व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विश्‍वासू कारभारी व त्याचे प्रतिनिधित्व करणारे नियमन मंडळ

विश्‍वासू कारभारी व त्याचे प्रतिनिधित्व करणारे नियमन मंडळ

विश्‍वासू कारभारी व त्याचे प्रतिनिधित्व करणारे नियमन मंडळ

“आपल्या परिवाराला [“सेवक वर्गाला,” NW] योग्य वेळी शिधासामुग्री द्यावयास धनी ज्याला नेमील असा विश्‍वासू व विचारशील कारभारी कोण?”—लूक १२:४२.

१, २. शेवटल्या दिवसांबद्दल संयुक्‍त चिन्ह देताना येशूने कोणता महत्त्वपूर्ण प्रश्‍न विचारला होता?

शेवटल्या दिवसांविषयीचे संयुक्‍त चिन्ह देताना, येशूने असा प्रश्‍न विचारला: “ज्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला [“नोकर-चाकरांना,” NW] यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमिले आहे असा कोण?” त्यानंतर येशूने म्हटले की, या दासाला त्याच्या विश्‍वासूपणाचे प्रतिफळ म्हणून धन्याच्या सर्वस्वावर नेमले जाईल.—मत्त. २४:४५-४७.

याआधीही काही महिन्यांपूर्वी येशूने असाच एक प्रश्‍न विचारला होता. (लूक १२:४२-४४) यावेळी त्याने दासाला “कारभारी” आणि “नोकर-चाकरांना” ‘सेवक वर्ग’ असे म्हटले होते. कारभारी हा घरची व्यवस्था पाहतो किंवा एक प्रबंधक म्हणून घरातील सेवकांवर त्याला नेमलेले असते. असे असले तरी, कारभारी स्वतः देखील एक सेवक असतो. तर मग, हा कारभारी किंवा दास कोण आहे आणि तो कशा प्रकारे “यथाकाळी खावयास” देतो? आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी ज्या माध्यमाचा वापर करण्यात येत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना माहीत असणे अत्यंत आवश्‍यक आहे.

३. (क) ‘दासाविषयी’ येशूने जे म्हटले त्याबद्दल ख्रिस्ती धर्मजगतातील भाष्यकारांचे काय म्हणणे आहे? (ख) “कारभारी” किंवा “दास” कोण आहे आणि ‘सेवक वर्ग’ किंवा ‘नोकर-चाकर’ कोण आहेत?

येशूचे हे शब्द, ख्रिस्ती असण्याचा दावा करणाऱ्‍यांमध्ये जबाबदारीचे पद सांभाळणाऱ्‍या लोकांना सूचित करतात असे ख्रिस्ती धर्मजगतातील भाष्यकारांचे म्हणणे आहे. पण, असंख्य दासांचा एक मोठा समूह असेल व ते ख्रिस्ती धर्मजगतातील निरनिराळ्या पंथांमध्ये विखुरलेले असतील असे दृष्टांतातील ‘धन्याने’ अर्थात येशूने म्हटले नव्हते. याउलट, धनी ज्याला आपल्या सर्वस्वावर नेमील असा एकच “कारभारी” किंवा “दास” असेल असे त्याने स्पष्टपणे सांगितले होते. म्हणून, या नियतकालिकात अनेकदा सांगण्यात आल्याप्रमाणे कारभारी हा एक संयुक्‍त गट किंवा समूह या नात्याने अभिषिक्‍त शिष्यांच्या ‘लहान कळपाचे’ प्रतिनिधित्व करणारा असला पाहिजे. लूकच्या शुभवर्तमानात येशूने नुकताच यांचा उल्लेख केला होता. (लूक १२:३२) ‘सेवक वर्ग’ किंवा ‘नोकर-चाकर’ या संज्ञा याच समूहाला लागू होत असल्या, तरी यांतून समूहातील प्रत्येकाची वैयक्‍तिक भूमिका सूचित होते. तेव्हा, एक महत्त्वाचा प्रश्‍न उभा राहतो. तो म्हणजे, या दास वर्गातील प्रत्येक सदस्य यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याच्या कार्यात भाग घेतो का? शास्त्रवचनांत याबद्दल जे सांगितले आहे त्याचे काळजीपूर्वक परीक्षण केल्यास आपल्याला या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल.

