व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पालकांनो आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा

पालकांनो आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा

पालकांनो आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा

“तुम्ही जे काही करता ते सर्व प्रीतीने करावे.”—१ करिंथकर १६:१४.

१. बाळाचा जन्म होतो तेव्हा पालकांच्या मनात कशाप्रकारच्या भावना येतात?

बाळाचा जन्म हा जीवनातल्या सर्वात आनंददायक घटनांपैकी एक आहे. बहुतेक आईवडील याच्याशी सहमत होतील. आलीया नावाची एक आई म्हणते, “मी माझ्या बाळाकडे पहिल्यांदा पाहिलं, त्या क्षणी मला जे वाटलं ते अवर्णनीय आहे. हे जगातलं सर्वात लोभसवाणं बाळ आहे असं मला वाटलं.” पण बाळाच्या जन्मामुळे आनंदासोबतच पालकांना एकप्रकारची चिंताही वाटते. आलीयाचा पती म्हणतो, “मला याची काळजी होती, की जीवनाच्या आव्हानांना यशस्वीपणे तोंड देण्याकरता मी आपल्या मुलीला लायक बनवू शकेन की नाही.” बऱ्‍याच आईवडिलांना अशाप्रकारची चिंता वाटत असते. मुलांना प्रेमाने वळण लावण्याची गरज आहे याची त्यांना जाणीव असते. पण आपल्या मुलांना प्रेमळपणे वळण लावू इच्छिणाऱ्‍या ख्रिस्ती पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यांपैकी काही समस्या कोणत्या आहेत?

२. पालकांना कशाप्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते?

आज आपण या जगाच्या शेवटल्या काळात अगदी टोकाला पोचलो आहोत. बायबलमध्ये पूर्वीच भाकीत केल्याप्रमाणे मानव समाजात प्रेमाचा अभाव आहे. रक्‍ताचे नाते असलेले कौटुंबिक सदस्यसुद्धा एकमेकांप्रती ‘ममताहीन, उपकार न स्मरणारे, विश्‍वासघातकी, असंयमी व क्रूर’ झाले आहेत. (२ तीमथ्य ३:१-५) अशाप्रकारची वृत्ती बाळगणाऱ्‍या लोकांसोबत दररोज संपर्क येत असल्यामुळे, ख्रिस्ती कुटुंबातले सदस्य एकमेकांशी ज्याप्रकारे वागतात, त्यावरही याचा प्रभाव पडतो. शिवाय स्वाभाविक अपरिपूर्णतेमुळे, पालकांना स्वतःच्या दुष्प्रवृत्तींशी झगडावे लागते. उदाहरणार्थ, ते सुद्धा कधीकधी संयम सोडून वागतात, रागाच्या भरात नको ते बोलून जातात, किंवा इतर मार्गांनी अविचारीपणे वागतात.—रोमकर ३:२३; याकोब ३:२, ८, ९.

३. आईवडील आपल्या मुलांना आनंदी व्यक्‍ती बनण्यास कसे साहाय्य करू शकतात?

या समस्या असूनही आईवडील आपल्या मुलांना योग्यप्रकारे वळण लावून त्यांना आनंदी व आध्यात्मिकरित्या सुदृढ व्यक्‍ती बनवू शकतात. ते कसे? “तुम्ही जे काही करता ते सर्व प्रीतीने करावे,” या बायबलमधील सल्ल्याचे पालन करण्याद्वारे. (१ करिंथकर १६:१४) खरोखर ‘प्रीती पूर्णता करणारे बंधन आहे.’ (कलस्सैकर ३:१४) म्हणून, करिंथकरांच्या पहिल्या पत्रात प्रेषित पौलाने वर्णन केलेल्या प्रीतीच्या तीन वैशिष्ट्यांचे आपण आता परीक्षण करू या आणि पालक आपल्या मुलांना वळण लावताना या गुणाचा काही विशिष्ट व्यावहारिक मार्गांनी कशाप्रकारे अवलंब करू शकतात याविषयी चर्चा करू या.—१ करिंथकर १३:४-८.

सहनशील असण्याची गरज

४. आईवडिलांनी सहनशील असणे का गरजेचे आहे?

