व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपला “मुक्‍तिदाता” आहे

यहोवा आपला “मुक्‍तिदाता” आहे

यहोवा आपला “मुक्‍तिदाता” आहे

“परमेश्‍वर त्यांना साहाय्य करितो व त्यांना मुक्‍त करितो.”—स्तो. ३७:४०.

१, २. यहोवाबद्दलच्या कोणत्या मूलभूत सत्यामुळे आपल्याला सांत्वन व बळ मिळते?

सूर्यामुळे निर्माण होणाऱ्‍या सावल्या स्थिर नसतात. पृथ्वी सतत फिरत असल्यामुळे पृथ्वीवर निर्माण होणाऱ्‍या सावल्या देखील सतत बदलत असतात. पण, सूर्य व पृथ्वीचा सृष्टिकर्ता मात्र बदलत नाही. (मला. ३:६) तो “फिरण्याने छायेत जात नाही,” असे बायबल सृष्टिकर्त्याबद्दल म्हणते. (याको. १:१७) यहोवाबद्दलच्या या मूलभूत सत्यामुळे आपल्याला सांत्वन व बळ मिळते. खासकरून जेव्हा आपण कठीण परीक्षांना आणि आव्हानांना तोंड देत असतो तेव्हा. असे का म्हणता येईल?

मागील लेखात आपण पाहिल्याप्रमाणे, प्राचीन काळात यहोवा आपल्या लोकांचा “मुक्‍तिदाता” ठरला. (स्तो. ७०:५) यहोवा कधी बदलत नसल्यामुळे तो नेहमी आपल्या शब्दाला जागतो. म्हणूनच, तो आपल्याला ‘साहाय्य करेल व मुक्‍त करेल’ याबद्दल त्याचे उपासक पूर्ण भरवसा बाळगू शकतात. (स्तो. ३७:४०) यहोवाने आधुनिक दिवसांत आपल्या उपासकांना कशा प्रकारे मुक्‍त केले आहे? आणि वैयक्‍तिक रीत्या तो आपल्याला कशा प्रकारे मुक्‍त करेल?

यहोवा विरोधकांपासून सुटका करतो

३. यहोवाच्या लोकांना सुवार्तेचा प्रचार करण्यापासून त्यांचे विरोधक रोखू शकणार नाहीत याविषयी आपण खात्री का बाळगू शकतो?

यहोवा अनन्य भक्‍तीस पात्र आहे आणि म्हणून केवळ त्याचीच उपासना करण्याचा त्याच्या साक्षीदारांचा दृढनिश्‍चय आहे. सैतानाने कितीही विरोध केला तरी तो त्यांना असे करण्यापासून रोखू शकणार नाही. देवाचे वचन आपल्याला असे आश्‍वासन देते: “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही; तुजवर आरोप ठेवणाऱ्‍या सर्व जिव्हांना तू दोषी ठरविशील.” (यश. ५४:१७) देवाच्या लोकांवर सोपवण्यात आलेले प्रचार कार्य थांबवण्याचा त्यांच्या विरोधकांनी अनेकदा प्रयत्न केला. पण, त्यांचा हा प्रयत्न व्यर्थ ठरला आहे. याची दोन उदाहरणे पाहू या.

४, ५. सन १९१८ मध्ये यहोवाच्या लोकांनी कोणत्या विरोधाचा सामना केला आणि याचा परिणाम काय झाला?

सन १९१८ मध्ये यहोवाच्या लोकांविरुद्ध छळाचा आगडोंब उसळला. ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकवर्गाच्या चिथावणीवरून करण्यात आलेल्या या छळाचा उद्देश, साक्षीदारांचे प्रचार कार्य थांबवणे हा होता. ७ मे रोजी अमेरिकेच्या संघीय सरकारने, त्यावेळी जगभरातील प्रचार कार्याची देखरेख करणाऱ्‍या जे. एफ. रदरफोर्ड यांना आणि मुख्यालयातील इतर काहींना अटक करण्याचे वॉरंट जारी केले. दोन महिन्यांच्या आत बंधू रदरफोर्ड आणि त्यांच्या सहकाऱ्‍यांवर देशद्रोहाचा खोटा आरोप लावून त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि बऱ्‍याच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण, न्यायसंस्थेचा वापर करून प्रचार कार्याला कायमची खीळ घालण्यास विरोधकांना यश आले का? मुळीच नाही!

यहोवाने काय वचन दिले होते ते आठवा: “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही.” २६ मार्च, १९१९ रोजी म्हणजे बंधू रदरफोर्ड व त्यांच्या सहकाऱ्‍यांना तुरुंगात टाकण्यात आले त्याच्या नऊ महिन्यांनंतर घटनांनी चमत्कारिक वळण घेतले. तुरुंगात असलेल्या या बांधवांना जामीनावर सोडण्यात आले. पुढच्या वर्षी ५ मे, १९२० रोजी, त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मागे घेण्यात आले. मिळालेल्या या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन हे बांधव राज्य प्रचाराच्या कार्यात पुढे सरसावले. याचा परिणाम काय झाला? तेव्हापासून जी अभूतपूर्व वाढ होण्यास सुरुवात झाली ती अजूनही सुरूच आहे! या विलक्षण वाढीचे श्रेय ‘मुक्‍तिदात्या’ यहोवालाच जाते.—१ करिंथ. ३:७.

६, ७. (क) नात्सी जर्मनीत यहोवाच्या साक्षीदारांचा कशा प्रकारे विरोध करण्यात आला, आणि याचा काय परिणाम झाला? (ख) यहोवाच्या लोकांचा आधुनिक इतिहास कोणत्या गोष्टीची ग्वाही देतो?

आता दुसरे उदाहरण पाहू या. सन १९३४ साली हिटलरने जर्मनीतून यहोवाच्या साक्षीदारांचे अस्तित्व मिटवून टाकण्याची प्रतिज्ञा केली. ही काही पोकळ धमकी नव्हती. पुष्कळ साक्षीदारांना अटक करण्यात आली व तुरुंगात टाकण्यात आले. हजारो साक्षीदारांवर जुलूम करण्यात आले आणि शेकडोंना यातना शिबिरांत जिवे मारण्यात आले. साक्षीदारांचे अस्तित्व मिटवून टाकण्याची हिटलरची मोहीम यशस्वी झाली का? जर्मनीतील प्रचार कार्य तो पूर्णपणे रोखू शकला का? मुळीच नाही! छळ होत असताना आपल्या बांधवांनी गुप्तपणे प्रचार कार्य सुरू ठेवले. नात्सी शासनाचे पतन झाल्यावर त्यांनी या मिळालेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन प्रचार कार्य सुरू ठेवले. आज जर्मनीत १,६५,००० पेक्षा जास्त राज्य प्रचारक आहेत. “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही,” असे वचन देणारा “मुक्‍तिदाता” यहोवा पुन्हा एकदा आपल्या शब्दाला जागला.

यहोवाच्या साक्षीदारांचा आधुनिक इतिहास या गोष्टीची ग्वाही देतो की यहोवा आपल्या लोकांचा एक समूह या नात्याने कधीही नाश होऊ देणार नाही. (स्तो. ११६:१५) पण वैयक्‍तिक रीत्या आपल्याबद्दल काय? यहोवा कशा प्रकारे आपल्या प्रत्येकाचा मुक्‍तिदाता ठरतो?

शारीरिक संरक्षणाबद्दल काय?

८, ९. (क) आजच्या काळात आपले शारीरिक संरक्षण करण्याचे वचन यहोवाने दिलेले नाही हे आपण कशावरून म्हणू शकतो? (ख) आपण कोणती गोष्ट आठवणीत ठेवली पाहिजे?

आपल्याला माहीत आहे की आज वैयक्‍तिक रीत्या आपले शारीरिक संरक्षण करण्याचे वचन यहोवाने दिलेले नाही. त्यामुळे, आपणही नबुखद्‌नेस्सर राजाने उभारलेल्या सोन्याच्या मूर्तीला दंडवत करण्यास नकार दिलेल्या तीन विश्‍वासू इब्र्यांप्रमाणेच भूमिका घेतो. यहोवा चमत्कारिकपणे आपल्या जिवाचे संरक्षण करेल असे त्या देवभीरू तरुणांनी गृहीत धरले नव्हते. (दानीएल ३:१७, १८ वाचा.) पण, यहोवाने धगधगत्या आगीच्या भट्टीतून त्यांना वाचवले. प्राचीन काळात अशा प्रकारे चमत्कारिक रीत्या देवाच्या लोकांचे संरक्षण क्वचितच करण्यात आले. यहोवाचे कित्येक सेवक विरोधकांच्या हाती मृत्यूमुखी पडले.—इब्री ११:३५-३७.

आजच्याबद्दल काय? “मुक्‍तिदाता” या नात्याने यहोवा आपल्या लोकांना भयानक परिस्थितींतून नक्कीच सोडवू शकतो. पण, एखाद्या विशिष्ट परिस्थितीत यहोवाने साहाय्य केले किंवा नाही हे आपण निश्‍चितपणे सांगू शकतो का? नाही. तरीसुद्धा, एखाद्या व्यक्‍तीला कदाचित खात्री वाटत असेल की भयंकर परिस्थितीतून यहोवानेच आपल्याला वाचवले. असे कोणाला वाटत असल्यास इतरांना याविषयी आक्षेप घेण्याचा हक्क नाही. त्याच वेळी, कित्येक विश्‍वासू ख्रिश्‍चनांना छळामुळे, उदाहरणार्थ, नात्सींच्या शासनादरम्यान आपले प्राण गमवावे लागले हे विसरून चालणार नाही. आणखी काहींचा दुःखद परिस्थितीत अंत झाला आहे. (उप. ९:११) मग, अकाली मृत्यू आलेल्या अशा विश्‍वासू सेवकांचा यहोवा “मुक्‍तिदाता” नव्हता असे म्हणता येईल का? नाही, असे आपण मुळीच म्हणू शकत नाही.

१०, ११. मृत्यूपुढे मनुष्याचे काहीच चालत नाही असे का म्हणता येते, पण यहोवा काय करणार आहे?

१० याचा विचार करा: मृत्यूपुढे माणसाचे काही एक चालत नाही. मृत्यूनंतर सर्व मानव कबरेत जातात. ‘अधोलोकाच्या कबजातून आपला जीव सोडवण्यास’ ते असमर्थ आहेत. (स्तो. ८९:४८) पण, यहोवाबद्दल काय म्हणता येईल? नात्सींचा भयानक छळाचा काळ पाहिलेल्या एका बहिणीने, यातना शिबिरांत मरण पावलेल्या प्रिय व्यक्‍तीबद्दल शोक करत असताना तिच्या आईने तिला सांत्वन देण्याकरता एकदा काय म्हटले होते हे सांगितले: “मृतजन जर कायमचे मृत्यूच्या विळख्यात राहणार असतील तर देवापेक्षा मृत्यू जास्त सामर्थ्यवान आहे असे म्हणावे लागेल, नाही का?” निश्‍चितच, जीवनाचा स्रोत असणाऱ्‍या यहोवासमोर मृत्यूचे सामर्थ्य काहीच नाही. (स्तो. ३६:९) कबरेत असलेले सर्व जण यहोवाच्या स्मृतीत आहेत आणि त्या सर्वांना तो मुक्‍त करेल.—लूक २०:३७, ३८; प्रकटी. २०:११-१४.

११ आजही यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांना साहाय्य करण्यासाठी जातीने लक्ष देतो. आता आपण अशा तीन मार्गांबद्दल चर्चा करू, ज्यांद्वारे आज तो आपला “मुक्‍तिदाता” ठरतो.

यहोवा आध्यात्मिकदृष्ट्या संरक्षण पुरवतो

१२, १३. आध्यात्मिक संरक्षण का महत्त्वाचे आहे आणि यहोवा आपले आध्यात्मिक रीत्या कशा प्रकारे संरक्षण करतो?

१२ यहोवा आपले आध्यात्मिकदृष्ट्या संरक्षण करतो आणि हेच संरक्षण खरेतर सर्वात महत्त्वाचे आहे. खरे ख्रिस्ती या नात्याने आपल्याला माहीत आहे की या वर्तमान जीवनापेक्षाही आणखी काहीतरी मौल्यवान आहे. ते म्हणजे यहोवा देवासोबतचा आपला वैयक्‍तिक नातेसंबंध. (स्तो. २५:१४; ६३:३) या नातेसंबंधाशिवाय आपल्या सध्याच्या जीवनाला काहीच अर्थ उरणार नाही आणि भविष्यातील जीवनाची आशाही आपण गमावून बसू.

१३ आनंदाची गोष्ट म्हणजे, यहोवासोबत जवळचा नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी आवश्‍यक असणारी सर्व मदत तो आपल्याला पुरवतो. आपल्या मदतीसाठी त्याने त्याचे वचन, त्याचा पवित्र आत्मा आणि त्याची मंडळी यांची तरतूद केली आहे. आपण या सर्व तरतुदींचा फायदा कशा प्रकारे घेऊ शकतो? नियमितपणे व परिश्रमाने त्याच्या वचनाचा अभ्यास करण्याद्वारे आपण आपला विश्‍वास मजबूत करू शकतो व आपली आशा उज्जवल बनवू शकतो. (रोम. १५:४) यहोवाच्या आत्म्यासाठी मनःपूर्वक प्रार्थना केल्यामुळे आपल्याला त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध ज्यामुळे धोक्यात येईल अशा परिस्थितींपासून दूर राहण्यास साहाय्य मिळेल. (लूक ११:१३) बायबलवर आधारित प्रकाशनांद्वारे, तसेच मंडळीच्या सभांद्वारे, संमेलनाद्वारे आणि अधिवेशनांद्वारे दास वर्ग पुरवत असलेल्या मार्गदर्शनाचे पालन केल्यामुळे “यथाकाळी खावयास” मिळणाऱ्‍या आध्यात्मिक अन्‍नाने आपले पोषण होईल. (मत्त. २४:४५) या सर्व तरतुदींमुळे आपले आध्यात्मिक रीत्या संरक्षण होते आणि देवासोबत जवळचा नातेसंबंध टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत मिळते.—याको. ४:८.

१४. आध्यात्मिक संरक्षण म्हणजे काय हे दाखवणारा एक अनुभव सांगा.

१४ यहोवा आपल्याला आध्यात्मिक संरक्षण कसे पुरवतो हे समजून घेण्यासाठी, मागील लेखात उल्लेख केलेल्या आईवडिलांचे उदाहरण आठवा. त्यांची मुलगी ट्रीझा बेपत्ता झाल्याच्या काही दिवसांनी तिचा खून झाल्याची हादरवून टाकणारी बातमी त्यांना मिळाली. * वडील आठवून सांगतात: “माझ्या मुलीचं संरक्षण करावं अशी मी यहोवाला प्रार्थना केली होती. पण, जेव्हा तिचा खून झाल्याचं कळलं, तेव्हा लगेचच माझ्या मनात हा विचार आला की देवानं माझी प्रार्थना का ऐकली नाही. अर्थात, आज वैयक्‍तिक रीत्या आपलं शारीरिक संरक्षण करण्याचं वचन यहोवानं दिलेलं नाही हे मला माहीत आहे. त्यामुळे, योग्य प्रकारे विचार करण्यास मदत करावी अशी मी प्रार्थना करत राहिलो. यहोवा आपल्या लोकांचं आध्यात्मिक रीत्या संरक्षण करतो म्हणजेच, त्याच्यासोबतचा नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेली सर्व मदत तो पुरवतो, या जाणिवेमुळे मला सांत्वन मिळालं. अशा प्रकारचं संरक्षणच सर्वात महत्त्वाचं आहे, कारण याच्यावर आपलं अनंत भविष्य अवलंबून आहे. या दृष्टिकोनानं विचार केल्यास, यहोवानं ट्रीझाचं नक्कीच संरक्षण केलं. ती आपल्या मृत्यूपर्यंत विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत होती. तिच्या भावी जीवनाची आशा देवाच्या प्रेमळ हातात सुरक्षित आहे, हे जाणून मला मनःशांती मिळाली आहे.”

आजारपणात यहोवा सांभाळतो

१५. जेव्हा आपण गंभीर रीत्या आजारी होतो तेव्हा यहोवा कशा प्रकारे आपल्याला मदत करतो?

१५ यहोवाने ज्या प्रकारे दाविदाच्या आजारपणात त्याचा संभाळ केला, त्याच प्रकारे आपण “रोगी असता,” तो आपल्यालाही सांभाळेल. (स्तो. ४१:३) आज यहोवा जरी चमत्कारिक रीत्या आपली सुटका करत नसला, तरी तो आपल्याला साहाय्य करतो. ते कसे? त्याच्या वचनात सापडणारी तत्त्वे आपल्याला उपचाराविषयी किंवा इतर गोष्टींविषयी योग्य निर्णय घेण्यास साहाय्य करू शकतात. (नीति. २:६) आपल्या प्रकाशनांत आलेल्या लेखांतून, आपल्या विशिष्ट आजाराबद्दल उपयुक्‍त माहिती व सल्ले आपल्याला मिळू शकतात. तसेच, आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी व काही झाले तरी आपली सचोटी कायम राखण्यासाठी यहोवा त्याच्या आत्म्याद्वारे आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देऊ शकतो. (२ करिंथ. ४:७) यहोवाच्या मदतीमुळे, आपण आपल्या आजारावरच जास्त लक्ष केंद्रित करून आपला आध्यात्मिक दृष्टिकोन गमावून बसण्याचे टाळू शकतो.

१६. एका बांधवाने आपल्या आजाराशी कशा प्रकारे झुंज दिली?

१६ मागील लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या तरुण बांधवाच्या उदाहरणावर विचार करू या. १९९८ साली त्याला ॲमायोट्रोफिक लॅट्रल स्क्‌लेरोसिस किंवा ALS झाल्याचे निदान करण्यात आले. या आजारामुळे तो पूर्णपणे पांगळा झाला. * पण, त्याने या आजाराचा सामना कशा प्रकारे केला? त्याने सांगितले: “असहनीय दुःखामुळे व निराशेमुळे काही क्षण असे यायचे जेव्हा, मृत्यू आला तरच आता आपली सुटका होऊ शकेल असं मला वाटायचं. आता मला आणखी सहन करता येणार नाही असं जेव्हा जेव्हा मला वाटतं तेव्हा तेव्हा मी यहोवाकडे तीन गोष्टी मागतो: शांत मन, सहनशीलता व धीर. मला वाटतं यहोवानं नक्कीच माझ्या त्या प्रार्थना ऐकल्या. मन शांत असल्यामुळे मी सांत्वनदायक विचारांवर मनन करू शकतो. उदाहरणार्थ, नवीन जगात मी चालू-फिरू शकेन, माझ्या आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकेन आणि माझ्या कुटुंबाबरोबर पुन्हा बोलू शकेन तेव्हा माझं जीवन किती वेगळं असेल असा मी विचार करतो. सहनशीलता मला पांगळ्या शरीरामुळे येणाऱ्‍या सर्व अडचणी व आव्हानं सोसण्यास मदत करते. धीर धरल्यामुळे मला यहोवाला विश्‍वासू राहता येतं व सगळं लक्ष आजारपणावरच केंद्रित न करता आध्यात्मिक दृष्टिकोनानं विचार करणं शक्य होतं. दाविदासारखा मी देखील असं म्हणू शकतो की मी अंथरुणास खिळलेला असताना यहोवानं माझा संभाळ केला.”—यश. ३५:५, ६.

यहोवा पालनपोषण करतो

१७. यहोवाने आपल्यासाठी काय करण्याचे वचन दिले आहे आणि याचा अर्थ काय होतो?

१७ यहोवा आपले पालनपोषण करण्याचे वचन देतो. (मत्तय ६:३३, ३४ आणि इब्री लोकांस १३:५, ६ वाचा.) पण, याचा अर्थ असा होतो का, की आपण फक्‍त हातावर हात देऊन बसून राहावे व यहोवा चमत्कारिक रीत्या आपल्या गरजा पुरवेल? (२ थेस्सलनी. ३:१०) नाही. याउलट, याचा असा अर्थ होतो की, जर आपण देवाच्या राज्याला आपल्या जीवनात पहिले स्थान दिले आणि पोट भरण्यासाठी कष्ट करण्याची आपली तयारी असली, तर यहोवा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला जरूर मदत करेल. (१ थेस्सलनी. ४:११, १२; १ तीम. ५:८) तो आपल्याला आवश्‍यक असलेल्या वस्तूंची तरतूद अशा मार्गांनी करू शकतो ज्यांची आपण कल्पना देखील केली नसेल. कदाचित एखादा सहउपासक आपल्या मदतीला धावून येईल किंवा आपल्याला एखादे काम देऊ करेल.

१८. हलाखीच्या परिस्थितीत यहोवा आपल्याला साहाय्य पुरवू शकतो याचा एक अनुभव सांगा.

