व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे

ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे

कुलपिता ईयोब ऊस देशात राहत होता. आताचे अरेबिया हेच पूर्वीचे ऊस होय. त्यावेळी असंख्य इस्राएली लोक इजिप्तमध्ये राहत होते. ईयोब स्वतः एक इस्राएली नव्हता; पण तो यहोवा देवाचा उपासक होता. त्याच्याविषयी बायबल म्हणते: “भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.” (ईयोब १:८) हा कालावधी, यहोवाच्या दोन उल्लेखनीय सेवकांच्या अर्थात याकोबाचा पुत्र योसेफ आणि संदेष्टा मोशे यांच्या जीवनकाळादरम्यानचा असावा.

ईयोबाचे पुस्तक ज्याने लिहिले असावे त्या मोशेला ईयोबाविषयी कदाचित, ऊस देशाजवळ असलेल्या मिद्यानमध्ये घालवलेल्या ४० वर्षांदरम्यान समजले असावे. इस्राएल लोक जेव्हा अरण्यातील त्यांच्या ४० वर्षांच्या प्रवासादरम्यानच्या शेवटास ऊस जवळ पोहंचले तेव्हा मोशेने ईयोबाच्या शेवटल्या वर्षांविषयी ऐकले असावे. * ईयोबाच्या जीवनाचे चित्रण इतक्या सुबकपणे मांडण्यात आले आहे की हा अहवाल एक वाङमयीन कलाकृती आहे, असे समजले जाते. परंतु याहूनही महत्त्वाचे म्हणजे या अहवालात महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरे मिळतात; जसे की चांगल्या लोकांना दुःख का सहन करावे लागते? देवाने दुष्टाईला आतापर्यंत का राहू दिले आहे? अपरिपूर्ण मानवही देवाशी एकनिष्ठ राहू शकतात का? ईयोबाचे पुस्तक देवाच्या ईश्‍वरप्रेरित वचनाचा भाग असल्यामुळे त्यातील संदेश सजीव आहे आणि आजही सक्रिय आहे.—इब्री लोकांस ४:१२.

“मी जन्मलो तो दिवस जळो!”

(ईयोब १:१–३:२६)

एके दिवशी सैतान, ईयोबाच्या देवावरील निष्ठेवर शंका घेतो. यहोवा हे आव्हान स्वीकारतो आणि सैतानाला ईयोबावर एकावर एक संकटे आणण्याची परवानगी देतो. ईयोब मात्र काही केल्या ‘देवाचे नाव सोडत’ नाही.—ईयोब २:९.

ईयोबाचे तीन मित्र त्याचे “समाधान” करायला अर्थात त्याला सांत्वन द्यायला येतात. (ईयोब २:११) आपल्या तोंडून एकही शब्द न काढता ते शांतपणे ईयोबाबरोबर बसतात; शेवटी ईयोबच बोलू लागतो: “मी जन्मलो तो दिवस जळो!” (ईयोब ३:३) मी “प्रकाश कधी न पाहिलेल्या अर्भकांसारखा” असतो किंवा गर्भाशयातच मेलो असतो तर किती बरे झाले असते, असे त्याला वाटते.—ईयोब ३:११, १६.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:४—ईयोबाची मुले जन्मदिवस साजरा करायचीत का? नाही. “दिवस” आणि “जन्मदिवस” यांच्यासाठी मूळ भाषेत वेगवेगळे शब्द आहेत आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा आहे. (उत्पत्ति ४०:२०) ईयोब १:४ (पं.र.भा) मध्ये वापरण्यात आलेला ‘दिवस’ हा शब्द, सूर्यादयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी सूचित करतो. ईयोबाचे सात पुत्र वर्षातून एकदा आळीपाळीने, सात दिवसांचा कौटुंबिक मेळावा भरवत, असे दिसते. या फेरीत, प्रत्येक मुलगा “आपापल्या नेमलेल्या दिवशी” आपल्या घरी हा भोजनसमारंभ ठेवत असे.

