व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विश्‍वास आणि देवाचे भय बाळगून धैर्यवान व्हा

विश्‍वास आणि देवाचे भय बाळगून धैर्यवान व्हा

विश्‍वास आणि देवाचे भय बाळगून धैर्यवान व्हा

“धैर्यवान हो, हिंमत धर! . . . तुझा देव यहोवा तुझ्याबरोबर असेल.”—यहोशवा १:९, सुबोध भाषांतर.

१, २. (क) मानवी दृष्टीतून पाहिल्यास इस्राएलांना कनानी लोकांवर विजय मिळवणे शक्य होते का? (ख) यहोवाने यहोशवाला पुन्हा कोणती खात्री दिली?

 इस्राएल राष्ट्र, सा.यु.पू. १४७३ साली वचनयुक्‍त देशाच्या उंबरठ्यावर उभे होते. आत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासमोर येणाऱ्‍या अडचणींविषयी मोशेने लोकांना अशी आठवण करून दिली: “हे इस्राएला, श्रवण कर; तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रे ताब्यात घेण्यास तू आज यार्देन उतरून जाणार आहेस; त्यांची नगरे मोठी व त्यांचे कोट गगनचुंबित आहेत; तेथील लोक धिप्पाड व उंच असून अनाकी वंशातले आहेत . . . अनाकाच्या वंशजांशी कोण सामना करील असे म्हणतात हे तू ऐकलेच आहेस.” (अनुवाद ९:१, २) होय हे धिप्पाड वीरपुरुष प्रसिद्ध होते! शिवाय, काही कनान्यांचे सैन्य आधुनिक शस्त्रसामुग्रीने सुसज्ज होते; त्यांच्याकडे घोडे होते, आणि चाकांना धारदार लोखंडी आऱ्‍या असलेले रथ होते.—यहोशवा ४:१३

दुसरीकडे पाहता, इस्राएल हे गुलामांचे राष्ट्र होते. त्यांनी नुकतीच ४० वर्षे अरण्यवासात काढली होती. त्यामुळे मानवी दृष्टीतून पाहिल्यास, विजयी होण्याची शक्यता जवळजवळ अशक्यच होती. तरीपण मोशेला विश्‍वास होता. यहोवा आपल्यापुढे एका नायकाप्रमाणे उभा आहे हे जणू काय तो ‘पाहू’ शकत होता. (इब्री लोकांस ११:२७) मोशेने लोकांना सांगितले: यहोवा ‘तुमच्यापुढे पलीकडे जात आहे. तो त्यांचा संहार करील व त्यांना तुझ्यापुढे चीत करील.’ (अनुवाद ९:३; स्तोत्र ३३:१६, १७) मोशेच्या मृत्यूनंतर यहोवाने यहोशवाला पुन्हा एकदा साहाय्याची खात्री देत असे म्हटले: “ऊठ व ह्‍यांना अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्‍या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाहि टिकाव लागणार नाही; जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरहि मी असेन.”—यहोशवा १:२,.

३. कोणत्या गोष्टीमुळे यहोशवाचा विश्‍वास वाढला व तो धैर्यवान झाला?

यहोवाचे साहाय्य आणि मार्गदर्शन मिळण्याकरता यहोशवाला देवाच्या नियमशास्त्राचे वाचन, मनन व पालन करणे अगत्याचे होते. तरच “तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ति घडेल,” असे यहोवाने त्याला म्हटले. पुढे यहोवा त्याला म्हणाला: “मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर [“धैर्यवान,” सुबोध भाषांतर] हो, हिंमत धर, घाबरु नको, कचरू नको; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्‍वर तुझ्याबरोबर असेल.” (यहोशवा १:८, ९) यहोशवाने देवाचे ऐकल्यामुळे तो धैर्यवान, हिंमती झाला व त्याला यशःप्राप्ती घडली. परंतु त्याच्या वयाच्या बहुतेक लोकांनी देवाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांना यशःप्राप्ती घडली नाही; ते अरण्यातच मरण पावले.

धैर्य खचलेले विश्‍वासहीन लोक

४, ५. (क) दहा हेर आणि यहोशवा व कालेब यांच्या मनोवृत्तीत कोणता फरक होता? (ख) लोकांनी यहोवावर विश्‍वास दाखवला नाही तेव्हा यहोवाची काय प्रतिक्रिया काय होती?

