व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१ बायबलवर विश्‍वास ठेवायला शिका

१ बायबलवर विश्‍वास ठेवायला शिका

१ बायबलवर विश्‍वास ठेवायला शिका

“प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक . . . ह्‍याकरिता उपयोगी आहे.”—२ तीमथ्य ३:१६.

आक्षेप: अनेकांना बायबल मानवी तत्त्वज्ञानाचे पुस्तक वाटते. काहींच्या मते बायबलमधील ऐतिहासिक अहवाल चुकीचे आहेत. इतरांना वाटते की बायबलचा सल्ला पूर्वीच्या काळी लागू होत नव्हता आणि आजही होत नाही.

तुम्ही काय करू शकता? बायबलच्या खरेपणावर व त्याच्या उपयुक्‍ततेवर आक्षेप घेणाऱ्‍यांनी स्वतः कधी बायबलचे परीक्षण केलेले नसते. इतर जे बोलतात त्याचीच री ते ओढतात. पण बायबल इशारा देते: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवितो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.”—नीतिसूत्रे १४:१५.

इतरांच्या मतावर डोळे झाकून विश्‍वास ठेवण्याऐवजी आपण पहिल्या शतकातील बिरूया (आत्ताचे उत्तर ग्रीस) येथे राहणाऱ्‍या ख्रिस्ती लोकांच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे. इतरांनी सांगितलेल्या गोष्टी निमूटपणे मानून ते शांत बसायचे नाही तर “ह्‍या गोष्टी अशाच आहेत की काय ह्‍याविषयी ते शास्त्रात दररोज शोध” करायचे. (प्रेषितांची कृत्ये १७:११) बायबल हे देवाच्या प्रेरणेने लिहिलेले पुस्तक आहे असा विश्‍वास आपण का बाळगू शकतो याबद्दलच्या दोन कारणांवर आता आपण थोडक्यात चर्चा करू या.

बायबलमधील ऐतिहासिक अहवाल अचूक आहेत. बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेल्या लोकांच्या व स्थळांच्या नावांच्या अचूकतेबद्दल टीकाकारांनी नेहमीच आक्षेप घेतला आहे व आजही घेत आहेत. पण वेळोवेळी पुढे आलेल्या पुराव्यांमुळे बायबलमधील अहवाल भरवशालायक असल्याचे व टीकाकारांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध झाले आहेत.

उदाहरणार्थ, यशया २०:१ येथे उल्लेख करण्यात आलेला अश्‍शूरी राजा सर्गोन याच्या अस्तित्वाबद्दल एके काळी विद्वानांनी शंका घेतली. पण, १८४० च्या दशकात पुरातत्त्ववेत्त्यांनी या राजाच्या महालाचे उत्खनन सुरू केले. सर्गोन हा अश्‍शूरी राजांपैकी एक सुप्रसिद्ध राजा होता हे त्यांना आढळून आले आहे.

येशूला मृत्यूदंड देणारा रोमी सुभेदार पंतय पिलात याच्या अस्तित्वाबद्दलही टीकाकारांनी शंका व्यक्‍त केली होती. (मत्तय २७:१, २२-२४) पण १९६१ मध्ये इस्राएलमधील कैसरीया शहराजवळ एक शिला सापडली जिच्यावर पिलाताचे नाव व हुद्दा कोरलेला होता.

बायबलमधील अहवाल अचूक आहेत याविषयी यु.एस न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्टच्या ऑक्टोबर २५, १९९९ च्या अंकात असे म्हटले होते: “आधुनिक पुरातत्त्वशास्त्राने अतिशय उल्लेखनीय रीतीने जुन्या व नव्या कराराची ऐतिहासिक अचूकता जाहीर केली आहे. इस्राएली कुलपिते, इस्राएली लोकांचे इजिप्तमधून बाहेर पडणे, दाविदाची राजसत्ता, येशूचे जीवन व त्याकाळची परिस्थिती यांविषयीच्या मुख्य माहितीला आधुनिक पुरातत्त्वशास्त्राने पुष्टी दिली आहे.” पण बायबलवरील आपला विश्‍वास पुरातत्त्वशास्त्राने केलेल्या शोधांवर अवलंबून नाही. अशा प्रकारचे अचूक ऐतिहासिक अहवाल देवाने प्रेरित केलेल्या पुस्तकातच असण्याची अपेक्षा आपण करू शकतो.

बायबलमध्ये दिलेल्या व्यावहारिक बुद्धिचा वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या लोकांना फायदा होतो. सूक्ष्मजीवाणू व त्यांच्यामुळे पसरणाऱ्‍या रोगांचा शोध लागण्याच्या बऱ्‍याच काळाआधी बायबलमध्ये स्वच्छतेच्या सवयींबद्दल सांगण्यात आले होते, ज्या आज देखील महत्त्वाच्या व उपयुक्‍त आहेत. (लेवीय ११:३२-४०; अनुवाद २३:१२, १३) कुटुंबातील सदस्य, एकमेकांशी कसे वागावे याबद्दल बायबलमध्ये असलेल्या सल्ल्याचे पालन करतात तेव्हा ते आनंदी असतात. (इफिसकर ५:२८–६:४) बायबल तत्त्वांचे पालन केल्यामुळे एक व्यक्‍ती अधिक मेहनती कामगार किंवा अधिक समंजस मालक बनते. (इफिसकर ४:२८; ६:५-९) बायबलची तत्त्वे आपल्या जीवनात लागू केल्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते. (नीतिसूत्रे १४:३०; इफिसकर ४:३१, ३२; कलस्सैकर ३:८-१०) आपल्या निर्माणकर्त्याकडूनच अशा प्रकारचे मार्गदर्शन मिळण्याची आपण अपेक्षा करू शकतो.

बायबलवर भरवसा ठेवल्यामुळे कोणते फायदे मिळतात? बायबलमध्ये असणाऱ्‍या बुद्धिमुळे कमअनुभवी मनुष्यही सूज्ञ बनतो. (स्तोत्र १९:७) शिवाय बायबलवर एकदा आपला भरवसा वाढला की मग मजबूत विश्‍वास बाळगण्यासाठी आवश्‍यक असणारे पुढचे पाऊल उचलण्यास आपण दुसऱ्‍या पुस्तकाचा आधार घेणार नाही. (w०९ ५/१)

अधिक माहितीसाठी “बायबल—देवाकडून आलेले पुस्तक” हा बायबल नेमके काय शिकवते? * या पुस्तकातील अध्याय २ पाहा.

[तळटीप]

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले.