व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या विवाहाची “तीनपदरी दोरी” जपा

तुमच्या विवाहाची “तीनपदरी दोरी” जपा

तुमच्या विवाहाची “तीनपदरी दोरी” जपा

“तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही.”—उप. ४:१२.

१. पहिल्या मानवी जोडप्याला विवाहबंधनात कोणी जोडले?

वनस्पती, झाडेझुडपे व पशूपक्षी निर्माण केल्यानंतर यहोवा देवाने पहिला मनुष्य आदाम याची सृष्टी केली. काही काळानंतर, आदामाला गाढ झोप लागेल असे देवाने केले आणि मग त्याच्या एका फासळीपासून त्याच्याकरता एक अनुरूप साहाय्यक, म्हणजेच स्त्री निर्माण केली. तिला पाहून आदाम म्हणाला: “आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे.” (उत्प. १:२७; २:१८, २१-२३) स्त्रीला निर्माण केल्याचे यहोवाला समाधान वाटले आणि त्याने पहिल्या मानवी जोडप्याला विवाहबंधनात जोडले व त्यांना आशीर्वाद दिला.—उत्प. १:२८; २:२४.

२. सैतानाने आदाम व हव्वा यांच्यात कशा प्रकारे फूट पाडली?

दुःखाची गोष्ट म्हणजे काही काळातच यहोवाने स्थापन केलेल्या विवाह संस्थेला धोका निर्माण झाला. तो कसा? सैतान म्हणण्यात आलेल्या एका दुष्ट आत्मिक प्राण्याने हव्वेला फसवले आणि यहोवाने या पहिल्या जोडप्याला ज्या एकमात्र झाडाचे फळ खाण्यास मनाई केली होती त्याचे फळ तिला खायला लावले. नंतर आदामानेही ते फळ खाल्ले. असे करण्याद्वारे खरे तर त्यांनी, देवाच्या त्यांच्यावर आधिपत्य करण्याच्या हक्काविरुद्ध व त्याच्या योग्य मार्गदर्शनाविरुद्ध बंड केले. (उत्प. ३:१-७) यहोवाने या जोडप्याला त्यांच्या या कृतीबद्दल जाब विचारला तेव्हा, त्यांचा आपसांतील नातेसंबंध आधीच बिघडला असल्याचे दिसून आले. कारण, आदामाने घडलेल्या प्रकारासाठी आपल्या पत्नीला दोषी ठरवून म्हटले: “जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.”—उत्प. ३:११-१३.

३. काही यहुद्यांमध्ये कोणता चुकीचा दृष्टिकोन निर्माण झाला होता?

तेव्हापासून आजपर्यंतच्या शेकडो वर्षांत, सैतानाने निरनिराळ्या धूर्त मार्गांनी विवाहित जोडप्यांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, धर्मपुढाऱ्‍यांच्या माध्यमाने त्याने विवाहासंबंधी बायबलशी सुसंगत नसलेले विचार व दृष्टिकोन पुढे आणले आहेत. काही यहुदी धर्मपुढारी देवाच्या नियमांकडे कानाडोळा करून, ‘जेवणात मीठ जास्त झाले’ यांसारख्या क्षुल्लक कारणांवरून पत्नीला घटस्फोट देण्याची विवाहित पुरुषांना परवानगी देत असत. पण येशूने मात्र स्पष्ट सांगितले: “जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करितो तो व्यभिचार करितो.”—मत्त. १९:९.

४. आज वैवाहिक बंधन कशा प्रकारे धोक्यात आले आहे?

आजही सैतान वैवाहिक बंधन उद्ध्‌वस्त करण्याच्या प्रयत्नात आहे. आज समाजात समलिंगी विवाहांना मान्यता दिली जात आहे. विवाह न करता जोडपी एकत्र राहत आहेत. आणि घटस्फोट मिळणे सहज शक्य झाले आहे. या सर्व गोष्टींवरून हेच सिद्ध होते की सैतानाच्या प्रयत्नांना बऱ्‍यापैकी यश आले आहे. (इब्री लोकांस १३:४ वाचा.) मग विवाहासंबंधी जगात प्रचलित असलेल्या अशा विकृत दृष्टिकोनाचा आपल्या विचारांवर प्रभाव पडू नये म्हणून ख्रिस्ती या नात्याने आपण काय करू शकतो? यासाठी, आपण आनंदी व यशस्वी वैवाहिक जीवनाची काही वैशिष्ट्ये विचारात घेऊ या.

