व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या मंदिराविषयी आवेशी असा!

यहोवाच्या मंदिराविषयी आवेशी असा!

यहोवाच्या मंदिराविषयी आवेशी असा!

“तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील.”—योहा. २:१७.

१, २. येशू सा.यु. ३० मध्ये मंदिरात काय करतो आणि का?

सा.यु. ३० सालच्या वल्हांडण सणाच्या वेळी घडलेल्या या घटनेचे दृश्‍य डोळ्यांपुढे उभे करा. सहा महिन्यांपूर्वीच येशूने त्याचे सेवाकार्य सुरू केले आहे. आता तो जेरूसलेमला जातो. तेथे मंदिरात गेल्यावर विदेश्‍यांच्या अंगणात येशूला ‘गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले’ आढळतात. तेव्हा, दोरखंडाचा चाबूक करून तो सर्व मेंढरांना व गुरांना आणि त्यांच्या पाठोपाठ सर्व व्यापाऱ्‍यांनाही मंदिरातून घालवून देतो. तसेच, तो सराफांचे चौरंग उलटवून त्यांचे पैसे जमिनीवर विखरतो. आणि कबुतरे विकणाऱ्‍यांना आपले सामान घेऊन तेथून निघून जाण्यास सांगतो.—योहा. २:१३-१६.

येशूला देवाच्या मंदिराविषयी मनापासून आस्था असल्यामुळेच तो असे करतो. तो सर्वांना बजावून सांगतो: “माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका!” हे सर्व पाहून येशूच्या शिष्यांना कित्येक शतकांआधी स्तोत्रकर्त्या दाविदाने लिहिलेल्या या शब्दांची आठवण होते: “तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील.”—योहा. २:१६, १७; स्तो. ६९:९.

३. (क) आवेश म्हणजे काय? (ख) आपण स्वतःला कोणता प्रश्‍न विचारू शकतो?

आपण आताच पाहिल्याप्रमाणे, देवाच्या मंदिराविषयी आस्था व आवेश असल्यामुळेच येशूला अशा प्रकारे वागण्याची प्रेरणा मिळाली. आवेश म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल “उत्सुकता व कळकळ” असणे. या २१ व्या शतकात सत्तर लाखांपेक्षा जास्त खरे ख्रिस्ती देवाच्या मंदिराविषयी अशाच प्रकारची आस्था व्यक्‍त करत आहेत. पण वैयक्‍तिक रीत्या आपण स्वतःला असे विचारू शकतो, ‘यहोवाच्या मंदिराविषयी माझा आवेश वाढवण्यासाठी मला काय करता येईल?’ या प्रश्‍नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे, की आज देवाचे मंदिर कशास सूचित करते? त्यानंतर आपण बायबलमधून देवाच्या काही विश्‍वासू सेवकांची उदाहरणे पाहू या, ज्यांनी देवाच्या मंदिराविषयी आवेश दाखवला. त्यांची उदाहरणे “आपल्या शिक्षणाकरिता” लिहून ठेवण्यात आली आहेत आणि त्यांवर विचार केल्याने आपल्याला अधिक आवेशी होण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल.—रोम. १५:४.

देवाचे मंदिर—पूर्वीचे व सध्याचे

४. शलमोनाने बांधलेल्या मंदिरात काय केले जायचे?

प्राचीन इस्राएलात देवाचे मंदिर जेरूसलेममध्ये होते. कधीकधी या मंदिराला देवाचे निवासस्थानही म्हटले जायचे. अर्थात, यहोवा खरोखरच तेथे राहात होता, असे नाही. त्याने तर असे म्हटले: “आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पाद्रासन आहे; तुम्ही मजसाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार?” (यश. ६६:१) तरीसुद्धा, शलमोनाच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेले मंदिर यहोवाच्या उपासनेचे प्रमुख केंद्र होते, जेथे त्याचे उपासक त्याला प्रार्थना करीत.—१ राजे ८:२७-३०.

५. शलमोनाने बांधलेले मंदिर आजच्या काळात कोणत्या तरतुदीला सूचित करते?

