारण, “सदोमातील रहिवासी . . . दुष्ट . . . परमेश्‍वराविरुद्ध महापातके करणारे होते.” (उत्पत्ति १३:७-१३) काळाच्या ओघात लोट व त्याच्या कुटुंबाला बऱ्‍याच संकटांना तोंड द्यावे लागले. शेवटी तर त्याच्यावर व त्याच्या मुलींवर एका गुहेत आश्रय घेण्याची पाळी आली. (उत्पत्ति १९:१७, २३-२६, ३०) सुरुवातीला त्याला जे इतके चांगले दिसत होते ते अगदी उलट निघाले.

लोटवर आलेल्या प्रसंगावरून आज देवाचे सेवक धडा घेऊ शकतात. आपल्याला निर्णय घ्यावे लागतात तेव्हा आपण सर्व संभाव्य धोक्यांचा विचार केला पाहिजे. पहिल्या नजरेत जे दिसते त्यावर कधीही भाळू नये. म्हणूनच तर देवाचे वचनही आपल्याला असा आग्रह करते की आपण ‘सावध राहावे.’ (१ पेत्र १:१३) बायबल विद्वान आर. सी. एच. लेन्स्की म्हणतात, की सावधपणा म्हणजे, “शांतचित्त किंवा स्थिरबुद्धी जी सर्व गोष्टींचा सारासार विचार केल्यावर योग्य निर्णय घेण्यास आपली मदत करते.” कोणत्या काही प्रसंगांत आपण सावधपणाने वागले पाहिजे याचा आता विचार करू या.

व्यापार करण्याची संधी स्वीकारण्याआधी

३. कोणी आपल्यासमोर नव्या व्यापाराचा प्रस्ताव ठेवल्यास सावध राहणे का महत्त्वाचे आहे?

एखाद्या प्रतिष्ठित व्यक्‍तीने, किंवा एखाद्या सहविश्‍वासू बांधवाने तुमच्यासमोर व्यापाराचा प्रस्ताव ठेवला आहे असे समजा. या व्यापारात नक्कीच खूप फायदा आहे असे तो तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो; शिवाय, लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर हातची संधी जाईल असेही बजावून सांगतो. हे ऐकल्यावर कदाचित तुम्ही आपली परिस्थिती सुधारण्याचे, आपल्या कुटुंबासोबत सुखात राहण्याचे स्वप्न पाहू लागाल. यामुळे आपल्याला आध्यात्मिक कार्यांकरता जास्त वेळ देता येईल असाही तर्क कदाचित तुम्ही कराल. पण नीतिसूत्रे १४:१५ हा इशारा देते: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवितो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.” नवा उद्योग सुरू करण्याच्या उत्साहाच्या भरात संभाव्य धोक्यांना क्षुल्लक लेखले जाऊ शकते, नुकसान होण्याच्या शक्यतेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते व उद्योगधंद्यांत सहसा येणाऱ्‍या अडीअडचणींकडे कानाडोळा केला जाऊ शकतो. (याकोब ४:१३, १४) अशा परिस्थितीत, सर्व दृष्टीने सावध राहणे किती महत्त्वाचे आहे!

४. व्यापाराच्या एखाद्या प्रस्तावाला तोलून पाहताना आपण कशाप्रकारे ‘नीट पाहून पाऊल टाकू’ शकतो?

विचारशील व्यक्‍ती निर्णय घेण्याआधी अशाप्रकारच्या व्यापाराच्या प्रस्तावाला काळजीपूर्वक तोलून पाहील. (नीतिसूत्रे २१:५) असे केल्यास, वरवर न दिसणारे अनेक धोके लक्षात येऊ शकतात. येथे उदाहरणादाखल दिलेल्या परिस्थितीचा विचार करा: एकाला त्याच्या धंद्यासाठी पैसे उधार घ्यायचे आहेत. तुम्ही पैसे दिल्यास, उद्योगात होणाऱ्‍या नफ्यातून मोठा हिस्सा देईन असे तो तुम्हाला सांगतो. प्रस्ताव तर अतिशय आकर्षक आहे, पण यात काही धोके दडलेले आहेत का? पैसा उधार घेणारा, उद्योगात नफा झाला नाही तरी तुमचे पैसे परत देण्याची हमी देतो का, की उद्योगात नफा झाला तरच तुमचे पैसे परत मिळण्याची आशा आहे? दुसऱ्‍या शब्दांत, जर हा उद्योग बुडाला तर तुमचे पैसेही बुडाले असे समजायचे का? तुम्ही असाही प्रश्‍न विचारू शकता: “या उद्योगासाठी एखाद्या व्यक्‍तीकडून पैसे उधार घेण्याची गरज का उद्‌भवली? बँकांना हा उद्योग फारच जोखिमीचा वाटला असावा का?” अशाप्रकारे सर्व संभाव्य धोक्यांचा विचार केल्यास तुम्हाला या प्रस्तावाकडे वास्तविक दृष्टिकोनातून पाहता येईल.—नीतिसूत्रे १३:१६; २२:३.

