व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नहूम, हबक्कूक व सफन्या पुस्तकातील ठळक मुद्दे

नहूम, हबक्कूक व सफन्या पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

नहूम, हबक्कूक व सफन्या पुस्तकातील ठळक मुद्दे

अश्‍शूरी जागतिक साम्राज्याने इस्राएलच्या दहागोत्र राज्याला अर्थात शोमरोनाला धुळीस मिळवले आहे. अश्‍शूरी लोक खूप वर्षांपासून यहुदासही धमकावत होते. यहुदाचा संदेष्टा नहूम याच्यापाशी अश्‍शूरी राजधानी निनवेविरुद्ध एक संदेश आहे. सा.यु.पू. ६३२ च्या आधी लिहिण्यात आलेल्या बायबलमधील नहूम नावाच्या पुस्तकात हाच संदेश आहे.

यानंतर बॅबिलोनी साम्राज्य उदयास आले; या साम्राज्यात अधूनमधून खास्दी राजांनी राज्य केले. कदाचित सा.यु.पू. ६२८ मध्ये लिहून पूर्ण झालेल्या हबक्कूक नावाच्या पुस्तकात असे भाकीत करण्यात आले आहे, की यहोवा बॅबिलोन साम्राज्याच्या माध्यमाने कशाप्रकारे न्यायदंड बजावेल व बॅबिलोनचे पतन कसे होईल.

संदेष्टा सफन्याने नहूम आणि हबक्कूक या दोघांआधी भविष्यवक्‍ता म्हणून सेवा केली होती. सा.यु.पू. ६०७ मध्ये जेरूसलेमचा नाश होण्याच्या ४० पेक्षा अधिक वर्षांआधी त्याने केलेल्या भविष्यवाणीत, तो यहुदासाठी नाशाचा आणि आशेचा संदेश देतो. बायबलमधील सफन्या या पुस्तकात इतर राष्ट्रांविरुद्ध घोषित केलेले न्यायदंड देखील आहेत.

“रक्‍तपाती नगरीला धिक्कार असो!”

(नहूम १:१–३:१९)

“निनवेविषयीची देववाणी” यहोवा देवाकडून आहे जो “मंदक्रोध व महापराक्रमी आहे.” यहोवा आपल्या शरणार्थिंसाठी तो “शरणदुर्ग” असला तरी, निनवेचा नाश झालाच पाहिजे.—नहूम १:१, ३, ७.

यहोवा ‘परमेश्‍वर याकोबाचे ऐश्‍वर्य पुनःस्थापीत’ करील. परंतु, सिंह जसा आपली शिकार फाडून तिचे तुकडे तुकडे करतो तसे अश्‍शूराने देवाच्या लोकांच्या राष्ट्राला घाबरवून सोडले आहे. यहोवा ‘[निनवेचे] रथ जाळेल, त्यांचा धूर निघेल. [तिच्या] तरुण सिंहांस तरवार नष्ट करील.’ (नहूम २:२, १२, १३) निनवेला अर्थात “रक्‍तपाती नगरीला धिक्कार असो!” ‘[तिची] बातमी ऐकणारे सर्व तिजविषयी टाळ्या पिटतील’ व आनंद करतील.—नहूम ३:१, १९.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:९—निनवेचा “पुरापुरा अंत” झाल्यावर यहुदाला कसे वाटेल? अश्‍शूऱ्‍यांपासून यहुदाची कायमची सुटका होईल. ‘विपत्ती दुसऱ्‍यांदा येणारच नाही.’ निनवे जणू काय पूर्णपणे उद्‌ध्वस्त होऊन नाहीसे झाल्याप्रमाणे नहूम असे लिहितो: “शुभसंदेश आणणारा, शांति जाहीर करणारा असा जो त्याचे पाय पर्वतांवर पाहा! हे यहूदा, आपले सण पाळ.”—नहूम १:१५.

२:६—कोणत्या “नदीकडील दरवाजे” खुले करण्यात आले? टिग्रीस नदीच्या पाण्यामुळे निनवेच्या भिंतींना पडलेल्या भोकांना हे दरवाजे लागू होतात. सा.यु.पू. ६३२ मध्ये, बॅबिलोन व मेद हे संयुक्‍त सैन्य निनवेवर चाल करून आले तेव्हा निनवेला इतकी काही भीती वाटली नाही. निनवेच्या भोवती उंच तट होते. आपण अगदी सुरक्षित आहोत, असे निनवेकरांना वाटत होते. परंतु, मुसळधार पावसामुळे टिग्रीस नदी दुथडी भरून वाहू लागली. त्यामुळे, “शहराचा काही भाग पाण्याखाली गेला आणि बऱ्‍याच लांबपर्यंत शहराभोवतीचे तट खाली कोसळले,” असे इतिहासकार डायोडोरसने म्हटले. अशाप्रकारे, नदीकडील दरवाजे खुले झाले व भाकीत केल्याप्रमाणे निनवे “वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म” झाले.—नहूम १:८-१०.

३:४—निनवे एका वेश्‍येसारखे कसे होते? निनवेने राष्ट्रांना मैत्रीचा व मदतीचा हात पुढे करण्याचे वचन देऊन त्यांची फसवणूक केली परंतु वास्तविकतेत त्यांच्यावर जुलूम केला. जसे की, अश्‍शूराने यहुदी राजा अहाज याला, अरामी व इस्राएली लोकांनी मिळून हल्ला केला तेव्हा लढण्यासाठी थोडीशी मदत केली. पण नंतर “अश्‍शूरचा राजा . . . याने [अहाजाकडे] येऊन त्यास त्रस्त केले.”—२ इतिहास २८:२०.

आपल्याकरता धडे:

१:२-६. जे यहोवाची एकमात्र उपासना करत नाहीत त्या शत्रूंचा तो बदला घेतो यावरून हेच दिसते, की तो आपल्या उपासकांकडून अनन्य भक्‍तीची अपेक्षा करतो.—निर्गम २०:५.

१:१०. शेकडो बुरूज असलेल्या मोठमोठाल्या भिंतीसुद्धा, निनवेविरुद्ध यहोवाने पुकारलेले वचन रोखू शकल्या नाहीत. आज, यहोवाच्या लोकांचे शत्रू त्याच्याकडून येणाऱ्‍या प्रतिकूल न्यायदंडापासून पळू शकणार नाहीत.—नीतिसूत्रे २:२२; दानीएल २:४४.

‘धार्मिक वाचेल’

(हबक्कूक १:१–३:१९)

हब्बकूक पुस्तकाचे पहिले दोन अध्याय, संदेष्टा हबक्कूक आणि यहोवा देव यांच्यातील संभाषण आहे. यहुदात जे काही चालले आहे ते पाहून अस्वस्थ झालेला हबक्कूक देवाला विचारतो: “मला अधर्म का पाहावयास लावितोस? विपत्ति मला का दाखवितोस?” त्यावर यहोवा त्याला उत्तर देतो: “मी खास्द्यांची उठावणी करितो; ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे.” यहुदाला अद्दल घडवण्यासाठी यहोवा ‘बेईमानी करणाऱ्‍यांचा’ उपयोग करणार आहे हे ऐकून हबक्कूकला खूप आश्‍चर्य वाटते. (हबक्कूक १:३, ६, १३) हबक्कूकला असे आश्‍वासन दिले जाते, की धार्मिक जण वाचेल परंतु जे यहोवाचे शत्रू आहेत ते शिक्षेपासून पळू शकत नाहीत. शिवाय, खास्दी शत्रूंवर येणाऱ्‍या पाच पीडांविषयी देखील हबक्कूक लिहितो.—हबक्कूक २:४.

दया मिळण्यासाठी प्रार्थना करताना हबक्कूक ‘क्षोभस्तोत्रांविषयी’ लिहितो; अर्थात, लाल समुद्र, रानात आणि यरीहोत यहोवाने दाखवलेल्या त्याच्या महाशक्‍तीच्या प्रदर्शनांविषयी सांगतो. हर्मगिद्दोनात यहोवा त्याचा विध्वंसक क्रोध कसा दाखवेल याविषयी देखील हबक्कूक भाकीत करतो. आणि मग प्रार्थनेच्या शेवटी असे म्हणतो: “परमेश्‍वर, प्रभु, माझे सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करितो, तो मला माझ्या उच्च स्थानांवरून चालू देतो.”—हबक्कूक ३:१, १९.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:५, ६—खास्दी जेरूसलेमविरुद्ध उठतील असे जेव्हा यहोवा म्हणतो तेव्हा यहुद्यांना हे अशक्य का वाटले असावे? हबक्कूक भविष्यवाणी करायला सुरुवात करेपर्यंत यहुदावर ईजिप्तचा फार मोठा प्रभाव पडला होता. (२ राजे २३:२९, ३०, ३४) बॅबिलोनी दिवसेंदिवस बलशाली होत चालले असले तरी, त्यांच्या सैन्याने अद्यापतरी फारो नखोचा पराभव केलेला नव्हता. (यिर्मया ४६:२) शिवाय, यहोवाचे मंदिर जेरूसलेमेत होते आणि तेथून दाविदाचे घराणे बिना व्यत्यय राज्य करीत होते. तेव्हा, खास्द्यांना जेरूसलेमचा नाश करू देण्याचे देवाचे “कार्य” अशक्य आहे, असे त्याकाळच्या यहुद्यांना वाटत होते. हबक्कूकचे शब्द त्यांना किती अविश्‍वसनीय वाटले माहीत नाही; पण एवढे मात्र खरे, की सा.यु.पू. ६०७ मध्ये बॅबिलोन्यांकरवी जेरूसलेमच्या नाशाचा दृष्टांत ‘फसला’ नाही; तो खचित पूर्ण झाला.—हबक्कूक २:३.

आपल्याकरता धडे:

१:१-४; १:१२–२:१. हबक्कूकने प्रामाणिक प्रश्‍न विचारले आणि यहोवाने त्यांचे उत्तर दिले. खरा देव आपल्या विश्‍वासू सेवकांच्या प्रार्थना ऐकतो.

२:१. हबक्कूकप्रमाणे आपण आध्यात्मिक अर्थाने जागृत व सक्रिय असले पाहिजे. सुधारणा करण्यासाठी आपल्याला कोणताही सल्ला दिला जातो तेव्हा आपण लगेच आपल्या विचारसरणीत फेरबदल करण्यास तयार असले पाहिजे.

२:३; ३:१६. यहोवाच्या दिवसाची विश्‍वासाने वाट पाहत असताना आपण सध्याच्या काळाची निकड आपल्या मनातून कमी होऊ देता कामा नये.

२:४. यहोवाच्या न्यायदंडाच्या दिवसापासून आपला जीव वाचवण्यासाठी, आपण विश्‍वासूपणे धीर धरला पाहिजे.—इब्री लोकांस १०:३६-३८.

२:६, ७, ९, १२, १५, १९. बेईमानीने पैसा कमावणाऱ्‍यांचा, हिंसेची आवड बाळगणाऱ्‍यांचा, अनैतिकता आचरणाऱ्‍यांचा किंवा मूर्तीपूजा करणाऱ्‍यांचा धिक्कार करण्यात आला आहे. आपण हे दुर्गुण व या प्रथा टाळल्या पाहिजेत.

२:११. आपण जर या जगाची दुष्टाई उघडकीस आणली नाही तर ‘दगड ओरडतील.’ तेव्हा, आपण राज्याच्या संदेशाचा प्रचार धैर्याने करीत राहणे महत्त्वाचे आहे.

३:६. यहोवा जेव्हा न्यायदंड बजावेल तेव्हा कोणीही त्याला अडवू शकणार नाही. पर्वतांसारख्या व डोंगरांसारख्या कायमस्वरूपी वाटणाऱ्‍या मानवी संघटनासुद्धा त्याच्या आड येऊ शकणार नाहीत.

३:१३. हर्मगिद्दोनातील नाश, गव्हाबरोबर किडेही दळले जातील अशाप्रकारचा नसेल याची आपण खात्री बाळगू शकतो. यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांना वाचवेल.

३:१७-१९. हर्मगिद्दोनाच्या आधी आणि त्यादरम्यान आपल्याला कदाचित अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागेल; तरीसुद्धा आपण ही खात्री बाळगू शकतो, की यहोवाची सेवा आनंदाने करीत असताना तो आपल्याला “सामर्थ्य” देईल.

“परमेश्‍वराचा दिवस येऊन ठेपला आहे”

(सफन्या १:१–३:२०)

बाल उपासनेला यहुदात ऊत आला आहे. आपला संदेष्टा सफन्या याच्याद्वारे यहोवा असे म्हणतो: “मी आपला हात यहूदावर, यरुशलेमेच्या सर्व रहिवाश्‍यांवर चालवीन.” सफन्या अशी ताकीद देतो: “परमेश्‍वराचा दिवस येऊन ठेपला आहे.” (सफन्या १:४, ७, १४) देवाच्या अपेक्षांनुसार जगणाऱ्‍यांनाच केवळ “दृष्टीआड” केले जाईल.—सफन्या २:३.

“बलात्कारी नगरी [जेरूसलेमचा] धिक्कार असो!” “मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा कारण राष्ट्रे एकत्र जमवावी, . . . त्यांवर माझा क्रोध . . . पाडावा हा माझा निश्‍चय आहे,” असे यहोवा म्हणतो. पण तो पुढे असेही वचन देतो: “त्या समयी मी तुम्हांस आणून एकत्र करीन; तुमच्या डोळ्यांदेखत तुमचा बंदिवास उलटवीन, तेव्हा पृथ्वीवरल्या सर्व राष्ट्रांत तुमचा लौकिक व गौरव होईल असे मी करीन.”—सफन्या ३:१, ८, २०.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:१३, १४—पूर्णपणे वैराण झालेल्या निनवेत कोणाचे “घुमणे” ऐकू येईल? निनवे हे जंगली प्राण्यांचे व पक्ष्यांचे वस्तीस्थान बनणार असल्यामुळे, त्यात घुमणारा आवाज हा पक्ष्यांच्या आवाजाला सूचित करतो व कदाचित तो निर्मनुष्य झालेल्या इमारतींच्या खिडक्यांतून शिरणाऱ्‍या वाऱ्‍याच्या आवाजाला सूचित करत असावा.

३:९—“शुद्ध वाणी” काय आहे व ती कशी बोलली जाते? “शुद्ध वाणी” देवाचे वचन बायबल यातील सत्य आहे. यांत बायबलच्या सर्व शिकवणींचा समावेश होतो. सत्य स्वीकारण्याद्वारे, इतरांना ती अचूकपणे शिकवण्याद्वारे व देवाच्या इच्छेच्या सामंजस्यात जगण्याद्वारे आपण ही शुद्ध वाणी बोलतो.

आपल्याकरता धडे:

१:८. सफन्याच्या दिवसांतील काही जण “परदेशी पोषाख” चढवून आजूबाजूच्या राष्ट्रांची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न करीत होते. आज यहोवाच्या उपासकांनी जगाच्या रीतीरिवाजांनुसार चालून जगाची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न करणे किती मूर्खपणाचे ठरेल!

