व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘जगाच्या आत्म्याचा’ प्रतिकार करा

‘जगाच्या आत्म्याचा’ प्रतिकार करा

‘जगाच्या आत्म्याचा’ प्रतिकार करा

“आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे.” —१ करिंथ. २:१२.

१, २. (क) गतकाळात ब्रिटिश खाणींत कनेरी पक्षांना का ठेवायचे? (ख) ख्रिश्‍चनांना कोणत्या घातक परिस्थितीला तोंड द्यावे लागते?

कोळशाच्या खाणीतील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी, १९११ साली ब्रिटिश अधिकाऱ्‍यांनी एक कायदा अंमलात आणला होता. प्रत्येक खाणीत दोन कनेरी पक्षी ठेवावे असा तो कायदा होता. कशासाठी? खाणीत आग लागल्यास, खाणकामगार या पक्षांना आपल्यासोबत खाणीत न्यायचे. हे लहान पक्षी कार्बन मोनॉक्साईडसारख्या विषारी वायूला संवेदनशील असतात. त्यामुळे, खाणीत विषारी वायूचा प्रादुर्भाव झाल्यास हे पक्षी बेचैन व्हायचे आणि कधीकधी तर आपल्या जागेवरून खाली पडायचे. सुरुवातीलाच अशा प्रकारची धोक्याची सूचना मिळणे कामगारांसाठी आवश्‍यक होते. कार्बन मोनॉक्साईड हा एक रंगहीन व गंधहीन विषारी वायू आहे. आणि या वायूचा शरीरात प्रवेश झाल्यास, रक्‍तातल्या लाल पेशी शरीराच्या निरनिराळ्या भागांना प्राणवायू पोचवण्याचे काम करू शकत नाहीत आणि यामुळे ती व्यक्‍ती काही वेळातच मरते. वेळीच कामगारांना धोक्याची सूचना न मिळाल्यास, ते बेशुद्ध होऊन, विषारी वायूचा त्यांच्या शरीरात प्रवेश झाला आहे हे कळण्याच्या आतच त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता होती.

आध्यात्मिक दृष्टिकोनाने पाहिल्यास, ख्रिश्‍चनांची परिस्थिती खाणकामगारांसारखीच आहे. ती कशी? येशूने जेव्हा आपल्या अनुयायांवर जगभरात सुवार्ता प्रचार करण्याची कामगिरी सोपवली, तेव्हा त्याला याची जाणीव होती की तो त्यांना सैतानाचा व या जगाच्या आत्म्याचा प्रभाव असलेल्या घातक वातावरणात पाठवत आहे. (मत्त. १०:१६; १ योहा. ५:१९) त्याला आपल्या अनुयायांची इतकी काळजी होती की आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने पित्याला अशी प्रार्थना केली: “तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करितो.”—योहा. १७:१५.

३, ४. येशूने आपल्या अनुयायांना कोणता इशारा दिला होता आणि त्याकडे आपण लक्ष का दिले पाहिजे?

जागृत न राहिल्यामुळे आध्यात्मिक मृत्यू संभवण्याच्या धोक्याविषयी येशूने आपल्या अनुयायांना इशारा दिला होता. आपण या व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या काळात राहत असल्यामुळे आपल्यासाठी येशूचा इशारा खास महत्त्वाचा आहे. त्याने आपल्या अनुयायांना असे आर्जवले: “तुम्ही तर होणाऱ्‍या ह्‍या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून . . . जागृत राहा.” (लूक २१:३४-३६) आनंदाची गोष्ट म्हणजे, शिकलेल्या सर्व गोष्टी आठवणीत ठेवण्यास आणि जागृत व आध्यात्मिक रीत्या सुदृढ राहण्यास त्यांना मदत करण्यासाठी त्याचा पिता त्यांच्यासाठी पवित्र आत्म्याची तरतूद करेल असे वचनही येशूने दिले होते.—योहा. १४:२६.

आज आपल्याबद्दल काय? आपल्या मदतीसाठी आजही देवाचा पवित्र आत्मा उपलब्ध आहे का? असल्यास, तो मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? जगाचा आत्मा काय आहे आणि तो कशा प्रकारे कार्य करतो? आणि आपण कशा प्रकारे या जगाच्या आत्म्याचा यशस्वी रीत्या प्रतिकार करू शकतो?१ करिंथकर २:१२ वाचा.

पवित्र आत्मा की जगाचा आत्मा?

५, ६. पवित्र आत्मा आपल्यासाठी काय करू शकतो, पण तो मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

देवाच्या पवित्र आत्म्याची तरतूद फक्‍त पहिल्या शतकापुरतीच मर्यादित नव्हती, तर आजही सहजपणे ती उपलब्ध आहे. योग्य ते करण्यासाठी लागणारी ताकद तसेच, त्याच्या सेवेत सक्रिय राहण्याकरता लागणारा उत्साह त्याचा आत्मा आपल्याला देऊ शकतो. (रोम. १२:११; फिलिप्पै. ४:१३) आणि ‘आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणाऱ्‍या फळाचे’ वेगवेगळे पैलू असलेले प्रीती, ममता व चांगुलपणा यांसारखे सद्‌गुण आपल्यामध्ये तो उत्पन्‍न करू शकतो. (गल. ५:२२, २३) पण, ज्यांना नको आहे अशांना यहोवा देव आपला आत्मा जबरदस्तीने देत नाही.

तर मग, ‘पवित्र आत्मा मिळवण्यासाठी मी काय करू शकतो?’ असा प्रश्‍न स्वतःला विचारणे योग्य राहील. पवित्र आत्मा मिळवण्यासाठी आपण बरेच काही करू शकतो असे बायबल आपल्याला सांगते. एक अतिशय महत्त्वाचा आणि सरळसोपा मार्ग म्हणजे देवाजवळ त्याच्यासाठी विनंती करणे. (लूक ११:१३ वाचा.) व्यवहारात आणण्याजोगा आणखी एक मार्ग म्हणजे देवाच्या प्रेरित वचनाचा अभ्यास करणे व त्यात सापडणाऱ्‍या सल्ल्यांना जीवनात लागू करणे. (२ तीम. ३:१६) अर्थातच, बायबलचे वरवर वाचन करणाऱ्‍या सर्वांनाच देवाचा आत्मा मिळेल असे नाही. पण, जेव्हा एक ख्रिस्ती प्रामाणिकपणे देवाच्या वचनाचा अभ्यास करतो तेव्हा तो प्रेरित वचनात असलेल्या भावना व दृष्टिकोन यांना ग्रहण करू शकतो. आपण या गोष्टीचाही स्वीकार करणे आवश्‍यक आहे की यहोवाने येशूला आपला प्रतिनिधी म्हणून नेमले आहे ज्याच्याद्वारे देवाने आपला आत्मा दिला आहे. (कलस्सै. २:६) म्हणून, येशूने आपल्याकरता मांडलेल्या उदाहरणानुसार व त्याच्या शिकवणींनुसार आपल्या जीवनाला आकार दिला पाहिजे. (१ पेत्र २:२१) आपण जितके जास्त येशूचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू तितके जास्त आपण पवित्र आत्मा मिळवू.

७. जगाच्या आत्म्याचा प्रभाव लोकांवर कशा प्रकारे पडतो?

या उलट, जगाचा आत्मा सैतानाच्या व्यक्‍तिमत्त्वाचे अनुकरण करण्यासाठी लोकांना प्रभावित करतो. (इफिसकर २:१-३ वाचा.) हा आत्मा वेगवेगळ्या मार्गांनी कार्य करतो. आज जगात जे काही चालले आहे त्यावरून दिसते की जगाचा आत्मा देवाच्या स्तरांच्या विरुद्ध बंड करण्यास लोकांना प्रोत्साहित करतो. तो “देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी” यांसारख्या गोष्टींना बढावा देतो. (१ योहा. २:१६) तो “जारकर्म, मुर्तिपूजा, चेटके, मत्सर, राग, आणि दारूबाजी,” यांसारखी देहाची कर्मे उत्पन्‍न करतो. (गल. ५:१९-२१) आणि आपल्याला भक्‍तिहीन बनवण्यासाठी तो धर्मत्यागी विचारांना बढावा देतो. (२ तीम. २:१४-१८) त्यामुळे, एखादी व्यक्‍ती जगाच्या आत्म्याचा प्रभाव जितका जास्त आपल्यावर पडू देते तितकीच जास्त ती सैतानासारखी बनते.