प्राचीन काळातील यहोवाचा सेवक

४. प्राचीन इस्राएल राष्ट्राचा यहोवाने कशा प्रकारे उल्लेख केला आणि त्या राष्ट्राबद्दल लक्ष देण्याजोगी एक महत्त्वपूर्ण गोष्ट कोणती आहे?

यहोवाने आपल्या लोकांना, म्हणजे प्राचीन इस्राएल राष्ट्राला सामूहिक रीत्या एक सेवक म्हटले होते. “परमेश्‍वराचे असे म्हणणे आहे की, . . . तुम्ही [अनेकवचन] माझे साक्षी आहा, तू [एकवचन] माझा निवडलेला सेवक आहेस.” (यश. ४३:१०) या एका सेवक वर्गात इस्राएल राष्ट्रातील सर्व सदस्य समाविष्ट होते. तरीसुद्धा, लक्ष देण्याजोगी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केवळ याजकांना व गैरयाजकीय लेव्यांनाच राष्ट्राला शिकवण्याची जबाबदारी मिळाली होती.—२ इति. ३५:३; मला. २:७.

५. येशूने सांगितल्याप्रमाणे कोणता मोठा बदल होणार होता?

तर मग, येशूने इस्राएल राष्ट्रालाच दास म्हटले होते का? नाही. येशूने त्याच्या दिवसांतील यहुद्यांना जे म्हटले त्यावरून आपल्याला हे समजते. त्याने म्हटले: “देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.” (मत्त. २१:४३) म्हणजेच, एक मोठा बदल होणार होता हे स्पष्टच आहे. यहोवा एका नवीन राष्ट्राचा उपयोग करणार होता. पण, आध्यात्मिक शिक्षण देण्याच्या पद्धतीत मात्र बदल होणार नव्हता. प्राचीन इस्राएलातील देवाचा “सेवक” ज्या पद्धतीने आध्यात्मिक शिक्षण द्यायचा त्याच पद्धतीने येशूच्या दृष्टांतातील दासही आज हे शिक्षण देतो.

विश्‍वासू दास अस्तित्वात येतो

६. सा.यु. ३३ मध्ये पेन्टेकॉस्टच्या दिवशी कोणत्या राष्ट्राचा जन्म झाला आणि त्या राष्ट्राचा भाग कोण बनले?

नवीन राष्ट्र अर्थात ‘देवाचे इस्राएल’ हे आध्यात्मिक इस्राएलांचे मिळून बनलेले आहे. (गलती. ६:१६; रोम. २:२८, २९; ९:६) सा.यु. ३३ मध्ये पेन्टेकॉस्टच्या दिवशी देवाचा पवित्र आत्मा ओतण्यात आला तेव्हा या राष्ट्राचा जन्म झाला. त्यानंतर, आत्म्याने अभिषिक्‍त झालेले सर्व ख्रिस्ती या राष्ट्राचा भाग बनले. हेच राष्ट्र धन्याने म्हणजेच येशू ख्रिस्ताने नेमलेला दास वर्ग म्हणून सेवा करू लागले. या राष्ट्रातील प्रत्येक सदस्यावर सुवार्तेचा प्रचार करण्याची व शिष्य बनवण्याची कामगिरी सोपवण्यात आली होती. (मत्त. २८:१९, २०) पण, या गटातील प्रत्येक सदस्य, यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याच्या कार्यात भाग घेणार होता का? याबद्दल शास्त्रवचनांत काय सांगितले आहे ते आपण पाहू या.

७. सुरुवातीला प्रेषितांचे प्रमुख कार्य काय होते आणि नंतर या कार्यात आणखी कशाची भर पडली?

