व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तो स्वतःच्या चुकांतून धडा शिकला

तो स्वतःच्या चुकांतून धडा शिकला

त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा

तो स्वतःच्या चुकांतून धडा शिकला

त्याला हा भयानक आवाज नकोसा वाटत होता. हा धडकी भरविणारा आवाज जहाजाच्या मोठमोठ्या खांबांवर घासणाऱ्‍या दोरांचा किंवा जहाजावर येऊन आदळणाऱ्‍या डोंगरलाटांचा अथवा जहाजाच्या लाकडांचा नव्हता. तर त्याला जहाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी धावपळ करणाऱ्‍या व धांदल उडालेल्या खलाश्‍यांच्या किंकाळ्या नकोशा वाटत होत्या. हे सर्व लोक आपल्यामुळे मरणार आहेत हे योनाने ताडले.

पण कशामुळे योना या परिस्थितीत अडकला होता? यहोवा देवाबरोबरील त्याच्या वागण्यात त्याने एक गंभीर चूक केली होती. काय केले होते त्याने? त्याने जी चूक केली होती ती सुधारली जाऊ शकत नव्हती का? या प्रश्‍नांची उत्तरे मिळवल्याने आपण बरेच काही शिकू शकतो. जसे की विश्‍वासात असलेल्या चांगल्या-चांगल्या लोकांकडून देखील चुका होऊ शकतात व ते चुका कसे सुधारू शकतात हे योनाच्या उदाहरणातून आपण शिकू शकतो.

गालीलातील एक संदेष्टा

योनाचे नाव घेताच लोकांच्या मनात त्याने देवाची आज्ञा मानली नाही किंवा तो हट्टी होता असे नकारात्मक गुण येतात. पण योनात इतरही चांगले गुण होते जे आपण माहीत करून घेतले पाहिजेत. योनाला यहोवाने आपला संदेष्टा म्हणून निवडले होते ही गोष्ट विसरू नका. योना जर अविश्‍वासू किंवा अनीतिमान असता तर यहोवाने त्याला इतक्या मोठ्या कामगिरीसाठी निवडले नसते.

दुसरे राजे १४:२५ या वचनातून योनाची आपल्याला थोडक्यात माहिती मिळते. तो गथ-हेफेरचा होता. गथ-हेफेर हे, सुमारे ८०० वर्षांनंतर येशू ख्रिस्त जेथे लहानाचा मोठा होणार होता त्या नासरेथपासून ४ किलोमीटरच्या अंतरावर होते. * इस्त्राएलाच्या दहा गोत्रांवर राज्य करणारा यराबाम-दुसरा याच्या कारकीर्दीत योनाने संदेष्टा म्हणून कार्य केले. एलीयाने येथे कार्य करून बराच काळ उलटला होता. तसेच त्याच्यानंतर संदेष्टा म्हणून सेवा करणारा एलीशा देखील यराबामच्या वडिलांच्या कारकीर्दीत मरण पावला होता. यहोवाने बआल उपासना काढून टाकण्यासाठी या संदेष्ट्यांचा उपयोग केला होता; तरीसुद्धा इस्त्राएल लोक जाणूनबुजून खऱ्‍या उपासनेपासून बहकत होते. आणि आता तर इस्राएल देशावर, “परमेश्‍वराच्या दृष्टीने जे वाईट ते” करणारा राजा राज्य करत होता. (२ राजे १४:२४) त्यामुळे, योनाची कामगिरी सोपी किंवा सुखद नव्हती. तरीही त्याने ती विश्‍वासूपणे पार पाडली.

पण एकदा, योनाच्या जीवनाला एक नाट्यमय वळण लागले. यहोवाकडून त्याला एक कामगिरी मिळाली. ही कामगिरी पूर्ण करण्याचे त्याच्या जीवावर आले. यहोवाने त्याला काय करण्यास सांगितले होते?

