व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बक्षिसावर लक्ष केंद्रित करा

बक्षिसावर लक्ष केंद्रित करा

बक्षिसावर लक्ष केंद्रित करा

“बक्षिस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो.”—फिलिप्पै. ३:१४.

१. प्रेषित पौलाला कोणते बक्षिस देऊ करण्यात आले होते?

प्रेषित पौल, ज्याला तार्सकर शौल देखील म्हणायचे, तो एका प्रतिष्ठित घराण्याचा होता. शिवाय, त्याला त्याच्या पूर्वजांच्या धर्माची शिकवण, नियमशास्त्राचा प्रसिद्ध शिक्षक गमलिएल याच्याकडून मिळाली होती. (प्रे. कृत्ये २२:३) त्यामुळे त्याकाळच्या समाजात नावलौकिक मिळवण्याची सुवर्णसंधी पौलासमोर होती. तरीसुद्धा, त्याने आपल्या धर्माचा त्याग केला व तो ख्रिस्ती बनला. आणि तेव्हापासून त्याने एका वेगळ्या बक्षिसाकडे किंवा ध्येयाकडे आपले लक्ष केंद्रित केले. त्याला देऊ करण्यात आलेले हे बक्षिस म्हणजे सार्वकालिक जीवन—अमरत्व प्राप्त करून देवाच्या स्वर्गीय राज्यात राजा व याजक बनणे. हे स्वर्गीय राज्य, नंदनवनात रूपांतरित झालेल्या पृथ्वीवर शासन करेल.—मत्त. ६:१०; प्रकटी. ७:४; २०:६.

२, ३. पौलाने स्वर्गीय जीवनाच्या बक्षिसाला किती मौल्यवान लेखले?

हे बक्षिस पौलाच्या दृष्टीने किती मौल्यवान होते हे त्याच्या पुढील शब्दांवरून दिसून येते: “ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे; इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभु, ह्‍याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानि असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो.” (फिलिप्पै. ३:७, ८) मानसन्मान, पैसा, व्यावसायिक यश, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी बहुतेक लोकांना खूप महत्त्वाच्या वाटतात. पण, मानवजातीबद्दल असलेल्या यहोवाच्या उद्देशाबद्दलचे सत्य समजल्यानंतर पौलाने या सर्व गोष्टी केरकचऱ्‍याप्रमाणे लेखल्या.

तेव्हापासून, यहोवाबद्दलच्या व ख्रिस्ताबद्दलच्या मौल्यवान ज्ञानालाच पौलाने जीवनात सर्वात जास्त महत्त्व दिले. या ज्ञानाविषयी येशूने देवाला केलेल्या प्रार्थनेत एकदा असे म्हटले होते: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहा. १७:३) हे सार्वकालिक जीवन मिळवण्याची पौलाला उत्कट इच्छा होती. फिलिप्पैकर ३:१४ यात नमूद असलेल्या त्याच्या पुढील शब्दांवरून हे स्पष्ट दिसून येते: “ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम.” (फिलिप्पै. ३:१४) खरोखरच, देवाच्या राज्याच्या शासनाखाली स्वर्गात सार्वकालिक जीवनाचे बक्षिस मिळवण्याकडे पौलाचे लक्ष पूर्णपणे केंद्रित होते.

पृथ्वीवर सर्वकाळ जगणे

४, ५. आज देवाच्या इच्छेनुसार आचरण करणाऱ्‍या लक्षावधी लोकांना कोणते बक्षिस देऊ करण्यात आले आहे?

देवाच्या इच्छेनुसार आचरण करणाऱ्‍यांपैकी बहुतेक जण कोणते बक्षिस मिळवण्यासाठी झटू शकतात? हे बक्षिस म्हणजे देवाने निर्माण केलेल्या नव्या जगात सार्वकालिक जीवन उपभोगणे. (स्तो. ३७:११, २९) ही आशा खातरीलायक असल्याची येशूने स्वतः हमी दिली होती. त्याने म्हटले: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” (मत्त. ५:५) स्तोत्र २:८ या वचनानुसार पृथ्वीचे वतन मिळवणाऱ्‍यांपैकी येशू सर्वात प्रमुख आहे. आणि त्याच्यासोबत १,४४,००० जन स्वर्गातून राज्य करतील. (दानी. ७:१३, १४, २२, २७) जे मेंढरांसमान लोक या पृथ्वीवर राहतील, ते ‘जगाच्या स्थापनेपासून त्यांच्याकरता सिद्ध केलेल्या’ राज्याच्या पृथ्वीवरील क्षेत्राचे “वतन” मिळवतील. (मत्त. २५:३४, ४६) बायबलमध्ये भाकीत केलेल्या या सर्व गोष्टी निश्‍चितच घडतील याची आपल्याला खातरी आहे, कारण जो कधीही खोटे बोलू शकत नाही त्या “सत्यप्रतिज्ञ” देवाने या सांगितल्या आहेत. (तीत १:२) देवाच्या प्रतिज्ञांच्या संदर्भात यहोशवाने इस्राएल लोकांना असे सांगितले होते: “आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.” (यहो. २३:१४) यहोशवाप्रमाणे आपणही देवाच्या प्रतिज्ञांबद्दल पूर्ण खातरी बाळगू शकतो.

