व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नीतिसूत्रे पुस्तकातील ठळक मुद्दे

नीतिसूत्रे पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

नीतिसूत्रे पुस्तकातील ठळक मुद्दे

प्राचीन इस्राएलच्या शलमोन राजाने “तीन हजार नीतिसूत्रे कथिली.” (१ राजे ४:३२) त्याची ही नीतिसूत्रे आज आपल्याकरता उपलब्ध आहेत का? होय, आहेत. बायबलमधील नीतिसूत्रे हे पुस्तक सा.यु.पू. ७१७ साली लिहून पूर्ण झाले व त्यात शलमोनाची बरीच नीतिसूत्रे वाचायला मिळतात. या पुस्तकातील फक्‍त शेवटले दोन अध्याय लिहिण्याचे श्रेय इतर लेखकांना—याकेचा पुत्र आगूर आणि लमुएल राजा यांना दिले जाते. पण काहींचे असे मत आहे की लमुएल हे शलमोनाचेच दुसरे नाव होते.

नीतिसूत्रांच्या पुस्तकात लिहून ठेवलेल्या देवप्रेरित म्हणींचा दुहेरी उद्देश आहे—‘ज्ञान व शिक्षण संपादणे.’ (नीतिसूत्रे १:२) ही नीतिसूत्रे आपल्याला ज्ञान अर्थात बुद्धी मिळवण्यास मदत करतात. बुद्धी म्हणजे कोणतीही गोष्ट स्पष्टपणे पाहू शकण्याची व समस्या सोडवण्याकरता जवळ असलेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता. नीतिसूत्रे आपल्याला शिक्षण अर्थात ताडन, किंवा नैतिक तालीमही देतात. नीतिसूत्रांकडे लक्ष दिल्याने व त्यांतील सल्ल्याचे पालन केल्याने आपल्याला आंतरिक प्रेरणा मिळते, आपल्या आनंदात भर पडते व यशप्राप्ती होते.—इब्री लोकांस ४:१२.

‘ज्ञान संपादन कर आणि शिक्षण दृढ धरून ठेव’

(नीतिसूत्रे १:१–९:१८)

शलमोन म्हणतो, “ज्ञान [“बुद्धी,” NW] रस्त्यावर पुकारा करिते.” (नीतिसूत्रे १:२०) तिच्या या पुकाऱ्‍याकडे आपण लक्ष का दिले पाहिजे? २ ऱ्‍या अध्यायात बुद्धी संपादन केल्यामुळे मिळणाऱ्‍या अनेक फायद्यांविषयी सांगितले आहे. ३ ऱ्‍या अध्यायात, आपण यहोवासोबत घनिष्ट नातेसंबंध कसा जोडू शकतो याविषयी मार्गदर्शन केले आहे. यानंतर शलमोन म्हणतो: “ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर; आपली सर्व संपत्ति वेचून सूज्ञता संपादन कर. तू शिक्षण दृढ धरून ठेव; सोडू नको.”—नीतिसूत्रे ४:७, १३.

जगाचे अनैतिक मार्ग टाळण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल? नीतिसूत्रांच्या ५ व्या अध्यायात आपल्याला याचे उत्तर सापडते. त्यात सांगितले आहे की आपण विचारशक्‍तीचा उपयोग केला पाहिजे व जगाच्या भुरळ पाडणाऱ्‍या गोष्टी ओळखल्या पाहिजेत. तसेच अनैतिकतेमुळे घडून येणाऱ्‍या गंभीर दुष्परिणामांचाही आपण विचार केला पाहिजे. पुढच्या अध्यायात यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाला धोक्यात आणणाऱ्‍या गोष्टींविषयी ताकीद दिली आहे. ७ व्या अध्यायात अनैतिक व्यक्‍ती कशाप्रकारे वागते याविषयी खुलासा केला आहे. ही माहिती अतिशय उपयुक्‍त आहे. ८ व्या अध्यायात बुद्धी किती मौल्यवान व श्रेयस्कर आहे हे अतिशय रोचक पद्धतीने सादर केले आहे. ९ व्या अध्यायात आतापर्यंत सांगितलेल्या नीतिसूत्रांचा समारोप, एका लक्षवेधक दृष्टान्ताच्या रूपात केला आहे, जो आपल्याला बुद्धी संपादन करण्याची प्रेरणा देतो.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:७; ९:१०—यहोवाचे भय बुद्धीचा किंवा “ज्ञानाचा प्रारंभ” आहे असे का म्हणण्यात आले आहे? यहोवाचे भय असल्याशिवाय ज्ञान असू शकत नाही कारण तोच सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आणि शास्त्रवचनांचा लेखक आहे. (रोमकर १:२०; २ तीमथ्य ३:१६, १७) तो अस्सल ज्ञानाचा मूळ स्रोत आहे. त्यामुळे, ज्ञानाचा प्रारंभ हा यहोवाचे श्रद्धापूर्ण भय बाळगल्याने होतो. देवाचे भय बुद्धीचाही आरंभ आहे कारण ज्ञान असल्याशिवाय बुद्धी असू शकत नाही. शिवाय, जी व्यक्‍ती यहोवाचे भय बाळगत नाही तिच्याजवळ कितीही ज्ञान असले तरी ती त्याचा उपयोग निर्माणकर्त्या देवाचे गौरव करण्याकरता करणार नाही.

५:३—वेश्‍येला ‘परस्त्री’ का म्हटले आहे? नीतिसूत्रे २:१६, १७ यात ‘परस्त्रीबद्दल’ असे म्हटले आहे की “ती आपल्या देवाचा करार विसरली आहे.” प्राचीन इस्राएलात जो कोणी खोट्या देवांची उपासना करत असे, किंवा जो कोणी मोशेच्या नियमशास्त्राचे उल्लंघन करत असे त्याला परका मानले जात असे. अशाप्रकारच्या लोकांत वेश्‍येचाही समावेश होता.—यिर्मया २:२५; ३:१३.

७:१, २—“माझी वचने” व “माझ्या आज्ञा” यांत कशाचा समावेश होतो? बायबलमधील नीतिनियमांसोबतच यांत कुटुंबातील सदस्यांच्या भल्याकरता आईवडिलांनी घालून दिलेले कौटुंबिक नियम व आज्ञाही येतात. लहान मुलांनी आईवडिलांकडून शिकवल्या जाणाऱ्‍या शास्त्रवचनांतील नीतिनियमांसोबतच अशा नियमांचेही पालन केले पाहिजे.

८:३०—“कुशल कारागीर” कोण आहे? व्यक्‍तीरूपात वर्णन केलेली बुद्धी स्वतःला कुशल कारागीर म्हणते. बुद्धीच्या गुणांचे अशाप्रकारे व्यक्‍तीरूपात वर्णन करणे निव्वळ एक भाषालंकारच नसून, ते देवाच्या ज्येष्ठपुत्राला, येशू ख्रिस्ताला तो पृथ्वीवर येण्याच्या आधीच्या अवस्थेत सूचित करते. पृथ्वीवर जन्म होण्याच्या बऱ्‍याच काळाआधी त्याला ‘देवाच्या सृष्टिक्रमाच्या आरंभी पैदा करण्यात आले.’ (नीतिसूत्रे ८:२२) ‘कुशल कारागीराच्या’ रूपात त्याने सर्व गोष्टींची निर्मिती केली जात असताना आपल्या पित्यासोबत हिरीरीने सहभाग घेतला.—कलस्सैकर १:१५-१७.

९:१७—“चोरिलेले पाणी” म्हणजे काय व ते “गोड” का लागते? वैवाहिक बंधनात बांधलेल्या पतीपत्नींनी लैंगिक आनंदाचा उपभोग घेण्याची तुलना बायबलमध्ये विहिरीतून काढलेले पाणी पिण्याशी केली आहे. त्याअर्थी, चोरलेले पाणी हे लपून अनैतिक लैंगिक संबंध ठेवण्यास सूचित करते. (नीतिसूत्रे ५:१५-१७) इतरांपासून ही गोष्ट लपवून ठेवल्याच्या आनंदामुळे हे पाणी गोड भासते.

आपल्याकरता धडे:

१:१०-१४. धनसंपत्तीचे आमीष दाखवणाऱ्‍या दुर्जनांच्या पापी मार्गांत वाहवत जाण्यापासून आपण सांभाळून राहिले पाहिजे.

३:३. प्रेमदया व सत्य यांना आपण अतिशय मौल्यवान समजले पाहिजे आणि एखाद्या महागड्या दागिन्याप्रमाणे हे गुण प्रदर्शित केले पाहिजेत. तसेच हे गुण आपण आपल्या हृदयावर लिहून ठेवले पाहिजेत, अर्थात ते आपल्या जीवनात पूर्णपणे सामावून गेले पाहिजेत.

४:१८. आध्यात्मिक ज्ञान हे प्रगतीशील असते. या प्रकाशात टिकून राहण्याकरता आपण सदोदीत नम्रतेने व लीनतेने वागले पाहिजे.

५:८. आपण सर्व प्रकारच्या अनैतिक प्रभावांपासून दूर राहिले पाहिजे, मग ते संगीत, मनोरंजन, इंटरनेट, पुस्तके व मासिके किंवा इतर कोणत्याही माध्यमाने आपल्यापर्यंत येवोत.

५:२१. यहोवावर प्रेम करणारा काही क्षणांच्या सुखाच्या मोबदल्यात खऱ्‍या देवासोबतचा आपला नातेसंबंध गमवण्यास तयार होईल का? मुळीच नाही! नैतिक शुद्धता टिकवून ठेवण्याची सर्वात शक्‍तिशाली प्रेरणा आपल्याला या जाणिवेतून मिळू शकते, की यहोवा आपले सर्व मार्ग पाहतो आणि आपल्याला त्याला हिशेब द्यावा लागेल.

६:१-५. या वचनांत आपल्याला ‘जामीन राहण्याविरुद्ध,’ अर्थात, आर्थिक व्यवहारांत इतरांच्या वतीने अविचारीपणे वचनबद्ध होण्याविरुद्ध अतिशय उत्तम सल्ला सापडतो. नीट विचार केल्यानंतर जर आपल्याला आढळले की आपण उचललेले पाऊल अयोग्य होते, तर आपण विलंब न लावता ‘आपल्या शेजाऱ्‍याला अत्याग्रहाने गळ घालून’ ही समस्या सोडवण्याचा हर तऱ्‍हेने प्रयत्न केला पाहिजे.

६:१६-१९. या सात मूलभूत वर्गांत जवळजवळ प्रत्येक प्रकारचे दुष्कृत्य मोडते. आपण त्यांच्याबद्दल तिटकारा उत्पन्‍न केला पाहिजे.

६:२०-२४. लहानपणापासून शास्त्रवचनांचे शिक्षण मिळालेल्या व्यक्‍तीचे, लैंगिक अनैतिकतेच्या जाळ्यात सापडण्यापासून संरक्षण होऊ शकते. आईवडिलांनी अशाप्रकारचे शिक्षण देण्याविषयी कधीही दुर्लक्ष करू नये.

७:४. बुद्धी व सुज्ञतेला आपण प्रिय मानले पाहिजे.

आपल्याला मार्गदर्शन देणारी काही स्वतंत्र नीतिसूत्रे

(नीतिसूत्रे १०:१–२९:२७)

शलमोनाची उर्वरीत नीतिसूत्रे संक्षिप्त, स्वतंत्र म्हणींच्या रूपात आहेत. प्रामुख्याने विरोधात्मक, समानार्थी व तुलनात्मक विधानांच्या रूपात सादर केलेल्या या म्हणी, आपल्या वागण्याबोलण्याच्या व मनोवृत्तीच्या संबंधाने अतिशय मोलवान धडे देतात.

अध्याय १० ते २४ हे यहोवाचे श्रद्धापूर्ण भय मानण्याच्या महत्त्वावर भर देतात. अध्याय २५ ते २९ यांतील नीतिसूत्रांचा संग्रह “यहूदाचा राजा हिज्कीया याच्या मनुष्यांनी” केला. (नीतिसूत्रे २५:१) ही नीतिसूत्रे यहोवावर विसंबून राहण्याचे महत्त्व व इतर मौल्यवान धडे शिकवतात.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१०:६—“दुर्जनांचे मुख बलात्काराने व्याप्त असते” या वाक्यांशाचा काय अर्थ आहे? दुर्जनांशी सहसा इतरजण शत्रुभावाने वागत असल्यामुळे, इतरांकडून त्यांना मिळणारी ही वाईट वागणूक त्यांचे तोंड बंद करते. मूळ इब्री भाषेतल्या या वाक्यांशाचा असाही अनुवाद केला जाऊ शकतो: ‘दुर्जनांचे मुख जुलूमास झाकिते.’ याचा असा अर्थ असू शकतो की दुष्ट लोक कपटी हेतूने इतरांवर जुलूम करतात, पण आपल्या लाघवी भाषणाने ते आपले दुष्ट हेतू झाकून टाकतात.

१०:१०—“जो डोळे मिचकावितो तो दुःखास कारण होतो” ते कोणत्या अर्थाने? “अधम” मनुष्य केवळ “उद्दामपणाचे भाषण” करत नाही तर आपल्या हावभावांनीही, उदाहरणार्थ ‘डोळे मिचकावून’ तो आपले हेतू लपवण्याचा प्रयत्न करतो. (नीतिसूत्रे ६:१२, १३) अशाप्रकारच्या फसवणुकीमुळे तो इतरांना पुष्कळ मानसिक दुःख देतो.

१०:२९—“परमेश्‍वराचा मार्ग” म्हणजे काय? याठिकाणी आपण जीवनात कशाप्रकारे मार्गाक्रमण केले पाहिजे याविषयी सांगितलेले नसून यहोवा कशाप्रकारे मानवजातीशी व्यवहार करतो त्याविषयी सांगितलेले आहे. देव ज्या पद्धतीने मानवांशी व्यवहार करतो त्यामुळे निर्दोष व्यक्‍तींना संरक्षण मिळते तर दुष्टांचा नाश होतो.

११:३१—दुर्जनाला धार्मिकापेक्षा जास्त फळ का मिळावे? याठिकाणी फळ हे प्रत्येकाला मिळणाऱ्‍या ताडनाच्या किंवा शिक्षेच्या प्रमाणाविषयी म्हटलेले आहे. धार्मिक जेव्हा चूक करतो तेव्हा त्याला ताडनाच्या रूपात फळ मिळते. दुर्जन मात्र जाणूनबुजून पाप करतो आणि चांगल्या मार्गावर येण्यास नकार देतो. त्यामुळे त्याला आणखी कठोर शिक्षा मिळाली पाहिजे आणि मिळतेही.

१२:२३—‘ज्ञान लपवून ठेवण्याचा’ काय अर्थ होतो? ज्ञान लपवण्याचा अर्थ ते अजिबात न दाखवणे असा नाही. तर बढाई मारण्याकरता त्याचा दिखावा न करता, त्याचा विचारपूर्वक उपयोग करणे असा याचा अर्थ आहे.

१८:१९—“दुखविलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड” का असते? वेढा घातलेल्या मजबूत शहराप्रमाणे अशी व्यक्‍ती देखील तिच्याविरुद्ध चूक करणाऱ्‍याला क्षमा करून वाद मिटवण्यास सहजासहजी तयार होत नाही. त्यामुळे त्यांच्यामधील कलह “दुर्गाच्या अडसरांसारखे” होतात.

आपल्याकरता धडे:

१०:११-१४. आपल्या बोलण्याने इतरांना उत्तेजन मिळण्याकरता, आपले मन अचूक ज्ञानाने भरलेले असले पाहिजे, आपले हृदय प्रेमाने प्रेरित झालेले असले पाहिजे आणि आपण जे काही बोलतो ते विचारपूर्वक, सुज्ञतेने बोलले पाहिजे.

१०:१९; १२:१८; १३:३; १५:२८; १७:२८. कमी बोलावे आणि विचारपूर्वक बोलावे.

११:१; १६:११; २०:१०, २३. उद्योगधंद्यात, पैशांच्या व्यवहारांत आपण प्रामाणिक असावे अशी यहोवा अपेक्षा करतो.

११:४. वैयक्‍तिक बायबल अभ्यास, सभा, प्रार्थना व क्षेत्र सेवाकार्य यांकडे दुर्लक्ष करून भौतिक संपत्तीच्या मागे लागणे मूर्खपणा आहे.

१३:४. मंडळीत जबाबदारीचे पद असावे अशी “आकांक्षा” धरणे किंवा नव्या जगातील जीवन मिळवण्याची आशा धरणे केवळ पुरेसे नाही. या गोष्टी मिळवण्याकरता असलेल्या अटी पूर्ण करण्याकरता आपण परीश्रमही केले पाहिजेत.

१३:२४; २९:१५, २१. प्रेमळ पालक आपल्या मुलांचे अवास्तव लाड पुरवत नाहीत किंवा त्यांच्या अवगुणांकडे कानाडोळा करत नाहीत. उलट हे अवगुण त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वात रुजण्याआधी ते उपटून काढण्याचा प्रयत्न आईवडील करतात.

१४:१०. आपल्या मनातल्या भावना आपण नेहमीच स्पष्टपणे व्यक्‍त करू शकत नाही आणि इतरांना त्या समजतीलच असेही नाही. त्यामुळे इतरजण आपल्याला जे भावनिक सांत्वन देऊ शकतात, त्याला मर्यादा आहेत. काही समस्यांना तोंड देण्याकरता आपल्याला केवळ यहोवावर विसंबून राहावे लागू शकते.

१५:७. ज्याप्रमाणे शेतकरी एकाच ठिकाणी सगळे बी न टाकता ते संपूर्ण शेतात विखुरतो त्याचप्रमाणे आपणही एखाद्या व्यक्‍तीला आपल्याजवळ असलेले सर्व ज्ञान एकाच वेळी सांगू नये. सुज्ञ व्यक्‍ती आवश्‍यकतेनुसार हळू हळू ज्ञान विखुरतो, अर्थात त्याचा प्रसार करतो.

१५:१५; १८:१४. सकारात्मक मनोवृत्ती राखल्यास, दुःखदायक परिस्थितीतही आपल्याला आनंदी राहण्यास मदत मिळेल.

१७:२४. महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ज्याचे डोळे व मन इकडे तिकडे भरकटते अशा ‘मूर्खासारखे’ होण्याऐवजी आपण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपल्याला सुबुद्धीने वागता येईल.

२३:६-८. आदरातिथ्याचा दिखावा करण्यापासून आपण सांभाळून राहिले पाहिजे.

२७:२१. इतरजण जेव्हा आपली प्रशंसा करतात तेव्हा आपले खरे व्यक्‍तिमत्त्व उजेडात येऊ शकते. जर इतरांची प्रशंसा आपल्याला यहोवाच्या अपार कृपेची जाणीव करून देत असेल, व त्याची सेवा करत राहण्याची प्रेरणा देत असेल तर यातून आपला नम्रपणा दिसून येतो. पण जर इतरांनी प्रशंसा केल्यामुळे आपण सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहोत असे आपल्याला वाटू लागले तर मग आपल्या व्यक्‍तिमत्त्वात नम्रतेचा गुण नाही हे दिसून येईल.

२७:२३-२७. मेंढपाळ व त्यांच्या कार्याचा संदर्भ घेऊन ही नीतिसूत्रे, परीश्रम केल्याने साध्या जीवनशैलीतूनही किती समाधान मिळू शकते यावर भर देतात. विशेषतः, या नीतिसूत्रांतून आपण देवावर विसंबून राहण्याविषयीचा धडा घेतला पाहिजे. *

२८:५. यहोवाला प्रार्थना करण्याद्वारे व त्याच्या वचनाचा अभ्यास करण्याद्वारे जर आपण त्याचा शोध घेऊन त्याला ‘शरण गेलो,’ तर त्याची सेवा स्वीकारार्ह मार्गाने करण्याकरता जे काही जाणणे आवश्‍यक आहे ते “सर्व काही” आपल्याला समजेल.

‘देववाणी’

(नीतिसूत्रे ३०:१–३१:३१)

नीतिसूत्रांच्या पुस्तकाचा शेवट दोन संदेशांनी होतो. या दोन्ही संदेशांना ‘देववाणी’ म्हटले आहे. (नीतिसूत्रे ३०:१; ३१:१) आगूर याच्या संदेशात अनेक तुलना केलेल्या आहेत, ज्या आपल्याला विचार करायला लावतात. या तुलनांच्या माध्यमाने, लोभी मनुष्य कशाप्रकारे कधीही तृप्त होत नाही आणि पुरुष किती बेमालूमपणे एखाद्या स्त्रीला आपल्या मोहात पाडू शकतो हे स्पष्ट केले आहे. * तसेच स्वतःची बढाई करणे आणि क्रोधिष्टपणे बोलणे किती हानीकारक असू शकते हे देखील या संदेशात सांगितले आहे.

लमुवेलला आपल्या आईकडून मिळालेला महत्त्वाचा संदेश द्राक्षारस व मद्याच्या उपयोगासंबंधी तसेच नीतिमत्तेने न्याय करण्यासंबंधी आहे. सद्‌गुणी स्त्रीविषयीच्या वर्णनाचा या शब्दांत शेवट होतो: “तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.”—नीतिसूत्रे ३१:३१.

बुद्धी संपादन करा, ताडन स्वीकारा, देवाचे भय उत्पन्‍न करा, यहोवावर विसंबून राहा. खरोखर देवप्रेरित नीतिसूत्रांतून किती अमूल्य धडे आपल्याला मिळतात! या सल्ल्याचा अवलंब करून आपणही, “जो मनुष्य परमेश्‍वराचे भय धरितो” त्याला मिळणारा आनंद अनुभवू.—स्तोत्र ११२:१. (w०६ ९/१५)

[तळटीपा]

^ परि. 49 टेहळणी बुरूज (इंग्रजी) ऑगस्ट १, १९९१ अंकातील पृष्ठ ३१ पाहावे.

^ परि. 53 टेहळणी बुरुज जुलै १, १९९२ अंकातील पृष्ठ ३१ पाहावे.

[४ पानांवरील चित्रे]

यहोवा अस्सल ज्ञानाचा स्रोत आहे

[६ पानांवरील चित्र]

‘ज्ञान विखुरण्याचा’ काय अर्थ होतो?