व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे राज्य केव्हा येईल?

देवाचे राज्य केव्हा येईल?

देवाचे राज्य केव्हा येईल?

“प्रभुजी, ह्‍याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?” (प्रेषितांची कृत्ये १:६) येशू आपले राज्य केव्हा स्थापन करणार हे जाणून घेण्यास त्याचे प्रेषित उत्सुक होते. आज जवळजवळ २,००० वर्षे उलटून गेल्यानंतर लोकांना अजूनही हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे, की देवाचे राज्य केव्हा येईल?

येशूने देवाच्या राज्याला आपल्या प्रचार कार्याचा मुख्य विषय बनवले, त्याअर्थी या प्रश्‍नावरही त्याने चर्चा केलीच असणार अशी कोणीही अपेक्षा करेल. आणि खरोखरच त्याने याविषयी चर्चा केली होती! किंबहुना, त्याने बरेचदा एका खास कालावधीविषयी उल्लेख केला व या कालावधीला त्याने आपल्या उपस्थितीचा काळ म्हटले. (मत्तय २४:३७) * तो उपस्थितीचा काळ मशीही राज्याच्या स्थापनेशी निगडीत आहे. हा उपस्थितीचा काळ काय आहे? ख्रिस्ताच्या उपस्थितीविषयी बायबलमध्ये प्रकट केलेल्या चार गोष्टींविषयी आपण थोडक्यात चर्चा करू या.

१. ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काळ त्याच्या मृत्यूच्या बऱ्‍याच काळानंतर सुरू होणार होता. येशूने एक दृष्टान्त दिला होता, ज्यात त्याने स्वतःची तुलना एका माणसाशी केली. हा माणूस “राज्य मिळवून परत यावे ह्‍या उद्देशाने दूर देशी गेला.” (लूक १९:१२) या भविष्यसूचक दृष्टान्ताची पूर्णता कशाप्रकारे झाली? येशूचा मृत्यू झाला व त्याचे पुनरुत्थान करण्यात आले; त्यानंतर तो “दूरदेशी” म्हणजेच स्वर्गात गेला. येशूने अशाचप्रकारच्या दुसऱ्‍या एका दृष्टान्तात भाकीत केल्याप्रमाणे, त्याचे राज्य मिळवून परत येणे हे “बराच काळ लोटल्यावर” घडणार होते.—मत्तय २५:१९.

येशू स्वर्गात परत गेल्यानंतर काही वर्षांनी प्रेषित पौलाने असे लिहिले: “पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे.” (इब्री लोकांस १०:१२, १३) याचा अर्थ, येशू स्वर्गात गेल्यानंतर प्रतीक्षेचा एक दीर्घ अवकाश सुरू झाला. यहोवाने आपल्या पुत्राला मशीही राज्याचे सिंहासन दिले तेव्हा हा प्रतीक्षेचा काळ संपुष्टात आला. या मशीही राज्याविषयी बऱ्‍याच काळाआधी वचन देण्यात आले होते. आणि ख्रिस्ताला या राज्याचा राजा बनवण्यात आले तेव्हाच ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काळ सुरू झाला. ही महत्त्वाची घटना पृथ्वीवरील मानव पाहू शकत होते का?

२. येशूची उपस्थिती अदृश्‍य रूपात घडते. येशूने आपल्या उपस्थितीच्या चिन्हाविषयी शिष्यांना सांगितले होते हे तुम्हाला आठवत असेल. (मत्तय २४:३) जर मानव त्याची उपस्थिती प्रत्यक्ष पाहू शकणार होते, तर मग चिन्ह देण्याची गरज होती का? उदाहरणार्थ: अशी कल्पना करा की तुम्ही समुद्र पाहायला जात आहात. कदाचित समुद्राकडे जाण्याचा रस्ता दाखवण्यासाठी वाटेत काही चिन्हे तुम्हाला आढळतील. पण जेव्हा तुम्ही क्षितिजापर्यंत पसरलेल्या अथांग पाण्याच्या विस्ताराजवळ येऊन पोचता, तेव्हा “समुद्र” असे मोठ्या अक्षरांत लिहिलेला फलक तुम्हाला दिसतो का? नाही! कारण जे उघडपणे डोळ्यांनी दिसते त्याकडे संकेत करण्यासाठी चिन्हाची गरज नसते.