५. (क) यिर्मयाने एक शेत विकत घेतले तेव्हा त्याने सुज्ञतेने कोणते पाऊल उचलले? (ख) केव्हाही पैशाचे व्यवहार करताना औपचारिक लेखी ठरावपत्र तयार करणे का महत्त्वाचे आहे?

संदेष्टा यिर्मया याने त्याच्यासारखाच यहोवाचा उपासक असणाऱ्‍या आपल्या भावाकडून शेत विकत घेतले तेव्हा त्याने साक्षीदारांपुढे त्या सौद्याची लेखी नोंद केली. (यिर्मया ३२:९-१२) आजच्या काळातही सूज्ञ व्यक्‍ती कोणतेही पैशाचे व्यवहार करताना, अगदी नातेवाईकांसोबत किंवा सहविश्‍वासू बांधवांसोबत व्यवहार करतानाही त्या व्यवहारांची औपचारिकपणे लेखी ठरावपत्रात नोंद करेल. * सुस्पष्टपणे नोंद केलेल्या व विचारपूर्वक तयार केलेल्या लेखी ठरावपत्रामुळे गैरसमज टाळता येतात आणि मंडळीतली एकता कायम राहते. दुसरीकडे पाहता, पैशाच्या व्यवहारांमुळे यहोवाच्या सेवकांमध्ये समस्या निर्माण होतात तेव्हा लेखी ठरावपत्र नसल्यास गुंता आणखीनच वाढतो. दुःखाची गोष्ट म्हणजे अशा समस्यांमुळे मने दुखावली जातात, वैरभाव उत्पन्‍न होतो आणि कधीकधी तर एखादी व्यक्‍ती विश्‍वासातूनही पडू शकते.

६. लोभी वृत्तीपासून सांभाळून राहणे का महत्त्वाचे आहे?

लोभी वृत्तीपासूनही आपण सांभाळून राहिले पाहिजे. (लूक १२:१५) मोठा नफा मिळण्याचे स्वप्न पाहून एखादी व्यक्‍ती अंधळेपणाने जोखिमीच्या व्यापारात पडू शकते. यहोवाच्या सेवेत ज्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या सोपवण्यात आल्या अशा व्यक्‍तींपैकीही काहीजण याप्रकारच्या समस्येत गुंतल्याची उदाहरणे आहेत. देवाचे वचन आपल्याला हा इशारा देते: “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे.” (इब्री लोकांस १३:५) व्यापाराची संधी स्वीकारण्याआधी ख्रिस्ती व्यक्‍तीने विचार करावा, ‘या व्यापारात गुंतणे खरोखरच आवश्‍यक आहे का?’ साधी राहणी ठेवून यहोवाच्या उपासनेत जास्तीतजास्त वेळ दिल्याने, ‘सर्व प्रकारच्या वाइटापासून’ आपले संरक्षण होईल.—१ तीमथ्य ६:६-१०.

अविवाहित ख्रिस्ती व्यक्‍तींपुढे असणारी आव्हाने

७. (क) अनेक अविवाहित ख्रिस्ती व्यक्‍तींना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते? (ख) विवाह जोडीदार निवडणे देवाला एकनिष्ठ राहण्याशी कशाप्रकारे संबंधित आहे?

यहोवाच्या सेवकांपैकी अनेकजण लग्न करण्यास उत्सुक आहेत, पण अद्याप त्यांना योग्य साथीदार सापडलेला नाही. काही देशांत अविवाहित व्यक्‍तींवर लग्न करण्यासाठी बराच दबाव आणला जातो. पण सहविश्‍वासू बांधवांमध्ये संभाव्य जोडीदारांना भेटण्याच्या संधी कदाचित सीमितच असतील. (नीतिसूत्रे १३:१२) अर्थात, ख्रिस्ती हे जाणतात, की “केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याची बायबलमधील आज्ञा पाळणे यहोवाला एकनिष्ठ राहण्याशी संबंधित आहे. (१ करिंथकर ७:३९) अविवाहित ख्रिस्ती व्यक्‍तींना अनेक दबाव व मोहांना तोंड द्यावे लागते; व या दबावांना व मोहांना यशस्वीरित्या तोंड देण्याकरता त्यांनी सावध राहणे अतिशय महत्त्वाचे आहे.

