व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने जे जोडले आहे ते तोडू नका

देवाने जे जोडले आहे ते तोडू नका

देवाने जे जोडले आहे ते तोडू नका

“ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”—मत्तय १९:६.

१, २. विवाहित जोडप्यांना वेळोवेळी समस्यांना तोंड द्यावे लागेल अशी अपेक्षा करणे शास्त्रवचनांना धरून आणि रास्त का आहे?

तुम्ही गाडीने लांबच्या प्रवासाला जायला निघाला आहात अशी कल्पना करा. मार्गात तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागेल का? आपल्यासमोर कोणत्याच समस्या येणार नाहीत असे गृहीत धरणे मूर्खपणाचे ठरेल! उदाहरणार्थ, अचानक हवामान बिघडल्यामुळे कदाचित तुम्हाला गाडीचा वेग कमी करावा लागेल आणि सावधगिरी बाळगून पुढे जावे लागेल. किंवा प्रवासात कदाचित तुमची गाडी नादुरुस्त होऊ शकते. स्वतःहून रिपेअर करता न आल्यास कदाचित तुम्हाला गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून कोणाचीतरी मदत घ्यावी लागेल. पण अशा समस्या उद्‌भवल्यामुळे आपण प्रवासाला निघालो हीच चूक केली असा निष्कर्ष तुम्ही काढावा का, किंवा गाडी तिथेच सोडून निघून जावे का? नाही. लांबच्या प्रवासात समस्या या अपेक्षित असतात आणि त्यामुळे वरीलप्रमाणे प्रतिक्रिया न दाखवता त्यांना तोंड देण्याचे मार्ग शोधण्यातच शहाणपण आहे.

वैवाहिक जीवनाबद्दलही हेच म्हणता येते. समस्या या अटळ आहेत. लग्नाच्या विचारात असलेल्या जोडप्यांनी आपल्या जीवनात केवळ आनंदीआनंद असेल, कोणत्याही समस्या नसतील अशी अपेक्षा करणे हे भोळेपणाचे लक्षण आहे. १ करिंथकर ७:२८ यात बायबल अगदी प्रामाणिकपणे सांगते की पती व पत्नींना “संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील.” पण असे का? याचे सरळसोपे कारण म्हणजे पती व पत्नी दोघेही अपरिपूर्ण आहेत आणि आज आपण राहात आहोत ते ‘शेवटल्या काळातील कठीण दिवस’ आहेत. (२ तीमथ्य ३:१; रोमकर ३:२३) त्याअर्थी, एकमेकांना अगदी अनुरूप असलेल्या व आध्यात्मिक प्रवृत्तीच्या जोडप्यालाही अधूनमधून समस्यांना तोंड द्यावेच लागते.

३. (क) जगातील बरेच लोक विवाहाकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहतात? (ख) ख्रिस्ती आपला विवाह टिकवून ठेवण्याचा प्रयत्न का करतात?

या आधुनिक काळात काही जोडपी वैवाहिक जीवनात समस्या येताच घटस्फोटाचे पाऊल उचलतात. बऱ्‍याच देशांत घटस्फोटांचे प्रमाण आकाशाला भिडले आहे. पण खरे ख्रिस्ती मात्र समस्यांपासून पळ काढण्यापेक्षा त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. का? कारण ते विवाहाला यहोवाकडील एक पवित्र वरदान मानतात. येशूने विवाहित जोडप्यांविषयी असे म्हटले: “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्तय १९:६) अर्थात, या नियमाला जडून राहणे नेहमीच सोपे नसते. उदाहरणार्थ, बायबलमधील तत्त्वांचा आदर न करणारे नातेवाईक व इतरजण, जसे की काही विवाह सल्लागार बरेचदा जोडप्यांना शास्त्रवचनांशी सुसंगत नसलेल्या कारणांसाठी एकमेकांपासून विभक्‍त होण्याचा किंवा घटस्फोट घेण्याचा सल्ला देतात. * पण देवाच्या लोकांना हे माहीत आहे की वैवाहिक बंधन तोडून टाकण्याची घाई करण्यापेक्षा त्यात सुधार करून ते टिकवून ठेवणेच जास्त श्रेयस्कर आहे. किंबहुना, समस्या उद्‌भवतात तेव्हाच, इतर लोकांचा सल्ला घेण्यापेक्षा यहोवाने सांगितलेल्या मार्गाने त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.—नीतिसूत्रे १४:१२.

समस्यांवर मात करणे

४, ५. (क) विवाहात कशाप्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते? (ख) विवाहात समस्या उद्‌भवल्या तरीसुद्धा देवाच्या वचनात सापडणारी तत्त्वे अतिशय उपयुक्‍त का ठरतात?

प्रत्येक विवाहात अधूनमधून, समस्या सोडवण्याचा प्रसंग येतो ही एक वस्तूस्थिती आहे. बरेचदा तर ही लहानसहान विषयांवरील गैरसमज मिटवण्याची बाब असते. पण काही विवाहांत तीव्र स्वरूपाची वादळे येतात जी पतीपत्नीच्या नात्यावरच आघात करू पाहात असतात. कधीकधी तुम्हाला एखाद्या अनुभवी विवाहित ख्रिस्ती वडिलांना मदतीची विनंती करावी लागू शकते. पण असे प्रसंग उद्‌भवले याचा अर्थ तुमचा विवाह अयशस्वी आहे असे नाही. तर समस्या सोडवताना बायबलमधील तत्त्वांना जडून राहणे किती महत्त्वाचे आहे हेच यावरून दिसून येते.

यशस्वी वैवाहिक नातेसंबंधाकरता कशाची आवश्‍यकता आहे हे इतर कोणाहीपेक्षा, मानवजातीचा निर्माणकर्ता आणि विवाह व्यवस्थेचा संस्थापक या नात्याने यहोवाच जाणतो. पण प्रश्‍न हा आहे, की आपण त्याच्या वचनातून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाकडे लक्ष देऊन त्याचे पालन करणार का? जर आपण असे केले तर निश्‍चितच हे आपल्या फायद्याचे ठरेल. प्राचीन काळात यहोवाने आपल्या लोकांना असे म्हटले होते: “अहा, तू माझ्या आज्ञा ऐकल्या असत्या तर किती बरे झाले असते! मग तुझी शांती नदीसारखी आणि तुझे न्यायीपण समुद्राच्या लाटांसारखे झाले असते.” (यशया ४८:१८, पं.र.भा.) बायबलमधील मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्याने वैवाहिक जीवन यशस्वी ठरू शकते. सर्वप्रथम बायबलमध्ये पतींना कोणते मार्गदर्शन देण्यात आले आहे याचा आपण विचार करूया.

“आपआपल्या पत्नीवर प्रीति करा”

६. पतींकरता शास्त्रवचनांत कोणते मार्गदर्शन दिले आहे?

प्रेषित पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात पतींकरता सुस्पष्ट मार्गदर्शन देण्यात आले आहे. पौलाने लिहिले: “पतींनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले, त्याचप्रमाणे पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वतःवरच प्रीति करितो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण [“व संभाळ,” NW] करितो, जसे ख्रिस्तहि मंडळीचे पालनपोषण करितो तसे तो करितो. तथापि, तुम्हांपैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी.”—इफिसकर ५:२५, २८, २९, ३३.

७. (क) ख्रिस्ती विवाहाचा पाया मुख्यतः कशावर आधारलेला असला पाहिजे? (ख) पती आपल्या पत्नीवर कशाप्रकारे प्रीती करतो?

