व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपल्या सामूहिक स्तुतीस पात्र

यहोवा आपल्या सामूहिक स्तुतीस पात्र

यहोवा आपल्या सामूहिक स्तुतीस पात्र

“परमेशाचे स्तवन करा.”—स्तो. १११:१.

१, २. “हालेलूया” या शब्दप्रयोगाचा काय अर्थ होतो आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये त्याचा वापर कसा करण्यात आला आहे?

हालेलूया!” हा शब्दप्रयोग ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेसमध्ये सहसा ऐकण्यात येतो. आणि काही लोक आपल्या रोजच्या संभाषणात सर्रासपणे त्याचा वापर करतात. पण फार कमी लोकांना त्याचा पवित्र अर्थ माहीत आहे. आणि या शब्दप्रयोगाचा वापर करणाऱ्‍या बऱ्‍याच लोकांची जीवनशैली देवाचा अनादर करणारी आहे. (तीत १:१६) बायबलच्या एका शब्दकोशानुसार, “विविध स्तोत्रांच्या लेखकांनी, आपल्यासोबत यहोवाची सामूहिक स्तुती करण्याचे सर्वांना आमंत्रण देण्यासाठी हालेलूया या शब्दाचा उपयोग केला आहे.” खरे पाहता, बायबलचे अनेक विद्वान “हालेलूया” या शब्दाचा अर्थ, “यहोवाची स्तुती करा,” असे असल्याचे सांगतात.

तेव्हा न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन या बायबल भाषांतरात स्तोत्र १११:१ यामध्ये हालेलूया या शब्दप्रयोगाचा अनुवाद “यहोवाची स्तुती करा!” असा करण्यात आला आहे. याचे ग्रीक भाषेतील रूप प्रकटीकरण १९:१-६ मध्ये चार वेळा आढळते. त्या ठिकाणी खोट्या धर्माच्या अंताचा विजयोत्सव करण्याच्या संदर्भात हा शब्दप्रयोग वापरण्यात आला आहे. खोट्या धर्माचा अंत होईल तेव्हा खऱ्‍या उपासकांकडे सन्मानाने “हालेलूया” म्हणण्याचे विशेष कारण असेल.

यहोवाची महान कृत्ये

३. नियमितपणे एकत्र येण्याचा आपला प्रमुख उद्देश काय आहे?

यहोवा सामूहिक रित्या केल्या जाणाऱ्‍या स्तुतीस पात्र का आहे याची अनेक कारणे स्तोत्र १११ ज्याने रचले तो देतो. १११ व्या स्तोत्राचे पहिले वचन म्हणते: “परमेशाचे स्तवन करा सरळ जनांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्‍वराचे उपकारस्मरण करीन.” आज यहोवाच्या साक्षीदारांना देखील असेच वाटते. स्थानिक मंडळ्यांमध्ये आणि मोठ्या अधिवेशनांमध्ये नियमितपणे एकत्र येण्याचा आपला प्रमुख उद्देश यहोवाची स्तुती करणे हा आहे.

४. आपण यहोवाच्या कार्यांचा शोध कसा करू शकतो?

“परमेश्‍वराची कृत्ये थोर आहेत, ज्यांस ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करितात.” (स्तो. १११:२) या वचनातील “शोध करितात” या शब्दप्रयोगाकडे लक्ष द्या. एका संदर्भ ग्रंथानुसार, हे वचन जे लोक “देवाच्या कार्यांवर मनापासून व भक्‍तिभावाने मनन करतात व त्यांचा अभ्यास करतात” त्यांना लागू होऊ शकते. यहोवाच्या प्रत्येक सृष्टीकार्यांतून त्याचा अद्‌भुत उद्देश दिसून येतो. त्याने सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या जागा ठरवल्या आहेत. यांचा एकमेकांशी उत्तम ताळमेळ असल्यामुळे आपल्या पृथ्वीला उब व प्रकाश मिळतो. तसेच दिवस-रात्र, ऋतू व भरती-ओहोटी शक्य होते.

५. मनुष्याने विश्‍वाबद्दल केलेल्या अभ्यासातून काय दिसून आले आहे?

