व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कधीही यहोवाला विसरू नका

कधीही यहोवाला विसरू नका

कधीही यहोवाला विसरू नका

जमावातील काहींना यापूर्वीही अशा प्रकारचा अनुभव आला होता. पण, बहुतेक जणांसाठी, अंगाला पाण्याचा थेंबही न लागता नदीचे पात्र ओलांडण्याची ही पहिलीच वेळ होती. आणि त्यानंतर परत त्यांना कधीही असा अनुभव आला नाही. यहोवाने त्यांच्या डोळ्यांदेखत यार्देन नदीचे पाणी धरणाप्रमाणे अडवले होते. तेव्हा लाखो इस्राएल लोकांच्या मोठ्या समुदायाने नदीचे पात्र ओलांडून पलीकडे प्रतिज्ञात देशात प्रवेश केला. ४० वर्षांपूर्वी तांबड्या समुद्रातून चालून गेलेल्या त्यांच्या पूर्वजांप्रमाणेच आज यार्देन नदी ओलांडतानाही बऱ्‍याच इस्राएलांनी कदाचित मनातल्या मनात म्हटले असेल: ‘यहोवाचा हा चमत्कार मी कधीही विसरणार नाही.’—यहो. ३:१३-१७.

पण यहोवाला माहीत होते की इस्राएल लोकांपैकी काही जण ‘त्याची कृत्ये लवकरच विसरतील.’ (स्तो. १०६:१३) म्हणूनच, त्याने इस्राएल लोकांचा नेता यहोशवा याला नदीच्या तळातून १२ धोंडे घेऊन ते त्यांच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी ठेवण्याची आज्ञा दिली. अशी आज्ञा यहोवाने का दिली होती, याविषयी यहोशवाने असा खुलासा केला: “हे धोंडे इस्राएल लोकांसाठी कायमचे स्मारक होतील.” (यहो. ४:१-८) धोंड्यांचे हे स्मारक इस्राएल राष्ट्राला यहोवाच्या सामर्थ्यशाली कृत्यांची आठवण करून देणार होते आणि त्यांनी सदैव यहोवाची एकनिष्ठपणे सेवा केली पाहिजे हे वारंवार त्यांच्या मनावर ठसवणार होते.

हा अहवाल आज देवाच्या लोकांकरताही महत्त्वाचा आहे का? हो, कारण आपणही यहोवाला कधीही न विसरता एकनिष्ठेने त्याची सेवा करत राहिली पाहिजे. इस्राएल राष्ट्राला देण्यात आलेल्या आणखीही काही चेतावण्या आज यहोवाच्या सेवकांसाठी महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ मोशेचे हे शब्द लक्षात घ्या: “सावध ऐस, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधि मी आज तुला सांगत आहे ते पाळावयाचे सोडून तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याला विसरशील.” (अनु. ८:११) या वचनानुसार जाणीवपूर्वक यहोवाच्या आज्ञा भंग करणे हे यहोवाला विसरण्यासारखेच आहे. त्याअर्थी, आज आपणही देवाला विसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ख्रिस्ती बांधवांना लिहिताना प्रेषित पौलाने त्यांना इस्राएल लोकांच्या अरण्यातील “अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे” न वागण्याची ताकीद दिली होती.—इब्री ४:८-११.

तर आता आपण इस्राएल राष्ट्राच्या इतिहासातील काही घटनांचे परीक्षण करू या. या घटनांवरून, देवाला न विसरणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होते. त्यासोबतच, आपण दोन एकनिष्ठ इस्राएली पुरुषांच्या उदाहरणाकडेही लक्ष देऊ या. त्यांची उदाहरणे आपल्याला धीराने व कृतज्ञ मनोवृत्तीने यहोवाची सेवा करण्याची प्रेरणा देतील.

इस्राएलांनी यहोवाला का विसरायचे नव्हते?

