व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लूक पुस्तकातील ठळक मुद्दे

लूक पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

लूक पुस्तकातील ठळक मुद्दे

मत्तयाचे शुभवर्तमान हे मुख्यतः यहुदी वाचकाला मनात ठेवून तर मार्कचे शुभवर्तमान गैरयहुदी वाचकांना मनात ठेवून लिहिण्यात आले आहे असे म्हटले जाते. पण लूकचे शुभवर्तमान हे सर्व राष्ट्रांच्या लोकांकरता लिहिण्यात आले. सा.यु. ५६-५८ च्या दरम्यान लिहिण्यात आलेले लूकचे हे पुस्तक येशूच्या जीवनाचे व सेवाकार्याचे सविस्तर वर्णन करते.

लूक मुळात एक वैद्य होता. त्यामुळे एका वैद्याच्या सहानुभूतीशील व काळजीपूर्वक नजरेने त्याने “सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध” करून ३५ वर्षांच्या म्हणजेच सा.यु.पू. ३ ते सा.यु. ३३ पर्यंतच्या काळाचे वर्णन करणारे हे पुस्तक लिहिले. (लूक १:३) लूकच्या शुभवर्तमानात सापडणारी जवळजवळ ६० टक्के माहिती दुसऱ्‍या कोणत्याही शुभवर्तमानात आढळत नाही.

येशूचे सुरुवातीचे सेवाकार्य

(लूक १:१–९:६२)

बाप्तिस्मा देणारा योहान व येशू यांच्या जन्माविषयी सविस्तर माहिती दिल्यानंतर लूक आपल्याला सांगतो की तिबिर्य कैसर याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी, म्हणजे सा.यु. २९ सालाच्या सुरुवातीस, योहानाने देवाच्या वचनाचा प्रचार करण्यास आरंभ केला. (लूक ३:१, २) त्याच वर्षी नंतर, योहान येशूला बाप्तिस्मा देतो. (लूक ३:२१, २२) सा.यु. ३० च्या सुमारास ‘येशू गालीलात परत येतो व त्यांच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देऊ लागतो.’—लूक ४:१४, १५.

यानंतर येशू गालीलात त्याच्या पहिल्या प्रचार यात्रेला सुरुवात करतो. तो लोकसमुदायाला सांगतो: “मला इतर गावीहि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे.” (लूक ४:४३) आपल्यासोबत तो मासे धरणाऱ्‍या शिमोनाला व इतरांनाही घेतो. त्यांना तो म्हणतो ‘येथून पुढे तुम्ही माणसे धरणारे व्हाल.’ (लूक ५:१-११; मत्त. ४:१८, १९) गालीलात येशूच्या दुसऱ्‍या प्रचार यात्रेत त्याचे १२ प्रेषितही त्याच्यासोबत असतात. (लूक ८:१) तिसऱ्‍या प्रचार यात्रेत तो या १२ शिष्यांना “राज्याची घोषणा करावयास व रोग्यांस बरे करावयास” पाठवतो.—लूक ९:१, २.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:३५—मरीयेच्या बाळाची रचना करण्याकरता तिच्या शरीरातील स्त्री बीजाचा वापर करण्यात आला का? मरीयेचे बाळ तिच्या पूर्वजांचे अर्थात, देवाने सांगितल्याप्रमाणे अब्राहाम, यहुदा व दावीद यांचे वंशज असण्याकरता तिच्या शरीरातील स्त्री बीज वापरणे भाग होते. (उत्प. २२:१५, १८; ४९:१०; २ शमु. ७:८, १६) पण देवाच्या पुत्राचे परिपूर्ण जीवन स्वर्गातून तिच्या उदरात पोचवण्याकरता, अर्थात मरीयेला दिवस राहण्याकरता पवित्र आत्म्याचा वापर करण्यात आला. (मत्त. १:१८) यामुळे मरीयेच्या स्त्री बीजात असणारी अपरिपूर्णता नाहीशी करून, तिच्या उदरात वाढणाऱ्‍या गर्भाला अगदी सुरुवातीपासूनच सर्व प्रकारच्या अपायांपासून सुरक्षित ठेवण्यात आले असावे.