शास्त्रज्ञांनी सौरमालेतील पृथ्वीच्या स्थानाचा तसेच चंद्राचा अचूक कक्ष, आकार आणि त्याचे वस्तुमान यांचा अभ्यास करून बरीच माहिती मिळवली आहे. या ग्रहांमधील सुव्यवस्था व परस्परांतील संबंधामुळे पृथ्वीवर सुंदर आणि नियमित ऋतूचक्र शक्य होते. तसेच विश्‍वाच्या नैसर्गिक शक्‍तींत होणाऱ्‍या लहान-सहान परंतु अचूक बदलांविषयी बरीच माहिती मिळाली आहे. मेकॅनिकल इंजिनियरींगचे एक प्राध्यापक, “द डिझाइन्ड ‘जस्ट सो’ युनिव्हर्स” या लेखात म्हणतात: “या विश्‍वाची निर्मिती केवळ अपघाताने झाली हे मान्य करणे अनेक वैज्ञानिकांना फार कठीण वाटते. म्हणूनच गेल्या ३० वर्षांच्या काळात या विषयांवरील त्यांचे विचार सतत बदलत का गेले हे समजण्याजोगे आहे. अतिशय विचारपूर्वक निर्माण केलेल्या पृथ्वीचा आपण जितका अधिक अभ्यास करू तितके अधिक आपल्याला जाणवेल की तिची रचना कोणा बुद्धिमान रचनाकाराने केली आहे.”

६. देवाने मानवाची केलेली रचना पाहून तुम्हाला काय वाटते?

देवाने केलेली मानवाची निर्मिती हे सृष्टीतील आणखी एक महान कार्य आहे. (स्तो. १३९:१४) देवाने मानवाला निर्माण केले तेव्हा त्याला मन व आवश्‍यक असणारे सर्व अवयव दिले तसेच त्याला काम करण्याची क्षमता व कुशलता देखील दिली. उदाहरणार्थ त्याला बोलण्याची, ऐकण्याची तसेच लिहिण्या-वाचण्याची क्षमता दिली. अनेक लोकांठायी या क्षमता आहेत. तुमच्या शरीराची रचना ही एक अद्‌भुत कलाकृती आहे असे म्हणता येईल कारण तुम्ही सरळ उभे राहू शकता. शरीराची घडण आणि संतुलन, त्याचे कार्ये आणि रासायनिक प्रक्रिया पाहून आपण चकित झाल्याशिवाय राहत नाहीत. या शिवाय, तुमचे मन आणि तुमच्या ज्ञानेंद्रियांना कार्य करायला लावणारे मज्जातंतुंचे विस्मयकारक जाळे, शास्त्रज्ञांनी आजपर्यंत केलेल्या कोणत्याही कार्याच्या तोडीचे नाही. खरे पाहता, मानवाला बहाल करण्यात आलेल्या मन व ज्ञानेंद्रियांच्या कार्यामुळेच तो बरेच काही साध्य करू शकला आहे. सगळ्यात प्रशिक्षित व कुशल इंजिनियर देखील आपल्या हातांच्या दहा बोटांसारखे विलक्षण रचना असलेले, अतिशय सुरेख व उपयुक्‍त असे यंत्र आजवर बनवू शकला नाही. स्वतःला विचारा, ‘सर्वोत्तम कलाकृती आणि बांधकाम देवाने दिलेल्या बोटांचा कुशलपणे वापर केल्याशिवाय करता आले असते का?’

यहोवाची महान कृत्ये व त्याचे गुण

७. बायबल ही देवाची उत्कृष्ट हस्तकृती आहे असे आपण का म्हणू शकतो?