इस्राएल लोक इजिप्तमध्ये असतानाच्या सबंध काळात यहोवा कधीही त्यांना विसरला नाही. “अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे [यहोवास] स्मरण झाले.” (निर्ग. २:२३, २४) आणि त्यांना गुलामीतून मुक्‍त करण्यासाठी यहोवाने जे केले ते खरोखर सदैव स्मरणात ठेवण्याजोगे होते.

यहोवाने इजिप्तवर नऊ पीडा आणल्या. फारोच्या ज्योतिषी व पंडितांना या पीडा थांबवण्यासाठी काहीही करता आले नाही. तरीसुद्धा, फारोने यहोवाचा उघड अवमान केला आणि इस्राएल लोकांना जाऊ देण्यास त्याने साफ नकार दिला. (निर्ग. ७:१४–१०:२९) पण, दहाव्या पीडेनंतर मात्र तो मगरूर राजा नमला आणि देवाने सांगितल्याप्रमाणे करण्यास कबूल झाला. (निर्ग. ११:१-१०; १२:१२) मोशेच्या नेतृत्त्वाखाली इस्राएल लोक आणि विदेशी लोकांचा एक मोठा मिश्र समुदाय, म्हणजे अंदाजे ३०,००,००० लोक इजिप्तमधून बाहेर पडले. (निर्ग. १२:३७, ३८) ते थोड्या दूरपर्यंतही गेले नव्हते तोच फारोने आपला इरादा बदलला. त्याने आपल्या रथसेनेला आणि घोडदळाला—त्याकाळच्या पृथ्वीवरील सर्वात शक्‍तिशाली सेनेला—आपल्या पूर्वीच्या दासांना पुन्हा पकडून आणण्याची आज्ञा दिली. इकडे यहोवाने मोशेला सांगितले की त्याने इस्राएल लोकांना, तांबडा समुद्र आणि त्याजवळील एका पर्वत रांगेच्या मधोमध असलेल्या पीहहिरोथ नावाच्या एका ठिकाणी न्यावे. एकीकडे समुद्र आणि दुसरीकडे डोंगर असल्यामुळे या ठिकाणातून बाहेर पडायला जणू मार्गच नव्हता.—निर्ग. १४:१-९.

आता इस्राएल लोक चांगलेच अडकले असे फारोला वाटले. त्याचे सैन्य इस्राएलांवर हल्ला करणारच होते. पण यहोवाने त्यांच्यामध्ये व इस्राएलांमध्ये मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ उभा केल्यामुळे ते इस्राएलांपर्यंत पोचू शकले नाहीत. मग देवाने तांबड्या समुद्राला मधोमध दुभागले. त्यामुळे समुद्राच्या तळातून रस्ता तयार झाला आणि दोन्ही बाजूंना जवळजवळ ५० फूट उंचीच्या पाण्याच्या भिंती उभ्या राहिल्या. इस्राएल लोक समुद्रातून कोरड्या जमिनीवर चालू लागले. लवकरच इजिप्शियन लोक समुद्राच्या काठापर्यंत पोचले. तेथून ते इस्राएल लोकांना पलीकडे जाताना पाहू शकत होते.—निर्ग. १३:२१; १४:१०-२२.

फारोच्या जागी दुसरा कोणताही समजदार सेनाप्रमुख असता तर तो तेथूनच मागे फिरला असता. पण फारो अर्थातच असे करणार नव्हता. त्याने तर पूर्ण आत्मविश्‍वासाने आपल्या सर्व रथसेनेला व घोडेस्वारांना इस्राएल लोकांच्या मागोमाग जाण्याचा आदेश दिला. इजिप्शियन लोक झपाटल्यासारखे इस्राएलांचा पाठलाग करत राहिले. पण, ते इस्राएल लोकांना गाठणार इतक्यात काहीतरी विलक्षण घडले. त्यांचे रथच पुढे जाईनासे झाले! यहोवाने त्यांच्या रथांची चाके काढून टाकली होती.—निर्ग. १४:२३-२५; १५:९.