१:१२; ३:५, १६. आपल्या लोकांना त्याच्या न्यायिक निर्णयांविषयी ताकीद देण्याकरता यहोवा आपल्या संदेष्ट्यांना पाठवत राहिला. अनेक यहुदी लोक खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले होते व यहोवाच्या संदेशाकडे बेपर्वा मनोवृत्ती दाखवत होते. तरीपण यहोवा त्यांना संदेष्ट्यांकरवी ताकीद देत राहिला. यहोवाचा महान दिवस जसजसा जवळ येतो तसतसे आपण, लोक आपल्या संदेशाकडे दाखवत असलेल्या बेपर्वा मनोवृत्तीमुळे ‘आपले हात गळू न देता’ अर्थात निराश न होता राज्य संदेशाचा प्रचार करण्याचे सोडू नये.

२:३. केवळ यहोवा आपल्याला त्याच्या क्रोधापासून वाचवू शकतो. यहोवाच्या मर्जीत राहण्याकरता आपण, त्याचे वचन बायबल याचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याद्वारे, प्रार्थनापूर्वक त्याचे मार्गदर्शन मिळवण्याद्वारे व त्याच्या समीप जाण्याद्वारे त्याचा “आश्रय” घेतला पाहिजे. नैतिकरीत्या शुद्ध जीवन आचरून आपण ‘धार्मिकतेचे अवलंबन’ केले पाहिजे. आणि नम्र व आज्ञाधारक मनोवृत्ती विकसित करून ‘नम्रतेचे अवलंबन’ केले पाहिजे.

२:४-१५; ३:१-५. यहोवाच्या न्यायदंडाच्या बजावणीच्या दिवशी ख्रिस्ती धर्मजगताला आणि देवाच्या लोकांवर जुलूम करणाऱ्‍या सर्व राष्ट्रांना, प्राचीन जेरूसलेमला व त्याच्या आजूबाजूच्या राष्ट्रांना जो परिणाम भोगावा लागला होता तोच परिणाम भोगावा लागणार आहे. आपण निडरतेने देवाच्या न्यायदंडाची घोषणा करीत राहिले पाहिजे.

३:८, ९. यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असताना आपण “शुद्ध वाणी” बोलण्यास शिकण्याद्वारे व यहोवाला आपले जीवन व्यक्‍तिगतरीत्या समर्पित करून त्याच्या “नामाचा धावा” करण्याद्वारे त्या महान दिवसापासून वाचण्याची तयारी करतो. तसेच आपण यहोवाच्या लोकांच्या सोबतीने “एकचित्ताने” अर्थात खांद्याला खांदा लावून त्याची सेवा करतो आणि भेट म्हणून त्याला “स्तुतीचा यज्ञ” अर्पण करतो.—इब्री लोकांस १३:१५.

यहोवाचा दिवस “वेगाने येत आहे”

स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधिशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही.” (स्तोत्र ३७:१०) नहूम पुस्तकात निनवेविषयी आणि हबक्कूक पुस्तकात बॅबिलोन व धर्मत्यागी यहुदाविषयी जे काही भाकीत करण्यात आले होते त्यांवर जेव्हा आपण मनन करतो तेव्हा आपल्या मनात, स्तोत्रकर्त्याचे शब्द खरे ठरतील याविषयी कसलीच शंका उरत नाही. पण आपल्याला आणखी किती काळ थांबून राहावे लागणार आहे?

सफन्या १:१४ मध्ये म्हटले आहे: “परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.” परमेश्‍वर यहोवाच्या त्या महान दिवसापासून आपण कसे वाचू शकतो आणि बचावाची तयारी आपण आतापासून कशी करू शकतो, हे सफन्याच्या पुस्तकातून आपल्याला कळते. खरेच, “देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे.—इब्री लोकांस ४:१२. (w०७ ११/१५)

[८ पानांवरील चित्रे]

निनवेच्या उंच भिंतीसुद्धा नहूमच्या भविष्यवाणीला पूर्ण होण्यापासून रोखू शकल्या नाहीत

[चित्राचे श्रेय]

Randy Olson/National Geographic Image Collection