व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने दुःख का राहू दिले आहे?

देवाने दुःख का राहू दिले आहे?

वाचक विचारतात

देवाने दुःख का राहू दिले आहे?

मानवाच्या जीवनातील दुःखाला देव जबाबदार नाही. बायबल म्हणते: “देवाकडून दुष्कर्म व्हावे . . . ही कल्पनाहि करावयाला नको.” (ईयोब ३४:१०) मग जगातल्या दुःखद परिस्थितीला प्रामुख्याने कोण जबाबदार आहे?

येशूने सैतानाला “जगाचा अधिकारी” म्हटले. (योहान १४:३०) अर्थात, यहोवाच सबंध विश्‍वाचा सार्वभौम अधिकारी आहे. हे पद तो कधीही त्यागणार नाही. पण काही काळासाठी देवाने सैतानाला मानवजातीवर अधिकार चालवण्याची मुभा दिली आहे.—१ योहान ५:१९.

एक अधिकारी किंवा शासक म्हणून सैतानाविषयी काय म्हणता येईल? मानवांशी सैतानाचा पहिल्यांदा संपर्क आला तेव्हापासूनच तो घात करणारा आणि फसवणूक करणारा आहे असे आपण म्हणू शकतो. सैतान निरनिराळ्या मार्गांनी मानव समाजात कोलाहल माजवत आहे. येशूने त्याची या शब्दांत निर्भर्त्सना केली: “तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.” (योहान ८:४४) जे येशूचा घात करू इच्छित होते त्यांना येशूने प्रारंभापासून मनुष्यघातक असणाऱ्‍या या सैतानाची मुले म्हटले. मुले सहसा आपल्या बापाचे अनुकरण करतात. त्याचप्रमाणे येशूला ठार मारू इच्छिणाऱ्‍यांनी सैतानाप्रमाणे वागून आपण त्याची मुले असल्याचे सिद्ध केले.

सैतान आजही मानवांच्या मनात इतरांचा घात करण्याची प्रवृत्ती उत्पन्‍न करतो. उदाहरणार्थ, अमेरिकेतील हवाई विद्यापीठातील मानद प्राध्यापक आर. जे. रमल यांनी लावलेल्या एका अंदाजानुसार १९०० ते १९८७ या काळात निरनिराळ्या सरकारांकडून घडवून आणण्यात आलेल्या राजकीय चकमकींत, जातिसंहारांत व हिंसाचाराच्या इतर घटनांत १६,९१,९८,००० जणांची कत्तल करण्यात आली. शिवाय, या संख्येत त्याच कालावधीदरम्यान युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या कोट्यवधी लोकांचा समावेश करण्यात आलेला नाही.

जर देव दुःखाला जबाबदार नाही, तर मग तो ते घडण्यास परवानगी तरी का देतो? कारण फार पूर्वी उपस्थित करण्यात आलेले काही वादविषय तडीस नेणे अद्याप बाकी आहे. हे वादविषय विश्‍वातील सर्व प्राण्यांशी संबंधित असून ते नैतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांपैकी फक्‍त एका वादविषयाची येथे चर्चा करू या.

मानव इतिहासाच्या सुरुवातीला आदाम व हव्वा यांनी सैतानाचा पक्ष घेतला. त्यांनी देवाचे आधिपत्य झिडकारले आणि स्वतःच आपल्या जीवनाचे मार्गदर्शन करायचे ठरवले. असे करण्याद्वारे खरे तर त्यांनी दियाबलाचे आधिपत्य स्वीकारले.—उत्पत्ति ३:१-६; प्रकटीकरण १२:९.

यहोवा न्यायी देव आहे. त्यामुळे त्याचे आधिपत्य मानवांकरता सर्वात उत्तम आहे की सैतानाचे हे शाबीत होईपर्यंत काही काळ जाऊ देणेच योग्य राहील असे त्याने ठरवले. आतापर्यंत गेलेल्या काळातून काय सिद्ध झाले आहे? सैतानाच्या प्रभावाखालील मानवी शासनातून केवळ दुःखच पदरी पडले आहे. दीर्घ पल्ल्याचा विचार केल्यास, देवाने हा जो काळ जाऊ दिला आहे त्यामुळे खरे तर मानवाला फायदाच झाला आहे. असे आपण का म्हणू शकतो? कारण जे आतापर्यंतच्या इतिहासात घडलेल्या घटनांचे काळजीपूर्वक परीक्षण करून त्यांतून धडा घेतात, त्यांना देवाच्या शासनाखाली राहण्यास आपण तयार आहोत हे दाखवण्याची संधी मिळते. जे देवाचे नीतिनियम जाणून घेऊन त्यांचे आपल्या जीवनात पालन करतात त्यांना सर्वकाळ जगण्याची आशा आहे.—योहान १७:३; १ योहान २:१७.

सध्या हे जग दुष्ट सैतानाच्या विळख्यात आहे हे तर खरे आहे. पण ते फार काळ राहणार नाही. लवकरच यहोवा आपल्या पुत्राच्या हातून ‘सैतानाची कृत्ये नष्ट करेल.’ (१ योहान ३:८) देवाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करून लवकरच येशू, दुःखाने जर्जर झालेल्यांच्या घायाळ मनांवर फुंकर घालून त्यांचे उद्‌ध्वस्त झालेले आयुष्य पुन्हा पूर्वपदास आणेल. आतापर्यंत नाना प्रकारची दुःखे सोसून मरण पावलेल्या अब्जावधी लोकांना तो पृथ्वीवर सर्वकाळ राहण्याकरता पुन्हा जिवंत करेल.—योहान ११:२५.

येशूचे पुनरुत्थान, हे दियाबलाच्या कार्यांवर देव किती अद्‌भुतरित्या विजय मिळवू शकतो याचे एक उदाहरण आहे. देवाचे शासन स्वीकारणाऱ्‍या मानवांकरता राखून ठेवलेल्या आशीर्वादांविषयीचे जणू ते एक आश्‍वासन आहे. (प्रेषितांची कृत्ये १७:३१) तो येणारा काळ कसा असेल हे समजून घेण्यास आपल्याला साहाय्य करण्याकरता बायबल अतिशय सांत्वनदायक शब्दांत असे वर्णन करते: “देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४. (w०८ २/१)