पौलाने लिहिले: “प्रीति सहनशील आहे.” (१ करिंथकर १३:४) “सहनशील” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ सोशीक आणि लगेच न रागावणारा असा होतो. आईवडिलांनी सहनशील असणे का गरजेचे आहे? याची बरीच कारणे आहेत. कोणत्याही पालकांना विचारल्यास ते ही कारणे तुम्हाला सांगतील. त्यांपैकी काही कारणे विचारात घ्या. मुले आईवडिलांना काहीही मागतात किंवा विचारतात तेव्हा ते एकदाच विचारून गप्प बसत नाहीत. आईवडिलांनी स्पष्टपणे ‘नाही’ म्हणून सांगितले तरीसुद्धा, आईवडिलांचे मन कदाचित बदलेल या आशेने मुले पुन्हापुन्हा विचारत राहतात. कधीकधी किशोरवयीन मुले एखादी विशिष्ट गोष्ट करण्याची परवानगी मागतात. आईवडिलांना माहीत असते की असे करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तरीसुद्धा, परवानगी मिळवण्याकरता ते आईवडिलांशी बराच वेळ वादविवाद घालत राहतात. (नीतिसूत्रे २२:१५) आणि आपल्या सर्वांप्रमाणेच, मुले देखील कधीकधी एकच चूक वारंवार करतात.—स्तोत्र १३०:३.

५. कोणती गोष्ट आईवडिलांना सहनशील असण्यास मदत करू शकेल?

आपल्या मुलांशी सहनशीलतेने वागण्यास कोणती गोष्ट आईवडिलांना साहाय्य करेल? राजा शलमोनाने लिहिले: “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो.” (नीतिसूत्रे १९:११) एकेकाळी आपणही ‘मुलासारखे बोलत होतो, मुलासारखी आपली बुद्धि होती, मुलासारखे आपले विचार होते,’ हे आठवणीत ठेवल्यास, आईवडिलांना मुले विशिष्ट प्रकारे का वागतात हे समजण्यास मदत मिळेल. (१ करिंथकर १३:११) आईवडिलांनो, तुम्ही लहानपणी एखादा हट्ट पुरवण्यासाठी आपल्या आई किंवा वडिलांच्या मागे लागल्याचे तुम्हाला आठवते का? आपले आईवडील आपल्या भावना, आपल्या समस्या समजूच शकत नाहीत असा किशोरवयात आल्यानंतर कधी तुम्ही विचार केला होता का? जर केला असेल, तर मग तुमची मुले अशी का वागतात आणि त्यांना तुमच्या निर्णयांविषयी सहनशीलपणे वारंवार आठवण करून देण्याची का गरज आहे हे तुमच्या लक्षात येईल. (कलस्सैकर ४:६) यहोवाने इस्राएली पालकांना आपले नियम लहान मुलांच्या मनावर ‘बिंबवण्याची’ आज्ञा दिली होती हे लक्ष देण्याजोगे आहे. (अनुवाद ६:६, ७) ‘बिंबवणे’ असे भाषांतर केलेल्या इब्री शब्दाचा अर्थ “पुनरुक्‍ती करणे” “वारंवार सांगणे” किंवा “ठसवणे” असा होतो. त्याअर्थी, आईवडिलांना कदाचित बरेचदा एकच गोष्ट सांगावी लागेल, तेव्हा कोठे मूल देवाच्या नियमांचे पालन करण्यास शिकेल. जीवनाविषयी इतर धडे देतानाही, अशाचप्रकारे एकच गोष्ट वारंवार सांगण्याची गरज पडू शकते.

६. सहनशील पालक मुलांना मोकाट सोडतात असे आपण का म्हणू शकत नाही?