इजिप्शियन लोक आपले मोडलेले रथ कसेबसे चालवण्याचा प्रयत्न करू लागले. तोपर्यंत सर्व इस्राएल लोक पूर्वेकडील किनाऱ्‍यावर पोचले. आता, मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला. तेव्हा, यहोवाने दुभंगलेल्या समुद्राचे पाणी पूर्ववत केले. फारो व त्याच्या सैनिकांवर लाखो टन पाण्याच्या भिंती कोसळल्या व ते सर्व समुद्रात बुडाले. त्यांच्यापैकी कोणीही जिवंत वाचला नाही. अशा रीतीने इस्राएल लोक मुक्‍त झाले!—निर्ग. १४:२६-२८; स्तो. १३६:१३-१५.

या घटनेची खबर आसपासच्या राष्ट्रांत पसरली तेव्हा त्या लोकांच्या मनात दहशत बसली. (निर्ग. १५:१४-१६) चाळीस वर्षे उलटून गेल्यावरही यरीहोत राहणाऱ्‍या राहाबेने दोन इस्राएल माणसांना असे सांगितले: “आम्हाला तुमची दहशत बसली आहे, . . . कारण तुम्ही मिसर देशाहून निघाला तेव्हा तुमच्यासमोर परमेश्‍वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटविले . . . हे आमच्या कानी आले आहे.” (यहो. २:९, १०) याचा अर्थ, यहोवाने आपल्या लोकांना कशा प्रकारे सोडवले हे मूर्तिपूजक राष्ट्रांतील लोकही विसरले नव्हते. त्याअर्थी, इस्राएल लोकांनी तर निश्‍चितच यहोवाला विसरायला नको होते.

‘आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्यांना सांभाळले’

तांबडा समुद्र ओलांडून इस्राएल लोक सीनायच्या “घोर व भयानक रानातून” चालू लागले. त्या ‘रुक्ष व निर्जल भूमीत’ इतक्या मोठ्या लोकसमुदायाकरता अन्‍नपाणी कोठून मिळणार होते? पण यहोवाचा हात तोकडा नव्हता. मोशेने आठवून सांगितले: “तो [इस्राएल] त्याला [यहोवाला] वैराण प्रदेशात व घोंघावणाऱ्‍या ओसाड रानात सापडला; त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली, आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले.” (अनु. ८:१५; ३२:१०) यहोवाने त्या लोकांना कशा प्रकारे सांभाळले?

यहोवाने त्यांना ‘आकाशातून अन्‍न दिले.’ मान्‍ना म्हटलेले हे चमत्कारिक अन्‍न ‘रानातील भूमीवर’ दिसायचे. (निर्ग. १६:४, १४, १५, ३५) तसेच यहोवाने त्यांच्याकरता “गारेच्या खडकातून पाणी काढिले.” देवाच्या आशीर्वादाने त्यांच्या ४० वर्षांच्या भटकंतीत त्यांच्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत, किंवा त्यांचे पाय कधी सुजले नाहीत. (अनु. ८:४) याच्या बदल्यात यहोवाला त्यांच्याकडून कोणती रास्त अपेक्षा होती? मोशेने इस्राएलांना सांगितले: “स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वतःला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील.” (अनु. ४:९) इस्राएल लोकांनी कृतज्ञ मनोवृत्तीने यहोवाच्या तारणाची कृत्ये आठवणीत ठेवली असती, तर ते सदैव त्याची सेवा करू शकले असते व त्याच्या आज्ञांचे पालन करू शकले असते. पण त्यांनी तसे केले का?

