व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी यहोवाची कशी उतराई होऊ?

मी यहोवाची कशी उतराई होऊ?

मी यहोवाची कशी उतराई होऊ?

रूथ डॉने यांच्याद्वारे कथित

१९३३ हे वर्ष संकटांचं वर्ष होतं असं आई गमतीनं म्हणायची: त्यावर्षी हिटलर सत्तेवर आला होता, पोपनं त्या वर्षाला पवित्र वर्ष म्हणून घोषित केलं होतं, आणि माझा जन्मही त्याच वर्षी झाला होता!

माझे आईबाबा जर्मनीच्या सीमेजवळ, फ्रान्सच्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या लॉरेन प्रांतातील युएट्‌स या गावात राहायचे. माझी आई कर्मठ कॅथलिक होती तर बाबा प्रोटेस्टंट होते. त्यांचं लग्न १९२१ मध्ये झालं होतं. माझी थोरली बहीण हेलन हिचा जन्म १९२२ मध्ये झाला तेव्हा आईबाबांनी कॅथलिक चर्चमध्ये तिला बाप्तिस्मा दिला.

१९२५ मध्ये एके दिवशी बाबांना द हार्प ऑफ गॉड या पुस्तकाची जर्मन भाषेतील एक प्रत मिळाली. ते पुस्तक वाचल्यावर हेच सत्य आहे याची त्यांना खातरी पटली. त्यांनी पुस्तकाच्या प्रकाशकांना पत्र लिहिलं आणि अशा रीतीने ते बीबलफॉर्शरांच्या संपर्कात आले. त्यावेळी जर्मनीत यहोवाच्या साक्षीदारांना या नावानं ओळखलं जायचं. बाबांनी लगेचच शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगायला सुरुवात केली. आईला हे अजिबात आवडलं नाही. ती बाबांना म्हणाली, “तुम्हाला वाट्टेल ते करा, पण त्या बीबलफॉर्शर लोकांची संगत धरू नका!” पण बाबांचा निर्णय पक्का होता त्यामुळे १९२७ मध्ये त्यांनी बाप्तिस्मा घेतला व ते साक्षीदारांपैकी एक बनले.

यामुळे, माझ्या आजीनं, बाबांपासून घटस्फोट घेण्याचा आईमागे तगादा लावला. एके दिवशी पाळकानं चर्चमधील सर्व लोकांना “डॉने नावाच्या त्या खोट्या संदेष्ट्यापासून दूरच राहा” असं बजावून सांगितलं. चर्चमधून परतल्यावर आजीनं वरच्या मजल्यावरून बाबांना कुंडी फेकून मारली. ती वजनदार कुंडी त्यांच्या डोक्याला न लागता खांद्याला लागली, त्यामुळे ते थोडक्यात वाचले. या घटनेमुळे आई विचार करू लागली, ‘ज्या धर्मामुळे लोक एखाद्याचा जीवही घ्यायला कमी करत नाहीत तो धर्म खरंच चांगला असू शकतो का?’ त्यानंतर, ती यहोवाच्या साक्षीदारांची प्रकाशनं वाचू लागली. लवकरच तिला खातरी पटली की तिला सत्य सापडलं आहे व तिनं १९२९ मध्ये बाप्तिस्मा घेतला.

माझ्या आईबाबांनी आम्हा दोघा बहिणींना यहोवा एक खरी व्यक्‍ती आहे हे समजवण्यासाठी खूप मेहनत घेतली. ते आम्हाला बायबलच्या गोष्टी वाचून दाखवायचे आणि मग त्या गोष्टीतली एखादी व्यक्‍ती अशी का वागली असा प्रश्‍न विचारायचे. त्या काळात बाबांनी कधीही रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या शिफ्टमध्ये काम केलं नाही. त्यांच्या या निर्णयामुळे आमच्या कुटुंबाचं बरंच आर्थिक नुकसान झालं, तरी हे नुकसान सोसायला ते तयार होते. कारण, ख्रिस्ती सभेसाठी, सेवाकार्यासाठी, व आम्हा मुलांसोबत अभ्यास करण्यासाठी ते वेळ देऊ इच्छित होते.

संकटाचं सावट

माझे आईबाबा प्रवासी पर्यवेक्षकांना तसेच स्वित्झर्लंड व फ्रान्स येथील बेथेलमध्ये असणाऱ्‍या बांधवांना नेहमी घरी बोलवायचे. हे बांधव आम्हाला सांगायचे की आमच्या घरापासून फक्‍त काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्‍या जर्मनीत आपले बांधव कशा प्रकारे समस्यांना तोंड देत आहेत. त्यावेळी नात्झी सरकार यहोवाच्या साक्षीदारांना यातना शिबिरांत पाठवत होते व कितीतरी मुलांना आपल्या साक्षीदार आईवडिलांपासून वेगळे करत होते.

आईबाबांनी मला व हेलनला पुढे येणाऱ्‍या संकटांसाठी तयार केलं होतं. आम्हाला योग्यवेळी मार्गदर्शन देतील अशी बायबलची काही वचनं त्यांनी मुद्दाम आमच्याकडून पाठ करून घेतली होती. ते म्हणायचे: “काय करायचं हे जर तुम्हाला सुचत नसेल तर, नीतिसूत्रे ३:५, ६ या वचनांचा विचार करा. जर शाळेत तुमच्यापुढे काही भितीदायक समस्या आल्या तर, १ करिंथकर १०:१३ हे वचन आठवा. जर तुम्हाला आमच्यापासून वेगळं व्हावं लागलं तर, नीतिसूत्रे १८:१० हे वचन मोठ्यानं म्हणा.” मी २३ वं व ९१ वं स्तोत्र पाठ केलं होतं. यहोवा माझं नेहमी संरक्षण करेल यावर मला पूर्ण भरवसा होता.

१९४० मध्ये नात्झी जर्मनीनं ॲलसेस-लॉरेनवर कब्जा केला. प्रत्येक प्रौढ व्यक्‍तीनं नात्झी दलात सामील व्हावं अशी सक्‍ती करण्यात आली होती. बाबांनी असं करण्यास नकार दिला तेव्हा गेस्टापोनं त्यांना अटक करण्याची धमकी दिली. आईनंही सैनिकांचे कपडे बनवण्यास नकार दिला तेव्हा गेस्टापो तिलाही धमकावू लागले.

शाळेला जाणं ही माझ्याकरता एक परीक्षाच होती. रोज आमच्या वर्गात हिटलरसाठी प्रार्थना केली जायची, “हेल हिटलर” असं म्हणून सलामी दिली जायची व उजवा हात पुढे करून राष्ट्रगीत गायलं जायचं. हिटलरला सलाम करू नको असं सांगण्याऐवजी आईबाबांनी मला स्वतःच्या विवेकानुसार निर्णय घेण्याची तालीम दिली. त्यामुळे मी स्वतःच “हेल हिटलर” न म्हणण्याचं ठरवलं. शिक्षकांनी मला मारलं व शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. मी सात वर्षांची असताना एकदा मला शाळेतील १२ शिक्षकांपुढे उभं करण्यात आलं. मला जबरदस्तीनं “हेल हिटलर” म्हणायला लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण, यहोवाच्या मदतीनं मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले.

एका शिक्षिकेनं गोड बोलून मला फुसलावण्याचा प्रयत्न केला. ती मला म्हणाली की मी एक हुशार विद्यार्थिनी आहे व मी तिला खूप आवडते, मला शाळेतून काढून टाकल्यास तिला खूप दुःख होईल. ती म्हणाली: “हात पूर्ण वर करायची गरज नाही फक्‍त जरासाच हात उचल. ‘हेल हिटलर’ पण म्हणू नकोस, फक्‍त ओठ हलवून तसं म्हणायचं नाटक कर.”

आईला जेव्हा मी हे सगळं सांगितलं तेव्हा तिनं मला बायबलमधील ती घटना आठवायला सांगितली ज्यामध्ये बाबेलच्या राजानं उभारलेल्या मूर्तीपुढे तीन इब्री तरुणांना उभं करण्यात आलं होतं. तिनं विचारलं, “त्यांना काय करायचं होतं?” “खाली वाकून नमन करायचं होतं,” मी उत्तर दिलं. ती म्हणाली, “जर त्या क्षणी ते आपल्या चपलेचे बंद बांधायला खाली वाकले असते तर चाललं असतं का? तूच विचार कर, मग तुला जे योग्य वाटेल ते कर.” शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्यासारखं मी पण फक्‍त यहोवालाच निष्ठावान राहायचं ठरवलं.—दानी. ३:१, १३-१८.