पण सहनशील पालक, आपल्या मुलांना मोकाट सोडतात असा याचा अर्थ होत नाही. देवाचे वचन ही ताकीद देते: “मोकळे सोडिलेले पोर आपल्या आईला खाली पाहावयास लावते.” पण असे घडू नये यासाठी तेच नीतिसूत्र असे सांगते: “छडी व वाग्दंड ज्ञान देतात.” (नीतिसूत्रे २९:१५) कधीकधी मुलांना असे वाटू शकते की आईवडिलांना आपल्याला शिकवण्याचा, आपले दोष दाखवण्याचा काही अधिकार नाही. पण ख्रिस्ती कुटुंब हे लोकशाही सरकारासारखे असू नये. म्हणजे, कुटंबात अधिकार चालवण्याचा आईवडिलांचा हक्क हा मुलांच्या पसंती-नापंसतीवर अवलंबून असू नये. कारण यहोवा, जो कुटुंब व्यवस्थेचा प्रमुख आहे त्यानेच आईवडिलांना आपापल्या मुलांना वळण लावण्याचा व प्रेमळपणे शिस्त लावण्याचा अधिकार दिला आहे. (१ करिंथकर ११:३; इफिसकर ३:१५; ६:१-४) किंबहुना, पौलाने प्रीतीच्या ज्या दुसऱ्‍या वैशिष्ट्याचे वर्णन केले ते मुलांना शिस्त लावण्याशी संबंधित आहे.

प्रेमाने शिक्षा देणे

७. दयाळू पालक आपल्या मुलांना शिक्षा का देतात आणि शिक्षा देण्यात कशाचा समावेश होतो?

पौलाने लिहिले की “प्रीति . . . दयाळू आहे.” (१ करिंथकर १३:४, NW) जे पालक खरोखर दयाळू असतात ते आपल्या मुलांना सातत्याने शिक्षा देतात. असे करताना ते यहोवाचे अनुकरण करत असतात. पौलाने लिहिले: “ज्यावर परमेश्‍वर प्रीति करितो, त्याला तो शिक्षा करतो.” पण बायबलमध्ये शिक्षा देण्याचा अर्थ केवळ शासन करणे असा होत नाही. तर मुलांना शिकवण्याचा व प्रशिक्षण देण्याचाही त्यात समावेश आहे. अशाप्रकारच्या शिक्षेचा उद्देश काय असतो? पौल सांगतो, “ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व व शांतिकारक फळ देते.” (इब्री लोकांस १२:६, ११) मुलांना देवाच्या इच्छेनुसार दयाळुपणे शिकवण्याद्वारे आईवडील त्यांना शांतीप्रिय व सात्त्विक व्यक्‍ती बनण्याची संधी देत असतात. मुलांनी “परमेश्‍वराचे शिक्षण” स्वीकारल्यास त्यांना बुद्धी, ज्ञान व सुज्ञता प्राप्त होते. हे गुण सोन्यारुप्यापेक्षाही मौल्यवान आहेत.—नीतिसूत्रे ३:११-१८.

८. आईवडील आपल्या मुलांना शिक्षा देण्याचे टाळतात तेव्हा सहसा काय घडते?

दुसरीकडे पाहता, आईवडील आपल्या मुलांना शिक्षा देण्याचे टाळतात तेव्हा ते दयाळुपणाने वागत नसतात. यहोवाने शलमोनाला असे लिहिण्यास प्रेरित केले: “जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करितो तो त्याजवर प्रीति करणारा होय.” (नीतिसूत्रे १३:२४) सातत्याने शिक्षा न मिळालेली मुले सहसा आत्मकेंद्रित व असमाधानी असतात. दुसरीकडे पाहता, जे आईवडील मुलांच्या भावना समजून घेतात पण त्याच वेळेस त्यांच्याकरता सुनिश्‍चित मर्यादाही घालून देतात, त्यांची मुले सहसा अभ्यासात हुशार असतात. इतरांशी मिळूनमिसळून वागणे त्यांना सोपे जाते आणि सहसा ही मुले जास्त आनंदीही असतात. तर मग निश्‍चितच, जे आईवडील आपल्या मुलांना शिक्षा देतात ते त्यांच्याशी दयाळुपणे वागत असतात असे आपण म्हणू शकतो.

९. ख्रिस्ती आईवडील आपल्या मुलांना काय शिकवतात आणि या गोष्टींविषयी त्यांचा कसा दृष्टिकोन असावा?

मुलांना दयाळू व प्रेमळ पद्धतीने वळण लावण्यात कशाचा समावेश आहे? मुलांकडून आपण नेमकी काय अपेक्षा करतो याविषयी आईवडिलांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. उदाहरणार्थ, अगदी बालपणापासून ख्रिस्ती आईवडिलांच्या मुलांना बायबलमधील मूलभूत तत्त्वांविषयी तसेच खऱ्‍या उपासनेच्या निरनिराळ्या कार्यांत सहभाग घेण्याविषयी शिकवले जाते. (निर्गम २०:१२-१७; मत्तय २२:३७-४०; २८:१९; इब्री लोकांस १०:२४, २५) या गोष्टींचे पालन करणे आपल्या इच्छेवर अवलंबून नाही, तर ते अनिवार्य आहे हे मुलांना माहीत असले पाहिजे.