आपल्या वैवाहिक जीवनात यहोवाला स्थान द्या

५. “तीनपदरी दोरी” या संज्ञेचा विवाहाच्या संदर्भात काय अर्थ आहे?

वैवाहिक जीवन आनंदी व यशस्वी होण्याकरता पतीपत्नीच्या नातेसंबंधात यहोवाला स्थान देणे अत्यंत गरजेचे आहे. देवाचे वचन म्हणते: “तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही.” (उप. ४:१२) “तीनपदरी दोरी” ही एक अलंकारिक संज्ञा आहे. हे रूपक विवाहास लागू केल्यास, पती व पत्नी या दोरीतील दोन धागे असून, ते एका तिसऱ्‍या धाग्याने एकमेकांशी गुंफलेले आहेत असे म्हणता येईल. हा तिसरा धागा म्हणजे यहोवा देव. वैवाहिक बंधनात यहोवा देवाला स्थान दिल्यामुळे पतीपत्नीला निरनिराळ्या समस्यांना तोंड देणे शक्य होते आणि वैवाहिक जीवनात आनंदी होण्याची खरे तर हीच गुरुकिल्ली आहे.

६, ७. (क) आपल्या विवाहात आपण देवाला स्थान देत आहोत की नाही याची खात्री विवाहित जोडपी कशी करू शकतात? (ख) एका बहिणीला तिच्या पतीबद्दल मनापासून आदर का वाटतो?

पण, आपला विवाह हा एका तीनपदरी दोरीसारखा आहे की नाही याची खात्री विवाहित जोडपी कशी करू शकतात? स्तोत्रकर्त्या दाविदाने एका गीतात असे म्हटले: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” (स्तो. ४०:८) देवाबद्दल वाटणारे प्रेम आपल्याला दाविदाप्रमाणेच त्याची मनोभावे सेवा करण्याची प्रेरणा देते. म्हणूनच, पती व पत्नी दोघांनीही यहोवासोबत घनिष्ट नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि यहोवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात त्यांनी आनंद मानला पाहिजे. तसेच, दोघांनीही आपल्या जोडीदाराचे यहोवा देवावर असलेले प्रेम वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.—नीति. २७:१७.

देवाचे नियम खरोखर आपल्या अंतर्यामी असल्यास विश्‍वास, आशा व प्रेम यांसारखे गुण आपल्या वागणुकीतून दिसून येतील आणि यामुळे विवाह बंधन आणखी बळकट होण्यास हातभार लागेल. (१ करिंथ. १३:१३) विवाहाला ५० वर्षे झालेली सॅन्ड्रा नावाची एक ख्रिस्ती बहीण म्हणते: “माझे पती नेहमी मला बायबलच्या आधारावर सल्ला देतात. तसेच त्यांचे माझ्याहीपेक्षा यहोवावर नितांत प्रेम आहे. याच गोष्टींमुळे मला त्यांचा मनापासून आदर वाटतो.” पतींनो, तुमच्याविषयीही असेच म्हणता येईल का?

८. विवाहात “चांगले फळ” मिळवण्याकरता कशाची गरज आहे?

पतीपत्नी या नात्याने तुम्ही आपल्या जीवनात देवासोबतच्या तुमच्या नातेसंबधाला आणि त्याच्या उपासनेशी संबंधित असलेल्या कार्यांना इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व देता का? तसेच, तुमचा विवाह जोडीदार हा यहोवाच्या सेवेतही तुमचा साथीदार आहे असा दृष्टिकोन तुम्ही खरोखर बाळगता का? (उत्प. २:२४) बुद्धिमान शलमोन राजाने असे लिहिले: “एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते.” (उप. ४:९) या वचनात सांगितल्याप्रमाणे, पती व पत्नीने “चांगले फळ” मिळवण्यासाठी, अर्थात ज्यावर देवाचा आशीर्वाद असेल असे प्रेममय व कायम टिकणारे विवाहबंधन निर्माण करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत.

९. (क) पतींवर कोणत्या जबाबदाऱ्‍या आहेत? (ख) कलस्सैकर ३:१९ या वचनानुसार पतीने आपल्या पत्नीशी कसे वागले पाहिजे?