‘ऊठ, निनवे शहरास जा’

यहोवाने योनास सांगितले: “ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्याविरुद्ध आरोळी कर; कारण त्याची दुष्टता मजपुढे आली आहे.” (योना १:२) ही कामगिरी कठीण का होती, ते आपण समजू शकतो. निनवे शहर, गालीलपासून ८०० किलोमीटर दूर पूर्वेस होते. तेथे पायी जाण्यासाठी जवळजवळ एक महिना लागणार होता. तरीपण पायी जायचा हा प्रवास, निनवेकरांना यहोवाच्या न्यायदंडाची घोषणा करण्याच्या तुलनेत सोपाच म्हणावा लागेल. कारण निनवेचे अश्‍शूरी लोक अतिशय हिंसक व क्रूर होते. अशा लोकांना योनाला यहोवाच्या न्यायदंडाचा संदेश सांगायचा होता. योनाला जर देवाच्या उपासकांमध्येच इतका कमी प्रतिसाद मिळाला होता तर या मूर्तीपूजक लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची तो अपेक्षा तरी कशी करू शकत होता? नंतर ज्याला ‘रक्‍तपाती नगरी’ असे म्हटले जाणार होते त्या इतक्या मोठ्या निनवे शहराला हा एकटा-दुकटा यहोवाचा सेवक कसा काय बरे संदेश सांगणार होता?—नहूम ३:१, ७.

हे सर्व विचार योनाच्या मनात आले असतील किंवा नसतील याविषयी आपल्याला निश्‍चित काहीही माहीत नाही. आपल्याला फक्‍त इतके माहीत आहे, की ही कामगिरी मिळाल्याबरोबर तो गालीलातून पसार झाला. यहोवाने त्याला पूर्वेकडे जायला सांगितले तर योना पश्‍चिमेकडे, होता होईल तितका दूर पळाला. तो योफा नावाच्या एका बंदर शहरात गेला आणि तेथे तार्शिशला जाणाऱ्‍या जहाजात चढला. तार्शिश हे आजच्या स्पेनमध्ये होते, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. हे जर बरोबर असेल, तर योना निनवेच्या अगदी विरुद्ध दिशेला ३,५०० किलोमीटर दूर चालला होता. त्या काळात, भूमध्य समुद्राला महान समुद्र म्हटले जायचे. तर या महान समुद्राच्या दुसऱ्‍या टोकाला जायला योनाला जवळजवळ एक वर्ष तरी लागले असते! यहोवाने दिलेल्या कामगिरीपासून योनाने इतक्या दूर जायचे ठरवले होते, की तो हा वर्षभराचा प्रवासही करायला तयार झाला होता!

यावरून, योना भितरा होता, असा निष्कर्ष आपण काढला पाहिजे का? त्याच्याविषयी असा काहीही विचार आपण करू नये. कारण, त्याने किती धैर्य दाखवले होते हे आपण पुढे पाहणार आहोत. योना आपल्या सर्वांप्रमाणेच एक अपरिपूर्ण मनुष्य होता व आपल्या कमतरतांशी झुंजत होता. (स्तोत्र ५१:५) आपल्यात असा कोण आहे जो कधी भीतीने डळमळत नाही?

देव आपल्याला, कधीकधी कठीण किंवा अशक्य वाटणाऱ्‍या गोष्टी करायला सांगतो, असे कदाचित आपल्याला वाटेल. ख्रिश्‍चनांना देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. आणि कधीकधी या आज्ञेचे पालन करण्यास आपल्याला जड वाटेल. (मत्तय २४:१४) “देवाला सर्व काही शक्य आहे,” या येशूने सांगितलेल्या गहन सत्याचा कधीकधी आपल्याला सहजपणे विसर पडू शकतो. (मार्क १०:२७) आणि जर आपल्याबाबतीत असे कधीकधी होऊ शकते तर योनाच्याबाबतीतही असे घडण्याची शक्यता होती. पण योनाच्या या पळून जाण्याचा काय परिणाम झाला?

यहोवा आपल्या भरकटलेल्या संदेष्ट्याचे ताडन करतो

आता तुम्ही कल्पना करू शकता. योना ज्या जहाजात चढतो ते कदाचित फिनिशयन मालवाहू जहाज असावे. थोड्याच वेळात जहाज बंदरावरून निघणार असल्यामुळे, जहाजाच्या कप्तानाची व त्याच्याबरोबर असलेल्या इतर खलाशांची पळापळ चालल्याचे योना पाहतो. आणि मग हळूहळू जहाज जसजसे बंदर सोडते व किनारा नाहीसा होऊ लागतो तसतसे योनालाही, सुटलो एकदाचं म्हणून हायसे वाटले असेल. तो असा विचार करतो न करतो तोच, अचानक हवामान बदलते.

