व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा—“परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे”

प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा—“परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे”

प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा—“परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे”

“प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू या.”—इब्री ६:२.

१, २. पहिल्या शतकात जेरूसलेम व यहूदियामध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना ‘डोंगरांत पळून जाण्याची’ संधी कशी मिळाली?

येशू पृथ्वीवर होता तेव्हा, त्याच्या शिष्यांनी त्याच्या जवळ येऊन असे विचारले: “ह्‍या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” येशूने त्यांच्या या प्रश्‍नाचे उत्तर एका भविष्यवाणीच्या रूपात दिले. त्या भविष्यवाणीची पहिली पूर्णता पहिल्या शतकात झाली. येशूने एक विलक्षण घटना घडणार असल्याचे सांगितले ज्यामुळे हे कळणार होते की अंत अगदी जवळ आहे. ती घटना घडताच, “जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून [जायचे होते.]” (मत्त. २४:१-३, १५-२२) येशूच्या शिष्यांनी त्याने सांगितलेले चिन्ह ओळखून त्याच्या सूचनांनुसार पाऊल उचलले का?

जवळजवळ तीन दशकांनंतर सा.यु. ६१ मध्ये प्रेषित पौलाने जेरूसलेम व त्याच्या आसपास राहणाऱ्‍या इब्री ख्रिश्‍चनांना अतिशय सडेतोड शब्दांत एक संदेश लिहिला. त्यावेळी, एका ‘मोठ्या संकटाची’ सुरुवात होत असल्याचे चिन्ह देणारी घटना घडायला फक्‍त पाच वर्षे उरली आहेत याची पौलाला किंवा त्याचा संदेश वाचणाऱ्‍या बांधवांना जराही कल्पना नव्हती. (मत्त. २४:२१) सा.यु. ६६ साली सेस्टियस गॅलसच्या नेतृत्वाखाली रोमी सैन्याने जेरूसलेम शहरावर चढाई केली. त्यांची ही मोहीम बऱ्‍याच प्रमाणात यशस्वीही ठरली होती. पण मग अचानक रोमी सैन्याने माघार घेतली. अशा रीतीने शहरातल्या लोकांना सुरक्षित स्थानी पळून जाण्याची संधी मिळाली.

३. पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना कोणता सल्ला दिला आणि का?

या घडामोडींचा अर्थ समजून घेऊन पळ काढण्यासाठी जेरूसलेममधील ख्रिश्‍चनांना उत्तम निर्णयशक्‍तीची व आध्यात्मिक रीत्या जागरूक असण्याची गरज होती. पण, त्यांच्यापैकी काही जण ‘ऐकण्यात मंद झाले होते.’ आध्यात्मिक दृष्ट्या ते “दुधाची” गरज असलेल्या तान्ह्या मुलांसारखे होते. (इब्री लोकांस ५:११-१३ वाचा.) जे सत्याच्या मार्गात वर्षानुवर्षे विश्‍वासूपणे चालत आले होते त्यांच्यापैकीही काही जण आता ‘जिवंत देवाला सोडून देण्याची’ लक्षणे दाखवत होते. (इब्री ३:१२) त्या काळातला संकटमय ‘दिवस जवळ येत असताना’ त्यांच्यापैकी काही जण ख्रिस्ती सभा चुकवू लागले होते. (इब्री १०:२४, २५) म्हणूनच, पौलाने त्यांना हा समयोचित सल्ला दिला: “आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू या.”—इब्री ६:२.

४. आध्यात्मिक रीत्या जागरूक राहणे का महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी कोणती गोष्ट आपली मदत करेल?

आज आपण येशूने केलेल्या भविष्यवाणीच्या शेवटल्या पूर्णतेच्या काळात जगत आहोत. “परमेश्‍वराचा मोठा दिवस,” अर्थात सैतानाच्या सबंध जगाचा जेव्हा अंत होईल तो दिवस “समीप आहे.” (सफ. १:१४) म्हणून, आता तर आपण सर्वात जास्त सावध व जागरूक असले पाहिजे. (१ पेत्र ५:८) आपण खरोखर सावध व जागरूक आहोत का? ख्रिस्ती प्रौढता आपल्याला सतत काळाचे भान ठेवण्यास मदत करेल.