देवाच्या नव्या जगातील जीवन सध्याच्या असमाधानकारक व निराशादायक जगण्यासारखे नसेल. ते जीवन अतिशय वेगळे असेल, कारण युद्धे, गुन्हेगारी, दारिद्र्‌य, अन्याय, रोगराई व मृत्यू या गोष्टी कायमच्या नाहीशा झालेल्या असतील. तेव्हा लोक पूर्णपणे निरोगी असतील आणि ते नंदनवनात रूपांतरित झालेल्या पृथ्वीवर जीवनाचा आनंद उपभोगतील. खरोखर, ते जीवन आपण कल्पनाही केली नसेल, इतके संतुष्टीदायक असेल. उगवणारा प्रत्येक नवा दिवस अत्यंत आनंददायक असेल. केवढे हे अद्‌भुत बक्षिस!

६, ७. (क) देवाच्या नव्या जगात आपण कोणत्या गोष्टी घडण्याची अपेक्षा करू शकतो हे येशूने कशा प्रकारे दाखवले? (ख) मृतांनाही एक नवे जीवन सुरू करण्याची संधी कशा प्रकारे दिली जाईल?

येशू पृथ्वीवर होता तेव्हा देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याने नव्या जगात सबंध पृथ्वीवर घडून येणार असलेल्या अद्‌भुत गोष्टींची खातरी देण्याकरता त्या प्रत्यक्ष करून दाखवल्या. उदाहरणार्थ, ३८ वर्षांपासून लकव्याने पीडित असलेल्या एका माणसाला येशूने उठून चालण्यास सांगितले. बायबल सांगते की तो मनुष्य खरोखरच चालू लागला. (योहान ५:५-९ वाचा.) आणखी एकदा, येशूला एक “जन्मांध माणूस” दिसला आणि त्याने त्याला बरे केले. नंतर, त्या आंधळ्या मनुष्याला, तुला कोणी बरे केले असे विचारण्यात आले तेव्हा त्याने असे उत्तर दिले: “जन्मांधाचे डोळे कोणी उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते. हा देवापासून नसता तर ह्‍याला काही करता आले नसते.” (योहा. ९:१, ६, ७, ३२, ३३) याचा अर्थ, देवाने सामर्थ्य दिल्यामुळेच येशू या सर्व गोष्टी करू शकला. जेथे कोठे तो जायचा, तेथे “ज्यांना बरे होण्याची जरूरी होती त्यांना तो बरे करीत होता.”—लूक ९:११.

येशू फक्‍त आजारी व लुळ्यापांगळ्या लोकांनाच बरे करू शकत नव्हता, तर मृतांनाही पुन्हा जिवंत करण्याचे सामर्थ्य त्याच्याजवळ होते. उदाहरणार्थ, १२ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाल्यामुळे तिचे आईवडील अत्यंत दुःखी होते. पण येशूने म्हटले: “मुली, मी तुला सांगतो, ऊठ.” आणि ती मुलगी खरोखरच उठली. तिच्या आईवडिलांना आणि तिथे असणाऱ्‍या इतरांना हे पाहून कसे वाटले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? (मार्क ५:३८-४२ वाचा.) देवाच्या नव्या जगात लाखो लोकांचे पुनरुत्थान होईल, तो खरोखर अतिशय आनंदाचा काळ असेल. बायबल सांगते की “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रे. कृत्ये २४:१५; योहा. ५:२८, २९) या सर्वांना एक नवे जीवन सुरू करण्याची संधी दिली जाईल आणि त्यांच्यापुढे सदासर्वकाळ जगण्याची आशा असेल.

८, ९. (क) ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान आदामापासून आलेल्या पापाचे काय होईल? (ख) मृतांचा न्याय कशाच्या आधारावर केला जाईल?