आज, जेरूसलेममध्ये किंवा इतर कोठे बांधलेल्या इमारतीला यहोवाचे मंदिर म्हणता येणार नाही. तर, आजच्या काळात देवाचे मंदिर हे ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर देवाची उपासना करण्यासाठी त्याच्याजवळ येण्याच्या तरतुदीला सूचित करते. या लाक्षणिक मंदिरात पृथ्वीवरील यहोवाचे सर्व विश्‍वासू उपासक त्याची एकजूटपणे उपासना करत आहेत.—यश. ६०:४, ८, १३; प्रे. कृत्ये १७:२४; इब्री ८:५; ९:२४.

६. कोणत्या यहुदी राजांनी खऱ्‍या उपासनेविषयी उल्लेखनीय आवेश दाखवला?

सा.यु.पू. ९९७ मध्ये इस्राएल राष्ट्राचे दोन भाग झाल्यानंतर, दक्षिणेकडील यहूदावर राज्य करणाऱ्‍या १९ राजांपैकी खासकरून ४ राजांनी खऱ्‍या उपासनेविषयी उल्लेखनीय आवेश दाखवला. आसा, यहोशाफाट, हिज्कीया व योशीया हे ते चार राजे. त्यांच्या उदाहरणांतून आपण कोणते महत्त्वाचे धडे शिकू शकतो?

पूर्ण हृदयाने केलेल्या सेवेमुळे आशीर्वाद मिळतो

७, ८. (क) यहोवा कशा प्रकारच्या सेवेवर आशीर्वाद देतो? (ख) आसा राजाने केलेल्या चुकीतून आपण कोणता धडा शिकू शकतो?

आसा राजाच्या कारकिर्दीत यहोवाने आपल्या लोकांचे मार्गदर्शन करण्यासाठी व विश्‍वासू राहण्यास त्यांना मदत करण्यासाठी संदेष्ट्यांना पाठवले होते. उदाहरणार्थ, ओदेदाचा पुत्र अजऱ्‍या या संदेष्ट्याचे आसाने ऐकले होते असे बायबल आपल्याला सांगते. (२ इतिहास १५:१-८ वाचा.) आसाने केलेल्या सुधारणांमुळे यहूदाचे लोक तर एकत्र आलेच, पण उत्तरेकडील इस्राएल राज्यातील लोकही जेरूसलेममध्ये मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत सामील झाले. त्या सर्वांनी मिळून यहोवाची विश्‍वासूपणे उपासना करण्याचा दृढनिश्‍चय केला. त्या घटनेविषयी असे सांगितले आहे: “त्यांनी जयघोष करून आणि कर्णे व रणशिंगे वाजवून उच्च स्वराने परमेश्‍वरासमक्ष शपथ वाहिली. सर्व यहूदी लोक आणभाक करून हर्षभरित झाले; त्यांनी मनःपूर्वक शपथ वाहिली, ते मोठ्या उत्कंठेने त्यास शरण गेले आणि तो त्यांस पावला, परमेश्‍वराने त्यांस चोहोकडून स्वास्थ्य दिले.” (२ इति. १५:९-१५) आपण यहोवाची पूर्ण हृदयाने सेवा केल्यास तो आपल्यालाही अशाच प्रकारे आशीर्वादित करेल यात शंका नाही.—मार्क १२:३०.

पण दुःखाची गोष्ट म्हणजे, नंतर हनानी द्रष्ट्याने आसाचे ताडन केले तेव्हा ते स्वीकारण्याऐवजी आसा त्याच्यावर रागावला. (२ इति. १६:७-१०) ख्रिस्ती वडिलांद्वारे यहोवा आपल्याला एखादा सल्ला किंवा मार्गदर्शन देतो तेव्हा आपण त्याला कसा प्रतिसाद देतो? सल्ला देणाऱ्‍या वडिलांबद्दल मनात राग बाळगून स्वतःचे नुकसान करून घेण्याऐवजी, आपण बायबलच्या आधारावर दिलेल्या त्यांच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करून त्याचे तत्परतेने पालन करतो का?

९. यहोशाफाट व यहूदाला कोणत्या भीतीदायक परिस्थितीला तोंड द्यावे लागले आणि तेव्हा त्यांनी काय केले?

