व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या प्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा

देवाच्या प्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा

देवाच्या जवळ या

देवाच्या प्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा

उत्पत्ति २२:१-१८

अब्राहामाचे देवावर अतीव प्रेम होते. या कुलपित्याचा, म्हातारपणात त्याला झालेल्या पुत्रावर अर्थात इसहाकावरही खूप जीव होता. परंतु, इसहाक कदाचित २५ वर्षांचा होता तेव्हा पिता या नात्याने त्याच्या भावनांची परीक्षा पाहणारा एक प्रसंग अब्राहामासमोर आला—देवाने त्याला त्याच्या एकुलत्या एका पुत्राचे अर्पण करण्यास सांगितले. परंतु, या प्रसंगातून इसहाकचा जीव वाचला. तो कसा? अब्राहाम आपल्या मुलाला वधणार तेवढ्यात देवाने आपल्या दूताकरवी त्याला रोखले. उत्पत्ति २२:१-१८ यातील बायबल अहवाल, देवाचे आपल्यावर किती प्रेम आहे याची भविष्यसूचक झलक देतो.

“देवाने अब्राहामास कसोटीस लाविले,” असे पहिल्या वचनात म्हटले आहे. यावरून अब्राहाम विश्‍वासू नव्हता असे नाही. पण, आता त्याच्या विश्‍वासाची सगळ्यात मोठी परीक्षा होणार होती. देवाने त्याला म्हटले: “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन . . . जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.” (वचन २) हे लक्षात असू द्या, की देव कधीही त्याच्या सेवकांची त्यांच्या सहनशक्‍तीपलीकडे परीक्षा घेत नाही. तेव्हा, या परीक्षेवरून देवाला अब्राहामावर पूर्ण भरवसा होता हे दिसून आले.—१ करिंथकर १०:१३.

अब्राहामाने देवाच्या आज्ञेचे तत्परतेने पालन केले. त्याविषयी आपण वाचतो: “अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसहाक यांस घेतले, आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला.” (वचन ३) या परीक्षेबद्दल अब्राहाम कदाचित कोणाजवळही बोलला नसेल.

तीन दिवसांच्या या प्रवासात अब्राहामाला या विषयावर गंभीरपणे विचार करण्यास बराच वेळ मिळाला असेल. परंतु, अब्राहाम आपल्या निर्णयावर टिकून राहिला. त्या वेळी त्याने जे म्हटले त्यावरून, त्याचा विश्‍वास किती दृढ होता हे दिसून येते. दूरवर त्याला तो डोंगर दिसला तेव्हा त्याने आपल्या सेवकास म्हटले: “येथे . . . थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करुन तुमच्याकडे परत येतो.” अर्पणाकरता कोकरू कुठे आहे असे इसहाकाने विचारले तेव्हा अब्राहामाने उत्तर दिले: “देव स्वतः होमार्पणासाठी कोकरु पाहून देईल.” (वचने ५, ८) आपण आपल्या मुलाबरोबर परत येऊ अशी अपेक्षा अब्राहामाला होती. का? कारण “[इसहाकाला] मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे, हे त्याने मानले.”—इब्री लोकांस ११:१९.

डोंगरावर गेल्यानंतर अब्राहामाने “आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करुन सुरा घेतला,” तेव्हा परमेश्‍वराच्या दूताने त्यास रोखले. आणि देवाने अब्राहामाला त्याच्या “पुत्राच्या ऐवजी” झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका अर्पण करण्यासाठी दाखवला. (वचने १०-१३) देवाच्या नजरेत इसहाकाचे जणू खरोखरच अर्पण करण्यात आले होते. (इब्री लोकांस ११:१७) एका विद्वानाने असे स्पष्टीकरण दिले: ‘देवाच्या नजरेत, आपल्या मुलाचे अर्पण करण्याची अब्राहामाने दाखवलेली तयारी ही प्रत्यक्ष अर्पण केल्यासारखीच होते.’

यहोवाचा अब्राहामावरील विश्‍वास पक्का ठरला. आणि अब्राहामाने यहोवावर ठेवलेल्या विश्‍वासाचे त्याला प्रतिफळ मिळाले. ते कशा प्रकारे? देवाने त्याच्यासोबत केलेल्या कराराविषयी पुन्हा एकदा विस्तारितपणे त्याला सांगितले. या करारामुळे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळणार होते.—वचने १५-१८.

अब्राहामाला आपल्या पुत्राचे अर्पण करावे लागले नाही. परंतु, यहोवाला मात्र सरतेशेवटी आपल्या पुत्राचे बलिदान द्यावे लागणार होते. इसहाकाचे अर्पण करण्याची अब्राहामाची तयारी, मानवजातीच्या पापाकरता देव आपल्या एकुलत्या एका पुत्राचे अर्थात येशूचे जे अर्पण करणार होता त्यास चित्रित करते. (योहान ३:१६) ख्रिस्ताचे बलिदान, यहोवाचे आपल्यावर किती प्रेम आहे त्याचा पुरावा देते. देवाने आपल्याकरता दिलेल्या या बलिदानामुळे आपण स्वतःला विचारले पाहिजे, ‘देवाला संतुष्ट करण्यासाठी मी कोणते त्याग करायला तयार आहे?’ (w०९ २/१)