येशूने आपल्या १२ प्रेषितांची नेमणूक केली व त्यांना सुवार्तेचा प्रचार करण्यास पाठवले. हे त्यांचे प्रमुख कार्य होते. (मार्क ३:१३-१५ वाचा.) ही नेमणूक, अपोस्टोलोस या ग्रीक शब्दाच्या मूळ अर्थाच्या सामंजस्यात होती. हा शब्द एका क्रियापदापासून घेण्यात आला आहे ज्याचा अर्थ “पाठवणे” असा होतो. पण, पुढे काही काळानंतर, जेव्हा ख्रिस्ती मंडळीची स्थापना होणार होती तेव्हा प्रेषितांच्या जबाबदारीचा विस्तार होऊन त्यात ‘देखरेखीच्या अधिकाराची’ भर पडली.—प्रे. कृत्ये १:२०-२६, पं.र.भा.

८, ९. (क) बारा प्रेषितांनी प्रामुख्याने कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व दिले होते? (ख) नियमन मंडळाने मान्यता दिल्यानुसार आणखी कोणावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या सोपवण्यात आल्या होत्या?

सुरुवातीच्या १२ प्रेषितांनी प्रामुख्याने कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व दिले होते? याचे उत्तर, पेन्टेकॉस्टच्या दिवसानंतर घडलेल्या घटनांवरून आपल्याला मिळू शकते. विधवांसाठी होणाऱ्‍या रोजच्या अन्‍न वाटपासंबंधी वाद निर्माण झाला तेव्हा १२ प्रेषितांनी शिष्यांना एकत्र बोलावून असे म्हटले: “आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्‍तिसेवा करावी हे ठीक नाही.” (प्रेषितांची कृत्ये ६:१-६ वाचा.) प्रेषितांना “वचनाच्या सेवेत” तत्पर राहता यावे म्हणून अन्‍न वाटपाच्या या आवश्‍यक “कामावर” नंतर त्यांनी आध्यात्मिक रीत्या पात्र असलेल्या इतर बांधवांची नियुक्‍ती केली. या व्यवस्थेमुळे “देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली.” अशा रीतीने यहोवाने त्यांना आशीर्वादित केले. (प्रे. कृत्ये ६:७) त्याअर्थी, आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याची मुख्य जबाबदारी प्रेषितांवरच होती.—प्रे. कृत्ये २:४२.

कालांतराने इतरांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या सोपवण्यात आल्या. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार, पौल व बर्णबा यांना अंत्युखिया मंडळीद्वारे मिशनरी म्हणून पाठवण्यात आले. पौल व बर्णबा हे सुरुवातीच्या १२ प्रेषितांपैकी नसले, तरी त्यांना देखील प्रेषित म्हणण्यात आले. (प्रे. कृत्ये १३:१-३; १४:१४; गलती. १:१९) त्यांच्या या नेमणुकीला नंतर जेरूसलेममधील नियमन मंडळाने मान्यता दिली. (गलती. २:७-१०) त्यानंतर काही काळाने, आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याच्या कार्यात पौलानेही भाग घेतला. त्याने आपले पहिले ईश्‍वरप्रेरित पत्र लिहिले.

१०. पहिल्या शतकात, आध्यात्मिक अन्‍न तयार करण्याच्या कार्यात आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या सर्वच ख्रिश्‍चनांनी भाग घेतला होता का? स्पष्ट करा.

१० तर मग, प्रचार कार्याची देखरेख करण्याच्या व आध्यात्मिक अन्‍न तयार करण्याच्या कार्यात आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या सर्वच ख्रिश्‍चनांचा समावेश होता का? नाही. प्रेषित पौलाने असे म्हटले: “सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्‌भुत कृत्ये करणारे आहेत काय?” (१ करिंथ. १२:२९) आत्म्याने अभिषिक्‍त असलेले सर्वच ख्रिस्ती प्रचार कार्य करण्यात गोवले होते, तरी मोजक्याच लोकांचा—केवळ आठ पुरुषांचा ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने लिहिण्यासाठी उपयोग करण्यात आला होता.