यहोशाफाट सा.यु.पू. दहाव्या शतकात यहूदावर राज्य करत होता. त्या काळात यहोशाफाटाला व सबंध यहूदा राज्याला एका भीतीदायक परिस्थितीला तोंड द्यावे लागले. कारण अम्मोनी, मवाबी व सेइर पहाडातील लोक यहूदावर चाल करून आले. राजा यहोशाफाटाला साहजिकच भीती वाटली. तरीपण, त्याने काय केले? तो व त्याची माणसे, तसेच त्यांची मुलेबाळे व स्त्रिया यहोवाच्या मंदिरात प्रार्थना करण्यासाठी एकत्र आले. (२ इतिहास २०:३-६ वाचा.) मंदिराच्या उद्‌घाटनाच्या वेळी शलमोनाने केलेल्या प्रार्थनेप्रमाणे, यहोशाफाटाने या हृदयस्पर्शी शब्दांत यहोवाला काकुळतीने विनंती केली: “हे आमच्या देवा; तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही; आम्ही काय करावे ते आम्हास सुचत नाही; पण आमचे डोळे तुजकडे लागले आहेत.” (२ इति. २०:१२, १३) यहोशाफाटाने प्रार्थना केल्यानंतर, यहजीएल लेवी ‘मंडळीमध्ये उभा असतानाच,’ यहोवाच्या आत्म्याने त्याला लोकांस धीर देऊन त्यांचा आत्मविश्‍वास वाढवण्यास प्रवृत्त केले.२ इतिहास २०:१४-१७ वाचा.

१०. (क) यहोशाफाट व यहूदाला कोठून मार्गदर्शन मिळाले? (ख) आज यहोवाकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाबद्दल आपण कृतज्ञता कशी व्यक्‍त करू शकतो?

१० तर अशा रीतीने, यहोशाफाट व यहूदा राज्याला यहजीएलाद्वारे यहोवाकडून मार्गदर्शन मिळाले. आज आपल्याला विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या माध्यमाने सांत्वन व मार्गदर्शन मिळते. म्हणूनच, मंडळीत नियुक्‍त केलेल्या वडिलांना आपण नेहमी साथ दिली पाहिजे व त्यांचा आदर केला पाहिजे. कारण, ते आपला संभाळ करण्यासाठी आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी खूप मेहनत घेतात.—मत्त. २४:४५; १ थेस्सलनी. ५:१२, १३.

११, १२. यहोशाफाट व यहूदाच्या लोकांच्या बाबतीत जे घडले त्यावरून आपण काय शिकू शकतो?

११ यहोशाफाट व त्याचे लोक ज्याप्रमाणे यहोवाचे मार्गदर्शन मिळवण्याकरता एकत्र आले त्याचप्रमाणे आपणही आपल्या बंधुभगिनींसोबत मंडळीच्या सभांमध्ये नियमितपणे एकत्र येण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. कधीकधी आपल्याला अतिशय कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते. पुढे कोणते पाऊल उचलावे हे देखील आपल्याला सुचत नाही. अशी परिस्थिती आपल्यासमोर आल्यास, आपण यहोशाफाट व यहूदा राज्यातील लोकांच्या चांगल्या उदाहरणाचे पालन करू या, ज्यांनी यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून मार्गदर्शनाकरता त्याला प्रार्थना केली. (नीति. ३:५, ६; फिलिप्पै. ४:६, ७) आपण एकटे असलो व बांधवांशी संपर्क करण्याचा कोणताच मार्ग आपल्याकडे नसला तरीसुद्धा आपण यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा आपल्या प्रार्थना जणू आपल्याला ‘जगातील आपल्या [सबंध] बंधुवर्गाशी’ जोडतात.—१ पेत्र ५:९.

१२ यहोशाफाट व त्याच्या लोकांनी यहजीएलाद्वारे देण्यात आलेल्या देवाच्या मार्गदर्शनाचे पालन केले. याचा काय परिणाम झाला? ते लढाईत विजयी झाले आणि “हर्षभरित” होऊन “सारंग्या, वीणा व कर्णे वाजवीत यरुशलेमेत परमेश्‍वराच्या मंदिरी आले.” (२ इति. २०:२७, २८) त्याच प्रकारे आपणही, यहोवा त्याच्या संघटनेद्वारे देत असलेल्या मार्गदर्शनाचा आदर करतो आणि आपल्या बांधवांसोबत मिळून त्याचे स्तवन करतो.