ख्रिस्ती प्रौढता म्हणजे नेमके काय?

५, ६. (क) आध्यात्मिक प्रौढतेचा काय अर्थ होतो? (ख) प्रौढतेप्रत जाण्यासाठी कोणत्या दोन गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे?

पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करण्याचे केवळ प्रोत्साहनच दिले नाही, तर आध्यात्मिक दृष्ट्या प्रौढ असण्याचा काय अर्थ होतो हे देखील स्पष्ट केले. (इब्री लोकांस ५:१४ वाचा.) जे ‘प्रौढ’ असतात, त्यांचे केवळ ‘दुधाने’ समाधान होत नाही. तर ते “जड अन्‍न” घेतात. म्हणजेच, सत्याच्या ‘मुळाक्षरांसोबतच’ त्यांना देवाच्या वचनातील ‘गहन गोष्टींचेही’ ज्ञान असते. (१ करिंथ. २:१०) शिवाय, आपल्या ज्ञानेंद्रियांचा वारंवार वापर केल्यामुळे म्हणजेच मिळालेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग केल्यामुळे त्यांना चांगले काय, वाईट काय हे ओळखता येते. अशा सरावामुळे, कोणताही निर्णय घेताना त्यांना त्या विशिष्ट बाबीवर बायबलमधील कोणती तत्त्वे प्रकाश टाकतात व ही तत्त्वे कशी उपयोगात आणता येतील हे समजून घेणे शक्य होते.

पौलाने लिहिले: “ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ.” (इब्री २:१) विश्‍वासापासून असे वाहवत जाणे आपल्याला पत्ताही लागणार नाही इतक्या हळुवारपणे घडू शकते. पण आपल्याबाबतीत असे घडू नये म्हणून, बायबलमधील सत्यांचा अभ्यास करताना, मग तो वैयक्‍तिक रीत्या असो किंवा ख्रिस्ती सभांमध्ये असो, आपण त्याकडे “विशेष लक्ष लाविले पाहिजे.” आपण प्रत्येक जण स्वतःला हे प्रश्‍न विचारू शकतो: ‘मी अजूनही फक्‍त प्राथमिक गोष्टींतच समाधान मानतो का? देवाच्या वचनातील सत्य खरोखरच माझ्या अंतःकरणात रुजले आहे का, की मी यांत्रिकपणे, केवळ सवयीमुळे सगळ्या गोष्टी करतो? मला खऱ्‍या अर्थाने आध्यात्मिक प्रगती कशी करता येईल?’ प्रौढतेप्रत जाण्यासाठी निदान दोन गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे, देवाच्या वचनाशी चांगल्या प्रकारे परिचित होणे. आणि दुसरी म्हणजे, आज्ञाधारक असण्यास शिकणे.

देवाच्या वचनाशी चांगल्या प्रकारे परिचित व्हा

७. देवाच्या वचनाशी चांगल्या प्रकारे परिचित झाल्यामुळे आपल्याला कोणता फायदा मिळू शकतो?

पौलाने लिहिले, “दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो; कारण तो बाळक आहे.” (इब्री ५:१३) प्रौढ बनण्याकरता आपण देवाच्या वचनाशी, म्हणजेच त्याने आपल्याला दिलेल्या त्याच्या संदेशाशी चांगल्या प्रकारे परिचित होणे महत्त्वाचे आहे. हा संदेश देवाच्या वचनात असल्यामुळे आपण बायबलचा तसेच ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या प्रकाशनांचा उत्सुकतेने अभ्यास केला पाहिजे. (मत्त. २४:४५-४७) असे केल्याने, देव कशा प्रकारे विचार करतो हे आपण जाणून घेऊ शकतो आणि यामुळे आपल्या ज्ञानेंद्रियांना योग्य व अयोग्य यातील फरक ओळखण्याचा सराव होतो. ऑर्किड नावाच्या एका ख्रिस्ती बहिणीचे उदाहरण लक्षात घ्या. * ती म्हणते: “नियमित बायबल वाचण्याविषयी वारंवार दिल्या जाणाऱ्‍या सूचनेचा माझ्या जीवनावर फार मोठा प्रभाव पडला. संपूर्ण बायबल वाचायला मला दोन वर्षं लागली. पण या काळात, जणू माझ्या सृष्टिकर्त्याशी माझी पहिल्यांदा भेट होतेय असं मला वाटलं. मला त्याच्या कार्यांविषयी, तसंच त्याला काय आवडतं, काय आवडत नाही, तो किती सामर्थ्यवान व बुद्धिमान आहे याविषयी शिकायला मिळालं. दररोज बायबल वाचल्यानं माझ्या जीवनातील सर्वात कठीण काळातून माझा निभाव लागला.”