एखादे जोडपे विवाहात देवाला स्थान देत आहे किंवा नाही हे, त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा ते दोघेही कितपत प्रयत्न करतात यावरून दिसून येते. कुटुंबाच्या भौतिक तसेच आध्यात्मिक गरजा पुरवण्याची जबाबदारी प्रामुख्याने पतींवर आहे. (१ तीम. ५:८) तसेच, आपल्या पत्नीच्या भावनांचीही कदर करण्याचे प्रोत्साहन त्यांना दिले जाते. कलस्सैकर ३:१९ यात आपण असे वाचतो: “पतींनो, तुम्ही आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका.” बायबलचा अभ्यास करणाऱ्‍या एका विद्वानाने “निष्ठुरतेने वागू नका” असे भाषांतर केलेल्या वाक्यांशावर खुलासा करून म्हटले, की निष्ठुरतेने वागण्याचा अर्थ, पत्नीला “कटू शब्दांनी दुखावणे किंवा मारहाण करणे आणि प्रेम, काळजी, मूलभूत गरजा, संरक्षण व साहाय्य यांसारख्या पतीकडून पत्नीला मिळाल्या पाहिजेत अशा गोष्टी तिला न देणे.” ख्रिस्ती कुटुंबात पती अशा रीतीने वागल्यास निश्‍चितच ते योग्य ठरणार नाही. याउलट, पतीवर सोपवलेली मस्तकपदाची जबाबदारी तो प्रेमाने पार पाडतो, तेव्हा पत्नीला आपोआपच त्याच्या अधीन राहावेसे वाटते.

१०. ख्रिस्ती पत्नींनी कशा प्रकारची मनोवृत्ती बाळगली पाहिजे?

१० आपल्या विवाहात यहोवाला स्थान देऊ इच्छिणाऱ्‍या ख्रिस्ती पत्नींनीही देवाच्या काही अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. प्रेषित पौलाने लिहिले: “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पति पत्नीचे मस्तक आहे.” (इफिस. ५:२२, २३) सैतानाने हव्वेला फसवून ही खोटी कल्पना पुढे आणली की देवाचा अधिकार झुगारून स्वतंत्रपणे वागल्यास मनुष्याचे जीवन आनंदी होईल. आज अशी स्वतंत्र वृत्ती बऱ्‍याच विवाहांत दिसून येते. पण देवाच्या दृष्टिकोनाने विचार करणाऱ्‍या स्त्रियांना मात्र, आपल्या प्रेमळ पतीच्या अधीन राहणे त्रासदायक वाटत नाही. त्या नेहमी हे आठवणीत ठेवतात की यहोवाने हव्वेला तिच्या पतीची “साहाय्यक” नेमले होते, त्याअर्थी देवाच्या नजरेत तिची भूमिका नक्कीच आदरणीय होती. (उत्प. २:१८) देवाने लावून दिलेल्या या व्यवस्थेला जी ख्रिस्ती पत्नी आनंदाने सहकार्य देते ती खरोखर आपल्या पतीचा “मुकुट” ठरते.—नीति. १२:४.

११. एका बांधवाने आपल्या यशस्वी वैवाहिक जीवनाला कोणत्या गोष्टीने हातभार लावला असल्याचे सांगितले?

११ विवाहात देवाला स्थान देण्यास साहाय्य करू शकेल अशी आणखी एक गोष्ट म्हणजे देवाच्या वचनाचा सोबत मिळून अभ्यास करणे. जेरल्ड यांनी ५५ वर्षे सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेतला आहे. ते सांगतात: “यशस्वी वैवाहिक जीवनाकरता सर्वात आवश्‍यक जर काही असेल तर ते म्हणजे दोघांनी मिळून बायबल वाचणे व त्याचा अभ्यास करणे.” ते पुढे म्हणतात: “सोबत मिळून निरनिराळ्या गोष्टी करणे, विशेषतः आध्यात्मिक कार्यांत एकत्र सहभागी होणे महत्त्वाचे आहे. यामुळे विवाह जोडीदार एकमेकांच्या आणि यहोवाच्याही आणखी जवळ येतात.” बायबलचा सोबत मिळून अभ्यास केल्याने कुटुंबातील सर्व जण यहोवाचे नियम व तत्त्वे सदैव डोळ्यांपुढे ठेवू शकतात. यामुळे यहोवासोबतचा त्यांचा नातेसंबंध घनिष्ट होतो आणि सतत सुधारणा व प्रगती करत राहणे शक्य होते.

१२, १३. (क) जोडप्याने सोबत मिळून प्रार्थना करणे इतके महत्त्वाचे का आहे? (ख) आणखी कोणत्या आध्यात्मिक कार्यांत सहभाग घेतल्यामुळे विवाहास बळकटी येईल?

