व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मोशेपेक्षा थोर असलेल्या येशूला स्वीकारणे

मोशेपेक्षा थोर असलेल्या येशूला स्वीकारणे

मोशेपेक्षा थोर असलेल्या येशूला स्वीकारणे

“प्रभु देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून उभा करील; . . . त्याचे ऐका.”—प्रे. कृत्ये ३:२२.

१. येशू ख्रिस्ताने मानव इतिहासावर कोणता प्रभाव पाडला आहे?

दोन हजार वर्षांपूर्वी, एका बालकाचा जन्म झाला तेव्हा देवदूतांच्या एका समूहाने काही मेंढपाळांच्या देखत देवाची स्तुती केली. (लूक २:८-१४) हेच बालक पुढे तीस वर्षांचा प्रौढ झाल्यावर त्याने केलेल्या अवघ्या साडेतीन वर्षांच्या सेवाकार्याने संपूर्ण इतिहासाचा चेहरामोहराच बदलला. १९ व्या शतकातील फिलिप शाफ नावाच्या एका इतिहासकाराने या तरुणाविषयी असे म्हटले: ‘त्याने स्वतःविषयी कधीही काही लिहिले नाही, परंतु त्याने जे काही केले व म्हटले त्यामुळे अनेक लेखक, गीतकार, प्रवचनकार तसेच चित्रकार यांना प्रेरणा मिळाली आहे. यावरून कळते, की मानव इतिहासावर त्याने विलक्षण प्रभाव पाडला आहे.’ हा असामान्य तरुण दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द येशू ख्रिस्त आहे.

२. प्रेषित योहानाने येशू व त्याच्या सेवेविषयी काय म्हटले?

प्रेषित योहानाने येशूच्या सेवेचा अहवाल लिहून समाप्तीस असे म्हटले: “येशूने केलेली दुसरीहि पुष्कळ कृत्ये आहेत, ती सर्व एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्‍या जगात मावणार नाहीत, असे मला वाटते.” (योहा. २१:२५) योहानाला माहीत होते, की येशूने साडेतीन वर्षांच्या महत्त्वपूर्ण कालावधीत जे काही म्हटले व केले त्यापैकी फक्‍त काही गोष्टीच तो लिहू शकत होता. तरीपण, योहानाने आपल्या शुभवर्तमानात लिहिलेल्या ऐतिहासिक घटना अत्यंत मोलाच्या आहेत.

३. देवाचा उद्देश पूर्ण करण्यात येशूची काय भूमिका आहे हे आपण अधिक चांगल्या प्रकारे कसे समजू शकतो?

येशूच्या जीवनावर लिहिलेल्या चार महत्त्वपूर्ण शुभवर्तमान अहवालांशिवाय बायबलमधील इतरही तपशीलवार उतारे वाचून आपला विश्‍वास मजबूत होऊ शकतो. जसे की, येशूच्या आधी हयात असलेल्या काही विश्‍वासू लोकांचे अहवाल बायबलमध्ये दिले आहेत. हे अहवाल वाचल्यावर, यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यात येशूची काय भूमिका आहे हे आपण अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. यांतील काही अहवालांची आपण चर्चा करू या.

ख्रिस्ताला चित्रित करणारे प्राचीन काळचे विश्‍वासू पुरुष

४, ५. येशूला कोणी चित्रित केले व कशा प्रकारे?

योहान व इतर तीन शुभवर्तमान लेखकांनी मोशे, दावीद व शलमोन हे, येशूला देवाचा अभिषिक्‍त व नियुक्‍त राजा म्हणून पूर्वचित्रित करत असल्याचे दाखवले. देवाच्या या प्राचीन सेवकांनी कोणकोणत्या प्रकारे येशूची पूर्वझलक दाखवली व या अहवालांवरून आपण कोणते धडे शिकू शकतो?