८. देवाच्या वचनाचा आपल्यावर कशा प्रकारे प्रभाव पडू शकतो?

देवाच्या वचनाचा काही भाग दररोज वाचल्याने आपण त्यातील संदेशाला आपल्यावर ‘सक्रियपणे’ प्रभाव पाडण्यास संधी देत असतो. (इब्री लोकांस ४:१२ वाचा.) अशा प्रकारच्या वाचनामुळे आपले आतील व्यक्‍तिमत्त्व सुधारते आणि यामुळे यहोवाच्या नजरेत आपण आणखी प्रिय बनतो. तुम्ही बायबल वाचण्यासाठी व त्यावर मनन करण्यासाठी आणखी वेळ देण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते का?

९, १०. देवाच्या वचनाशी परिचित होण्याचा काय अर्थ होतो? उदाहरण देऊन सांगा.

बायबलशी परिचित होण्यासाठी त्यात काय सांगितले आहे हे फक्‍त माहीत असणे पुरेसे नाही. पौलाच्या दिवसांत जे आध्यात्मिक दृष्ट्या बाळकांसारखे होते त्यांना देवाच्या प्रेरित वचनाचे काहीच ज्ञान नव्हते अशातला भाग नाही. पण, त्यांनी त्या ज्ञानाचा वैयक्‍तिक जीवनात उपयोग केला नाही आणि ते ज्ञान प्रत्यक्ष व्यवहारात आणून ते किती बहुमोल आहे हे त्यांनी अजमावून पाहिले नाही. तसेच, जीवनात सुज्ञ निर्णय घेण्याकरता त्यांनी शास्त्रवचनांतील मार्गदर्शनाचा उपयोग केला नाही. आणि त्यामुळे ते देवाच्या वचनाशी परिचित झाले नाहीत.

१० देवाच्या वचनाशी परिचित होण्याकरता आपण त्यात काय सांगितले आहे हे जाणून घेण्यासोबतच ते ज्ञान व्यवहारात आणले पाहिजे. हे कसे करता येईल, ते काइल नावाच्या एका ख्रिस्ती बहिणीच्या अनुभवावरून दिसून येते. काइलची तिच्यासोबत काम करणाऱ्‍या एका स्त्रीशी बाचाबाची झाली. मग, हा मतभेद मिटवण्यासाठी काइलने काय केले? ती सांगते: “मला लगेच रोमकर १२:१८ हे वचन आठवलं, जे म्हणतं: ‘शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.’ त्यामुळे मी कामानंतर त्या स्त्रीची भेट घ्यायचं ठरवलं.” काइलचे प्रयत्न यशस्वी ठरले. मतभेद मिटवण्याकरता काइलने असा पुढाकार घेतला याचे त्या स्त्रीला फार आश्‍चर्य वाटले. काइल म्हणते: “बायबलमधील तत्त्वांचं पालन केल्यास आपण कधीच चुकीचं पाऊल उचलणार नाही.”

आज्ञाधारक राहण्यास शिका

११. आपण कठीण परिस्थितीत सापडतो, तेव्हा बायबलमधून आपण जे शिकलो आहोत त्याचे पालन करणे आपल्याला जड का जाऊ शकते?