८. आपल्यापैकी प्रत्येकाला काय ठरवावे लागेल?

जगातील प्रभावांपासून पूर्णपणे अलिप्त राहणे जरी शक्य नसले, तरीसुद्धा आपल्या जीवनावर पवित्र आत्म्याला नियंत्रण करू द्यावे की जगाच्या आत्म्याला, हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. जे सध्या जगाच्या आत्म्याच्या प्रभावात आहेत ते त्याच्या बेड्यांपासून स्वतःला मुक्‍त करून आपल्या जीवनात पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळवू शकतात. पण, याच्या उलटही घडू शकते. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने जे आतापर्यंत चालत होते ते जगाच्या आत्म्याच्या जाळ्यात अडकू शकतात. (फिलिप्पै. ३:१८, १९) म्हणूनच, जगाच्या आत्म्याचा प्रतिकार आपल्याला कसा करता येईल ते आपण पाहू या.

सुरुवातीला दिसणारी धोक्याची लक्षणे ओळखा

९-११. आपल्यावर जगाच्या आत्म्याचा प्रभाव होत आहे हे ओळखण्यासाठी धोक्याच्या कोणत्या काही सूचना आहेत?

सुरुवातीला उल्लेख केलेले ब्रिटिश खाणकामगार खाणीतील विषारी वायूची सूचना प्राप्त करण्यासाठी कनेरी पक्षांचा वापर करायचे. जर एखाद्या कामगाराने पक्ष्याला आपल्या जागेवरून खाली पडताना पाहिले तर त्याला कळायचे की आता बचावाकरता जलद गतीने कार्य करावे लागेल. आध्यात्मिक अर्थाने पाहिल्यास, आपण जगाच्या आत्म्याच्या प्रभावात येत आहोत हे ओळखण्यासाठी सुरुवातीची धोक्याची लक्षणे कोणती आहेत?

१० जेव्हा आपण देवाच्या वचनात असलेले सत्य शिकून घेतले आणि आपण यहोवाला आपले जीवन समर्पित केले, तेव्हा कदाचित आपण उत्सुकतेने बायबलचे वाचन करायचो. कदाचित आपण कळकळीने व वेळोवेळी प्रार्थना करायचो. आणि मंडळीच्या सभांमध्ये उपस्थित राहणे आपल्यासाठी आनंददायक असायचे. तहानेने व्याकूळ माणसाला ज्या प्रकारे मरुभूमीतील जलाशय पाहून तजेला वाटतो, त्याच प्रकारे प्रत्येक सभेकडे आपण आध्यात्मिक तजेला मिळवण्याचा स्रोत या नात्याने पाहायचो. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला जगाच्या आत्म्यापासून मुक्‍त व्हायला व त्याच्यापासून दूर राहायला साहाय्य मिळाले.

११ आपण आजही बायबलचे वाचन करण्याचा प्रयत्न करतो का? (स्तो. १:२) आपण वारंवार व मनःपूर्वक प्रार्थना करतो का? सभांना उपस्थित राहणे आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे का आणि दर आठवड्यातील प्रत्येक सभेला आपण उपस्थित राहतो का? (स्तो. ८४:१०) की यांपैकी आपल्या काही चांगल्या सवयींचा ऱ्‍हास झाला आहे? अर्थातच, आपल्या इतर अनेक जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेळ व शक्‍ती लावावी लागते आणि त्यामुळे आपला आध्यात्मिक नित्यक्रम आव्हानात्मक बनतो. काळाच्या ओघात आपल्या काही चांगल्या सवयींचा ऱ्‍हास झाला असल्यास, याचा अर्थ आपल्यावर जगाच्या आत्म्याचा प्रभाव होत आहे असा तर नाही? तर मग, आता आपण त्या चांगल्या सवयी स्वतःला पुन्हा लावून घेण्याकरता मेहनत करणार का?

कधीही ‘भारावून जाऊ’ नका

१२. येशूने आपल्या अनुयायांना कोणता सल्ला दिला होता, आणि का?

१२ जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो? जेव्हा येशूने आपल्या अनुयायांना ‘जागृत राहण्याचा’ सल्ला दिला होता, तेव्हा त्याने नुकतेच त्यांना काही विशिष्ट धोक्यांविषयी सावध केले होते. त्याने म्हटले: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल.”—लूक २१:३४, ३५.

