व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हाग्गय व जखऱ्‍या पुस्तकातील ठळक मुद्दे

हाग्गय व जखऱ्‍या पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

हाग्गय व जखऱ्‍या पुस्तकातील ठळक मुद्दे

र्ष आहे सा.यु.पू. ५२०. बॅबिलोनच्या बंदिवासातून परतलेल्या यहुद्यांनी जेरूसलेममध्ये यहोवाच्या मंदिराचा पाया घालून सोळा वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीसुद्धा मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. बांधकामावर बंदी आहे. यहोवा, संदेष्टा हाग्गय आणि दोन महिन्यांनंतर संदेष्टा जखऱ्‍या यांना आपले वचन सांगावयास नियुक्‍त करतो.

हाग्गय आणि जखऱ्‍या या दोघांचा एकच हेतू आहे: मंदिराचे बांधकाम पुन्हा सुरू करण्यासाठी लोकांना उत्तेजित करणे. या संदेष्ट्यांचे प्रयत्न वाया जात नाहीत. पाच वर्षांनंतर मंदिराचे बांधकाम पूर्ण होते. हाग्गय आणि जखऱ्‍या यांनी जे काही घोषित केले ते सर्व त्यांच्या नावाने असलेल्या बायबलमधील पुस्तकांत लिहिलेले आहे. हाग्गयचे पुस्तक सा.यु.पू. ५२० मध्ये तर जखऱ्‍याचे पुस्तक सा.यु.पू. ५१८ मध्ये लिहून पूर्ण झाले. या संदेष्ट्यांप्रमाणे आपल्याला देखील देवाने एक काम दिले आहे. सद्य व्यवस्थीकरणाचा अंत येण्याआधी हे काम पूर्ण झाले पाहिजे. राज्य प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे हे काम आहे. हाग्गय आणि जखऱ्‍या पुस्तकांतून आपल्याला कोणते प्रोत्साहन मिळते ते आपण पाहू या.

“तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष लावा”

(हाग्गय १:१–२:२३)

एकशे बारा दिवसांच्या कालावधीत हाग्गय चार प्रेरणादायक संदेश देतो. पहिला संदेश असा आहे: “तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा; त्याने मी प्रसन्‍न होईन व माझा महिमा प्रगट करीन, असे परमेश्‍वर म्हणतो.” (हाग्गय १:७, ८) लोक चांगला प्रतिसाद देतात. दुसरा संदेश असा आहे: “मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो.”—हाग्गय २:७.

तिसऱ्‍या संदेशानुसार, मंदिराच्या पुनर्बांधणीच्या कामाकडे या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे ‘लोक आणि त्यांच्या हातचे प्रत्येक काम’ यहोवासमोर अशुद्ध झाले होते. परंतु ज्या दिवसापासून डागडुजीचे काम पुन्हा सुरू होईल त्या दिवसापासून यहोवा त्यांच्यावर “आशीर्वाद” पाठवेल. चौथ्या संदेशात सांगितल्यानुसार यहोवा “राज्यांचे तक्‍त उलथून” टाकेल आणि प्रांताधिकारी जरुब्बाबेलला “मुद्रेच्या अंगठीसारखे” करेल.—हाग्गय २:१४, १९, २२, २३.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:६, ७, २१, २२—हे हलवणे कोण करत आहे व याचा परिणाम काय झाला आहे? संपूर्ण जगभरात चाललेल्या राज्य संदेशाच्या प्रचाराद्वारे यहोवा ‘सर्व राष्ट्रांस हलवून सोडत आहे.’ प्रचार कार्याच्या परिणामामुळे देखील “सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु” यहोवाच्या मंदिरात येत आहेत व यामुळे ते वैभवाने भरत आहे. कालांतराने, “सेनाधीश परमेश्‍वर” यहोवा ‘आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन, ही हालवून सोडणार’ आहे; परिणामतः, सद्याचे संपूर्ण दुष्ट व्यवस्थीकरण मुळासकट नाहीसे होईल.—इब्री लोकांस १२:२६, २७.