११ आपण कठीण परिस्थितीत सापडतो, तेव्हा बायबलमधून आपण जे शिकलो आहोत त्याचे पालन करणे आपल्याला जड जाऊ शकते. उदाहरणार्थ, यहोवाने इस्राएल लोकांना इजिप्तच्या गुलामीतून सोडवल्यावर थोड्याच काळानंतर “ते मोशेशी भांडू लागले” आणि ‘परमेश्‍वराची परीक्षा पाहू’ लागले. का? पिण्याचे पाणी न मिळाल्यामुळे. (निर्ग. १७:१-४) देवासोबत करार केल्यानंतर व “जी वचने परमेश्‍वराने सांगितली त्या सगळ्याप्रमाणे आम्ही करू” असे कबूल केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांनी मूर्तिपूजा करून देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले. (निर्ग. २४:३, १२-१८; ३२:१, २, ७-९) देवाकडून सूचना घेण्यासाठी मोशे बऱ्‍याच दिवसांपासून होरेब पर्वतावर गेला असताना त्याच्या अनुपस्थितीमुळे ते भयभीत झाले असावेत का? पूर्वी जेव्हा अमालेकी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता, तेव्हा मोशेने आपले हात वर उचलून धरल्यामुळे त्यांना विजय मिळाला होता. त्यामुळे, पुन्हा जर अमालेकी लोकांनी हल्ला केला तर मोशेशिवाय आपण अगदी असाहाय्य ठरू असा विचार करून ते घाबरले असतील का? (निर्ग. १७:८-१६) असे घडले असण्याची शक्यता आहे. पण कारण काहीही असले तरी, मुळात इस्राएल लोकांना देवाचे ‘ऐकण्याची इच्छा नव्हती.’ (प्रे. कृत्ये ७:३९-४१) प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्यास इस्राएलांना भीती वाटल्यामुळे त्यांनी देवाची अवज्ञा केली होती. या “त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये” म्हणून ख्रिश्‍चनांनी “होईल तितका प्रयत्न करावा” असे पौलाने त्यांना प्रोत्साहन दिले.—इब्री ४:३, ११.

१२. येशू कशा प्रकारे आज्ञाधारकपणा शिकला आणि त्याचा परिणाम काय झाला?

१२ आध्यात्मिक दृष्ट्या प्रौढ बनण्याकरता आपण यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. बरेचदा आपण कठीण परिस्थितीला तोंड देऊन आज्ञाधारकपणा शिकतो. हे येशूच्या उदाहरणावरून दिसून येते. (इब्री लोकांस ५:८, ९ वाचा.) पृथ्वीवर येण्याअगोदर येशू आपल्या पित्याला आज्ञाधारक होता हे खरे आहे. पण, पृथ्वीवर येऊन त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याकरता त्याला अनेक शारीरिक व मानसिक यातना सोसाव्या लागल्या. अत्यंत कठीण परिस्थितीतही आज्ञाधारक राहिल्यामुळे देवाच्या मनात त्याच्याकरता असलेल्या नव्या भूमिकेसाठी, अर्थात राजा व मुख्य याजकाच्या भूमिकेसाठी तो ‘परिपूर्ण केला गेला.’

१३. आपण आज्ञाधारक राहण्यास शिकलो आहोत की नाही हे कशावरून दिसून येईल?

१३ आपल्याबद्दल काय म्हणता येईल? आपल्यासमोर दुःखदायक समस्या उभ्या ठाकतात, तेव्हा देखील आपण खंबीरतेने यहोवाच्या आज्ञांनुसार वागतो का? (१ पेत्र १:६, ७ वाचा.) नैतिक शुद्धता, प्रामाणिकपणा, जिभेचा उचित उपयोग, बायबलचे वैयक्‍तिक वाचन व अभ्यास, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे तसेच प्रचार कार्यात सहभाग घेणे, या सर्व गोष्टींविषयी देवाचे मार्गदर्शन अगदी स्पष्ट आहे. (यहो. १:८; मत्त. २८:१९, २०; इफिस. ४:२५, २८, २९; ५:३-५; इब्री १०:२४, २५) आपण दुःखदायक परिस्थितीत असलो तरीसुद्धा आपण वरील गोष्टींबद्दल यहोवाच्या स्पष्ट सूचनांचे पालन करतो का? या गोष्टींत आपण आज्ञाधारक राहतो किंवा नाही यावरून आपण प्रौढतेप्रत जाण्यात कितपत प्रगती केली आहे हे दिसून येईल.

ख्रिस्ती प्रौढता—फायदेकारक का आहे?

१४. प्रौढतेप्रत जाण्याचा प्रयत्न करत राहिल्याने कशा प्रकारे आपले संरक्षण होऊ शकते हे एक उदाहरण देऊन सांगा.