१२ आनंदी विवाहित जोडपी सोबत मिळून प्रार्थना देखील करतात. पती जेव्हा प्रार्थनेत यहोवासमोर ‘मन मोकळे करतो,’ व खास त्यांची परिस्थिती लक्षात ठेवून यहोवाला विशिष्ट विनंत्या करतो तेव्हा साहजिकच त्यांचे वैवाहिक बंधन आणखी मजबूत होते. (स्तो. ६२:८) उदाहरणार्थ, पतीपत्नीत मतभेद होतात, तेव्हा दोघांनी मिळून सर्वसमर्थ देवाच्या मार्गदर्शनासाठी कळकळीची प्रार्थना केल्यास त्यांना आपले मतभेद दूर सारणे निश्‍चितच सोपे जाईल, नाही का? (मत्त. ६:१४, १५) देवाला प्रार्थना केल्यानंतर दोघांनीही एकमेकांना मदत करण्याचा, तसेच, ‘एकमेकांचे सहन करून आपसात क्षमा करण्याचा’ दृढनिश्‍चय केला पाहिजे. (कलस्सै. ३:१३) प्रार्थना करण्याद्वारे आपण यहोवावर विसंबून आहोत हे दिसून येते. राजा दाविदाने म्हटले: “सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात.” (स्तो. १४५:१५) ‘देव आपली काळजी घेतो’ या भरवशाने जेव्हा आपण त्याच्याकडे डोळे लावतो, म्हणजेच मार्गदर्शनाकरता त्याला प्रार्थना करतो, तेव्हा आपण अनावश्‍यक चिंतांनी ग्रस्त होत नाही.—१ पेत्र ५:७.

१३ यहोवाला आपल्या विवाहात स्थान देण्याचा आणखी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे दोघांनी मिळून मंडळीच्या सभांना उपस्थित राहणे व सेवाकार्यात सहभागी होणे. कुटुंबांमध्ये फूट पाडण्यासाठी सैतान आज जे ‘डावपेच’ उपयोगात आणतो त्यांवर कशी मात करता येईल हे विवाहित जोडप्यांना सभांतून शिकायला मिळते. (इफिस. ६:११) तसेच, सेवाकार्यात पती व पत्नीने एकत्र सहभाग घेतल्यास ते ‘स्थिर व अढळ व्हायला’ शिकतात.—१ करिंथ. १५:५८.

समस्या निर्माण होतात तेव्हा

१४. कोणत्या गोष्टींमुळे वैवाहिक जीवनातील ताणतणावांत भर पडू शकते?

१४ अर्थात, येथे दिलेले सल्ले नवीन नाहीत, आणि पहिल्यांदाच या गोष्टींचा उल्लेख केला जात आहे असेही नाही. पण तरीसुद्धा, आपल्या जोडीदारासोबत त्यांच्याविषयी मनमोकळेपणाने चर्चा करण्यास काय हरकत आहे? तुमच्या वैवाहिक जीवनात यांपैकी एखाद्या गोष्टीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे का हे तपासून पाहा. अर्थात, जे आपल्या विवाहात देवाला स्थान देतात त्यांनाही “हालअपेष्टा भोगाव्या लागतील” असे बायबल स्पष्टपणे सांगते. (१ करिंथ. ७:२८) मानवी अपरिपूर्णता, या अधार्मिक जगाचा कुप्रभाव व दियाबलाचे मोहपाश यांमुळे देवाच्या विश्‍वासू सेवकांनाही आपल्या वैवाहिक जीवनात समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. (२ करिंथ. २:११) पण या सर्व समस्यांना व त्यामुळे निर्माण होणाऱ्‍या तणावाला तोंड देण्यास यहोवा आपल्याला साहाय्य करतो. यहोवाच्या मदतीने आपण जीवनातील ताणतणावांवर नक्कीच मात करू शकतो. देवाचा विश्‍वासू सेवक ईयोब याने आपली गुरेढोरे, सेवक व मुलेही गमावली. तरीसुद्धा, बायबल त्याच्याविषयी असे म्हणते: “ह्‍या सर्व प्रसंगात ईयोबाच्या हातून पाप झाले नाही; व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही.”—ईयो. १:१३-२२.

१५. ताणतणावांमुळे कधीकधी एखादी व्यक्‍ती कशा प्रकारे वागण्याची शक्यता आहे आणि विवाह जोडीदार असे वागल्यास काय केले जाऊ शकते?

१५ पण ईयोबाच्या पत्नीने मात्र त्याला म्हटले: “तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहा काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा.” (ईयो. २:९) जीवनात दुःखद घटना घडतात किंवा कठीण प्रसंग येतात तेव्हा कधीकधी आपल्याला आपल्या भावनांवर ताबा राहत नाही आणि त्यामुळे आपण अविचारीपणे वागू शकतो. बुद्धिमान शलमोन म्हणतो, “जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो.” (उप. ७:७) तुमचा जोडीदार रागाच्या भरात नको ते बोलून गेल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा. जशास तसे वागणूक दिल्यास तुमच्यापैकी एक जण किंवा तुम्ही दोघेही आणखी काहीतरी बोलून बसाल आणि यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळेल. (स्तोत्र ३७:८ वाचा.) म्हणूनच, परिस्थितीमुळे वैतागून किंवा निराश होऊन तुमच्या जोडीदाराचे “बोलणे मर्यादेबाहेर” गेल्यास त्याकडे दुर्लक्ष करा.—ईयो. ६:३.

१६. (क) मत्तय ७:१-५ यातील येशूचे शब्द विवाहाच्या संदर्भात कसे लागू करता येतील? (ख) वैवाहिक जीवनात समजूतदार असणे अत्यंत महत्त्वाचे का आहे?

१६ विवाह जोडीदारांनी एकमेकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत. आपल्या जोडीदाराच्या काही विचित्र सवयी किंवा गुण पाहून, ‘मी याला/हिला बदलू शकेन’ असे दुसऱ्‍या जोडीदाराला कदाचित वाटू शकते. प्रेमाने व सहनशील मनोवृत्तीने तुम्हाला आपल्या जोडीदाराला व्यक्‍तिमत्त्वात सुधारणा करण्याकरता मदत करण्यात कदाचित यश येईलही. पण हे विसरू नका, की जो दुसऱ्‍यांच्या लहानसहान चुका दाखवतो त्याची तुलना येशूने एका अशा माणसाशी केली, ज्याला आपल्या भावाच्या डोळ्यांतील “कुसळ” तर दिसते, पण स्वतःच्या डोळ्यांतील “मुसळ” दिसत नाही. म्हणूनच, येशूने असा सल्ला दिला: “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका.” (मत्तय ७:१-५ वाचा.) अर्थात तुम्ही आपल्या जोडीदाराचे गंभीर दोषही पदरात घ्यावेत असा याचा अर्थ होत नाही. रॉबर्ट ज्यांच्या लग्नाला जवळजवळ ४० वर्षे झाली आहेत, ते म्हणतात: “एकमेकांना आपली मतं प्रामाणिकपणे व मनमोकळेपणाने सांगण्याकरता आणि जोडीदाराने लक्षात आणून दिलेली गोष्ट रास्त असल्यास ती स्वीकारण्यास तयार असण्याकरता पतीपत्नींना आपल्या मनोवृत्तीत बदल करावा लागू शकतो.” म्हणूनच, टोकाची भूमिका न घेता, समजूतदार असा. तुमच्या जोडीदाराच्या व्यक्‍तिमत्त्वात जे गुण नाहीत त्यांबद्दल वैतागण्याऐवजी जे चांगले गुण त्याच्या किंवा तिच्या व्यक्‍तिमत्त्वात आहेत त्यांची कदर करायला व आनंदी राहायला शिका.—उप. ९:९.

१७, १८. जीवनात समस्या उद्‌भवतात तेव्हा मदतीसाठी तुम्ही कोठे वळू शकता?

१७ कधीकधी परिस्थितीत बदल झाल्यामुळे जीवनात अनपेक्षितपणे कठीण परीक्षा येतात. उदाहरणार्थ, एखाद्या जोडप्याला मूल होते तेव्हा त्यांना नवीन समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. किंवा पती, पत्नी, मुले यांपैकी कोणालाही अचानक गंभीर आजारपण येऊ शकते. वयस्क पालकांची काळजी घेणे हे देखील एक आव्हान ठरू शकते. मुले मोठी होऊन घर सोडून आईवडिलांपासून दूर जाऊ शकतात. कधीकधी मंडळीतील विशेषाधिकार व जबाबदाऱ्‍यांमुळेही वैवाहिक जोडीदारांची परिस्थिती बदलू शकते. अशा बदललेल्या परिस्थितींमुळे पतीपत्नीच्या नातेसंबंधात ताणतणाव व चिंता निर्माण होऊ शकतात.