१०, ११. मुलांकरता नियम बनवताना आईवडिलांनी त्यांच्या विनंतीची दखल का घ्यावी?

१० पण खास कुटुंबासाठी असलेले घरगुती नियम बनवताना मात्र, आईवडील कधीकधी आपल्या मुलांनाही चर्चेत सामील करू शकतात. या नियमांविषयी चर्चा करताना मुले स्वतः सहभागी असल्यास ती या नियमांचे जास्त उत्सुकतेने पालन करतील. उदाहरणार्थ, मुलांनी विशिष्ट वेळेच्या आत घरी परत येण्याविषयी नियम बनवताना, एकतर आईवडील स्वतः एक निश्‍चित वेळ ठरवू शकतात. किंवा, ते आपल्या मुलांना ही वेळ सुचवण्याची आणि ती वेळ का योग्य ठरेल यासंबंधी कारणे सांगण्याची संधी देऊ शकतात. मुलांचे ऐकून घेतल्यावर आईवडील आपल्याला कोणती वेळ योग्य वाटते आणि ती का योग्य वाटते हे स्पष्ट करू शकतात. पुष्कळदा मुलांच्या व आईवडिलांच्या विचारांत मतभेद असू शकतो. अशावेळी काय करावे? जर बायबलमधील तत्त्वांचे उल्लंघन होणार नसेल तर त्याबाबतीत आईवडील आपल्या मुलांच्या इच्छेनुसार निर्णय घेऊ शकतात. पण असे केल्यास, आईवडील आपल्या अधिकाराचा त्याग करत आहेत असा त्याचा अर्थ होतो का?

११ या प्रश्‍नाच्या उत्तराकरता, लोट व त्याच्या कुटुंबासोबत व्यवहार करताना यहोवाने आपल्या अधिकाराचा किती प्रेमळपणे वापर केला हे विचारात घ्या. लोट, त्याची पत्नी व त्याच्या मुलींना सदोममधून बाहेर आणल्यानंतर देवदूत त्यांना म्हणाले: “डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल.” पण लोटने उत्तर दिले: “हे प्रभू, नको! नको!” मग त्याने एक पर्यायही सुचवला: “पाहा, पळून जाण्यास हे नगर जवळ असून लहान आहे; . . . तिकडे मला पळून जाऊ दे.” यहोवाने काय उत्तर दिले? तो म्हणाला: “पाहा, तुझ्या याहि गोष्टीला मी मान्य आहे.” (उत्पत्ति १९:१७-२२) यहोवाने आपल्या अधिकाराचा त्याग केला होता का? मुळीच नाही! पण त्याने लोटच्या विनंतीकडे लक्ष दिले आणि या बाबतीत त्याच्याशी अधिक दयाळुपणे वागण्याचे ठरवले. पालक या नात्याने, नियम बनवताना तुम्हालाही आपल्या मुलांच्या विनंत्यांची दखल घेता येईल का?

१२. कोणती गोष्ट मुलांना सुरक्षिततेची भावना देते?

१२ अर्थात, मुलांना केवळ नियमच नव्हेत तर या नियमांचे उल्लंघन करण्याचे परिणामही माहीत असणे आवश्‍यक आहे. नियम तोडल्यास कोणती शिक्षा मिळेल याविषयी चर्चा करून ते स्पष्ट झाल्यावर या नियमांची अंमलबजावणी केली गेली पाहिजे. आईवडील जर मुलांना फक्‍त शिक्षा देण्याची तंबी देत असतील पण प्रत्यक्ष शिक्षा देत नसतील तर हा दयाळुपणा ठरणार नाही. बायबल म्हणते, “दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्राचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते.” (उपदेशक ८:११) अर्थात, मुलांना लाजिरवाणे वाटू नये म्हणून कधीकधी आईवडील सर्वांसमोर, विशेषतः मुलांच्या मित्रांसमोर त्यांना शिक्षा द्यायचे टाळत असतील. पण आपले आईवडील शब्दाचे पक्के आहेत, शिक्षा द्यावी लागली तरी, त्यांचे “होय” तर होय, आणि “नाही” तर नाहीच असते हे जर मुलांना माहीत असेल तर त्यांना जास्त सुरक्षित वाटते. आणि आईवडिलांबद्दल त्यांच्या मनातला आदर आणि प्रेमही वाढते.—मत्तय ५:३७.