आपल्या सभागृहांची चांगली निगा राखणे

१३. हिज्कीयाने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच कोणते कार्य हाती घेतले?

१३ हिज्कीयाच्या कारकिर्दीच्या पहिल्या महिन्यात त्याने देवाच्या मंदिराची द्वारे उघडून त्याची डागडुजी करण्याद्वारे यहोवाच्या उपासनेविषयी त्याला आवेश असल्याचे दाखवले. त्याने मंदिराची शुद्धी करण्यासाठी याजकांना व लेव्यांना नेमले. त्यांनी १६ दिवसांत हे कार्य पूर्ण केले. (२ इतिहास २९:१६-१८ वाचा.) आज आपल्या राज्य सभागृहांना सुस्थितीत ठेवण्यासाठी व त्यांची डागडुजी करण्यासाठीही अशाच प्रकारे मेहनत घेतली जाते. आणि यामुळे आपण यहोवाची आवेशाने उपासना करतो हे दिसून येते. अशा कार्यांत सहभाग घेणाऱ्‍या बंधुभगिनींचा आवेश पाहून लोक कशा प्रकारे प्रभावित झाले, याविषयीचे अनुभव तुम्ही नक्कीच ऐकले असतील. खरोखर त्यांच्या परिश्रमामुळे यहोवाचा गौरव होतो.

१४, १५. आज कोणत्या कार्यामुळे यहोवाचा मोठ्या प्रमाणात गौरव होत आहे? उदाहरणे द्या.

१४ इंग्लंडच्या उत्तरेकडे असलेल्या एका शहरात बांधवांनी एका राज्य सभागृहाचे नविनीकरण करायचे ठरवले. पण शेजारचा प्लॉट ज्या मनुष्याचा होता त्याने या कार्याला विरोध केला. बांधवांनी अतिशय समंजसपणे ही समस्या हाताळली. राज्य सभागृहाच्या व त्या मनुष्याच्या प्लॉटच्या मधल्या भिंतीची दुरुस्ती करण्याची गरज आहे हे पाहून त्यांनी हे काम विनामूल्य करून देण्याची तयारी दाखवली. त्यांनी अतिशय मेहनत घेऊन जवळजवळ पूर्णच भिंत पुन्हा बांधली. बांधवांनी परिस्थिती इतक्या चांगल्या प्रकारे हाताळली की शेजारच्या त्या माणसाचा हृदयपालट झाला. आता तो राज्य सभागृहावर लक्ष ठेवण्याद्वारे बांधवांना मदत करतो.

१५ यहोवाचे लोक आज सबंध जगभरात मोठ्या प्रमाणात बांधकामाचे कार्य करत आहेत. निरनिराळ्या मंडळ्यांतील बांधव पूर्ण-वेळ कार्य करणाऱ्‍या आंतरराष्ट्रीय बांधकाम सेवकांसोबत मिळून राज्य सभागृहांच्याच नव्हे तर संमेलन गृहांच्या व बेथेल गृहांच्या बांधकामातही सहभाग घेतात. सॅम हा हीटिंग, व्हेंटिलेशन व एअर-कंडिशनिंगच्या कामाचे कौशल्य असलेला इंजिनियर आहे. तो व त्याची पत्नी रूथ यांनी युरोप व आफ्रिकेतील कितीतरी देशांत जाऊन बांधकाम प्रकल्पांत साहाय्य केले आहे. ते जेथे कोठे जातात, तेथील मंडळ्यांसोबत प्रचार कार्यातही आनंदाने सहभाग घेतात. अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांत सहभागी होण्याची प्रेरणा कशी काय मिळाली, याविषयी सांगताना सॅम म्हणतो: “निरनिराळ्या देशांतील बेथेल गृहांत सेवा केलेल्या बांधवांच्या प्रोत्साहनामुळेच मला या कार्यात सहभाग घ्यावासा वाटला. त्यांचा आवेश व आनंद पाहून आपणही या मार्गानं सेवा करावी असं मला वाटलं.”

देवाच्या सूचनांचे पालन करा

१६, १७. देवाच्या लोकांनी कोणत्या खास कार्यात आवेशाने सहभाग घेतला आहे आणि याचा काय परिणाम झाला आहे?

