व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रेमामुळे बळकट होणारे धैर्य

प्रेमामुळे बळकट होणारे धैर्य

प्रेमामुळे बळकट होणारे धैर्य

“देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.”—२ तीमथ्य १:७.

१, २. (क) प्रेम एखाद्याला काय करण्यास प्रवृत्त करू शकते? (ख) येशूने दाखवलेले धैर्य अनन्यसाधारण का होते?

 एक नवीनच लग्न झालेली जोडी, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्‍यावर असलेल्या एका गावाच्या शेजारील समुद्रात स्कूबा डायव्हींग करीत होती. ते दोघे पाण्यातून वर येतच होते इतक्यात एक भला मोठा शार्क मासा त्या स्त्रीकडे वेगाने आला. हे पाहताच एका नायकाप्रमाणे पतीने आपल्या पत्नीला जोरात बाजूला सारले आणि स्वतः शार्कपुढे झाला. त्याच्या अंत्यविधीच्या वेळी त्याची विधवा पत्नी म्हणाली: “त्यानं माझ्यासाठी आपला जीव दिला!”

होय, प्रेम मानवांना उल्लेखनीय धैर्य दाखवण्यास प्रवृत्त करू शकते. स्वतः येशू ख्रिस्ताने असे म्हटले: “आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्‍यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही.” (योहान १५:१३) येशूच्या या बोलण्याला २४ तास पूर्ण व्हायच्या आतच त्याने एका व्यक्‍तीसाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी आपले जीवन बलिदान केले. (मत्तय २०:२८) शिवाय, येशूने शौर्य दाखवण्यासाठी अचानक आपल्या जीवनाचे बलिदान केले नाही. आपली थट्टा केली जाईल, आपल्याला गैरवागणूक दिली जाईल, आपल्यावर अन्याय केला जाईल आणि शेवटी आपल्याला वधस्तंभावर ठार मारले जाईल, हे येशूला आधीपासूनच माहीत होते. यासाठी त्याने आपल्या शिष्यांच्या मनाची तयारी देखील केली होती; तो त्यांना म्हणाला होता: “पाहा, आपण वर यरुशलेमेस जात आहो; तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्‍यांच्या स्वाधीन करण्यात येईल; ते त्याला देहान्त शिक्षा ठरवितील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील; आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारितील व त्याचा जीव घेतील.”—मार्क १०:३३, ३४.

३. कोणत्या कारणास्तव येशूने अनन्यसाधारण धैर्य दाखवले?

कोणत्या कारणास्तव येशूने अनन्यसाधारण धैर्य दाखवले? विश्‍वास आणि देवाबद्दलयचे भय, ही मुख्य कारणे होती. (इब्री लोकांस ५:७; १२:२) परंतु सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, त्याला देवाविषयी आणि सहमानवांविषयी प्रेम होते. (१ योहान ३:१६) आपणही जर विश्‍वास आणि देवाबद्दलचे भय या दोन गुणांव्यतिरिक्‍त आपल्या मनात प्रेम विकसित केले तर आपणही ख्रिस्ताप्रमाणे धैर्य दाखवू शकू. (इफिसकर ५:२) पण हे प्रेम आपण कशाप्रकारे विकसित करू शकतो? या प्रेमाचा स्रोत कोण आहे, हे आधी आपण शोधून काढले पाहिजे.

“प्रीति देवापासून आहे”

४. यहोवा प्रीतीचा उगम आहे असे का म्हणता येते?

यहोवा, प्रीतीचे साक्षात रूप आणि उगम आहे. प्रेषित योहानाने लिहिले: “आपण एकमेकांवर प्रीति करावी, कारण प्रीति देवापासून आहे; जो कोणी प्रीति करितो तो देवापासून जन्मलेला आहे, व देवाला ओळखतो. जो प्रीति करीत नाही तो देवाला ओळखीत नाही; कारण देव प्रीति आहे.” (१ योहान ४:७, ८) यास्तव, एक व्यक्‍ती अचूक ज्ञान घेते व त्या ज्ञानानुसार संपूर्ण मनाने आज्ञाधारकता दाखवते व त्यानुसार कार्य करून देवाच्या जवळ येते तेव्हाच ती देवासारखी प्रीती विकसित करू शकते.—फिलिप्पैकर १:९; याकोब ४:८; १ योहान ५:३.

