व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“सावध असा”

“सावध असा”

“सावध असा”

“सर्वांचा शेवट जवळ आला आहे; म्हणून . . . प्रार्थना करण्यासाठी सावध असा.”—१ पेत्र ४:७.

१. येशूने लोकांना प्रामुख्याने कशाविषयी शिकवले?

येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना, त्याने लोकांना प्रामुख्याने देवाच्या राज्याबद्दल शिकवले. या राज्याद्वारे, यहोवा सबंध विश्‍वावर आधिपत्य करण्याचा आपला अधिकार सिद्ध करेल आणि आपल्या नावावर लावण्यात आलेला कलंक कायमचा मिटवून टाकेल. म्हणूनच, येशूने आपल्या शिष्यांना अशी प्रार्थना करण्यास शिकवले: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्त. ४:१७; ६:९, १०) हे राज्य लवकरच सैतानाच्या जगाचा अंत करणार आहे. आणि त्यानंतर याच राज्याच्या देखरेखीखाली सबंध पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे घडून येईल. दानीएलाने भाकीत केल्याप्रमाणे, देवाचे राज्य “या सर्व [सध्याच्या] राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानी. २:४४.

२. (क) येशूला राज्य सामर्थ्य मिळाले आहे हे त्याच्या अनुयायांना कशावरून समजणार होते? (ख) चिन्हावरून आणखी काय दिसून येणार होते?

देवाचे राज्य येणे किती महत्त्वाचे आहे हे माहीत असल्यामुळे येशूच्या अनुयायांनी त्याला विचारले: “ह्‍या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे [“उपस्थितीचे,” NW] व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” (मत्त. २४:३) राज्य सामर्थ्यासह ख्रिस्ताचे उपस्थित होणे हे अदृश्‍य स्वरूपात असणार होते. म्हणूनच, या घटनेचे एक चिन्ह दिले जाणार होते. या चिन्हात, बायबलमध्ये वर्णन केलेल्या निरनिराळ्या गोष्टी समाविष्ट असणार होत्या. आणि हे चिन्ह पाहून त्या काळात राहणाऱ्‍या येशूच्या अनुयायांना त्याचे राज्य स्वर्गात सुरू झाले आहे हे समजणार होते. तसेच, सध्याच्या दुष्ट जगाचा ‘शेवटला काळ’ सुरू झाल्याचेही या चिन्हावरून दिसणार होते.—२ तीम. ३:१-५, १३; मत्त. २४:७-१४.

शेवटल्या काळादरम्यान सावध असा

३. ख्रिश्‍चनांना सावध का राहावे लागणार होते?

प्रेषित पेत्राने लिहिले: “सर्वांचा शेवट जवळ आला आहे; म्हणून मर्यादेने राहा, व प्रार्थना करण्यासाठी सावध असा.” (१ पेत्र ४:७) येशूच्या अनुयायांना सावध असावे लागणार होते. म्हणजेच, येशू स्वर्गात राज्य करत आहे हे दाखवणाऱ्‍या जगातील घटनांविषयी त्यांनी जागरूक राहायचे होते. शिवाय, सध्याच्या दुष्ट जगाचा अंत जसजसा जवळ येतो तसतसे त्यांनी अधिकच सावध राहण्याची गरज आहे. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “जागृत राहा; कारण [सैतानाच्या जगाचा न्याय करण्यासाठी] घरधनी केव्हा येईल, . . . हे तुम्हाला माहीत नाही.”—मार्क १३:३५, ३६.

४. सैतानाच्या जगातील लोकांच्या व यहोवाच्या सेवकांच्या मनोवृत्तीत कोणता फरक दिसून येतो? (चौकटीतील माहितीचाही समावेश करावा.)