चाळीस वर्षांपूर्वी इस्राएल राष्ट्र पहिल्यांदा जेव्हा कनानजवळ आले होते तेव्हा मोशेने या देशाची पाहणी करण्यासाठी १२ हेरांना पाठवले. त्यांपैकी दहा जण घाबरून माघारी आले. ते म्हणाले: तेथील “सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले; त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो.” पण, फक्‍त अनाकाचे लोकच नव्हे तर ‘सर्वच’ लोक धिप्पाड होते का? नाही. अनाकाचे लोक जलप्रलय येण्याआधी हयात असलेल्या नेफिलीम लोकांचे वंशज होते का? नाही. पण या अफवांमुळे इस्राएली लोकांच्या छावण्यांमध्ये भीतीची लाट पसरली. काही लोक तर, ते ज्या देशात गुलाम म्हणून होते त्या मिसर अर्थात ईजिप्त देशाला पुन्हा जायलाही तयार झाले!—गणना १३:३१–१४:४.

यहोशवा आणि कालेब हे दोन हेर मात्र वचनयुक्‍त देशात प्रवेश करण्यास उत्सुक होते. ते म्हणाले: कनानी लोक “आमचे भक्ष्य होतील. त्यांचा आधार तुटला आहे पण आमच्याबरोबर परमेश्‍वर आहे. त्यांची भीती बाळगू नका.” (गणना १४:९) यहोशवा आणि कालेब विनाकारण आशा बाळगत होते का? मुळीच नाही. इस्राएल राष्ट्रांतील इतर लोकांप्रमाणे त्यांनी देखील, यहोवाने दहा पीडांद्वारे शक्‍तिशाली ईजिप्त देश आणि त्यांच्या देवांची नालस्ती केली होती हे पाहिले होते. यहोवाने फारो आणि त्याच्या सैन्याचा लाल समुद्रात कसा नाश केला होता हे देखील त्यांनी पाहिले होते. (स्तोत्र १३६:१५) तेव्हा, ते दहा हेर आणि त्यांच्या अफवांवर विश्‍वास करणारे लोक जी भीती दाखवत होते ती रास्त नव्हती. या लोकांची ही मनोवृत्ती पाहून यहोवाला अतिशय वाईट वाटले; तो अगदी कळवळून म्हणाला: “कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि ह्‍यांच्यामध्ये मी केलेली सगळी चिन्हे पाहूनहि हे कोठवर माझ्यावर विश्‍वास ठेवणार नाहीत?”—गणना १४:११.

६. धैर्य आणि विश्‍वास या गुणांचा परस्परांशी संबंध आहे तो कसा आणि हे आधुनिक दिवसांत कसे दिसून आले?

यहोवाने या लोकांची मूळ समस्या काय होती ती दाखवून दिली. त्यांच्यात विश्‍वासाची कमी असल्यामुळे त्यांची भित्रट मनोवृत्ती झाली होती. होय, विश्‍वास आणि धैर्य या गुणांचा परस्परांशी जवळून संबंध आहे. इतका की, प्रेषित योहानाने ख्रिस्ती मंडळीविषयी आणि तिच्या कल्याणाविषयी असे लिहिले: “ज्याने जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला विश्‍वास.” (१ योहान ५:४) आज, आबालवृद्ध, सशक्‍त आणि अशक्‍त असे साठ लाखांपेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार यहोशवा आणि कालेबसारखा विश्‍वास दाखवत असल्यामुळे राज्याच्या सुवार्तेचा प्रचार संपूर्ण जगभरात होत आहे. कोणताही शत्रू या शक्‍तिशाली, धैर्यवान सैन्याला रोखू शकलेला नाही!—रोमकर ८:३१.

‘माघार घेऊ’ नका

७. ‘माघार घेणे’ याचा काय अर्थ होतो?

