व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाच्याने मामाचा जीव वाचवला

भाच्याने मामाचा जीव वाचवला

आपल्या मुलांना शिकवा

भाच्याने मामाचा जीव वाचवला

प्रेषित पौलाचे नातेवाईकही येशूचे अनुयायी होते, हे तुम्हाला माहीत होते का? *— त्याची बहीण आणि तिचा मुलगा येशूचे अनुयायी होते. आणि याच भाच्याने पौलाचा जीव वाचवला होता. आपल्याला या दोघांचीही नावे माहीत नाहीत, पण या भाच्याने काय केले होते ते मात्र माहीत आहे. तुम्हाला ऐकायला आवडेल का?—

पौल नुकताच आपल्या मिशनरी दौऱ्‍यावरून परतला होता आणि तो आता जेरूसलेमेत आहे. हे सा.यु. ५६ असावे. तेव्हा त्याला अटक होते व त्याची उलटतपासणी सुरू होते. पण पौलाच्या शत्रूंना त्याच्यावर खटला भरायचा नव्हता तर त्याला जिवे मारायचे होते. म्हणून ते पौलाला ज्या मार्गावरून नेले जाणार होते त्या मार्गावर जवळजवळ ४० लोकांना दबा धरून बसायला सांगतात.

पौलाच्या भाच्याला कुठून तरी या कटाची कुणकुण लागते. तो काय करतो माहीत आहे?— तो लगेच याविषयी आपल्या मामाला जाऊन सांगतो. आणि पौल लगेच एका लष्करी अधिकाऱ्‍याला असे सांगतो: “ह्‍या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा; ह्‍याला त्यास काही सांगावयाचे आहे.” तो अधिकारी त्याला क्लौद्य लुसिया नावाच्या सरदाराकडे नेतो आणि म्हणतो, की या तरुणाकडे एक महत्त्वाची बातमी आहे. हे ऐकताच क्लौद्य पौलाच्या भाच्याला बाजूला घेतो व तो, पौलाला मारण्याच्या शिजत असलेल्या कटाविषयी त्याला सगळे सांगतो.

सर्व ऐकून घेतल्यावर क्लौद्य त्याला बजावतो: “तू हे मला कळविले आहे हे कोणाला सांगू नको.” त्यानंतर क्लौद्य दोघा लष्करी अधिकाऱ्‍यांना बोलवतो आणि २०० शिपाई, ७० स्वार व २०० भालेकरी यांना कैसरियाला जाण्यास तयार ठेवा असे त्यांना सांगतो. रात्री ९ वाजता हे सर्व ४७० लोक पौलाला कैसरियातील रोमी सुभेदार फेलिक्स याच्याकडे सुरक्षितपणे पोहचवण्यासाठी निघतात. फेलिक्सला लिहिलेल्या एका पत्रात क्लौद्य पौलाला ठार मारण्याच्या कटाविषयी सांगतो.

त्यामुळे यहुद्यांची पौलाशी भेट आता थेट कैसरियातील न्यायालयातच होणार होती. कारण त्याच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांना तेथेच जावे लागणार होते. पण खरे तर त्यांच्याकडे पौलाविरुद्ध काहीच ठोस पुरावा नसतो. तरीपण, अन्यायीपणे पौलाला दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते. म्हणून तो, रोममध्ये आपल्यावर खटला भरण्यात यावा अशी विनंती करतो आणि त्याला तेथे पाठवले जाते.—प्रेषितांची कृत्ये २३:१६–२४:२७; २५:८-१२.

या वृत्तांतावरून आपण पौलाच्या भाच्याविषयी काय शिकू शकतो?— जे बरोबर आहे ते बोलण्यासाठी धैर्य लागते व असे केल्याने आपण इतरांचा जीवही वाचवू शकतो. येशूचे शत्रू “त्याला जिवे मारावयास पाहत होते,” तरीपण तो लोकांना देवाच्या राज्याबद्दल सांगत राहिला. आपणही असेच करावे अशी त्याने आपल्याला आज्ञा दिली आहे. आपण ही आज्ञा पाळतो का? पौलाच्या भाच्यासारखे आपल्यात धैर्य असेल तर आपण नक्कीच येशूच्या आज्ञेचे पालन करू.—योहान ७:१; १५:१३; मत्तय २४:१४; २८:१८-२०.

पौलाने त्याचा तरुण मित्र तीमथ्य याला असे आर्जवले: “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्‍यांचेहि तारण साधिशील.” (१ तीमथ्य ४:१६) पौलाच्या भाच्याने जे केले ते पौलाच्या शब्दांच्या सुसंगतेतच होते. तुम्हीही असेच कराल का? (w०९ ६/१)

[तळटीप]

^ काही वाक्यांच्या पुढे एक छोटीशी रेघ दिली आहे. तेथे तुम्ही थांबून तुमच्या मुलाला काय वाटते ते विचारायचे आहे.

प्रश्‍न:

❍ पौलाचे नातेवाईक कोणकोण होते व यांच्याविषयी आपण काय शिकलो?

❍ पौलाचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या भाच्याने काय केले?

❍ येशूने दिलेल्या कोणत्या आज्ञेचे आज आपण पालन करू शकतो ज्यामुळे लोकांचे प्राण वाचतील?