व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला हे माहीत होते का?

तुम्हाला हे माहीत होते का?

तुम्हाला हे माहीत होते का?

बायबलमध्ये उल्लेख केलेला महारोग किंवा कुष्ठरोग व आजच्या काळातला कुष्ठरोग एकच आहे का?

आज वैद्यकीय भाषेत ज्याला “कुष्ठरोग” म्हटले जाते तो जिवाणूंच्या संसर्गामुळे माणसांना होणारा एक रोग आहे. १८७३ मध्ये पहिल्यांदा डॉ. जी. ए. हॅन्सन यांनी या जिवाणूचा (मायकोबॅक्टेरियम लेप्री) शोध लावला. हा जिवाणू शरीराबाहेर नाकातील स्रावात नऊ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ते असेही म्हणतात की कुष्ठरोग झालेल्या व्यक्‍तींच्या सहवासात राहणाऱ्‍या लोकांना या रोगाची लागण होण्याचा जास्त धोका असतो व ही लागण सहसा कपड्यांवरील जंतूंमुळे होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते २००७ मध्ये कुष्ठरोगाच्या २,२०,००० नव्या रुग्णांची नोंद झाली.

बायबल काळात मध्यपूर्वेतील देशांतही लोकांना कुष्ठरोगाची लागण होत होती यात शंका नाही. मोशेच्या नियमशास्त्रात महारोग झालेल्या व्यक्‍तीला इतरांपासून वेगळे ठेवले जावे असे सांगण्यात आले होते. (लेवीय १३:४, ५) पण “महारोग” असे भाषांतर केलेला त्सारेआथ हा इब्री शब्द फक्‍त मानवांना होणाऱ्‍या रोगापुरताच मर्यादित नव्हता, तर कपडे व घरांनाही त्याची लागण होत असे. अशा प्रकारचा कुष्ठरोग लोकर किंवा तागापासून बनवलेल्या कपड्यांवर किंवा चामड्याच्या वस्तूंवर पण येऊ शकत होता. काही वेळा कापडावर आलेला ‘हिरवट अथवा तांबूस चट्टा’ धुतल्यावर निघून जात असे. पण जर तो नाही निघाला तर ते कापड किंवा चामडे जाळून टाकले जात असे. (लेवीय १३:४७-५२) कधीकधी घरांच्या भिंतीवरही “हिरवट अथवा तांबूस रेषा” येत. ज्या दगडांवर अशा रेषा आल्या असतील ते काढून मानव वस्तीपासून दूर नेऊन टाकले जायचे. पुन्हा जर त्या घरावर कुष्ठरोग आला तर ते घर पाडून बांधकामाचे सर्व साहित्य नगराबाहेर फेकून दिले जात असे. (लेवीय १४:३३-४५) काहींचे असे म्हणणे आहे की कपडे किंवा घरांवर येणारा महारोग हा आपण आज बुरशी म्हणतो तसाच एक प्रकार असावा. पण, असे निश्‍चितपणे म्हणता येणार नाही. (w०९ २/१)