व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दानीएल पुस्तकातील ठळक मुद्दे

दानीएल पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

दानीएल पुस्तकातील ठळक मुद्दे

“बायबलमधील दानीएल नावाचे पुस्तक सर्वात लक्षवेधक पुस्तक आहे. या पुस्तकाच्या प्रत्येक पानांवर चिरकालिक सत्य आहे.” असे होलमन इलस्ट्रेटेड बायबल डिक्शनरीमध्ये म्हटले आहे. दानीएलच्या अहवालाची सुरुवात सा.यु.पू. ६१८ मध्ये होते जेव्हा बॅबिलोनचा राजा नबुखदनेस्सर जेरूसलेमला येऊन शहराला वेढा घालतो. यहुदावर चढाई केल्यानंतर तो काही ‘इस्राएली . . . तरुण पुरुषांना’ बॅबिलोनमध्ये बंदिवासात नेतो. (दानीएल १:१-४) त्या तरुणांपैकी एक असतो दानीएल. तो तेव्हा कदाचित किशोरवयात असेल. दानीएल पुस्तकाचे लिखाण संपते तरीपण दानीएल अद्याप बॅबिलोनमध्येच आहे. आता दानीएल सुमारे १०० वर्षांचा आहे. तेव्हा देव त्याला एक अभिवचन देतो: “तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील.”—दानीएल १२:१३.

दानीएल पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात सर्व घटना क्रमवार मांडल्या आहेत. हे संपूर्ण पुस्तक दानीएलानेच लिहिले असले तरी, त्याच्या पहिल्या भागाची लिहिण्याची शैली, दानीएल जणू काय एक निरीक्षक आहे या दृष्टीने आहे. आणि शेवटला भाग दानीएलच्या दृष्टीने लिहिण्यात आला आहे. या पुस्तकात जागतिक साम्राज्यांच्या उदय व पतनाविषयीच्या भविष्यवाण्या, मशीहाच्या आगमनाची वेळ आणि आपल्या दिवसांत घडत असलेल्या घटना यांच्याविषयी लिहिले आहे. * वयोवृद्ध दानीएल देखील आपल्या गत जीवनाकडे पाहून अशा काही घटना सांगतो ज्या आपल्याला देवाशी एकनिष्ठ राहण्यास मदत करतात. दावीदाचा संदेश सजीव व सक्रिय आहे.—इब्री लोकांस ४:१२.

क्रमवार घटनांच्या अहवालावरून आपण काय शिकू शकतो?

(दानीएल १:१–६:२८)

वर्ष आहे, सा.यु.पू. ६१७. दानीएल आणि त्याचे तीन तरुण साथीदार, शद्रख, मेशख व अबेद्‌नगो हे चौघेही बॅबिलोनी दरबारात आहेत. दरबारातील तीन वर्षांच्या प्रशिक्षण काळात हे तरुण देवाशी एकनिष्ठ राहिले. सुमारे आठ वर्षांनंतर, राजा नबुखद्‌नेस्सर याला एक गूढ स्वप्न पडते. ते कोणते स्वप्न होते आणि त्याचा अर्थ काय हे दानीएल सांगतो. राजा कबूल करतो, की यहोवा खरोखरच “देवाधिदेव व राजराजेश्‍वर आहे आणि . . . रहस्य प्रगट करणारा देव आहे.” (दानीएल २:४७) परंतु, नबुखद्‌नेस्सर राजा काही दिवसांनी यहोवाने त्याला शिकवलेला धडा विसरून जातो. दानीएलाचे तीन साथीदार जेव्हा एका अवाढव्य मूर्तीसमोर दंडवत करण्यास नकार देतात तेव्हा राजा त्यांना एका धगधगत्या भट्टीत टाकतो. परंतु देव या तिघांनाही वाचवतो. आणि तेव्हाही नबुखद्‌नेस्सर राजाला, “अशा प्रकारे सोडविण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही,” हे कबूल करावेच लागते.—दानीएल ३:२९.