८. शुलेमकरिणीवर कोणत्या प्रकारचा दबाव आला आणि आज ख्रिस्ती स्त्रियांना अशाचप्रकारच्या आव्हानाला कशाप्रकारे तोंड द्यावे लागू शकते?

गीतरत्नात, शुलेमकरीणीला पाहून राजा मोहित होतो. ही साधी गावकरी मुलगी आधीच एका तरुणाच्या प्रेमात पडलेली असते, पण तरीसुद्धा राजा आपली संपत्ती, प्रतिष्ठा व लाघवी भाषणाने तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. (गीतरत्न १:९-११; ३:७-१०; ६:८-१०, १३) तुम्ही एक ख्रिस्ती स्त्री असाल, तर तुमच्याकडे कोणीतरी अनावश्‍यक लक्ष देत असल्याचा अनुभव तुम्हालाही येऊ शकतो. तुम्ही जेथे काम करता तेथे एखादी व्यक्‍ती, कदाचित अधिकारपदी असणारी एखादी व्यक्‍ती तुमची स्तुती करण्याचा, तुमची खुशामत करण्याचा प्रयत्न करू लागेल. काही न काही निमित्त काढून तुमच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करू लागेल. अशाप्रकारे वागणाऱ्‍यांपासून सावध राहा. असे वागणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीचा उद्देश तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करण्याचा किंवा अनैतिक नसेल. पण सहसा हाच उद्देश असतो. शुलेमकरिणीप्रमाणे एखाद्या मजबूत ‘तटासारखे’ किंवा भिंतीसारखे बना. (गीतरत्न ८:४, १०) अनावश्‍यक लक्ष देणाऱ्‍या व्यक्‍तींना स्पष्ट नकार द्या. आपण यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक आहोत हे आपल्या सहकाऱ्‍यांना सुरुवातीपासूनच सांगा आणि त्यांना साक्ष देण्याची एकही संधी गमवू नका. तुम्ही असे केल्यास तुमचे संरक्षण होईल.

९. इंटरनेटवर एखाद्या अनोळखी व्यक्‍तीसोबत मैत्री करण्यात कोणते धोके दडलेले आहेत? (पृष्ठ २५ वरील चौकट पाहा.)

अविवाहित व्यक्‍तींना जोडीदार शोधण्यास मदत करणाऱ्‍या इंटरनेट साईट्‌स अलीकडे बऱ्‍याच लोकप्रिय झाल्या आहेत. एरवी जिच्याशी भेट होणे शक्य नाही अशा व्यक्‍तीची भेट या साईट्‌सच्या माध्यमाने होणे शक्य आहे असे काहींना वाटते. पण एखाद्या अनोळखी व्यक्‍तीसोबत डोळे झाकून मैत्री करणे अतिशय धोकेदायक ठरू शकते. इंटरनेटवर खरे काय आणि खोटे काय हे ठरवणे तितके सोपे नसते. (स्तोत्र २६:४) आपण यहोवाचे सेवक आहोत असे म्हणणारी प्रत्येक व्यक्‍ती खरे बोलत नसते. शिवाय, इंटरनेटवर एखाद्या विरुद्धलिंगी व्यक्‍तीशी मैत्री केल्यावर फार लवकर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते आणि असे घडल्यास डोळसपणे निर्णय घेणे कठीण बनू शकते. (नीतिसूत्रे २८:२६) इंटरनेटच्या माध्यमाने असो किंवा इतर कोणत्या माध्यमाने असो, ज्या व्यक्‍तीबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे अशा व्यक्‍तीशी जवळीक करणे केव्हाही सुज्ञपणाचे ठरणार नाही.—१ करिंथकर १५:३३.

१०. सहविश्‍वासू बांधव अविवाहित ख्रिस्ती व्यक्‍तींना कसे प्रोत्साहन देऊ शकतात?

१० यहोवा आपल्या सेवकांप्रती “फार कनवाळू” आहे. (याकोब ५:११) आपल्या इच्छेविरुद्ध अविवाहित असणाऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तींना कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते, यामुळे त्यांना कधीकधी किती निराश वाटते हे यहोवाला माहीत आहे आणि तो अशा व्यक्‍तींच्या एकनिष्ठतेची कदर करतो. इतरजण अशा व्यक्‍तींना कशाप्रकारे प्रोत्साहन देऊ शकतात? आपण नेहमी त्यांच्या विश्‍वासूपणाची व आत्मत्यागी वृत्तीची प्रशंसा केली पाहिजे. (शास्ते ११:३९, ४०) तसेच एकमेकांना प्रोत्साहन देण्याकरता तुम्ही इतर बांधवांना आपल्या घरी बोलावता किंवा इतर बेत आखता, तेव्हा मंडळीतल्या अविवाहित व्यक्‍तींनाही त्यात सामील केले जाऊ शकते. अलीकडे तुम्ही असे केले आहे का? शिवाय, आपण त्यांच्याकरता प्रार्थना करू शकतो आणि यहोवाने त्यांना आध्यात्मिक जीवनात स्थिर राहण्याकरता व त्याची सेवा आनंदाने करत राहण्याकरता मदत करावी अशी आपण त्याला विनंती करू शकतो. प्रामाणिक आस्था व्यक्‍त करण्याद्वारे आपण हे दाखवले पाहिजे की यहोवा जशी या एकनिष्ठ अविवाहित व्यक्‍तींची कदर करतो तशी आपणही करतो.—स्तोत्र ३७:२८.

आजारपणाला तोंड देताना

११. गंभीर आजारपणामुळे कोणती आव्हाने येऊ शकतात?

११ आपल्याला किंवा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्‍तीला गंभीर आजारपणाला तोंड द्यावे लागते तेव्हा तो निश्‍चितच अतिशय दुःखदायी अनुभव असतो! (यशया ३८:१-३) सर्वात चांगला उपचार शोधताना आपण शास्त्रवचनांतील तत्त्वांना जडून राहणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, खरे ख्रिस्ती रक्‍त वर्ज्य करण्याच्या बायबलमधील आज्ञेचे पालन करण्याची काळजी घेतात आणि ते अशी कोणतीही चिकित्सा किंवा उपचार टाळतात की ज्याचा संबंध भूतविद्येशी असू शकतो. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९; गलतीकर ५:१९-२१) ज्यांना वैद्यकीय प्रशिक्षण नाही त्यांना साहजिकच निरनिराळ्या उपचारपद्धतींची तुलना करणे व कोणती योग्य ते ठरवणे अतिशय अवघड वाटू शकते. अशा परिस्थितीत आपण कशाप्रकारे सावध राहू शकतो?

१२. उपचारांचे पर्याय निवडताना ख्रिस्ती व्यक्‍ती संतुलित दृष्टिकोन कसा बाळगू शकते?

१२ “शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.” असे करण्यासाठी आपण बायबलमधून व ख्रिस्ती प्रकाशनांतून संशोधन करू शकतो. (नीतिसूत्रे १४:१५) काही भागांत तितके डॉक्टर व इस्पितळे नाहीत. अशा ठिकाणी पारंपरिक उपचारपद्धती, ज्यांत जडीबुटींचा उपयोग केला जातो हा एकच पर्याय कदाचित उपलब्ध असेल. जर आपण अशाप्रकारचा उपचार घेण्याचा विचार करत असू तर यासंबंधी टेहळणी बुरूज (इंग्रजी) एप्रिल १५, १९८७ अंकातील पृष्ठे २६-९ यात आपल्याला उपयोगी माहिती मिळू शकते. या लेखांत आपल्याला अशा उपचारांतील संभाव्य धोक्यांबद्दल सावध केले आहे. उदाहरणार्थ आपण पुढील माहिती काढू शकतो: हा पारंपरिक वैद्य भूतविद्या करण्याबद्दल प्रसिद्ध आहे का? आजारपण व मृत्यू देवीदेवतांच्या (किंवा पूर्वजांच्या आत्म्याच्या) कोपामुळे होतो किंवा जादूटोणा करणाऱ्‍या शत्रूंमुळे होतो अशाप्रकारच्या विश्‍वासांवर ही उपचारपद्धत आधारित आहे का? औषधे तयार करताना किंवा त्यांचा वापर करताना बलिदाने, मंत्रतंत्र किंवा भूतविद्येशी संबंधित असणारे इतर रितीरिवाज पाळले जातात का? (अनुवाद १८:१०-१२) अशाप्रकारच्या संशोधनामुळे आपल्याला बायबलमधील हा प्रेरित सल्ला पाळणे शक्य होईल: “सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा.” * (१ थेस्सलनीकाकर ५:२१) तसेच संतुलित दृष्टिकोन राखणे शक्य होईल.