१:६२—जखऱ्‍या मुका व बहिराही झाला होता का? नाही, तो फक्‍त मुका झाला होता. लोकांनी त्याला बाळाचे काय नाव ठेवायचे याविषयी “खुणावून विचारिले” पण हे तो बहिरा झाल्यामुळे नव्हते. त्याच्या पत्नीने बाळाच्या नावाविषयी काय म्हटले हे त्याने ऐकले. कदाचित इतरांनी खुणेने याविषयी त्याचे मत विचारले असेल. नंतर फक्‍त त्याची बोलण्याची शक्‍तीच पुन्हा त्याला परत देण्यात आली असे सांगितले आहे, यावरूनही दिसून येते की जखऱ्‍याची श्रवणशक्‍ती गेली नव्हती.—लूक १:१३, १८-२०, ६०-६४.

२:१, २—“ही पहिली नावनिशी” असा जो उल्लेख केला आहे तो येशूच्या जन्माची वेळ निश्‍चित करण्यास कशा प्रकारे साहाय्य करतो? कैसर औगुस्त याच्या राज्यादरम्यान दोन वेळा नावनिशी लिहिण्याची आज्ञा देण्यात आली. पहिल्यांदा सा.यु.पू. २ साली दानीएल ११:२० यातील भविष्यवाणीची पूर्णता झाली तेव्हा आणि दुसऱ्‍यांदा सा.यु. ६ किंवा ७ या वर्षी. (प्रे. कृत्ये ५:३७) क्विरीनिय हा या दोन्ही नावनिशींच्या वेळी सूरियाचा सुभेदार होता. त्याला दोन वेळा हे पद मिळाले असे दिसते. लूकने पहिल्या नावनिशीचा उल्लेख केल्यामुळे येशूचा जन्म सा.यु.पू. २ साली झाला हे आपल्याला कळते.

२:३५—मरीयेच्या जिवातून “तरवार भोसकून जाईल” असे का भाकीत करण्यात आले? येशू मशीहा आहे हे बहुतेक लोक मान्य करणार नाही तेव्हा मरीयेला जे दुःख होईल आणि त्याचा यातनामय मृत्यू पाहून तिला ज्या वेदना होतील त्यांच्या संदर्भात असे भाकीत करण्यात आले होते.—योहा. १९:२५.

९:२७, २८—आपल्या शिष्यांपैकी काही जण आपल्याला राज्य गौरवात येताना पाहीपर्यंत त्यांना “मरणाचा अनुभव येणारच नाही” असे येशूने आपल्या शिष्यांना वचन दिल्यानंतर “आठ दिवसांनी” येशूचे रूपांतरण झाले असे लूक म्हणतो. पण मत्तय व मार्क हे दोघेही ते “सहा दिवसांनंतर” घडले असे म्हणतात, असे का? (मत्त. १७:१; मार्क ९:२) लूकने दोन जास्तीचे दिवस, म्हणजे हे वचन येशूने दिले तो दिवस आणि ज्या दिवशी त्याची पूर्णता झाली तो दिवसही मोजला असे दिसते.

९:४९, ५०—एक मनुष्य येशूला अनुसरत नव्हता तरीसुद्धा येशूने त्याला दुरात्मे काढण्याची मनाई का केली नाही? येशूने या मनुष्याला मनाई केली नाही कारण ख्रिस्ती मंडळीची अद्याप स्थापना झालेली नव्हती. त्यामुळे येशूच्या नावावर विश्‍वास ठेवून दुरात्मे काढण्यासाठी त्या मनुष्याने येशूसोबत असण्याची आवश्‍यकता नव्हती.—मार्क ९:३८-४०.

आपल्याकरता धडे:

१:३२, ३३; २:१९, ५१. मरीयेने भविष्यवाण्यांची पूर्णता करणाऱ्‍या घटना व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. येशूने ‘युगाच्या समाप्तीविषयी’ जे भाकीत केले ते आपणही आपल्या मनात ठेवून जगातल्या घडामोडींशी त्याची तुलना करतो का?—मत्त. २४:३.