जोराचा वारा सुटतो, इतका वेळ शांत असलेला समुद्र रौद्ररुप धारण करतो. इतक्या मोठमोठ्या लाटा उसळू लागतात, की आजकालची जहाजेसुद्धा त्याच्यापुढे ठेंगणी दिसू लागतील. समुद्रात उसळणाऱ्‍या उंच डोंगरलाटांमध्ये खेळण्याप्रमाणे वाटणारे हे लाकडी जहाज किती काळ टिकणार होते? ‘परमेश्‍वरानेच समुद्रात प्रचंड वायु सोडला’ होता हे जे योनाने नंतर लिहीले ते त्याला त्या प्रसंगी माहीत होते का? सांगता येत नाही. त्याला फक्‍त इतके माहीत होते की जहाजातील लोक आपापल्या दैवतांचा धावा करू लागले पण त्यांना कोणीही मदत करू शकणार नव्हते. त्याने असे लिहिले: “जहाज फुटण्याच्या लागास आले” होते. (योना १:४; लेवीय १९:४) पण ज्या देवापासून तो दूर पळत होता त्याला तो कोणत्या तोंडाने प्रार्थना करू शकत होता?

योनाचे हातपाय गळून जातात, तो जहाजाच्या तळाशी जाऊन झोपतो. आणि पडल्या पडल्या त्याला गाढ झोप लागते. * पण जहाजाचा कॅप्टन जेव्हा योनाला पाहतो तेव्हा तो त्याला उठवत म्हणतो की तूही इतरांप्रमाणे तुझ्या देवाचा धावा कर. हे वादळ काही साधेसुधे वादळ नसल्याची खातरी खलाशांनाही पटल्यामुळे कोणामुळे हे संकट ओढवले होते ते जाणून घेण्यासाठी चिठ्ठ्या टाकायचे ठरवतात. चिठ्ठ्या टाकल्यावर एकएक जण जसजसा सुटत जातो तसतसे योनाच्या मनातील धडकी वाढत राहते. लवकरच सत्य उघडकीस येते. हे वादळ यहोवानेच आणले होते. शिवाय चिठ्ठ्या सुद्धा एकाच व्यक्‍तीकडे अर्थात योनाकडे बोट दाखवत होत्या, यातही यहोवाचाच हात होता.—योना १:५-७.

योना या लोकांना सर्वकाही खरं खरं सांगतो. तो सर्वशक्‍तिमान यहोवा देव याचा सेवक आहे आणि याच देवाने सांगितलेल्या कामापासून तो पळून जात असल्यामुळे तो नाराज झाला होता त्यामुळे त्याने हे भयंकर संकट आणले होते. योनाचे बोलणे ऐकून हे लोक भांबावून जातात. योना त्यांचे भेदरलेले डोळे पाहतो. मग आता, जहाज व त्याजवरील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी त्याचे काय करावे, म्हणून ते त्याला विचारतात. योना त्यांना काय सांगतो? आपण त्या थंड व खवळलेल्या समुद्रात बुडत आहोत अशी नुसती कल्पना करूनच योनाच्या पोटात गोळा आला असेल! पण याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्याला पाण्यात टाकले तरच या लोकांचे प्राण वाचू शकतील, हे माहीत असूनही तो गप्प कसा राहू शकत होता? त्यामुळे तो त्यांना म्हणतो: “मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे.”—योना १:१२.

हे भितरेपणाचे लक्षण वाटते का? मुळीच नाही. या आणीबाणीच्या प्रसंगी योनाची धैर्यशील, आत्म-त्यागी मनोवृत्ती पाहून यहोवाला किती आनंद झाला असेल. येथे आपल्याला योनाच्या भक्कम विश्‍वासाचा पुरावा पाहायला मिळतो. स्वतःपेक्षा इतरांच्या हिताला प्राधान्य देऊन आपण आज योनाच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो. (योहान १३:३४, ३५) शारीरिकरीत्या, भावनिकरीत्या किंवा आध्यात्मिकरीत्या कोणाला मदत हवी असल्याचे आपण पाहतो तेव्हा आपण त्यांना मदत करण्यासाठी लगेच धावून जातो का? असे जर आपण करत असू तर यहोवाला आपण खरोखरच खूप आनंदित करू.