बायबलमध्ये वर्णन केल्याप्रमाणे, यहोवाच्या महान कार्यांत त्याने मानवजातीसाठी केलेल्या इतर गोष्टींचा समावेश होतो. बायबलसुद्धा यहोवा देवाची एक उत्कृष्ट हस्तकृती आहे. त्यातील पुस्तकांत उल्लेखनीय सुसंगतपणा आढळतो. इतर कोणतेही पुस्तक बायबलसारखे ‘परमेश्‍वरप्रेरित व सद्‌बोध करण्यास उपयोगी’ नाही. (२ तीम. ३:१६) उदाहरणार्थ, देवाने नोहाच्या दिवसांत पृथ्वीवरील दुष्टाई कशी काढून टाकली हे बायबलमधील उत्पत्ति नावाच्या पहिल्या पुस्तकात सांगितले आहे. यहोवाने इस्त्राएल लोकांना इजिप्तच्या गुलामीतून सोडवून तोच खरा देव आहे हे कसे शाबीत केले त्याविषयीचे वर्णन निर्गम या दुसऱ्‍या पुस्तकात दिले आहे. स्तोत्रकर्त्याच्या मनात कदाचित या घटना असाव्यात म्हणूनच त्याने म्हटले: “[यहोवाची] कृति साक्षात्‌ मान व महिमा आहे. त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते. आपल्या अद्‌भुतकृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे; परमेश्‍वर दयाळू व कनवाळू आहे.” (स्तो. १११:३, ४) गतकाळात यहोवाने केलेली कार्ये तसेच त्याने तुमच्यासाठी जे जे केले आहे ते सर्व त्याचा “मान व महिमा” यांचे स्मरण करून देत नाही का?

८, ९. (क) देवाच्या कार्यांत व मानवाच्या कार्यांत कोणती तफावत दिसते? (ख) देवाचे कोणते गुण तुम्हाला आवडतात?

स्तोत्रकर्ता, यहोवाचे उल्लेखनीय गुण जसे की न्यायीपण, दयाळूपणा व कनवाळूपणा यांविषयी देखील सांगतो हे लक्षात घ्या. पापी मनुष्यांच्या कार्यातून न्यायीपण दिसून येत नाही हे तर तुम्हाला माहीतच आहे. अनेकदा लोभ, मत्सर आणि घमेंड यामुळे ते न्यायीपणा दाखवत नाहीत. ही गोष्ट, युद्धे चेतवण्याकरता व आपल्या आर्थिक लाभाकरता मानव निर्माण करत असलेल्या जीवघेण्या हत्यारांवरून दिसून येते. यामुळे लाखो निष्पाप लोकांवर दुःख ओढवले आहे व त्यांच्यावर भीतीचे सावट पसरले आहे. मानवाच्या कार्यांमुळे पुष्कळ गरीब लोकांवर जुलूम झाला आहे. याचे एक उदाहरण द्यायचे झाल्यास, पिरॅमिड बांधण्यासाठी लोकांचा उपयोग गुलाम म्हणून करण्यात आला होता. इजिप्तमधील घमेंडी फारोंचे दफन करण्यासाठी हे पिरॅमिड बांधण्यात आले होते. शिवाय, आधुनिक काळातील मानवांच्या अनेक कार्यांमुळे केवळ अत्याचारच नव्हे तर “पृथ्वीची नासाडी” देखील झाली आहे.—प्रकटीकरण ११:१८ वाचा.

मानवाच्या कार्यांपासून यहोवाची कार्ये किती वेगळी आहेत. त्याची कार्ये नेहमीच योग्य असतात! त्याच्या कार्यांत, पापी मानवजातीसाठी त्याने केलेल्या तारणाच्या दयाळू योजनेचा समावेश होतो. खंडणी पुरवून “त्याने आपले नीतिमत्व व्यक्‍त” केले. (रोम. ३:२५, २६) खरोखर, “त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते!” पापी मानवजातीबद्दल त्याने दाखवलेल्या सहनशीलतेवरून त्याचा दयाळूपणा दिसून येतो. काही प्रसंगी त्याने आपल्या लोकांना चुकीच्या मार्गावरून मागे वळावे व चांगले ते करण्याची विनवणी करून त्यांना दयाळूपणा दाखवला.—यहेज्केल १८:२५ वाचा.

यहोवा आपल्या वचनाला जागतो

१०. अब्राहामासोबत केलेल्या कराराच्या बाबतीत यहोवाने विश्‍वासूपणाचे कोणते उदाहरण मांडले?