१३, १४. खाण्या-पिण्याच्या बाबतीत स्वतःला कोणत्या प्रकारचे प्रश्‍न विचारणे योग्य राहील?

१३ येशूने दिलेल्या इशाऱ्‍याबद्दल विचार करा. त्याने खाणे-पिणे वाईट आहे असे म्हटले होते का? नाही! शलमोनाने जे म्हटले ते त्याला माहीत होते: “मनुष्यांनी आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्यांस काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीहि देवाची देणगी आहे.” (उप. ३:१२, १३) पण, जगाचा आत्मा खाण्या-पिण्याच्या बाबतीत लोकांना अतिरेकी वृत्ती बाळगण्याचे प्रोत्साहन देतो हेही येशूला माहीत होते.

१४ खादाडपणा किंवा अतिमद्यपान यांसारख्या गोष्टींविषयी आपल्या विचारसरणीवर जगाच्या विषारी आत्म्याचा प्रभाव झालेला नाही याची खात्री आपण कशी करू शकतो? आपण स्वतःला असे विचारू शकतो: ‘बायबलमध्ये किंवा आपल्या प्रकाशनांत खादाडपणाविषयी दिलेला सल्ला वाचून माझी प्रतिक्रिया काय असते? हा सल्ला महत्त्वाचा नाही किंवा खूप टोकाचा आहे असे म्हणून मी सहसा त्याला बगल देतो का किंवा स्वतःच्या वागणुकीबद्दल काही न काही कारण देतो का? * ख्रिश्‍चनांनी मद्यपान करायचेच झाल्यास माफक प्रमाणात करावे आणि कोणत्याही परिस्थितीत नशा चढेपर्यंत दारू पिऊ नये, या सल्ल्याबद्दल माझा दृष्टिकोन काय आहे? हा सल्ला मला लागू होत नाही असे म्हणून मी तो तुच्छ लेखतो का? जेव्हा माझ्या पिण्याबद्दल इतर जण काळजी व्यक्‍त करतात तेव्हा मी स्वतःच्या बचावासाठी सबबी देतो का किंवा त्यांच्यावर रागावतो का? बायबलमधील सल्ला गंभीरतेने न घेण्याचे मी इतरांना प्रोत्साहन देतो का?’ होय, एखाद्या व्यक्‍तीच्या मनोवृत्तीवरून ती जगाच्या आत्म्याच्या प्रभावात येत आहे का याचा अंदाज लावता येतो.—रोमकर १३:११-१४ पडताळून पाहा.

आध्यात्मिक प्रगती खुंटवणाऱ्‍या चिंता

१५. येशूने मानवांच्या कोणत्या प्रवृत्तीविरुद्ध इशारा दिला होता?

१५ चिंतांवर नियंत्रण करायला शिकणे हा देखील जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. अपरिपूर्ण असल्यामुळे, आपल्या गरजांविषयी चिंता करणे ही आपली स्वाभाविक प्रवृत्ती आहे हे येशूला माहीत होते. म्हणूनच, त्याने आपल्या अनुयायांना प्रेमळपणे म्हटले: “चिंता करीत बसू नका.” (मत्त. ६:२५) पण, काही महत्त्वाच्या गोष्टींविषयी, उदाहरणार्थ, देवाच्या अपेक्षा पूर्ण करणे, आपल्या ख्रिस्ती जीवनातील जबाबदाऱ्‍या पार पाडणे आणि कुटुंबाचे पालनपोषण करणे यांविषयी काळजी वाटणे तर साहजिकच आहे. (१ करिंथ. ७:३२-३४) तर मग, येशूने दिलेल्या इशाऱ्‍यातून आपण काय शिकू शकतो?

१६. कित्येक लोकांवर जगाच्या आत्म्याचा काय परिणाम होतो?