येशूच्या केवळ काही महत्त्वपूर्ण भूमिकांचा आपण थोडक्यात विचार करूया. बायबलमध्ये सांगितले आहे, मोशे एक संदेष्टा, मध्यस्थ व उद्धारकर्ता होता. येशूच्याही याच भूमिका आहेत. दावीद एक मेंढपाळ व राजा होता. त्याने इस्राएलच्या शत्रूंवर विजय मिळवला. येशूसुद्धा एक मेंढपाळ व विजयी राजा आहे. (यहे. ३७:२४, २५) शलमोन विश्‍वासू होता तोपर्यंत तो एक बुद्धिमान शासक होता. त्याच्या राजवटीत इस्राएल राष्ट्रात शांती नांदत होती. (१ राजे ४:२५, २९) येशूही शलमोनाप्रमाणेच अतिशय बुद्धिमान आहे. त्याला “शांतीचा अधिपति” म्हटले आहे. (यश. ९:६) ख्रिस्त येशूची भूमिका या प्राचीन पुरुषांसारखीच असली तरीसुद्धा, देवाच्या उद्देशांतील त्याचे स्थान हे सर्वश्रेष्ठ आहे. तेव्हा आधी आपण, येशू आणि मोशे यांची तुलना करून पाहूया जेणेकरून देवाचा उद्देश पूर्ण करण्यात येशूची काय भूमिका आहे हे आपण अधिक चांगल्या प्रकारे समजू.

येशूला पूर्वचित्रित करणारा मोशे

६. येशूचे आपण ऐकले पाहिजे हे प्रेषित पेत्राने कसे समजावून सांगितले?

सा.यु. ३३ च्या पेंटेकॉस्टनंतर लगेच, प्रेषित पेत्राने, मोशेच्या एका भविष्यवाणीचा उल्लेख केला जी येशू ख्रिस्ताने पूर्ण केली. पेत्र मंदिरातील उपासकांच्या एका जमावासमोर उभा होता. पेत्र व योहान यांनी, जन्मापासून पांगळा असलेल्या एका भिकाऱ्‍याला बरे केले तेव्हा सर्व लोक “आश्‍चर्यचकित” झाले व या माणसाला पाहायला धावत आले. येशू ख्रिस्ताद्वारे कार्य करत असलेल्या यहोवाच्या पवित्र आत्म्यामुळे हा चमत्कार घडला असे पेत्राने सांगितले. आणि मग इब्री शास्त्रवचनांतून उल्लेख करून त्याने पुढे म्हटले: “मोशेनेहि म्हटलेच आहे, प्रभु देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून उभा करील; तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टीत त्याचे ऐका.”—प्रे. कृत्ये ३:११, २२, २३; अनुवाद १८:१५, १८, १९ वाचा.

७. पेत्र जेव्हा मोशेपेक्षा थोर असलेल्या एका संदेष्ट्याविषयी बोलत होता तेव्हा त्याच्या श्रोत्यांना त्याचे बोलणे सहज का समजले असावे?

मोशेचे शब्द पेत्राच्या श्रोत्यांना कदाचित माहीत असावेत. यहुदी असल्यामुळे त्यांना मोशेबद्दल आदर होता. (अनु. ३४:१०) पण मोशेपेक्षाही थोर असलेल्या एका संदेष्ट्याची ते आतुरतेने वाट पाहत होते. हा संदेष्टा, मोशेसमान देवाचा अभिषिक्‍त वा आणखी एक मशीहा ठरणार नव्हता तर तो “देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला” एकमेव मशीहा ठरणार होता.—लूक २३:३५; इब्री ११:२६.

येशू आणि मोशे यांच्यातील साम्यता

८. मोशे व येशूच्या जीवनातील काही साम्यता कोणत्या आहेत?

काही बाबतींत, येशूचे पृथ्वीवरील जीवन आणि मोशेचे जीवन यांत साम्यता आढळते. उदाहरणार्थ, मोशे व येशू हे दोघेही बालपणी एका जुलुमी शासकाच्या हातून वाचले होते. (निर्ग. १:२२–२:१०; मत्त. २:७-१४) शिवाय, दोघांनाही ‘मिसरातून बोलावण्यात’ आले होते. संदेष्टा होशेय याने, यहोवाने उद्‌गारलेल्या शब्दांची अशी नोंद केली: “इस्राएल लहान मूल असता त्याजवर माझी प्रीति बसली; मी त्याला आपला पुत्र म्हणून मिसरातून बोलाविले.” (होशे. ११:१) होशेय येथे त्या काळाविषयी बोलत होता जेव्हा यहोवाने आपल्या ‘पुत्राला’ अर्थात इस्राएल राष्ट्राला त्याने नियुक्‍त केलेल्या प्रमुख्याच्या अर्थात मोशेच्या नेतृत्वाखाली ईजिप्तमधून बाहेर काढले. (निर्ग. ४:२२, २३; १२:२९-३७) परंतु होशेयचे शब्द, गतकाळात घडलेल्या या घटनेलाच नव्हे तर भविष्यात होणाऱ्‍या घटनेलाही सूचित करतात. त्याचे शब्द ही एक भविष्यवाणी होती. ही भविष्यवाणी, हेरोद राजाचा मृत्यू झाल्यानंतर योसेफ व मरीया येशूला घेऊन पुन्हा ईजिप्तला आले तेव्हा पूर्ण झाली.—मत्त. २:१५, १९-२३.

९. (क) मोशे व येशू यांनी कोणते चमत्कार केले? (ख) येशू आणि मोशे यांच्यात आणखी कोणकोणत्या गोष्टी समांतर होत्या ते सांगा. (“येशू व मोशे यांच्यातील आणखी समांतर गोष्टी” हा पृष्ठ २६ वरील चौकोन पाहा.)

मोशे व येशू या दोघांनीही चमत्कार करून यहोवा त्यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. बायबलनुसार, मोशे हा चमत्कार करणाऱ्‍या लोकांपैकी सर्वात पहिला मनुष्य होता. (निर्ग. ४:१-९) मोशेचे चमत्कार हे पाण्याच्या संबंधाने होते. उदाहरणार्थ, त्याने आज्ञा केल्या-केल्या नाईल नदीच्या व तलावांच्या पाण्याचे रक्‍त झाले, लाल समुद्राचे पाणी दुभंगले आणि वाळवंटात एका खडकातून जोराने पाणी बाहेर येऊ लागले. (निर्ग. ७:१९-२१; १४:२१; १७:५-७) येशूने देखील पाण्याशी संबंधित चमत्कार केले. त्याचा सर्वात पहिला चमत्कार, एका लग्नसोहळ्याच्या वेळी पाण्याचा द्राक्षारस बनवणे हा होता. (योहा. २:१-११) नंतर, त्याने गालील समुद्रात उठलेले वादळ शांत केले. आणि एकदा तर, तो चक्क पाण्यावर चालला! (मत्त. ८:२३-२७; १४:२३-२५) मोशे व थोर मोशे अर्थात येशू यांच्यात आणखी कोणकोणत्या गोष्टी समांतर होत्या हे पृष्ठ २६ वरील चौकोनात दिले आहे.

संदेष्टा म्हणून ख्रिस्ताची भूमिका समजणे

१०. खरा संदेष्टा कोण असतो व मोशे एक खरा संदेष्टा का होता?

१० संदेष्टा म्हटले की पुष्कळ लोकांच्या मनात, भविष्यवाणी करणारा असा विचार येतो. परंतु भविष्यवाणी करणे, ही संदेष्ट्याची केवळ एक जबाबदारी आहे. खरा संदेष्टा यहोवाच्या वतीने बोलणारा असतो जो ‘देवाची महत्कृत्ये सांगतो.’ (प्रे. कृत्ये २:११, १६, १७) यामध्ये, भावी घटनांचे भाकीत करणे, यहोवाच्या उद्देशांचे विविध पैलू प्रकट करणे किंवा देवाच्या न्यायदंडाची घोषणा करणे समाविष्ट आहे. मोशे अशा प्रकारचा संदेष्टा होता. त्याने ईजिप्तवर आलेल्या दहा पीडांचे भाकीत केले होते. सीनाय पर्वतावर त्याने लोकांना देवाचा नियमशास्त्र करार सांगितला. इस्राएल राष्ट्राला त्याने देवाची इच्छा काय आहे हे शिकवले. परंतु, मोशेपेक्षाही एक थोर संदेष्टा भविष्यात येणार होता.

११. येशूने मोशेपेक्षाही थोर अशा संदेष्ट्याची भूमिका कशी बजावली?

११ सा.यु.पू. पहिल्या शतकात, जखऱ्‍याने आपला पुत्र योहान याच्या बाबतीत यहोवाचा उद्देश प्रकट करून संदेष्टा म्हणून कार्य केले. (लूक १:७६) हाच योहान पुढे बाप्तिस्मा करणारा योहान झाला. त्याने खूप दिवसांपासून ज्याची वाट पाहिली जात होती त्या थोर मोशेच्या अर्थात येशू ख्रिस्ताच्या आगमनाची घोषणा केली. (योहा. १:२३-३६) संदेष्टा यानात्याने येशूने अनेक गोष्टींचे भाकीत केले. जसे की, त्याच्या मृत्यूविषयी म्हणजे तो कसा, कोठे व कोणाच्या हातून मारला जाईल या सर्वाविषयी भाकीत केले. (मत्त. २०:१७-१९) येशूने जेरूसलेम आणि तेथील मंदिराच्या नाशाविषयीही भाकीत केले तेव्हा त्याच्या श्रोत्यांना खूप आश्‍चर्य वाटले. (मार्क १३:१, २) येशूने अगदी आपल्या काळाविषयी देखील भविष्यवाण्या केल्या.—मत्त. २४:३-४१.

