व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मनुष्याचे नव्हे तर देवाचे भय बाळगण्याची पाच कारणे

मनुष्याचे नव्हे तर देवाचे भय बाळगण्याची पाच कारणे

मनुष्याचे नव्हे तर देवाचे भय बाळगण्याची पाच कारणे

त्यातरुणाला आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला होता. नुकतेच जे घडले ते अगदीच अनपेक्षित होते. दोन यहोवाच्या साक्षीदारांशी झालेल्या चर्चेमुळे त्याला नवीन काहीतरी शिकायला मिळाले होते. देव मानवांवर दुःखे का येऊ देतो हा प्रश्‍न त्याला कितीतरी वर्षांपासून सतावत होता. पण, आता त्याला बायबलमधून त्याच्या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले होते. बायबलमध्ये इतकी महत्त्वाची व आनंददायक माहिती आहे याची त्याला जरा देखील कल्पना नव्हती.

त्याच्याकडे आलेले दोघे जण गेल्यानंतर, काही मिनिटांतच घरमालकीण अचानक त्याच्या खोलीत आली आणि तिने जोराने ओरडत विचारले, “कोण होते हे लोक?”

तो इतका गोंधळून गेला की, त्याला काहीच उत्तर देता आले नाही.

ती रागाने त्याला म्हणाली: “मी या लोकांना चांगली ओळखते, आणि जर का पुन्हा कधी तू त्यांना घरात घेतलंस तर तुला दुसरीकडे खोली बघावी लागेल!”

दार धाड्‌कन आपटून ती निघून गेली.

ख्रिस्ताचे खरे अनुयायी विरोधाची अपेक्षा करू शकतात

या तरुणासोबत जे घडले ते काही नवीन नाही. देवाचे वचन बायबल यात असे सांगितले आहे: “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.” (२ तीमथ्य ३:१२) खऱ्‍या ख्रिश्‍चनांना सहसा लोक पसंत करत नाहीत आणि पूर्वीही करत नव्हते. का बरे? प्रेषित योहानाने आपल्या ख्रिस्ती बांधवांना असे म्हटले: “आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे; सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” तसेच, दियाबल सैतानाचे वर्णन एका ‘गर्जणाऱ्‍या सिंहासारखे’ करण्यात आले आहे जो “कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” (१ योहान ५:१९; १ पेत्र ५:८) मनुष्याचे भय हे सैतानाच्या सर्वात प्रभावी शस्त्रांपैकी एक आहे.

येशू ख्रिस्ताने पुष्कळ चांगली कामे केली होती व त्याने कोणतेही पाप केले नव्हते, तरी लोकांनी त्याची थट्टा आणि छळ केला. त्याने म्हटले: “विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला.” (योहान १५:२५) त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने आपल्या अनुयायांना, पुढे होणाऱ्‍या छळाचा सामना करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले. त्याने म्हटले: “जग जर तुमचा द्वेष करिते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाहि केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. दास धन्यापेक्षा मोठा नाही हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याहि पाठीस लागतील.”—योहान १५:१८, २०.

येशूच्या या शब्दांमुळे पुष्कळ लोक खऱ्‍या उपासनेचा स्वीकार करण्यास मागेपुढे पाहत होते. एके प्रसंगी येशूचा शोध घेत असलेल्या लोकांबद्दल बायबल असे सांगते: “यहूद्यांच्या भीतीमुळे त्याच्याविषयी कोणीहि उघडपणे बोलला नाही.” (योहान ७:१३; १२:४२) जो कोणी येशूवर विश्‍वास ठेवील त्याला धर्मसभेतून बहिष्कृत करण्यात येईल अशी त्या काळातील धर्मपुढाऱ्‍यांनी धमकी दिली होती. अशा रीतीने, पुष्कळ लोकांनी मनुष्याच्या भीतीमुळे ख्रिस्ती बनण्याचे पाऊल उचलले नाही.—प्रेषितांची कृत्ये ५:१३.

ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यावर जेरूसलेममधील मंडळीचा “फार छळ झाला” असे बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. (प्रेषितांची कृत्ये ८:१) खरेतर, रोमन साम्राज्याच्या सबंध काळात ख्रिश्‍चनांना छळाचा सामना करावा लागला. रोममधील काही प्रतिष्ठित माणसांनी प्रेषित पौलाला असे सांगितले: “ह्‍या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हाला ठाऊक आहे.” (प्रेषितांची कृत्ये २८:२२) होय, खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा सर्वत्र छळ करण्यात आला.

आजही, लोकांना ख्रिस्ताचे खरे अनुयायी बनण्यापासून रोखण्यासाठी सैतान मनुष्याच्या भीतीचा वापर करतो. यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करणाऱ्‍या प्रामाणिक मनाच्या लोकांना शाळेत, कामाच्या ठिकाणी, शेजारी-पाजारी, मित्रांकडून किंवा नातेवाइकांकडून विरोधाचा सामना करावा लागतो. लोक आपला आदर करणार नाहीत, आपले मित्र आपल्याशी संबंध तोडतील किंवा आपल्याला आर्थिक अडचणी येतील अशी त्यांना भीती वाटू शकते. काही ग्रामीण भागांत, शेतकऱ्‍यांना अशी भीती वाटते की कापणीच्या वेळी त्यांचे शेजारी त्यांच्या मदतीला येणार नाहीत किंवा त्यांच्या गुराढोरांचे संरक्षण करणार नाहीत. या सर्व गोष्टींची भीती असूनही, लाखो लोकांनी येशू ख्रिस्ताचे अनुकरण करून देवावर भरवसा ठेवण्याचा व त्याच्या वचनानुसार जीवन जगण्याचा निर्धार केला आहे. असे केल्यामुळे यहोवाने त्यांना अनेक आशीर्वाद दिले आहेत.

मनुष्याऐवजी देवाचे भय का बाळगावे?

मनुष्याऐवजी देवाचे भय बाळगावे असे बायबल आपल्याला आर्जवते. ते म्हणते: “परमेश्‍वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय.” (स्तोत्र १११:१०) हे भय विकृत स्वरूपाचे नसून, आपल्याला जीवन देणाऱ्‍या देवाला नाखूष करण्याविषयीचे भय आहे जे खरेतर आपल्याकरता हितकारक आहे. हे भय प्रेमामुळे उत्पन्‍न होते. पण, आपण मनुष्याऐवजी देवाचे भय का बाळगले पाहिजे? याची पाच कारणे आपण पाहू या.

१ यहोवा सर्वशक्‍तिमान आहे. यहोवा कोणत्याही मनुष्यापेक्षा कितीतरी पटीने शक्‍तिमान आहे. त्याच्यासमोर पृथ्वीवरील “राष्ट्रे पोहऱ्‍यातल्या जलबिंदूसमान” आहेत. आणि अशा सर्वशक्‍तिमान देवाचे आपण उपासक आहोत हे त्याचे भय बाळगण्याद्वारे आपण दाखवतो. (यशया ४०:१५) देव सर्वशक्‍तिमान असल्यामुळे, त्याच्या विश्‍वासू सेवकांवर “चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार” निकामी करण्याचे सामर्थ्य त्याच्याजवळ आहे. (यशया ५४:१७) आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यास कोण योग्य आहे हे तोच ठरवणार असल्यामुळे, आपण त्याच्याबद्दल शिकून घेणे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागणे महत्त्वाचे आहे. कोणाच्याही भीतीमुळे आपण असे करण्याचे थांबवू नये.—प्रकटीकरण १४:६, ७.

२ देव आपले साहाय्य व संरक्षण करेल. बायबलमध्ये नीतिसूत्रे २९:२५ येथे असे म्हटले आहे: “मनुष्याची भीति पाशरूप होते; पण जो परमेश्‍वरावर भाव ठेवितो त्याचे संरक्षण होते.” मनुष्याचे भय बाळगणे खरेच पाशासारखे आहे. कारण हे भय आपल्याला देवावरील विश्‍वास उघडपणे व्यक्‍त करण्यापासून माघार घ्यायला लावू शकते. देवाने आपले संरक्षण करण्याचे आपल्याला आश्‍वासन दिले आहे. तो म्हणतो: “तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्‍ति देतो; मी तुझे साहाय्यहि करितो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो.”—यशया ४१:१०.

३ जे देवाजवळ येतात त्यांच्यावर तो प्रेम करतो. प्रेषित पौलाने हे हृदयस्पर्शी शब्द लिहिले: “माझी खात्री आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपति, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीहि सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्‍याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्‍त करावयाला समर्थ होणार नाही.” (रोमकर ८:३७-३९) आपण देवावर भरवसा ठेवायला आणि त्याच्या आज्ञांचे पालन करायला शिकतो, तेव्हा आपण विश्‍वाच्या सार्वभौम अधिपतीचे अतूट प्रेम अनुभवू शकतो. किती मोठा बहुमान आहे हा!

४ देवाने आपल्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींची आपण कदर करतो. यहोवा आपल्याला जीवन देणारा सृष्टिकर्ता आहे. तसेच, त्याने आपल्याला केवळ जीवनावश्‍यक गोष्टीच पुरवल्या नाहीत, तर ज्यांमुळे आपले जीवन आनंददायी व रोमांचक बनेल अशा कितीतरी गोष्टी त्याने पुरवल्या आहेत. खरोखर, तो सर्व उत्तम देणग्यांचा स्रोत आहे. (याकोब १:१७) देवाच्या प्रेम-दयेची कदर करणाऱ्‍या विश्‍वासू दाविदाने असे लिहिले: “हे परमेश्‍वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्‌भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; . . . मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत.”—स्तोत्र ४०:५.