१३, १४. आईवडील आपल्या मुलांना वळण लावताना यहोवाचे अनुकरण कसे करू शकतात?

१३ शिक्षा दयाळुपणे द्यायची असल्यास, ती शिक्षा आणि शिक्षा देण्याची पद्धत देखील प्रत्येक मुलाच्या गरजेनुरूप असली पाहिजे. पॅम नावाची माता असे म्हणते: “शिक्षा देण्याच्या बाबतीत आमची दोन्ही मुले वेगळी होती. एकावर जी शिक्षा परिणामकारक होती ती दुसऱ्‍यावर नव्हती.” पॅमचे पती लॅरी म्हणतात: “आमची थोरली मुलगी अतिशय हट्टी होती आणि तिला कडक शिक्षा केल्याशिवाय ती सुधरायची नाही. पण आमची धाकटी मुलगी मात्र वेगळी होती. तिला फक्‍त कडक शब्दांत ताकीद दिली किंवा नुसतेच रागाने पाहिले तरी ती लगेच ऐकायची.” तर, दयाळू पालक प्रत्येक मुलाकरता काय योग्य ठरेल याचा विचार करूनच शिक्षा देतात.

१४ यहोवा देव आईवडिलांकरता एक उत्तम आदर्श आहे. त्याला आपल्या सेवकांपैकी प्रत्येकाचे सद्‌गुण व अवगुण माहीत आहेत. (इब्री लोकांस ४:१३) शिवाय, शिक्षा देताना यहोवा अवाजवीपणे कडक किंवा खूपच नरमही होत नाही. त्याऐवजी तो आपल्या लोकांना “योग्य” प्रमाणात शिक्षा देतो. (यिर्मया ३०:११) आईवडिलांनो, तुम्हाला तुमच्या मुलांचे सद्‌गुण व अवगुण माहीत आहेत का? या माहितीचा तुम्ही त्यांना सकारात्मक व दयाळू पद्धतीने वळण लावण्याकरता उपयोग करता का? जर तुम्ही असे करत असाल तर आपल्या मुलांवर तुमचे प्रेम आहे हे तुम्ही दाखवत आहात.

प्रामाणिकपणे विचार व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन द्या

१५, १६. आईवडील आपल्या मुलांना प्रामाणिकपणे आपले विचार व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन कसे देऊ शकतात आणि ख्रिस्ती पालकांनी असे करण्याकरता कोणत्या पद्धतींचा वापर केला आहे?

१५ प्रीतीचे आणखी एक वैशिष्ट्य हे आहे की “ती अनीतीत आनंद मानीत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते.” (१ करिंथकर १३:६) आईवडील आपल्या मुलांना जे योग्य व सत्य आहे त्याची आवड धरण्यास कसे शिकवू शकतात? असे करण्याचा एक मुख्य मार्ग म्हणजे, मुलांना आपल्या भावना प्रामाणिकपणे व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन देणे. मुलांनी व्यक्‍त केलेले विचार आईवडिलांना स्वीकारायला कठीण वाटत असतील तरीसुद्धा त्यांनी आपल्या मुलांना मोकळेपणाने भावना व्यक्‍त करू दिल्या पाहिजेत. साहजिकच, जेव्हा मुले नीतिमान तत्त्वांच्या अनुरूप असणारे विचार व भावना व्यक्‍त करतात तेव्हा आईवडिलांना आनंद वाटतो. पण जर मुलांच्या प्रामाणिक अभिप्रायांवरून त्यांच्या मनाचा कल अधार्मिकतेकडे आहे असे दिसून आले तर? (उत्पत्ति ८:२१) अशावेळी आईवडिलांची प्रतिक्रिया कशी असावी? कदाचित अशाप्रकारचे विचार व्यक्‍त केल्याबद्दल त्यांना आपल्या मुलांना लगेच शिक्षा द्यावीशी वाटेल. जर आईवडिलांनी अशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवली, तर मुले हळूहळू फक्‍त आईवडिलांना जे आवडते तेच बोलायला शिकतील. अर्थात, मुले उद्धटपणे बोलली तर त्यांची ताबडतोब कानउघाडणी केलीच पाहिजे. पण मुलांना अदबशीरपणे आपले विचार व्यक्‍त करायला शिकवणे, आणि त्यांच्या तोंडात नेमके शब्द घालणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