१८ मागील लेखाच्या प्रस्तावनेत उल्लेख केलेली एकटी माता तुम्हाला आठवते का? ती आपल्या मुलीसह एका नव्या ठिकाणी राहायला गेली. खूप शोधूनही तिला काम मिळेना. ती सांगते: “सकाळी मी क्षेत्र सेवेत जात असे व दुपारी कामाच्या शोधात फिरत असे. एके दिवशी मी दूध आणायला दुकानात गेले. तो दिवस आजही माझ्या लक्षात आहे. मी दुकानातील भाज्यांकडे नुसतीच बघत राहिले, कारण भाजीपाला विकत घेण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. मला आजपर्यंत इतकं वाईट कधीच वाटलं नव्हतं. दुकानातून जेव्हा मी घरी परत आले, तेव्हा पाहते तर काय! माझ्या घरामागच्या व्हरांड्यात निरनिराळ्या भाज्यांच्या कितीतरी पिशव्या ठेवल्या होत्या. आम्हा मायलेकींना बरेच महिने पुरेल इतका तो भाजीपाला होता. ते पाहून मला रडू कोसळलं आणि मी यहोवाचे आभार मानले.” या बहिणीच्या मंडळीतील एक बांधव आपल्या बागेत भाजीपाला उगवायचे. त्यांनीच तो सगळा भाजीपाला आणून ठेवल्याचे नंतर तिला कळाले. तिने त्याला एक पत्र लिहिले: “त्या दिवशी मी तुमचे तर आभार मानलेच, पण तुमच्या दयाळुपणातून यहोवानं मला त्याच्या प्रेमाची आठवण करून दिल्याबद्दल मी त्याचेही आभार मानले.”—नीति. १९:१७.

१९. मोठ्या संकटाच्या वेळी यहोवाचे सेवक कोणता भरवसा बाळगू शकतील, आणि आता आपण काय करण्याचा दृढनिश्‍चय केला पाहिजे?

१९ प्राचीन काळातील व आपल्या काळातील जी उदाहरणे आपण पाहिली त्यांवरून हे अगदी स्पष्ट झाले आहे की आपला साहाय्यकर्ता म्हणून आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो. लवकरच, जेव्हा सैतानाच्या जगावर मोठे संकट येईल, तेव्हा आधी कधीही भासली नव्हती तितकी आपल्याला यहोवाच्या मदतीची गरज भासेल. पण, यहोवाचे सेवक मदतीसाठी पूर्ण भरवशाने त्याच्याकडे पाहतील. आपला मुक्‍तीसमय जवळ आला आहे या जाणिवेने ते आपली डोकी वर करून आनंद करतील. (लूक २१:२८) तोपर्यंत, आपल्याला कोणत्याही परीक्षांना तोंड द्यावे लागले, तरी कधीही न बदलणारा यहोवा देव आपला “मुक्‍तिदाता” ठरेल या खात्रीने त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवण्याचा आपण दृढनिश्‍चय करू या.

[तळटीपा]

^ परि. 14 “अकथनीय दुःखाचा प्रसंग,” हा सावध राहा! जुलै २२, २००१ (इंग्रजी) अंकातील पृष्ठे १९-२३ वरील लेख पाहा.

^ परि. 16 “ALS सारख्या आजाराला तोंड देताना विश्‍वासामुळेच टिकून राहिलो,” हा सावध राहा! जानेवारी २००६ (इंग्रजी) अंकातील पृष्ठे २५-२९ वरील लेख पाहा.

तुम्हाला आठवते का?

• अकाली मृत्यू पावलेल्यांसाठी यहोवा कोणत्या अर्थाने मुक्‍तिदाता ठरतो?

• आध्यात्मिक संरक्षण सर्वात महत्त्वाचे का आहे?

• आपले पालनपोषण करण्याविषयी यहोवाने दिलेल्या वचनाचा काय अर्थ आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८ पानांवरील चित्र]

बंधू रदरफोर्ड व त्यांच्या सहकाऱ्‍यांना १९१८ मध्ये अटक करण्यात आली व नंतर त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेऊन त्यांना सोडण्यात आले

[१० पानांवरील चित्र]

‘अंथरुणास खिळलेले’ असताना यहोवा आपला संभाळ करतो