१६ मंदिराची डागडुजी करण्यासोबतच हिज्कीयाने दरवर्षी यहोवाच्या आज्ञेनुसार वल्हांडणाचा सण पाळण्याची प्रथाही पुन्हा सुरू केली. (२ इतिहास ३०:१, ४, ५ वाचा.) हिज्कीया व जेरूसलेमच्या रहिवाशांनी संपूर्ण राष्ट्रातील लोकांना याकरता आमंत्रित केले. यांत उत्तरेकडील राज्यात राहणाऱ्‍या लोकांचाही समावेश होता. आमंत्रणाची पत्रे घेऊन जासुदांना सबंध देशात पाठवण्यात आले.—२ इति. ३०:६-९.

१७ अलीकडील काही वर्षांत आपणही काहीशा अशाच प्रकारच्या एका कार्यात सहभाग घेतला आहे. आकर्षक निमंत्रण पत्रिकांचा वापर करून आपण आपल्या क्षेत्रातील लोकांना येशूच्या आज्ञेनुसार प्रभूच्या सांज भोजनाचा विधी साजरा करण्यासाठी आपल्यासोबत सहभागी होण्यास आमंत्रित केले आहे. (लूक २२:१९, २०) सेवा सभांमध्ये मिळालेल्या सूचनांचे पालन करून आपण या कार्यात आवेशाने सहभाग घेतला. आणि आपल्या या प्रयत्नांवर यहोवाने भरभरून आशीर्वाद दिला! मागच्या वर्षी, आपण सर्वांनी म्हणजे जवळजवळ सत्तर लाख जणांनी मिळून या निमंत्रण पत्रिकांचे वाटप केले आणि परिणामस्वरूप एकूण १,७७,९०,६३१ लोक प्रभूच्या सांज भोजनाला उपस्थित राहिले!

१८. खऱ्‍या उपासनेविषयी आवेश असणे तुम्हाला का महत्त्वाचे वाटते?

१८ हिज्कीयाबद्दल असे म्हणण्यात आले: “इस्राएलाचा देव परमेश्‍वर याजवर त्याचा भाव असे; त्याच्यामागून यहूदाच्या सर्व राजांमध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्यापूर्वीहि झाला नाही. तो परमेश्‍वराला धरून राहिला; त्याला अनुसरण्याचे त्याने सोडिले नाही; परमेश्‍वराने मोशेला ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळिल्या.” (२ राजे १८:५, ६) हिज्कीयाच्या उदाहरणाचे आपणही पालन करू या. देवाच्या मंदिराविषयी असलेला आपला आवेश आपल्याला सार्वकालिक जीवनाची आशा डोळ्यांपुढे ठेवून नेहमी ‘यहोवाला धरून राहण्यास’ मदत करेल.—अनु. ३०:१६.

मार्गदर्शनाला तत्परतेने प्रतिसाद द्या

१९. स्मारक विधीच्या प्रसंगी कशा प्रकारे आवेशाने तयारी केली जाते?

१९ योशीयानेही आपल्या राज्यात वल्हांडण सण साजरा करण्याची व्यवस्था केली आणि त्याकरता बरीच तयारी देखील त्याने केली. (२ राजे २३:२१-२३; २ इति. ३५:१-१९) आपणही प्रांतीय अधिवेशने, विभागीय संमेलने, खास संमेलन दिन तसेच स्मारक विधी यांसाठी चांगल्या प्रकारे तयारी करण्याची काळजी घेतो. काही देशांतील बांधव तर ख्रिस्ताच्या स्मारक विधीसाठी एकत्र येण्याकरता आपला जीवही धोक्यात घालतात. आवेशी वडील या प्रसंगी मंडळीतील कोणाकडेही दुर्लक्ष होणार नाही याची खास काळजी घेतात. वयस्क व दुर्बळ असलेल्यांना उपस्थित राहण्याकरता साहाय्य दिले जाते.

२०. (क) योशीया राजाच्या कारकिर्दीत काय घडले आणि यावर त्याची काय प्रतिक्रिया होती? (ख) आपण यातून काय शिकू शकतो?