५, ६. कोणत्या गोष्टीमुळे येशूचे आरंभीचे अनुयायी ख्रिस्तासारखी प्रीती विकसित करू शकले?

आपल्या ११ विश्‍वासू शिष्यांबरोबर केलेल्या शेवटल्या प्रार्थनेत येशूने, देवाला ओळखणे आणि प्रीतीत वाढणे यांत असलेला संबंध दाखवताना म्हटले: “मी तुझे नाव त्यांस कळविले आहे आणि कळवीन; ह्‍यासाठी की, जी प्रीति तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.” (योहान १७:२६) येशू व त्याच्या पित्यामध्ये जे प्रेम होते त्याप्रकारचे प्रेम विकसित करण्यास त्याने आपल्या शिष्यांना मदत केली. आपल्या बोलण्यातून व आपल्या कार्यातून त्याने, देवाच्या नावाचा, त्याच्या अद्‌भुत गुणांचा काय अर्थ होतो हे प्रकट केले. म्हणूनच तो म्हणू शकला: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.”—योहान १४:९, १०; १७:८.

ख्रिस्तासारखे प्रेम हे देवाच्या पवित्र आत्म्याचे फळ आहे. (गलतीकर ५:२२) आरंभीच्या ख्रिश्‍चनांना वचन दिल्याप्रमाणे सा.यु. ३३ च्या पेंटेकॉस्ट रोजी पवित्र आत्मा मिळाला तेव्हा, येशूने शिकवलेल्या गोष्टी त्यांना आठवल्या शिवाय शास्त्रवचनांचा अर्थ अधिक चांगल्याप्रकारे उमगला. या सूक्ष्मदृष्टीमुळे देवाबद्दलचे त्यांच्या मनातील प्रेम आणखी वाढले. (योहान १४:२६; १५:२६) याचा परिणाम काय झाला? त्यांच्या जीवाला धोका होता तरीसुद्धा त्यांनी सुवार्तेची घोषणा धैर्याने व आवेशाने केली.—प्रेषितांची कृत्ये ५:२८, २९.

कार्यातून दाखवलेले धैर्य आणि प्रेम

७. पौल आणि बर्णबाला आपल्या मिशनरी दौऱ्‍यादरम्यान काय काय सहन करावे लागले होते?

प्रेषित पौलाने लिहिले: “देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.” (२ तीमथ्य १:७) पौल स्व-अनुभवावरून बोलत होता. त्याला आणि बर्णबाला त्यांच्या मिशनरी दौऱ्‍यादरम्यान कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावे लागले होते यावर विचार करा. त्यांनी अनेक शहरांमध्ये तसेच अंत्युखिया, इकुन्या आणि लुस्त्र येथे प्रचार केला. प्रत्येक शहरात काही लोक विश्‍वासू बनले तर इतर लोक कट्टर विरोधी बनले. (प्रेषितांची कृत्ये १३:२, १४, ४५, ५०; १४:१, ५) लुस्त्रात तर एका खवळलेल्या लोकसमुदायाने पौलाला दगडमार केला; पौल जेव्हा खाली कोसळला तेव्हा तो मेला असे समजून ते त्याला सोडून गेले. “पण त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर तो उठला व नगरात निघून आला; मग दुसऱ्‍या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बेस गेला.”—प्रेषितांची कृत्ये १४:६, १९, २०.

८. पौलाने व बर्णबाने दाखवलेल्या धैर्यावरून, त्यांना लोकांबद्दल गाढ प्रेम आहे हे कसे दिसून आले?