येशूनेही आपल्या उपस्थितीचे चिन्ह यासाठी दिले की मानव त्याची उपस्थिती डोळ्यांनी पाहू शकणार नव्हते. ज्या घटना स्वर्गात घडणार होत्या त्या ओळखण्यास मदत करण्यासाठी येशूने चिन्ह दिले. म्हणूनच येशूने म्हटले: “देवाचे राज्य दृश्‍य स्वरूपात येत नाही.” (लूक १७:२०) ख्रिस्ताची उपस्थिती सुरू झाली आहे हे पृथ्वीवरील लोकांना त्या चिन्हाच्या साहाय्याने कशाप्रकारे ओळखता येणार होते?

३. येशूच्या उपस्थितीच्या काळात पृथ्वीवर अतिशय त्रासदायक घटना घडतील. येशूने म्हटले होते की स्वर्गात राजा या नात्याने त्याची उपस्थिती सुरू होईल तेव्हा या पृथ्वीवर युद्धे, दुष्काळ, भूकंप, रोगराई व अनाचार पसरेल. (मत्तय २४:७-१२; लूक २१:१०, ११) या सर्व दुःखद घटना कशामुळे घडतील? बायबलमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की “ह्‍या जगाचा अधिकारी” सैतान सध्या अतिशय संतप्त आहे कारण त्याला माहीत आहे की राजा या नात्याने ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काळ सुरू झाला आहे त्याअर्थी आपला काळ थोडा आहे. (योहान १२:३१; प्रकटीकरण १२:९, १२) सैतानाच्या संतापाचा आणि ख्रिस्ताच्या उपस्थितीचा हा दृश्‍य पुरावा आपल्या काळात मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. विशेषतः १९१४ या सालापासून हा पुरावा अभूतपूर्व प्रमाणात आणि जागतिक स्तरावर दिसला आहे. इतिहासकारही कबूल करतात की १९१४ हे साल इतिहासाला कलाटणी देणारे वर्ष होते.

ही माहिती एखाद्याला नैराश्‍यजनक वाटेल, पण मुळात ती तशी नाही. कारण या सर्व दुःखद घटनांवरून हेच सिद्ध होते की मशीही राज्य सध्या स्वर्गात कार्यरत आहे. लवकरच हे सरकार सबंध पृथ्वीला आपल्या अंमलाखाली आणेल. पण लोकांना या राज्याचा स्वीकार करून त्याच्या अधीन होण्याची संधी मिळावी म्हणून त्याविषयी माहिती कोठून मिळेल?

४. जागतिक प्रचाराचे कार्य येशूच्या उपस्थितीचे चिन्ह आहे. येशूने म्हटले की त्याच्या उपस्थितीचा काळ हा ‘नोहाच्या दिवसांप्रमाणे’ असेल. * (मत्तय २४:३७-३९) नोहा हा केवळ तारू बांधणारा नव्हे, तर “नीतिमत्त्वाचा उपदेशक” देखील होता. (२ पेत्र २:५) नोहाने लोकांना ताकीद दिली होती की देव लवकरच दुष्ट लोकांचा नाश करणार. येशूने म्हटले की त्याचे पृथ्वीवरील अनुयायी त्याच्या उपस्थितीदरम्यान अशाचप्रकारचे एक कार्य करतील. त्याने अशी भविष्यवाणी केली, “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

याआधीच्या लेखात आपण पाहिल्याप्रमाणे, देवाचे राज्य जगातील सर्व सरकारांचा नाश करेल. प्रचाराचे कार्य लोकांना देवाचे स्वर्गीय सरकार लवकरच कार्य करेल याची जाणीव करून देते आणि येणाऱ्‍या नाशातून बचावण्याची व त्या राज्याच्या अधीन होण्याची संधी देते. पण महत्त्वाचा प्रश्‍न हा आहे की या कार्याला तुम्ही कसा प्रतिसाद देणार?

देवाचे राज्य तुमच्याकरता एक आनंदाची वार्ता ठरेल का?