आज यहोवाचे सेवक धैर्याने सुवार्तेचा प्रचार करतात कारण त्यांची मनोवृत्ती प्रेषित पौलाप्रमाणेच आहे. प्रेषित पौलाने असे लिहिले: “ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्‍यांपैकी आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी आहो.” (इब्री लोकांस १०:३९) पौलाने म्हटले, ‘माघार घेऊ’ नका. याचा अर्थ तात्पुरत्या काळासाठी गर्भगळीत होणे असा होत नाही; कारण देवाचे अनेक विश्‍वासू सेवक काही प्रसंगी भयभीत झाले होते. (१ शमुवेल २१:१२; १ राजे १९:१-४) तर त्याचा अर्थ, “मागे पडणे, दूर जाणे” “सत्यावरील आपली पकड ढीली” करणे, असा होतो, असे स्पष्टीकरण एका बायबल कोशात दिले आहे. या कोशात पुढे असेही म्हटले आहे, की ‘माघार घेणे’ हे एक रुपक असावे जे, देवाच्या सेवेत जणू काय “शिड खाली घेऊन जहाजाची गती कमी करणे” या अर्थावर आधारित असावे. अर्थात, भक्कम विश्‍वास असणाऱ्‍यांसमोर अडचणी जसे की छळ, आजारपण किंवा इतर परीक्षा येतात तेव्हा ते आपली “गती कमी” करण्याचा विचार देखील करत नाहीत. त्याऐवजी, ते यहोवाची सेवा करीत राहतात. त्यांना ही जाणीव असते की तो त्यांची काळजी घेतो आणि त्याला त्यांच्या मर्यादा माहीत आहेत. (स्तोत्र ५५:२२; १०३:१४) तुमचाही असाच भक्कम विश्‍वास आहे का?

८, ९. (क) यहोवाने आरंभीच्या ख्रिश्‍चनांचा विश्‍वास मजबूत कसा केला? (ख) आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी आपण काय करू शकतो?

आपला विश्‍वास कमी होत चालला आहे असे एकदा प्रेषितांना वाटल्यामुळे ते येशूला म्हणाले: “आमचा विश्‍वास वाढवा.” (लूक १७:५) त्यांनी देवाला केलेली प्रामाणिक विनंती खासकरून सा.यु. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी मान्य करण्यात आली जेव्हा शिष्यांवर पवित्र आत्मा ओतण्यात आला व त्यांना देवाच्या वचनाचे व उद्देशाचे आणखी गहन ज्ञान देण्यात आले. (योहान १४:२६; प्रेषितांची कृत्ये २:१-४) त्यांचा विश्‍वास अशाप्रकारे मजबूत करण्यात आल्यामुळे त्यांनी अगदी उत्साहाने प्रचार मोहीम सुरू केली. विरोध होत असूनही “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” सुवार्तेचा प्रचार करण्यात आला.—कलस्सैकर १:२३; प्रेषितांची कृत्ये १:८; २८:२२.

आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी आणि सेवेत पुढे जाण्यासाठी आपणही शास्त्रवचनांचा अभ्यास करून त्यावर मनन केले पाहिजे आणि पवित्र आत्मा मिळण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. यहोशवा, कालेब आणि आरंभीच्या ख्रिस्ती शिष्यांनी केले त्याप्रमाणे आपणही देवाचे सत्य आपल्या मनावर आणि आपल्या हृदयावर बिंबवले पाहिजे. तरच आपल्यात असा विश्‍वास उत्पन्‍न होईल जो आपल्याला आपल्या आध्यात्मिक युद्धात टिकून राहून विजयी होण्याचे धैर्य देईल.—रोमकर १०:१७.

केवळ विश्‍वास असणे पुरेसे नाही

१०. खऱ्‍या विश्‍वासात काय काय समाविष्ट आहे?

१० प्राचीन काळच्या देवाच्या एकनिष्ठ सेवकांच्या उदाहरणावरून दिसून येते, की जो विश्‍वास आपल्यात धैर्य व सहनशीलता उत्पन्‍न करतो त्यात केवळ देव अस्तित्वात आहे इतकाच विश्‍वास करणे समाविष्ट नाही. (याकोब २:१९) तर, आपण यहोवाला एक व्यक्‍ती म्हणून ओळखले पाहिजे आणि त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे. (स्तोत्र ७८:५-८; नीतिसूत्रे ३:५, ६) त्याचा अर्थ, देवाच्या नियमांचे व तत्त्वांचे पालन करण्यातच आपले चिरकालिक कल्याण आहे, असा आपण विश्‍वास केला पाहिजे. (यशया ४८:१७, १८) आपल्यात विश्‍वास असेल तर आपण ही पूर्ण खात्री बाळगू की यहोवा आपली सर्व अभिवचने पूर्ण करील आणि “त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ” देईल.—इब्री लोकांस ११:१, ६; यशया ५५:११.

११. यहोशवा आणि कालेबने विश्‍वास आणि धैर्य दाखवल्यामुळे त्यांना कोणता आशीर्वाद मिळाला?