पौलाच्या जीवावर बेतलेल्या या प्रसंगामुळे घाबरून त्याने व बर्णबाने प्रचार करण्याचे थांबवले का? थांबवणे तर दूरच, ते अधिक आवेशाने प्रचार कार्य करू लागले. दुर्बेत “पुष्कळ शिष्य केल्यावर” हे दोघे “लुस्त्र, इकुन्या व अंत्युखिया ह्‍या नगरात . . . परत आले.” का बरे? नवीन शिष्यांना विश्‍वासात मजबूत राहण्याचे उत्तेजन देण्याकरता. “आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते,” असे पौलाने व बर्णबाने म्हटले. ख्रिस्ताच्या ‘मेंढरांबद्दल’ असलेल्या गाढ प्रीतीमुळेच त्यांना हे सर्व काही सहन करण्याचे धैर्य मिळाले यात शंका नाही. (प्रेषितांची कृत्ये १४:२१-२३; योहान २१:१५-१७) नव्याने स्थापन झालेल्या प्रत्येक मंडळीत वडीलजन नियुक्‍त केल्यानंतर पौल आणि बर्णबाने प्रार्थना केल्या आणि “ज्या प्रभूवर त्यांनी विश्‍वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपविले.”

९. पौलाने इफिससमधील वडिलांनी दाखवलेल्या प्रेमाला कसा प्रतिसाद दिला?

पौल अतिशय प्रेमळ व धाडसी व्यक्‍ती असल्यामुळे आरंभीच्या पुष्कळ ख्रिश्‍चनांचे त्याच्यावर प्रेम होते. पौल इफिससमध्ये तीन वर्ष होता व इथे त्याला खूप विरोधाचा सामना करावा लागला होता. येथील वडिलांबरोबर त्याने घेतलेल्या एका सभेनंतर काय घडले ते आठवा. (प्रेषितांची कृत्ये २०:१७-३१) देवाने त्यांच्यावर सोपवलेल्या त्याच्या कळपाची काळजी घेण्याचे त्यांना उत्तेजन दिल्यानंतर पौलाने त्यांच्याबरोबर गुडघे टेकून प्रार्थना केली. मग, “ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले. माझे तोंड तुमच्या दृष्टीस ह्‍यापुढे पडणार नाही, असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दुःख झाले.” खरोखर या बांधवांचे पौलावर किती प्रेम होते! निरोप घ्यायची वेळ आली तेव्हा पौल आणि त्याच्याबरोबर प्रवास करणाऱ्‍यांना अक्षरशः बळजबरीने हात सोडवून घ्यावे लागले कारण स्थानीय वडिलांना त्यांचा ‘वियोग’ अनावर झाला होता.—प्रेषितांची कृत्ये २०:३६-२१:१.

१०. यहोवाच्या आधुनिक दिवसांतील साक्षीदारांनी एकमेकांबद्दल धैर्यवान प्रेम कसे दाखवले आहे?

१० आज, प्रवासी पर्यवेक्षकांवर, मंडळीतल्या वडीलजनांवर आणि इतर अनेकांवर खूप प्रेम केले जाते कारण ते यहोवाच्या मेंढरांची काळजी घेण्याकरता पुष्कळ धैर्य दाखवतात. उदाहरणार्थ, मुलकी युद्धामुळे उद्ध्‌वस्त झालेल्या किंवा जेथे बंदी आहे अशा राष्ट्रांत सेवा करणारे प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नी मंडळ्यांना भेटी देण्याकरता आपला जीव धोक्यात घालतात. तसेच, पुष्कळ साक्षीदारांना त्यांचा तिरस्कार करणाऱ्‍या अधिकाऱ्‍यांच्या व त्यांच्या साहाय्यकांच्या हातून छळ सोसावा लागला कारण या साक्षीदारांनी आपल्या सहबांधवांचा विश्‍वासघात केला नाही किंवा त्यांना आध्यात्मिक अन्‍न कोठून मिळते ते सांगितले नाही. इतर हजारो साक्षीदारांचा छळ करण्यात आला, त्यांना यातना देण्यात आल्या, इतकेच नव्हे तर ठारही मारण्यात आले कारण त्यांनी राज्याच्या सुवार्तेचा प्रचार थांबवला नाही किंवा ख्रिस्ती सभांमध्ये सहविश्‍वासू बंधूभगिनींबरोबर संगती करण्याचे सोडले नाही. (प्रेषितांची कृत्ये ५:२८, २९; इब्री लोकांस १०:२४, २५) अशा धैर्यवान बंधूभगिनींच्या विश्‍वासाचे व प्रेमाचे आपण अनुकरण करूया!—१ थेस्सलनीकाकर १:६.

