व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते

प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते

प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते

बायबलमध्ये असे म्हटले आहे: “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो.” हे शब्द, प्राचीन काळातील शलमोन नावाच्या एका बुद्धिमान राजाने लिहिले होते. तो पुढे म्हणतो, की जन्म आणि मृत्यूचा समय असतो, मोडून टाकण्याचा व बांधून काढण्याचा समय असतो, प्रेम करण्याचा व द्वेष करण्याचा समय असतो. शेवटी त्याने म्हटले, की “मनुष्य ज्यासाठी कष्ट करितो त्यांत त्याला काय लाभ?”—उपदेशक ३:१-९.

हेशब्द वाचल्यानंतर काही जण असा निष्कर्ष काढतात की नशिबाने ठरवल्यानुसार सर्वकाही घडत असते अशी शिकवण बायबल देते. हे खरे आहे का? जीवनातली हरएक घटना नशिबात लिहिल्याप्रमाणे घडत असते याला बायबल दुजोरा देते का? ‘प्रत्येक शास्त्रलेख ईश्‍वरप्रेरित’ असल्यामुळे बायबलच्या एका वचनात जे म्हटले आहे त्याचा इतर वचनांशीही मेळ बसला पाहिजे. तेव्हा, बायबलच्या इतर वचनांत याविषयी काय म्हटले आहे ते आपण पडताळून पाहू या.—२ तीमथ्य ३:१६.

समय व प्रसंग

बायबलच्या उपदेशक पुस्तकात शलमोनाने पुढे असे लिहिले: “मी फिरून सूर्याच्या खालती असे पाहिले की वेगवंतांस धाव व बलवानांस युद्ध साधत नाही, आणि ज्ञान्यांस अन्‍न व बुद्धिमंतांस धन आणि निपुणांस अनुग्रह प्राप्त होत नाही.” असे का बरे? कारण “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात,” असे स्पष्टीकरण त्याने दिले.—उपदेशक ९:११, पं.र.भा.

जीवनातली प्रत्येक गोष्ट नशिबात लिहिलेली असते असे शलमोन सूचित करत नव्हता. तर ‘समय व प्रसंग हे सर्वांना घडत’ असल्यामुळे मानव जे काही करू पाहतात त्याचा नेमका परिणाम कसा निघेल हे ते आधीच, अगदी अचूकपणे सांगू शकत नाहीत असे तो सूचित करत होता. बरेचदा एखाद्या व्यक्‍तीच्या जीवनात जे काही घडते ते ती व्यक्‍ती, उचित ठिकाणी, उचित वेळी असल्यामुळे किंवा चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी असल्यामुळे घडते.

उदाहरणार्थ, ‘वेगवंतांस धाव साधत नाही,’ अर्थात वेगवानांस शर्यतीत यश मिळतेच असे नाही, असे जे म्हटले आहे त्याचा विचार करा. १९८४ साली, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, लॉस एंजेलीझ शहरातील ऑलिंपिकमध्ये गाजलेल्या एका असामान्य घटनेविषयी तुम्ही ऐकले असेल. ३००० मीटरच्या महिलांच्या शर्यतीत धावणाऱ्‍यांपैकी एक धावपटू ब्रिटनचे, तर दुसरी धावपटू अमेरिकेचे प्रतिनिधीत्व करत होती. या दोघींनाही सुवर्ण पदक मिळवायचे होते. पण, अर्ध्यावर आल्यानंतर मात्र धावमार्गावर दोघींची टक्कर झाली. एक खाली पडली व तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले तर दुसरी इतकी खचून गेली की ती सातव्या क्रमांकावर आली.

या दोघींच्या बाबतीत जे काही घडले ते त्यांच्या नशिबात लिहिले होते असे म्हणता येईल का? काहींना कदाचित तसे वाटेल. पण, खरे तर त्या दोघींची एकमेकींशी टक्कर झाल्यामुळे त्यांची हार झाली होती हे उघडच आहे. ही टक्कर एक अपघात होता ज्याची कोणीही अपेक्षा केली नव्हती. मग त्यांची एकमेकींशी झालेली टक्कर हीसुद्धा नशिबात होती असे म्हणता येईल का? येथेही काही जण होय असेच म्हणतील. पण, खेळाचे धावते निवेदन करणाऱ्‍यांनी तो अपघात का झाला त्याचे कारण सांगितले. दोघीही अतिशय कणखर खेळाडू होत्या. दोघींमध्ये एकमेकींना मागे टाकण्याची प्रचंड धडपड चालली होती. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे “समय व प्रसंग” हा सर्वांवर ओढवतो. तसाच तो त्या दोघींवर ओढवला होता. म्हणूनच, एखाद्या गोष्टीची आपण कितीही पूर्वतयारी केलेली असली तरी काही तरी अनेपक्षित घडण्याची दाट शक्यता असते ज्याचा विपरीत परिणाम घडू शकतो. नशिबाशी याचा काहीएक संबंध नसतो.