१४ हे जग नैतिकदृष्ट्या “कोडगे” झाले आहे. अशा जगात राहत असताना, एका ख्रिस्ती व्यक्‍तीच्या ज्ञानेंद्रियांना चांगल्यावाइटात फरक करण्याचा सराव झाला असल्यास हे तिच्याकरता संरक्षण ठरू शकते. (इफिस. ४:१९) उदाहरणार्थ, जेम्स नावाचा एक ख्रिस्ती बांधव बायबलवर आधारित प्रकाशनांचे नियमित वाचन करायचा व त्यांतील माहितीची कदर करायचा. त्याच्या नोकरीच्या ठिकाणी त्याच्यासोबत काम करणाऱ्‍या सर्व स्त्रियाच होत्या. जेम्स सांगतो, “त्यांच्यापैकी बहुतेक जणींचं वर्तन अनैतिक होतं. पण एक मात्र चांगल्या चारित्र्याची वाटली आणि तिनं बायबलमधील सत्याविषयी आवडही दाखवली. पण एकदा आम्ही दोघंच एका खोलीत काम करत असताना ती नको ते चाळे करू लागली. मला वाटलं की कदाचित ती चेष्टा करतेय, पण तिला आवरणं खूप कठीण होतं. त्याक्षणी मला टेहळणी बुरूज मासिकात आलेला एका बांधवाचा अनुभव आठवला. त्या बांधवालाही त्याच्या कामाच्या ठिकाणी अशाच प्रकारच्या प्रलोभनाचा सामना करावा लागला होता. त्या लेखात योसेफ व पोटीफराच्या बायकोचं उदाहरण सांगण्यात आलं होतं. * मी लगेच त्या मुलीला दूर ढकललं आणि ती धावत बाहेर गेली.” (उत्प. ३९:७-१२) आपल्या हातून काही अनुचित घडले नाही आणि आपला शुद्ध विवेक टिकवून ठेवता आला याबद्दल जेम्सला समाधान वाटले.—१ तीम. १:५.

१५. प्रौढतेप्रत जाण्याचा प्रयत्न केल्याने आपले अंतःकरण कशा प्रकारे स्थिर होते?

१५ ख्रिस्ती प्रौढतेचा आणखी एक फायदा आहे. यामुळे आपले अंतःकरण स्थिर होते आणि परिणामस्वरूप आपण ‘विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जात’ नाही. (इब्री लोकांस १३:९ वाचा.) आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जे “श्रेष्ठ” आहे त्यावर आपले लक्ष केंद्रित राहते. (फिलिप्पै. १:९, १०) अशा रीतीने, देवाबद्दल व आपल्याकरता त्याने ज्या काही तरतुदी केल्या आहेत त्यांबद्दल आपली कदर वाढते. (रोम. ३:२४) जे “समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे” असतात ते अशी कृतज्ञ मनोवृत्ती बाळगतात आणि यामुळे यहोवासोबत त्यांचा घनिष्ठ नातेसंबंध असतो.—१ करिंथ. १४:२०.

१६. एका बहिणीला आपले “अंतःकरण स्थिर” करण्यास कशामुळे मदत झाली?

१६ लवीज नावाची एक बहीण कबूल करते, की तिचा बाप्तिस्मा झाल्यावर काही काळापर्यंत, लोक आपल्याबद्दल काय विचार करतील केवळ या विचारानेच ती ख्रिस्ती कार्यांत सहभाग घ्यायची. ती म्हणते, “मी काही चुकीचं करत होते अशातला भाग नव्हता. पण उत्कट इच्छेनं प्रेरित होऊन मी यहोवाची सेवा करत नव्हते. आपण पूर्ण शक्‍तिनिशी यहोवाची सेवा करत आहोत असं मला वाटत नव्हतं. पण, यासाठी मला स्वतःत बराच बदल करावा लागेल याची मला जाणीव होती. सर्वात मोठा बदल म्हणजे मला पूर्ण मनानं त्याच्या सेवेत स्वतःला झोकून द्यावं लागणार होतं.” या दिशेने प्रयत्न केल्यामुळे लवीजचे ‘अंतःकरण स्थिर झाले’ आणि नंतर जेव्हा तिला गंभीर आजारपणाला तोंड द्यावे लागले तेव्हा तिला याचा खूप फायदा झाला. (याको. ५:८) लवीज म्हणते, “मला जरी बराच त्रास सहन करावा लागला तरी मी यहोवाच्या खूप जवळ आले.”