नबुखद्‌नेस्सरला दुसऱ्‍यांदा एक अर्थभरीत स्वप्न पडते. या स्वप्नात तो एक भला मोठा वृक्ष पाहतो ज्याला तोडण्यात येते आणि तो पुन्हा वाढू नये म्हणून त्याची वाढ खुंटवली जाते. दानीएल या स्वप्नाचा अर्थ राजाला सांगतो. या स्वप्नाची एक पूर्णता, राजा नबुखद्‌नेस्सर जेव्हा वेडा होऊन बरा होतो तेव्हा होते. अनेक दशकांनंतर, राजा बेलशस्सर आपल्या सरदारांसाठी एक मेजवानी करतो आणि या प्रसंगी यहोवाच्या मंदिरातून आणलेल्या पात्रांचा अनादर करतो. अगदी त्याच रात्री, बेलशस्सरला ठार मारले जाते आणि मेदी दारयावेश राजाला राज्य मिळते. (दानीएल ५:३०, ३१) दारयावेश राजाच्या कारकीर्दीत जेव्हा दानीएल ९० पेक्षा अधिक वर्षांचा असतो तेव्हा राजमहालातील काही मत्सरी अधिकारी या वृद्ध संदेष्ट्याविरुद्ध एक कट रचतात. पण यहोवा दानीएलास “सिंहांच्या पंजांतून” सोडवतो.—दानीएल ६:२७.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:११-१५—शाकाहारी अन्‍नामुळे या चार यहुदी युवकांचे चेहरे सुरूप व शरीर धष्टपुष्ट झाले होते का? नाही. कोणत्याही प्रकारचे अन्‍न अवघ्या दहा दिवसांत इतके बदल घडवून आणू शकत नाही. हे चार यहुदी तरुण इतर तरुणांपेक्षा इतके धष्टपुष्ट व सुरूप दिसत होते ते यहोवामुळे. या तरुणांनी यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे यहोवाने त्यांना आशीर्वादित केले होते.—नीतिसूत्रे १०:२२.

२:१—नबुखद्‌नेस्सरला एका विशाल मूर्तीचे स्वप्न केव्हा पडले? अहवालानुसार नबुखद्‌नेस्सरला हे स्वप्न “त्याच्या कारकीर्दीच्या दुसऱ्‍या वर्षी” पडले. सा.यु.पू. ६२४ मध्ये तो बॅबिलोनचा राजा झाला. त्याच्या कारकीर्दीचे दुसरे वर्ष सा.यु.पू. ६२३ मध्ये सुरू झाले असावे—यहुदावर चढाई करण्याच्या अनेक वर्षांआधी. त्या काळात, दानीएल बॅबिलोनमध्ये स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी नसावा. सा.यु.पू. ६०७ पासून ‘दुसरे वर्ष’ मोजले जाते. तेव्हा बॅबिलोनच्या राजाने जेरूसलेमचा नाश केला व तो एक जागतिक शासक बनला.

२:३२, ३९—कोणत्या अर्थाने रुप्याचे राज्य सोन्याच्या शीरापेक्षा आणि पितळेचे राज्य रुप्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे होते? मूर्तीतला रुप्याचा भाग मेद व पारस साम्राज्याला चित्रित करतो. मेद व पारस सोन्याचे शीर अर्थात बॅबिलोनच्या तुलनेत कनिष्ठ होते; कारण, बॅबिलोनसारखे मेद व पारसला यहुदाचा पराभव करण्याची ख्याती प्राप्त झाली नव्हती. यानंतर ग्रीसचे साम्राज्य उदयास आले; मूर्तीचा पितळेचा भाग ग्रीसला चित्रित करतो. जसे पितळ रुप्यापेक्षा कनिष्ठ असते तसे ग्रीस तर मेद व पारसपेक्षाही कनिष्ठ होते. ग्रीस साम्राज्याने बहुत भाग व्यापलेला असला तरी, त्याला मेद व पारसप्रमाणे देवाच्या लोकांची बंदिवासातून सुटका करण्याची एकमेव संधी मिळाली नाही.