१६ जगात दिखाव्याच्या जीवनशैलीवर खूप जोर दिला जातो. या जगिक आत्म्याला कित्येक जण बळी पडतात आणि त्यामुळे ते अनेक अपायकारक चिंतांनी ग्रस्त होतात. ते आपल्यालाही असे भासवण्याचा प्रयत्न करतात की पैसाच सर्व काही आहे आणि व्यक्‍तीचे मोल तिच्या ख्रिस्ती गुणांवरून नव्हे तर तिच्याजवळ असलेल्या धनसंपत्तीवरून ठरते. जे लोक अशा प्रकारच्या विचारसरणीला बळी पडतात ते श्रीमंत होण्यासाठी गुलामांसारखे राबायला तयार असतात आणि अशा लोकांना सगळ्यात नवीन, मोठ्या व अत्याधुनिक वस्तू मिळवण्याचा सतत ध्यास लागलेला असतो. (नीति. १८:११) भौतिक गोष्टींबद्दल अशा अवाजवी दृष्टिकोनामुळे चिंता निर्माण होतात आणि यामुळे एखाद्या व्यक्‍तीची आध्यात्मिक प्रगती खुंटते.मत्तय १३:१८, २२ वाचा.

१७. आपण चिंताग्रस्त होण्याचे कसे टाळू शकतो?

१७ चिंताग्रस्त होणे टाळण्यासाठी आपण येशूच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे: “तुम्ही पहिल्याने [देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा.” जर आपण असे केले तर आपल्याला खरोखर आवश्‍यक असलेल्या गोष्टी मिळतील. (मत्त. ६:३३) या वचनावर आपला भरवसा आहे हे आपण कशा प्रकारे दाखवू शकतो? असे करण्याचा एक मार्ग आहे देवाचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटणे. म्हणजेच, पैशांच्या व्यवहारात देवाच्या स्तरांनुसार जे योग्य आहे ते करणे. उदाहरणार्थ, आपण कर चुकवत नाही आणि “लहानसहान” बाबींतही खोटे बोलत नाही. पैशांच्या व्यवहारात इतरांना दिलेला शब्द आपण पाळतो. जेव्हा कर्ज फेडण्याची वेळ येते तेव्हा आपले म्हणणे “होय तर होय” असे असते. (मत्त. ५:३७; स्तो. ३७:२१) अशा प्रकारच्या प्रामाणिकपणामुळे आपण जरी श्रीमंत बनत नसलो, तरी यामुळे आपण देवाचे मन आनंदित करतो, आपला विवेक शुद्ध राहतो आणि आपण बऱ्‍याच चिंतांपासून मुक्‍त होतो.

१८. येशूने आपल्यासाठी कोणते उत्तम उदाहरण मांडले, आणि त्याचे अनुकरण केल्याने आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?

१८ देवाचे राज्य मिळवण्यासाठी झटणे म्हणजे जीवनात खरोखर महत्त्वाचे काय आहे ते ओळखणे. येशूच्या उदाहरणावर लक्ष द्या. त्याच्याजवळ एक उत्कृष्ट प्रतीचे वस्त्र होते. (योहा. १९:२३) मित्रांच्या सहवासात तो भोजन व द्राक्षारसाचा आनंद घेत असे. (मत्त. ११:१८, १९) पण, जवळ असलेल्या वस्तू आणि विरंगुळा याच गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या नव्हत्या, तर यहोवाची इच्छा पूर्ण करणे हे त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते. (योहा. ४:३४-३६) आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करतो तेव्हा आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात. दुःखी-कष्टी लोकांना बायबलमधून सांत्वन मिळवण्यासाठी मदत करण्याचा आनंद आपल्याला प्राप्त होतो. आपल्याला मंडळीचे प्रेम व आधार मिळतो. आणि आपण यहोवाचे मन आनंदित करतो. जेव्हा आपण देवाच्या इच्छेला जीवनात प्राधान्य देतो, तेव्हा आपल्या जवळील वस्तू किंवा मनोरंजन यांसारख्या गोष्टी आपल्याला नियंत्रित करत नाहीत तर देवाच्या उपासनेत त्या आपल्याला साहाय्यक ठरतात. आपण देवाच्या राज्याशी संबंधित असलेल्या कार्यांमध्ये जितके जास्त गुंतलेले राहतो, तितकेच जास्त आपण जगाच्या आत्म्याचा आपल्यावर प्रभाव होण्याचे टाळू शकतो.

“आत्म्याचे चिंतन” करत राहा

१९-२१. आपण “आत्म्याचे चिंतन” कशा प्रकारे करू शकतो आणि आपण असे का केले पाहिजे?

