व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बाजारातील साक्षकार्य

बाजारातील साक्षकार्य

बाजारातील साक्षकार्य

अथेनै शहरात असताना प्रेषित पौल दररोज बाजारात जाऊन येशूबद्दल सुवार्ता सांगत असे. (प्रे. कृत्ये १७:१७) साधारणतः अथेनैकर दिवसातील बराचसा वेळ बाजारात घालवत. म्हणूनच, पौलाने बाजारात साक्षकार्य करण्याचे निवडले.

जवळजवळ २,००० वर्षानंतर आजही यहोवाचे साक्षीदार बाजारांत देवाच्या राज्याचा प्रचार करतात. का? कारण पुष्कळ लोक त्यांना तेथेच भेटू शकतात. आजकालचे बाजार म्हणजे शॉपिंग सेंटर किंवा मॉल. म्हणूनच, काही साक्षीदारांनी अशा ठिकाणी तेथील मालकाची अथवा मॅनेजरची परवानगी घेऊन एका टेबलावर किंवा स्टॅन्डवर आपले बायबल साहित्य प्रदर्शित केले आहे.

उदाहरणार्थ, अमेरिकेतील न्यू जर्सी येथील एका शॉपिंग मॉलमध्ये “कौटुंबिक नीतिमूल्ये कशी जपावीत?” या विषयावर आकर्षक पद्धतीने साहित्य प्रदर्शित करण्यात आले होते. याचा काय परिणाम झाला? एकाच दिवसात सहा भाषांतील १५३ पुस्तके लोकांना देण्यात आली.

पुस्तकांच्या स्टॅन्डजवळ आलेल्या एका स्त्रीने साक्षीदारांपैकी एकीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले. आपले जीवन व कुटुंब यात देवाच्या इच्छेला स्थान देणे महत्त्वाचे आहे हे तिने मान्य केले. तिने साक्षीदारांकडून ही पुस्तके घेतली: थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी), कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य, आणि तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे.

दुपारच्या वेळी एक माणूस पुस्तकांच्या स्टॅन्डजवळ असलेल्या दुकानात जात असताना त्याची नजर तरुणांचे प्रश्‍न या पुस्तकावर गेली. स्टॅन्डवर असलेल्या बहिणीने त्या माणसाच्या चेहऱ्‍यावरील कुतूहल पाहून “यांपैकी एखादे पुस्तक तुम्हाला आवडले का?” असे त्याला विचारले. मानेने होकार दर्शवत त्याने तरुणांचे प्रश्‍न या पुस्तकाकडे बोट दाखवले. तो वाकून ते पुस्तक घेणार तेवढ्यात तिने ते त्याला काढून दिले. त्याने आपल्याला तीन मुले असल्याचे सांगितले. बोलता-बोलता त्याने उल्लेख केला की आठवड्यातून एकदा तो त्यांच्याबरोबर चर्चा करत असतो. त्याची मोठी दोन मुले किशोरवयीन आहेत. पुस्तक चाळताना त्याने म्हटले की त्यांच्या कौटुंबिक चर्चांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्‍त ठरेल. बहिणीने कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकाकडेही त्याचे लक्ष वेधले. या पुस्तकातील सल्ला त्याला व त्याच्या पत्नीला कुटुंबासाठी निर्णय घेताना साहाय्यक ठरेल अशी खात्री तिने त्याला दिली. त्या मनुष्याने तिचे आभार मानले, दानही दिले आणि साक्षीदारांपैकी कोणी येऊन त्याला व त्याच्या कुटुंबाला भेटल्यास त्याला आवडेल असे सांगितले.

त्यादिवशी मॉलमध्ये केलेल्या प्रचाराबद्दल साक्षीदारांना कसे वाटले? एका बहिणीने म्हटले: “प्रचाराची ही पद्धत मला खूप आवडली. हा माझ्यासाठी एक उत्तम अनुभव होता!” दुसरी बहीण म्हणाली: “पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्तेचा प्रचार केला जाईल असे यहोवाने म्हटले आहे. आज न्यू जर्सीतील पॅरामसमध्ये वेगवेगळ्या भाषांतील लोकांपर्यंत ही सुवार्ता पोचली आहे. शॉपिंग मॉलमध्ये प्रचार करणे एक विलक्षण अनुभव होता. यामध्ये सहभागी झालेले सर्वच जण आनंदित झाले. घरी जायची कोणाचीच इच्छा नव्हती.”

तुम्हालाही सुवार्तेचा प्रचार करण्याच्या तुमच्या पद्धतीत नाविन्य आणता येईल का? घरोघरी जाऊन प्रचार करणे सुवार्ता घोषित करण्याचा आपला प्रमुख मार्ग आहे. (प्रे. कृत्ये २०:२०) तरीसुद्धा, शॉपिंग सेंटर किंवा मॉलमध्ये प्रचार करून पाहायला तुम्हाला आवडेल का?