तुमची प्रीती थंड होऊ देऊ नका

११. सैतान यहोवाच्या सेवकांविरुद्ध कोणते आध्यात्मिक युद्ध लढत आहे व यासाठी आपण काय करण्याची गरज आहे?

११ सैतानाला पृथ्वीवर फेकण्यात आले तेव्हा त्याने, ‘देवाच्या आज्ञा पाळणाऱ्‍या व येशूविषयी साक्ष देणाऱ्‍या’ यहोवाच्या सेवकांवर आपला राग काढण्याचा जणू निर्धारच केला होता. (प्रकटीकरण १२:९, १७) दियाबलाच्या कुयुक्‍त्‌यांतील एक आहे छळ. परंतु पुष्कळदा त्याच्या कुयुक्‍तीचे उलट परिणाम होतात. जसे की देवाचे लोक एकमेकांच्या आणखी जवळ येतात आणि आपल्यातील प्रेमाचे बंधन आणखी मजबूत करून आवेशाने पुढे जातात. सैतानाचा आणखी एक डावपेच आहे पापी मानवी प्रवृत्तीचा फायदा उचलून मोहात पाडणे. या डावपेचाचा प्रतिकार करण्यासाठी एका वेगळ्या प्रकारच्या धैर्याची आवश्‍यकता आहे कारण, हे युद्ध आंतरिक युद्ध आहे; आपल्याच ‘कपटी व असाध्य’ हृदयात चाललेल्या अयोग्य इच्छांविरुद्धचे हे युद्ध आहे.—यिर्मया १७:९; याकोब १:१४, १५.

१२. देवाबद्दल आपल्या मनात असलेले प्रेम कमकुवत बनवण्याचा प्रयत्न करताना सैतान ‘जगाच्या आत्म्याचा’ कशाप्रकारे उपयोग करतो?

१२ सैतानाच्या शस्त्रसाठ्यात आणखी एक शक्‍तिशाली हत्यार आहे—या “जगाचा आत्मा.” अर्थात, या जगाचा प्रचलित कल किंवा प्रवृत्ती जी देवाच्या पवित्र आत्म्याच्या अगदी विरोधात आहे. (१ करिंथकर २:१२) या जगाचा आत्मा लोभ आणि भौतिकवादाला—‘डोळ्यांच्या वासनेला’ प्रोत्साहन देतो. (१ योहान २:१६; १ तीमथ्य ६:९, १०) भौतिक गोष्टी आणि पैसा मुळात वाईट नाहीत पण देवापेक्षा जर आपण त्यांच्यावर अधिक प्रेम केले तर सैतानाचा विजय होतो. या जगाच्या आत्म्याचा ‘अधिकार’ किंवा शक्‍ती, पापी शरीराला आकर्षित करते. ही शक्‍ती एखाद्यास भुरळ पाडण्यासाठी अतिशय धूर्तपणे सतत प्रयत्न करते आणि ती सर्वत्र आहे. तेव्हा, या जगाच्या आत्म्याची तुमच्या हृदयाला लागण होऊ देऊ नका!—इफिसकर २:२, ३; नीतिसूत्रे ४:२३.