२:९—कोणकोणत्या बाबतीत, “या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल”? हे निदान तीन मार्गांनी होणार होते: पहिले, हे मंदिर जितक्या वर्षांसाठी अस्तित्वात होते; दुसरे, तेथे जो शिकवणार होता आणि तिसरे यहोवाची उपासना करायला तेथे जे झुंडीच्या झुंडीने येत होते. शलमोनाने बांधलेले भव्य मंदिर सा.यु.पू. १०२७ पासून सा.यु.पू. ६०७ पर्यंत ४२० वर्षांपर्यंत उभे होते; तरीपण, हे नंतरचे मंदिर, ५८० पेक्षा अधिक वर्षांपर्यंत टिकले. सा.यु.पू. ५१५ मध्ये ते बांधून पूर्ण झाले तेव्हापासून सा.यु. ७० मध्ये त्याचा नाश झाला तोपर्यंत. शिवाय, मशीहा अर्थात येशू ख्रिस्ताने या नंतरच्या मंदिरात शिकवण दिली आणि पहिल्या मंदिरापेक्षा दुसऱ्‍या मंदिरात अधिकाधिक लोक देवाची उपासना करण्यासाठी आले.—प्रेषितांची कृत्ये २:१-११.

आपल्याकरता धडे:

१:२-४. आपल्या प्रचार कार्याला लोक विरोध करतात म्हणून, जीवनात आपण ‘राज्य मिळवण्यास झटण्याला’ जे प्रथम स्थान दिले आहे ते सोडून आपल्या स्वार्थी इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या मागे लागू नये.—मत्तय ६:३३.

१:५, ७. आपण ‘आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवण्यात’ व आपण ज्याप्रकारे आपले जीवन व्यतीत करीत आहोत त्याचा देवाबरोबर असलेल्या आपल्या संबंधावर कसा परिणाम होतो, यावर विचार करण्यात सुज्ञपणा आहे.

१:६, ९-११; २:१४-१७. हाग्गयच्या दिवसांतील यहुदी लोक रक्‍ताचे पाणी करून पैसा कमवत होते पण त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ उपभोगता येत नव्हते. ते मंदिराकडे दुर्लक्ष करीत होते त्यामुळे त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद नव्हता. आपण आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे आणि देवाची पूर्ण मनाने सेवा केली पाहिजे. आपल्याजवळ भौतिकरीत्या थोडे असो अथवा बहुत असो, “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो,” ही गोष्ट आपण कदापि विसरू नये.—नीतिसूत्रे १०:२२.

२:१५, १८. यहोवाने यहुद्यांना, त्यांनी मंदिराकडे कसे दुर्लक्ष केले होते त्यावर नव्हे तर आजपासून पुढे ‘आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवण्यास’ अर्थात मंदिराच्या पुनर्बांधणीच्या कामावर लक्ष पुरवण्यास आर्जवले. आपणही, आजपासून पुढे यहोवा देवाच्या उपासनेवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे.

“बलाने नव्हे, . . . तर माझ्या आत्म्याने”

(जखऱ्‍या १:१-१४:२१)

यहुद्यांना ‘यहोवाकडे वळण्याचे’ आमंत्रण देऊन जखऱ्‍या आपल्या कार्याची सुरुवात करतो. (जखऱ्‍या १:३) यानंतरच्या आठ दृष्टांतातून, मंदिराच्या पुनर्बांधणीच्या कार्याला देवाचा पाठिंबा असल्याचे दिसून येते. (“जखऱ्‍याचे आठ रूपक दृष्टांत” हा चौकोन पाहा.) मंदिराचे बांधकाम “बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे तर [यहोवाच्या] आत्म्याने” कार्यसिद्ध होईल. (जखऱ्‍या ४:६) कोंब असे नाव असलेला एक पुरुष यहोवा “परमेश्‍वराचे मंदिर बांधील,” आणि “आपल्या सिंहासनावर याजकहि होईल.”—जखऱ्‍या ६:१२, १३.

