व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही”

“तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही”

देवाच्या जवळ या

“तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही”

प्रेषितांची कृत्ये १७:२४-२७

या विशाल विश्‍वाच्या तुलनेत मानव अगदी क्षुद्र आहे. कदाचित तुमच्या मनात अशा प्रश्‍न येईल: ‘क्षुद्र मानवाला सर्वसमर्थ देवाबरोबर घनिष्ठ नाते जोडणे शक्य आहे का?’ होय, शक्य आहे. ज्याचे नाव यहोवा आहे त्या देवाची इच्छा असेल तर हे शक्य आहे. देवाची तशी इच्छा आहे का? प्रेषित पौलाने अथेन्समधील विद्वानांशी बोलताना वापरलेल्या वजनदार शब्दांतून आपल्याला या प्रश्‍नाचे सांत्वनदायक उत्तर मिळू शकते. हा अहवाल आपल्याला प्रेषितांची कृत्ये १७:२४-२७ वचनांमध्ये वाचायला मिळतो. या अहवालात पौलाने यहोवाविषयी चार गोष्टी सांगितल्या आहेत. पाहूयात त्या कोणकोणत्या आहेत.

पहिली गोष्ट. पौलाने म्हटले, की “देवाने जग व त्यांतले अवघे निर्माण केले.” (वचन २४) आपले जीवन आनंददायी बनवणारे सौंदर्य आणि वैविध्य यांतून, आपल्या निर्माणकर्त्याच्या विचारीपणाचा व प्रेमाचा प्रत्यय येतो. (रोमकर १:२०) असा विचारी व प्रेमळ देव स्वतःला अलिप्त ठेवतो, हा विचार करणे मूर्खपणाचे ठरेल.

दुसरी गोष्ट. यहोवा ‘सर्वांना जीवन, प्राण व सर्व काही देतो.’ (वचन २५) यहोवामुळे जीवन टिकून राहिले आहे. (स्तोत्र ३६:९) जीवनाकरता आवश्‍यक असलेली हवा, पाणी व अन्‍न, या सर्व गोष्टी आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याकडून आपल्याला मिळालेल्या देणग्या आहेत. (याकोब १:१७) अशाप्रकारचा उदार देव स्वतःला अलिप्त ठेवतो, त्याच्याविषयी जाणून घेण्याचे व त्याच्याजवळ येण्याचे वरदान आपल्याला मिळू देत नाही, हे सगळे विचार तर्काला न पटणारे आहेत, नाही का?

तिसरी गोष्ट. यहोवा देवाने “एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण” केली. (वचन २६) यहोवा निःपक्ष देव आहे. त्याच्या मनात कसलाही दुजाभाव नाही. (प्रेषितांची कृत्ये १०:३४) आणि तो दुजाभाव दाखवेल तरी कसा? कारण त्यानेच तर त्या ‘एकाला’ अर्थात आदामाला बनवले ज्याच्यापासून सर्व राष्ट्रे व सर्व वंश आले आहेत. “सर्व माणसांचे तारण व्हावे,” अशी देवाची इच्छा आहे. (१ तीमथ्य २:४) यास्तव, आपल्या कातडीचा रंग कोणताही असला तरी, आपण कोणत्याही राष्ट्राचे किंवा वंशाचे असलो, तरी आपल्या सर्वांना त्याच्याजवळ येण्याची संधी आहे.

चौथी व शेवटली गोष्ट. पौल देवाविषयी सर्वात दिलासादायक सत्य व्यक्‍त करतो: “तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.” (वचन २७) यहोवा अतिशय महान व श्रेष्ठ असला तरी, जे त्याच्या जवळ येऊ इच्छितात त्यांच्यापासून तो दूर नाही. त्याचे वचन आपल्याला असा दिलासा देते, की तो दूर नव्हे तर “जे कोणी त्याचा धावा करितात, . . . त्या सर्वांना परमेश्‍वर जवळ आहे.”—स्तोत्र १४५:१८.

पौलाच्या शब्दांवरून हे स्पष्ट झाले, की आपण देवाच्या जवळ यावे, अशी देवाचीच इच्छा आहे. परंतु, तो फक्‍त अशा लोकांनाच त्याच्या जवळ येऊ देतो जे त्याचा “शोध” करण्यास व त्याला ‘चाचपडून प्राप्त’ करण्यास तयार आहेत, असेही पौलाने म्हटले. (वचन २७) वर उल्लेखण्यात आलेल्या “दोन्ही क्रियापदांचा अर्थ, साध्य करण्याजोगी शक्यता . . . किंवा पूर्ण होण्याजोगी इच्छा, असा होतो,” असे बायबल भाषांतरकारांसाठी असलेल्या एका संदर्भ ग्रंथात म्हटले होते. जसे की, तुम्ही घरात असताना लाईट जाते. अंधारात तुम्ही लाईटचे बटण किंवा दरवाजा चाचपडता. तुम्हाला लाईटचे बटण किंवा दरवाजा नक्की सापडेल, अशी तुमची खात्री असते. तसेच, आपणही जर पूर्ण मनाने देवाचा शोध केला, त्याला चाचपडत राहिलो तर तो आपल्याला नक्की सापडेल अर्थात “प्राप्त” होईल, अशी पौल आपल्याला हमी देतो.—वचन २७.

देवाच्या जवळ येण्याची तुमची मनापासून इच्छा आहे का? तुम्ही जर विश्‍वासाने “देवाचा शोध” केलात आणि “चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून” घेण्याचा प्रयत्न केलात तर तो तुम्हाला नक्की सापडेल; तुम्ही निराश होणार नाही. यहोवाला शोधणे कठीण नाही. कारण, तो “कोणापासूनहि दूर नाही.” (w०८ ७/१)