शिक्षकांनी अनेकदा मला शाळेतून बाहेर काढलं व आईबाबांपासून वेगळं करायची धमकी दिली. कधीकधी मला खूप भीती वाटायची, पण आईबाबा मला नेहमी प्रोत्साहन द्यायचे. शाळेत जाण्यापूर्वी आई माझ्याबरोबर प्रार्थना करायची व माझं संरक्षण करण्यासाठी यहोवाला विनवायची. मला माहीत होतं की यहोवा मला सत्यात स्थिर राहण्यास बळ देईल. (२ करिंथ. ४:७) बाबांनी मला सांगितलं होतं की जर शाळेतला दबाव मी सहन करू शकले नाही तर मी न घाबरता घरी येऊ शकते. त्यांनी म्हटलं, “आमचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू नेहमी आमची मुलगी राहशील. हा तुझा व यहोवाचा प्रश्‍न आहे.” या शब्दांमुळे यहोवाला विश्‍वासू राहण्याची माझी इच्छा आणखी दृढ झाली.—ईयो. २७:५.

साक्षीदारांच्या प्रकाशनांचा शोध घेण्यासाठी व आईबाबांना प्रश्‍न विचारण्यासाठी गेस्टापो अधूनमधून आमच्या घरी येत असत. ते आईला घेऊन जात व तासनतास तिची चौकशी करत. बाबांना व माझ्या बहिणीला ते त्यांच्या कामाच्या ठिकाणाहूनच घेऊन जात. शाळेतून घरी परतल्यावर आई घरी असेल की नाही हे मला माहीत नसायचं. काही वेळा आमच्या शेजारच्या काकू मला सांगायच्या: “ते तुझ्या आईला घेऊन गेले.” मग मी घरात लपून बसायचे आणि विचार करायचे: ‘ते आईला मारत तर नसतील? आपण तिला परत कधी पाहू का?’

आम्हाला हद्दपार करण्यात आलं

२८ जानेवारी, १९४३ रोजी पहाटे साडेतीन वाजता गेस्टापोंनी आम्हाला जागं केलं. ते आम्हाला म्हणाले की आम्ही चौघं जर नात्झी दलात सामील झालो तर आम्हाला हद्दपार केलं जाणार नाही. त्यांनी आम्हाला तयार व्हायला तीन तासांची मुदत दिली. आईनं अशा प्रसंगासाठी आधीच तयारी करून ठेवली होती. आमच्या बॅगा तिनं तयारच ठेवल्या होत्या. त्यात कपड्यांचा एक जोड व बायबल ठेवलं होतं. त्यामुळे दिलेल्या वेळेचा उपयोग आम्ही प्रार्थना करण्यासाठी व एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी केला. बाबांनी आम्हाला आठवण करून दिली की कोणतीही गोष्ट “देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्‍त करावयाला समर्थ होणार नाही.”—रोम. ८:३५-३९.

गेस्टापो परत आले. आँगलॉड नावाच्या एका म्हाताऱ्‍या बहिणीनं पाणावलेल्या डोळ्यांनी आमचा निरोप घेतला ते मी कधीच विसरू शकणार नाही. गेस्टापोंनी आम्हाला मेट्‌स येथील रेल्वे स्टेशनवर आणलं. तीन दिवसांच्या रेल्वेच्या प्रवासानंतर आम्ही पोलंडमधील, ऑश्‍वट्‌सि संकुलात असलेल्या कॉख्वोवीत्से या लहानशा शिबिरात पोचलो. दोन महिन्यांनंतर आम्हाला ग्लिवीत्से इथं हलवण्यात आलं जे आधी एक मठ होतं व त्याचं रूपांतर श्रमशिबिरात करण्यात आलं होतं. नात्झी सैनिकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आमचा विश्‍वास त्यागत आहोत असं लिहिलेल्या एका कागदावर जर आमच्यापैकी प्रत्येकानं सही केली, तर आमची सुटका केली जाईल व आमच्या वस्तू आम्हाला परत दिल्या जातील. आईबाबांनी असे करण्यास नकार दिला तेव्हा ते सैनिक म्हणाले, “तुम्ही तुमच्या घरी परत कधीच जाऊ शकणार नाही.”