जेरूसलेमच्या नाशाच्या प्रीत्यर्थ पाळल्या जाणाऱ्‍या उपवासांची याजकांकडे चौकशी करण्यासाठी बेथेलकर काही प्रतिनिधींना पाठवतात. जेरूसलेमवर कोसळलेल्या संकटाच्या प्रीत्यर्थ पाळल्या जाणाऱ्‍या चार उपवासांच्या वेळी होत असलेल्या शोकाऐवजी, ‘हर्ष व आनंद व . . . आनंदाच्या उत्सवाचे दिवस’ येतील. (जखऱ्‍या ७:२; ८:१९) यानंतरच्या दोन वाणीत, राष्ट्रे व खोट्या संदेष्ट्यांविरुद्धचे न्यायदंडाचे संदेश, मशीहाविषयक भविष्यवाण्या आणि देवाच्या लोकांच्या पुनर्वसनाचा संदेश यांचा समावेश होतो.—जखऱ्‍या ९:१; १२:१.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:१—एक मनुष्य जेरूसलेमला एका रस्सीने का मापत होता? हे कार्य, शहराभोवती संरक्षक भिंत बांधण्याच्या तयारीस सूचित करते. जेरूसलेमचा विस्तार होणार आहे व यहोवा तिचे संरक्षण करणार आहे, असे एक देवदूत या मनुष्याला सांगतो.—जखऱ्‍या २:३-५.

६:११-१३—महायाजक यहोशवाच्या मस्तकावर मुकुट घातल्यावर तो राजा-याजक झाला का? नाही. यहोशवा दाविदाच्या राजसी वंशातला नव्हता. परंतु त्याच्या डोक्यावर मुकुट घालणे, मशीहाला भविष्यसूचकपणे चित्रित करत होते. (इब्री लोकांस ६:२०) “कोंब” याविषयी असलेली भविष्यवाणी, स्वर्गीय राजा-याजक असलेल्या येशू ख्रिस्तात पूर्ण झाली. (यिर्मया २३:५) पुनः बांधलेल्या मंदिरात यहोशवाने परतलेल्या यहुद्यांसाठी महायाजक म्हणून सेवा केली तसेच यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात खऱ्‍या उपासनेसाठी येशू महायाजक म्हणून सेवा करतो.

८:१-२३—या वचनांतील दहा वाणी केव्हा पूर्ण होतात? प्रत्येक वाणीच्या आधी, “परमेश्‍वर असे म्हणतो,” या संज्ञेवरून, देव आपल्या लोकांना शांती देण्याचे वचन देतो हे सूचित होते. यांपैकीच्या काही वाण्या सा.यु.पू. सहाव्या शतकात पूर्ण झाल्या. परंतु सर्व वाण्या एकतर, सा.यु. १९१९ पासून अथवा सध्या पूर्ण होत असाव्यात. *

८:३—जेरूसलेमला “सत्यनगर” असे का संबोधण्यात आले आहे? सा.यु.पू. ६०७ मध्ये जेरूसलेमचा नाश होण्याआधी ती “बलात्कारी नगरी” होती. भ्रष्ट संदेष्टे व याजक आणि अविश्‍वासू लोकांनी ती भरली होती. (सफन्या ३:१; यिर्मया ६:१३; ७:२९-३४) परंतु, मंदिराची पुनर्बांधणी झाल्यानंतर व लोक पुन्हा यहोवाची उपासना करू लागल्यानंतर तेथे शुद्ध उपासनेची सत्ये बोलण्यात येऊ लागली व म्हणूनच जेरूसलेमला “सत्यनगर” असे संबोधण्यात आले.

११:७-१४—“रमणीयता” आणि “बंधन” नावाच्या काठ्या जखऱ्‍याने मोडण्याचा काय अर्थ होतो? मेंढरासमान असलेले लोक ज्यांना त्यांचे नेते लुटत आहेत अशा लोकांना अर्थात ‘वधासाठी नेमिलेल्या मेंढरास चारण्याचे’ काम जखऱ्‍याला देण्यात आले आहे असे चित्रित करण्यात आले आहे. मेंढपाळ या नात्याने त्याला देण्यात आलेल्या कामात जखऱ्‍या येशू ख्रिस्ताला पूर्वचित्रित करतो. देवाने येशू ख्रिस्ताला आपल्या लोकांकडे पाठवले ज्यांच्याबरोबर त्याने करार केला होता, परंतु या लोकांनी येशूला नाकारले. “रमणीयता” नावाची काठी मोडण्याचा अर्थ देव, यहुद्यांबरोबर केलेला नियमशास्त्र करार रद्द करेल व त्यांच्याबरोबर रमणीयतेने अथवा प्रेमाने व्यवहार करण्याचे थांबवेल. “बंधन” नावाची काठी मोडण्याचा अर्थ, यहुदा आणि इस्राएल यांच्यामध्ये असलेल्या बंधुत्वाचे ईश्‍वरशासित बंधन तोडून टाकण्यात येईल.

१२:११—‘मगिद्दोनाच्या खोऱ्‍यांतील हदाद्रिमोनाचा आकांत’ म्हणजे काय? यहुदाचा राजा योशिया, ईजिप्तचा फारो नखो याच्याबरोबर ‘मगिद्दोनाच्या खोऱ्‍यात’ युद्ध करताना मारला गेला. कित्येक वर्षांपर्यंत त्याच्या मृत्यूचा शोक विलापगीते गाऊन व्यक्‍त केला जात होता. (२ इतिहास ३५:२५) यास्तव, ‘हदाद्रिमोनाचा आकांत’ योशियाच्या मृत्यूच्या विलापास सूचित करीत असावा.

आपल्याकरता धडे:

१:२-६; ७:११-१४. पश्‍चात्तापी वृत्तीने शिक्षेचा स्वीकार करून व पूर्ण मनाने यहोवाची उपासना पुन्हा एकदा करण्यास सुरुवात करणाऱ्‍यांवर यहोवा संतुष्ट होतो व त्यांच्याकडे वळतो. दुसऱ्‍या बाजूला पाहता, जे ‘ऐकताना आपली मान ताठ करतात व ऐकू नये म्हणून कान बंद करतात’ असे लोक जेव्हा मदतीसाठी त्याला हाक मारतात तेव्हा तो प्रतिसाद देत नाही.

४:६, ७. यहोवाच्या पवित्र आत्म्याला मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यास कोणीही अडवू शकले नाही. देवाची सेवा करत असताना आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्‍या समस्यांवर आपण, यहोवावर भरवसा ठेवून मात करू शकतो.—मत्तय १७:२०.

४:१०. यहोवाच्या देखरेखीत जरुब्बाबेल आणि त्याचे लोक, देवाच्या उच्च स्तरांनुसार मंदिराचे बांधकाम पूर्ण करू शकले. यहोवाच्या अपेक्षा पूर्ण करणे अपरिपूर्ण मानवांना अशक्य नाही.

७:८-१०; ८:१६, १७. यहोवाची मर्जी संपादण्याकरता आपण न्यायी असले पाहिजे, एकमेकांस प्रेमळ-दया व करुणा दाखवली पाहिजे आणि एकमेकांबरोबर खरे बोलले पाहिजे.

८:९-१३. यहोवाने आपल्याला दिलेल्या कामात जेव्हा आपण “आपले हात दृढ” करतो तेव्हा तो आपल्याला आशीर्वाद देतो. जसे, की आपण शांती व सुरक्षितता अनुभवतो आणि आध्यात्मिकरीत्या आपली वाढ होते.

१२:६. यहोवाच्या लोकांत पर्यवेक्षक पदी असणाऱ्‍यांनी “जळत्या मशालीसारखे” अर्थात अतिशय आवेशी असले पाहिजे.

१३:३. खरा देव आणि त्याची संघटना यांना आपण दाखवत असलेली एकनिष्ठा, ही कोणत्याही मानवाला, मग तो आपला कितीही जवळचा असला तरीसुद्धा, त्याला दाखवत असलेल्या एकनिष्ठेपेक्षा वरचढ असली पाहिजे.