आधुनिक काळातील विश्‍वासू दास

११. दासाला ज्या “सर्वस्वावर” नेमण्यात आले आहे ते काय आहे?

११ शेवटच्या काळातही एक विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्ग पृथ्वीवर अस्तित्वात असेल हे मत्तय २४:४५ मध्ये असलेल्या येशूच्या शब्दांवरून स्पष्टपणे दिसते. प्रकटीकरण १२:१७ मध्ये यांचा उल्लेख स्त्रीच्या संतानापैकी “बाकीचे” लोक असा करण्यात आला आहे. एक समूह या नात्याने, या शेषजनांना पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या सर्वस्वावर नेमण्यात आले आहे. विश्‍वासू कारभाऱ्‍याला ज्या “सर्वस्वावर” नेमण्यात आले आहे ते म्हणजे पृथ्वीवर धन्याच्या राज्याशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी. यामध्ये, राज्याच्या पृथ्वीवरील प्रजेचा, तसेच सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या सर्व साधनसंपत्तीचा समावेश होतो.

१२, १३. एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला स्वर्गीय जीवनासाठी पाचारण करण्यात आले आहे हे तिला कसे समजते?

१२ एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला स्वर्गीय जीवनाची आशा आहे आणि ती आध्यात्मिक इस्राएलाच्या शेषजनांपैकी एक आहे हे तिला कसे समजते? याचे उत्तर प्रेषित पौलाच्या शब्दांतून मिळते जे त्याने त्याच्यासारखीच स्वर्गीय जीवनाची आशा असलेल्यांना लिहिले होते. त्याने लिहिले: “जितक्यांना देवाचा आत्मा चालवीत आहे तितके देवाचे पुत्र आहेत; कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण अब्बा, बापा, अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो; आणि जर मुले तर वारीसहि आहो; म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहो; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगित असलो तरच.”—रोम. ८:१४-१७.

१३ सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, या सर्वांना देवाच्या आत्म्याद्वारे अभिषिक्‍त करण्यात येते. आणि त्यांना स्वर्गीय जीवनासाठी ‘पाचारण’ करण्यात येते किंवा आमंत्रण देण्यात येते. (इब्री ३:१) हे आमंत्रण स्वतः देव त्यांना देतो. आणि ते लोकही मनात कोणतीही शंका वा भीती न बाळगता देवाचे पुत्र होण्याच्या या आमंत्रणाला लगेच प्रतिसाद देऊन त्याचा स्वीकार करतात. (१ योहान २:२०, २१ वाचा.) त्याअर्थी, ते स्वतःहून या आशेची निवड करत नाहीत, तर यहोवा त्यांच्यावर शिक्कामोर्तब करतो किंवा त्याचा पवित्र आत्मा त्यांना देतो.—२ करिंथ. १:२१, २२; १ पेत्र १:३, ४.

योग्य दृष्टिकोन

१४. स्वर्गीय जीवनाच्या आमंत्रणाबद्दल अभिषिक्‍त जन कोणता दृष्टिकोन बाळगतात?

१४ स्वर्गीय जीवनाची आशा पूर्ण होण्याची वाट पाहत असताना अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी स्वतःबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे? त्यांना स्वर्गीय जीवनाचे अद्‌भुत आमंत्रण मिळाले असले, तरी ते केवळ एक आमंत्रणच आहे हे त्यांना माहीत आहे. हे अद्‌भुत बक्षीस प्राप्त करण्यासाठी त्यांना मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहणे आवश्‍यक आहे. म्हणून, ते प्रेषित पौलासारखीच नम्र मनोवृत्ती दाखवतात. त्याने म्हटले होते: “बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्‍यात घेतले असे मानीत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम.” (फिलिप्पै. ३:१३, १४) म्हणून, अभिषिक्‍त शेषजनांनी “भीत व कापत” ‘त्यांना झालेल्या पाचारणास शोभेल असे पूर्ण नम्रतेने चालण्यासाठी’ कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.—इफिस. ४:१, २; फिलिप्पै. २:१२; १ थेस्सलनी. २:१२.