जूनमध्ये आम्हाला श्‍फेन्तॉख्वोवीत्से इथं पाठवण्यात आलं. इथंच आल्यावर मला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला जो आजही मला अधूनमधून सतावतो. माझ्या बोटांनाही संसर्ग झाला व डॉक्टरांनी भूल न देताच माझी नखं काढली. या परिस्थितीतही एक चांगली गोष्ट होती, ती म्हणजे सैनिकांसाठी सामान खरेदी करण्याच्या निमित्तानं मला एका बेकरीमध्ये जावं लागायचं. तिथं एक बाई मला काहीतरी खायला द्यायची.

आत्तापर्यंत आमचं कुटुंब इतर कैद्यांपासून वेगळं राहत होतं. १९४३ च्या ऑक्टोबर महिन्यात आम्हाला झाँप्कोवीत्से येथील शिबिरात पाठवण्यात आलं. तेथे एका माळ्यावर आम्ही इतर ६० स्त्री-पुरुष, मुले यांच्यासोबत एकावर एक असलेल्या बिछान्यांवर झोपायचो. SS गार्ड्‌स आम्हाला मुद्दामहून नासकं-कुजकं, खाता न येण्याजोगं अन्‍न द्यायचे.

अशा खडतर परिस्थितीतही आम्ही कधी आशा सोडली नाही. युद्धानंतर मोठ्या प्रमाणात प्रचार कार्य केलं जाणार असल्याचं आम्ही टेहळणी बुरूज मासिकात वाचलं होतं. त्यामुळे ही सर्व संकटं आमच्यावर का येत आहेत व ही संकटं लवकरच संपुष्टात येतील हे आम्हाला माहीत होतं.

आगेकूच करणाऱ्‍या मित्र राष्ट्रांच्या सैन्यांबद्दल जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा नात्झी सेना युद्धात हरणार हे आम्हाला कळालं होतं. १९४५ च्या सुरुवातीला SS गार्ड्‌सनी आमचं शिबीर बंद करण्याचा निर्णय घेतला. १९ फेब्रुवारीला आम्ही तिथून निघालो. त्यांनी आम्हाला जवळजवळ अडीचशे किलोमीटर चालायला लावलं. चार आठवड्यांनंतर आम्ही जर्मनीतील श्‍टाइनफेल्स इथं पोचलो. SS गार्ड्‌सनी सर्व कैद्यांना एका खाणीत डांबलं. आता आपल्याला हे मारून टाकणार असं बऱ्‍याच जणांना वाटलं. पण त्याच दिवशी मित्र राष्ट्रांच्या सेना तिथं पोचल्या व SS गार्ड्‌सनी तिथून पळ काढला. अशा प्रकारे आमच्या संकटांचा शेवट झाला.

ध्येयं गाठणं

५ मे, १९४५ रोजी जवळजवळ अडीच वर्षांनंतर, आम्ही युएट्‌समधील आमच्या घरी परतलो. फेब्रुवारीपासून आम्ही कपडे बदलले नव्हते, त्यामुळे आम्ही अतिशय घाणेरड्या अवस्थेत होतो, आमचं शरीर उवांनी भरलं होतं. आम्ही आमचे हे जुने कपडे जाळून टाकायचं ठरवलं. मला अजूनही आठवतं आई आम्हाला म्हणाली: “तुमच्या आयुष्यातला हा सर्वात सुंदर दिवस ठरो. आपल्याकडं आज काहीच नाही. आपल्या अंगावरचे कपडेसुद्धा आपले नाहीत. पण, आपण चौघंही विश्‍वासू राहून परत आलो आहोत. आपण तडजोड केली नाही.”

तीन महिने स्वित्झर्लंडमध्ये राहिल्यानंतर माझी प्रकृती बरीच सुधारली. त्यानंतर मी शाळेत जाऊ लागले. शाळेतून काढून टाकतील अशी भीती आता मला वाटत नव्हती. आता आम्ही उघडपणे आपल्या बांधवांना भेटू शकत होतो व प्रचारही करू शकत होतो. २८ ऑगस्ट, १९४७ रोजी, मी अनेक वर्षांआधी यहोवाला केलेलं सर्मपण बाप्तिस्मा घेण्याद्वारे जाहीर केलं, त्यावेळी मी १३ वर्षांची होते. माझ्या वडिलांनी मोझेल नदीत मला बाप्तिस्मा दिला. मला लगेचच पायनियर बनायचं होतं, पण बाबांचा आग्रह होता की मी आधी काही व्यवसाय शिकून घ्यावा. म्हणून मी शिवणकला शिकले. १९५१ मध्ये १७ वर्षांची असताना मी पायनियर बनले व जवळच्याच ट्योन्वीलमध्ये सेवा करू लागले.

