व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“पाहा मी प्रभूची दासी!”

“पाहा मी प्रभूची दासी!”

त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा

“पाहा मी प्रभूची दासी!”

एक अनोळखी पाहुणा अचानक मरीयेच्या घरात आला. डोळे विस्फारून ती त्याच्याकडे बघतच राहिली. तो तिच्या आईवडिलांना भेटण्यासाठी आला नव्हता, तर तिलाच भेटायला आला होता! तो नासरेथचा नाही, याची तिला खात्री होती. कारण, नासरेथ सारख्या लहान नगरात, अनोळखी माणसांना ओळखणे कठीण नव्हते. तो पाहुणा निराळाच होता. हजारो लोकांतून त्याला पटकन ओळखता आले असते. त्याने तिला अभिवादन करत असे म्हटले: “हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो; प्रभु तुझ्याबरोबर असो.” (लूक १:२८) अशा प्रकारचे अभिवादन तिच्यासाठी नवीनच होते. कारण, याआधी कोणीही तिला अशा प्रकारे अभिवादन केले नव्हते.

अशा प्रकारे, बायबल आपल्याला गालीलातील नासरेथ नगरात राहणाऱ्‍या एलीची मुलगी मरीया हीची ओळख करून देते. आपल्याला तिची ओळख अशा वेळी होते, जेव्हा तिला जीवनात अतिशय महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार होते. तिचे लग्न योसेफ नावाच्या एका सुताराशी ठरले होते. योसेफ जरी श्रीमंत नसला, तरी तो देवाचा एक विश्‍वासू सेवक होता. त्यामुळे, लग्नानंतर तिचे जीवन कसे असेल याची तिला जाणीव होती. तिचे जीवन अगदी साधे असणार होते. एक कर्तव्यदक्ष पत्नी या नात्याने योसेफाला मदत करणे आणि आपले कुटुंब वाढवणे. पण, आज अचानक तिच्याकडे हा पाहुणा आला आणि देवाने तिला एका खास कामगिरीकरता निवडल्याचा संदेश त्याने तिला दिला. ही जबाबदारी स्वीकारल्यास तिचे जीवन पार बदलून जाणार होते.

बायबलमध्ये मरीयेबद्दल जास्त माहिती दिलेली नाही हे जाणून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. तिच्या कुटुंबाबद्दल व तिच्या संगोपनाबद्दल बायबलमध्ये खूप कमी माहिती दिलेली आहे. तिच्या व्यक्‍तिमत्वाबद्दल तर त्याहूनही कमी माहिती आहे. आणि ती दिसायला कशी होती याबद्दल तर बायबलमध्ये काहीच सांगितलेले नाही. तरीसुद्धा, तिच्याविषयी देवाचे वचन जे काही सांगते त्यातून आपण बरेच काही शिकू शकतो.

ख्रिस्ती धर्मजगतातील वेगवेगळ्या धार्मिक गटांत मरीयेविषयी अनेक धारणा प्रचलित आहेत. पण, मरीयेला जवळून ओळखण्यासाठी, आपण त्या धारणांच्या पलीकडे पाहिले पाहिजे. म्हणून, आपण येथे तिच्या चित्रांवर, तिच्या संगमरवरी मूर्तींवर चर्चा करणार नाही. आणि तसेच, ज्या धर्मसिद्धांतांनी किंवा मतप्रणाल्यांनी या नम्र स्त्रीला “देवमाता” आणि “स्वर्गाची राणी” अशा भव्य पदव्या प्रदान केल्या आहेत, त्यांच्यावरही आपण चर्चा करणार नाही. त्याऐवजी, बायबलमध्ये तिच्याविषयी खरोखर काय सांगितले आहे यावर आपण आपले लक्ष केंद्रित करणार आहोत. बायबलमधून आपण तिच्या विश्‍वासाबद्दल आणि तिच्या विश्‍वासाचे आपल्याला कशा प्रकारे अनुकरण करता येईल याबद्दल शिकू शकतो.

