व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

योएल व आमोस पुस्तकांतील ठळक मुद्दे

योएल व आमोस पुस्तकांतील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

योएल व आमोस पुस्तकांतील ठळक मुद्दे

“पथूएलाचा पुत्र योएल.” इतकीच माहिती योएल स्वतःविषयी देतो. (योएल १:१) आपल्याच नावाने असलेल्या पुस्तकात योएलने त्याच्या संदेशाव्यतिरिक्‍त दुसरी माहिती इतकी कमी दिली आहे की, त्याने कोणत्या काळात भविष्यवाणी केली असावी, याचाही फक्‍त अंदाजच लावता येतो. त्याने कदाचित, सा.यु.पू. ८२० च्या सुमारास जेव्हा उज्जिया राजा यहुदाचा राजा झाला तेव्हा संदेष्टा म्हणून सेवा केली असावी. पण योएल संदेष्टा असा मितभाषी का आहे? कदाचित तो संदेश देणाऱ्‍यावर नव्हे तर संदेशावर अधिक जोर देऊ इच्छित असावा.

तसेच, उज्जियाच्या दिवसांत यहुदात, ‘उंबराच्या झाडांची निगा करणाऱ्‍या’ आमोस नावाच्या एकाला संदेष्टा म्हणून सेवा करण्यास सांगितले जाते. (आमोस ७:१४) आमोस योएलप्रमाणे यहुदात संदेष्ट्याचे काम करत नाही तर त्याला उत्तरेस असलेल्या इस्राएलच्या दहा गोत्र राज्यात पाठवले जाते. त्याच्याच नावाने असलेले आमोस नावाचे पुस्तक तो यहुदाहून परतल्यावर अर्थात सा.यु.पू. ८०४ मध्ये लिहून संपवतो. या पुस्तकातील भाषा अगदी सरळसोपी असली तरी ती चित्रवत आहे.

“त्या दिवसाबद्दल हायहाय”—का?

(योएल १:१–३:२१)

योएल आपल्या दृष्टांतात, कुरतुडणारे टोळ (सुरवंट), झुंडींनी येणारे टोळ (नाकतोडा) आणि चाटून खाणारे टोळ (झुरळ) यांनी पाडलेल्या धाडीचे वर्णन करतो. धाड पाडणारे “महान व बलवान” व “वीरांप्रमाणे” आहेत असे म्हणण्यात आले आहे. (योएल १:४; २:२-७) योएल अशी खंत व्यक्‍त करतो: “त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्‍वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.” (योएल १:१५) यहोवा सीयोनच्या रहिवाशांना असा सल्ला देतो: “मनपूर्वक मजकडे वळा.” जर ते वळाले तर यहोवा ‘आपल्या लोकांविषयी कळवळा’ दाखवेल आणि “उत्तरेकडून आलेल्यास” अर्थात हल्ला करत असलेल्या कीटकांना दूर हाकून देईल. परंतु, त्याचा महान दिवस येण्याआधी यहोवा “मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव” करील आणि “आकाशात व पृथ्वीवर . . . चिन्हे” दाखवेल.—योएल २:१२, १८-२०, २८-३१.

राष्ट्रांना ललकारण्यात येते: “तुमचे फाळ ठोकून त्यांच्या तरवारी बनवा, आपल्या कोयत्यांचे भाले बनवा” आणि लढाईसाठी तयार व्हा. त्यांना “यहोशाफाटाच्या खोऱ्‍यात” येण्याची आज्ञा दिली जाते. तेथे त्यांचा न्याय केला जाईल आणि चिरडून टाकले जाईल. परंतु “यहूदा तर सर्वकाळ वसेल.”—योएल ३:१०, १२, २०.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:१५; २:१, ११, ३१; ३:१४—हा “परमेश्‍वराचा दिवस” काय आहे? यहोवा परमेश्‍वराचा दिवस हा त्याच्या शत्रूंवर न्यायदंड बजावण्याचा समय आहे. यात त्यांचा नाश केला जाईल परंतु खऱ्‍या उपासकांचे तारण होईल. जसे की, सा.यु.पू. ५३९ मध्ये प्राचीन बॅबिलोनवर असाच एक दिवस आला जेव्हा मेद-पारसांनी त्याच्यावर विजय मिळवला. (यशया १३:१, ६) यहोवाचा आणखी एक “दिवस” अतिशय जवळ आला आहे. या दिवशी तो “मोठी बाबेल” अर्थात खोट्या धर्माच्या विश्‍वव्यापी साम्राज्यावर त्याचा न्यायदंड बजावेल.—प्रकटीकरण १८:१-४, २१.

२:१-१०, २८—कीटकांच्या धाडीविषयीची भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? योएलच्या पुस्तकात कीटकांच्या ज्या मोठ्या धाडीचे वर्णन करण्यात आले आहे तशी धाड कनान देशावर पडल्याचा कोणताही अहवाल बायबलमध्ये नाही. यास्तव, योएलने वर्णन केलेला हल्ला, सा.यु. ३३ सालातला भविष्यसूचक लाक्षणिक हल्ला आहे जेव्हा यहोवाने येशूच्या आरंभीच्या अनुयायांवर आपला पवित्र आत्मा ओतण्यास सुरुवात केली. या अनुयायांनी ज्या संदेशाचा प्रचार सुरू केला तो खोट्या धार्मिक पुढाऱ्‍यांना झोंबणारा असा होता. (प्रेषितांची कृत्ये २:१, १४-२१; ५:२७-३३) अशाचप्रकारच्या कार्यात भाग घेण्याची आज आपल्याला संधी मिळत आहे.

२:३२—यहोवा ‘परमेश्‍वराचा धावा’ करण्याचा काय अर्थ होतो? यहोवा परमेश्‍वराचा धावा करण्याचा अर्थ, त्याचे नाव जाणून घेणे, त्याचा मनापासून आदर करणे आणि हे नाव धारण करणाऱ्‍यावर संपूर्णपणे भरवसा व भाव ठेवणे, असा होतो.—रोमकर १०:१३, १४.

३:१४—‘निर्णयाचे खोरे’ म्हणजे काय? देवाचा न्यायदंड बजावण्याचे हे एक लाक्षणिक ठिकाण आहे. यहुदाचा राजा यहोशाफाट (याच्या नावाचा अर्थ, “यहोवा न्यायाधीश आहे”) याच्या दिवसांत, देवाने यहुदाला त्याच्या आजूबाजूच्या राष्ट्रांच्या लष्करी सैन्यांत गोंधळ माजवून वाचवले. यास्तव, त्या ठिकाणाला ‘यहोशाफाटाचे खोरे’ असेही संबोधले जाते. (योएल ३:२, १२) आपल्या दिवसांत, ते एका लाक्षणिक ठिकाणाला सूचित करते. द्राक्षकुंडांत ज्याप्रमाणे द्राक्षे चुरडली जातात त्याप्रमाणे या ठिकाणी राष्ट्रांना चुरडले जाईल.—प्रकटीकरण १९:१५.

आपल्याकरता धडे:

१:१३, १४. तारण मिळण्याकरता खरा पश्‍चात्ताप आणि यहोवा खरा देव आहे असे कबूल करणे आवश्‍यक आहे.

२:१२, १३. खरा पश्‍चात्ताप मनापासून असला पाहिजे. यात, ‘आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडणे’ समाविष्ट आहे.

२:२८-३२. यहोवा ‘परमेश्‍वराच्या महान व भयंकर दिवशी’ जे त्याच्या नावाचा ‘धावा करतील’ त्यांचेच तारण होईल. यहोवा, सर्व मनुष्यमात्रेवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करतो आणि तरुण व वृद्ध, स्त्री आणि पुरुष या सर्वांना भविष्यवाणीच्या कार्यात अर्थात “देवाची महत्कृत्ये” विदित करण्याच्या कार्यात भाग घेऊ देतो, म्हणून आपण त्याचे आभारी असले पाहिजे! (प्रेषितांची कृत्ये २:११) यहोवाचा दिवस जवळ येत असता आपण “पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत” वाढत राहिले पाहिजे, नाही का?—२ पेत्र ३:१०-१२.

३:४-८, १९. योएलने अशी भविष्यवाणी केली, की यहुदाच्या आसपासच्या राष्ट्रांना देवाच्या लोकांना गैरवागणूक दिल्याबद्दल शिक्षा दिली जाईल. हे भविष्यसूचक शब्द खरे ठरले. सोरच्या मुख्य प्रदेश नगराचा बॅबिलोनच्या राजा नबुखद्‌नेस्सरने नाश केला. नंतर, द्वीप-शहरावर थोर सिकंदरने विजय मिळवला तेव्हा या शहरातील हजारो सैनिकांना व मुख्य लोकांना ठार मारण्यात आले आणि या शहराच्या ३०,००० रहिवाशांना दास म्हणून विकण्यात आले. पलिष्ट्यांना देखील सिकंदर व त्याच्या नंतर आलेल्या राजांकडून अशीच वागणूक मिळाली. सा.यु.पू. चवथ्या शतकापर्यंत एदोम ओसाड झाले होते. (मलाखी १:३) या पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांमुळे, यहोवा दिलेले वचन पूर्ण करणारा देव म्हणून आपला विश्‍वास आणखी मजबूत होतो. शिवाय या भविष्यवाण्यांवरून हेही दिसून येते, की आज जी राष्ट्रे यहोवाच्या उपासकांना छळतात त्यांना यहोवा काय करेल.

३:१६-२१. ‘आकाश व पृथ्वी खरोखरच थरथर कापतील’ आणि राष्ट्रे यहोवाचा प्रतिकूल न्यायदंड अनुभवतील. पण यहोवा “आपल्या लोकांचा आश्रय” होईल; नंदनवनमय परिस्थितीत त्यांना तो जीवन देईल. तेव्हा, या दुष्ट जगाचा न्यायदंड बजावण्याचा त्याचा दिवस जवळ येत असता आपण त्याच्या जवळ राहण्याचा आणखी पक्का निश्‍चय केला पाहिजे, नाही का?

“आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध ऐस”

(आमोस १:१–९:१५)

इस्राएलच्या अवतीभोवती असलेल्या शत्रू राष्ट्रांसाठी, यहुदा व इस्राएलसाठी आमोसकडे संदेश आहे. अराम, पलेशेथ, सोर, एदोम आणि मवाब या राष्ट्रांनी, देवाच्या लोकांना क्रूर वागणूक दिल्यामुळे त्यांचा नाश होणार होता. यहुदाच्या रहिवाशांनी “परमेश्‍वराचे धर्मशास्त्र धिक्कारिले” त्यामुळे तेही नाशास पात्र ठरले होते. (आमोस २:४) आणि इस्राएलच्या दहा-गोत्र राज्याविषयी काय? त्यांनी, गरीबांचे हावरटपणे शोषण करून, अनैतिक कामात गुरफटून व देवाच्या संदेष्ट्यांना अनादरयुक्‍तपणे वागणूक देऊन पाप केले. यहोवा “बेथेलाच्या वेद्यांचा समाचार” घेईल आणि “हिवाळ्याचा महाल उन्हाळ्याच्या महालावर आदळून” पाडेल, अशी आमोस ताकीद देतो.—आमोस ३:१४, १५.

इस्राएली लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा देण्यात आल्या तरीपण हे मूर्तीपूजक लोक हट्टीच राहिले. आमोस त्यांना म्हणाला: “आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध ऐस.” (आमोस ४:१२) इस्राएली लोकांसाठी यहोवाचा दिवस म्हणजे ‘दिमिष्काच्या पलीकडे बंदिवासात’ जाणे होते; अर्थात अश्‍शूरी लोकांनी त्यांना बंदिवान म्हणून नेले. (आमोस ५:२७) आमोसला बेथेलचा एक याजक छळत असतो पण आमोस घाबरत नाही. यहोवा आमोसला सांगतो: “माझे लोक इस्राएल यांचा अंतसमय आला आहे; यापुढे मी त्यांची गय करणार नाही.” (आमोस ८:२) शिओल अथवा उंच पर्वतसुद्धा त्यांना देवाच्या न्यायदंडापासून वाचवू शकत नाहीत. (आमोस ९:२, ३) पण पुनर्वसनाचे वचन दिले जाते. यहोवा म्हणतो: “मी आपल्या इस्राएल लोकांचा बंदिवास पालटीन; ते ओसाड झालेली नगरे बांधितील व त्यांत वस्ती करितील; ते द्राक्षीचे मळे लावितील व त्यांचा द्राक्षारस पितील; ते बाग लावितील व त्यांची फळे खातील.”—आमोस ९:१४.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

४:१—‘बाशानच्या गाई’ कोणास चित्रित करतात? गालील समुद्राच्या पूर्वेकडचा भाग असलेले बाशानचे उंच पठार, तिथे केल्या जाणाऱ्‍या उत्कृष्ट जातीच्या प्राण्यांच्या पैदाशीसाठी ज्यात गाईंचा देखील समावेश होतो, सर्वज्ञात होते. कारण, तेथे हिरवीगार कुरणे होती. आमोसने शोमरोनच्या विलासी स्त्रियांची तुलना बाशानच्या गाईंशी केली. या स्त्रिया धनसंपत्तीचे स्वतःचे चोचले पुरवण्यासाठी गरिबांची फसवणूक करण्यास आपल्या ‘धन्यांवर’ अथवा नवऱ्‍यांवर दबाव आणत होत्या.

४:६—“दातांची स्वच्छता” या वाक्यांशाचा काय अर्थ होतो? “भाकरीची वाण” या वाक्यांशासोबत हाही वाक्यांश वापरण्यात आला आहे; तेव्हा, दातांची स्वच्छता हा वाक्यांश दुष्काळास सूचित करत असावा. खायला अन्‍न नसल्यामुळे दात स्वच्छ राहतात.

५:५—कोणत्या अर्थाने इस्राएलने ‘बेथेलास शरण जायचे नव्हते’? यराबामने बेथेलमध्ये वासराची उपासना सुरू केली होती. तेव्हापासून ते शहर खोट्या उपासनेचे केंद्र बनले. गिलगाल आणि बैरशेबा देखील धर्मत्यागी उपासनेची ठिकाणे असावीत. भाकीत केलेल्या संकटातून इस्राएलला जर वाचायचे असेल तर इस्राएलने या ठिकाणी उपासनेसाठी जाणे थाबंवून यहोवास शरण जाणे आवश्‍यक होते.

७:१—‘राजाकरिता कापणी झाल्यावर उगवलेले गवत’ कशास सूचित करते? आपल्या घोडेस्वारांच्या व पशूंच्या देखभालीसाठी राजाने बसवलेल्या करास ते सूचित करत असावे. हा कर, “पडसाळ उगवण्याच्या सुमारास” भरावयाचा होता. यानंतर लोक आपल्या पिकांची कापणी करू शकत होते. पण कापणीच्या आधीच टोळ उत्पन्‍न झाले आणि त्यांनी पिकाचा आणि इतर वनस्पतींचा फडशा पाडला.

८:१, २—“पक्व फळांची पाटी” काय सूचित करते? “पक्व फळांची पाटी” हेच सूचित करते, की यहोवाचा दिवस जवळ आला आहे. उन्हाळ्यातली फळे कापणीच्या हंगामाच्या शेवटी म्हणजे, कृषी वर्षाच्या शेवटी गोळा केली जातात. यहोवाने आमोसला “फळांची पाटी” दाखवली; अर्थात इस्राएलचा अंत जवळ आला होता. म्हणून देवाने आमोसला सांगितले: “माझे लोक इस्राएल यांचा अंतसमय आला आहे; यापुढे मी त्यांची गय करणार नाही.”

आपल्याकरता धडे:

१:३, ६, ९, ११, १३; २:१, ४, ६. इस्राएल, यहुदा आणि त्यांच्या अवतीभोवती असलेल्या सहा राष्ट्रांवर यहोवाला क्रोध होता, त्यामुळे तो म्हणाला: “मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही.” यहोवाचे न्यायदंड चुकवता येत नाहीत.—आमोस ९:२-५.

२:१२. कष्टाळू पायनियर, प्रवासी पर्यवेक्षक, मिशनरी किंवा बेथेल सदस्य यांना, अनेक लोक ज्याला सर्वसामान्य जीवनशैली म्हणतात ती प्राप्त करण्यासाठी पूर्ण वेळेची सेवा सोडून देण्याचे उत्तेजन देऊ नये. त्याऐवजी आपण त्यांना ते करत असलेले उत्तम कार्य असेच पुढे चालू ठेवण्याचे उत्तेजन देऊ शकतो.