आज जगातील बहुतेक लोक सैतानाच्या प्रभावाखाली आहेत आणि जगातील घडामोडींचा काय अर्थ आहे याकडे त्यांनी फारसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे, ख्रिस्ताचे राज्य स्वर्गात सुरू झाल्याचे त्यांना ओळखता आले नाही. पण, ख्रिस्ताचे खरे अनुयायी मात्र सावध राहिले आहेत आणि गत शतकात घडलेल्या घटनांचा खरा अर्थ त्यांनी अचूकपणे ओळखला आहे. १९२५ च्या नंतर यहोवाच्या साक्षीदारांनी हे स्पष्टपणे ओळखले की पहिले महायुद्ध व त्यानंतर घडलेल्या घटना, १९१४ साली ख्रिस्ताचे राज्य स्वर्गात सुरू झाल्याचा पुरावा आहेत. आणि तेव्हापासूनच सैतानाच्या दुष्ट जगाचा शेवटला काळ सुरू झाल्याचेही त्यांना समजले आहे. सामाजिक घडामोडींवर नजर ठेवणाऱ्‍या अनेक लोकांना जरी या घटनांचा अर्थ समजला नसला, तरी पहिल्या महायुद्धाच्या आधीच्या व त्यानंतरच्या काळात खूप फरक आहे हे ते देखील मान्य करतात.—“अशांततेच्या काळाची सुरुवात” हे शीर्षक असलेली चौकट पाहा.

५. सतत सावध राहणे का महत्त्वाचे आहे?

जवळजवळ एका शतकापासून जगभरात घडत असलेल्या भयानक घटनांवरून हे स्पष्टपणे दिसून येते की आपण शेवटल्या काळात राहत आहोत. ख्रिस्ताने आपल्या सामर्थ्यशाली देवदूतांच्या सैन्यासोबत सैतानाच्या जगाविरुद्ध कारवाई करावी अशी यहोवा त्याला आज्ञा देईल. या घटनेला आता फारच कमी वेळ उरला आहे. (प्रकटी. १९:११-२१) म्हणूनच, खऱ्‍या ख्रिश्‍चनांना सावध व जागृत राहण्यास सांगण्यात आले आहे. या जगाचा अंत होण्याची वाट पाहत असताना आपण शेवटपर्यंत सावध राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. (मत्त. २४:४२) सतत जागृत राहून आपल्याला ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली सबंध पृथ्वीवर एक खास कार्य पार पाडायचे आहे.

जगव्याप्त कार्य

६, ७. शेवटल्या काळात राज्याच्या प्रचाराचे कार्य कशा प्रकारे वाढत आहे?

यहोवाच्या सेवकांवर सोपवण्यात आलेले हे कार्य, सध्याच्या दुष्ट जगाच्या शेवटल्या काळाच्या चिन्हाचा एक भाग असेल असे भाकीत करण्यात आले होते. येशूने शेवटल्या काळात कोणकोणत्या घटना घडतील याचे वर्णन केले, तेव्हा त्याने या जगव्याप्त कार्याविषयीही सांगितले होते. त्याच्या भविष्यवाणीत हे अतिशय अर्थपूर्ण विधान आढळते: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्त. २४:१४.

येशूच्या भविष्यवाणीच्या या पैलूशी संबंधित काही माहिती लक्षात घ्या. १९१४ मध्ये शेवटल्या काळाला सुरुवात झाली तेव्हा सुवार्तेची घोषणा करणाऱ्‍यांची संख्या जेमतेमच होती. पण आता मात्र या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. आज सबंध पृथ्वीवर १,००,००० मंडळ्यांमध्ये ७०,००,००० पेक्षा जास्त यहोवाचे साक्षीदार राज्याचा प्रचार करत आहेत. शिवाय, २००८ मध्ये ख्रिस्ताचा स्मारक विधी साजरा करण्यासाठी आणखी १,००,००,००० लोक यहोवाच्या साक्षीदारांसोबत सामील झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ उल्लेखनीय होती.

८. विरोध होत असूनही आपले प्रचार कार्य यशस्वी का ठरले आहे?

या जगाचा अंत येण्याअगोदर देवाच्या राज्याबद्दल सर्व राष्ट्रांना खरोखर किती प्रभावीपणे साक्ष दिली जात आहे! खरे पाहता, सैतान ‘ह्‍या युगाचे दैवत’ आहे. (२ करिंथ. ४:४) त्यामुळे या जगातील राजकीय, धार्मिक व व्यापारी यंत्रणा, तसेच, जगातील प्रसार माध्यमेही त्याच्याच नियंत्रणात आहेत. तर मग, राज्याच्या साक्षकार्याला मिळत असलेल्या आश्‍चर्यकारक यशाचे रहस्य काय? नक्कीच, हे यश यहोवाच्या पाठिंब्यामुळेच मिळू शकले आहे. त्याच्या साहाय्यामुळेच, सैतानाने सर्व प्रकारे प्रयत्न करूनही राज्य प्रचाराचे कार्य थांबलेले नाही. उलट, त्यात अभूतपूर्व वाढ होत आहे.

९. आपल्या आध्यात्मिक समृद्धीला एक चमत्कार का म्हणता येईल?

यहोवाच्या लोकांच्या राज्य प्रचार कार्यातील यश, त्यांच्या संख्येत होत असलेली अभूतपूर्व वाढ व त्यांची आध्यात्मिक समृद्धी हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. देवाच्या साहाय्याशिवाय, म्हणजेच त्याच्या मार्गदर्शनाशिवाय व त्याच्या संरक्षणाशिवाय हे प्रचार कार्य साध्य करणे शक्यच नव्हते. (मत्तय १९:२६ वाचा.) आपण हे खातरीने म्हणू शकतो की या शेवटल्या काळात सावध राहून देवाचे कार्य करण्यास उत्सुक असलेल्या त्याच्या लोकांना त्याचा आत्मा प्रेरित करत राहील व ते प्रचार कार्य यशस्वीपणे पूर्णत्वास नेतील आणि “तेव्हा शेवट होईल.” ती वेळ अतिशय वेगाने जवळ येत आहे.

“मोठे संकट”

१०. येशूने भविष्यातील मोठ्या संकटाचे कशा प्रकारे वर्णन केले?

१० या दुष्ट जगाचा शेवट ‘मोठ्या संकटात’ होईल. (प्रकटी. ७:१४) हे संकट किती काळ राहील याविषयी बायबल आपल्याला सांगत नाही. पण, येशूने म्हटले: “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल.” (मत्त. २४:२१) या जगावर यापूर्वी आलेल्या संकटांचा विचार करा. उदाहरणार्थ, दुसऱ्‍या महायुद्धात अंदाजे ५ ते ६ कोटी लोकांचा बळी गेला. याच्या तुलनेत भविष्यातील ते मोठे संकट खूपच भयानक असेल. या संकटाचा शेवट हर्मगिदोनाच्या लढाईने होईल. त्या लढाईत यहोवा आपल्या सैन्याद्वारे सैतानाच्या नियंत्रणात असलेल्या जगाचा पूर्णपणे नाश करून त्याचे नामोनिशाण मिटवून टाकेल.—प्रकटी. १६:१४, १६.

११, १२. कोणत्या घटनेने मोठ्या संकटाची सुरुवात होईल?

११ मोठ्या संकटाचा पहिला टप्पा सुरू होण्याची नेमकी तारीख बायबलमधील भविष्यवाणीत सांगण्यात आलेली नाही. पण, त्याची सुरुवात एका विलक्षण घटनेने होईल हे मात्र आपल्याला सांगण्यात आले आहे. ही घटना म्हणजे, राजकीय शक्‍तींद्वारे खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा नाश. प्रकटीकरणाच्या १७ व १८ व्या अध्यायांतील भविष्यवाण्यांमध्ये खोट्या धर्माची तुलना एका कलावंतिणीशी करण्यात आली आहे, जिचे पृथ्वीवरील राजकीय शक्‍तींशी अनैतिक संबंध आहेत. प्रकटीकरण १७:१६ यात सांगितल्याप्रमाणे लवकरच या राजकीय शक्‍ती “कलावंतिणीचा द्वेष करितील व तिला ओसाड व नग्न करितील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.”

१२ हे घडण्याची वेळ येईल तेव्हा देव ‘आपला इरादा पूर्ण करण्याचे त्यांच्या [“राजकीय सत्ताधीशांच्या”] मनात घालेल.’ (प्रकटी. १७:१७) त्याअर्थी, हा नाश खरे तर देवच घडवून आणेल असे आपण म्हणू शकतो. शतकानुशतके देवाच्या इच्छेविरुद्ध असलेले खोटे सिद्धान्त शिकवल्याबद्दल व त्याच्या सेवकांचा छळ केल्याबद्दल देव ढोंगी धर्मव्यवस्थेविरुद्ध आपला न्यायदंड बजावेल. खोट्या धर्माचा लवकरच नाश होणार आहे याची जगातल्या लोकांना कल्पना नाही. पण यहोवाच्या विश्‍वासू सेवकांना मात्र असे घडणार हे माहीत आहे. आणि शेवटल्या काळादरम्यान त्यांनी लोकांना याविषयी सांगितलेही आहे.