एक देवदूत भेटायला येतो

मरीयेला भेटायला आलेला पाहुणा कोणी मनुष्य नव्हता हे कदाचित तुम्हाला माहितच असेल. तो पाहुणा देवदूत गब्रीएल होता. जेव्हा त्याने तिला “कृपा पावलेल्या स्त्रिये” असे म्हटले तेव्हा त्याच्या शब्दांमुळे तिच्या “मनात खळबळ उडाली,” आणि ती या अनोख्या अभिवादनाबद्दल विचार करू लागली. (लूक १:२८, २९) कोणाकडून कृपा पावलेली? माणसांकडून तिला कृपा प्राप्त होईल, अशी तिने कधीही अपेक्षा केली नव्हती. पण, देवदूत येथे यहोवा देवाच्या कृपेबद्दल बोलत होता. देवाकडून कृपा प्राप्त करण्यापेक्षा मरीयेसाठी आणखी काय महत्त्वाचे होते! पण, आपण आधीपासूनच देवाच्या कृपेस पात्र आहोत असे गर्विष्ठपणे तिने गृहीत धरले नाही. आपणही, आधीपासूनच देवाच्या कृपेस पात्र आहोत, असा अभिमान कधीही बाळगू नये. त्याऐवजी, देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. असे केल्यास, आपल्याला एक असा महत्त्वाचा धडा शिकता येईल ज्याची तरुण मरीयेला आधीपासूनच जाणीव होती. तो असा की देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र व लीन जणांवर प्रेम करतो आणि त्यांना साहाय्य करतो.—याकोब ४:६.

मरीयेने नम्र असणे आवश्‍यकच होते, कारण तिने कधी कल्पनाही केली नसेल असा एक खास विशेषाधिकार देवदूत तिला देऊ करत होता. देवदूताने तिला सांगितले की तिने एका मुलाला जन्माला घालायचे होते, जो मानवांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार होता. गब्रीएलाने म्हटले: “प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्‍याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (लूक १:३२, ३३) देवाने दाविदाला वचन दिले होते की त्याचा एक वंशज सदासर्वदा राज्य करेल. हजारपेक्षा जास्त वर्षांपूर्वी दिलेल्या या वचनाबद्दल मरीयेला नक्कीच माहीत होते. (२ शमुवेल ७:१२, १३) त्याअर्थी, देवाचे लोक ज्याची शतकानुशतके आतुरतेने वाट पाहत होते, तो मशीहा तिचाच पुत्र असणार होता!

एवढेच नाही तर, देवदूताने तिला सांगितले की तिच्या मुलाला “परात्पराचा पुत्र म्हणतील.” पण, एका मानवी स्त्रीने देवाच्या पुत्राला जन्म देणे हे कसे शक्य होते? किंबहुना, मरियेला मूल होणे तरी कसे शक्य होते? कारण, योसेफाशी तिचे लग्न ठरले असले तरी अजून त्यांचे लग्न झाले नव्हते. म्हणून मरीयेने बेधडकपणे देवदूताला हा प्रश्‍न विचारला: “हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही.” (लूक १:३४) तिचे कौमार्य अजूनही टिकून आहे, याबद्दल ती न लाजता बोलली याकडे लक्ष द्या. उलट, तिला आपल्या कौमार्याचा अभिमान होता. आज अनेक तरुण-तरुणी आपले कौमार्य गमावण्यास उत्सुक असतात. आणि जे आपले कौमार्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांची ते टिंगल करतात. निश्‍चितच, हे जग पार बदलून गेले आहे. पण, यहोवा बदललेला नाही. (मलाखी ३:६) मरीयेच्या दिवसांप्रमाणेच आजही जे लोक त्याच्या नैतिक स्तरांना जडून राहतात ते त्याच्या नजरेत मौल्यवान आहेत.—इब्री लोकांस १३:४.

