व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाईट संगतीमुळे यहोआशने यहोवाला सोडले

वाईट संगतीमुळे यहोआशने यहोवाला सोडले

आपल्या मुलांना शिकवा

वाईट संगतीमुळे यहोआशने यहोवाला सोडले

देवाचे मंदिर असलेल्या शहरात अर्थात जेरूसलेमेत तो भयंकर काळ होता. राजा अहज्या याची नुकताच हत्या झाली होती. यानंतर, त्याची आई अथल्या हिने एक अतिशय वाईट काम केले. तिने तिच्या स्वतःच्या नातवांची म्हणजे अहज्याच्या पुत्रांची हत्या करवली! कशासाठी माहीत आहे?— * त्यांच्याऐवजी तिला राणी होता यावे म्हणून.

पण अथल्याचा एक नातू, बाळ यहोआश मात्र त्याच्या दुष्ट आजीच्या तावडीतून सुटतो. त्याच्या आजीला हे माहीतही होत नाही. कसे काय माहीत आहे?— त्याचे असे होते, की त्या बाळाची एक आत्या असते जिचे नाव यहोशेबा होते. ती बाळ यहोआशला देवाच्या मंदिरात लपवून ठेवते. ती त्याला मंदिरात लपवून ठेवू शकली कारण तिचा नवरा यहोयादा तिथे महायाजक होता. अशा प्रकारे ते दोघं नवरा-बायको यहोआशला तिथे सुरक्षित ठेवतात.

सहा वर्षांपर्यंत यहोआश मंदिरातच लहानाचा मोठा होतो; कोणालाच त्याचा थांगपत्ता लागत नाही. तेथे त्याला यहोवा देवाविषयी आणि त्याच्या नियमांचे शिक्षण दिले जाते. शेवटी, सात वर्षांचा झाल्यावर यहोयादा, यहोआशला राजा बनवण्याचे ठरवतो. तो हे कसे करतो आणि यहोआशची दुष्ट आजी राणी अथल्या हिचे काय होते याविषयी तुम्हाला आणखी ऐकायचे आहे का?—

बरं, यहोयादा, त्या काळी जेरुसलेमच्या राजांच्या खास अंगरक्षकांची एक गुप्त सभा भरवतो. आपण राजा अहज्या याच्या एका पुत्राला कसे वाचवले ते तो त्यांना सांगतो. आणि मग, यहोआशला त्यांच्यासमोर आणतो. हाच जेरूसलेमच्या राजगादीचा खरा वारस आहे हे अंगरक्षक लगेच ओळखतात. आणि मग ते सर्व मिळून एक योजना आखतात.

यहोयादा एके दिवशी यहोआशला लोकांसमोर आणतो आणि त्याच्या डोक्यावर राजमुकूट घालतो. तेव्हा सर्व लोकांनी, “टाळ्यांचा गजर करून म्हटले, राजा चिरायु होवो.” अंगरक्षक लगेच यहोआशभोवती सुरक्षा कडे उभारतात. काय गोंधळ चालला आहे हे पाहण्यासाठी राणी अथल्या पळतच बाहेर येते. तिला वाटते, की कोणीतरी तिच्याविरुद्ध फितुरी करत आहे म्हणून ती फितुरी रे फितुरी असे ओरडू लागते. तेव्हाच यहोयादाच्या हुकूमावरून अंगरक्षक, राणी अथल्या हिचा वध करतात.—२ राजे ११:१-१६.

पण, यहोआश नेहमीच यहोयादाच्या आज्ञेत राहून जे बरोबर आहे ते करत राहिला का?— यहोयादा जिवंत होता तोपर्यंतच तो चांगला राहिला. यहोआशचे वडील राजा अहज्या आणि त्याचे आजोबा यहोराम यांनी, देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केले होते. पण यहोआशाने मंदिराच्या दुरुस्तीसाठी लोकांकडून वर्गणी गोळा केली. पण मग, महायाजक यहोयादा मरण पावल्यावर काय झाले ते आपण पाहू या.—२ राजे १२:१-१६.

आतापर्यंत यहोआश ४० वर्षांचा झाला होता. यहोवाची सेवा करणाऱ्‍या लोकांबरोबरच आपली मैत्री टिकवून ठेवण्याऐवजी त्याने खोट्या दैवतांची उपासना करणाऱ्‍यांबरोबर मैत्री केली. तेव्हा यहोयादाचा पुत्र जखऱ्‍या हा यहोवाचा याजक म्हणून सेवा करत होता. वाईट लोकांबरोबर मैत्री केल्यामुळे यहोआशसुद्धा वाईट कामे करू लागला. तेव्हा जखऱ्‍याने काय केले असावे, असे तुम्हाला वाटते?—

जखऱ्‍याने यहोआश व लोकांना असे म्हटले: “तुम्ही परमेश्‍वरास सोडिले म्हणून त्यानेहि तुम्हास सोडिले आहे.” हे शब्द ऐकून यहोआशला इतका राग आला की त्याने जखऱ्‍याला दगडमार करून ठार मारण्याची आज्ञा दिली. विचार करा—यहोयादाने म्हणजे जखऱ्‍याच्या वडिलांनीच यहोआशला त्याच्या मारेकऱ्‍यापासून वाचवले होते आणि आता तो स्वतःच जखऱ्‍याचा मारेकरी बनला!—२ इतिहास २४:१-३, १५-२२.

आपण या वृत्तांतातून काही धडा शिकू शकतो का?— आपल्याला अथल्यासारखे व्हायला आवडणार नाही. तिच्या मनात खूप द्वेष होता व ती क्रूर होती. उलट आपण आपल्या भाऊबहिणींवर तसेच आपल्या शत्रूंवरही प्रेम केले पाहिजे. येशूने आपल्याला असेच करण्यास शिकवले. (मत्तय ५:४४; योहान १३:३४, ३५) यहोआशप्रमाणे फक्‍त सुरुवातीलाच चांगले असणे पुरेसे नाही तर आपण शेवटपर्यंत चांगले राहिले पाहिजे. यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांबरोबर आणि त्याची सेवा करण्याचे उत्तेजन देणाऱ्‍यांबरोबरच आपण मैत्री केली पाहिजे. (w०९ ४/१)

[तळटीप]

^ तुम्ही हा लेख जर आपल्या मुलाला वाचून दाखवत असाल तर, लेखात काही वाक्यांच्या पुढे जेव्हा एक छोटीशी रेघ तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही तेथे थांबून तुमच्या मुलाला काय वाटते ते विचारायचे आहे.

प्रश्‍न:

❍ यहोआशचा जीव कसा व कोणी वाचवला होता?

❍ यहोआश राजघराण्याचा खरा वारस कसा बनला आणि त्याने कोणते चांगले कृत्य केले?

❍ यहोआश नंतर वाईट का झाला व त्याने कोणाला ठार मारले?

❍ बायबलमधल्या या गोष्टीवरून आपण काय शिकतो?

[२३ पानांवरील चित्र]

यहोआशला वाचवले जाते