१०“त्याने आपले भय धरणाऱ्‍यांस अन्‍न दिले आहे; तो आपला करार सदा स्मरतो.” (स्तो. १११:५) असे दिसते की स्तोत्रकर्ता येथे यहोवाने अब्राहामासोबत केलेल्या कराराविषयी बोलत आहे. यहोवाने अब्राहामाच्या संततीला आशीर्वादित करण्याचे वचन दिले व ते शत्रूंची नगरे हस्तगत करतील असे म्हटले. (उत्प. २२:१७, १८; स्तो. १०५:८, ९) या वचनांची प्राथमिक पूर्णता अब्राहामाच्या संततीचे इस्राएल राष्ट्र बनले तेव्हा झाली. या राष्ट्राने बऱ्‍याच काळापर्यंत इजिप्तची गुलामी केली पण नंतर ‘[देवाला] अब्राहामाशी केलेल्या कराराचे स्मरण झाले’ व त्याने त्यांना मुक्‍त केले. (निर्ग. २:२४) यानंतर यहोवाने त्यांच्याशी केलेल्या व्यवहारावरून तो किती उदार आहे हे दिसून आले. त्याने शारीरिक भोजन देऊन त्यांचे पोषण केले व त्यांनी आपल्या दर्जांनुसार जीवन व्यतीत करावे म्हणून त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन दिले. (अनु. ६:१-३; ८:४; नहे. ९:२१) यानंतरच्या शतकांदरम्यान इस्राएल राष्ट्राने त्याची अवज्ञा केली. यहोवाने वेळोवेळी आपल्या संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठवले पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही. इस्राएलाची इजिप्तच्या गुलामीतून मुक्‍तता केल्याच्या १,५०० पेक्षा अधिक वर्षांनंतर देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला पृथ्वीवर पाठवले. बहुतेक यहुद्यांनी येशूचा स्वीकार केला नाही. उलट त्यांनी त्याचा वध होऊ दिला. यानंतर यहोवाने एका नव्या, आध्यात्मिक राष्ट्राची अर्थात “देवाच्या इस्राएलाची” स्थापना केली. ख्रिस्तासोबत मिळून हे राष्ट्र अब्राहामाचे लाक्षणिक संतान बनते. मानवजातीला आशीर्वादित करण्यासाठी यहोवा याच संतानाचा उपयोग करणार असल्याचे त्याने भाकीत केले.—गलती. ३:१६, २९; ६:१६.

११. आजही यहोवा अब्राहामाशी केलेल्या ‘कराराचे स्मरण’ कसे करतो?

११ आजही यहोवाला अब्राहामाशी केलेल्या ‘कराराचे’ आणि त्याकरवी मिळणाऱ्‍या आशीर्वादांचे ‘स्मरण’ आहे. आज तो ४०० पेक्षा अधिक भाषांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे. आणि “आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे” या अनुषंगाने आपल्या शारीरिक गरजा पुरवण्यासाठी केल्या जाणाऱ्‍या प्रार्थनांना देखील तो उत्तर देतो.—लूक ११:३; स्तो. ७२:१६, १७; यश. २५:६-८.

यहोवाचे विस्मयकारक सामर्थ्य

१२. प्राचीन काळातील इस्राएल लोकांना कशा प्रकारे “राष्ट्रे वतनादाखल” देण्यात आली?

१२“त्याने आपल्या लोकांस राष्ट्रे वतनादाखल देऊन आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखविले आहे.” (स्तो. १११:६) स्तोत्रकर्त्याच्या मनात कदाचित इस्राएल लोकांची इजिप्तमधून झालेल्या चमत्कारिक मुक्‍ततेची घटना असावी. ही घटना इस्राएलच्या इतिहासात घडलेली उल्लेखनीय घटना होती. यहोवाने इस्राएल लोकांना वाग्दत्त देशात जाऊ दिल्यावर ते यार्देन नदीच्या पूर्वेकडील व पश्‍चिमेकडील राज्ये काबीज करू शकले. (नहेम्या ९:२२-२५ वाचा.) अशा प्रकारे यहोवाने इस्राएल लोकांना “राष्ट्रे वतनादाखल” दिली. यातून देवाचे सामर्थ्य प्रकट झाले.

१३, १४. (क) बॅबिलोनच्या संदर्भात यहोवाच्या सामर्थ्याचा उल्लेख करताना स्तोत्रकर्त्याच्या मनात कदाचित कोणती घटना असावी? (ख) यहोवाने आपल्या लोकांना मुक्‍त करण्यासाठी आणखी कोणती महान कार्ये केली?