१३:८, ९. यहोवाने नाकारलेल्या धर्मत्यागी लोकांची संख्या मोठी होती; अर्थात प्रदेशाचे दोन भाग. केवळ एकतृतीयांश भाग अग्नीत शुद्ध करण्यात आला. आपल्या दिवसांत ख्रिस्ती धर्मजगतात ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍यांची संख्या मोठी आहे. पण यहोवाने त्यांना नाकारले आहे. केवळ एका लहानशा संख्येच्या लोकांनी अर्थात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी ‘यहोवाचे नाम घेतले आहे,’ व त्यांचे शुद्धीकरण होऊ दिले आहे. हे अभिषिक्‍त जण व त्यांचे विश्‍वासू सोबती सिद्ध करून दाखवतात, की ते केवळ नावासाठी यहोवाचे साक्षीदार नाहीत तर त्यांचे कार्यही त्यांच्या नावाप्रमाणे आहे.

हिरिरीने कार्य करण्यास आपणही प्रवृत्त व्हावे

हाग्गय आणि जखऱ्‍या यांनी जो संदेश दिला त्याचा आज आपल्यावर कोणता परिणाम होतो? त्यांच्या संदेशामुळे यहुदी लोकांमध्ये जणू काय मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा जोम भरला, यावर जेव्हा आपण मनन करतो तेव्हा आपल्यालाही राज्य प्रचार कार्यात व शिष्य बनवण्याच्या कार्यात हिरिरीने भाग घेण्याची प्रेरणा मिळत नाही का?

जखऱ्‍याने असे भाकीत केले, की मशीहा “गाढवावर” बसून येईल, ‘तीस रुपयांसाठी’ त्याचा विश्‍वासघात केला जाईल, त्याच्यावर प्रहार केला जाईल आणि “मेंढरे विखरतील.” (जखऱ्‍या ९:९; ११:१२; १३:७) मशीहाविषयी जखऱ्‍याने केलेल्या भविष्यवाणींवर मनन केल्याने आपल्या विश्‍वासावर किती मोठा प्रभाव पडतो! (मत्तय २१:१-९; २६:३१, ५६; २७:३-१०) देवाचे वचन आणि आपल्या तारणासाठी त्याने केलेल्या तरतुदी यांच्यावरील आपला भरवसा आणखी पक्का होतो.—इब्री लोकांस ४:१२. (w०७ १२/१)

[तळटीप]

^ परि. 2 टेहळणी बुरूज जानेवारी १, १९९६, पृष्ठे ९-२२ पाहा.

[१५ पानांवरील चौकट]

जखऱ्‍याचे आठ रूपक दृष्टांत

१:८-१७: मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याची हमी देतात आणि जेरूसलेम व यहुदातील इतर शहरांवर आशीर्वाद येतील, हे दाखवतात.

१:१८-२१: “यहुदास परागंदा” केलेल्या ‘चार शृंगांचा’ अर्थात, यहोवाच्या उपासनेचा विरोध करणाऱ्‍या सर्व सरकारांचा नाश होईल असे वचन देतात.

२:१-१३: जेरूसलेमचा विस्तार होईल आणि यहोवा “तिला अग्नीचा कोट” होईल अर्थात तिचे संरक्षण करेल, असे सूचित करतात.

३:१-१०: मंदिराच्या बांधकामाचा विरोध करण्यात सैतानाचा हात होता व महायाजक यहोशवाची सुटका केली जाते व त्याला शुद्ध केले जाते, हे दाखवतात.

४:१-१४: पर्वतांसारखी अडखळणे भुईसपाट केली जातील व प्रांताधिकारी जरुब्बाबेल मंदिराचे बांधकाम पूर्ण करेल, याचे आश्‍वासन देतात.

५:१-४: शिक्षेपासून वाचलेल्या अपराध्यांवर शाप घोषित करतात.

५:५-११: दुष्टाईचा अंत होण्याचे भाकीत करतात.

६:१-८: देवदूतांची देखरेख व संरक्षण असल्याचे वचन देतात.

[१२ पानांवरील चित्र]

हाग्गय व जखऱ्‍याच्या संदेशांचा काय उद्देश होता?

[१४ पानांवरील चित्र]

पर्यवेक्षक पदी असलेले “जळत्या मशालीसारखे” कसे आहेत?