पुनरुत्थान झालेल्या व्यक्‍तींजवळ सार्वकालिक जीवन मिळवण्याची संधी असेल. कारण मृतांतून उठणाऱ्‍या या लोकांचा, त्यांनी मृत्यूच्या आधी केलेल्या पापांच्या आधारावर न्याय केला जाणार नाही. (रोम. ६:७) ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान त्याच्या खंडणी बलिदानाचे फायदे आज्ञाधारक मानवांना लागू केले जातील, ज्यामुळे, ते क्रमाक्रमाने परिपूर्ण बनत जातील. कालांतराने मानवजात आदामाच्या पापाच्या सर्व परिणामांपासून पूर्णपणे मुक्‍त झालेली असेल. (रोम. ८:२१) यहोवा “मरणाला कायमचे गिळून टाकील आणि प्रभू यहोवा सर्व मुखांवरील आसवे पुसून टाकील.” (यश. २५:८, पं.र.भा.) देवाचे वचन असेही सांगते, की त्यावेळी ‘पुस्तके उघडली जातील.’ याचा अर्थ, त्या काळात राहणाऱ्‍या लोकांना नवीन माहिती दिली जाईल. (प्रकटी. २०:१२) जसजसे पृथ्वीचे नंदनवनात रूपांतर केले जाईल, तसतसे ‘जगात राहणारे धार्मिकता शिकतील.’—यश. २६:९.

पुनरुत्थान झालेल्यांचा न्याय आदामापासून आलेल्या पापाच्या आधारावर नव्हे तर ते स्वतः जो मार्ग निवडतील त्याच्या आधारावर केला जाईल. प्रकटीकरण २०:१२ म्हणते: “त्या पुस्तकांमध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला.” याचा अर्थ पुनरुत्थानानंतरच्या त्यांच्या कृत्यांच्या आधारावर त्यांचा न्याय केला जाईल. यहोवाच्या न्यायीपणाचा, दयाळूपणाचा व प्रेमाचा हा किती अद्‌भुत पुरावा आहे! शिवाय, सध्याच्या जीवनातील दुःखदायी गोष्टी, “कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.” (यश. ६५:१७) नवी उभारणीकारक माहिती उपलब्ध झाल्यामुळे व जीवनात अनेक आशीर्वाद मिळाल्यामुळे कोणालाही पूर्वीच्या वाईट अनुभवांचे दुःख जाणवणार नाही. हे सर्व वाईट अनुभव ते विसरून जातील. (प्रकटी. २१:४) हर्मगिदोनातून बचावणाऱ्‍या ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ बाबतीतही असेच घडेल.—प्रकटी. ७:९, १०, १४.

१०. (क) देवाच्या नव्या जगातील जीवन कसे असेल? (ख) बक्षिसावर लक्ष केंद्रित करण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकते?

१० देवाच्या नव्या जगात लोक कधीही आजारी पडणार नाहीत किंवा मरणार नाहीत. “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यश. ३३:२४) कालांतराने, नव्या पृथ्वीवर राहणारे पूर्णपणे निरोगी झालेले असतील. ते प्रत्येक दिवसाचे अतिशय जोमाने व उत्साहाने स्वागत करतील. ते जे काही करतील त्यातून त्यांना संतुष्टी मिळेल. आणि त्यांच्या सभोवती असणारे सर्व लोक त्यांचे भले इच्छिणारे असतील. खरोखर, असे अद्‌भुत जीवन मिळवण्यापेक्षा चांगले बक्षिस आणखी कोणते असू शकेल! आपले बायबल उघडून यशया ३३:२४ आणि ३५:५-७ यातील भविष्यवाण्या वाचून पाहा. तुम्ही तेथे आहात अशी कल्पना करा. असे केल्याने नक्कीच तुम्हाला त्या बक्षिसावर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळेल.

यांनी बक्षिसावर लक्ष केंद्रित केले नाही

११. शलमोनाच्या शासनकाळाची कशा प्रकारे चांगली सुरुवात झाली याचे वर्णन करा.

११ सार्वकालिक जीवनाच्या बक्षिसाविषयी समजल्यावर आपण सतत त्यावर आपले लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण असे न केल्यास, आपले त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, शलमोन प्राचीन इस्राएल राष्ट्राचा राजा बनला तेव्हा त्याने नम्रपणे देवाला प्रार्थना केली आणि तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी ज्ञान व विवेकबुद्धी दे, अशी त्याला विनंती केली. (१ राजे ३:६-१२ वाचा.) परिणामस्वरूप, बायबल सांगते की “देवाने शलमोनास अलोट शहाणपण व बुद्धि दिली.” “शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी यांच्याहून अधिक होते.”—१ राजे ४:२९-३२.