१:६; २:१—यहोवासमोर येऊन उभे राहण्यास कोणा कोणाला अनुमती होती? यहोवासमोर उभे राहणाऱ्‍यांमध्ये, त्याचा एकुलता एक पुत्र अर्थात शब्द; विश्‍वासू देवदूत आणि अवज्ञाकारी देवदूत असलेले “देवपुत्र” तसेच दियाबल सैतान यांचा समावेश होता. (योहान १:१, १८) १९१४ मध्ये जेव्हा देवाचे राज्य स्वर्गात स्थापन झाले तेव्हा सैतान आणि त्याच्या देवदूतांची हकालपट्टी झाली; तोपर्यंत त्यांना स्वर्गात येण्याची परवानगी होती. (प्रकटीकरण १२:१-१२) आपल्यासमोर येण्याची परवानगी देण्याद्वारे यहोवाने सर्व आत्मिक प्राण्यांपुढे सैतानाने केलेले आव्हान आणि त्यामुळे उठलेला वादविषय उभा केला.

१:७; २:२—यहोवा सैतानाशी थेट बोलला का? यहोवा आत्मिक प्राण्यांबरोबर संभाषण कसे करतो याबाबतीत बायबल सविस्तर काही सांगत नाही. पण, संदेष्टा मीखाया याला एक दृष्टान्त झाला ज्यात त्याने एका देवदूताला यहोवाबरोबर थेट संभाषण करताना पाहिले. (१ राजे २२:१४, १९-२३) यावरून असे दिसते, की यहोवा कोणत्याही मध्यस्थाविना सैतानाशी बोलला.

१:२१—कोणत्या अर्थाने ईयोब आपल्या ‘मातेच्या उदरात’ परत जाणार होता? यहोवा देवाने मनुष्याला “जमिनीतील मातीचा” बनवल्यामुळे येथे वापरण्यात आलेला ‘माता’ हा शब्द लाक्षणिक अर्थाने पृथ्वीस सूचित करतो.—उत्पत्ति २:७.

२:९—ईयोबाच्या पत्नीने त्याला, देवाला सोडून मरून जा असे म्हटले तेव्हा ती कोणत्या मनःस्थितीत असावी? ईयोबाच्या पत्नीवरही तेच संकट कोसळले होते जे तिच्या नवऱ्‍यावर कोसळले होते. एकेकाळी धडधाकट असलेला आपला नवरा आता एका किळसवाण्या आजाराने कसा जर्जर झाला आहे हे पाहून नक्कीच तिचे काळीज तुटत असावे. तिच्या पोटच्या सर्व मुलांचा मृत्यू तिने उघड्या डोळ्यांनी पाहिला होता. या सर्वामुळे ती दुःखात इतकी बुडून गेली, की सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टीकडे अर्थात देवाबरोबरील नातेसंबंधाकडेही तिने दुर्लक्ष केले.

आपल्याकरता धडे:

१:८-११; २:३-५. ईयोबाच्या बाबतीत पाहिल्याप्रमाणे एकनिष्ठेत, योग्य वर्तन आणि भाषण यांच्याव्यतिरिक्‍त यहोवाची सेवा करण्यामागे उचित हेतू असणे, समाविष्ट आहे.

१:२१, २२. अनुकूल तसेच प्रतिकूल परिस्थितीतही यहोवाशी एकनिष्ठ राहिल्याने आपण सैतानाला खोटे ठरवू शकतो.—नीतिसूत्रे २७:११.

२:९, १०. आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपण करत असलेल्या आध्यात्मिक गोष्टींची किंमत वाटत नसली किंवा आपला विश्‍वास सोडून देण्यासाठी ते आपल्यावर दबाव आणत असले तरीसुद्धा आपण ईयोबाप्रमाणे विश्‍वासात दृढ राहिले पाहिजे.

२:१३. ईयोबाचे मित्र त्याला देव आणि त्याच्या अभिवचनांविषयी सांगून सांत्वन देऊ शकले नाहीत कारण ते आध्यात्मिक वृत्तीचे नव्हते.

“मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही”

(ईयोब ४:१–३१:४०)

ईयोबाच्या तिन्ही मित्रांच्या बोलण्यातून एक गोष्ट दिसत होती; ईयोबाला ज्याअर्थी देवाकडून इतकी कडक शिक्षा मिळत आहे त्याअर्थी त्याने नक्कीच काहीतरी घोर पाप केले आहे, असे ते त्याला सांगत होते. अलिफज पहिल्यांदा बोलतो. नंतर बिल्दद बोलतो. बिल्ददची भाषा अतिशय खोचक आहे. सोफर तर त्याहूनही तिखट भाषा वापरतो.