१५. स्मारक विधीच्या वेळी बोधचिन्हे सेवन करणाऱ्‍यांबद्दल ख्रिश्‍चनांनी कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि अभिषिक्‍त ख्रिश्‍चन स्वतःबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगतात?

१५ दुसरीकडे पाहता, आत्म्याने अभिषिक्‍त झाल्याचा दावा करणाऱ्‍या व स्मारक विधीच्या वेळी बोधचिन्हे सेवन करणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल इतर ख्रिश्‍चनांनी कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे? त्याबद्दल कोणीही त्या व्यक्‍तीचा न्याय करू नये. ही गोष्ट सर्वस्वी तिच्या व यहोवाच्या मधली आहे. (रोम. १४:१२) पण, ज्या ख्रिश्‍चनांचा खरोखर आत्म्याने अभिषेक करण्यात आला आहे ते स्वतःकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत नाहीत. आपण अभिषिक्‍त आहोत याचा अर्थ आपल्याला इतरांपेक्षा, अगदी ‘मोठ्या लोकसमुदायातील’ काही अनुभवी सदस्यांपेक्षाही जास्त आध्यात्मिक समज प्राप्त होते असे ते मानत नाहीत. (प्रकटी. ७:९) “दुसरी मेंढरे” असलेल्या आपल्या साथीदारांपेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला पवित्र आत्मा मिळतो असेही ते मानत नाहीत. (योहा. १०:१६) आपल्याला खास वागणूक मिळावी अशी ते अपेक्षा करत नाहीत किंवा आपण बोधचिन्हे सेवन करतो त्यामुळे मंडळीतील नियुक्‍त वडिलांपेक्षाही आपण वरचढ आहोत असाही दावा ते करत नाहीत.

१६-१८. (क) नवीन आध्यात्मिक समज देण्याच्या कार्यात सर्वच अभिषिक्‍त जणांचा समावेश आहे का? उदाहरण द्या. (ख) नियमन मंडळाला, अभिषिक्‍त ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या प्रत्येकाचा सल्ला घेण्याची आवश्‍यकता नसते असे का म्हणता येईल?

१६ जगभरात असलेले हे सर्व अभिषिक्‍त ख्रिस्ती, बायबलमधून मिळणाऱ्‍या नवीन आध्यात्मिक माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात राहणाऱ्‍या एका विश्‍वव्यापी समूहाचा भाग आहेत असे म्हणता येईल का? नाही. एक संयुक्‍त गट या नात्याने दास वर्गावर, ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त अनुयायांच्या परिवाराला आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याची जबाबदारी असली, तरी दास वर्गातील सर्वच सदस्यांना एकसारखीच जबाबदारी किंवा कार्याची नेमणूक मिळालेली नाही. (१ करिंथकर १२:१४-१८ वाचा.) आपण याआधी पाहिल्याप्रमाणे, पहिल्या शतकात सर्वच जण प्रचार करण्याच्या महत्त्वाच्या कार्यात सामील होते. पण, केवळ काही मोजक्याच लोकांना बायबलमधील पुस्तके लिहिण्याची आणि ख्रिस्ती मंडळीची देखरेख करण्याची जबाबदारी मिळाली होती.

१७ उदाहरणार्थ, न्यायिक विषय हाताळण्यासाठी ‘मंडळी’ विशिष्ट कारवाई करते असे बायबलमध्ये काही वेळा म्हटले आहे. (मत्त. १८:१७) पण वास्तवात मात्र, मंडळीतील वडीलजन मंडळीचे प्रतिनिधी या नात्याने ही कारवाई करत असतात. हे वडीलजन मंडळीतील सर्व सदस्यांशी बोलून, त्यांची मते विचारात घेऊन एखादा निर्णय घेत नाहीत. तर ते ईश्‍वरशासित व्यवस्थेनुसार आपआपली जबाबदारी पार पाडतात आणि संपूर्ण मंडळीच्या वतीने कार्य करतात.