४:८, ९—दानीएल स्वतः एक ज्योतिषी झाला होता का? नाही. “ज्योतिषांचा अध्यक्ष” ही संज्ञा केवळ दानीएलाच्या हुद्द्‌याला चित्रित करते. तो “बाबेलाच्या सर्व ज्ञान्यांच्या प्रमुखांचा अध्यक्ष” होता.—दानीएल २:४८.

४:१०, ११, २०-२२—नबुखद्‌नेस्सरच्या स्वप्नातील विशाल वृक्ष कशास चित्रित करतो? हा वृक्ष सुरुवातीला एका जागतिक सत्तेचा शासक म्हणून नबुखद्‌नेस्सरास चित्रित करत होता. परंतु, हे प्रभुत्व “पृथ्वीच्या सीमेपर्यंत” [पं.र.भा.] पोहचल्यामुळे तो वृक्ष दुसऱ्‍या एका महान गोष्टीस चित्रित करतो. दानीएल ४:१७ वचनात, नबुखद्‌नेस्सरला पडलेले स्वप्न, संपूर्ण मानवजातीवरील ‘परात्पर देवाच्या’ सत्तेशी जोडण्यात आले आहे. तेव्हा, तो वृक्षसुद्धा, पृथ्वीच्यासंबंधाने यहोवाच्या सार्वत्रिक सार्वभौमत्वास चित्रित करतो. यास्तव, स्वप्नाच्या दोन पूर्णता आहेत—नबुखद्‌नेस्सरच्या सत्तेच्या संबंधाने आणि यहोवाच्या सार्वभौमत्त्वाच्या संबंधाने.

४:१६, २३, २५, ३२, ३३—“सात काळ” किती अवधीचे होते? नबुखद्‌नेस्सर राजात जे जे बदल झाले ते खरोखरच्या सात दिवसात होणे शक्य नाही, त्यासाठी “सात काळ” एका मोठ्या अवधीचे असणे आवश्‍यक होते. राजाच्या बाबतीत, हा काळ ३६० दिवसांची सात वर्षे किंवा २५२० दिवसांचा होता. मोठ्या पूर्णतेत, “सात काळ” म्हणजे, २५२० वर्षे होय. (यहेज्केल ४:६, ७) सा.यु.पू. ६०७ मध्ये जेरूसलेमचा नाश झाला तेव्हापासून यांची सुरुवात झाली आणि सा.यु. १९१४ मध्ये येशू स्वर्गात राजा झाला तेव्हा हा काळ समाप्त झाला.—लूक २१:२४.

६:६-१०—एका विशिष्ट स्थितीतच यहोवाला प्रार्थना केली पाहिजे, असा कोणताही नियम नसल्यामुळे, दानीएलाने जरा सुज्ञपणे वागून, ३० दिवसांच्या कालावधीत गुप्तपणे प्रार्थना करायला हवी होती, नाही का? दानीएल दिवसांतून तीनदा प्रार्थना करतो हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच माहीत होते. त्यामुळेच तर त्याच्याविरुद्ध कट रचणाऱ्‍यांनी, प्रार्थना करण्यावरच बंदी आणणारा नियम काढण्याची शक्कल लढवली. प्रार्थनेच्या बाबतीत दानीएलाचा जो रिवाज होता त्यात जर त्याने कसलाही बदल केला असता तर इतरांच्या दृष्टीने तो हातमिळवणी केल्यासारखा असता व यावरून, यहोवाला तो एकनिष्ठ उपासना देत नाही असे सूचित झाले असते.

