व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्याला मानवांच्या मर्यादांची जाणीव आहे

त्याला मानवांच्या मर्यादांची जाणीव आहे

देवाच्या जवळ या

त्याला मानवांच्या मर्यादांची जाणीव आहे

लेवीय ५:२-११

“मी खूप मनापासून प्रयत्न केले, पण ते पुरेसे नाहीत असे मला वाटायचे.” असे उद्‌गार एका स्त्रीने काढले. देवाला प्रसन्‍न करण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न कमी पडत आहेत असे तिला वाटत होते. यहोवा त्याच्या उपासकांचे मनःपूर्वक प्रयत्न स्वीकारतो का? तो त्यांच्या क्षमता आणि परिस्थिती लक्षात घेतो का? ह्‍या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपण विशिष्ट अर्पणांविषयी मोशेला दिलेल्या नियमशास्त्रात काय म्हटले होते त्याचे परीक्षण करून पाहूया. लेवीय ५:२-११ येथे याविषयी सांगितले आहे.

नियमशास्त्रात पापांची क्षमा मिळवण्यासाठी वेगवेगळी अर्पणे व बलिदाने देण्याविषयी देवाने आज्ञा दिली होती. या अहवालात अशा व्यक्‍तीबद्दल सांगण्यात आले आहे जिने नकळत किंवा अविचारीपणे पाप केले होते. (वचन २-४) आपण पाप केले आहे याची तिला जाणीव झाल्यावर त्याची कबुली द्यायची होती आणि पापार्पण—“कोकरांची किंवा करडांची एक मादी” सादर करायची होती. (वचने ५, ६) पण जर ती व्यक्‍ती गरीब असेल व तिच्याजवळ कोकरू किंवा करडू नसेल तर? तर मग कर्ज काढून दुसऱ्‍याकडून तिला ते विकत घ्यायचे होते का? ते विकत घेण्यासाठी पैसे जमेपर्यंत तिला काम करून हे पापार्पण करण्याचे लांबणीवर टाकायचे होते का?

यहोवाला लोकांबद्दल किती प्रेमळ काळजी होती हे नियमशास्त्रात पुढे काय म्हटले त्यावरून दिसून येते: “त्याला कोकरू देण्याची ऐपत नसेल तर त्याने आपण केलेल्या पापाबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले अथवा पारव्याची दोन पिले परमेश्‍वरापाशी आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्‍याचे होमार्पण करावे.” (वचन ७) “ऐपत नसेल तर” या वाक्यांशाचे भाषांतर, “त्याच्या आवाक्याबाहेर असेल तर” असेही केले जाऊ शकते. जर एखाद्या इस्त्राएली व्यक्‍तीची कोकरू देण्याची ऐपत नसेल तर तिला जे देता येऊ शकत होते ते म्हणजे दोन पारवे किंवा कबुतरे स्वीकारण्यासही यहोवा तयार होता.

पण जर त्या व्यक्‍तीकडे दोन पक्षी घेण्याइतकेही पैसे नसतील तर काय? “तर त्याने आपल्या पापाबद्दल एक दशमांश एफा [आठ ते नऊ कप] सपीठ पापार्पण म्हणून आणावे” असे नियमशास्त्रात म्हटले होते. (वचन ११) खूप गरीब असणाऱ्‍या व्यक्‍तीसाठी यहोवाने एक सूट देण्याचे ठरवले. रक्‍त नसलेले पापार्पण स्वीकारण्यास तो तयार झाला. * इस्राएलमध्ये गरीब लोकसुद्धा पश्‍चाताप केल्यामुळे मिळणारा आशीर्वाद अथवा देवाबरोबर समेट करण्याचा सुहक्क प्राप्त करू शकत होते.

पापार्पणाच्या या नियमापासून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळते? हेच की तो एक कनवाळू व समजदार देव आहे जो आपल्या उपासकांच्या मर्यादांची जाणीव बाळगतो. (स्तोत्र १०३:१४) आपली परिस्थिती कठीण असली तरी म्हणजे वृद्धावस्था, आजारपण, कौटुंबिक किंवा इतर जबाबदाऱ्‍या आपल्यावर असल्या, तरी आपण त्याच्याशी जवळीक साधावी व त्याच्यासोबत चांगला नातेसंबंध विकसित करावा अशी त्याची इच्छा आहे. आपल्याला जे काही शक्य आहे ते सर्व करून आपण त्याची सेवा करतो हे पाहून यहोवा प्रसन्‍न होतो हे किती सांत्वन देणारे आहे. (w०९ ६/१)

[तळटीप]

^ प्रायश्‍चित्ताचे मूल्य, अर्पण केल्या जाणाऱ्‍या प्राण्याच्या रक्‍तात असल्यामुळे देव त्या रक्‍ताला पवित्र समजत होता. (लेवीय १७:११) याचा अर्थ, गरीब इस्राएली करीत असलेल्या सपीठाच्या अर्पणाला काही मूल्य नव्हते का? असे नाही. नम्र व स्वेच्छेने केल्या जाणाऱ्‍या या अर्पणांना यहोवा मौल्यवान समजत होता. शिवाय दर वर्षी येणाऱ्‍या प्रायश्‍चित्ताच्या दिवशी अर्पण केल्या जाणाऱ्‍या प्राण्यांच्या रक्‍तामुळे संपूर्ण राष्ट्राच्या पापांचे ज्यात गरिबांच्या पापांचा देखील समावेश होतो, प्रायश्‍चित्त व्हायचे.—लेवीय १६:२९, ३०.