व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूचे अनुकरण करा देवाला आवडेल अशा प्रकारे त्याची उपासना करा

येशूचे अनुकरण करा देवाला आवडेल अशा प्रकारे त्याची उपासना करा

येशूचे अनुकरण करा देवाला आवडेल अशा प्रकारे त्याची उपासना करा

देवाचे मानवांवर प्रेम असल्यामुळे त्याने आपली उपासना करण्याचा सुहक्क ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍या’ लोकांना देऊ केला आहे. (प्रकटी. ७:९, १०; १५:३, ४) जे या आमंत्रणाचा स्वीकार करतात ते यहोवाचे ‘मनोहर रूप पाहू’ शकतात, म्हणजेच त्याचा अनुग्रह प्राप्त करू शकतात. (स्तो. २७:४; ९०:१७) ते आपला आवाज उंचावून स्तोत्रकर्त्याप्रमाणे देवाची स्तुती करतात व म्हणतात: “याहो या, परमेश्‍वर जो आपला उत्पन्‍नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची उपासना करू, त्याला नमन करू.”—स्तो. ९५:६.

यहोवाला मौल्यवान वाटलेली उपासना

देवाचा एकुलता एक पुत्र असल्यामुळे येशूला आपल्या पित्याचे विचार, तत्त्वे व नीतिनियम जाणून घेण्याची पुरेपूर संधी मिळाली. म्हणूनच येशू आत्मविश्‍वासाने इतरांनाही खरी उपासना कशी करावी हे सांगू शकला. तो म्हणाला: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.”—योहा. १:१४; १४:६.

देवाला नम्रपणे अधीन होण्याच्या बाबतीत येशू एक परिपूर्ण आदर्श आहे. त्याने म्हटले: “मी आपण होऊन काही करीत नाही तर मला पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्‍या गोष्टी बोलतो.” मग तो म्हणाला: “जे त्याला आवडते ते मी सर्वदा करितो.” (योहा. ८:२८, २९) देवाला आवडेल अशी उपासना येशूने कशा प्रकारे केली?

पहिली गोष्ट म्हणजे, येशू आपल्या पित्याला पूर्णपणे एकनिष्ठ होता. आणि देवाची उपासना करण्याचा खरे तर हाच अर्थ आहे. येशूला अतिशय खडतर परिस्थितीला सामोरे जावे लागले तेव्हासुद्धा त्याने आपल्या पित्याच्या आज्ञांचे पालन केले व त्याच्याच इच्छेप्रमाणे तो वागला. अशा प्रकारे आपल्या पित्यावर मनापासून प्रेम असल्याचे त्याने दाखवले. (फिलिप्पै. २:७, ८) शिष्य बनवण्याचे कार्य येशू नियमितपणे करत असे. हा त्याच्या उपासनेचा एक महत्त्वाचा भाग होता. हे कार्य त्याने इतके मनोभावे केले, की त्याच्यावर विश्‍वास करणारे तसेच, ज्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही ते देखील त्याला गुरुजी किंवा शिक्षक म्हणून ओळखायचे. (मत्त. २२:२३, २४; योहा. ३:२) त्याच्या आत्मत्यागी मनोवृत्तीमुळे त्याच्याजवळ स्वतःकरता वेळच उरत नसे. पण, दुसऱ्‍यांसाठी खपण्यास त्याला आनंद वाटे. (मत्त. १४:१३, १४; २०:२८) सतत कार्यमग्न असूनही, आपल्या पित्याला प्रार्थना करून त्याच्याशी बोलण्यासाठी मात्र तो कसेही करून वेळ काढत असे. (लूक ६:१२) यहोवाला येशूची उपासना किती मौल्यवान वाटली असेल!

देवाला संतोषविण्याकरता प्रयत्नांची पराकाष्टा

यहोवाला आपल्या पुत्राची वागणूक पाहून आनंद वाटला आणि त्याने त्याच्याविषयी आपले समाधान व्यक्‍त केले. (मत्त. १७:५) पण येशूचा विश्‍वासूपणा दियाबल सैतानाच्या नजरेतूनही सुटला नाही. आणि परिणामस्वरूप, येशू सैतानाचे मुख्य निशाण बनला. का? कारण आजपर्यंत कोणीही मनुष्य देवाला पूर्णपणे आज्ञाधारक राहून त्याला आवडणाऱ्‍या पद्धतीने त्याची उपासना करण्यात यशस्वी ठरला नव्हता. आणि म्हणून, यहोवा ज्या उपासनेस पात्र होता ती उपासना त्याला देण्यापासून येशूला परावृत्त करण्याचा दियाबलाने जणू चंगच बांधला.—प्रकटी. ४:११.

सैतानाने येशूला आमिष दाखवून त्याची निष्ठा भंग करण्याचा प्रयत्न केला. त्याने येशूला “एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखविले.” तो येशूला म्हणाला: “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन.” येशूची प्रतिक्रिया काय होती? तो म्हणाला: “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्‍वर तुझा देव ह्‍याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.’” (मत्त. ४:८-१०) सैतानाला नमन केल्याने कोणताही फायदा मिळणार असला, तरीसुद्धा असे करणे मूर्तिपूजा ठरेल हे येशूने ओळखले. यहोवाला सोडून दुसऱ्‍या कोणाला एकदाही नमन करणे त्याला नामंजूर होते.

आज सैतान आपल्या उपासनेच्या बदल्यात जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव कदाचित आपल्याला देऊ करणार नाही. पण प्रांजळ ख्रिश्‍चनांना देवाची उपासना करण्यापासून परावृत्त करण्यास तो आजही प्रयत्नशील आहे. आपण यहोवाला सोडून इतर कोणाची किंवा इतर कशाची उपासना करावी असे दियाबलाला वाटते.—२ करिंथ. ४:४.

मृत्यूला सामोरे जावे लागले तरीसुद्धा ख्रिस्त येशूने आपली निष्ठा भंग होऊ दिली नाही. शेवटपर्यंत विश्‍वासू राहण्याद्वारे, येशूने इतर कोणत्याही मनुष्याने केले नव्हते अशा प्रकारे यहोवाचे गौरव केले. ख्रिस्ताचे खरे अनुयायी या नात्याने आज आपण त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून आपल्या निर्माणकर्त्याच्या उपासनेला इतर सर्व गोष्टींपेक्षा वरचे स्थान देतो. खरोखर, देवासोबतचा चांगला नातेसंबंध हीच आपली सर्वात मौल्यवान संपत्ती आहे.

देवाला आवडेल अशा प्रकारे उपासना केल्यामुळे मिळणारे आशीर्वाद

देवाच्या दृष्टीने “शुद्ध व निर्मळ धर्माचरण” किंवा उपासना केल्याने व इतरांनाही अशा प्रकारे उपासना करण्यास साहाय्य केल्याने आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात. (याको. १:२७) आज आपण अशा काळात राहात आहोत ज्यात बहुतेक लोक ‘केवळ स्वतःवर आणि स्वतःच्या पैशावरच प्रेम करतात. ते गर्विष्ठ व चांगल्याचा द्वेष करणारे आहेत.’ (२ तीम. ३:१-५, सुबोध भाषांतर) पण देवाच्या संघटनेत मात्र आपल्याला शुद्ध आचरण असलेल्या चांगल्या लोकांचा सहवास लाभतो, जे देवाच्या नीतिनियमांनुसार त्याची उपासना करण्याचा प्रयत्न करत आहेत. जगातील लोकांच्या तुलनेत अशा लोकांचा सहवास आपल्याला आनंददायक वाटत नाही का?

या जगापासून निष्कलंक राहिल्यामुळे आपल्याला आणखी एक आशीर्वाद मिळतो. तो म्हणजे एक शुद्ध विवेक. देवाच्या नीतिमान तत्त्वांचे पालन करून व कैसराचे जे कायदे देवाच्या कायद्यांच्या विरोधात जात नाहीत त्यांचे पालन करून आपण आपला शुद्ध विवेक टिकवून ठेवू इच्छितो.—मार्क १२:१७; प्रे. कृत्ये ५:२७-२९.

देवाची मनोभावे उपासना केल्यामुळे आपल्याला इतरही आशीर्वाद लाभतात. स्वतःच्या इच्छा-आकांक्षांपेक्षा जेव्हा आपण देवाच्या इच्छेनुसार वागण्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपले जीवन आणखी अर्थपूर्ण व समाधानकारक बनते. “चला, आपण खाऊ, पिऊ कारण उद्या मरावयाचे आहे,” अशी वृत्ती बाळगण्याऐवजी आपण पृथ्वीवर नंदनवनात सर्वकाळचे जीवन उपभोगण्याची आशा बाळगतो.—१ करिंथ. १५:३२.

प्रकटीकरणाचे पुस्तक अशा एका काळाविषयी सांगते, जेव्हा यहोवाची सातत्याने शुद्ध उपासना करणारे ‘मोठ्या संकटातून [बाहेर] येतील.’ “राजासनावर बसलेला त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील” असे हा अहवाल सांगतो. (प्रकटी. ७:१३-१५) राजासनावर बसलेला कोण आहे? तो सबंध विश्‍वातील सर्वात गौरवशाली व्यक्‍ती, अर्थात यहोवा देव आहे. यहोवा आपल्या मंडपात तुमचे स्वागत करील. तुमच्यावर कोणत्याही दुःखाची सावली पडू नये म्हणून तो तुम्हाला आपल्या पंखांखाली घेईल. त्या आनंदी काळाची तुम्ही कल्पना करू शकता का? काही प्रमाणात यहोवाचे हे प्रेम व संरक्षण आजही आपण अनुभवू शकतो.

शिवाय, जे देवाला आवडेल अशा प्रकारे त्याची उपासना करतात त्या सर्वांना “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ” नेले जाईल असे बायबल सांगते. आपल्याला सार्वकालिक जीवन मिळवता यावे म्हणून यहोवाने केलेल्या सर्व तरतुदींना हे जीवनदायी झरे सूचित करतात. ख्रिस्ताच्या खंडणीद्वारे “देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.” (प्रकटी. ७:१७) मानवजातीला परिपूर्ण बनण्यास साहाय्य केले जाईल. यामुळे पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा असलेल्यांना अवर्णनीय आनंद अनुभवण्यास मिळेल. आजही देवाचे आनंदी उपासक हर्षाने जयजयकार करतात. ते यहोवाला आपली मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्‍त करतात आणि त्याच्या स्वर्गीय उपासकांसोबत मिळून हे गीत गातात: “हे प्रभु देवा, हे सर्वसमर्था, तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत; हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही? कारण तूच मात्र पवित्र आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रगट झाली आहेत, म्हणून सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करितील.”—प्रकटी. १५:३, ४.

[२७ पानांवरील चित्र]

आज आपल्या उपासनेच्या बदल्यात सैतान काय देऊ करत आहे?