१३, १४. (क) शारीरिक आरोग्यासंबंधी माफक दृष्टिकोन असल्याचे आपण कसे दाखवू शकतो? (ख) आपण इतरांसोबत आरोग्य व उपचारांसंबंधी चर्चा करतो तेव्हा आपला माफक दृष्टिकोन का असावा?

१३ जीवनाच्या सर्व क्षेत्रांत माफक दृष्टिकोन बाळगणे महत्त्वाचे आहे. ही गोष्ट आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या बाबतीतही खरी आहे. आपल्या आरोग्याची माफक प्रमाणात काळजी घेतल्यामुळे जीवनाच्या मोलवान देणगीची आपल्याला कदर आहे हे आपण दाखवतो. आपल्याला आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते तेव्हा साहजिकच त्यांच्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. पण जोपर्यंत राष्ट्रांना निरोगी करण्याची देवाची नियुक्‍त वेळ येत नाही तोपर्यंत परिपूर्ण आरोग्याची अपेक्षा आपण करू शकत नाही. (प्रकटीकरण २२:१, २) शारीरिक आरोग्याला आपण इतके महत्त्व देऊ नये की ज्यामुळे अधिक महत्त्वाच्या आध्यात्मिक कार्यांकडे लक्ष देण्याकरता आपल्याला वेळ मिळणार नाही. याबाबतीत सावध राहणे महत्त्वाचे आहे.—मत्तय ५:३; फिलिप्पैकर १:१०.

१४ इतरांसोबत यांविषयी चर्चा करतानाही आपण माफक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. ख्रिस्ती सभा व संमेलनांत आपण आध्यात्मिक सहभागितेकरता एकत्र येतो तेव्हा त्या ठिकाणी आरोग्य व उपचार हेच आपल्या संभाषणाचे मुख्य विषय असू नयेत. शिवाय, उपचारांसंबंधी निर्णय घेताना बायबलमधील तत्त्वे, त्या व्यक्‍तीचा विवेक व यहोवासोबतचा तिचा नातेसंबंध या गोष्टींचा समावेश असतो. तेव्हा एखाद्या सहविश्‍वासू बांधवावर आपले विचार लादणे किंवा त्याला त्याच्या विवेकाकडे दुर्लक्ष करण्यास गळ घालणे निश्‍चितच प्रेमळपणाचे ठरणार नाही. मंडळीतल्या अनुभवी व्यक्‍तींचा सल्ला घेण्यात काही गैर नाही. पण प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने “आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे” अर्थात आपले निर्णय स्वतः घेण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. “आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबधी [देवाला] हिशेब देईल.”—गलतीकर ६:५; रोमकर १४:१२, २२, २३.

आपण तणावाखाली असतो तेव्हा

१५. तणावपूर्ण परिस्थिती कशाप्रकारे एक आव्हान ठरू शकते?

१५ तणावपूर्ण परिस्थितीमुळे यहोवाचे एकनिष्ठ सेवक देखील कधीकधी अविचारीपणे बोलू किंवा वागू शकतात. (उपदेशक ७:७) अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देताना ईयोबही काही प्रमाणात आपले संतुलन गमवून बसला व त्याला आपल्या विचारसरणीत फेरबदल करावा लागला. (ईयोब ३५:२, ३; ४०:६-८) “मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता,” तरीसुद्धा एकदा संतप्त होऊन तो अविचारीपणे बोलला. (गणना १२:३; २०:७-१२; स्तोत्र १०६:३२, ३३) शौल राजाला जिवे मारण्याच्या अनेक संधी मिळूनही दाविदाने आत्मसंयम बाळगला व हे कौतुकास्पद होते. पण नाबालने त्याचा अपमान केला व त्याच्या माणसांना शिवीगाळ केला तेव्हा मात्र दावीद इतका क्रोधित झाला की त्याने अविचारीपणाने निर्णय घेतला. अबीगईल हिने मध्ये पडून त्याला थांबवले तेव्हा कोठे तो शुद्धीवर आला आणि अशारितीने एक भयानक चूक करण्यापासून वाचला.—१ शमुवेल २४:२-७; २५:९-१३, ३२, ३३.

१६. कोणती गोष्ट आपल्याला उतावीळपणे वागण्यापासून आवरेल?