मग, “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो,” असे जे बायबलमध्ये म्हटले आहे त्याचा काय अर्थ होतो? आपल्या भविष्यावर परिणाम करणाऱ्‍या गोष्टींबद्दल आपण काही करू शकतो का?

प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ

बायबलचा लेखक लोकांच्या नशिबाविषयी बोलत नव्हता तर देवाच्या उद्देशाविषयी आणि या उद्देशाचा मानवजातीवर होणाऱ्‍या परिणामांविषयी बोलत होता. हे कशावरून म्हणता येईल? या वचनाच्या मागच्या पुढच्या संदर्भावरून आपल्याला असे म्हणता येईल. ज्या ज्या गोष्टींचा “उचित काळ” असतो यांचा उल्लेख केल्यानंतर शलमोनाने म्हटले: “देवाने माणसाला तऱ्‍हेतऱ्‍हेची कामे दिली आहेत. त्या साऱ्‍यांच्या संबंधात मी याचा विचार केला आहे. प्रत्येक गोष्ट यथाकाळी योग्य असते.”—उपदेशक ३:१०, ११, सुबोध भाषांतर.

देवाने मानवांना अनेक कामे करावयास दिली आहेत. यांपैकी अनेकांचा शलमोनाने उल्लेख केला. देवाने आपल्याला इच्छा स्वातंत्र्य देखील दिले आहे ज्यामुळे आपण आपल्या इच्छेनुसार निवड करू शकतो. असे असले तरी प्रत्येक गोष्ट करण्याची एक उचित किंवा योग्य वेळ असते. आणि त्याच वेळी ती गोष्ट केल्यास चांगले परिणाम निष्पन्‍न होऊ शकतात. उदाहरणार्थ, उपदेशक ३:२ या वचनात शलमोनाने जे म्हटले त्याचा विचार करा. त्यात त्याने म्हटले: “रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो.” प्रत्येक पिकाची उचित वेळीच पेरणी केली पाहिजे हे शेतकऱ्‍यांना माहीत असते. या साध्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्‍याने चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या हंगामात पेरणी केली तर काय होऊ शकते? ढोर मेहनत करूनसुद्धा त्याला चांगले पीक मिळाले नाही तर त्याने त्याचे खापर नशिबावर फोडून चालेल का? मुळीच नाही! त्याने योग्य वेळी पेरणी केली नाही म्हणून त्याला चांगले पीक मिळाले नाही. सृष्टिकर्त्याने घालून दिलेल्या नैसर्गिक नियमांना अनुसरून त्याने पेरणी केली असती तर त्याला चांगले उत्पन्‍न मिळाले असते.

देवाने लोकांचे नशीब ठरवलेले नाही तर त्याने त्याच्या उद्देशानुसार मानवांना काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. तेव्हा, आपण जे काही काम हाती घेऊ त्यात आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपण देवाच्या उद्देशाचे व त्याच्या समयाचे भान ठेवून काम केले पाहिजे. देवाने लोकांचे नशीब नव्हे तर त्याचा उद्देश पूर्वनियोजित केला आहे आणि हा उद्देश केव्हाही बदलणार नाही. यशया संदेष्ट्याद्वारे यहोवाने म्हटले: “माझ्या मुखातून निघणारे वचन . . . माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:११.

मग, पृथ्वी व मानवजातीच्या भविष्यासंबंधी देवाच्या मुखातून निघणारे हे “वचन” किंवा देवाचा उद्देश काय आहे जो ‘विफल होणार नाही’?