१३. खोट्या धर्माचा नाश त्वरेने होईल हे कशावरून दिसून येते?

१३ खोट्या धर्माचा नाश झालेला पाहून लोकांना मोठा धक्का बसेल. बायबलमधील भविष्यवाणीत सांगितले आहे की ‘पृथ्वीवरील राजांपैकीही’ काही या नाशाविषयी असे म्हणतील: “अरेरे! . . . एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.” (प्रकटी. १८:९, १०, १६, १९) “एका घटकेत” या शब्दांवरून असे दिसून येते की ही घटना त्वरेने घडेल.

१४. यहोवाचे शत्रू त्याच्या सेवकांवर शेवटचा हल्ला चढवतील तेव्हा तो काय करेल?

१४ खोट्या धर्माचा नाश झाल्यावर काही काळाने, यहोवाच्या न्यायसंदेशांची घोषणा करत असलेल्या त्याच्या सेवकांवर हल्ला करण्यात येईल. (यहे. ३८:१४-१६) हे घडताच, यहोवाच्या लोकांवर हल्ला करणाऱ्‍यांना खुद्द यहोवाचाच सामना करावा लागेल, कारण त्याने आपल्या विश्‍वासू सेवकांचे संरक्षण करण्याचे वचन दिले आहे. यहोवा म्हणतो: ‘मी ईर्ष्येने, क्रोधाग्नीने तप्त होऊन बोलेन. . . . तेव्हा त्यांस समजेल की मी [यहोवा] आहे. (यहेज्केल ३८:१८-२३ वाचा.) देव आपल्या वचनात असे म्हणतो, की “जो कोणी तुम्हास [त्याच्या विश्‍वासू सेवकांस] स्पर्श करील तो [माझ्या] डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील.” (जख. २:८) त्यामुळे, यहोवाचे शत्रू त्याच्या सेवकांवर जागतिक पातळीवर हल्ला चढवतील तेव्हा यहोवा शांत बसणार नाही. तो त्यांच्याविरुद्ध कारवाई करेल आणि अशा रीतीने मोठ्या संकटाच्या शेवटल्या टप्प्याची म्हणजेच हर्मगिदोनाची सुरुवात होईल. ख्रिस्ताच्या नेतृत्त्वाखाली देवदूतांचे शक्‍तिशाली सैन्य सैतानाच्या जगाविरुद्ध यहोवाचे न्यायदंड बजावतील.

आपल्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे?

१५. या दुष्ट जगाचा अंत वेगाने जवळ येत आहे हे जाणून आपल्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे?

१५ या दुष्ट जगाचा अंत वेगाने जवळ येत आहे हे जाणून आपल्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे? प्रेषित पेत्राने लिहिले: “ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?” (२ पेत्र ३:११) हे शब्द सावध व जागृत राहण्याच्या महत्त्वावर भर देतात. म्हणजेच, आपली वागणूक देवाच्या नियमांनुसार असल्याची आणि आपण आपल्या जीवनात सुभक्‍तीची, अर्थात ज्यांतून यहोवाबद्दल प्रेम व्यक्‍त होईल अशी कार्ये करत आहोत किंवा नाही याची खातरी करणे महत्त्वाचे आहे. अंत येण्याअगोदर सुवार्तेच्या प्रचार कार्यात आपल्याकडून होईल तितका उत्साही सहभाग घेणे हे देखील या सुभक्‍तीच्या कार्यांत सामील आहे. पेत्राने असेही लिहिले: “सर्वांचा शेवट जवळ आला आहे; म्हणून . . . प्रार्थना करण्यासाठी सावध असा.” (१ पेत्र ४:७) सतत यहोवाला प्रार्थना केल्यास आणि त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे व त्याच्या जगव्याप्त मंडळीद्वारे त्याने आपले मार्गदर्शन करावे अशी त्याला विनंती केल्यास, आपल्याला त्याच्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध टिकवून ठेवता येईल आणि त्याच्याबद्दल आपले प्रेम व्यक्‍त करता येईल.