पतीपत्नीमध्ये उद्‌भवू शकणाऱ्‍या प्रत्येक संभाव्य समस्येची पौलाने येथे चर्चा केली नाही. तर त्याने मुळाशी जाऊन, प्रत्येक ख्रिस्ती विवाहाचा पाया मुख्यतः कशावर आधारलेला असला पाहिजे हे स्पष्ट केले, अर्थात प्रीतीवर. वरील वचनांत सहा वेळा प्रीतीचा उल्लेख केलेला आढळतो. तसेच मूळ भाषेनुसार पौल याठिकाणी पतींना “आपआपल्या पत्नीवर प्रीति करत राहा” असे सांगतो. तेव्हा साहजिकच, पौलाने हे ओळखले होते की प्रेमात पडणे सोपे असले तरीपण प्रेम टिकवून ठेवणे सहसा तितके सोपे नसते. आणि विशेषतः या ‘शेवटल्या काळात’ बहुतेक लोक “स्वार्थी” व “शांतताद्वेषी” असल्यामुळे हे आणखीनच कठीण आहे. (२ तीमथ्य ३:१-३) अशाप्रकारच्या दुर्गुणांमुळे आज बऱ्‍याच विवाहांत कलह निर्माण होत आहेत पण आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम करणारा पती जगातल्या या वाईट प्रवृत्तींचा स्वतःच्या विचारांवर व वागणुकीवर प्रभाव पडू देणार नाही.—रोमकर १२:२.

तुम्ही आपल्या पत्नीच्या गरजा कशा पूर्ण करू शकता?

८, ९. ख्रिस्ती पती आपल्या पत्नीच्या कोणकोणत्या गरजा पूर्ण करतो?

जर तुम्ही एक ख्रिस्ती पती असाल तर स्वार्थी प्रवृत्तीला थारा न देता, आपल्या पत्नीबद्दल तुम्ही मनस्वी प्रेम कशाप्रकारे व्यक्‍त करू शकता? पौलाने इफिसकरांना संबोधून उद्‌गारलेले शब्द याआधी उद्धृत करण्यात आले होते. त्यात पौलाने अशा दोन गोष्टी सांगितल्या ज्या तुम्ही केल्या पाहिजेत—एकतर तुम्ही आपल्या पत्नीचे पालनपोषण केले पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःच्या शरीराप्रमाणेच तिचा संभाळ केला पाहिजे. तुम्ही आपल्या पत्नीचे पालनपोषण कसे करू शकता? असे करण्याचा एक मार्ग म्हणजे भौतिकदृष्ट्या, अर्थात, तिच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याद्वारे. पौलाने तीमथ्याला असे लिहिले: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे; तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.”—१ तीमथ्य ५:८.

पण केवळ अन्‍न, वस्त्र व निवारा इतकेच पुरवून चालणार नाही. का? कारण एखादा पती आपल्या पत्नीच्या भौतिक गरजा पुऱ्‍या करण्यात कोणतीही कसर राहू देत नसला तरीपण, तिच्या भावनिक व आध्यात्मिक गरजा तृप्त करण्यात तो कमी पडू शकतो. या गरजा तृप्त करणेही अतिशय महत्त्वाचे आहे. आज बरेच ख्रिस्ती पुरुष मंडळीच्या कार्यांत अतिशय व्यग्र असतात हे खरे आहे. पण मंडळीच्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्याचा अर्थ असा होत नाही की पती एक कुटुंब-प्रमुख या नात्याने देवाने त्याच्यावर सोपवलेल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. (१ तीमथ्य ३:५, १२) या विषयावर अभिप्राय व्यक्‍त करताना काही वर्षांपूर्वी या नियतकालिकात पुढील विधान केले होते: “बायबलमधील आवश्‍यकतेनुसार, असे म्हणता येते की ‘कळपाचे पालन करण्याचे काम खरे तर घरापासून सुरू होते.’ जर एखाद्या वडिलाने आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले तर तो वडील या नात्याने सेवा करण्याचा विशेषाधिकार गमावू शकतो.” * तेव्हा निश्‍चितच, तुम्ही आपल्या पत्नीच्या—शारीरिक, भावनिक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आध्यात्मिक गरजा पूर्ण केल्याच पाहिजेत.

पत्नीचा संभाळ करण्याचा काय अर्थ होतो?

१०. पती आपल्या पत्नीचा संभाळ कशाप्रकारे करू शकतो?

१० पत्नीचा संभाळ करण्याचा अर्थ तिच्यावर तुमचे प्रेम असल्यामुळे तिची चांगल्याप्रकारे काळजी घेणे. तुम्ही हे बऱ्‍याच मार्गांनी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्याबरोबर पुरेसा वेळ घालवा. जर या बाबतीत तुम्ही आपल्या पत्नीकडे दुर्लक्ष केले तर तिचे तुमच्यावरचे प्रेम थंडावू शकते. शिवाय, हे देखील आठवणीत असू द्या, की तुम्ही तिला जितका वेळ देता तो पुरेसा आहे असे तुम्हाला जरी वाटत असले, तरी तिला कदाचित तसे वाटत नसेल. कदाचित तेवढा वेळ तिच्याकरता पुरेसा नसेल. मी माझ्या पत्नीचा संभाळ करतो, तिच्यावर प्रेम करतो असे म्हणणे पुरेसे नाही. पती आपला चांगल्याप्रकारे संभाळ करतो, आपल्यावर मनापासून प्रेम करतो असे तुमच्या पत्नीला जाणवले पाहिजे. पौलाने लिहिले: “कोणीहि आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्‍याचे पाहावे.” (१ करिंथकर १०:२४) एक प्रेमळ पती या नात्याने तुम्ही, आपल्या पत्नीला खरोखरच कशाची गरज आहे हे जाणून घेतले पाहिजे.—फिलिप्पैकर २:४.

११. पती आपल्या पत्नीशी कशाप्रकारे वागतो याचा देवासोबतच्या व मंडळीसोबतच्या त्याच्या नातेसंबंधावर कशाप्रकारे प्रभाव पडतो?

११ आपल्या पत्नीचा संभाळ करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तिच्याशी कोमलतेने बोलणे व वागणे. (नीतिसूत्रे १२:१८) पौलाने कलस्सैकरांना लिहिले: “पतींनो, तुम्ही आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका.” (कलस्सैकर ३:१९) एका संदर्भ ग्रंथानुसार पौलाच्या या विधानाचे भाषांतर, “तिला मोलकरणीसारखे वागवू नका” किंवा “तिला गुलाम बनवू नका,” असेही केले जाऊ शकते. जो पती एखाद्या हुकुमशहासारखा वागतो, मग ते घरात असो किंवा चारचौघांसमोर असो, तो आपल्या पत्नीचा संभाळ करतो असे निश्‍चितच म्हणता येणार नाही. आपल्या पत्नीशी निष्ठूरपणे वागल्यामुळे देवासोबतच्या त्याच्या नातेसंबंधावरही परिणाम होऊ शकतो. प्रेषित पौलाने पतींना असे लिहिले: “पतींनो, तसेच तुम्हीहि आपल्या स्त्रियांबरोबर, त्या अधिक नाजूक व्यक्‍ति आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहा, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.” *१ पेत्र ३:७.

१२. येशूने ख्रिस्ती मंडळीशी ज्याप्रकारे व्यवहार केला त्यावरून ख्रिस्ती पती काय शिकू शकतात?

१२ तुमच्या पत्नीचे तुमच्यावर असलेले प्रेम कधीही कमी लेखू नका तर, तुमचे अजूनही तिच्यावर प्रेम आहे याचे तिला आश्‍वासन द्या. येशूने ख्रिस्ती मंडळीसोबत ज्याप्रकारे व्यवहार केला त्यावरून त्याने ख्रिस्ती पतींना एक आदर्श दिला. त्याच्या अनुयायांनी वारंवार चुका केल्या तरीसुद्धा तो कोमल, दयाळू व क्षमाशील होता. म्हणूनच येशू इतरांना असे म्हणू शकला की ‘माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. [कारण] मी मनाचा सौम्य व लीन आहे.’ (मत्तय ११:२८, २९) येशूच्या पावलावर पाऊल ठेवून ख्रिस्ती पती आपल्या पत्नीशी तशाचप्रकारे वागतो जसा येशू मंडळीशी वागला. जो पुरुष आपल्या पत्नीचा खऱ्‍या अर्थाने संभाळ करतो, व हे आपल्या वागण्याबोलण्यातून दाखवतो तो तिला खरोखर विसावा देतो.