ईयोब त्याला भेटायला आलेल्यांचे खोटे तर्क मान्य करत नाही. देवाने आपल्यावर पीडा का येऊ दिल्या हे समजत नसल्यामुळे तो स्वतःचे समर्थन करायचा प्रयत्न करतो. पण ईयोबाचे देवावर प्रेम आहे व तो म्हणतो: “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही.”—ईयोब २७:५.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

७:१; १४:१४—“कष्ट” किंवा ‘कष्टमय सेवा’ यांचा काय अर्थ होतो? ईयोबावर कोसळलेले संकट इतके मोठे होते, की जीवन खडतर, वेठबिगारी सारखे आहे असे त्याला वाटत होते. (ईयोब १०:१७, NW तळटीप) मनुष्य शिओलात जातो त्या—मृत्यूपासून पुनरुत्थान होईपर्यंतच्या—कालावधीची तुलना ईयोबाने वेठबिगारीशी केली आहे.

७:९, १०; १०:२१; १६:२२—ईयोबाचा पुनरुत्थानावर विश्‍वास नव्हता असे या विधानांवरून सूचित होते का? ही विधाने ईयोबाच्या जवळच्या भविष्याविषयी आहेत. मग त्याच्या बोलण्याचा काय अर्थ होतो? एक शक्यता ही असावी, की जर त्याचा मृत्यू झालाच तर त्याच्याबरोबरचे कोणी त्याला पाहू शकणार नाहीत. त्यांच्या दृष्टीत तो आपल्या घरीही पुन्हा जाणार नाही किंवा देवाचा नियुक्‍त समय येईपर्यंत त्याला कसलीच आशा राहणार नाही. ईयोबाला कदाचित असेही म्हणायचे असेल, की शिओलमध्ये गेलेला मनुष्य स्वतःहून बाहेर येऊ शकत नाही. ईयोबाचा पुनरुत्थानावर विश्‍वास होता हे ईयोब १४:१३-१५ वचनांवरून साफ दिसते.

१०:१०—यहोवाने कशाप्रकारे ईयोबाला ‘दुधासारखे ओतले व दह्‍यासारखे विरजविले’? आईच्या उदरात ईयोबाला कशाप्रकारे घडविण्यात आले त्याचे हे काव्यात्मक वर्णन आहे.

१९:२०—“मी केवळ दातांच्या कातडीनिशी बचावलो आहे” या ईयोबाच्या विधानाचा काय अर्थ होतो? ज्याला कातडी नाही अशा एखाद्या गोष्टीच्या कातडीनिशी मी बचावलो असे म्हणण्याद्वारे ईयोब कदाचित असे म्हणत असावा, की तो केवळ आपल्या जीवानिशी बचावला.

आपल्याकरता धडे:

४:७, ८; ८:५, ६; ११:१३-१५. एखाद्यावर संकट येते तेव्हा आपण लगेच असे गृहीत धरू नये की तो आपल्या पापाचे फळ भोगीत आहे व त्याच्यावर देवाची कृपादृष्टी नाही.

४:१८, १९; २२:२, ३. आपण व्यक्‍तिगत मतांच्या आधारावर नव्हे तर देवाच्या वचनाच्या आधारावर सल्ला दिला पाहिजे.—२ तीमथ्य ३:१६.

१०:१. प्रचंड दुःख झाल्यामुळे ईयोब, त्याच्यावर इतर कोणत्या कारणांसाठी पीडा आल्या होत्या यांचा विचार करू शकला नाही. आपल्यावर संकट येते तेव्हा आपण असे कटू होऊ नये; कारण आपल्याला, यांत गोवलेल्या वादविषयांबद्दलची स्पष्ट समज मिळालेली आहे.

१४:७, १३-१५; १९:२५; ३३:२४. सैतानाने आपल्यावर कोणतीही परीक्षा आणली तरी, पुनरुत्थानाची आशा आपल्याला टिकून राहण्यास मदत करू शकते.

१६:५; १९:२. आपल्या शब्दांनी इतरांना उत्तेजन, बळकटी मिळाली पाहिजे; आपले शब्द इतरांस चीड आणणारे असू नयेत.—नीतिसूत्रे १८:२१.

२२:५-७. ठोस पुरावा नसलेल्या दोषारोपांबद्दल दिलेला सल्ला निरर्थक व हानीकारक असतो.