१३. आपले नैतिक धैर्य कसोटीस कसे उतरू शकते?

१३ परंतु, जगाच्या दुष्ट आत्म्याचा प्रतिकार व नकार करण्यासाठी नैतिक बळाची आवश्‍यकता आहे. उदाहरणार्थ, पडद्यावर अश्‍लील चित्रे दाखवली जातात तेव्हा चित्रपट गृहातून उठून जाण्यास किंवा टीव्ही अथवा कम्प्युटर बंद करण्यास धैर्य लागते. साथीदारांच्या हानीकारक दबावाचा प्रतिकार करण्यासाठी व वाईट लोकांची सोबत सोडण्यासाठी हिंमत लागते. तसेच, शाळासोबती, सहकर्मचारी, शेजारी किंवा नातेवाईक यांच्याकडून थट्टा होत असतानाही देवाचे नियम आणि तत्त्व उंचावून धरण्यासाठी धाडस लागते.—१ करिंथकर १५:३३; १ योहान ५:१९.

१४. आपल्याला जगाच्या आत्म्याची लागण झालेली असेल तर आपण काय करू शकतो?

१४ यास्तव, देव आणि आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींबद्दलचे आपले प्रेम आपण आणखी मजबूत करणे किती महत्त्वाचे आहे! जगाच्या आत्म्याची तुम्हाला लागण तर झाली नाही, हे पाहण्यासाठी आपल्या ध्येयांचे व आपल्या जीवनशैलीचे परीक्षण करा. अल्प प्रमाणात लागण झालेली असली तरीसुद्धा, तो आत्मा मुळापासून काढून टाकून त्याच्यापासून दूर राहण्याचे धैर्य देण्याकरता यहोवाला लगेच प्रार्थना करा. तुम्ही मनापासून केलेल्या विनंत्यांकडे यहोवा कदापि दुर्लक्ष करणार नाही. (स्तोत्र ५१:१७) शिवाय, त्याचा आत्मा या जगाच्या आत्म्यापासून कितीतरी पटीने शक्‍तिशाली आहे.—१ योहान ४:४.

व्यक्‍तिगत परीक्षांचा धैर्याने सामना करणे

१५, १६. ख्रिस्तासारखे प्रेम आपल्याला, आपल्या समोर येणाऱ्‍या परीक्षांचा सामना करण्यास कशाप्रकारे मदत करू शकते? उदाहरण द्या.

१५ यहोवाच्या साक्षीदारांना इतर आव्हानांना देखील तोंड द्यावे लागते. जसे की अपरिपूर्णता व वृद्धापकाळामुळे येणारे आजारपण, अपंगत्व, नैराश्‍य आणि इतर अनेक समस्या. (रोमकर ८:२२) ख्रिस्तासारखे प्रेम आपल्याला या परीक्षांचा सामना करण्यास मदत करेल. झांबियात, एका ख्रिस्ती कुटुंबात वाढलेल्या नामान्गोल्वाचे उदाहरण घ्या. ती दोन वर्षांची होती तेव्हा अधू झाली. ती म्हणते: “माझ्या मनात सारखी एक भीती असायची, की माझं रूप पाहून लोकांना धक्का बसेल. पण माझ्या आध्यात्मिक बंधूभगिनींनी मला माझ्या दृष्टिकोनात बदल करण्यास मदत केली. त्यामुळे मी माझ्या या स्वभावावर मात करू शकले आणि बाप्तिस्मा घेऊ शकले.”