१२. (क) येशूने एका विश्‍वव्यापी प्रचार मोहिमेचा पाया कसा घातला? (ख) आज आपण येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून त्याच्या आवेशाचे अनुकरण कसे करू शकतो?

१२ संदेष्टा असण्यासोबतच येशू एक प्रचारक व शिक्षक देखील होता. त्याने देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला आणि त्याच्याइतके निर्भयतेने कोणीही बोलले नव्हते. (लूक ४:१६-२१, ४३) शिक्षक म्हणून त्याच्या तोडीचे कोणीही नव्हते. ज्यांनी त्याचे बोलणे ऐकले त्यांपैकी काहींनी म्हटले: “कोणीहि मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.” (योहा. ७:४६) येशूने अगदी आवेशाने सुवार्तेचा प्रचार केला व आपल्या अनुयायांनाही अशाच आवेशाने प्रचार करण्याची प्रेरणा दिली. अशा प्रकारे त्याने, आजही चालू असलेल्या एका विश्‍वव्यापी प्रचार व शिकवण्याच्या मोहिमेचा पाया घालून दिला. (मत्त. २८:१८-२०; प्रे. कृत्ये ५:४२) गेल्या वर्षी, सुमारे सत्तर लाख ख्रिस्ताच्या अनुयायांनी, राज्याच्या सुवार्तेच्या प्रचार कार्यात व आवड दाखवणाऱ्‍या लोकांना बायबलमधील सत्य शिकवण्यात सुमारे १,५०,००,००,००० तास खर्च केले. तुम्हीही या कार्यात होता होईल तितका भाग घेत आहात का?

१३. काय केल्याने आपण “जागे” राहू शकतो?

१३ मोशेसारखा संदेष्टा उभा करण्याची यहोवाने जी भविष्यवाणी केली ती त्याने पूर्ण केली यात काहीच शंका नाही. हे जाणून तुम्हाला कसे वाटते? आपल्या निकटच्या भवितव्याविषयी देवाने केलेल्या इतर भविष्यवाणींची देखील पूर्णता होईल अशी तुम्हाला अधिक खात्री वाटते का? थोर मोशेच्या उदाहरणावर मनन केल्याने देव आपल्यासाठी लवकरच जे काही करणार आहे त्यासंबंधाने आपण “जागे व सावध” राहण्यास प्रवृत्त होतो.—१ थेस्सलनी. ५:२, ६.

मध्यस्थ म्हणून येशूचा आदर करा

१४. इस्राएल लोक व देव यांच्यात मोशे हा एक मध्यस्थ कसा होता?

१४ मोशेप्रमाणे येशूही मध्यस्थ होता. मध्यस्थ म्हणजे, दोन पक्षांशी संपर्क साधणारा. यहोवाने जेव्हा इस्राएल राष्ट्राशी नियमशास्त्र करार केला तेव्हा त्याने मोशेचा मध्यस्थ म्हणून उपयोग केला. याकोबाच्या पुत्रांनी देवाच्या नियमांचे पालन केले असते तर ते देवाचे खास लोक, त्याची मंडळी म्हणून राहिले असते. (निर्ग. १९:३-८) हा करार सा.यु.पू. १५१३ पासून ते सा.यु. पहिल्या शतकापर्यंत अस्तित्वात होता.

१५. येशू हा सर्वश्रेष्ठ मध्यस्थ कसा आहे?

१५ सा.यु. ३३ साली यहोवाने एका नवीन इस्राएलशी पहिल्या कराराच्या तुलनेत श्रेष्ठ असलेल्या एका कराराची स्थापना केली. हे नवीन इस्राएल अर्थात ‘देवाचे इस्त्राएल’ अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची मिळून बनलेली एक विश्‍वव्यापी मंडळी आहे. (गलती. ६:१६) मोशे ज्या कराराचा मध्यस्थ होता त्या करारात, देवाने दगडावर लिहिलेल्या नियमांचा समावेश होता. परंतु येशू ज्या कराराचा मध्यस्थ आहे तो करार याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. या कराराचे नियम देवाने मानवांच्या हृदयपटावर कोरले आहेत. (१ तीमथ्य २:५; इब्री लोकांस ८:१० वाचा.) अशा प्रकारे, ‘देवाचे इस्राएल’ आता देवाचा खास निधी अर्थात मशिही राज्याचे ‘फळ उत्पन्‍न करणारी प्रजा’ आहे. (मत्त. २१:४३) या आत्मिक राष्ट्राचे सदस्य त्या नवीन कराराचे भागीदार आहेत. पण, या काराराचा केवळ त्यांनाच फायदा होतो असे नाही. तर, असंख्य मानवांना या सर्वश्रेष्ठ कराराद्वारे सर्वकाळसाठी आशीर्वाद मिळतील. मृत्यूच्या गाढ निद्रेत असलेल्या अनेकांनाही या कराराचा लाभ होणार आहे.

उद्धारकर्ता म्हणून ख्रिस्ताचा आदर करा

१६. (क) इस्राएल राष्ट्राची सुटका करण्याकरता यहोवाने मोशेचा कोणकोणत्या मार्गांनी उपयोग केला? (ख) निर्गम १४:१३ नुसार खरा उद्धारकर्ता कोण आहे?

१६ ईजिप्तमधून निघायच्या आदल्या रात्री इस्राएल लोकांतील प्रथम जन्मलेल्या मुलांचे जीव धोक्यात होते. देवाचा दूत ईजिप्तमधून फिरून प्रथम जन्मलेल्यांचा वध करणार होता. इस्राएल लोकांनी वल्हांडणाच्या कोकऱ्‍याचे रक्‍त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्‍यांवर शिंपडले तर इस्राएल लोकांतील प्रथम जन्मलेल्यांचे प्राण वाचू शकतील, असे यहोवाने मोशेला सांगितले. (निर्ग. १२:१-१३, २१-२३) यहोवाने म्हटल्याप्रमाणेच झाले. नंतर मग, संपूर्ण इस्राएल राष्ट्रच एका धोकेदायक परिस्थितीत अडकले होते. एकीकडे तांबडा समुद्र आणि दुसरीकडे त्यांचा पिच्छा करणारे ईजिप्शियन सैन्य व त्यांचे रथ या दोहांमध्ये ते अडकून पडले होते. पण यहोवाने चमत्काराने तांबड्या समुद्राचे पाणी दुभंगून मोशेद्वारे इस्राएल लोकांची सुटका केली.—निर्ग. १४:१३, २१.

१७, १८. कोणत्या अर्थाने येशू मोशेपेक्षाही महान उद्धारकर्ता आहे?

१७ यहोवाने मोशेकरवी केलेली ही मुक्‍ती कार्ये नक्कीच महान होती. पण येशूद्वारे त्याने केलेली मुक्‍ती याहीपेक्षा महान आहे. येशूद्वारे आज्ञाधारक मानवजातीला पापाच्या दास्यत्वातून मुक्‍त केले जाते. (रोम. ५:१२, १८) आणि ही मुक्‍ती “सार्वकालिक मुक्‍ती” आहे. (इब्री ९:११, १२) येशूच्या नावाचा अर्थ, “यहोवा तारणकर्ता आहे” असा होतो. उद्धारकर्ता किंवा तारणकर्ता यानात्याने येशू आपल्याला फक्‍त आपल्या पापांपासूनच सोडवत नाही तर आनंदी भवितव्याचा आनंद लुटण्याकरताही मार्ग मोकळा करतो. येशू आपल्या अनुयायांना पापाच्या दास्यत्वातून मुक्‍त करून त्यांना देवाच्या क्रोधापासून वाचवतो आणि त्याच्याबरोबर प्रेमळ नातेसंबंध जोडण्यास मदत करतो.—मत्त. १:२१.

१८ पापाच्या दास्यत्वातून येशू जी मुक्‍ती देणार आहे त्यामध्ये पापाच्या दुःखद परिणामांचाही समावेश होतो. आजारपण व मृत्यू यांपासूनही येशू आपल्याला मुक्‍त करणार आहे. हे कसे होईल, याची कल्पना करण्यासाठी याईर नावाच्या एका माणसाच्या संबंधाने घडलेल्या घटनेचा विचार करा. याईराची १२ वर्षांची मुलगी मरण पावते तेव्हा येशू त्यांच्या घरी जातो. तेथे तो याईरला असे आश्‍वासन देतो: “भिऊ नका, विश्‍वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल.” (लूक ८:४१, ४२, ४९, ५०) आणि येशूने म्हटल्याप्रमाणे ती मुलगी पुन्हा जिवंत होते! तिच्या आईवडिलांना किती आनंद झाला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? पुनरुत्थानाच्या वेळी “कबरेतील सर्व माणसे [येशूची] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील” तेव्हा जो अवर्णनीय आनंद होईल याची एकंदरित कल्पना आता तुम्हाला आली असेल. (योहा. ५:२८, २९) होय, येशू आपला तारणकर्ता व उद्धारकर्ता आहे!—प्रेषितांची कृत्ये ५:३१ वाचा; तीत १:४; प्रकटी. ७:१०.