येशूने प्रचार केलेला संदेश एका अतुलनीय आशेविषयी होता. हजारो वर्षांपूर्वी एदेन बागेत देवाविरुद्ध बंड करण्यात आले तेव्हा यहोवा देवाने सर्वकाही पुन्हा सुरळीत करण्यासाठी एक सरकार स्थापन करण्याचा संकल्प केला. या सरकारच्या शासनाखाली विश्‍वासू मानव पृथ्वीवरील नंदनवनात सर्वकाळ राहतील. अशारितीने देवाचा सुरवातीपासूनच जो उद्देश होता तो हे सरकार पूर्ण करेल. कित्येक शतकांपूर्वी ज्याविषयी अभिवचन देण्यात आले होते, ते सरकार आज स्वर्गात राज्य करत आहे यापेक्षा आणखी आनंददायक गोष्ट कोणती असू शकते? देवाचे राज्य ही केवळ एक अमूर्त कल्पना नाही तर एक वास्तविकता आहे!

देवाचा नियुक्‍त राजा सध्या आपल्या शत्रूंमध्ये राज्य करत आहे. (स्तोत्र ११०:२) देवापासून दुरावलेल्या या नीतिभ्रष्ट जगात मशीहा आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करत आहे. म्हणजेच तो अशा लोकांना शोधून काढत आहे की जे देवाला खरोखर जाणून घेऊन त्याची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” करू इच्छितात. (योहान ४:२४) देवाच्या राज्यशासनाखाली सर्वकाळ जगण्याची आशा सर्व जातींच्या, वयोगटांच्या व सामाजिक पार्श्‍वभूमींच्या लोकांना उपलब्ध आहे. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) आम्ही तुम्हाला या अद्‌भुत संधीचा फायदा घेण्यासाठी आग्रह करतो. देवाच्या राज्याबद्दल आताच जाणून घ्या, जेणेकरून त्या नीतिमान राज्यात तुम्हाला सर्वकाळ जीवनाचा उपभोग घेता येईल!—१ योहान २:१७. (w०८ १/१)

[तळटीपा]

^ परि. 3 मत्तय २४:३७ यात “येणे” असे भाषांतर केलेला मूळ ग्रीक शब्द पारूसिया हा आहे. हा शब्द केवळ येण्याच्या तात्कालिक घटनेलाच नव्हे तर आगमनानंतरच्या काळालाही सूचित करतो. त्यामुळे या शब्दाचा अर्थ “उपस्थिती” या शब्दातून जास्त अचूकपणे व्यक्‍त होतो.

^ परि. 10 “उपस्थिती” या शब्दाचे बायबलच्या काही अनुवादांमध्ये चुकीचे भाषांतर करण्यात आल्यामुळे जो गैरसमज निर्माण झाला आहे तो येशूच्या या विधानामुळे दूर होतो. काही अनुवादांत त्याचे भाषांतर, “येणे,” “आगमन” किंवा “परतणे” असे करण्यात आले आहे. या तिन्ही शब्दांतून एका क्षणिक घटनेचा अर्थ निघतो. पण येशूने आपल्या उपस्थितीची तुलना नोहाच्या काळात आलेल्या जलप्रलयाशी, म्हणजेच एका घटनेशी केली नाही याकडे लक्ष द्या. त्याने आपल्या उपस्थितीची तुलना ‘नोहाच्या दिवसांशी’ म्हणजे एका दीर्घ कालावधीशी केली. या कालावधीच्या शेवटी जलप्रलयाची घटना घडली. त्या प्राचीन काळाप्रमाणेच ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या काळातही लोक आपल्या दैनंदिन जीवनात मग्न असतील आणि दिलेल्या इशाऱ्‍याकडे ते लक्ष देणार नाहीत असे येशूने म्हटले.

[८, ९ पानांवरील चित्रे]

दररोज आपल्याला ज्या वाईट बातम्या ऐकायला मिळतात त्या याच गोष्टीचा पुरावा आहेत की चांगल्या घटना लवकरच घडणार आहेत

[चित्राचे श्रेय]

Antiaircraft gun: U.S. Army photo