१९ कोणतीही कृती विचार केल्याशिवाय घडत नसते. ज्यांना अविचारी कृत्ये म्हणतात ती देखील मुळात अविचाराने नव्हे, तर देहस्वभावाच्या अपरिपूर्ण विचारसरणीमुळे घडलेली असतात. म्हणूनच, प्रेषित पौलाने आपल्याला आपल्या विचारांचे रक्षण करण्याची आठवण करून दिली. त्याने असे लिहिले: “जे देहस्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात; आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात.”—रोम. ८:५.

२० आपल्या विचारांवर आणि पर्यायाने आपल्या कृतींवर जगाच्या आत्म्याचा प्रभाव पडू नये म्हणून आपण काय करू शकतो? विचारांवर नियंत्रण ठेवण्याद्वारे आपल्याला शक्य होईल तितका या जगाच्या भ्रष्ट विचारसरणीचा प्रतिकार करून आपण आपल्या मनाचे रक्षण केले पाहिजे. उदाहरणार्थ, मनोरंजनाची निवड करताना, ज्यांमध्ये अनैतिकतेला किंवा हिंसेला बढावा दिला जातो अशा कार्यक्रमांनी आपले मन मलीन न होऊ देण्याचा आपण निर्धार केला पाहिजे. जर आपण घाणेरड्या विचारांना आपल्या मनात थारा दिला तर देवाचा पवित्र म्हणजेच शुद्ध आत्मा आपल्या ठायी राहणार नाही. (स्तो. ११:५; २ करिंथ. ६:१५-१८) त्याऐवजी, नियमितपणे बायबलचे वाचन, प्रार्थना व मनन करण्याद्वारे आणि सभांना उपस्थित राहण्याद्वारे आपण देवाच्या आत्म्याला आपल्या मनात कार्य करू देतो. आणि त्या आत्म्याच्या मदतीने आपण नियमित रीत्या ख्रिस्ती प्रचार कार्यातही सहभाग घेतो.

२१ निश्‍चितच, आपण जगाच्या आत्म्याचा आणि तो बढावा देत असलेल्या देहाच्या वासनांचा प्रतिकार केला पाहिजे. आणि याकरता मनःपूर्वक प्रयत्न करणे आपल्या फायद्याचे ठरेल, कारण पौलाने म्हटल्याप्रमाणे, “देह स्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.”—रोम. ८:६.

[तळटीप]

^ परि. 14 खादाडपणा एक प्रकारची मनोवृत्ती आहे. अशी मनोवृत्ती असणारी व्यक्‍ती सहसा हावरट असते व खाण्या-पिण्याच्या बाबतीत अतिरेक करते. एखादी व्यक्‍ती खादाड आहे किंवा नाही हे तिच्या शरीरयष्टीवरून नव्हे तर खाण्या-पिण्याविषयी तिच्या दृष्टिकोनावरून ठरवता येते. एखादी व्यक्‍ती सर्वसामान्य बांध्याची किंवा सडपातळ असली, तरी ती खादाड असू शकते. दुसरीकडे पाहता लठ्ठ व्यक्‍ती खादाड असेलच असे नाही कारण, कधीकधी आजारामुळे किंवा आनुवांशिक कारणांमुळेही लठ्ठपणा येऊ शकतो. तेव्हा, एखाद्याची शरीरयष्टी कशीही असो, खरा मुद्दा हा आहे की तो खाण्याच्या बाबतीत अतिरेक करतो का?—टेहळणी बुरूज नोव्हेंबर १, २००४ या अंकातील “वाचकांचे प्रश्‍न” पाहा.

तुम्हाला आठवते का?

• पवित्र आत्मा मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

• कोणकोणत्या बाबतीत जगाच्या आत्म्याचा आपल्यावर प्रभाव पडू शकतो?

• आपण कशा प्रकारे जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्र]

कामावर किंवा शाळेला जाण्यापूर्वी, पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा

[२३ पानांवरील चित्रे]

आपण आपले मन शुद्ध ठेवले पाहिजे, पैशांच्या व्यवहारात प्रामाणिक असले पाहिजे आणि खाण्या-पिण्याच्या बाबतीत संयमी असले पाहिजे