व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनाचा काय उद्देश आहे?

जीवनाचा काय उद्देश आहे?

जीवनाचा काय उद्देश आहे?

या प्रश्‍नाचे उत्तर शोधून काढणे महत्त्वाचे का आहे? जीवनाला अर्थ नाही किंवा जीवनात उद्देश नाही हा विचार मनुष्याला खूप अस्वस्थ करणाऱ्‍या काही गोष्टींपैकी एक आहे. दुसऱ्‍या बाजूला पाहता, ज्या व्यक्‍तीच्या जीवनात एक निश्‍चित उद्देश असतो ती व्यक्‍ती येईल त्या परिस्थितीशी चार हात करण्यास व सावरण्यास सक्षम असते. नात्सींच्या छळछावण्यांतून जिवंत वाचलेले न्यूरोलॉजिस्ट, विक्टोर ई. फ्रँकल, असे लिहितात: “आपल्या जीवनाला अर्थ आहे ही जाणीव एखाद्याला वाइटातल्या वाईट अनुभवाला तोंड देण्याची शक्‍ती देते. खरं तर, दुसरी कोणतीही गोष्ट ही शक्‍ती देऊ शकत नाही असं म्हणण्याचं मी धाडस करेन.”

परंतु या विषयावर अनेक वेगवेगळी मते आहेत. जीवनाचा अर्थ काय, हे प्रत्येक व्यक्‍तीने स्वतःच ठरवले पाहिजे, असे काहींचे म्हणणे आहे. या उलट, जे उत्क्रांतीवादावर विश्‍वास करतात ते असे म्हणतात, की जीवनात असा काही निश्‍चित अर्थ नसतो.

पण, जीवनाचा काय अर्थ आहे हे शोधून काढण्याचा सर्वात सुज्ञ मार्ग म्हणजे ज्याने जीवन बहाल केले आहे त्या यहोवा देवालाच याबाबतीत विचारणे. या विषयावर त्याचे वचन बायबल काय म्हणते ते आपण पाहू या.

बायबल काय शिकवते

यहोवा देवाने पुरुष व स्त्री यांना निर्माण केले तेव्हा त्यांच्यासाठी त्याच्या मनात एक खास उद्देश होता, असे बायबल शिकवते. या दोघांना अर्थात आपल्या प्रथम पालकांना यहोवाने पुढील आज्ञा दिली.

उत्पत्ति १:२८. “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.”

आदाम, हव्वा आणि त्यांना होणाऱ्‍या मुलांनी संपूर्ण पृथ्वीला नंदनवन बनवावे असा देवाचा उद्देश होता. मानवांनी म्हातारे होऊन मरून जावे किंवा त्यांनी पर्यावरणाचा नाश करावा, असा उद्देश देवाच्या मनात नव्हता. परंतु, आपल्या पहिल्या पालकांच्या अविचारी निर्णयांमुळे आपल्याला पाप आणि मृत्यू वारशाने मिळाले आहे. (उत्पत्ति ३:२-६; रोमकर ५:१२) एवढे सर्व होऊनही यहोवाचा उद्देश बदललेला नाही. लवकरच या पृथ्वीचे रूपांतर नंदनवनात होणार आहे.—यशया ५५:१०, ११.

यहोवाने आपला उद्देश पूर्ण करण्याकरता मानवाला शारीरिक व बौद्धिक क्षमतेसह निर्माण केले. त्याने मानवाला त्याच्यापासून स्वतंत्र राहण्यासाठी बनवले नाही. बायबलमधील पुढील उताऱ्‍यांत देवाचा आपल्याबद्दल काय उद्देश आहे हे सांगितलेले आहे.

उपदेशक १२:१३. “आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”

मीखा ६:८. “नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्‍वर तुजजवळ काय मागतो?”

मत्तय २२:३७-३९. “‘तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.’ हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.’”