१६ नामान्गोल्वाकडे व्हीलचेअर आहे तरीपण तिला पुष्कळदा मातीच्या रस्त्यावरून जाताना आपल्या हातांवर व गुडघ्यांवर रांगत जावे लागते. तरीपण ती वर्षांतून दोनदा तरी, साहाय्यक पायनियरींग करून सेवेत अधिक भाग घेते. एकदा तर एका स्त्रीला नामान्गोल्वाने साक्ष दिल्यानंतर रडूच कोसळले. का? नामान्गोल्वाचा विश्‍वास आणि धैर्य पाहून या स्त्रीचे हृदय भरून आले. नामान्गोल्वाच्या पाच बायबल विद्यार्थ्यांनी बाप्तिस्मा घेतला आहे व एकजण मंडळीत वडील यानात्याने सेवा करीत आहे. हा यहोवाने तिला किती समृद्धपणे आशीर्वादित केले आहे त्याचा पुरावा आहे. ती म्हणते: “खूपदा माझे पाय खूप दुखतात, पण त्या दुखण्यामुळं मी थांबत नाही.” ही भगिनी, संपूर्ण जगभरातील अशा अनेक साक्षीदारांपैकी एक आहे जी शरीराने अशक्‍त असली तरी यहोवा आणि शेजारी यांच्याबद्दल प्रेम असल्यामुळे मनाने खंबीर आहे. असे सर्व बंधूभगिनी यहोवाच्या नजरेत किती मौल्यवान आहेत!—हाग्गय २:७.

१७, १८. कोणती गोष्ट पुष्कळ बंधूभगिनींना आजारपण आणि इतर परीक्षांचा सामना करण्यास मदत करते? काही स्थानीय उदाहरणे द्या.

१७ दीर्घकाळपासून असलेले आजारपण देखील एखाद्याला नाउमेद आणि निराश करू शकते. एका मंडळीतील वडील सांगतात: “आमच्या पुस्तक अभ्यास गटात एक भगिनी आहे जिला मधूमेह आहे व तिचे मूत्रपिंड निकामी झाले आहे. आणखी एक भगिनी आहे जिला कॅन्सर आहे. दुसऱ्‍या दोघी आहेत त्यांना गंभीर स्वरुपाचा सांधेदुखीचा त्रास आहे तर आणखी एका बहिणीला लुपस व फायब्रोमायालजिया नावाचे वेदनादायी आजार आहेत. कधीकधी त्या निराश होतात. तरीपण, खूपच आजारी असल्याशिवाय किंवा दवाखान्यात असल्याशिवाय त्या कधीही सभा चुकवत नाहीत. सर्व जणी क्षेत्र सेवेत अगदी नियमित असतात. त्यांना पाहून मला पौलाची आठवण होते, ज्याने म्हटले होते: ‘जेव्हा मी अशक्‍त तेव्हाच मी सशक्‍त आहे.’ त्यांच्या प्रेमाची आणि त्यांच्या धैर्याची मी प्रशंसा करतो. कदाचित आपल्या आजारपणामुळे जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट आहे आणि कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे हे त्यांना माहीत आहे.”—२ करिंथकर १२:१०.

१८ तुम्हाला जर एखादे आजारपण किंवा इतर कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर मदतीसाठी “निरंतर प्रार्थना करा” जेणेकरून तुम्ही निराश होणार नाही. (१ थेस्सलनीकाकर ५:१४, १७) तुम्हाला भावनिकरीत्या अनेक सुख-दुःखाचे प्रसंग अनुभवावे लागत असले तरी, उत्तेजनात्मक, आध्यात्मिक गोष्टींवर खासकरून आपल्या मौल्यवान राज्य आशेवर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करा. एका भगिनीने म्हटले: “माझ्यासाठी, क्षेत्र सेवा हे औषध आहे.” इतरांना सुवार्ता सांगण्यात वेळ खर्च केल्यामुळे तिला सकारात्मक मनोवृत्ती ठेवण्यास मदत मिळते.

पाप करणाऱ्‍या व्यक्‍तिला यहोवाकडे पुन्हा येण्यास प्रेम प्रवृत्त करते

१९, २०. (क) ज्यांनी पाप केले होते अशा लोकांना यहोवाकडे परत येण्याकरता धैर्य एकवटण्यास कोणती गोष्ट मदत करेल? (ख) पुढील लेखात कोणत्या विषयावर चर्चा केली जाईल?