१८ अशाच प्रकारे, आज अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपैकी केवळ काही मोजक्याच लोकांवर दास वर्गाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आहे. याच लोकांचे मिळून यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ बनले आहे. आत्म्याने अभिषिक्‍त असलेले हे पुरुष राज्याशी संबंधित असलेल्या कार्याची व आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याच्या कार्याची देखरेख करतात. पण, पहिल्या शतकात होते त्याप्रमाणेच, एखादा निर्णय घेण्याअगोदर नियमन मंडळ, दास वर्गातील प्रत्येक सदस्याचा सल्ला घेत नाही. (प्रेषितांची कृत्ये १६:४, ५ वाचा.) असे असले तरीही, सध्या चालू असलेल्या कापणीच्या महत्त्वपूर्ण कार्यात सर्वच अभिषिक्‍त साक्षीदार उत्साहाने सहभाग घेतात. एक वर्ग या नात्याने, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ एका शरीरासमान आहे, पण त्या वर्गातील प्रत्येक सदस्याची जबाबदारी वेगवेगळी आहे.—१ करिंथ. १२:१९-२६.

१९, २०. “विश्‍वासू व बुद्धिमान दास” व त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्‍या नियमन मंडळाबद्दल मोठा लोकसमुदाय कोणता संतुलित दृष्टिकोन बाळगतो?

१९ वर उल्लेख केलेल्या या सर्व गोष्टींचा, उत्तरोत्तर वाढत चाललेल्या व पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा असलेल्या मोठ्या समुदायातील लोकांवर कोणता प्रभाव पडला पाहिजे? मोठ्या लोकसमुदायातील लोक हे राजाच्या सर्वस्वाचा भाग असल्यामुळे, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाचे’ प्रतिनिधित्व करणाऱ्‍या नियमन मंडळाने केलेल्या व्यवस्थेला आनंदाने व पूर्णपणे सहकार्य करतात. नियमन मंडळाच्या मार्गदर्शनात तयार होणाऱ्‍या आध्यात्मिक अन्‍नाची मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य मनापासून कदर करतात. त्यांना दास वर्गाबद्दल आदर असला, तरीही दास वर्गातील सदस्य असण्याचा दावा करणाऱ्‍या व्यक्‍तींना इतरांपेक्षा श्रेष्ठ न समजण्याची ते काळजी घेतात. ज्या ख्रिस्ती व्यक्‍तीचा खरोखरच देवाच्या आत्म्याने अभिषेक झाला आहे ती केव्हाही अशा प्रकारच्या खास वागणुकीची इच्छा किंवा अपेक्षा बाळगणार नाही.—प्रे. कृत्ये १०:२५, २६; १४:१४, १५.

२० ‘नोकर-चाकर’ या नात्याने आपण अभिषिक्‍त शेषजनांचा भाग असो अथवा मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य असो, विश्‍वासू कारभाऱ्‍याला व त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्‍या नियमन मंडळाला पूर्णपणे सहकार्य करण्याचा आपण दृढनिश्‍चय करू या. आपण सर्व जण ‘जागृत राहू’ या आणि शेवटपर्यंत विश्‍वासात टिकून राहू या.—मत्त. २४:१३, ४२.

तुम्हाला आठवते का?

• ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ कोण आहे आणि नोकर-चाकर कोण आहेत?

• स्वर्गीय जीवनासाठी आमंत्रण मिळाले आहे हे एका व्यक्‍तीला कसे समजते?

• नवीन आध्यात्मिक अन्‍न तयार करण्याची प्रमुख जबाबदारी कोणाची आहे?

• अभिषिक्‍त व्यक्‍तीने स्वतःबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

आज, नियमन मंडळ विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्गाचे प्रतिनिधित्व करते. पहिल्या शतकात देखील अशीच व्यवस्था होती