१६ आपल्या जीवनातही अशाप्रकारचे तणावपूर्ण प्रसंग येऊ शकतात जेव्हा आपण क्षणभर अंधळे होतो व योग्य निर्णय घेऊ शकत नाही. दाविदाने केल्याप्रमाणे, इतर व्यक्‍तींचे दृष्टिकोन विचारात घेतल्यास एखादे अविचारी कृत्य करण्यापासून व उतावीळपणे पाप करण्यापासून आपण स्वतःला आवरू शकतो. (नीतिसूत्रे १९:२) शिवाय, देवाचे वचन आपल्याला असा सल्ला देते: “जर तुम्हाला कसला त्रास होत असेल तर तुम्ही रागवा, पण पाप करू नका. तुम्ही झोपायच्यावेळी त्या गोष्टीचा विचार करा आणि शांत पडून राहा.” (स्तोत्र ४:४, ईजी टू रीड व्हर्शन) शक्यतो, आपले मन शांत झाल्यावरच कोणतेही पाऊल उचलणे किंवा निर्णय घेणे शहाणपणाचे आहे. (नीतिसूत्रे १४:१७, २९) आपण यहोवाला कळकळीने प्रार्थना करू शकतो, “म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति [आपली] अंतःकरणे व [आपले] विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) देवाने दिलेली ही शांती आपल्याला मानसिक स्थैर्य देईल व सावध राहून वागण्यास आपली मदत करेल.

१७. सावध राहण्याकरता आपण यहोवावर का अवलंबून राहिले पाहिजे?

१७ धोके टाळण्याचा व सुज्ञपणे वागण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी सर्वांच्या हातून चुका या होतातच. (याकोब ३:२) कधीकधी आपण एखादे चुकीचे पाऊल उचलून स्वतःवर संकट ओढावणार असतो, पण आपल्याला त्याची जाणीवही नसते. (स्तोत्र १९:१२, १३) शिवाय, मानव प्राणी या नात्याने, यहोवाच्या मार्गदर्शनाशिवाय स्वतःचा मार्ग ठरवण्याची क्षमता किंवा हक्क आपल्याला नाही. (यिर्मया १०:२३) पण आपण किती कृतज्ञ आहोत की त्याने आपल्याला हे आश्‍वासन दिले आहे: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.” (स्तोत्र ३२:८) होय, यहोवाच्या मदतीने आपण सावध राहू शकतो. (w०६ ३/१)

[तळटीपा]

^ परि. 5 लेखी ठरावपत्रांविषयी अधिक माहितीकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले टेहळणी बुरूज ऑगस्ट १, १९९७, पृष्ठे ३०-१; नोव्हेंबर १५, १९८६ (इंग्रजी), पृष्ठे १६-१७; व सावध राहा! (इंग्रजी) फेब्रुवारी ८, १९८३, पृष्ठे १३-१५ पाहावीत.

^ परि. 12 एखाद्या आक्षेपार्ह उपचारपद्धतीचा विचार करणाऱ्‍यांनाही ही माहिती उपयोगी पडू शकते.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

खालील परिस्थितीत आपण सावध कसे राहू शकतो?

• व्यापाराचा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवला जातो तेव्हा?

• विवाह जोडीदार शोधताना?

• आजारपणाला तोंड देताना?

• तणावपूर्ण परिस्थितीत असताना?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील चौकट]

तुम्ही भरवसा ठेवू शकता का?

अविवाहित व्यक्‍तींकरता असलेल्या वेब साईट्‌स पुढील स्पष्टीकरण देऊन जबाबदारीतून मुक्‍त होतात:

“आम्ही पूर्ण खबरदारी घेतलेली असूनही, एखाद्या व्यक्‍तीबद्दल दिलेली सर्व माहिती खरी असेलच याचे आश्‍वासन आम्ही देत नाही.”

“या सेवेद्वारे उपलब्ध असणारी कोणतीही माहिती पूर्णपणे अचूक, संपूर्ण किंवा उपयुक्‍त असण्याविषयी आम्ही हमी देत नाही.”

“या सेवेद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले अभिप्राय, सल्ला, विधाने, प्रस्ताव किंवा इतर माहिती संबंधित लेखकांची असून . . . ती पूर्णपणे विश्‍वासार्ह समजण्यात येऊ नये.”

[२८ पानांवरील चित्रे]

ख्रिस्ती स्त्रिया शुलेमकरीणीचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतात?

[३० पानांवरील चित्र]

“सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा”