व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीभेवर ताबा ठेवण्याद्वारे प्रेम आणि आदर दाखवा

जीभेवर ताबा ठेवण्याद्वारे प्रेम आणि आदर दाखवा

जीभेवर ताबा ठेवण्याद्वारे प्रेम आणि आदर दाखवा

“तुम्हांपैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी, आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.”—इफिसकर ५:३३.

१, २. सर्व विवाहितांनी स्वतःला कोणता महत्त्वाचा प्रश्‍न विचारला पाहिजे, व का?

 समजा तुम्हाला एक पाकीट भेट म्हणून मिळते ज्यावर “हॅण्डल वीथ केअर” म्हणजे सांभाळून हाताळावे, अशी अक्षरे गिरवलेली आहेत. तुम्ही ते पाकीट कसे हाताळाल? ते खाली पडून त्यातील वस्तु फुटून जाऊ नये म्हणून तुम्ही अतिशय काळजीपूर्वक ते धराल. तुमचा विवाह जोडीदार जो तुम्हाला भेट म्हणून मिळाला आहे त्याच्याशी तुम्ही कसे वागाल?

इस्राएली विधवा नामी आपल्या सुनांना अर्थात अर्पा व रूथला असे म्हणाली: “परमेश्‍वर करो आणि तुम्हास पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो.” (रूथ १:३-९) उत्तम पत्नीविषयी बायबल म्हणते: “घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग होत; सुज्ञ पत्नी परमेश्‍वरापासून प्राप्त होते.” (नीतिसूत्रे १९:१४) तुम्ही जर विवाहित असाल तर, तुमचा विवाह सोबती, देवाकडून तुम्हाला मिळालेली भेट आहे, असे तुम्ही समजले पाहिजे. देवाने तुम्हाला दिलेली ही भेट तुम्ही कशी हाताळत आहात?

३. पतीपत्नीने पौलाच्या कोणत्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे?

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना लिहिताना प्रेषित पौलाने म्हटले: “तुम्हांपैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी, आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.” (इफिसकर ५:३३) पती व पत्नी आपल्या बोलण्याच्या बाबतीत या सल्ल्याचे पालन कसे करू शकतात त्यावर विचार करा.

“चंचल, भयंकर” जीभेपासून सावधान

४. जीभेचा चांगला आणि वाईट वापर कसा होऊ शकतो?

जीभ “चंचल, भयंकर” आहे जी “जहाल विषाने भरलेली” आहे, असे बायबलचा लेखक याकोब म्हणतो. (याकोब ३:८, ईजी टू रीड व्हर्शन) याकोबाला या महत्त्वपूर्ण सत्याची जाणीव होती: ताबा नसलेली जीभ विध्वंसकारी असते. तो बायबलमधील त्या नीतिसूत्राशी परिचित होता जे, अविचारी शब्दांची तुलना ‘तरवारीच्या भोसकण्याशी’ करते. याउलट, तेच नीतिसूत्र पुढे म्हणते: “सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” (नीतिसूत्रे १२:१८) होय, शब्दांचा जबरदस्त प्रभाव पडू शकतो. ते एकतर जिव्हारी लागू शकतात किंवा आरोग्यदायी ठरू शकतात. तुमच्या शब्दांचा तुमच्या विवाह सोबत्यावर कोणता परिणाम पडतो? तुम्ही जर हा प्रश्‍न तुमच्या विवाहसोबत्याला विचारलात तर तो किंवा ती काय उत्तर देईल?

५, ६. कोणत्या कारणांमुळे काहींना आपल्या जिभेवर ताबा ठेवण्यास जड जाते?

जर टोचून बोलणे नकळत तुमच्या वैवाहिक जीवनाचा भाग बनले असेल तर तुम्ही दोघे मिळून ती सुधारू शकता. पण, यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न का? दोन कारणांसाठी. एक कारण आहे, अपरिपूर्णता. वारशाने मिळालेल्या पापामुळे, आपण एकमेकांबद्दल ज्या प्रकारे विचार करतो आणि एकमेकांशी ज्याप्रकारे बोलतो त्यावर नकारात्मक परिणाम झालेला असतो. याकोबाने लिहिले: “कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरहि कह्‍यात ठेवण्यास समर्थ आहे.”—याकोब ३:२.

मानवी अपरिपूर्णतेव्यतिरिक्‍त, कौटुंबिक वातावरणामुळे देखील, जिभेचा गैरवापर होऊ शकतो. काही लोक अशा घरात लहानाचे मोठे झालेले असतात जेथे पालक “शांतताद्वेषी . . . असंयमी, क्रूर,” असे होते. (२ तीमथ्य ३:१-३) अशा वातावरणात वाढलेली मुले प्रौढ झाल्यावरही सहसा असेच गुण दाखवतात. अर्थात, अपरिपूर्णता किंवा कुटुंबातील अयोग्य वातावरण हे हानीकारक भाषाशैली वापरण्यासाठी एक सबब ठरू शकत नाही. परंतु या कारणांची जाणीव राखल्याने आपल्याला समजेल, की काहींना आपली खोचक भाषाशैली बदलण्यासाठी आपल्या जिभेवर ताबा मिळवणे कठीण का जाते.

‘दुर्भाषण सोडून द्या’

७. ‘सर्व दुर्भाषण सोडून द्या,’ या पेत्राने ख्रिश्‍चनांना दिलेल्या सल्ल्याचा काय अर्थ होतो?

विवाहात कोणत्याही कारणासाठी खोचक भाषाशैली वापरणे हे, विवाह सोबत्याबद्दल प्रेम व आदर यांचा अभाव असल्याचे दाखवते. म्हणूनच पेत्राने ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: ‘सर्व दुर्भाषणे सोडून द्या.’ (१ पेत्र २:१) ‘दुर्भाषण’ असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘अपमानकारक भाषा’ असा होतो. त्यावरून, ‘लोकांवर शब्दांचा मारा करणे’ असा अर्थ निघतो. ताबा नसलेल्या जिभेच्या परिणामांचे किती हे साजेसे वर्णन आहे!

८, ९. अपमानकारक भाषा वापरल्यामुळे कोणते परिणाम उद्‌भवू शकतात आणि विवाह जोडीदारांनी ती का टाळली पाहिजे?

अपमानजनक भाषा इतकी गंभीर वाटणार नाही परंतु एक पती किंवा पत्नी जेव्हा अशाप्रकारची भाषा वापरतो किंवा वापरते तेव्हा काय होते त्यावर जरा विचार करा. आपल्या विवाह जोडीदाराला, मूर्ख, आळशी किंवा स्वार्थी असे संबोधण्याद्वारे, पतीपत्नी आपल्या जोडीदारावर ही अपमानजनक छाप मारतात. हे निश्‍चितच प्रेमळपणाचे लक्षण नाही. आणि आपल्या जोडीदाराचे अवगुण वाढवून सांगण्याविषयी काय? “तू नेहमीच उशीर लावतेस” किंवा “तुम्ही कधीच माझं ऐकून घेत नाही” ही अशी वाक्ये फुगवून सांगितलेली वाक्ये नाहीत का? अशा वाक्यांचा बोलण्यात उपयोग केल्यास, तुमचा जोडीदार याला हमखास नकारात्मक प्रतिसाद देईल. याचे फलस्वरूप कडाक्याचे भांडण.—याकोब ३:५.

अपमानकारक भाषा असलेल्या संभाषणामुळे विवाहात तणाव निर्माण होतो व याचेही गंभीर परिणाम घडू शकतात. नीतिसूत्रे २५:२४ म्हणते: “भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरांत राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपऱ्‍याला बसणे पुरवले.” अर्थात हे वचन भांडखोर नवऱ्‍याला देखील लागू होऊ शकते. नवरा अथवा बायकोच्या झोंबणाऱ्‍या शब्दांमुळे पतीपत्नीमधील नातेसंबंध हळूहळू बिघडू शकतो आणि पतीला अथवा पत्नीला, आपण प्रेमाच्या लायक नाही, असे वाटू लागू शकते. त्यामुळे जिभेवर ताबा ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण हे कसे करता येईल?

‘जिभेला आळा घाला’

१०. जिभेला लगाम लावणे इतके महत्त्वाचे का आहे?

१० याकोब ३:८ मध्ये म्हटले आहे: “मनुष्यांपैकी कोणीहि जिभेला वश करावयास समर्थ नाही.” तरीपण, ज्याप्रमाणे एक घोडेस्वार घोड्याच्या हालचालींवर नियंत्रण करण्यासाठी लगामाचा उपयोग करतो त्याचप्रकारे आपणही आपल्या जिभेला लगाम लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. “आपण धर्मांचरण करणारे आहो, असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल, आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे.” (याकोब १:२६; ३:२, ३) या वचनांतील शब्दांवरून दिसून येते, की तुम्ही तुमच्या जिभेचा कशाप्रकारे उपयोग करता ही एक गंभीर गोष्ट आहे. यामुळे केवळ तुमच्या जोडीदाराबरोबर असलेल्या तुमच्या नातेसंबंधावरच परीणाम होत नाही तर यहोवा देवाबरोबर असलेल्या तुमच्या नातेसंबंधावर देखील होतो.—१ पेत्र ३:७.

११. वाद विकोपाला जाऊ नये म्हणून विवाहसोबती काय करण्याचे टाळू शकतात?

११ तुम्ही तुमच्या विवाह जोडीदाराबरोबर कशाप्रकारे बोलता त्यावर विचार करण्यात सुज्ञपणा आहे. तुमच्यात तणाव निर्माण झाला असेल तर तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. इसहाक आणि त्याची बायको रिबका यांच्या जीवनात उद्‌भवलेल्या एका प्रसंगाचा विचार करा. उत्पत्ति २७:४६–२८:४ मध्ये तुम्हाला तो अहवाल वाचायला मिळेल. “रिबका इसहाकास म्हणाली, या हेथीच्या मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे; यांच्यासारखी हेथीच्या मुलीतली, ह्‍या देशाच्या मुलीतली एखादी याकोबाने वरिली तर मला जगून काय लाभ?” यावर इसहाकाने कठोरपणे प्रतिक्रिया दाखवल्याची नोंद नाही. उलट त्याने त्यांचा पुत्र याकोब याला, रिबकेसाठी दुःखाचे कारण बनणार नाही अशी एक देव-भीरू पत्नी शोधून आणण्यास पाठवले. समजा पती-पत्नीत एखाद्या लहानशा गोष्टीवरून वाद होतो. अशावेळी, जोडीदाराला दोषी ठरवण्यापेक्षा समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्यास वाद विकोपाला जाणार नाही. उदाहरणार्थ, “तू/तुम्ही माझ्यासाठी कधीच वेळ काढत नाही” असे म्हणण्यापेक्षा, “मला नेहमी वाटतं, आपल्याला जास्त वेळ एकमेकांच्या सहवासात घालवता आला तर किती बरं होईल!” असे म्हणता येईल, नाही का? समस्येवर लक्ष केंद्रित करा, व्यक्‍तीवर नव्हे. कोणाचे बरोबर होते आणि कोणाचे चूक होते, याचा छडा लावत बसू नका. रोमकर १४:१९ म्हणते: “शांतीला व परस्परांच्या बुद्धीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे आपण लागावे.”

“कडूपण, संताप, क्रोध, गलबला” सोडून द्या

१२. जिभेवर ताबा ठेवण्याकरता आपण कशाबद्दल प्रार्थना केली पाहिजे व का?

१२ आपण काय बोलतो केवळ त्याबाबतीत सावधगिरी बाळगणे इतकेच जिभेवर ताबा ठेवण्यात समाविष्ट नाही. कारण, आपण मनात नेमका काय विचार करतो ते आपल्या शब्दांतून दिसून येते. येशूने म्हटले: “चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो; तसेच वाईट मनुष्य वाइटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.” (लूक ६:४५) यास्तव, जिभेवर ताबा ठेवण्याकरता तुम्हाला दाविदाप्रमाणे अशी प्रार्थना करावी लागेल: “हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्‍न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.”—स्तोत्र ५१:१०.

१३. कडूपण, संताप, क्रोध यांमुळे एखादा खोचक भाषा वापरण्यास कशाप्रकारे प्रवृत्त होऊ शकेल?

१३ पौलाने इफिसकरांना केवळ खोचक शब्द वापरण्याचे टाळा इतकेच आर्जवले नाही तर ज्या भावनांमुळे आपल्या तोंडून असे शब्द बाहेर पडतात त्या भावनांवर देखील मात करण्यास आर्जवले. त्याने लिहिले: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत.” (इफिसकर ४:३१) “गलबला व निंदा” ह्‍याआधी पौलाने “कडूपण, संताप, क्रोध” यांचा उल्लेख केला याची नोंद घ्या. खरे तर एखाद्या व्यक्‍तीच्या मनात खदखदत असलेल्या रागाचा स्फोट होतो तेव्हा त्या व्यक्‍तीच्या तोंडून खोचक शब्द बाहेर पडतात. तेव्हा स्वतःला विचारा: ‘मी माझ्या मनात संताप व क्रोध बाळगतो का? मी “रागीट” मनुष्य आहे का?’ (नीतिसूत्रे २९:२२) असाल तर मग या प्रवृत्तींवर मात करण्यास व आत्मसंयम बाळगण्यास साहाय्य मिळावे म्हणून देवाला प्रार्थना करा जेणेकरून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण करू शकाल. स्तोत्र ४:४ मध्ये (ईजी टू रीड व्हर्शन) म्हटले आहे: “रागवा, पण पाप करू नका. तुम्ही झोपायच्यावेळी त्या गोष्टीचा विचार करा आणि शांत पडून राहा.” तुमचा क्रोध वाढत चालला आहे आणि कुठल्याही क्षणी त्याचा स्फोट होऊ शकतो, असे जर तुम्हाला वाटत असेल तर लगेच नीतिसूत्रे १७:१४ मधील सल्ल्याचे पालन करा: “भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.” वातावरण निवळेपर्यंत तिथून निघून जा.

१४. पतीपत्नीने एकमेकांबद्दल मनात राग बाळगल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनावर याचा विपरित परिणाम कसा होऊ शकतो?

१४ पौलाने ज्याला “कडूपण” म्हटले अशा कटू भावना मनात असतील तर क्रोध किंवा रागावर नियंत्रण करणे सोपे नाही. पौलाने येथे वापरलेल्या ग्रीक शब्दाची व्याख्या, “समेट करण्यास नकार देण्याची संतप्त प्रवृत्ती” आणि ‘चुकांची यादी ठेवण्याची द्वेषयुक्‍त प्रवृत्ती’ अशी करण्यात आली आहे. कधीकधी पतीपत्नीमध्ये द्वेषभाव दाट धुक्यासारखा दीर्घकाळपर्यंत घुटमळत असतो. पतीपत्नी एकमेकांवर नाराज झाले असतील तर त्यांनी त्यांच्यातील वाद लवकरात लवकर मिटवला पाहिजे नाही तर त्यांच्या मनात एकमेकांबद्दल तिरस्काराची भावना उत्पन्‍न होऊ लागेल. पण झालेल्या गोष्टींबद्दल मनात राग बाळगणे व्यर्थ आहे. कारण जे घडले आहे ते तर कोणालाही बदलता येत नाही. आणि एकदा क्षमा केल्यावर पती-पत्नीने ती चूक विसरून गेले पाहिजे. प्रीती “अपकार स्मरत नाही.”—१ करिंथकर १३:४, ५.

१५. कठोर शब्द वापरण्याची सवय असलेल्यांना आपल्या भाषाशैलीत बदल करण्यास कोणती गोष्ट मदत करेल?

१५ पण समजा तुम्ही तुमच्या कुटुंबात, कठोर भाषा ऐकतच लहानाचे मोठे झालात आणि आता तुमच्या तोंडातही अशीच भाषा आहे तर काय? तुम्ही याबाबतीत बदल करू शकता. तुम्ही जीवनात अनेक प्रसंगी स्वतःला काही मर्यादा घालता की तुम्ही अमूक प्रकारे वागणार नाही. मग, भाषेच्या बाबतीत तुम्ही स्वतःला मर्यादा कोठे घालाल? तुमचे शब्द निंदात्मक होऊ लागण्याआधीच तुम्ही थांबाल का? तुम्हाला इफिसकर ४:२९ मध्ये वर्णन केलेल्या मर्यादेचे पालन करावेसे वाटेल: “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो.” असे करण्यासाठी तुम्हाला ‘जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकून . . . नवा मनुष्य, [जो] आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला धारण’ करावे लागेल.—कलस्सैकर ३:९, १०.

“मसलत” घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे

१६. पतीपत्नीने अबोला धरल्यामुळे विवाहासाठी ते हानीकारक का असू शकते?

१६ पती किंवा पत्नी अबोला धरतात तेव्हा त्यातून काही निष्पन्‍न तर होत नाही उलट हानीच जास्त होते. जोडीदाराला शिक्षा म्हणून अबोला धरला जातो, असे नाही तर कधीकधी चिडचिडपणामुळे किंवा निराशेमुळे पती-पत्नी अबोला धरतात. तरीपण, एकमेकांबरोबर बोलण्याचे थांबवल्याने आपापसातील ताण अधिकच वाढतो आणि यामुळे वाद सुटत नाही. एका पत्नीने म्हटले: “पुन्हा बोलायला सुरुवात केल्यावर मूळ समस्येविषयी आमच्यात चर्चा होतच नाही.”