२:३७. हन्‍नाच्या उदाहरणावरून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण यहोवाची उपासना सातत्याने केली पाहिजे, “प्रार्थनेत तत्पर” राहिले पाहिजे आणि ख्रिस्ती सभांमध्ये “एकत्र मिळणे” आपण कधीही सोडू नये.—रोम. १२:१२; इब्री १०:२४, २५.

२:४१-५०. योसेफाने आपल्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व दिले आणि त्याने आपल्या कुटुंबाची शारीरिक व आध्यात्मिक दृष्टीने काळजी वाहिली. त्याने कुटुंबप्रमुखांकरता एक उत्तम उदाहरण मांडले आहे.

४:४. आध्यात्मिक गोष्टींवर विचार न करता आपण एकही दिवस जाऊ द्यायला नको.

६:४०. देवाच्या वचनातून शिकवणाऱ्‍याने आपल्या विद्यार्थ्यांकरता चांगला आदर्श पुरवला पाहिजे. तो जे शिकवतो त्याचे त्याने पालनही केले पाहिजे.

८:१५. ‘[वचन] अंतःकरणात धरून ठेवण्याकरता व धीराने फळ देत राहण्याकरता’ आपण देवाच्या वचनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे, त्याची कदर केली पाहिजे आणि ते आत्मसात केले पाहिजे. याकरता बायबल व बायबल आधारित प्रकाशने वाचताना प्रार्थनापूर्वक मनन करणे अत्यावश्‍यक आहे.

येशूचे नंतरचे सेवाकार्य

(लूक १०:१–२४:५३)

येशू आणखी ७० जणांना, यहुदियात ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे आपल्यापुढे पाठवतो. (लूक १०:१, पं.र.भा.) तो “गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत” फिरला.—लूक १३:२२.

सा.यु. ३३ सालच्या वल्हांडणाच्या पाच दिवसांआधी येशू गाढवीच्या शिंगरावर बसून जेरूसलेममध्ये प्रवेश करतो. “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी, मुख्य याजक व शास्री ह्‍यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे, आणि तिसऱ्‍या दिवशी पुन्हा उठविले जावे, ह्‍याचे अगत्य आहे,” असे जे त्याने आपल्या शिष्यांना सांगितले होते ते पूर्ण होण्याची वेळ आली होती.—लूक ९:२२, ४४.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१०:१८—“सैतान आकाशांतून विजेसारखा पडला हे मी पाहिले,” असे येशूने आपल्या सत्तर शिष्यांना सांगितले तेव्हा तो काय म्हणू इच्छित होता? सैतानाला इतक्यातच स्वर्गातून फेकण्यात आले आहे असे येशू या ठिकाणी म्हणत नव्हता. कारण हे १९१४ साली ख्रिस्त जेव्हा स्वर्गात राजा बनला त्यानंतर थोड्या काळाने घडले. (प्रकटी. १२:१-१०) भविष्यातील ही घटना जणू घडून चुकली आहे अशारितीने तिचा उल्लेख करण्याद्वारे, ही घटना निश्‍चितच घडेल यावर कदाचित येशू जोर देत असावा. अर्थात ही केवळ एक शक्यता आहे, हे असेच आहे हे आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

१४:२६ख्रिस्ताचे अनुयायी आपल्या नातलगांचा “द्वेष” करतात ते कोणत्या अर्थाने? बायबलमध्ये “द्वेष” हा शब्द एखाद्या व्यक्‍तीला किंवा वस्तूला दुसऱ्‍या एखाद्यापेक्षा कमी प्रेम करण्याच्या संदर्भातही वापरला जातो. ख्रिश्‍चनांनी आपल्या नातलगांचा “द्वेष” केला पाहिजे तो या अर्थाने की त्यांनी येशूपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करू नये.—मत्त. १०:३७.

१७:३४-३७—या वचनांत उल्लेख केलेली “गिधाडे” कोणाला सूचित करतात आणि जेथे ती जमतात ते “प्रेत” म्हणजे काय? ज्यांना ‘घेतले जाईल’ किंवा ज्यांना तारण मिळेल त्यांची तुलना दूरपर्यंत पाहू शकणाऱ्‍या गिधाडांशी केली आहे. जेथे ही गिधाडे जमतात ते “प्रेत” अदृश्‍यरित्या उपस्थित असलेल्या खऱ्‍या ख्रिस्ताला आणि यहोवा त्यांना जे आध्यात्मिक अन्‍न पुरवतो त्याला सूचित करते.—मत्त. २४:२८.

२२:४४—येशू इतका विव्हळ का झाला? यामागे अनेक कारणे होती. येशूला याची काळजी लागली होती की त्याला एक गुन्हेगार म्हणून मृत्यूदंड दिला जाईल तेव्हा यहोवा देवावर व त्याच्या नावावर याचा काय परिणाम होईल. शिवाय येशूला हेही माहीत होते की त्याचे सार्वकालिक जीवन आणि सबंध मानवजातीचे भविष्य हे त्याच्या शेवटपर्यंत विश्‍वासू राहण्यावर अवलंबून होते.

२३:४४—तीन तासांचा अंधार सूर्य ग्रहणामुळे पडला होता का? नाही. सूर्य ग्रहण फक्‍त अमावस्येच्या वेळी घडते. पण वल्हांडणाच्या काळात अमावस्या नव्हे तर पौर्णिमा होती. त्याअर्थी, येशूच्या मृत्यूच्या दिवशी पडलेला अंधार हा देवाने केलेला एक चमत्कार होता.

आपल्याकरता धडे:

११:१-४. येशूने या ठिकाणी प्रार्थना कशी करावी यासंबंधी दिलेल्या सूचना व सुमारे १८ महिन्यांपूर्वी डोंगरावरील प्रवचनात त्याने जी आदर्श प्रार्थना शिकवली होती यांत थोडा फरक आहे. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की आपल्या प्रार्थनांमध्ये आपण तोंडपाठ केलेले तेच-ते शब्द वारंवार म्हणू नयेत.—मत्त. ६:९-१३.

११:५, १३. यहोवा आपल्या प्रार्थनांचे उत्तर देण्यास तयार आहे हे जरी खरे असले तरी आपण पुन्हापुन्हा व सतत प्रार्थना केली पाहिजे.—१ योहा. ५:१४.

११:२७, २८. खरा आनंद हा कौटुंबिक नातेसंबंधांतून किंवा धनसंपत्ती साठवल्याने मिळत नाही तर विश्‍वासूपणे देवाची इच्छा पूर्ण केल्याने मिळतो.

११:४१. आपण जे काही दान देतो ते प्रेमाने व स्वेच्छेने दिले पाहिजे.

१२:४७, ४८. ज्याच्या खांद्यांवर जास्त जबाबदारी टाकण्यात येते व जो ती पार पाडत नाही तो अशा माणसापेक्षा जास्त दोषास्पद आहे ज्याला आपले कर्तव्य काय आहे ते माहीत नसते किंवा त्याला ते पूर्णपणे समजत नाही.

१४:२८, २९. आपण पांघरूण पाहूनच पाय पसरले पाहिजे.

२२:३६-३८. येशूने त्याच्या शिष्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्रे बाळगण्यास सांगितले नाही. उलट, त्याला धरून देण्यात आले तेव्हा त्याच्या शिष्यांजवळ तलवारी असल्यामुळे त्याला त्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवण्याची संधी मिळाली: “तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.”—मत्त. २६:५२.

[३१ पानांवरील चित्र]

योसेफाने कुटुंबप्रमुखांकरता एक उत्तम उदाहरण मांडले

[३२ पानांवरील चित्र]

लूकने येशूच्या जीवनाचा व सेवाकार्याचा सविस्तर अहवाल लिहिला