१९, २०. (क) थोर मोशे यानात्याने येशूच्या भूमिकेवर मनन केल्याने आपल्यावर कोणता प्रभाव पडतो? (ख) पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

१९ येशूच्या मुक्‍ती कार्यांचा लाभ घेण्याकरता आपणही लोकांना मदत करू शकतो हे जेव्हा आपल्याला कळते तेव्हा आपण प्रचार व शिकवण्याच्या कार्यात भाग घेण्यास प्रवृत्त होतो. (यश. ६१:१-३) शिवाय, थोर मोशे यानात्याने येशूच्या भूमिकेवर मनन केल्याने, दुष्टांवर न्यायदंड बजावण्याकरता येशू येईल तेव्हा तो आपल्या अनुयायांना मुक्‍त करेल यावर आपला विश्‍वास आणखी पक्का होतो.—मत्त. २५:३१-३४, ४१, ४६; प्रकटी. ७:९, १४.

२० होय, येशू हा थोर मोशे आहे. मोशे कधी करू शकला नसता अशा अनेक अद्‌भुत गोष्टी त्याने केल्या. संदेष्टा यानात्याने त्याच्या शब्दांचा व मध्यस्थ यानात्याने त्याने केलेल्या कार्यांचा सबंध मानवजातीवर प्रभाव पडतो. उद्धारकर्ता म्हणून येशू तात्पुरती सुटका करत नाही तर कायमस्वरूपी मुक्‍ती करतो. प्राचीन काळच्या विश्‍वासू पुरुषांकडून येशूबद्दल आणखी पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तो थोर दावीद व थोर शलमोन कसा होता हे आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत.

तुम्ही कसे समजावून सांगाल?

खालील बाबतीत येशू मोशेपेक्षा कशा प्रकारे थोर आहे:

• संदेष्टा या नात्याने?

• मध्यस्थ या नात्याने?

• उद्धारकर्ता या नात्याने?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील चौकट/चित्र]

येशू व मोशे यांच्यातील आणखी समांतर गोष्टी

◻ यहोवाची आणि त्याच्या लोकांची सेवा करण्याकरता दोघांनीही आपले मोठे पद सोडले.—२ करिंथ. ८:९; फिलिप्पै. २:५-८; इब्री ११:२४-२६.

◻ दोघांनाही यहोवाने निवडले व नियुक्‍त केले होते.मार्क १४:६१, ६२; योहा. ४:२५, २६; इब्री ११:२६.

◻ दोघेही देवाच्या नावाने आले होते.—निर्ग. ३:१३-१६; योहा. ५:४३; १७:४, ६, २६.

◻ दोघांनीही नम्रता दाखवली.—गण. १२:३; मत्त. ११:२८-३०.

◻ दोघांनीही असंख्यांना जेवू घातले.—निर्ग. १६:१२; योहा ६:४८-५१.

◻ दोघांनीही न्यायाधीश व नियमकर्ता म्हणून सेवा केली.—निर्ग. १८:१३; मला. ४:४; योहा. ५:२२, २३; १५:१०.

◻ दोघांनाही देवाच्या घरावर मस्तकपद बहाल करण्यात आले होते.—गण. १२:७; इब्री ३:२-६.

◻ दोघांचेही वर्णन यहोवाचे विश्‍वासू साक्षीदार असे करण्यात आले आहे.—इब्री ११:२४-२९; १२:१; प्रकटी. १:५.

◻ मोशेचा मृत्यू झाल्यानंतर व पृथ्वीवर येशूचा मानव म्हणून मृत्यू झाल्यानंतर, देवाने त्या दोघांच्या शरीरांची विल्हेवाट लावली.—अनु. ३४:५, ६; लूक २४:१-३; प्रे. कृत्ये २:३१; १ करिंथ. १५:५०; यहू. ९.