जरी मरीया देवाच्या विश्‍वासू सेवकांपैकी असली, तरी मानव या नात्याने ती अपरिपूर्णच होती. तर मग, ती देवाच्या पुत्राला, म्हणजेच एका परिपूर्ण संतानाला कशी जन्म देऊ शकत होती? गब्रीएलाने असा खुलासा केला: “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; ह्‍या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.” (लूक १:३५) पवित्र म्हणजे, “स्वच्छ,” “निर्मळ,” व “शुद्ध.” सामान्यतः मानवांना अशुद्धता व अपरिपूर्णता आईवडिलांकडून वारशाने मिळते. पण या घटनेत मात्र, यहोवा एक अद्‌भुत चमत्कार करणार होता. तो आपल्या मुलाचे जीवन स्वर्गातून मरीयेच्या उदरात स्थलांतरित करणार होता. आणि नंतर आपल्या सक्रिय शक्‍तीद्वारे म्हणजेच पवित्र आत्म्याद्वारे मरीयेवर “छाया” करून जन्माला येणाऱ्‍या मुलाचे सर्व प्रकारच्या अपरिपूर्णतेपासून संरक्षण करणार होता. मरीयेने देवदूताच्या वचनावर विश्‍वास ठेवला का? तिची प्रतिक्रिया काय होती?

मरीयेची प्रतिक्रिया

एक कुमारिका पुत्राला जन्म देऊ शकते यावर विश्‍वास ठेवणे संशयवाद्यांना आणि काही ख्रिस्ती धर्मशास्र्यांना कठीण वाटते. एवढी विद्वत्ता असूनही, त्यांना एक साधेसे सत्य समजत नाही. गब्रीएलाने म्हटल्याप्रमाणे ते सत्य असे की, “देवाला काहीच अशक्य होणार नाही.” (लूक १:३७) मरीयेचा देवावर पक्का विश्‍वास होता, त्यामुळे तिने गब्रीएलाने सांगितलेल्या गोष्टी खऱ्‍या मानल्या. तरीसुद्धा, ती अंधविश्‍वासी नव्हती. एक विचारशील व्यक्‍ती असल्याने, या गोष्टीवर विश्‍वास ठेवण्यासाठी तिलाही पुराव्याची गरज होती. तिचा विश्‍वास वाढवण्यासाठी गब्रीएल देवदूताजवळ असा पुरावा होता. त्याने तिची नातेवाईक असलेल्या व वंध्य असलेल्या अलीशिबा नावाच्या एका वयस्क स्त्रीबद्दल सांगितले. देवाने या स्त्रीला म्हातारपणी गर्भधारणा होणे चमत्कारिक रीत्या शक्य केले होते!

आता मरीया काय करणार? तिच्यासमोर देवाकडून मिळालेली जबाबदारी होती, आणि गब्रीएलाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्‍या ठरणार हा पुरावाही होता. हा विशेषाधिकार मिळाल्यामुळे तिला कशाचीच भीती वाटली नसेल किंवा तिच्यासमोर कोणत्याच अडचणी आल्या नसतील असे आपण समजू नये. पहिली गोष्ट म्हणजे, योसेफाशी ठरलेल्या लग्नाबद्दल तिला विचार करावा लागणार होता. योसेफाला तिच्या गरोदरपणाविषयी कळेल तेव्हा तो तिच्याशी लग्न करेल का? दुसरी गोष्ट म्हणजे, तिला मिळालेली जबाबदारीही काही सोपी नव्हती. तिला देवाच्या निर्मितीकृत्यांपैकी सर्वात अनमोल असलेल्या व्यक्‍तीला अर्थात देवाच्या प्रिय पुत्राला आपल्या उदरात जपायचे होते. तो एक असहाय बालक असताना त्याची काळजी घ्यायची होती व दुष्ट जगापासून त्याचे संरक्षण करायचे होते. खरेच, ही खूप मोठी जबाबदारी होती.