१८ वैवाहिक जीवनातील ताण तुम्हाला असह्‍य वाटत असेल, तर तुम्ही काय करू शकता? (नीति. २४:१०) निराश होऊन हार मानू नका! देवाच्या एखाद्या सेवकाने शुद्ध उपासना सोडून द्यावी हेच तर सैतानाला हवे आहे. त्यातल्या त्यात, जर एखाद्या जोडप्याने यहोवाकडे पाठ फिरवली तर त्याला आणखीनच आनंद होईल. म्हणूनच, तुमचे वैवाहिक बंधन एका तीनपदरी दोरीसारखे राहावे म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करा. कठीण परीक्षांना तोंड देऊनही जे देवाला विश्‍वासू राहिले अशा कित्येक जणांची उदाहरणे आपल्याला बायबलमध्ये सापडतात. उदाहरणार्थ, दाविदाने एकदा यहोवाला काकुळतीने विनंती केली: “हे देवा, माझ्यावर दया कर, कारण मनुष्य मला तुडवीत आहे.” (स्तो. ५६:१) तुम्हालाही कधी दाविदासारखे वाटले आहे का? तुम्हाला होणारा त्रास, मग तो तुमच्या कुटुंबातल्या व्यक्‍तीकडून असो किंवा इतर कोणाकडून, एक गोष्ट नेहमी आठवणीत असू द्या: दावीद ज्याप्रमाणे कठीण परिस्थितीत टिकून राहू शकला त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या परिस्थितीचा नक्कीच सामना करू शकता. दाविदाने म्हटले: “मी परमेश्‍वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले.”—स्तो. ३४:४.

विवाहित जोडप्यांना मिळणारे आशीर्वाद

१९. आपण सैतानाच्या हल्ल्यांचा प्रतिकार कसा करू शकतो?

१९ या शेवटल्या काळात, विवाह जोडीदारांनी ‘एकमेकांचे सांत्वन करण्याची व एकमेकांची उन्‍नति करण्याची गरज’ आहे. (१ थेस्सलनी. ५:११) मानव स्वार्थापोटी यहोवाची उपासना करतात असा आजही सैतानाचा दावा आहे, हे विसरू नका. तो या ना त्या मार्गाने देवाप्रती आपली एकनिष्ठा भंग करण्यास प्रयत्नशील आहे. वैवाहिक जीवनात समस्या निर्माण करणे त्यांपैकी एक मार्ग आहे. सैतानाच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपण यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवला पाहिजे. (नीति. ३:५, ६) पौलाने लिहिले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.”—फिलिप्पै. ४:१३.

२०. विवाहात देवाला स्थान दिल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळू शकतात?

२० विवाहात देवाला स्थान दिल्यामुळे अनेक आशीर्वाद मिळतात. ५१ वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या जोएल व त्यांच्या पत्नीच्या बाबतीत हे खरे ठरले आहे. ते म्हणतात: “मला इतकी चांगली पत्नी दिल्याबद्दल आणि आम्ही इतकी वर्षे अनुभवलेल्या आनंदी सहवासाबद्दल मी यहोवाचे नेहमी आभार मानतो. ती खरंच एक आदर्श जोडीदार आहे.” त्यांच्या समाधानी वैवाहिक जीवनाचे गुपीत काय आहे? “आम्ही नेहमीच एकमेकांशी दयाळुपणे, सहनशीलतेने व प्रेमाने वागण्याचा प्रयत्न केला आहे.” अर्थात, या सर्व गुणांचा परिपूर्ण रीत्या अवलंब करणे या जगात तरी आपल्यापैकी कोणालाही शक्य नाही. तरीसुद्धा, आपण बायबलमधील तत्त्वांचे पालन करण्याचा व आपल्या विवाहात यहोवाला स्थान देण्याचा परिश्रमपूर्वक प्रयत्न करत राहू या. जर आपण असे केले, तर आपला विवाह ‘सहसा न तुटणाऱ्‍या तीनपदरी दोरीसारखा’ ठरेल.—उप. ४:१२.

तुम्हाला आठवते का?

• विवाहात यहोवाला स्थान देण्याचा काय अर्थ होतो?

• समस्या उद्‌भवतात तेव्हा विवाह जोडीदारांनी काय केले पाहिजे?

• एखादे जोडपे विवाहात देवाला स्थान देत आहे किंवा नाही हे कशावरून दिसून येते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्रे]

सोबत मिळून प्रार्थना केल्यामुळे विवाहित जोडीदारांना कठीण प्रसंगांना तोंड देणे शक्य होते