विसरण्याची प्रवृत्ती कृतघ्न बनवते

मोशेने म्हटले: “तुला जन्मास घातलेल्या खडकाची तू पर्वा केली नाही, व तुला जन्म देणाऱ्‍या देवाला तू विसरलास.” (अनु. ३२:१८) यहोवाने तांबड्या समुद्राजवळ केलेला चमत्कार, अरण्यात त्याने इस्राएल राष्ट्राचा संभाळ करण्यासाठी केलेल्या तरतुदी, तसेच त्याने त्यांच्यावर केलेले इतर अनेक उपकार यांकडे इस्राएल लोकांनी दुर्लक्ष केले व या सर्व गोष्टी ते लवकरच विसरून गेले. इस्राएल लोक बंडखोर बनले.

एकदा, पाणी मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही असे वाटून इस्राएल लोक मोशेबद्दल अपशब्द बोलू लागले. (गण. २०:२-५) जो मान्‍ना त्यांना जिवंत राहण्याकरता पुरवण्यात आला होता त्याबद्दल त्यांनी अशी तक्रार केली: “ह्‍या हलक्या अन्‍नाला आम्ही कंटाळलो आहो.” (गण. २१:५) त्यांनी देवाच्या निर्णयांविरुद्ध आक्षेप घेतला आणि मोशेचे नेतृत्त्व नाकारले. ते म्हणाले: “आम्ही मिसर देशात मेलो असतो तर बरे झाले असते किंवा ह्‍याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते. . . . आपण कोणाला तरी पुढारी करून मिसर देशाला परत जाऊ या.”—गण. १४:२-४.

इस्राएल लोकांनी यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन केले तेव्हा त्याला कसे वाटले? त्या घटनांबद्दल सांगताना एका स्तोत्रकर्त्याने नंतर असे लिहिले: “किती वेळा तरी त्यांनी रानात त्याच्याविरुद्ध बंडाळी केली! किती वेळा तरी त्यांनी अरण्यात त्याला दु:ख दिले! पुन्हा पुन्हा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, व इस्राएलाच्या पवित्र प्रभूस चिडविले. त्याच्या प्रतापी हस्ताचे त्यांस स्मरण झाले नाही; त्याने त्यांस शत्रूपासून सोडविले, त्याने मिसर देशात आपली चिन्हे . . . दाखविली, तो दिवस त्यांनी आठविला नाही.” (स्तो. ७८:४०-४३) खरोखर, इस्राएल लोकांच्या विसरण्याच्या प्रवृत्तीमुळे यहोवाचे मन अतिशय दुखावले गेले.

ते दोघे यहोवाला विसरले नाहीत

पण, इस्राएल लोकांपैकी काही जण मात्र यहोवाला विसरले नाहीत. त्यांच्यापैकी दोघे यहोशवा व कालेब हे होते. प्रतिज्ञात देशाची पाहणी करण्यासाठी कादेश-बर्ण्याहून पाठवण्यात आलेल्या १२ हेरांमध्ये ते दोघेही होते. १२ हेरांपैकी दहा जणांनी प्रतिज्ञात देशाविषयी चांगले वृत्त दिले नाही. पण यहोशवा व कालेब यांनी मात्र लोकांना असे सांगितले: “चहूकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे. परमेश्‍वर आमच्यावर प्रसन्‍न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्‍या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल. तुम्ही परमेश्‍वराविरुद्ध बंड मात्र करू नका.” लोकांनी हे ऐकले तेव्हा ते यहोशवा व कालेब यांना दगडमार करण्याची भाषा करू लागले. पण, यहोशवा व कालेब यहोवावर भरवसा ठेवून खंबीर राहिले.—गण. १४:६-१०.

अनेक वर्षांनंतर कालेबने यहोशवाला असे सांगितले: “परमेश्‍वराचा सेवक मोशे ह्‍याने मला हा देश हेरावयाला कादेश-बर्ण्याहून पाठविले तेव्हा मी चाळीस वर्षांचा होतो आणि मी प्रामाणिकपणे खबर काढून आणली; माझ्याबरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणीपाणी होईल असे केले, पण मी मात्र आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो.” (यहो. १४:६-८) यहोवावर भरवसा ठेवून कालेब व यहोशवा यांनी नाना प्रकारच्या कठीण परिस्थितींना तोंड दिले. त्यांनी जीवनभर यहोवाला न विसरण्याचा निर्धार केला होता.

तसेच, यहोवाने आपल्या लोकांना एक सुपीक देश देण्याचे जे वचन दिले होते, ते त्याने पूर्ण केले आहे हे ओळखून कालेब व यहोशवा यांनी त्याच्याप्रती कृतज्ञताही दाखवली. खरोखर, इस्राएल लोक जिवंत होते ते केवळ यहोवाच्या कृपेनेच. यहोशवाने लिहिले: “इस्राएल लोकांना जो देश देण्याची परमेश्‍वराने शपथ वाहिली होती तो सबंध देश त्याने त्यांना दिला. . . . परमेश्‍वराने इस्राएल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; त्या सर्व सिद्धीस गेल्या.” (यहो. २१:४३, ४५) आज आपणही कालेब व यहोशवासारखी कृतज्ञ मनोवृत्ती कशी दाखवू शकतो?

कृतज्ञ असा

एका देवभीरू माणसाने एकदा असा प्रश्‍न केला: “परमेश्‍वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ?” (स्तो. ११६:१२) देवाने दिलेले शारीरिक आशीर्वाद, त्याचे आध्यात्मिक मार्गदर्शन तसेच भविष्यात आपले तारण करण्यासाठी त्याने केलेली तरतूद या सर्व गोष्टींमुळे यहोवाचे आपल्यावर फार मोठे ऋण आहे असे आपण म्हणू शकतो. आपण सर्वकाळ त्याचे उपकार मानत राहिलो तरीही हे ऋण फिटणार नाही. खरोखर यहोवाची परतफेड करणे आपल्याकरता अशक्य आहे. पण त्याच्या उपकारांबद्दल कृतज्ञ मनोवृत्ती आपण सर्व जण नक्कीच बाळगू शकतो.

यहोवाने दिलेल्या सल्ल्यामुळे तुम्हाला जीवनात काही समस्या टाळता आल्या आहेत का? त्याच्या क्षमाशीलतेमुळे तुम्हाला पुन्हा एकदा शुद्ध विवेक मिळवणे शक्य झाले आहे का? देवाच्या अशा दयाळू कृत्यांमुळे होणारे फायदे बऱ्‍याच काळापर्यंत टिकून राहतात. त्याच प्रकारे या उपकारांबद्दल आपली कृतज्ञताही टिकून राहिली पाहिजे. सँड्रा नावाच्या एका १४ वर्षांच्या मुलीसमोर गंभीर समस्या आल्या. पण यहोवाच्या मदतीने ती या समस्यांवर मात करू शकली. ती म्हणते: “मी यहोवाला मदतीसाठी प्रार्थना केली आणि त्यानं मला माझ्या समस्या सोडवण्यास कशी मदत केली हे पाहून मला आश्‍चर्य वाटलं. माझे बाबा मला सहसा नीतिसूत्रे ३:५, ६ या वचनाची आठवण का करून द्यायचे हे आता मला कळतंय: ‘तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.’ यहोवानं मला आजपर्यंत जशी मदत केलीय तशीच तो पुढेही करत राहील याची मला खातरी आहे.”

धीराने समस्यांना तोंड देऊन यहोवाचे स्मरण असल्याचे दाखवा

यहोवाचे स्मरण ठेवण्याशी संबंधित असलेल्या आणखी एका गुणावर बायबलमध्ये भर देण्यात आला आहे: “धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्‍यासाठी की, तुम्ही कशांतहि उणे न होता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.” (याको. १:४) ‘कशांतहि उणे न होता, अखंड परिपूर्णता प्राप्त’ करण्याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ असा होतो, की आपल्यावर समस्या येतात तेव्हा हार न मानता, आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून त्यांना तोंड देण्याचा संकल्प केला पाहिजे आणि या समस्यांना तोंड देण्यास साहाय्य करतील असे गुण विकसित केले पाहिजेत. अशा रीतीने धीराने समस्यांना तोंड दिल्यास, विश्‍वासाच्या या परीक्षा संपुष्टात येतात तेव्हा आपण मोठे समाधान अनुभवू शकतो. आणि आज ना उद्या सगळ्याच परीक्षा संपुष्टात येतात हे निश्‍चित.—१ करिंथ. १०:१३.

अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलेल्या आणि अनेक गंभीर आरोग्याच्या समस्यांना तोंड दिलेल्या एका बांधवाने, त्यांना कशामुळे धीर धरण्यास साहाय्य मिळाले हे सांगितले: “मला काय करावंसं वाटतं याचा नव्हे, तर यहोवा काय करत आहे याचा मी विचार करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मते विश्‍वासू राहणं म्हणजे, स्वतःच्या इच्छांवर लक्ष केंद्रित न करता देवाच्या उद्देशांवर लक्ष केंद्रित करणं. समस्या येतात, तेव्हा ‘यहोवा देवा, माझ्यावरंच हे संकट का आलं?’ असं मी म्हणत नाही. तर त्या परिस्थितीतही मी यहोवाची सेवा करत राहतो आणि अनपेक्षित समस्या येतात तेव्हाही त्याला जडून राहतो.”

आज खरे ख्रिस्ती यहोवाची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” करतात. (योहा. ४:२३, २४) इस्राएल राष्ट्र ज्याप्रमाणे देवाला विसरले त्याप्रमाणे एक समूह या नात्याने खरे ख्रिस्ती त्याला कधीही विसरणार नाहीत हे निश्‍चित. पण केवळ आपण ख्रिस्ती मंडळीचे सदस्य आहोत म्हणून आपण यहोवाला शेवटपर्यंत विश्‍वासू राहूच असे म्हणता येत नाही. कालेब व यहोशवा यांच्यासारखेच आपल्यापैकी प्रत्येकाने कृतज्ञतेने व धीराने यहोवाची सेवा करत राहिली पाहिजे. कारण, या शेवटल्या कठीण काळात यहोवा आपल्या प्रत्येकाचे मार्गदर्शन व संभाळ करत आहे.

यहोशवाने उभारलेल्या धोंड्यांच्या स्मारकासारखीच देवाने आजपर्यंत केलेली अनेक महत्कृत्ये आपल्याला याची खातरी देतात की तो आपल्या लोकांना कधीही सोडणार नाही. म्हणूनच, आपल्यापैकी प्रत्येकाने स्तोत्रकर्त्यासारखे म्हणावे: “मी परमेशाची महत्कृत्ये वर्णीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्‌भुत कृत्यांचे स्मरण करीन. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननहि करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन.”—स्तो. ७७:११, १२.

[७ पानांवरील चित्र]

सबंध इस्राएल राष्ट्राला ‘रुक्ष भूमीवरून’ चालावे लागले

[चित्राचे श्रेय]

Pictorial Archive (Near Eastern History) Est.

[८ पानांवरील चित्र]

इस्राएलांनी कादेश-बर्ण्या येथे मुक्काम केला असताना प्रतिज्ञात देशाची पाहणी करण्यासाठी हेरांना पाठवण्यात आले

[चित्राचे श्रेय]

Pictorial Archive (Near Eastern History) Est.

[९ पानांवरील चित्र]

अनेक वर्षे वाळवंटात भटकल्यानंतर सुपीक असलेला प्रतिज्ञात देश मिळाल्यामुळे इस्राएल लोकांनी कृतज्ञ असायला हवे होते

[चित्राचे श्रेय]

Pictorial Archive (Near Eastern History) Est.

[१० पानांवरील चित्र]

आपल्यासमोर येणाऱ्‍या सर्व समस्यांना धीराने तोंड दिल्यामुळे आपल्याला यहोवाच्या उद्देशांवर लक्ष केंद्रित करणे शक्य होते