१६ मुलांना आपले विचार प्रामाणिकपणे व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन कसे देता येईल? आलीया, जिच्याविषयी याआधी उल्लेख करण्यात आला होता, ती म्हणते, “एखाद्या विषयावर मुलांचे म्हणणे ऐकल्यावर आम्ही अस्वस्थ झालो तरी, आम्ही त्या क्षणी भावनांच्या भरात प्रतिक्रिया दाखवत नाही. असे केल्यामुळे आम्ही मोकळ्या सुसंवादाकरता अनुकूल असे वातावरण निर्माण केले आहे.” टॉम नावाचा एक पिता असे म्हणतो, “आम्ही आपल्या मुलीला सांगितले की तिला आमचे विचार पटले नाहीत तरी, तिने मोकळेपणाने आपल्या भावना आमच्याजवळ व्यक्‍त कराव्यात. आम्हाला जाणवले, की जर आम्ही प्रत्येक वेळेस तिला अडवले आणि स्वतःचे विचार तिच्यावर लादले तर ती वैतागून जाईल आणि आपल्या खऱ्‍या भावना आमच्यापासून लपवून ठेवायला शिकेल. त्याऐवजी, आम्ही तिचे ऐकून घेत असल्यामुळे ती ही आमचे ऐकून घ्यायला शिकली आहे.” मुलांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञांचे पालन निश्‍चितच केले पाहिजे. (नीतिसूत्रे ६:२०) पण मोकळ्या सुसंवादामुळे आईवडिलांना आपल्या मुलांच्या तर्कबुद्धीला चालना देण्याची संधी मिळते. चार मुलांचा पिता असणारा व्हिंसेंट म्हणतो: “बरेचदा आम्ही एखाद्या गोष्टीचे फायदे काय व तोटे काय याविषयी बराच वेळ बोलत असू. त्यामुळे कोणता पर्याय सर्वात चांगला हे मुलांना स्वतःहूनच ठरवता यायचे. असे केल्यामुळे त्यांची वैचारिक क्षमता वाढली आहे.”—नीतिसूत्रे १:१-४.

१७. आईवडील कशाविषयी खात्री बाळगू शकतात?

१७ अर्थात, कोणतेही पालक मुलांना वळण लावण्यासंबंधी बायबलमधील सल्ल्याचे तंतोतंत पालन करू शकणार नाहीत. तरीसुद्धा, तुम्ही आपल्या मुलांना सहनशील, दयाळू व प्रेमळ पद्धतीने वळण लावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ते नक्कीच तुमचे आभार मानतील. आणि यहोवा देखील तुमच्या प्रयत्नांवर निश्‍चितच आशीर्वाद देईल. (नीतिसूत्रे ३:३३) काही झाले तरी, शेवटी सर्व ख्रिस्ती पालकांची हीच इच्छा असते की आपल्यासारखेच, आपल्या मुलांनीही यहोवावर मनापासून प्रेम करायला शिकावे. पण हे उदात्त ध्येय पालक कसे साध्य करू शकतात? पुढील लेखात असे करण्याच्या काही विशिष्ट पद्धतींची चर्चा केली आहे. (w०७ ९/१)

तुम्हाला आठवते का?

• कोणती गोष्ट आठवणीत ठेवल्याने आईवडिलांना सहनशीलपणे वागणे शक्य होईल?

• दयाळुपणाचा शिक्षा देण्याशी काय संबंध आहे?

• आईवडील व मुलांमध्ये प्रामाणिक सुसंवाद असणे का महत्त्वाचे आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४ पानांवरील चित्रे]

आईवडिलांनो, तुम्हाला आपले लहानपण आठवते का?

[२५ पानांवरील चित्र]

तुम्ही आपल्या मुलांना प्रामाणिकपणे व मोकळेपणाने आपले विचार व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन देता का?