योनाचे बोलणे ऐकल्यावर कदाचित खलाशांना देखील खूप भरून आले असेल कारण सुरूवातीला त्याला समुद्रात फेकून द्यायला ते तयार झाले नाहीत. उलट या भयंकर वादळातून मार्ग काढण्याकरता त्यांनी इतर बरेच प्रयत्न करून पाहिले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. हे तुफान आणखीनच रौद्र रूप घेऊ लागले होते. शेवटी, काही पर्याय नसल्याचे त्यांना जाणवू लागले. योनाचा देव, यहोवा याने दया करावी म्हणून त्यांनी त्याचा धावा करून योनाला उचलले व समुद्रात फेकून दिले.—योना १:१३-१५.

योनाला दया दाखवली जाते व त्याला मुक्‍त केले जाते

समुद्रात पडल्यावर सुरुवातीला लाटांनी त्याला झेलले असावे. नंतर मात्र त्याने पोहत राहण्याचा प्रयत्न केला असेल. समुद्राच्या फेसाळ पाण्यात पडल्यावर, त्याला जहाज त्याच्यापासून दूर जात असल्याचे दिसले असावे. पण तो जास्त वेळ पाण्यावर राहू शकला नाही. लाटांनी त्याला आत खेचून घेतले. आणि तो समुद्रात आणखी बुडू लागला. समुद्रातील पाण्यात आणखी खोलवर बुडत असताना त्याच्या मनात विचार आला असेल की आता सर्वकाही संपले.

या प्रसंगी त्याच्या मनात कोणकोणते विचार आले होते ते त्याने नंतर सांगितले आहे. त्याच्या मनात काही दृश्‍ये तरळून गेली. जेरूसलेममधील यहोवाचे भव्य व देखणे मंदिर त्याला कधी पाहायला मिळणार नाही, याची त्याला खंत वाटली. आपण समुद्राच्या पोटात व पर्वतांच्या तळी जात आहोत, व समुद्रातील शेवाळाने त्याला वेढा घातला आहे, अशी त्याला जाणीव झाली. हीच आपली कबर आहे असे त्याला वाटले.—योना २:२-६.

पण थांबा! त्याच्या जवळपास काहीतरी मोठे, काळ्या रंगाचे घुटमळत असल्याचे त्याला जाणवते. तो एक भला मोठा मासा असतो, जो त्याच्या जवळ येऊन त्याच्याकडे बघतो. आणि मग आपला जबडा उघडून योनाला एका झटक्यात गिळतो.

आता आपण काही जिवंत राहत नाही, असे योनाला वाटले असावे. पण नाही, त्याला काहीतरी चमत्कारीक घडत असल्याचे जाणवले. तो अजूनही जिवंत आहे! या माशाने त्याचे तुकडे केले नाहीत, गिळल्यावर त्याला पचवले नाही, इतकेच काय तर योनाला गुदमरल्यासारखेही वाटले नाही. त्याची कबर बनू शकणाऱ्‍या माशाच्या पोटातही त्याचा श्‍वास चालू होता. हळूहळू योनाच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होते. त्याचा देव यहोवा यानेच “योनाला गिळण्यास एक प्रचंड मत्स्य सिद्ध केला होता.” *योना १:१७.

मिनिटे सरत जातात, तासांमागून तास निघून जातात. योनाने आयुष्यात पूर्वी कधी इतका घनघोर अंधकार पाहिला नव्हता. या अंधारात त्याला यहोवा देवाचा विचार करण्याकरता व त्याला प्रार्थना करण्याकरता वेळ मिळाला होता. योनाच्या दुसऱ्‍या अध्यायात लिखित असलेली त्याची प्रार्थना त्याच्याविषयी बरेच काही सांगून जाते. यावरून योना शास्त्रवचनांत पारंगत होता असे दिसते, कारण त्याने अनेकदा स्तोत्रसंहिता पुस्तकातल्या उताऱ्‍यांचा उल्लेख केला आहे. त्याच्या या प्रार्थनेतून त्याची कृतज्ञ मनोवृत्ती देखील दिसून येते. योनाने शेवटी असे म्हटले: “मी तुला आभारप्रदर्शनाचे यज्ञ करीन; मी केलेले नवस फेडीन; तारण परमेश्‍वरापासून होते.”—योना २:९.