मनापासून आज्ञाधारक असा

१७. पहिल्या शतकात आज्ञाधारक असणे खासकरून का आवश्‍यक होते?

१७ ‘प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करण्याविषयी’ पौलाने दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यामुळे पहिल्या शतकात जेरूसलेममध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांचा जीव वाचला. ज्यांनी या सल्ल्याचे पालन केले होते, ते आध्यात्मिक दृष्ट्या सावध व जागरूक राहिले आणि त्यामुळे येशूने दिलेले चिन्ह त्यांना ओळखता आले. “ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात उभा असलेला” जेव्हा त्यांनी पाहिला, म्हणजेच रोमी सैन्याने जेरूसलेमला वेढून शहरात प्रवेश केला आहे हे जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा ‘डोंगरात पळून जाण्याची’ वेळ आली आहे हे त्यांनी ओळखले. (मत्त. २४:१५, १६) येशूने आधीच इशारा दिल्याप्रमाणे ख्रिस्ती लोकांनी जेरूसलेम शहराचा नाश होण्याआधी तेथून पळ काढला आणि ख्रिस्ती धर्माचा इतिहासकार युसेबियस याच्या लिखाणानुसार त्यांनी गिलियडच्या डोंगराळ प्रदेशातील पेल्ला या शहरात आश्रय घेतला. अशा रीतीने ते आजवरच्या इतिहासात जेरूसलेम शहरावर आलेल्या सर्वात भयंकर संकटातून बचावले.

१८, १९. (क) आजच्या काळात आज्ञाधारक असणे का आवश्‍यक आहे? (ख) पुढील लेखात कशाविषयी चर्चा करण्यात येईल?

१८ आजवर कधीही आले नाही आणि पुढेही येणार नाही असे “मोठे संकट” येण्याविषयी येशूने भाकीत केले होते. येशूच्या या भविष्यवाणीची शेवटली पूर्णता होईल तेव्हा देखील, प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न केल्यामुळे आपण शिकलेला आज्ञाधारकपणा जीवनदायक ठरेल. (मत्त. २४:२१) भविष्यात ‘विश्‍वासू कारभाऱ्‍याकडून’ आपल्याला ज्या काही निकडीच्या सूचना मिळतील त्यांचे आपण आज्ञाधारकपणे पालन करू का? (लूक १२:४२) खरोखर, देवाच्या आज्ञांचे ‘मनापासून पालन’ करण्यास शिकणे किती महत्त्वाचे आहे!—रोम. ६:१७.

१९ प्रौढतेप्रत जाण्याकरता आपण आपल्या ज्ञानेंद्रियांना चांगल्यावाइटात फरक करण्याचा सराव दिला पाहिजे. असे करण्यासाठी देवाच्या वचनाशी चांगल्या प्रकारे परिचित होण्याचा आणि आज्ञाधारकपणा शिकण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. ख्रिस्ती प्रौढतेप्रत जाण्याचा प्रयत्न करताना तरुणांना काही खास आव्हानांना तोंड द्यावे लागते. या आव्हानांना यशस्वीपणे तोंड कसे देता येईल याविषयी पुढील लेखात आपण चर्चा करणार आहोत.

[तळटीपा]

^ परि. 7 काही नावे बदलण्यात आली आहेत.

^ परि. 14 टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, १९९९ अंकातील “नाही म्हणण्याचे धैर्य” हा लेख पाहावा.

तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• आध्यात्मिक प्रौढता काय आहे आणि ती आपण कशी प्राप्त करू शकतो?

• प्रौढतेप्रत जाण्याकरता देवाच्या वचनाशी परिचित होणे का महत्त्वाचे आहे?

• आपण कशा प्रकारे आज्ञाधारकपणा शिकू शकतो?

• ख्रिस्ती प्रौढतेमुळे आपल्याला कशा प्रकारे फायदा होतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

बायबलच्या मार्गदर्शनाचे पालन केल्याने आपल्याला एका प्रौढ व्यक्‍तीप्रमाणे समस्यांना तोंड देता येईल

[१२, १३ पानांवरील चित्र]

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी येशूच्या सल्ल्याचे पालन केल्यामुळे त्यांचा जीव वाचला