१६. आपण देवाच्या सल्ल्याचे सदोदित पालन करणे का गरजेचे आहे?

१६ या भयावह काळात राहत असताना आपण देवाच्या वचनातील या सल्ल्याचे सदोदित पालन केले पाहिजे: “अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.” (इफिस. ५:१५, १६) आज दुष्टाई इतिहासात कधीही नव्हती इतकी बोकाळली आहे. यहोवाच्या लोकांना त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यापासून परावृत्त करण्यासाठी किंवा त्यांचे लक्ष देवाच्या सेवेपासून विचलित करण्यासाठी सैतानाने असंख्य मार्ग शोधून काढले आहेत. देवाचे सेवक या नात्याने आपल्याला सैतानाचे हे डावपेच माहीत आहेत. आपण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून देवाप्रती आपली निष्ठा भंग करू इच्छित नाही. तसेच, लवकरच काय घडणार आहे हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपण यहोवावर व त्याच्या उद्देशांवर पूर्ण भरवसा ठेवतो.१ योहान २:१५-१७ वाचा.

१७. पुनरुत्थान होईल तेव्हा हर्मगिदोनातून बचावलेल्यांची काय प्रतिक्रिया असेल?

१७ मृतांना पुन्हा जिवंत करण्याचे देवाने दिलेले अद्‌भुत वचनही पूर्ण होईल कारण बायबल सांगते की “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रे. कृत्ये २४:१५) “पुनरुत्थान होईल” हे अगदी निश्‍चित आहे! याबद्दल शंकेला थाराच नाही कारण हे वचन स्वतः यहोवाने दिले आहे! यशया २६:१९ असे आश्‍वासन देते: “तुझे मृत जिवंत होतील, . . . मातीस मिळालेल्यांनो जागृत व्हा, गजर करा! . . . भूमि प्रेते बाहेर टाकील.” प्राचीन काळी, देवाचे लोक बंदिवासातून मुक्‍त होऊन आपल्या मायभूमीस परतले तेव्हा या शब्दांची पहिली पूर्णता झाली. यावरून आपल्याला भरवसा मिळतो की नव्या जगात हे वचन अक्षरशः पूर्ण होईल. मेलेल्यांतून उठलेले आपल्या प्रिय जनांना भेटतील, तो किती आनंदाचा काळ असेल! होय, सैतानाच्या जगाचा अंत अगदी जवळ आहे आणि देवाचे नवे जग लवकरच येत आहे. म्हणूनच, आपण सतत सावध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे!

तुम्हाला आठवते का?

• येशूने लोकांना प्रामुख्याने कशाविषयी शिकवले?

• आज राज्याच्या प्रचाराचे कार्य किती व्यापक प्रमाणावर केले जात आहे?

• सावध असणे महत्त्वाचे का आहे?

प्रेषितांची कृत्ये २४:१५ यातील आश्‍वासन तुम्हाला प्रोत्साहनदायक का वाटते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६, १७ पानांवरील चौकट/चित्र]

अशांततेच्या काळाची सुरुवात

२००७ साली ॲलन ग्रीनस्पॅन यांचे दी एज ऑफ टर्ब्युलंस: ॲडवेंचर्स इन ए न्यू वर्ल्ड हे पुस्तक प्रकाशित झाले. जवळजवळ २० वर्षे त्यांनी अमेरिकेच्या केंद्रिय व्यापारी यंत्रणेची देखरेख करणाऱ्‍या फेडरल रिझर्व बोर्डाचे अध्यक्षपद भूषवले होते. दी एज ऑफ टर्ब्युलंस या पुस्तकात १९१४ पूर्वीची जगाची परिस्थिती व त्यानंतरची जगाची परिस्थिती यातील उल्लेखनीय फरक ग्रीनस्पॅन दाखवतात:

“सर्व तत्कालीन वृत्तांनुसार तेव्हाचे जग सामाजिक विकासाच्या व सुसंस्कृतपणाच्या दिशेने उत्तरोत्तर प्रगती करत राहणार आहे असे वाटत होते; मानव समाजाला विकासाचा सर्वोच्च बिंदू गाठणे अशक्य नाही असे त्याकाळी वाटू लागले होते. एकोणिसाव्या शतकात गुलामांची खरेदी-विक्री करण्याची निंदनीय प्रथा संपुष्टात आली होती. अमानुष हिंसाचाराचे प्रकार कमी झाले होते. . . . सबंध एकोणिसाव्या शतकात जागतिक पातळीवर नवनवे शोध लावण्यात आले होते. त्यामुळे रेल्वे, टेलिफोन, वीज, सिनेमा, मोटारी व घरगुती उपकरणे यांसारख्या कितीतरी सोयीसुविधा उपलब्ध झाल्या. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, सकस आहार, पिण्याच्या शुद्ध पाण्याची उपलब्धता यांमुळे लोकांचे आयुष्यमान वाढले. . . . आता अशीच अखंड प्रगती होत राहणार अशी त्यावेळी जगातील बहुतेक लोकांची भावना होती.”

पण . . . “जीवितहानीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास दुसरे महायुद्ध कितीतरी जास्त नाशकारक असले, तरीसुद्धा मानव समाजाला व सुसंस्कृतपणाला पहिल्या महायुद्धामुळेच जास्त नुकसान झाले. पहिल्या महायुद्धात एक विश्‍वास नष्ट झाला. १९१४ च्या आधीची ती वर्षे मी कधीही विसरू शकत नाही, जेव्हा मानवजातीचे भविष्य अगदी उज्ज्वल वाटत होते, तिच्या प्रगतीत कोणताही अडथळा नाही, मर्यादा नाही असे वाटत होते. शंभर वर्षांच्या पूर्वीच्या तुलनेत आज आपला दृष्टिकोन अगदीच वेगळा असला, तरी तो वास्तवाला धरून आहे. आज आपण जागतिकीकरणाच्या युगात राहत आहोत आणि यामुळे मनुष्याचे जीवनमान बरेच सुधारले आहे हे खरे आहे. पण पहिल्या महायुद्धामुळे तेव्हाच्या युगावर जो परिणाम झाला होता, तोच परिणाम दहशतवाद, तापमानातील वाढ, किंवा निरनिराळ्या लोकसमूहांमध्ये वारंवार होणाऱ्‍या संघर्षांमुळे या युगावरही होईल का? याचे उत्तर सध्या कोणीही देऊ शकत नाही.”

ग्रीनस्पॅन त्यांच्या विद्यापीठ शिक्षणाच्या काळातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक बेंजमिन एम. अँडरसन (१८८६-१९४९) यांनी केलेले एक विधान उद्धृत करतात: “१९१४ च्या आधीचे जग आठवण्याइतके आणि तेव्हाच्या घडामोडी समजू शकण्याइतके जे प्रौढ होते त्यांना आज तो काळ अतिशय हवाहवासा वाटतो. तेव्हा जी सुरक्षिततेची भावना होती ती त्यानंतर कधीच अनुभवायला मिळाली नाही.”—इकॉनॉमिक्स अँड द पब्लिक वेल्फेअर.

यासारखेच विधान, जी. जे. मेयर यांनी ए वर्ल्ड अनडन या २००६ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकात केले आहे: “ऐतिहासिक घडामोडींनी ‘सर्वकाही बदलून टाकले’ असे आपण बरेचदा ऐकतो. निदान पहिल्या महायुद्धाच्या बाबतीत तरी हे विधान शंभर टक्के खरे आहे. या युद्धाने खरोखरच सर्वकाही बदलून टाकले: फक्‍त सरहद्दी, सरकारे आणि अनेक देशांचे भवितव्यच नव्हे, तर तेव्हापासून आजपर्यंत लोकांचा जगाकडे आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनदेखील या युद्धाने बदलून टाकला. या युद्धाने इतिहासात जणू एक मोठी दरी निर्माण केली, जिने पहिल्या महायुद्धाच्या नंतरच्या जगाला त्याआधीच्या सर्व गोष्टींपासून कायमचे दूर केले.”

[१८ पानांवरील चित्र]

हर्मगिदोनात यहोवा आपल्या शक्‍तिशाली देवदूतांच्या सैन्याला सैतानाच्या जगाविरुद्ध कारवाई करण्याची आज्ञा देईल