१३ यहोवाने इस्राएल लोकांसाठी सर्व काही करूनही त्यांनी त्याच्याबद्दल किंवा अब्राहाम, इसहाक आणि याकोब या त्यांच्या पूर्वजांबद्दल आदर दाखवला नाही, हे आपण जाणतो. ते बंड करत राहिले. सरतेशेवटी, बॅबिलोनकरवी देवाने त्यांना देशातून काढून बंदिवान म्हणून जाऊ दिले. (२ इति. ३६:१५-१७; नहे. ९:२८-३०) बायबलच्या काही विद्वानांच्या मते १११ चा स्तोत्रकर्ता, इस्राएली लोक बॅबिलोनच्या बंदिवासातून आपल्या मायदेशी परतले तोपर्यंत जिवंत होता. हे खरे असल्यास, यहोवाने दाखवलेल्या निष्ठेची व सामर्थ्याची स्तुती करण्यास तो अधिकच प्रवृत्त झाला असावा. बंदिवानांना केव्हाही मुक्‍त न करण्याचे बॅबिलोन साम्राज्याचे धोरण होते. पण यहोवाने आपल्या लोकांना मुक्‍त करून त्याची निष्ठा व सामर्थ्य प्रकट केले.—यश. १४:४, १७.

१४ सुमारे पाच शतकांनंतर, पश्‍चात्तापी मानवांची पाप व मृत्यूच्या दास्यत्वातून सुटका करून यहोवाने आपले सामर्थ्य अधिक मोठ्या प्रमाणात प्रकट केले. (रोम. ५:१२) यामुळे १,४४,००० मानवांना, आत्म्याने अभिषिक्‍त असलेले ख्रिस्ताचे अनुयायी बनण्याची संधी प्राप्त झाली. सन १९१९ मध्ये या अभिषिक्‍त जनांच्या एका लहान शेष वर्गाची खोट्या धर्माच्या दास्यत्वातून सुटका करून यहोवाने आपले सामर्थ्य दाखवले. या अंतसमयात पृथ्वीवर हयात असलेले अभिषिक्‍त जन देवाच्या सामर्थ्यानेच सर्वकाही साध्य करत आहेत. मरेपर्यंत विश्‍वासू राहिल्यावर पश्‍चात्तापी मानवांच्या भल्याकरता ते येशू ख्रिस्तासोबत स्वर्गातून राज्य करतील. (प्रक. २:२६, २७; ५:९, १०) प्राचीन इस्राएलच्या तुलनेत एका मोठ्या प्रमाणात संबंध पृथ्वी त्यांना वतनादाखल मिळेल.—मत्त. ५:५.

सर्वकाळ टिकणारे विश्‍वसनीय सिद्धान्त

१५, १६. (क) देवाच्या हस्तकृतीत कशाचा समावेश होतो? (ख) देवाने प्राचीन इस्राएलाला कोणत्या आज्ञा दिल्या होत्या?

१५“त्यांच्या हातची कृत्ये साक्षात्‌ सत्य व न्याय आहेत; त्याचे सर्व विधि विश्‍वसनीय आहेत. ते सदासर्वकाळ अढळ असे आहेत. ते सत्याने व सरळपणाने नेमिलेले आहेत.” (स्तो. १११:७, ८) ‘यहोवाच्या हातच्या कृत्यांमध्ये’ त्याने इस्राएल लोकांना दिलेल्या दहा महत्त्वपूर्ण आज्ञांचा समावेश होतो. या आज्ञा त्याने दगडाच्या दोन पाट्यांवर लिहून दिल्या होत्या. (निर्ग. ३१:१८) इतर नियमांबरोबरच या आज्ञा देखील मोशेच्या नियमशास्त्र करारात समाविष्ट करण्यात आल्या. हे सर्व नियम व दहा आज्ञा सर्वकाळ टिकणारे व विश्‍वसनीय सिद्धान्त यांवर आधारित आहेत.

१६ उदाहरणार्थ, दहा आज्ञेतील एका आज्ञेत म्हटले आहे, की “मी तुझा देव परमेश्‍वर ईर्ष्यावान देव आहे.” याच आज्ञेत यहोवाने पुढे असे म्हटले: “जे माझ्यावर प्रेम करितात व माझ्या आज्ञा पाळितात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करितो.” या दहा आज्ञांमध्ये कोणत्याही काळाकरता व्यवहारी असणारे सिद्धान्त देखील होते. जसे की तू “आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख,” आणि “चोरी करू नको.” तसेच इतरांच्या मालकीच्या असलेल्या कशाचाही लोभ धरू नको यासारख्या अतिशय गहिरा अर्थ असलेल्या नियमांचाही त्यात समावेश होता.—निर्ग. २०:५, ६, १२, १५, १७.