बायबलमधून आपल्याला दिसते की मजबूत विश्‍वास असलेले देवाचे सेवकही काही वेळा त्याच्याकडून आव्हानात्मक जबाबदाऱ्‍या स्वीकारण्यास लगेच तयार झाले नाहीत. मोशेने, आपल्याला चांगल्या प्रकारे बोलता येत नाही असे कारण सांगून देवाचा प्रतिनिधी या नात्याने कार्य करण्यास नकार दिला. (निर्गम ४:१०) यिर्मयानेही, मी “केवळ बाळ” आहे असे म्हणून देवाकडून जबाबदारी स्वीकारण्यास नाकारले. (यिर्मया १:६) आणि योना तर आपली जबाबदारी पार पाडण्याऐवजी पळून गेला. (योना १:३) मरीयेबद्दल काय?

आज इतकी शतके उलटून गेल्यावरही, जेव्हा आपण मरीयेने गब्रीएलाला दिलेले उत्तर वाचतो, तेव्हा तिच्या शब्दांतून तिची नम्र व आज्ञाधारक प्रवृत्ती दिसून येते. ती म्हणाली: “पाहा मी प्रभूची दासी! आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.” (लूक १:३८) दासींना त्याकाळी सेवकांपैकी सर्वात कमी महत्त्वाचे मानले जायचे; त्यांचे जगणे-मरणे सर्वस्वी मालकाच्या मर्जीवर अवलंबून होते. यहोवा देव हा आपला मालक आहे असे मरीयेने मानले. तो आपली काळजी घेण्यास समर्थ आहे हे तिला माहीत होते. जे एकनिष्ठपणे त्याची सेवा करतात त्यांना तो कधीही सोडत नाही आणि ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याचा जर तिने मनःपूर्वक प्रयत्न केला तर तो तिला अनेक आशीर्वाद देईल हेही तिला माहीत होते.—स्तोत्र १८:२५.

देव आपल्यावर जी जबाबदारी सोपवतो ती आपल्याला कदाचित कठीण, कधीकधी तर अशक्यही वाटू शकते. पण, मरीयेप्रमाणे आपणही देवावर पूर्ण भरवसा ठेवून, स्वतःला त्याच्या हातात सोपवून देणे का योग्य आहे याची अनेक कारणे देवाच्या वचनात आपल्याला सापडतात. (नीतिसूत्रे ३:५, ६) याबाबतीत आपण मरीयेचे अनुकरण करणार का? जर केले, तर देव आपल्याला याचे प्रतिफळ देईल आणि अशा रीतीने आपला त्याच्यावरील विश्‍वास आणखीनच मजबूत होईल.

मरीया अलीशिबेला भेटते

गब्रीएलाने अलीशिबेबद्दल दिलेली माहिती मरीयेकरता अतिशय महत्त्वाची होती. कारण या क्षणी तिची परिस्थिती समजून घेऊ शकेल अशी फक्‍त अलीशिबाच होती. म्हणून, मरीया लगबगीने यहूदाच्या डोंगराळ भागात राहणाऱ्‍या अलीशिबेकडे जायला निघाली. हा तीन-चार दिवसांचा प्रवास होता. जेव्हा तिने अलीशिबा व याजक जखऱ्‍या यांच्या घरात पाऊल ठेवले तेव्हा यहोवाने तिच्या विश्‍वासाला पुष्टी देऊ शकेल असा आणखी एक पुरावा तिला दिला. मरीयेचे अभिवादन ऐकताच अलीशिबेच्या उदरातील बाळाने उल्हासाने उडी मारली. अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि तिने मरीयेला ‘माझ्या प्रभुची माता’ म्हणून संबोधले. मरीयेचा पुत्र, तिचा प्रभु म्हणजेच मशीहा होईल असे देवानेच अलीशिबेला प्रकट केले होते. देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन तिने मरीयेच्या विश्‍वासाची व आज्ञाधारकतेची प्रशंसा करून म्हटले: “जिने विश्‍वास ठेविला ती धन्य.” (लूक १:३९-४५) होय, यहोवाने मरीयेला वचन दिलेला प्रत्येक शब्द खरा ठरणार होता!