५ आपला विरोध करणाऱ्‍यांपैकी काही जण बदलू शकतात. तुम्ही कोणतीही तडजोड न करता देवाची भीती बाळगत राहण्याद्वारे आणि देवावर प्रेम करत राहण्याद्वारे, तुमच्या विरोधकांना मदत करू शकता. येशूच्या नातेवाइकांचेच उदाहरण घ्या. आधी त्यांनी येशूवर विश्‍वास ठेवला नाही. उलट त्यांनी म्हटले: “त्याला वेड लागले आहे.” (मार्क ३:२१; योहान ७:५) पण नंतर, येशूचा मृत्यू होऊन त्याचे पुनरुत्थान झाल्यावर, त्यांच्यापैकी बहुतेकांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला. याकोब व यहूदा या येशूच्या सावत्र भावांना तर बायबलमधील काही भाग लिहिण्याची संधीही लाभली. धर्मांध असलेला शौल हा देखील आधी ख्रिश्‍चनांचा छळ करायचा, पण नंतर तो प्रेषित पौल बनला. त्याच प्रकारे, देवाला विश्‍वासू राहण्याच्या आपल्या दृढनिश्‍चयामुळे, आपण बायबलमधून जे शिकवतो ते सत्य आहे हे सध्या आपला विरोध करणाऱ्‍यांपैकी काही जणांना दिसून येईल.—१ तीमथ्य १:१३.

उदाहरणार्थ, आफ्रिकेत राहणारी ॲबेरॅश नावाची एक स्त्री देवाबद्दलचे सत्य तिला कळावे म्हणून प्रार्थना करायची. यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्यास सुरू केल्यावर, तिला तिच्या कुटुंबातील सदस्यांकडून व धार्मिक पुढाऱ्‍यांकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. तिचे काही नातेवाईक देखील बायबलचा अभ्यास करत होते. पण, नंतर मनुष्याच्या भीतीमुळे त्यांनी अभ्यास करायचे थांबवले. तिने मात्र, धैर्य व बळ मिळण्यासाठी देवाला विनवणी केली आणि काही काळाने ती बाप्तिस्मा घेऊन यहोवाची एक साक्षीदार बनली. याचा परिणाम काय झाला? तिच्या आठ नातेवाइकांनीही हिम्मत करून पुन्हा बायबलचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि ते आता चांगली प्रगती करत आहेत.

तुम्ही मनुष्याच्या भीतीवर मात करू शकता

मनुष्याच्या भीतीला बळी पडण्याचे टाळण्यासाठी, देवावरील तुमचे प्रेम अधिकाधिक बळकट करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. बायबलचा अभ्यास करण्याद्वारे आणि बायबलमधील विशिष्ट वचनांवर मनन करण्याद्वारे तुम्ही असे करू शकता. उदाहरणार्थ, इब्री लोकांस १३:६, ज्यात असे म्हटले आहे: “प्रभु मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?” मनुष्यांऐवजी देवाचे भय बाळगणे योग्य व सुज्ञपणाचे का आहे, याची कारणे नेहमी लक्षात असू द्या.

बायबलमधून शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू केल्यामुळे मिळणाऱ्‍या अनेक आशीर्वादांकडेही लक्ष द्या. तुम्हाला जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळतील. जीवनात उद्‌भवणाऱ्‍या समस्यांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी तुम्हाला सुज्ञता प्राप्त होईल. सध्या जगाची परिस्थिती बिकट असली, तरी तुम्हाला भविष्याची अद्‌भुत आशा प्राप्त होईल. आणि सर्वशक्‍तिमान देवाला कोणत्याही वेळी प्रार्थना करण्याचा सुहक्क तुम्हाला प्राप्त होईल.

प्रेषित योहानाने असे लिहिले: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७) तेव्हा, विश्‍वासात दृढ राहण्याची आणि देवाचे भय बाळगून चालत राहण्याची हीच वेळ आहे. मनुष्याचे भय बाळगण्याऐवजी, तुम्ही देवाच्या या सल्ल्याचे पालन करण्याचा निर्धार करू शकता: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रत्युत्तर देईन.” (नीतिसूत्रे २७:११) देवाच्या या सल्ल्याचे पालन करणे खरोखर किती सन्मानाची गोष्ट आहे!

देवाचे भय बाळगणाऱ्‍यांना तो जे देणार आहे, ते कोणीही मनुष्य तुम्हाला देऊ शकणार नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: “नम्रता व परमेश्‍वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय.”—नीतिसूत्रे २२:४. (w०९ ३/१)

[३० पानांवरील चित्र]

ॲबेरॅशने दाखवलेल्या धैर्यामुळे तिच्या नातेवाइकांपैकी आठ जण बायबल अभ्यासाचा आनंद घेत आहेत