२० योशीया राजाने देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचे कार्य सुरू केल्यावर, मुख्य याजक हिल्कीयाला ‘मोशेच्या द्वारे दिलेल्या परमेश्‍वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला.’ त्याने तो ग्रंथ राजाचा चिटणीस शाफान याला दिला आणि शाफानाने तो राजा योशीयाला वाचून दाखवला. (२ इतिहास ३४:११-२१ वाचा.) याचा काय परिणाम झाला? राजाने तो ऐकताच दुःखित होऊन आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या सेवकांना यहोवाकडून मार्गदर्शन मिळवण्याची आज्ञा दिली. संदेष्ट्री हुल्दा हिने देवाकडून आलेला संदेश सांगितला. यात यहूदात चालत असलेल्या खोट्या उपासनेची निंदा करण्यात आली होती. पण या मूर्तिपूजक प्रथा बंद करण्यासाठी योशीयाने केलेल्या प्रयत्नांची मात्र यहोवाने दखल घेतली. त्यामुळे, सबंध राष्ट्रावर जरी संकटे येतील असे भाकीत करण्यात आले तरी योशीयावर मात्र यहोवाची कृपा राहणार होती. (२ इतिहास ३४:१९-२८) यावरून आपण काय शिकू शकतो? नक्कीच आपणही योशीयासारखीच इच्छा बाळगली पाहिजे आणि यहोवाच्या मार्गदर्शनाचे तत्परतेने पालन केले पाहिजे. तसेच, धर्मत्याग व अविश्‍वासूपणा यांसारख्या गोष्टींना आपण आपल्या उपासनेच्या मार्गात येऊ दिल्यास कोणते दुष्परिणाम घडू शकतात हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. योशीयाप्रमाणेच आपल्यालाही खऱ्‍या उपासनेविषयी जो आवेश आहे त्याची यहोवा नक्कीच दखल घेईल आणि आपल्याला आशीर्वाद देईल याची आपण खातरी बाळगू शकतो.

२१, २२. (क) आपण यहोवाच्या मंदिराविषयी आवेशी का असले पाहिजे? (ख) पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?

२१ देवाच्या मंदिराविषयी व उपासनेविषयी आवेशी असण्याच्या बाबतीत आसा, यहोशाफाट, हिज्कीया आणि योशीया या चार यहूदी राजांचे उदाहरण अनुकरणीय आहे. आपल्याठायी असलेल्या आवेशाने आपल्यालाही त्यांच्याप्रमाणेच यहोवावर पूर्ण भरवसा ठेवण्यास व त्याच्या उपासनेसाठी आपल्याकडून होता होईल तितके करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करणे आणि ख्रिस्ती मंडळीद्वारे व त्यांतील वडिलांद्वारे मिळणाऱ्‍या प्रेमळ साहाय्याला व सुधारणुकीला प्रतिसाद देणे हे खरोखरच सुज्ञपणाचे आहे. आणि असे केल्यामुळे आपण खऱ्‍या अर्थाने आनंदी होऊ शकतो.

२२ पुढील लेखात आपण खासकरून क्षेत्र सेवाकार्यात आवेशी असण्याबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच, हा लेख तरुणांना आपल्या प्रेमळ पित्याची आवेशाने सेवा करण्याचे प्रोत्साहन देईल. यासोबतच, आपल्याला खऱ्‍या उपासनेपासून परावृत्त करण्यासाठी सैतान जो सर्वात प्रभावी मार्ग उपयोगात आणतो त्यापासून आपल्याला कशा प्रकारे दूर राहता येईल हेही आपण पाहणार आहोत. यहोवाकडून मिळणाऱ्‍या या सर्व सूचनांचे आपण उत्सुकतेने पालन केल्यास आपण खुद्द यहोवाच्या पुत्राचे, अर्थात येशूचे अनुकरण करत असू, ज्याच्याविषयी असे म्हणण्यात आले: “तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकिले आहे.”—स्तो. ६९:९; ११९:१११, १२९; १ पेत्र २:२१.

तुम्हाला आठवते का?

• यहोवा कशा प्रकारच्या सेवेवर आशीर्वाद देतो आणि का?

• आपण यहोवावर भरवसा असल्याचे कशा प्रकारे दाखवू शकतो?

• आपला आवेश आपल्याला देवाच्या सूचनांचे पालन करण्यास कशा प्रकारे प्रवृत्त करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्रे]

आसा, यहोशाफाट, हिज्कीया व योशीया यांनी यहोवाच्या मंदिराविषयी कशा प्रकारे आवेश दाखवला?