१९ आध्यात्मिकरीत्या अशक्‍त बनलेल्या किंवा ज्यांच्या हातून पाप घडले आहे अशा अनेकांना यहोवाकडे पुन्हा येणे कठीण वाटते. परंतु अशा लोकांनी मनापासून पश्‍चात्ताप केला आणि यहोवाबद्दल आपल्या मनात प्रेम पुन्हा जागृत केले तर त्यांना हवे असलेले धैर्य मिळू शकेल. संयुक्‍त संस्थानांत राहणाऱ्‍या मार्योचे * उदाहरण घ्या. मार्योने ख्रिस्ती मंडळी सोडून दिली, दारूडा बनला, मादक पदार्थांचे सेवन करू लागला आणि २० वर्षांनंतर त्याला तुरुंगात टाकण्यात आले. “तुरुंगात मी माझ्या भविष्याविषयी गंभीरपणे विचार करू लागलो. मी पुन्हा एकदा बायबलचे वाचन सुरू केले. मला यहोवाचे गुण विशेषकरून त्याची दया अनुभवायला मिळाली. मी यासाठी नेहमी प्रार्थना करायचो. तुरुंगातून सुटल्यानंतर मी वाईट संगत सोडून दिली, ख्रिस्ती सभांना जाऊ लागलो आणि मग मला मंडळीत पुन्हा एकदा घेण्यात आले. मी ज्याप्रकारे माझ्या जीवनाशी खेळलो होतो त्याचे परिणाम मी आज भोगत आहे खरा, परंतु निदान मला आशा आहे. यहोवानं माझ्यावर किती दया दाखवली आहे व मला किती क्षमा केली आहे याबद्दल मी त्याचे जितके आभार मानेन तितके कमीच आहेत.”—स्तोत्र १०३:९-१३; १३०:३, ४; गलतीकर ६:७, ८.

२० मार्योसारख्या परिस्थितीत असलेल्यांना यहोवाकडे पुन्हा येण्यास बराच प्रयत्न करावा लागेल, यात शंका नाही. परंतु नियमित बायबल अभ्यास, प्रार्थना आणि मनन यांद्वारे त्यांच्या मनात पुनः जागृत झालेले प्रेम त्यांना आवश्‍यक ते धैर्य देईल आणि दृढनिश्‍चयी होण्यास मदत करू शकेल. मार्योला राज्य आशेमुळे देखील बळकटी मिळाली. होय, प्रीती, विश्‍वास आणि देवाबद्दलचे भय यांबरोबर आशा देखील आपल्या जीवनात शक्‍तिशाली प्रेरणा ठरू शकते जिचा आपल्याला फायदा होऊ शकतो. या अमूल्य आध्यात्मिक देणगीविषयी आपण पुढील लेखात बारकाईने चर्चा करणार आहोत. (w०६ १०/१)

[तळटीप]

^ परि. 19 नाव बदलण्यात आले आहे.

तुम्ही उत्तर देऊ शकाल?

• प्रेमामुळे येशूने उल्लेखनीय धैर्य दाखवले ते कसे?

• प्रेमामुळे पौल आणि बर्णबा अनन्यसाधारण धैर्य दाखवू शकले ते कसे?

• सैतान, ख्रिस्ती प्रीतीचा नाश करायचा प्रयत्न कसा करतो?

• यहोवाबद्दलचे प्रेम आपल्याला कोणकोणत्या परीक्षांचा सामना करण्याचे धैर्य देते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

पौलाला लोकांबद्दल प्रेम असल्यामुळे त्याला टिकून राहण्याचे धैर्य मिळाले

[२५ पानांवरील चित्र]

देवाचे दर्जे उंचावून धरण्यासाठी धैर्य लागते

[२५ पानांवरील चित्र]

नामान्गोल्वा सुटूटू