यानंतर मरीया बोलली. तिचे शब्द लूक १:४६-५५ येथे जतन करून ठेवण्यात आले आहेत. बायबलमध्ये नमूद असलेले हे मरीयेचे सर्वात दीर्घ कथन आहे आणि त्यातून तिच्याबद्दल बरीच माहिती मिळते. यहोवाने तिला मशीहाची आई होण्याचा सन्मान दिल्याबद्दल तिने त्याची स्तुती केली. तिच्या शब्दांवरून तिची उपकारशील व कृतज्ञ मनोवृत्ती दिसून येते. यहोवा गर्विष्ठ व सामर्थी लोकांना धुळीस मिळवतो, पण त्याची सेवा करू इच्छिणाऱ्‍या दीनदुबळ्यांचे साहाय्य करतो असे तिने म्हटले. यावरून तिला यहोवावर किती गाढ विश्‍वास होता हे दिसून येते. तिच्या शब्दांतून तिच्या ज्ञानाचीही प्रचिती येते. एका अंदाजानुसार तिने इब्री शास्त्रवचनांचा जवळजवळ २० वेळा उल्लेख केला!

देवाच्या वचनावर मरीया ध्यानपूर्वक मनन करत होती हे तर उघडच आहे. पण असे असूनही तिने नम्र मनोवृत्ती राखली. स्वतःच्या मनाप्रमाणे बोलण्याऐवजी तिने आपल्या शब्दांना शास्त्रवचनांचा आधार दिला. तिच्या उदरात वाढत असलेल्या तिच्या पुत्रानेही नंतर अशीच मनोवृत्ती दाखवली. त्याने म्हटले: “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.” (योहान ७:१६) आपणही स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘देवाच्या वचनाबद्दल मीही अशाच प्रकारे आदर व सन्मान व्यक्‍त करतो का? की माझे स्वतःचे विचार व माझी मते मला जास्त महत्त्वाची वाटतात?’ याबाबतीत मरीयेची मनोवृत्ती अनुकरण करण्याजोगी आहे.

मरीया तीन महिने अलीशिबेकडेच राहिली. या काळात त्या दोघींनी नक्कीच एकमेकींना खूप प्रोत्साहन दिले असेल. (लूक १:५६) या दोन्ही स्त्रियांच्या उदाहरणावरून आपल्याला मैत्रीचे महत्त्व पटते. जर आपण यहोवा देवावर मनापासून प्रेम करणाऱ्‍या व्यक्‍तींशी मैत्री केली तर नक्कीच यामुळे आपले देवाविषयीचे ज्ञान वाढेल व आपण त्याच्या आणखी जवळ येऊ. (नीतिसूत्रे १३:२०) शेवटी, मरीयेची आपल्या घरी परतण्याची वेळ आली. आता प्रश्‍न हा होता की योसेफाला सगळी हकीकत समजेल तेव्हा तो काय करेल?

मरीया व योसेफ

ती गरोदर असल्याचे सर्वांना कळेपर्यंत मरीया थांबून राहिली नाही. तिने नक्कीच योसेफाला सगळी हकीकत सांगितली असेल. या देव-भीरू, भल्या माणसाची प्रतिक्रिया काय असेल, असा कदाचित आधी तिच्या मनात विचार आला असावा. काहीही असो, ती त्याच्याकडे गेली व त्याला घडलेले सर्व काही सांगितले. योसेफ हे ऐकून किती अस्वस्थ झाला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. एकीकडे मरीयेवर त्याचे प्रेम असल्यामुळे ती जे काही सांगत होती त्यावर त्याला विश्‍वास ठेवावासा वाटत होता. पण ती जे सांगत होती तसे यापूर्वी कधीच घडले नव्हते. योसेफाच्या मनात नेमके कोणते विचार त्यावेळी आले किंवा त्याने कशा प्रकारे तर्क केला याविषयी बायबलमध्ये काहीही सांगितलेले नाही. पण हे मात्र सांगितले आहे, की त्याने तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. कारण त्याकाळी लग्न ठरलेल्या जोडप्याला विवाहितांप्रमाणेच लेखले जायचे. मरीयेची चारचौघांत बदनामी होऊ नये किंवा तिला शिक्षा दिली जाऊ नये म्हणून त्याने तिला गुप्तपणे घटस्फोट देण्याचे ठरवले. (मत्तय १:१८, १९) अनपेक्षितपणे निर्माण झालेल्या या विचित्र परिस्थितीमुळे योसेफाला किती यातना होत आहेत हे पाहून मरीयेलाही खूप दुःख झाले असेल. पण, तिच्या मनात योसेफाविषयी कटू भावना मात्र आल्या नाहीत.