आपला पवित्र व भययोग्य उद्धारकर्ता

१७. कोणत्या कारणांसाठी इस्राएल लोक देवाचे नाव पवित्र मानू शकले असते?

१७“त्याने आपल्या लोकांस उद्धारदान पाठवून दिले आहे; त्याने आपला करार सर्वकाळचा नेमिला आहे. त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे.” (स्तो. १११:९) या ठिकाणी देखील, स्तोत्रकर्त्याच्या मनात यहोवाने अब्राहामाशी केलेल्या कराराच्या बाबतीत दाखवलेली निष्ठा असावी. यहोवाचे लोक प्रथम प्राचीन इजिप्तच्या गुलामगिरीत व नंतर बॅबिलोनमध्ये बंदिवान म्हणून होते तेव्हा त्याने त्यांचा त्याग केला नाही. तर या दोन्ही प्रसंगी देवाने आपल्या लोकांचा उद्धार केला अर्थात त्यांची सुटका केली. देवाने साध्य केलेली निदान ही दोन कार्ये पाहून तरी इस्राएल लोकांनी देवाचे नाव पवित्र मानायला हवे होते.निर्गम २०:७; रोमकर २:२३, २४ वाचा.

१८. देवाचे नाव धारण करणे हा एक बहुमान आहे असे तुम्हाला का वाटते?

१८ आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या बाबतीतही जे अशक्य होते ते यहोवाने शक्य करून दाखवले. त्याने त्यांना पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वातून मुक्‍त केले. आदर्श प्रार्थनेतील पहिली विनंती अर्थात “तुझे नाव पवित्र मानिले जावो,” या विनंतीनुसार जीवन व्यतीत करण्याचा आपण सर्वाधिक प्रयत्न केला पाहिजे. (मत्तय ६:९) या गौरवशाली नावावर मनन केल्याने आपल्या मनात देवाविषयीचे भय उत्पन्‍न होते. स्तोत्र १११ ज्याने रचले त्याचा देवाच्या भयाविषयी योग्य दृष्टिकोन होता. त्याने म्हटले: “परमेश्‍वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात [त्याच्या आज्ञांचे पालन करतात] त्या सर्वांस सुबुद्धि प्राप्त होते.”स्तो. १११:१०.

१९. पुढील लेखात आपण कशाची चर्चा करणार आहोत?

१९ यहोवाबद्दलचे हितकारक भय असल्यास आपण वाइटाचा द्वेष करू. तसेच, पुढच्या लेखात चर्चा केल्या जाणाऱ्‍या स्तोत्र ११२ या अध्यायात दिलेल्या यहोवाच्या उत्कृष्ट गुणांचे अनुकरण करण्यासही देवाचे भय आपल्याला प्रवृत्त करील. यहोवाची सदासर्वकाळ स्तुती करणाऱ्‍या लाखो लोकांमध्ये आपल्यालाही सहभाग घेता यावा म्हणून आपण काय केले पाहिजे ते या स्तोत्रात सांगितले आहे. यहोवा नक्कीच आपल्या सामूहिक स्तुतीस पात्र आहे. यहोवाचे “स्तवन सर्वकाळ चालते.”स्तो. १११:१०.

मनन करण्याकरता प्रश्‍न

• यहोवा आपल्या सामूहिक स्तुतीस का पात्र आहे?

• यहोवाच्या कार्यांतून त्याचे कोणते गुण प्रकट होतात?

• देवाचे नाव धारण करणे हा एक बहुमान आहे असे तुम्हाला का वाटते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२० पानांवरील चित्र]

नियमितपणे एकत्र येण्याचा आपला प्रमुख उद्देश यहोवाची स्तुती करणे हा आहे

[२३ पानांवरील चित्र]

यहोवाचे सर्व नियम सर्वकाळ टिकणाऱ्‍या विश्‍वसनीय सिद्धान्तांवर आधारित आहेत