२७:२; ३०:२०, २१. एकनिष्ठ राहण्यासाठी आपण परिपूर्णच असले पाहिजे असे नाही. ईयोबाने देवाची टीका केली हे त्याचे चुकले.

२७:५. केवळ ईयोबच स्वतःचे सत्वसमर्थन सोडू शकत होता; कारण, एक व्यक्‍ती देवाबद्दल तिला असलेल्या प्रेमाच्या आधारावरच देवाशी एकनिष्ठ राहते. म्हणूनच आपण यहोवा देवाबद्दल गाढ प्रेम विकसित केले पाहिजे.

२८:१-२८. पृथ्वीची खनिजे कोठे आहेत हे मानवाला माहीत आहे. त्यांचा शोध करत असताना तो आपल्या कौशल्यांचा उपयोग करून दूरदृष्टी असलेला कोणताही पक्षी जाऊ शकत नाही इतक्या खोलपर्यंत जाऊ शकतो. पण, ईश्‍वरी बुद्धी केवळ यहोवाचे भय बाळगल्याने मिळते.

२९:१२-१५. गरजूंना आपण आनंदाने प्रेमळ-दया दाखवली पाहिजे.

३१:१, ९-२८. ईयोबाने आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडले. त्याने, प्रणयचेष्टा, जारकर्म, इतरांशी अन्यायी व क्रूरपणे वागणे, भौतिकवाद आणि मूर्तीपूजा या सर्व गोष्टी टाळल्या.

मी “धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करीत आहे”

(ईयोब ३२:१–४२:१७)

अलीहू नावाचा एक तरुण, ईयोब आणि त्याच्या तीन मित्रांमध्ये चाललेला वाद शांतपणे ऐकत आहे. पण आता तो बोलतो. तो ईयोब आणि त्याचा छळ करणाऱ्‍या तिघांची सुधारणूक करतो.

अलीहूचे बोलणे संपताच यहोवा एका वावटळीतून उत्तर देतो. ईयोबावर आलेल्या पीडांचे तो कसलेही स्पष्टीकरण देत नाही. पण, ईयोबावर प्रश्‍नांचा भडिमार करून सर्वसमर्थ परमेश्‍वर ईयोबाला त्याच्या भयप्रद शक्‍तीची आणि महान बुद्धीची जाणीव करून देतो. आपण विचार न करता बोललो, असे कबूल करून ईयोब म्हणतो: “मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करीत आहे.” (ईयोब ४२:६) ईयोबाची परीक्षा संपल्यावर त्याला त्याच्या एकनिष्ठेचे प्रतिफळ मिळते.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

३२:१-३—अलीहू केव्हा आला? अलीहूने सर्वांचे बोलणे ऐकले होते त्याअर्थी तो, ईयोबाने बोलायला सुरुवात करायच्या काही काळ आधी आला असावा. तो कदाचित या चौघांच्या जवळपासच कोठेतरी बसला असावा जेथून त्याला त्यांचे बोलणे ऐकू येत असावे. त्याच्या तीन साथीदारांनी पाळलेले सात दिवसांचे मौन त्याने मोडले अर्थात त्याने बोलायला सुरुवात केली.—ईयोब ३:१, २.

३४:७—ईयोब “ईश्‍वरनिंदा उदकाप्रमाणे प्राशन” करणाऱ्‍या मनुष्यासारखा कसा होता? दुःखाने व्याकूळ झाल्यामुळे ईयोबाने, त्याला भेटायला आलेल्या तिघा पाहुण्यांची टीका स्वतःलाच लागू केली; पण खरे पाहता ते तिघेही देवाविरुद्ध बोलत होते. (ईयोब ४२:७) अशाप्रकारे ईयोब, आरामशीर पाणी पिणाऱ्‍या माणसासारखा शांतपणे ईश्‍वरनिंदा ऐकून घेत होता.

आपल्याकरता धडे:

३२:८, ९. मनुष्य म्हातारा झाला म्हणजे तो सुज्ञ आहे, असा अर्थ होत नाही. सुज्ञ होण्याकरता एका व्यक्‍तीला देवाच्या वचनातील समज आणि त्याच्या आत्म्याचे मार्गदर्शन मिळाले पाहिजे.