यहोवा कोणाचेही, कुठेही व कधीही तारण करू शकतो, ही गोष्ट योना शिकला होता. अगदी ‘माशाच्या पोटातही’ यहोवाने आपल्या या त्रस्त सेवकाची दखल घेऊन त्याला वाचवले होते. (योना १:१७) फक्‍त यहोवाच एखाद्याला, एका मोठ्या माशाच्या पोटात तीन दिवस व तीन रात्र जिवंत ठेवू शकतो. यहोवा हा असा देव आहे ‘ज्याच्या हाती आपला प्राण आहे’ ही गोष्ट आपण आजही लक्षात ठेवली पाहिजे. (दानीएल ५:२३) आपला प्रत्येक श्‍वास, आपले अस्तित्व त्याच्यामुळेच आहे. तेव्हा आपण त्याचे आभार मानले पाहिजे व त्याच्या आज्ञेत राहिले पाहिजे, नाही का?

योनाचे काय झाले? आज्ञाधारकता दाखवून त्याने यहोवाचे आभार मानले का? होय. तीन दिवस व तीन रात्रींनंतर, तो मासा किनाऱ्‍यावर येतो आणि तो “योनास कोरड्या भूमीवर ओकून” टाकतो. (योना २:१०) कल्पना करा, योनाला समुद्रातून पोहत बाहेर यावे लागले नाही! मात्र, त्या माशाने त्याला ज्या किनाऱ्‍यावर ओकून टाकले होते तेथून योनाला स्वतःचा मार्ग स्वतःच शोधावा लागला असेल. पण, यानंतर लगेचच त्याच्या आज्ञाधारकतेची परीक्षा होती. योना ३:१, २ मध्ये असे म्हटले आहे: “परमेश्‍वराचे वचन दुसऱ्‍याने योनाला प्राप्त झाले की, ऊठ; त्या मोठ्या निनवे शहरास जा व मी तुला सांगेन तो संदेश त्यास आरोळी करून सांग.” तेव्हा योनाने काय केले?

तो कचरला नाही. त्याच्याविषयी आपण असे वाचतो: “तेव्हा योना उठून परमेश्‍वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला.” (योना ३:३) योनाने परमेश्‍वराच्या आज्ञेचे पालन केले. तो स्वतःच्या चुकांतून धडा शिकला होता. याबाबतीतही आपण योनाच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे. आपण सर्व जण पापी असल्यामुळे आपल्या हातून चुका होतातच. (रोमकर ३:२३) पण मग आपण हार मानतो का? की, आपल्या चुकांतून धडा शिकतो व पुन्हा आज्ञाधारकतेने देवाची सेवा करू लागतो?

योनाच्या आज्ञेधारकतेचे यहोवाने त्याला प्रतिफळ दिले का? होय. योनाला नंतर कळते, की ज्या खलाशांनी त्याला समुद्रात फेकले होते, ते त्या वादळातून सुखरूप पार झाले होते. योना जेव्हा स्वतःहून पुढे आला तेव्हा खलाशांनी त्याला पाण्यात टाकले होते. आणि पाण्यात टाकल्या टाकल्या खवळलेला समुद्र शांत झाला होता. तेव्हा या खलाशांना “परमेश्‍वराचा फार धाक पडला” व आपल्या खोट्या दैवतांऐवजी त्यांनी यहोवाला यज्ञ केला होता.—योना १:१५, १६.

योनाला आणखी कोणता आशीर्वाद मिळाला? येशूने, योना माशाच्या पोटात जितके दिवस होता त्याची भविष्यसूचक तुलना तो स्वतः कबरेत अर्थात शिओल मध्ये असणार होता त्या काळाशी केली. (मत्तय १२:३८-४०) योनाला पुन्हा जिवंत केल्यावर तो या आशीर्वादाविषयी ऐकेल तेव्हा त्याला किती आनंद होईल! (योहान ५:२८, २९) तुम्हालाही आशीर्वाद देण्याची यहोवाची इच्छा आहे. योनाप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या चुकांतून धडा शिकून आज्ञाधारक व आत्म-त्यागी मनोवृत्ती दाखवण्यास तयार आहात का? (w०९ १/१)

[तळटीपा]

^ योनाचा जन्म एका गालीली शहरात झाला होता, ही गोष्ट उल्लेखण्याजोगी आहे. कारण, परूशी अगदी तोंड वर करून येशूविषयी असे म्हणाले होते: “शोध करुन पाहा, की गालीलातून कोणी संदेष्टा उद्‌भवत नाही.” (योहान ७:५२) अनेक भाषांतरकार व संशोधक असे म्हणतात, की गालीलातून कोणी संदेष्टा आजपर्यंत आला नाही व पुढेही येणार नाही, असे परुशी मोघमपणे बोलले होते. हे लोक खरोखरच मोघमपणे बोलत असतील तर याचा अर्थ ते इतिहास तसेच भविष्यवाणी यांच्याकडे कानाडोळा करत होते.—यशया ९:१, २.

^ योनाला किती गाढ झोप लागली होती यावर जोर देण्याकरता, सेप्ट्युजंट मध्ये, तो घोरू लागला होता, हा वाक्यांश आढळतो. यावरून, योना किती बेफिकीर होता, असा आपण निष्कर्ष काढू नये. कारण, कधीकधी जे खूप निराश झालेले असतात त्यांच्याही डोळ्यांवर खूप झोप असते, ही गोष्ट खरी असल्याचे आपण आणखी एका घटनेवरून सांगू शकतो. गथशेमाने बागेतील येशूच्या मृत्यूच्या काही तासाआधी त्या तणावपूर्ण काळात, पेत्र, याकोब व योहान ‘खिन्‍न झाल्यामुळे झोपी गेले होते.’—लूक २२:४५.

^ इब्री भाषेतील “प्रचंड मत्स्य” या शब्दाचे ग्रीकमध्ये “समुद्री राक्षस,” किंवा “अवाढव्य मासा” असे भाषांतर करण्यात आले आहे. योनाला नेमक्या कोणत्या माशाने गिळले असावे हे निश्‍चितपणे सांगता येत नसले तरी, अख्ख्या माणसाला गिळंकृत करू शकतील इतके मोठमोठे शार्क मासे भूमध्य समुद्रात असल्याचे पाहण्यात आले आहे. इतर ठिकाणी तर याहीपेक्षा मोठे शार्क आहेत. यांना व्हेल शार्क म्हणतात व ते १५ मीटर किंवा त्याच्यापेक्षा अधिक मोठे वाढू शकतात!

[३१ पानांवरील चौकट/चित्र]

योना टीकाकारांच्या कचाट्यात सापडतो

▪ बायबलमधील योना नावाच्या पुस्तकात नमूद असलेल्या घटना खरोखरच घडल्या होत्या का? प्राचीन काळापासूनच या पुस्तकावर टीकाझोड होत आहे. हायर क्रिटिसिझम अर्थात उच्च टीकेच्या या युगात, योनाचे पुस्तक, हे बोथकथा, दंतकथा, कल्पित कथा किंवा कादंबरी आहे असे सहसा म्हटले जाते. एकोणीसाव्या शतकातील एका लेखकाने, एका पाळकाविषयी सांगितले ज्याने, योना व मोठ्या माशाचा अहवाल एक दंतकथा असल्याचे म्हटले. त्या पाळकाने असे म्हटले, की योना योफा येथे द साईन ऑफ द व्हेल नावाच्या एका हॉटेलमध्ये उतरला होता. आणि बिल भरण्याइतके पैसे त्याच्याजवळ नव्हते तेव्हा हॉटेल मालकाने त्याला हॉटेलमधून बाहेर हाकलले. अशाप्रकारे, योनाला एका व्हेलने “गिळले” अर्थात आत घेतले व नंतर “बाहेर ओकून टाकले” अर्थात हाकलून दिले! असे दिसते, की त्या प्रचंड माशापेक्षा हे बायबल टीकाकारच योनाला गिळंकृत करू पाहत होते!

पण बायबलमधले हे पुस्तक विश्‍वसनीय नाही, असे अनेक लोकांना का वाटते? कारण यांत अनेक चमत्कारांचा उल्लेख करण्यात आला आहे. पुष्कळ टीकाकारांच्या मनात चमत्कारांविषयी एक पूर्वकल्पित धारणा आहे. त्यांच्या मते, अशा गोष्टी होणे शक्यच नाही. पण असा विचार खरोखरच तर्काला पटण्याजोगा आहे का? बायबलच्या सर्वात पहिल्या वाक्यात असे म्हटले आहे: “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्‍न केली.” (उत्पत्ति १:१) आता स्वतःला विचारा: ‘या वाक्यावर माझा विश्‍वास आहे का?’ संपूर्ण जगभरातील कोट्यवधी समंजस लोक, या साध्याशा सत्यावर विश्‍वास करतात. खरे तर, या एकाच वाक्यात, बायबलमध्ये नंतर वर्णन केलेल्या इतर चमत्कारांपेक्षा अनेक चमत्कार समाविष्ट आहेत.