आपल्याकरता धडे:

१:३-८. दानीएल आणि त्याच्या साथीदारांनी यहोवाशी एकनिष्ठ राहण्याचा जो दृढनिश्‍चय केला होता त्यावरून, त्यांना मिळालेल्या पालकांच्या प्रशिक्षणाचे मूल्य समजून येते. देवाला भिऊन वागणारे पालक जेव्हा स्वतःच्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देतात आणि आपल्या मुलांनाही तसेच करायला शिकवतात तेव्हा, त्यांची मुले बहुतेकदा शाळेत किंवा इतरत्र येणाऱ्‍या कोणत्याही प्रकारच्या मोहांचा व दबावांचा प्रतिकार करतात.

१:१०-१२. “खोजांचा सरदार” राजाला का घाबरत होता व तो ही गोष्ट पुढे का नेत नव्हता हे दानीएलाला समजले. दानीएल मग ‘कारभाऱ्‍याकडे’ गेला ज्याला त्याच्या हुद्द्‌यामुळे थोडी मोकळीक होती. आपल्यासमोर जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा आपणही सूक्ष्मदृष्टी, समंजसपणा आणि बुद्धीचा उपयोग केला पाहिजे.

२:२९, ३०. बायबलच्या शिक्षणाचा फायदा घेतल्यामुळे आपण जेव्हा कोणत्याही प्रकारचे ज्ञान, उत्तम गुण आणि कौशल्ये प्राप्त करतो तेव्हा त्या सर्वांचे पूर्ण श्रेय आपण दानीएलाप्रमाणे यहोवाला दिले पाहिजे.

३:१६-१८. अन्‍नाच्या बाबतीत या तीन हिब्रू तरुणांनी जर हातमिळवणी केली असती तर आता ह्‍या प्रसंगी त्यांनी यहोवाची इतकी ठामपणे बाजू घेणे शक्य नसते. आपणही “सर्व गोष्टींविषयी विश्‍वासू” असले पाहिजे.—१ तीमथ्य ३:११.

४:२४-२७. राज्याचा संदेश आणि देवाच्या प्रतिकूल न्यायदंडाचा संदेश सांगण्यासाठी दानीएलासारख्या विश्‍वासाची व धैर्याची गरज आहे. नबुखद्‌नेस्सर राजावर काय गुदरणार आहे आणि त्याचे “स्वास्थ्य अधिक काळ” राहण्याकरता त्याने काय करावे हे त्याला सांगण्यासाठी दानीएलाला विश्‍वास आणि धैर्याची गरज होती.

५:३०, ३१. ‘बाबेलच्या राजासंबंधाने असलेले कवन’ खरे ठरले. (यशया १४:३, ४, १२-१५) बॅबिलोनी साम्राज्यासारखी शेखी मिरवणाऱ्‍या दियाबल सैतानाचा देखील अतिशय अपमानास्पदरीत्या अंत होणार आहे.—दानीएल ४:३०; ५:२-४, २३.

दानीएलाने पाहिलेले दृष्टांत काय प्रगट करतात?

(दानीएल ७:१–१२:१३)

दानीएलाला सा.यु.पू. ५५३ मध्ये पहिला दृष्टांत दाखवला जातो तेव्हा त्याने सत्तरी ओलांडलेली असते. तेव्हा दानीएल चार महाश्‍वापदे पाहतो जी त्याच्या दिवसांपासून आपल्या दिवसांपर्यंत उदय व पतन पावलेल्या जागतिक सत्तांना चित्रित करतात. स्वर्गातील एका दृष्टांतात दानीएल ‘मानवपुत्रासारख्या’ कोणाला तरी पाहतो ज्याचे “प्रभुत्व अक्षय” आहे. (दानीएल ७:१३, १४) दोन वर्षांनंतर, दानीएल पुन्हा एक दृष्टांत पाहतो ज्यांत, मेद-पारस व ग्रीस आहे आणि एक ‘उग्रस्वरुपी राजा’ जो उभा राहिला आहे.—दानीएल ८:२३.

आता वर्ष सा.यु.पू. ५३९ आहे. बॅबिलोनचे पतन झाले आहे आणि मेदी दारयावेश खास्द्यांच्या राज्यावर राजा बनतो. दानीएल आपल्या मायदेशाच्या पुनर्वसनाविषयी यहोवाला प्रार्थना करतो. तो अद्याप प्रार्थनाच करत असतो तोच, यहोवा आपला दूत गब्रिएल याला पाठवून दानीएलाला मशीहाच्या आगमनाविषयीची “बुद्धि देऊन चतुर करण्यासाठी” अर्थात मशीहाच्या आगमनाविषयीची सूक्ष्मदृष्टी देण्याकरता पाठवतो. (दानीएल ९:२०-२५) काळ सरत सरत सा.यु.पू. ५३६/५३५ साल येते. इस्राएलांचा एक शेष गट जेरूसलेमला परत येतो. पण मंदिराच्या बांधकामाला विरोध होत असतो. यामुळे दानीएलाला चिंता वाटू लागते. याविषयी तो दिवसंरात्र कळकळीने प्रार्थना करतो आणि यहोवा उच्च पदावर असलेल्या देवदूताला दानीएलाकडे पाठवतो. दानीएलाचे मनोबल वाढवून त्याला उत्तेजन दिल्यानंतर, हा देवदूत उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा यांच्यात श्रेष्ठत्व मिळवण्याविषयी लागलेल्या चढाओढीच्या संबंधाने असलेल्या एका भविष्यवाणीविषयी सांगतो. या दोन राजांमध्ये चाललेल्या या चढाओढीचा काळ, महान अलेक्झॅन्डरचे राज्य त्याच्या चार सभापतींमध्ये विभाजित झाले तेव्हापासून मोठा अधिपती मीखाएल ‘उठेपर्यंत’ आहे.—दानीएल १२:१.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

८:९—हा ‘वैभवी देश’ कोणास चित्रित करतो? येथे, ‘वैभवी देश’ हा, अँग्लो-अमेरिकन जागतिक सत्तेच्या काळात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या पृथ्वीवरील स्थितीस चित्रित करतो.

८:२५, (पं.र.भा.)—हा ‘अधिपतींचा अधिपती’ कोण आहे? इब्री भाषेत सार या शब्दाचे भाषांतर “अधिपती” असे करण्यात आले आहे ज्याचा मूळ अर्थ “प्रमुख” अथवा “मस्तक” असा होतो. ‘अधिपतींचा अधिपती’ ही पदवी केवळ यहोवा देवाला लागू होते जो सर्व अधिपती असलेल्या देवदूतांचा आणि “मुख्य अधिपतींपैकी एक मीखाएल” याचाही प्रमुख आहे.—दानीएल १०:१३.

९:२१—दानीएल गब्रीएल देवदूताला “पुरुष” असे का संबोधतो? कारण गब्रीएल त्याला, मनुष्यरूपात भेटायला आला होता. पूर्वीसुद्धा एका दृष्टांतात त्याने दानीएलाला अशाच रूपात भेट दिली होती.—दानीएल ८:१५-१७.

९:२७—सा.यु. ३६ पर्यंत अथवा वर्षांच्या ७० व्या सप्ताहाच्या शेवटपर्यंत कोणता करार ‘पुष्कळांकरता [चालू राहिला]’? सा.यु. ३३ मध्ये येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले तेव्हा नियमशास्त्र करार रद्द करण्यात आला. परंतु, सा.यु. ३६ पर्यंत अब्राहामाशी केलेला करार शारीरिक इस्राएलांप्रती चालू ठेवण्याद्वारे यहोवाने यहुद्यांना, ते अब्राहामाचे वंशज होते या आधारावर, खास कृपापसंती दाखवण्याचा काळ लांबवला. अब्राहामाशी केलेला करार अद्यापही, ‘देवाच्या इस्राएलशी’ चालू आहे.—गलतीकर ३:७-९, १४-१८, २९; ६:१६.