११ अशाप्रकारच्या विश्‍वासाची नेहमी वाढ होत राहते, ती खुंटत नाही. आपण शिकत असलेल्या सत्याचे जसजसे आपण पालन करीत राहतो, त्याच्या लाभांचा “अनुभव” घेतो, आपल्या प्रार्थना पूर्ण होताना ‘पाहतो’ आणि इतर मार्गांद्वारे आपल्या जीवनात यहोवाच्या मार्गदर्शनाची आपल्याला जाणीव होते, तसतसा हा विश्‍वास वाढत राहतो. (स्तोत्र ३४:८; १ योहान ५:१४, १५) यहोशवा आणि कालेबने देवाचा चांगुलपणा चाखून पाहिल्यामुळे त्यांचा विश्‍वास वाढला होता, असे आपण खात्रीने म्हणू शकतो. (यहोशवा २३:१४) या मुद्द्‌यांचा विचार करा: देवाने त्यांना वचन दिले त्याप्रमाणे ते ४० वर्षांच्या अरण्य प्रवासातून सुखरूप आले होते. (गणना १४:२७-३०; ३२:११, १२) कनानवर विजय मिळवण्यासाठी इस्राएलांना सहा वर्षांपर्यंत संघर्ष करावा लागला. पण सरतेशेवटी, त्यांना दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य लाभले; शिवाय प्रत्येकाला त्याचा वारसाहक्क देखील मिळाला. जे यहोवाची विश्‍वासूपणे व धैर्याने सेवा करतात त्यांना तो सढळ हाताने प्रतिफळ देतो!—यहोशवा १४:६, ९-१४; १९:४९, ५०; २४:२९.

१२. यहोवा ‘आपल्या वचनाची थोरवी कशी वाढवतो’?

१२ यहोशवा आणि कालेबवर यहोवाने दाखवलेल्या प्रेमळ-दयेवरून आपल्याला स्तोत्रकर्त्याच्या शब्दांची आठवण होते: “तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे.” (स्तोत्र १३८:२) यहोवा जेव्हा एखाद्या अभिवचनाची हमी देण्याकरता आपल्या नावाचा उपयोग करतो तेव्हा त्या अभिवचनाच्या पूर्णतेची “थोरवी” वाढते; अर्थात आपल्या अपेक्षांपेक्षा कित्येक पटीने ते तो पूर्ण करतो. (इफिसकर ३:२०) होय, जे यहोवाच्या ठायी ‘आनंदित’ होतात त्यांना तो केव्हाही निराश करत नाही.—स्तोत्र ३७:३, ४.

‘देवाला संतोषविणारा’ मनुष्य

१३, १४. हनोखला विश्‍वास आणि धैर्याची गरज का होती?

१३ हनोख, या आणखी एका ख्रिस्तपूर्व साक्षीदाराने मांडलेल्या उदाहरणावर मनन करून आपण विश्‍वास आणि धैर्याविषयी आणखी शिकू शकतो. हनोखला त्याच्या विश्‍वासाची आणि धैर्याची परीक्षा होईल हे भविष्यवाद सुरू करायच्या आधीपासूनच माहीत होते. ते कसे? जे देवाची सेवा करतात आणि जे दियाबल सैतानाची सेवा करतात यांच्यात वैर किंवा शत्रूत्व उत्पन्‍न होईल, असे यहोवाने एदेन बागेत सांगितले होते. (उत्पत्ति ३:१५) काईनाने आपला भाऊ हाबेल याचा वध केला तेव्हाच म्हणजे मानव इतिहासाच्या सुरुवातीलाच या वैरभावाची सुरुवात झाली होती, हेही हनोखास माहीत होते. काईन आणि हाबेलाचा बाप आदाम, हनोखचा जन्म झाल्यावर जवळजवळ ३१० वर्षांपर्यंत हयात होता.—उत्पत्ति ५:३-१८.

१४ हे सर्व माहीत असूनही हनोख धैर्याने खऱ्‍या “देवाबरोबर चालला” आणि लोक यहोवाविरुद्ध ज्या “कठोर गोष्टी” बोलत होते त्यांचा त्याने निषेध केला. (उत्पत्ति ५:२२; यहुदा १४, १५) खऱ्‍या उपासनेकरता हनोखने घेतलेल्या या धैर्यवान भूमिकेमुळे पुष्कळ लोक त्याचे शत्रू बनले व यामुळे त्याच्या जिवाला धोका होता. या प्रसंगी यहोवाने हनोखला वेदनामय मृत्यूपासून वाचवले. ‘तू मला संतोषविले आहेस’ असे हनोखला प्रकट केल्यानंतर यहोवाने त्याला “लोकांतरी नेले” अर्थात तो एक भविष्यसूचक दृष्टान्त पाहत असतानाच त्याचे जीवन संपुष्टात आणले.—इब्री लोकांस ११:५, १३; उत्पत्ति ५:२४.

१५. हनोखने आजच्या यहोवाच्या सेवकांकरता कोणते उत्तम उदाहरण मांडले?

१५ हनोखच्या लोकांतराचा उल्लेख केल्यानंतर लगेच पौलाने विश्‍वासाच्या महत्त्वावर पुन्हा जोर देत म्हटले: “विश्‍वासावाचून [देवाला] संतोषविणे अशक्य आहे.” (इब्री लोकांस ११:६) होय, विश्‍वास असल्यामुळे हनोखला यहोवाबरोबर चालण्याचे आणि एका भक्‍तिहीन जगाला देवाच्या न्यायदंडाचा संदेश सांगण्याचे धैर्य मिळाले. याबाबतीत हनोखने आपल्याकरता एक उत्तम उदाहरण मांडले आहे. आपल्याला देखील, खऱ्‍या उपासनेचा विरोध करणाऱ्‍या व सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींनी भरलेल्या जगात प्रचार करायचे काम आहे.—स्तोत्र ९२:७; मत्तय २४:१४; प्रकटीकरण १२:१७.

देवाची भीती बाळगल्यामुळे मिळणारे धैर्य

१६, १७. ओबद्या कोण होता आणि तो कोणत्या परिस्थितीत होता?

१६ विश्‍वासाव्यतिरिक्‍त आणखी एका गुणामुळे धैर्य उत्पन्‍न होते. तो गुण आहे, देवाबद्दलचे आदरयुक्‍त भय. आपण संदेष्टा एलिया आणि इस्राएलच्या उत्तरेकडील राज्यांवर राज्य करणाऱ्‍या राजा अहाब यांच्या दिवसांतील एका देव-भीरू मनुष्याच्या उल्लेखनीय उदाहरणाचा विचार करूया. अहाबाच्या कारकीर्दीत, उत्तरेकडील राज्यात बआल उपासना मोठ्या प्रमाणावर बोकाळली होती. खरे तर, बआलचे ४५० पुरोहित आणि लिंगपूजा करणारे ४०० पुरोहित अहाबाच्या पत्नीच्या अर्थात ‘ईजबेलीच्या पंक्‍तीस जेवत’ होते.—१ राजे १६:३०-३३; १८:१९.

१७ ईजबेल ही यहोवाची शत्रू होती. ती अतिशय क्रूर होती व तिने तिच्या देशातून खरी उपासना पूर्णपणे मिटवून टाकायचा प्रयत्न केला होता. तिने यहोवाच्या काही संदेष्ट्यांचा वध केला आणि एलियाला देखील ठार मारायचा प्रयत्न केला होता. पण देवाने त्याला यार्देन नदी पार करून पळून जा असे सांगितल्यामुळे तो वाचला. (१ राजे १७:१-३; १८:१३) तेव्हा, उत्तर राज्यात खऱ्‍या उपासनेचे समर्थन करणे किती कठीण असावे, याची तुम्ही कल्पना करू शकता. आणि समजा तुम्ही अगदी राज महालातच काम करत आहात, मग तर खऱ्‍या उपासनेचे समर्थन करणे आणखीनच कठीण! अगदी याच परिस्थितीत देव-भीरू ओबद्या होता. * तो अहाब राजाच्या महालात घरकारभारी म्हणून काम करत होता.—१ राजे १८:३.

१८. ओबद्या यहोवाचा अनन्यसाधारण उपासक का होता?

१८ ओबद्या यहोवाची उपासना अतिशय सावधगिरीने व सुज्ञपणे करीत होता, यात काही शंका नाही. तरीपण त्याने हातमिळवणी केली नाही. वास्तविक पाहता, १ राजे १८:३ मध्ये म्हटले आहे: “ओबद्या परमेश्‍वराला फार भिऊन वागत असे.” होय, ओबद्याला देवाबद्दल अनन्यसाधारण भय होते! या हितकारक भयामुळे त्याच्यात उल्लेखनीय धैर्य उत्पन्‍न झाले. ईजबेलीने यहोवाच्या संदेष्ट्यांचा वध केल्यानंतर त्याने जे कार्य केले त्यावरून हे स्पष्ट दिसते.

१९. ओबद्याने असे काय केले ज्यावरून त्याचे धैर्य दिसून आले?

१९ आपण असे वाचतो: “ईजबेल परमेश्‍वराच्या संदेष्ट्यांचा वध करीत होती तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्टे नेऊन एका गुहेत पन्‍नास व दुसऱ्‍या गुहेत पन्‍नास असे लपविले व त्यांस अन्‍नपाणी पुरविले.” (१ राजे १८:४) तुम्ही कल्पना करू शकता, शंभर लोकांना गुप्तपणे अन्‍नपाणी पुरवणे हे अतिशय जिकरीचे काम होते. ओबद्याला केवळ अहाब आणि ईजबेलीपासूनच सावध राहायचे नव्हते तर त्याला त्या ८५० खोट्या संदेष्ट्यांची देखील नजर चुकवावी लागायची ज्यांचे राजमहालात सतत येणे-जाणे असायचे. शिवाय, देशातील सामान्य लोकांपासून राजकुमारांपर्यंतच्या इतर खोट्या उपासकांना संधी मिळाली असती तर राजा-राणीची मर्जी मिळवण्याकरता त्यांनी लगेच ओबद्याचं भांडं फोडलं असतं. तरीपण, या सर्व मूर्तिपूजकांच्या देखत ओबद्या यहोवाच्या संदेष्ट्यांच्या गरजा धैर्याने पुरवत होता. देवाचे भय एखाद्याला किती धैर्यवान बनवू शकते, नाही का?

२०. ओबद्याला देवाचे भय असल्यामुळे त्याला कोणती मदत मिळाली आणि त्याच्या उदाहरणावरून तुम्हाला कोणते साहाय्य मिळते?

२० ओबद्याला देवाची भीती असल्यामुळे त्याने धैर्य दाखवले म्हणून यहोवाने त्याला त्याच्या शत्रूंपासून वाचवले. नीतिसूत्रे २९:२५ म्हणते: “मनुष्याची भीति पाशरूप होते; पण जो परमेश्‍वरावर भाव ठेवितो त्याचे संरक्षण होते.” ओबद्याकडे अलौकिक शक्‍ती नव्हती. आपल्याला जशी भीती वाटते तशी त्यालाही आपण पकडले जाऊन ठार मारले जाऊ अशी भीती वाटत होती. (१ राजे १८:७-९, १२) तरीपण, देवाबद्दल त्याच्या मनात भीती असल्यामुळे, मानवाच्या भीतीवर मात करण्याचे धैर्य त्याला मिळाले. ओबद्याचे उदाहरण आपल्या सर्वांसाठी उत्तम उदाहरण आहे. विशेषकरून जे आपले स्वातंत्र्य किंवा आपला जीव धोक्यात घालून यहोवाची उपासना करतात अशांसाठी तो एक आदर्श आहे. (मत्तय २४:९) तेव्हा, आपण सर्व यहोवाची सेवा “आदर व भय धरून करू” या.—इब्री लोकांस १२:२८.

२१. पुढील लेखात कोणत्या विषयावर चर्चा केली जाईल?

२१ धैर्य केवळ विश्‍वास आणि देवाबद्दलचे भय या गुणांमुळेच उत्पन्‍न होत नाही तर प्रेमही धैर्य उत्पन्‍न करण्यामागे सर्वात शक्‍तिशाली प्रेरणा असू शकते. प्रेषित पौलाने लिहिले: “देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.” (२ तीमथ्य १:७) पुढील लेखात आपण या शेवटल्या कठीण दिवसांत प्रेम आपल्याला यहोवाची सेवा धैर्याने करण्यास कसे मदत करू शकते हे पाहणार आहोत.—२ तीमथ्य ३:१. (w०६ १०/१)

[तळटीप]

^ परि. 17 हा संदेष्टा ओबद्या नव्हे.

तुम्ही उत्तर देऊ शकाल?

• कोणत्या कारणास्तव यहोशवा आणि कालेब धैर्यवान होते?

• खऱ्‍या विश्‍वासात काय काय गोवलेले आहे?

• हनोखने देवाच्या न्यायाचा संदेश निर्भयतेने का घोषित केला?

• देवाबद्दलच्या भयाने धैर्य कसे उत्पन्‍न होते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८, १९ पानांवरील चित्र]

यहोवाने यहोशवाला अशी आज्ञा दिली: “धैर्यवान हो, हिंमत धर!”

[२० पानांवरील चित्र]

ओबद्याने देवाच्या संदेष्ट्यांची काळजी घेतली आणि त्यांचे संरक्षण केले

[२१ पानांवरील चित्र]

हनोखने देवाचे वचन धैर्याने प्रकट केले