त्याच वर्षी मी पॅरिसमधील संमेलनाला हजर राहिले व मिशनरी सेवेसाठी अर्ज भरला. माझं वय कमी होतं, पण बंधू नेथन नॉर यांनी माझा अर्ज “पुढे कधीतरी” विचारात घेऊ असं सांगितलं. १९५२ च्या जून महिन्यात मला अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील साऊथ लँन्सिंग येथे असलेल्या वॉचटॉवर बायबल स्कूल ऑफ गिलियडच्या २१ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं.

गिलियड व त्यानंतरचं जीवन

खरंच तो किती अविस्मरणीय अनुभव होता! मला स्वतःच्याच भाषेत लोकांपुढं बोलायला भीती वाटायची. पण आता तर मला इंग्रजीत बोलावं लागणार होतं. आमच्या प्रशिक्षकांनी मला खूप प्रेमळपणे सांभाळून घेतलं. मी लाजले की नुसतीच हसायचे. माझं हे हसणं बघून एका बांधवानं मला एक खास नावही दिलं होतं.

१९ जुलै, १९५३ या तारखेला न्यूयॉर्कमधील यँकी स्टेडियममध्ये आमचा पदवीदान समारंभ झाला. मला आयडा कॉन्डूसो (नंतरची सानियोबॉस) हिच्यासोबत पॅरिसला पाठवण्यात आलं. पॅरिसमधल्या गर्भश्रीमंत लोकांना प्रचार करताना मला भीती वाटायची. पण अनेक नम्र लोकांसोबत बायबल अभ्यास करण्याची मला संधी मिळाली. १९५६ मध्ये आयडाचं लग्न झालं आणि ती आफ्रिकेला निघून गेली, मी मात्र पॅरिसमध्येच राहिले.

१९६० मध्ये बेथेलमधील एका बांधवाबरोबर माझं लग्न झालं आणि आम्ही शोमॉन व विशी इथं खास पायनियर म्हणून सेवा केली. पाच वर्षांनंतर, टी.बी. झाल्यामुळे मला पायनियरींग सोडावी लागली. मी खूप निराश झाले कारण लहानपणापासून पूर्णवेळची सेवा करण्याचं व त्यात टिकून राहण्याचं माझं स्वप्न होतं. काही काळानंतर, माझ्या पतीनं मला सोडून दिलं आणि तो एका दुसऱ्‍या स्त्रीबरोबर राहू लागला. या कठीण काळात मंडळीतील बंधूभगिनींनी मला खूप आधार दिला. आणि यहोवानं माझा भार वाहायला मला मदत केली.—स्तो. ६८:१९.

आता मी नॉरमँडी येथील लूव्ये इथं फ्रान्स शाखा कार्यालयाजवळ राहते. माझं आरोग्य तितकंसं चांगलं नसलं तरी यहोवानं मला वेळोवेळी कशी मदत केली आहे हे पाहून मला आनंद वाटतो. लहानपणी मला जे शिक्षण मिळालं त्याचा फायदा मला आजही योग्य मनोवृत्ती ठेवण्यासाठी होत आहे. माझ्या आईबाबांनी मला शिकवलं होतं की यहोवा एक खरी व्यक्‍ती आहे. मी त्याच्यावर प्रेम करू शकते, त्याच्याशी बोलू शकते आणि तो प्रार्थनांचं उत्तर देणारा देव आहे. खरोखर, ‘परमेश्‍वरानं माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याची कशी उतराई होऊ?’—स्तो. ११६:१२.

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

मी सहा वर्षांची असताना गॅस मास्क घेऊन

[५ पानांवरील चित्र]

मी सोळा वर्षांची असताना मिशनरी व पायनियरांसोबत लक्झम्बर्ग इथं एका खास प्रचार मोहिमेत

[५ पानांवरील चित्र]

१९५३ मध्ये आईबाबांसोबत एका अधिवेशनात

[६ पानांवरील चित्र]

“यहोवानं मला वेळोवेळी कशी मदत केली आहे हे पाहून मला आनंद वाटतो”