बायबलमधील तत्त्वांनुसार वागणाऱ्‍या पत्नी

१३. बायबलमध्ये पत्नींना साहाय्य करण्याकरता कोणती तत्त्वे दिलेली आहेत?

१३ बायबलमध्ये पत्नींना साहाय्य करण्याकरताही काही तत्त्वे दिलेली आहेत. इफिसकर ५:२२-२४, ३३ यात असे विधान केले आहे: “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पति पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीहि सर्व गोष्टींत आपल्या पतीच्या अधीन असावे. . . . पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.”

१४. पतीच्या अधीन राहण्याच्या तत्त्वामुळे स्त्रियांचा दर्जा का खालावत नाही?

१४ पत्नीने पतीच्या अधीन असावे व त्याची भीड राखावी यावर पौलाने कशाप्रकारे भर दिला याकडे लक्ष द्या. पत्नीला आठवण करून देण्यात आली आहे की तिने आपल्या पतीच्या अधीन असावे. हे देवाच्या व्यवस्थेच्या सामंजस्यात आहे. स्वर्गात व पृथ्वीवर प्रत्येक सजीव प्राणी कोणा न कोणाच्या अधीन आहे. येशू देखील यहोवा देवाच्या अधीन आहे. (१ करिंथकर ११:३) अर्थात, पती आपल्या मस्तकपदाचा योग्यप्रकारे उपयोग करतो तेव्हा त्याच्या पत्नीला त्याच्या अधीन राहणे जास्त सोपे जाईल.

१५. पत्नींकरता बायबलमध्ये कोणता सल्ला सापडतो?

१५ पौलाने असेही म्हटले की पत्नीने “आपल्या पतीची भीड राखावी.” ख्रिस्ती पत्नीने “सौम्य व शांत आत्मा” दाखवावा. तिने उद्धटपणे आपल्या पतीच्या अधिकाराला आव्हान करू नये किंवा स्वतंत्रवृत्तीने वागण्याचा प्रयत्न करू नये. (१ पेत्र ३:४) देवाला भिणारी पत्नी आपल्या कुटुंबाच्या भल्याकरता झटते आणि आपल्या पतीला सन्मान मिळवून देते. (तीत २:४, ५) ती नेहमी आपल्या पतीविषयी चांगले बोलते आणि इतरांच्या नजरेत त्याचा आदर कमी होईल असे काहीही करण्याचे ती टाळते. तसेच त्याने घेतलेले निर्णय यशस्वी व्हावेत म्हणून ती सर्वतोपरी प्रयत्न करते.—नीतिसूत्रे १४:१.

१६. सारा व रिबका यांच्या उदाहरणांवरून ख्रिस्ती पत्नी काय शिकू शकतात?

१६ शांत व सौम्य आत्मा असण्याचा असा अर्थ होत नाही की ख्रिस्ती स्त्रीला आपली स्वतःची मतेच असू नयेत किंवा तिचे विचार तितके महत्त्वाचे नाहीत. प्राचीन काळात सारा व रिबका यांसारख्या देवाला भिऊन वागणाऱ्‍या स्त्रियांनी काही विषयांबद्दल आपली काळजी व्यक्‍त करण्याकरता पुढाकार घेऊन आपल्या पतीजवळ आपली मते बोलून दाखवली. आणि बायबलमधील अहवाल दाखवून देतात की यहोवाने त्यांच्या या कृतीला संमती दिली. (उत्पत्ति २१:८-१२; २७:४६–२८:४) ख्रिस्ती पत्नी देखील आपली मते व्यक्‍त करू शकतात. पण त्यांनी हे अपमानास्पद रितीने नव्हे तर विचारपूर्वक करावे. असे केल्यास त्यांचे बोलणे ऐकून घेण्यास पतीला आनंद वाटेल आणि ते परिणामकारक देखील ठरेल.

वचनबद्धतेचे महत्त्व

१७, १८. विवाह बंधनास नष्ट करण्याचे सैतानाचे दुष्ट प्रयत्न हाणून पाडण्याकरता पती व पत्नी काय करू शकतात?