योसेफाला या समस्येवर जो मार्ग सर्वात योग्य वाटला त्यानुसार यहोवाने त्याला करू दिले नाही. एका देवदूताने योसेफाला स्वप्नात येऊन सांगितले की मरीयेला खरोखरच चमत्कारामुळे दिवस राहिले आहेत. हे ऐकून योसेफाला किती हायसे वाटले असेल! मरीयेने जे अगदी सुरुवातीपासूनच केले होते, ते आता योसेफानेही केले—त्याने यहोवाने सांगितल्यानुसार पावले उचलली. त्याने मरीयेशी लग्न केले आणि यहोवाच्या पुत्राचे पालनपोषण करण्याची विशेष जबाबदारी पार पाडण्याची तो तयारी करू लागला.—मत्तय १:२०-२४.

जे विवाहित आहेत, तसेच जे विवाह करण्याच्या विचारात आहेत त्यांना, २,००० वर्षांपूर्वीच्या या तरुण जोडप्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. योसेफाने जेव्हा आपल्या तरुण पत्नीला मातृत्वाच्या जबाबदाऱ्‍या पार पाडताना पाहिले असेल, तेव्हा यहोवाच्या दूताने दिलेल्या मार्गदर्शनानुसार आपण वागलो याबद्दल त्याला नक्कीच समाधान वाटले असेल. महत्त्वाचे निर्णय घेताना यहोवावर विसंबून राहणे किती गरजेचे आहे याचीही योसेफाला खात्री पटली असेल. (स्तोत्र ३७:५; नीतिसूत्रे १८:१३) पुढेही त्याने कुटुंबप्रमुख या नात्याने काळजीपूर्वक व दयाळूपणे निर्णय घेतले असतील यात शंका नाही.

दुसरीकडे, मरीया योसेफाशी लग्न करण्यास तयार झाली यावरून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो? योसेफाने जरी तिच्या सांगण्यावर लगेच विश्‍वास ठेवला नाही, तरीसुद्धा भविष्यात हा आपला कुटुंबप्रमुख असेल या जाणिवेने तिने निर्णय त्याच्यावर सोडला. या घटनेतून मरीयेला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला आणि आजही ख्रिस्ती स्त्रियांकरता हा एक शिकण्यासारखा धडा आहे. या सर्व घटनांमुळे योसेफ व मरीया या दोघांनाही आपसांत प्रामाणिकपणे व मोकळेपणाने संवाद करण्याविषयी बरेच काही शिकायला मिळाले असेल.

त्या तरुण जोडप्याने निश्‍चितच आपल्या वैवाहिक जीवनाकरता एक उत्तम पाया घातला. त्या दोघांचेही यहोवा देवावरच सर्वात जास्त प्रेम होते आणि जबाबदार व प्रेमळ पालक बनून यहोवाचे मन आनंदित करण्यास ते उत्सुक होते. अर्थात त्यांना त्यांच्या जीवनात याहून मोठे आशीर्वाद मिळणार होते, तसेच याहून मोठ्या आव्हानांनाही त्यांना तोंड द्यावे लागणार होते. जो इतिहासातील सर्वश्रेष्ठ मनुष्य बनणार होता त्या येशूचे पालक होण्याचे आनंदी भवितव्य त्यांच्यापुढे होते. (w०८ ७/१)