१२. इस्राएल राष्ट्राच्या राजांना यहोवाने कोणता इशारा दिला होता?

१२ पण पूर्वीच यहोवाने असे सांगून ठेवले होते की इस्राएलाच्या राजांनी “फार घोडे बाळगू नयेत” तसेच, त्याने “पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जावयाचे.” (अनु. १७:१४-१७) घोडदळ वाढवल्याने असे दिसून आले असते, की यहोवा जो त्याच्या लोकांचा संरक्षक होता, त्याच्यावर अवलंबून राहण्याऐवजी राजाला आपल्या सैन्यावर जास्त भरवसा आहे. आणि पुष्कळ बायका करणेही धोकेदायक होते. कारण त्यांच्यापैकी काही आजूबाजूच्या मूर्तिपूजक व खोटी उपासना करणाऱ्‍या राष्ट्रांच्या असू शकत होत्या. आणि त्या राजाला खऱ्‍या उपासनेपासून बहकवू शकत होत्या.

१३. शलमोनाने यहोवाच्या इशाऱ्‍यांकडे कशा प्रकारे दुर्लक्ष केले?

१३ शलमोनाने यहोवाच्या या इशाऱ्‍यांकडे लक्ष दिले नाही. त्याऐवजी, यहोवाने जे न करण्याची स्पष्ट ताकीद दिली होती, तेच त्याने केले. त्याने हजारो घोडे व घोडेस्वार जमवले. (१ राजे ४:२६) तसेच, त्याला ७०० बायका आणि ३०० उपपत्नी होत्या. यांपैकी बऱ्‍याच, आसपासच्या मूर्तिपूजक राष्ट्रांतील होत्या. त्यांनी, “त्याचे मन अन्य देवांकडे वळविले; त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्‍वराकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे.” आपल्या विदेशी बायकांच्या सांगण्यावरून शलमोन मूर्तिपूजक देशांतील लोकांच्या घृणास्पद खोट्या उपासनेत सामील झाला. परिणामस्वरूप, यहोवाने शलमोनाला म्हटले की ‘मी तुझे राज्य तुजपासून तोडून घेईन.’—१ राजे ११:१-६, ११.

१४. शलमोनाच्या आणि सबंध इस्राएल राष्ट्राच्या अविश्‍वासूपणाचा काय परिणाम झाला?

१४ खऱ्‍या देवाच्या वतीने त्याच्या लोकांचे नेतृत्त्व करण्याच्या बहुमोल सन्मानाविषयी शलमोनाला पूर्वीसारखी कदर राहिली नाही. तो पूर्णपणे खोट्या उपासनेत बुडाला. कालांतराने, संपूर्ण इस्राएल राष्ट्राने खऱ्‍या उपासनेचा त्याग केला आणि त्यामुळे सा.यु.पू. ६०७ साली त्यांचा नाश झाला. नंतर यहुद्यांनी खऱ्‍या उपासनेची पुनर्स्‌थापना केली तरीसुद्धा, कित्येक शतके उलटल्यावरही येशूला त्यांच्याविषयी असे म्हणावे लागले: “देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.” आणि असेच घडले. येशूने म्हटले: “पाहा, तुमचे घर तुम्हावर सोडले आहे.” (मत्त. २१:४३; २३:३७, ३८) इस्राएल राष्ट्राच्या अविश्‍वासूपणामुळे खऱ्‍या देवाचे लोक म्हणवण्याचा बहुमान त्यांनी कायमचा गमावला. सा.यु. ७० साली रोमी सैन्याने जेरूसलेम शहराचा व मंदिराचा नाश केला आणि अद्याप शहरात असलेल्या यहुद्यांना त्यांनी दास बनवले.

१५. जे खऱ्‍या अर्थाने महत्त्वाचे आहे त्याकडे ज्यांनी दुर्लक्ष केले अशा काही व्यक्‍तींची उदाहरणे सांगा.

१५ यहुदा इस्कर्योत हा येशूच्या १२ प्रेषितांपैकी एक होता. त्याने येशूच्या अद्‌भुत शिकवणी ऐकल्या होत्या आणि देवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने केलेले चमत्कारही पाहिले होते. तरीसुद्धा यहुदाने आपल्या हृदयाचे रक्षण केले नाही. येशूच्या व १२ प्रेषितांच्या खर्चाचे पैसे ठेवलेली डबी सांभाळण्याचे काम त्याला देण्यात आले होते. पण ‘तो चोर होता, आणि डबीत जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई.’ (योहा. १२:६) पुढे तर तो इतका लोभी बनला की त्याने ढोंगी मुख्य याजकांसोबत मिळून कट रचला आणि चांदीच्या ३० शिक्क्यांच्या मोबदल्यात येशूला धरून दिले. (मत्त. २६:१४-१६) जे खऱ्‍या अर्थाने महत्त्वाचे आहे त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्‍यांपैकी आणखी एक जण देमास हा होता. त्यानेही आपल्या हृदयाचे रक्षण केले नाही. पौलाने म्हटले: ‘देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून गेला.’—२ तीम. ४:१०; नीतिसूत्रे ४:२३ वाचा.