देवाच्या उद्देशाची वेळ समजणे

देवाचे वचन अथवा उद्देश काय आहे हे शलमोनाने सूचित केले. “आपआपल्या समयी होणारी हरएक वस्तु त्याने सुंदर बनविली आहे,” हे सांगितल्यानंतर त्याने पुढे म्हटले: “त्याने मनुष्याच्या मनांत अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही.” मराठीतील सुबोध भाषांतर याच वचनाचा अनुवाद असा करते: “देवाने माणसांच्या अंतःकरणात चिरकाळाची कल्पना बीजरूपाने ठेवली आहे. तरीपण माणसाला आरंभापासून शेवटपर्यंत देवाच्या कृत्यांचे आकलन होत नाही.”—उपदेशक ३:१०, ११.

या वचनावर बरेच लिखाण करण्यात आले असले तरी एक गोष्ट मात्र खरी आहे आणि ती म्हणजे आपणापैकी प्रत्येकाने कधी ना कधी आपल्या जीवनाच्या अर्थाविषयी किंवा आपल्या भविष्याविषयी खूप विचार केला असेल. जीवनातील कर्तव्ये पार पाडण्यासाठी जीवतोड मेहनत करणे व शेवटी मरून जाणे इतकेच आपले आयुष्य आहे हे स्वीकारणे मानवांना पूर्वीपासूनच फार कठीण गेले आहे. सर्व जीवप्राण्यांमध्ये मानव हा सगळ्यात वेगळा प्राणी आहे. केवळ मानवच सध्याच्या व भावी जीवनाचाही विचार करू शकतो. इतकेच नाही तर मानव हा सतत किंवा कायम जिवंत राहू इच्छितो. का बरे? कारण बायबलमध्ये म्हटले आहे, की देवाने “मनुष्याच्या मनांत अनंतकालाविषयीची कल्पना” घातली आहे.

आपल्यामध्ये कायम जिवंत राहण्याची इच्छा असल्यामुळेच मेल्यानंतरही आपण अस्तित्वात असतो का या प्रश्‍नाने लोकांना भेडसावले आहे. मृत्यूनंतर आपल्यातले काहीतरी जिवंत राहते असा निष्कर्ष काहींनी काढला आहे. इतरांना वाटते, की आपला पुनर्जन्म होत राहतो. तर असेही काही लोक आहेत ज्यांना वाटते, की आपल्या जीवनातली हरएक घटना नशिबाने किंवा देवाने आधीच ठरवलेली आहे त्यामुळे आपल्याला यात काहीच फेरबदल करता येत नाही. पण, दुःखाची गोष्ट म्हणजे यांपैकी एकही स्पष्टीकरण पूर्णपणे मनाला पटण्यासारखे नाही. याचे कारण माणसाने स्वतःहून कितीही प्रयत्न केले तरी त्याला ‘आरंभापासून शेवटपर्यंत देवाच्या कृत्यांचे कधीही आकलन होणार नाही,’ असे बायबलमध्ये म्हटले आहे.

माणसामध्ये कायम जगत राहण्याची तीव्र इच्छा असूनही त्याला ती तृप्त का करता येत नाही या प्रश्‍नाने कित्येक युगांपासून अनेक विचारवंतांना आणि तत्त्वज्ञान्यांना चक्रावून सोडले आहे. पण, देवाने आपल्या मनात अनंतकाल जगण्याची ही कल्पना घातली आहे त्यामुळे या प्रश्‍नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपण त्याच्याकडेच पाहावे हे योग्य नाही का? कारण यहोवाविषयी बायबलमध्ये म्हटले आहे, की “तू आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करितोस.” (स्तोत्र १४५:१६) तेव्हा, देवाचे वचन बायबल याचा अभ्यास केल्याने जीवन-मरणाविषयीची समाधानकारक उत्तरे तसेच पृथ्वी व सबंध मानवजात यांसंबंधी असलेल्या देवाच्या सनातन उद्देशाविषयीचे स्पष्टीकरण आपल्याला मिळू शकेल.—इफिसकर ३:१०, ११. (w०९ ३/१)

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

‘वेगवानांस शर्यतीत यश मिळतेच असे नाही.’—उपदेशक ९:११

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

शेतकऱ्‍याने उचित वेळी पेरणी न केल्यामुळे चांगले पीक मिळाले नाही तर त्याने त्याचे खापर नशिबावर फोडून चालेल का?

[७ पानांवरील संक्षिप्त आशय]

देवाने “माणसांच्या अंतःकरणात चिरकाळाची कल्पना बीजरूपाने ठेवली आहे” त्यामुळेच आपण जीवन-मृत्यूचा विचार करतो