आपल्याकरता धडे:

९:१-२३; १०:११. दानीएलाच्या नम्रतेमुळे, देवभक्‍तीमुळे, अभ्यासूपणामुळे, प्रार्थनेत तत्पर असल्यामुळे तो “परमप्रिय” होता. याच गुणांमुळे तो त्याच्या जीवनाच्या शेवटल्या घटकेपर्यंत देवाशी विश्‍वासू राहू शकला. आपणही दानीएलाच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा निश्‍चय करूया.

९:१७-१९. “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास” करेल अशा देवाच्या नव्या जगासाठी आपण प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला, आपल्या व्यक्‍तिगत दुःखांचा व कष्टांचा अंत होण्याविषयी चिंता नसून यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण आणि त्याचे सार्वभौमत्व उंचावले जाईल, ही मुख्य चिंता असली पाहिजे, नाही का?—२ पेत्र ३:१३.

१०:९-११, १८, १९. दानीएलाचे मनोबल वाढवण्यासाठी आलेल्या देवदूताचे अनुकरण करून आपणही एकमेकांना मदत करण्याद्वारे व सांत्वनदायक शब्दांद्वारे उत्तेजन दिले पाहिजे आणि हिम्मत दिली पाहिजे.

१२:३. या शेवटल्या दिवसांमध्ये, “जे सुज्ञ” आहेत अर्थात अभिषिक्‍त ख्रिस्ती ‘ज्योतीसारखे चमकत’ आहेत. त्यांनी अनेकांना ‘धार्मिकतेकडे वळवले’ आहे. यांत, ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या’ ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ सदस्यांचा समावेश आहे. (फिलिप्पैकर २:१५; प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६) ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीत अभिषिक्‍त जण ख्रिस्तासोबत जेव्हा पृथ्वीवरील आज्ञाधारक मानवजातीला खंडणीचे सर्व लाभ मिळवून देण्यात भाग घेतील तेव्हा ते पूर्णार्थाने “ताऱ्‍यांप्रमाणे चमकतील.” ‘दुसऱ्‍या मेंढरांनी’ अभिषिक्‍त जणांशी एकनिष्ठपणे जडून राहून प्रत्येक मार्गाने त्यांना मनापासून सहकार्य केले पाहिजे.

जे यहोवाचे ‘भय धरतात त्यांना तो आशीर्वाद’ देतो

आपण ज्या देवाची उपासना करतो त्या देवाविषयी दानीएलाचे पुस्तक आपल्याला काय शिकवते? त्यात असलेल्या भविष्यवाण्या—ज्या पूर्ण झाल्या आहेत आणि भविष्यात पूर्ण होणार आहेत—त्यांवर मनन करा. यहोवा, दिलेले वचन पूर्ण करणारा देव आहे, हेच वर्णन या पुस्तकातून आपल्याला मिळते!—यशया ५५:११.

दानीएलाबद्दलचा अहवाल असलेल्या भागातून आपल्याला आपल्या देवाविषयी काय कळते? बॅबिलोनी राजमहालातील रीतिरिवाजात सामावून जाण्यास नकार देणाऱ्‍या त्या चार हिब्रू तरुणांस ‘विद्या, सूक्ष्मदृष्टी व बुद्धी’ मिळाली. (दानीएल १:१७, NW) खऱ्‍या देवाने आपल्या देवदूताला धाडून शद्रख, मेशख व अबेद्‌नगोला धगधगत्या भट्टीतून वाचवले. दानीएलाला सिंहांच्या गुहेतून सुखरूप वाचवण्यात आले. जे यहोवावर ‘भाव ठेवतात त्यांचा तो साहाय्यकर्ता व ढाल’ बनतो आणि त्याचे ‘भय धरणाऱ्‍यांना तो आशीर्वाद देतो.’—स्तोत्र ११५:९, १३. (w०७ ९/१)

[तळटीप]

^ परि. 2 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! (इंग्रजी) या पुस्तकात दानीएल पुस्तकातील एकेका वचनाची चर्चा करण्यात आली आहे.

[२० पानांवरील चित्र]

दानीएल “परमप्रिय” का होता?