आपल्या प्रत्येकाकरता धडा

१६, १७. (क) आपले विरोधक किती शक्‍तिशाली आहेत? (ख) सैतानाने आपल्याविरुद्ध आणलेल्या कोणत्याही विरोधाचा सामना करण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

१६ देवाच्या सर्व सेवकांनी बायबलमध्ये दिलेल्या उदाहरणांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, कारण आपल्याला असे सांगण्यात आले आहे: “ह्‍या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत.” (१ करिंथ. १०:११) आज आपण सध्याच्या दुष्ट जगाच्या समाप्तीच्या काळात जगत आहोत.—२ तीम. ३:१, १३.

१७ ‘ह्‍या युगाचे दैवत’ असणाऱ्‍या दियाबल सैतानाला “आपला काळ थोडा आहे,” हे माहीत आहे. (२ करिंथ. ४:४; प्रकटी. १२:१२) म्हणून, यहोवाच्या सेवकांना भुलवून, ख्रिस्ती या नात्याने त्यांची एकनिष्ठा भंग करण्यासाठी तो वाटेल त्या मार्गाचा अवलंब करू शकतो. हे जग व त्यातील प्रसार माध्यमे सैतानाच्या नियंत्रणात आहेत. पण यहोवाच्या लोकांजवळ कितीतरी जास्त शक्‍तिशाली असे ‘पराकोटीचे सामर्थ्य’ आहे. (२ करिंथ. ४:७) देवाकडून मिळणाऱ्‍या या सामर्थ्याच्या साहाय्याने आपण सैतानाने आपल्याविरुद्ध आणलेल्या कोणत्याही विरोधाचा यशस्वीपणे सामना करू शकतो. म्हणूनच, आपल्याला असे प्रोत्साहन दिले जाते की आपण सतत प्रार्थना करत राहिले पाहिजे आणि हा भरवसा बाळगला पाहिजे की यहोवाजवळ ‘जे मागतात त्यांस तो पवित्र आत्मा देईल.’—लूक ११:१३.

१८. सध्याच्या या जगाबद्दल आपला कसा दृष्टिकोन असावा?

१८ सैतानाची सबंध यंत्रणा लवकरच नष्ट केली जाईल, आणि खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा या नाशातून बचाव होईल हे माहीत असल्यामुळे देखील आपल्याला दिलासा मिळतो. “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहा. २:१७) हे लक्षात घेता, सध्याच्या या जगातील कोणतीही गोष्ट यहोवासोबतच्या नातेसंबंधापेक्षा जास्त मौल्यवान असू शकते असा देवाच्या सेवकांपैकी कोणीही विचार केल्यास ते किती मूर्खपणाचे ठरेल! सैतानाच्या नियंत्रणात असलेले हे जग बुडणाऱ्‍या जहाजासारखे आहे. पण यहोवाने आपल्या विश्‍वासू सेवकांच्या बचावाकरता ख्रिस्ती मंडळीच्या रूपात जणू एक “बचावनौका” पुरवली आहे. नव्या जगाकडे वाटचाल करत असताना ते देवाने दिलेल्या या वचनावर पूर्ण भरवसा बाळगू शकतात: “दुष्कर्म करणाऱ्‍यांचा उच्छेद होईल; पण परमेश्‍वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.” (स्तो. ३७:९) तेव्हा, या अद्‌भुत बक्षिसावर सतत आपले लक्ष केंद्रित असू द्या!

तुम्हाला आठवते का?

• पौलाला देऊ करण्यात आलेल्या बक्षिसाबद्दल त्याची कशी मनोवृत्ती होती?

• जे पृथ्वीवर सर्वकाळ जगतील त्यांचा न्याय कशाच्या आधारावर केला जाईल?

• आता तुम्ही काय करणे सुज्ञपणाचे ठरेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२, १३ पानांवरील चित्र]

बायबलमधील भविष्यवाण्या वाचताना तुम्ही स्वतःला देवाच्या नव्या जगात पाहता का?