३४:३६. या नाहीतर त्या मार्गाने ‘शेवटपर्यंत आपली परीक्षा’ होते तेव्हा आपली एकनिष्ठा सिद्ध होते.

३५:२. अलीहूने आधी सर्वांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले आणि मग बोलायच्या आधी खरा मुद्दा दाखवला. (ईयोब १०:७; १६:७; ३४:५) सल्ला देण्याआधी ख्रिस्ती वडिलांनी लक्षपूर्वक ऐकले पाहिजे, पुरावे गोळा केले पाहिजेत आणि संबंधित वादविषय स्पष्टपणे समजून घेतला पाहिजे.—नीतिसूत्रे १८:१३.

३७:१४; ३८:१–३९:३०. यहोवाच्या शक्‍तीचे व बुद्धीचे प्रदर्शन करणाऱ्‍या महत्कृत्यांवर मनन केल्यामुळे आपण नम्र होतो आणि आपल्या व्यक्‍तिगत इच्छांपेक्षा त्याच्या सार्वभौमत्वाचे दोषनिवारण सर्वात महत्त्वाचे आहे हे पाहण्यास मदत मिळते.—मत्तय ६:९, १०.

४०:१-४. आपल्याला जेव्हा सर्वसमर्थ देवाविरुद्ध तक्रार करावीशी वाटते तेव्हा आपण ‘आपला हात आपल्या तोंडावर ठेवला पाहिजे.’

४०:१५–४१:३४. बेहेमोथ (पाणघोडा) आणि लिव्याथान (मगर) किती शक्‍तिशाली आहेत! देवाच्या सेवेत टिकून राहण्याकरता आपल्याला देखील या शक्‍तिशाली प्राण्यांना बनवणाऱ्‍या सृष्टीकर्त्याकडून बल हवे. तोच आपल्याला बल देतो.—फिलिप्पैकर ४:१३.

४२:१-६. यहोवाचे वचन ऐकल्यामुळे व त्याच्या शक्‍तीच्या प्रदर्शनाची आठवण करून दिल्यामुळे ईयोब देवाला ‘पाहू’ शकला किंवा त्याच्याविषयीचे सत्य समजू शकला. (ईयोब १९:२६) यामुळे त्याची विचारसरणी बदलली. शास्त्रवचनांनुसार आपली जेव्हा सुधारणूक केली जाते तेव्हा आपण आपली चूक कबूल करून आपल्या विचारसरणीत बदल केला पाहिजे.

‘ईयोबासारखा धीर’ उत्पन्‍न करा

मानवाला सहन कराव्या लागत असलेल्या दुःखासाठी देव नव्हे तर सैतान जबाबदार आहे, हे ईयोबाच्या पुस्तकावरून स्पष्ट समजते. देवाने पृथ्वीवर दुष्टाईला अद्याप राहू दिल्यामुळे, यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या व आपल्या एकनिष्ठेच्या वादविषयाच्या बाबतीत आपण कोणत्या बाजूने उभे आहोत याचे व्यक्‍तिगत उत्तर देण्यासाठी आपल्याला एक संधी मिळते.

ईयोबाप्रमाणे, यहोवावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांवर परीक्षा येईल. पण आपण या परीक्षेत टिकून राहू शकतो, हा भरवसा आपल्याला ईयोबाच्या अहवालावरून मिळतो. आपल्या समस्या या अशाच चालत राहणार नाहीत याची आठवण हा अहवाल आपल्याला करून देतो. याकोब ५:११ म्हणते: “तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतु होता तो तुम्ही पाहिला आहे.” ईयोब एकनिष्ठ राहिल्याबद्दल यहोवाने त्याला प्रतिफळ दिले. (ईयोब ४२:१०-१७) आपल्यापुढे एक अद्‌भुत आशा आहे—पृथ्वीवरील परादीसात सार्वकालिक जीवन! यास्तव, ईयोबाप्रमाणे आपणही आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्याचा निर्धार करू या.—इब्री लोकांस ११:६. (w०६ ३/१५)

[तळटीप]

^ परि. 4 ईयोबाच्या पुस्तकात, सा.यु.पू. १६५७ व सा.यु.पू. १४७३ पर्यंत अर्थात १४० पेक्षा अधिक वर्षांच्या कालावधीचा अहवाल आहे.

[६ पानांवरील चित्रे]

‘ईयोबाच्या धीरावरून’ आपण काय शिकतो?