१७ विवाह ही एक आजीवन वचनबद्धता आहे. त्यामुळे पती व पत्नी दोघांनाही कोणत्याही परिस्थितीत आपले वैवाहिक जीवन यशस्वी करण्याची इच्छा असली पाहिजे. पती पत्नींमध्ये प्रामाणिक सुसंवाद नसल्यास समस्या वाढून त्या गंभीर स्वरूप धारण करू शकतात. बरेचदा, समस्या निर्माण होताच विवाहित जोडपी एकमेकांशी बोलण्याचे थांबवतात आणि यामुळे मनात कटुता उत्पन्‍न होते. काही जोडीदार तर आपल्या नातेसंबंधातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागतात व तिऱ्‍हाईत व्यक्‍तीसोबत प्रणयसंबंध जोडण्याचा प्रयत्न करतात. येशूने ही ताकीद दिली की “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.”—मत्तय ५:२८.

१८ प्रेषित पौलाने सर्व ख्रिश्‍चनांसोबतच विवाहित ख्रिश्‍चनांनाही हा सल्ला दिला: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका, तुम्ही रागात असताना सुर्य मावळू नये, आणि सैतानाला वाव देऊ नका.” (इफिसकर ४:२६, २७) आपला प्रमुख शत्रू सैतान हा ख्रिश्‍चनांमध्ये निर्माण होणाऱ्‍या मतभेदांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो. त्याला यशस्वी होऊ देऊ नका! समस्या उद्‌भवतात तेव्हा बायबल निरनिराळ्या विषयांवर यहोवाच्या विचारसरणीबद्दल आपल्याला काय सांगते याचे बायबल आधारित प्रकाशनांतून संशोधन करा. मतभेदांवर शांतपणे व प्रामाणिकपणे चर्चा करा. यहोवाच्या स्तरांविषयी तुम्हाला जे माहीत आहे आणि त्याचे प्रत्यक्ष पालन करण्याकरता तुम्ही जो प्रयत्न करता त्यात तफावत असू नये. (याकोब १:२२-२५) आपल्या जोडीदारासोबत देवासमोर नेहमी एक विवाहित जोडपे या नात्याने चालत राहण्याचा निर्धार करा आणि त्याने जे जोडले आहे ते कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही व्यक्‍ती तोडणार नाही याची काळजी घ्या.—मीखा ६:८. (w०७ ५/१)

[तळटीपा]

^ परि. 3 विभक्‍त व घटस्फोट याविषयीच्या माहितीकरता, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकातील पृष्ठ १७ वरील परिच्छेद ६-७ कृपया पाहावेत.

^ परि. 9 टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १५, १९९०, पृष्ठ २३ पाहावे.

^ परि. 11 ख्रिस्ती मंडळीतील विशेषाधिकार मिळवण्यास पात्र ठरण्याकरता एक पुरुष “मारका” नसावा, अर्थात इतरांना शारीरिकरित्या असो वा संभाषणाद्वारे धाक दाखवणारा नसावा अशी अपेक्षा केली जाते. म्हणूनच टेहळणी बुरूज मे १, १९९१ अंकातील पृष्ठ १७ वर असे म्हटले आहे की जर एक पुरुष “इतरत्र ईश्‍वरी मार्गाचे आचरण दाखवीत आहे पण घरी मात्र हुकुमशहा आहे तर तो पात्र ठरू शकत नाही.”—१ तीमथ्य ३:२-५, १२.

तुम्हाला आठवते का?

• ख्रिस्ती विवाहांतही समस्या निर्माण होण्याची शक्यता का नाकारता येत नाही?

• पती आपल्या पत्नीच्या गरजा कशा पूर्ण करू शकतो व तिचा संभाळ कसा करू शकतो?

• पत्नीने कशाप्रकारे आपल्या पतीची भीड राखावी?

• पती व पत्नी आपल्या विवाह बंधनाला कशारितीने मजबूत बनवू शकतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४ पानांवरील चित्र]

पतीने आपल्या पत्नीची केवळ भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक दृष्टीनेही चांगली काळजी घ्यावी

[२५ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती पत्नी आपली मते आदरपूर्वक व्यक्‍त करते