उदाहरणार्थ: ज्याने तारांगण व पृथ्वीवरील सर्व विस्मयकारी क्लिष्ट गोष्टी बनवल्या आहेत त्याच्यासाठी, योनाच्या पुस्तकात सांगितलेली कोणतीही गोष्ट करणे अशक्य असू शकेल का? जसे की वादळ आणणे, एका प्रचंड माशाला एका मनुष्याला गिळंकृत करायला लावणे आणि त्या माशाला पुन्हा त्या माणसास बाहेर ओकून टाकायला लावणे, हे सर्व करणे शक्य नसेल का? ज्याच्याकडे असीम सामर्थ्य आहे तो या गोष्टी चुटकीसरशी घडवून आणू शकतो.—यशया ४०:२६.

प्रत्येक वेळा चमत्कारिक गोष्टी देवाकडूनच होतात असे नाही. जसे की, १७५८ साली म्हणे, एक खलाशी भूमध्य समुद्रात आपल्या जहाजातून जात असताना तोल जाऊन पाण्यात पडला व एका शार्कने त्याला गिळले. पण, या शार्कच्या दिशेने एक तोफगोळा फेकण्यात आला. तो तोफ लागल्याबरोबर शार्कने त्या गिळलेल्या माणसाला बाहेर ओकले व या माणसाला इतर लोकांनी लगेच ओढले. त्या माणसाच्या अंगावर कुठेही जखमा नव्हत्या. ही गोष्ट जर खरी आहे तर आपण तिला लगेचच, उल्लेखनीय, आश्‍चर्यकारक म्हणू. पण चमत्कार झाल्याचे आपण म्हणणार नाही. मग ज्या देवाकडे शक्‍ती आहे तो याहीपेक्षा काहीतरी अद्‌भुत करू शकणार नाही का?

टीकाकारांचे असेही म्हणणे आहे, की कोणीही मनुष्य न गुदमरता, माशाच्या पोटात तीन दिवस जिवंत राहू शकत नाही. पण माणूस जर, टाक्यांमध्ये प्राणवायू कसा भरायचा व पाण्याखाली जास्त वेळ राहता यावे म्हणून त्या टाक्यांतील प्राणवायूचा उपयोग कसा करायचा याचा शोध लावण्याइतपत हुशार आहे तर देव आपल्या अमर्याद शक्‍तीचा उपयोग करून योनाला तीन दिवस जिवंत ठेवण्याकरता आपल्या बुद्धीचा उपयोग करू शकत नाही का? यहोवाच्या एका देवदूताने एकदा, येशूची आई मरीया हिला असे म्हटले होते: “देवाला काहीच अशक्य होणार नाही.”—लूक १:३७.

आणखी कोणत्या गोष्टीमुळे योनाचे पुस्तक ऐतिहासिकरीत्या अचूक आहे? जहाज व जहाजावरील खलाशांबद्दल योनाने अगदी बारीकसारीक व वास्तविक वर्णन दिले आहे. योना १:५ येथे आपण असे वाचतो, की जहाज हलके करण्याकरता खलाशी त्यावरील माल समुद्रात फेकू लागले होते. हवामान बिघडल्यावर जहाजावरील खलाशी सहसा असेच करायचे, असे प्राचीन इतिहासकार आणि रब्बींचा नियम देखील दाखवतो. योनाने निनवे शहराविषयी नंतर दिलेले वर्णन देखील ऐतिहासिक व पुरातत्त्वीय पुराव्यांशी जुळते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येशू ख्रिस्ताने, योना माशाच्या पोटात असलेल्या तीन दिवसांचा उल्लेख तो स्वतः कबरेत राहणार असलेल्या तीन दिवसांशी केला. (मत्तय १२:३८-४०) योनाची कथा ही सत्यकथा होती, हे येशूच्या साक्षीवरून स्पष्ट होते. (w०९ १/१)

“देवाला काहीच अशक्य होणार नाही.”—लूक १:३७.