१७. ज्या ख्रिश्‍चनांच्या विवाहात समस्या आहेत त्यांनी काय केले पाहिजे?

१७ विवाहात तणावाचे वातावरण असते तेव्हा तणाव कमी करण्याचे सोपे मार्ग नाहीत. नीतिसूत्रे १५:२२ म्हणते: “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात.” तुम्ही तुमच्या सोबत्याबरोबर बसून चर्चा केली पाहिजे. आपल्या सोबत्याचे म्हणणे खुल्या मनाने व मनात कसलेही पूर्वग्रह न बाळगता ऐकून घ्या. तुम्हाला असे करणे अशक्य वाटत असेल तर ख्रिस्ती मंडळीत असलेल्या वडिलांची मदत तुम्ही घेऊ शकता. त्यांना शास्त्रवचनांचे ज्ञान असते आणि बायबल तत्त्वे लागू करण्याच्या बाबतीत त्यांना अनुभव असतो. हे वडील “वाऱ्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा” असे आहेत.—यशया ३२:२.

आपल्या जीभेच्या गैरवापरावर तुम्ही आळा घालू शकता

१८. रोमकर ७:१८-२३ येथे कोणत्या समस्येशी झगडण्याविषयीचा उल्लेख करण्यात आला आहे?

१८ आपल्या जीभेला लगाम लावण्याकरता तुम्हाला बरेच झटावे लागेल. तसेच आपल्या कार्यांवरही ताबा मिळवणे सोपे नाही. प्रेषित पौलासमोर आलेल्या अडचणीविषयी बोलताना त्याने लिहिले: “मला ठाऊक आहे की, माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही; कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करितो, तर ते कर्म मीच करितो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करिते.” आपल्या ‘अवयवातील पापाच्या नियमामुळे,’ आपल्या जीभेचा आणि आपल्या शरीराच्या इतर अवयवांचा गैरवापर करण्याकडे आपला कल आहे. (रोमकर ७:१८-२३) परंतु या प्रवृत्तीवर आपण मात केलीच पाहिजे आणि देवाच्या मदतीने आपण मात करू शकतो.

१९, २०. येशूचे उदाहरण पतीपत्नीला आपल्या जीभेला लगाम लावण्यास कशाप्रकारे मदत करू शकते?

१९ प्रेम आणि आदर असलेल्या नातेसंबंधात, अविचारी, कठोर शब्दांना थारा नसतो. येशू ख्रिस्ताने याबाबतीत किती उत्तम उदाहरण मांडले त्याचा विचार करा. येशूने आपल्या शिष्यांबरोबर बोलताना कधीच अपमानजनक भाषा वापरली नाही. पृथ्वीवरील जीवनाच्या आपल्या शेवटल्या रात्रीसुद्धा, त्याच्या शिष्यांमध्ये त्यांच्यापैकी मोठा कोण यावर वाद चालले होते तेव्हा देवाच्या पुत्राने त्यांना रागावले नाही. (लूक २२:२४-२७) बायबल असा सल्ला देते: “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले.”—इफिसकर ५:२५.

२० पत्नीविषयी काय? “पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.” (इफिसकर ५:३३) पतीची भीड राखणारी पत्नी आपल्या पतीवर खेकसेल का? निंदात्मक शब्द वापरले का? पौलाने लिहिले: “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.” (१ करिंथकर ११:३) ख्रिस्त जसा त्याच्या मस्तकाधीन आहे तसेच पत्नींनी आपल्या मस्तकाच्या अधीन असले पाहिजे. (कलस्सैकर ३:१८) कोणताही अपरिपूर्ण मानव येशूचे हुबेहूब अनुकरण करू शकत नसला तरी, ‘त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्याचा’ प्रयत्न केल्यास, पतीपत्नी जीभेच्या गैरवापरावर आळा घालण्याच्या प्रयत्नात यशस्वी ठरू शकतात.—१ पेत्र २:२१. (w०६ ९/१५)

तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• बेलगाम जीभेचा विवाहात हानीकारक परिणाम कसा घडू शकतो?

• जीभेला लगाम लावणे कठीण का आहे?

• कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल?

• विवाहात तणाव निर्माण होतो तेव्हा तुम्ही काय केले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

मंडळीतील वडील बायबलमधून मदत देतात