३:८. सिंहाची गर्जना ऐकून एक व्यक्‍ती जशी गर्भगळीत होते तसेच, यहोवा जेव्हा “जा, माझे लोक इस्राएल यांस संदेश सांग” असे आमोसास सांगतो तेव्हा आमोसला, आपण प्रचार केलाच पाहिजे असे वाटले. (आमोस ७:१५) आपल्या मनातील देवाच्या भयाने आपल्याला राज्य संदेशाचा आवेशाने प्रचार करण्यास प्रवृत्त केले पाहिजे.

३:१३-१५; ५:११. यहोवाच्या मदतीने गरीब गुराखी असलेला आमोस श्रीमंत व श्रीमंतीमुळे निश्‍चिंत झालेल्या लोकांना देवाचा संदेश ‘सांगू’ शकला. तसेच आजही एखादे क्षेत्र कितीही कठीण असले तरी, राज्याचा संदेश सांगण्याकरता यहोवा आपल्याला समर्थ करू शकतो.

४:६-११; ५:४, ६, १४. इस्राएली लोक यहोवाकडे ‘वळण्यास’ वारंवार टाळत होते तरीपण त्यांना “परमेश्‍वरास शरण जा, म्हणजे वाचाल,” असे आर्जवले जात होते. या दुष्ट व्यवस्थिकरणाला यहोवा जोपर्यंत राहू देईल तोपर्यंत आपण या व्यवस्थिकरणातील लोकांना यहोवाकडे वळण्यास आर्जवले पाहिजे.

५:१८, १९. “परमेश्‍वराचा दिवस यावा” अशी फक्‍त इच्छा बाळगायची पण या दिवसासाठी स्वतःला तयार न करणे हे निव्वळ मूर्खपण आहे. असे जो करतो त्याची अवस्था अशा एका मनुष्यासारखी असते जो सिंहापासून पळतो परंतु समोर त्याला एक अस्वल गाठते आणि मग अस्वलापासून पळतो तर एक सर्प त्याला दंश करतो. आध्यात्मिकरीत्या ‘जागृत राहून’ तयारीच्या स्थितीत राहिल्यास आपण सुज्ञ ठरू.—लूक २१:३६.

७:१२-१७. आपण निर्भयतेने व धैर्याने देवाचा संदेश सांगितला पाहिजे.

९:७-१०. विश्‍वासू कुलपित्यांच्या कुळातले असूनही व देवाचे निवडलेले लोक म्हणून मिसरातून त्यांची सुटका झाली होती तरीपण काही इस्राएली लोक अविश्‍वासू झाले; कुशी लोकांप्रमाणे देवाने त्यांना नापसंत केले. निःपक्षपाती देवाची कृपापसंती मिळवण्यासाठी आपण एका विशिष्ट कुळातले असण्याची गरज नाही तर आपण त्याची ‘भीती बाळगली पाहिजे व नैतिक कृत्ये’ आचरली पाहिजेत.—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.

आपण काय केले पाहिजे?

सैतानाच्या जगावर देव लवकरच न्यायदंड बजावणार आहे. देवाने आपल्या उपासकांवर आपला पवित्र आत्मा ओतून त्यांना, येणाऱ्‍या दिवसाची ताकीद लोकांना देण्याकरता सज्ज केले आहे. तेव्हा आपण, लोकांना यहोवाला ओळखण्यास व ‘त्याच्या नावाचा धावा करण्यास’ मदत करण्यात पूर्ण सहभाग घेतला पाहिजे, नाही का?—योएल २:३१, ३२.

आमोस असे आर्जवतो: “वाइटाचा द्वेष करा, बऱ्‍याची आवड धरा, वेशीत न्याय स्थापित करा.” (आमोस ५:१५) यहोवाचा दिवस जसजसा जवळ येतो तसतसे आपण देवाच्या आणखी जवळ गेले पाहिजे आणि या दुष्ट जगापासून आणि या जगाच्या भ्रष्ट संगतीपासून स्वतःला वेगळे केले पाहिजे; असे करण्यातच सुज्ञपण आहे. असे करण्यासाठी आपल्याला योएल व आमोस या बायबलमधील पुस्तकातून किती समयोचित धडे शिकायला मिळाले आहेत!—इब्री लोकांस ४:१२. (w०७ १०/१)