व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे वचन सजीव आहे याकोबाच्या आणि पेत्राच्या पत्रांतील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे याकोबाच्या आणि पेत्राच्या पत्रांतील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे याकोबाच्या आणि पेत्राच्या पत्रांतील ठळक मुद्दे

येशूचा भाऊ याकोब याने सा.यु. ३३ च्या पेंटेकॉस्टनंतर जवळजवळ ३० वर्षांनी आत्मिक इस्राएलाच्या ‘बारा वंशांना’ एक पत्र लिहिले. (याको. १:१) त्यांना विश्‍वासात दृढ राहण्यासाठी आणि धीराने परीक्षांचा सामना करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या पत्राचा उद्देश होता. तसेच, मंडळ्यांमध्ये निर्माण झालेल्या खेदजनक परिस्थितींत सुधारणा करण्याचा सल्ला देखील त्याने आपल्या पत्रात दिला.

रोमी सम्राट नीरो याने सा.यु. ६४ मध्ये ख्रिश्‍चनांविरुद्ध छळाची मोहीम सुरू करण्याच्या थोड्याच काळाआधी, प्रेषित पेत्राने त्यांना विश्‍वासात खंबीर राहण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आपले पहिले पत्र लिहिले. यानंतर लिहिलेल्या दुसऱ्‍या पत्रात त्याने सहख्रिश्‍चनांना देवाच्या वचनाकडे लक्ष देण्याचे प्रोत्साहन आणि येऊ घातलेल्या यहोवाच्या दिवसाबद्दल इशारा दिला. खरोखर, याकोबाच्या व पेत्राच्या पत्रांतील संदेशांकडे लक्ष दिल्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो.—इब्री ४:१२.

‘विश्‍वासाने मागणाऱ्‍यांना’ देव ज्ञान प्रदान करतो

(याको. १:१-५:२०)

याकोबाने असे लिहिले: ‘जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण परीक्षेत उतरल्यावर त्याला जीवनाचा मुगूट मिळेल.’ जे यहोवाला ‘विश्‍वासाने मागतात’ त्यांना धैर्याने परीक्षांना तोंड देण्यासाठी तो आवश्‍यक असणारे ज्ञान प्रदान करतो.—याको. १:५-८, १२.

मंडळीत “शिक्षक” म्हणून कार्य करणाऱ्‍यांना देखील विश्‍वास व बुद्धी यांची आवश्‍यकता आहे. याकोबाने जिभेला ‘सर्व शरीर अमंगळ करणारा लहानसा अवयव’ असे म्हणून, देवासोबत आपला नातेसंबंध ज्यांमुळे धोक्यात येईल अशा जगिक प्रवृत्तींविषयी त्याने इशारा दिला. आध्यात्मिकदृष्ट्या रोगी असलेल्यांना बरे होण्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील याबद्दलही त्याने सांगितले.—याको. ३:१, ५, ६; ५:१४, १५.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:१३—कशा प्रकारे “दया न्यायावर विजय मिळवते”? जेव्हा देवाला आपला हिशेब द्यायची वेळ येते, तेव्हा आपण इतरांप्रती दाखवलेली दया तो लक्षात घेतो आणि त्याच्या पुत्राच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर आपल्याला क्षमा करतो. (रोम. १४:१२) ही गोष्ट आपल्याला इतरांना दया दाखवण्यास प्रेरित करत नाही का?

४:५—येथे याकोबाने कोणते वचन उद्धृत केले आहे? याकोबाने येथे कोणतेही विशिष्ट वचन उद्धृत केले नाही. पण, हे देवप्रेरित शब्द कदाचित उत्पत्ति ६:५; ८:२१; नीतिसुत्रे २१:१०; आणि गलतीकर ५:१७ या वचनांत व्यक्‍त केलेल्या सर्वसाधारण तत्त्वावर आधारित असतील.

५:२०—“पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवितो,” तो कोणाचा जीव वाचवील? एक ख्रिस्ती जो एका पापी माणसाला त्याच्या पापपूर्ण मार्गापासून फिरवतो, तो त्या पश्‍चात्तापी व्यक्‍तीचा जीव आध्यात्मिक मृत्यूपासून आणि कदाचित सदासर्वकाळच्या नाशापासून वाचवतो. त्या पापी व्यक्‍तीला अशा प्रकारे मदद करणारा तिच्या “पापांची रास झाकील.”

आपल्याकरता धडे:

१:१४, १५. पापाची सुरुवात अयोग्य इच्छेतून होते. त्यामुळे, अशा अयोग्य इच्छांना मनात घोळवत ठेवून आपण त्यांना आपल्या मनात घर करू देऊ नये. त्याऐवजी, उन्‍नतीला पोषक ठरणाऱ्‍या गोष्टींवर “मनन” करण्याद्वारे आपण त्यांना आपल्या मनात व अंतःकरणात रुजवले पाहिजे.—फिलिप्पै. ४:८.

२:८, ९. ‘तोंड पाहून वागणे’ हे प्रीतीच्या ‘राजमान्य नियमाच्या’ विरुद्ध आहे. त्यामुळे, खरे ख्रिस्ती तोंड पाहून वागत नाहीत.

२:१४-२६. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या किंवा ख्रिस्ती या नात्याने केलेल्या ‘कर्मांमुळे’ नव्हे, तर ‘विश्‍वासाच्या द्वारे आपले तारण’ होते. देवावर माझा विश्‍वास आहे केवळ एवढेच म्हणून चालत नाही. (इफिस. २:८, ९; योहा. ३:१६) तर, आपल्या विश्‍वासाने आपल्याला देवाच्या इच्छेनुसार वागण्यास प्रेरित केले पाहिजे.

३:१३-१७. ‘ऐहिक, इंद्रियजन्य, सैतानाकडल्या’ ज्ञानापेक्षा “वरून येणारे ज्ञान” हे निश्‍चितच कितीतरी श्रेष्ठ आहे! म्हणूनच, आपण ‘देवाच्या ज्ञानाला गुप्त निधीप्रमाणे उमगून काढले’ पाहिजे.—नीति. २:१-५.

३:१८. राज्य सुवार्तेचे बी “शांतीत पेरले जाते.” म्हणून, आपण उद्धट, भांडखोर किंवा बंडखोर असण्याऐवजी शांती करणारे असले पाहिजे.

“विश्‍वासात दृढ असे उभे राहा”

(१ पेत्र १:१-५:१४)

पेत्र सहख्रिश्‍चनांना त्यांच्या स्वर्गीय वतनाच्या ‘जिवंत आशेची’ आठवण करून देतो. “तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’” आहा असे तो त्यांना सांगतो. अधीन असण्याबाबत विशिष्ट सल्ला दिल्यानंतर, तो त्यांना “एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा,” असे म्हणून प्रोत्साहित करतो.—१ पेत्र १:३, ४; २:९; ३:८.

“[यहुदी व्यवस्थेचा] शेवट जवळ आला” असल्यामुळे, पेत्र बांधवांना असा सल्ला देतो: “मर्यादेने राहा, व प्रार्थना करण्यासाठी सावध असा.” तो त्यांना सांगतो: “सावध असा, जागे राहा; [सैतानाविरुद्ध] विश्‍वासांत दृढ असे उभे राहा.”—१ पेत्र ४:७; ५:८, ९.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

३:२०-२२बाप्तिस्म्यामुळे आपले तारण कसे होते? तारण प्राप्त करण्याची इच्छा असलेल्यांसाठी बाप्तिस्मा घेणे आवश्‍यक आहे. तरीपण, केवळ बाप्तिस्मा घेतल्याने आपले तारण होत नाही. खरेतर आपले तारण “येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे” होते. बाप्तिस्मा घेणाऱ्‍याने हा विश्‍वास बाळगला पाहिजे की येशूने आपले जीवन बलिदान केले, त्याचे पुनरुत्थान करण्यात आले आणि जिवंत लोकांवर व मृतांवर अधिकार प्राप्त करून तो “आता देवाच्या उजवीकडे आहे.” अशा विश्‍वासावर आधारित असणारा बाप्तिस्मा, ज्या ‘आठ जणांना पाण्यातून वाचविण्यात आले’ त्यांच्या तारणाशी लाक्षणिक अर्थाने जुळतो.

४:६—ज्या ‘मृतांना सुवार्ता सांगण्यात आली होती’ ते कोण होते? हे ते लोक होते जे ‘आपले अपराध व आपली पातके ह्‍यामुळे मृत झालेले,’ किंवा आध्यात्मिक रीत्या मृत असे होते. (इफिस. २:१) पण, सुवार्तेवर विश्‍वास ठेवल्यानंतर, ते आध्यात्मिक अर्थाने जिवंत झाले.

आपल्याकरता धडे:

१:७. आपला विश्‍वास श्रेष्ठ असा ठरण्यासाठी तो कसोटीवर खरा उतरलेला असावा. अशा प्रकारचा भक्कम विश्‍वास खरोखर आपल्या ‘जिवाचे तारण’ करेल. (इब्री १०:३९) म्हणून, आपल्या विश्‍वासाची परीक्षा होते तेव्हा आपण माघार घेऊ नये.

१:१०-१२. प्राचीन काळातील देवाच्या संदेष्ट्यांनी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांबद्दल लिहिलेली गहन आध्यात्मिक सत्ये न्याहाळून पाहण्याची व त्या गोष्टी समजून घेण्याची देवदूतांची इच्छा होती. पण, या गोष्टी यहोवाने मंडळीसोबत व्यवहार करण्यास सुरुवात केल्यानंतरच स्पष्ट झाल्या. (इफिस. ३:१०) तर मग, देवदूतांचे अनुकरण करून आपणही ‘देवाच्या गहन गोष्टींचा’ शोध करण्यासाठी झटू नये का?—१ करिंथ. २:१०.

२:२१. यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन करण्यासाठी, येशूप्रमाणे आपलीही दुःखे सहन करण्याची, आणि वेळ आल्यास मरण पत्करण्याचीही तयारी असली पाहिजे.

५:६, ७. आपण आपली सर्व चिंता यहोवावर टाकल्यास, तो आपल्याला पुढच्या दिवसाविषयी अनावश्‍यक चिंता करण्याऐवजी त्याच्या उपासनेला आपल्या जीवनात पहिले स्थान देण्यासाठी साहाय्य करतो.—मत्त. ६:३३, ३४.

यहोवाचा दिवस येईल

(२ पेत्र १:१-३:१८)

पेत्राने असे लिहिले: “संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.” म्हणून, आपण संदेष्ट्यांच्या वचनाकडे लक्ष दिल्यास ‘खोट्या शिक्षकांपासून’ आणि इतर भ्रष्ट व्यक्‍तींपासून आपले संरक्षण होऊ शकते.—२ पेत्र १:२१; २:१-३.

पेत्राने लिहिले: ‘शेवटल्या दिवसात थट्टेखोर लोक थट्टा करीत येतील.’ पण, ‘प्रभूचा [यहोवाचा] दिवस चोर येतो तसा येईल.’ म्हणूनच, “देवाचा दिवस येण्याची वाट पाहत” असलेल्यांना उपयुक्‍त सल्ला देऊन पेत्र आपल्या पत्राचा शेवट करतो.—२ पेत्र ३:३, १०-१२.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:१९—“पहाटचा तारा” कोण आहे, तो केव्हा उगवतो आणि तो आता उगवला आहे हे आपल्याला कसे कळते? “पहाटचा तारा,” राज्य सामर्थ्य मिळवलेल्या येशू ख्रिस्ताला सूचित करतो. (प्रकटी. २२:१६) सन १९१४ मध्ये जणू एका नव्या दिवसाची पहाट झाल्याची घोषणा करत, मशीही राज्याचा राजा या नात्याने सर्व सृष्टीत त्याचा उदय झाला. रूपांतराच्या दृष्टान्ताने येशूच्या गौरवाची व राज्यसत्तेची आधीच झलक दिली होती. तसेच, देवाचे भविष्यसूचक वचन निश्‍चितच पूर्ण होईल याचीही त्यामुळे खात्री पटली. या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष दिल्यास ते आपल्या हृदयात प्रकाशते आणि अशा प्रकारे आपल्याला कळते की पहाटचा तारा उगवला आहे.

३:१७—पेत्राने “तुम्हाला पूर्वीपासून कळत” आहे असे म्हटले याचा अर्थ काय? पेत्र येथे देवाच्या प्रेरणेने त्याला व इतर बायबल लेखकांना देण्यात आलेल्या भविष्यातील घटनांच्या पूर्वज्ञानाचा उल्लेख करत होता. हे ज्ञान अमर्यादित नसल्याने, सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांना भविष्यात घडणाऱ्‍या घटनांची संपूर्ण माहिती नव्हती. तर, भविष्यात काय घडू शकते याची त्यांना केवळ सर्वसाधारण कल्पना होती.

आपल्याकरता धडे:

१:२, ५-७. विश्‍वास, धीर आणि सुभक्‍ती हे गुण उत्पन्‍न केल्याने आपल्याला “देव व आपला प्रभु येशू ह्‍यांच्या ओळखीने” किंवा यथार्थ ज्ञानाने वाढत जाण्यास, तसेच, त्या ज्ञानासंदर्भात “निष्क्रिय व निष्फळ” न होण्यास साहाय्य मिळेल.—२ पेत्र १:८.

१:१२-१५. ‘सत्यात स्थिर असण्यासाठी’ आपल्याला मंडळीच्या सभा, वैयक्‍तिक अभ्यास आणि बायबल वाचन यांच्याद्वारे वारंवार मिळणाऱ्‍या सूचनांची गरज आहे.

२:२. आपल्या आचरणामुळे यहोवा व त्याच्या संघटनेवर कलंक येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे.

२:४-९. यहोवाने गतकाळात जे काही केले त्यावरून आपण खात्री बाळगू शकतो की “भक्‍तिमान्‌ लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान्‌ लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे [त्याला] कळते.”

२:१०-१३. ‘थोर’ जनांमध्ये म्हणजेच ख्रिस्ती वडीलांमध्ये उणिवा असतात आणि कधीकधी तेही चुकू शकतात, तरीही आपण त्यांचा अपमान होईल अशा प्रकारे कधीही बोलू नये.—इब्री १३:७, १७.

३:२-४, १२. ‘पूर्वी सांगितलेल्या वचनांकडे आणि तारणाऱ्‍या प्रभुने प्रेषितांच्या द्वारे दिलेल्या आज्ञांकडे’ काळजीपूर्वक लक्ष दिल्यास, जवळ येत असलेला यहोवाचा दिवस डोळ्यांपुढे ठेवण्यास आपल्याला साहाय्य मिळेल.—२ पेत्र ३:२-४, १२.

३:११-१४. ‘देवाचा दिवस येण्याची वाट पाहणारे’ या नात्याने आपण (१) शारीरिक, मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक शुद्धता बाळगण्याद्वारे ‘वर्तणुकीत पवित्र’ असावे; (२) राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याशी संबंधीत असलेल्या ‘सुभक्‍तीच्या’ कार्यांत मग्न असावे; (३) आपले आचरण व व्यक्‍तिमत्त्व जगापासून “निष्कलंक” ठेवावे; (४) सर्व गोष्टी शुद्ध हेतूने करण्याद्वारे “निर्दोष” असावे; आणि (५) देवासोबत, आपल्या ख्रिस्ती बांधवांसोबत आणि इतरांसोबत “शांतीत” असावे.