बायबलमधील उत्तराने खरी मनःशांती मिळते

कोणतेही यंत्र सुरळीत चालण्याकरता ते ज्या कामाकरता बनवण्यात आले आहे त्याचकरता वापरले पाहिजे व बनवणाऱ्‍याच्या सूचनांप्रमाणे चालवले पाहिजे. त्याच प्रकारे, आपण जर स्वतःला हानी पोहचवू इच्छित नसू—मग ती आध्यात्मिक, मानसिक, भावनिक अथवा शारीरिक अर्थाने असो—तर आपण आपल्या जीवनाचा उपयोग निर्माणकर्त्याच्या इच्छेनुसार केला पाहिजे. देवाचा आपल्यासाठी काय उद्देश आहे हे माहीत झाल्यावर, जीवनातील विविध क्षेत्रांत आपल्याला मनःशांती कशी मिळू शकेल ते पाहा.

कोणत्या गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायचे याबाबतीत पाहिल्यास, पुष्कळ लोक आज धनसंपत्ती गोळा करण्यातच आपले बहुतांश आयुष्य घालवत आहेत. परंतु बायबल अशी ताकीद देते, की “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मुर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात.”—१ तीमथ्य ६:९, १०.

दुसऱ्‍या बाजूला पाहता, जे पैशापेक्षा देवावर प्रेम करण्यास शिकले आहेत ते आपल्या जीवनात आहे त्यात समाधान मानतात. (१ तीमथ्य ६:७, ८) त्यांना कष्ट करण्याचे मोल समजते व आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याचे आपले कर्तव्य आहे हेही त्यांना माहीत आहे. (इफिसकर ४:२८) पण त्याचवेळेस ते येशूने दिलेल्या इशाऱ्‍याकडेही लक्ष देतात: “कोणीहि दोन धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्‍यावर प्रीति करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.”—मत्तय ६:२४.

यास्तव देवावर प्रेम करणारे, नोकरीला किंवा धनसंपत्ती गोळा करण्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान देत नाहीत तर देवाची इच्छा पूर्ण करण्याला प्राधान्य देतात. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याला आपण आपल्या जीवनात, इतर गोष्टींपेक्षा अधिक महत्त्व दिले तर यहोवा आपली काळजी घेईल, हे त्यांना माहीत आहे. किंबहुना आपल्या सेवकांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे असे यहोवा समजतो.—मत्तय ६:२५-३३.

लोकांबरोबर व्यवहार करताना पुष्कळ लोक आधी स्वतःचा विचार करतात. आणि आजच्या जगात शांती नसण्याचे मुख्य कारण हेच आहे. बहुतेक लोक “स्वार्थी, . . . ममताहीन” झाले आहेत. (२ तीमथ्य ३:२, ३) कोणी आपल्या मनाविरुद्ध वागले किंवा आपल्या मताशी सहमत झाले नाहीत तर ते “संताप, क्रोध, गलबला व निंदा” करतात. (इफिसकर ४:३१) अशा असंयमी वागणुकीमुळे मनःशांती तर सोडाच, उलट ‘तंटाच उपस्थित’ होतो.—नीतिसूत्रे १५:१८.

या उलट, आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखे प्रेम कर, या देवाच्या आज्ञेचे पालन करणारे ‘एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू’ असतात व ते “एकमेकांना क्षमा” देखील करतात. (इफिसकर ४:३२; कलस्सैकर ३:१३) इतर जण त्यांच्याशी दयाळुपणे वागत नाहीत तेव्हाही ते, ‘निंदा होत असता ज्याने उलट निंदा केली नाही,’ त्या येशूचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. (१ पेत्र २:२३) येशूप्रमाणे ते समजतात, की इतरांची सेवा केल्याने खरे समाधान मिळते; मग लोकांना या सेवेबद्दल कृतज्ञता वाटत असो अथवा नसो. (मत्तय २०:२५-२८; योहान १३:१४, १५; प्रेषितांची कृत्ये २०:३५) जे येशूचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात अशांना यहोवा आपला पवित्र आत्मा देतो. हा पवित्र आत्मा त्यांच्या जीवनात खरी मनःशांती उत्पन्‍न करतो.—गलतीकर ५:२२.

परंतु, भविष्यात जे राखून ठेवले आहे त्याबद्दलच्या तुमच्या दृष्टिकोनाचा तुमच्या मनाच्या शांतीवर कसा प्रभाव पडू शकतो? (w०८ २/१)

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

जीवनात एक निश्‍चित उद्देश असणे महत्त्वाचे आहे

[७ पानांवरील चित्र]

मनःशांती कशी मिळवायची हे येशू आपल्याला शिकवतो