व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अविवाहित असताना आनंदी राहण्याचे गुपित

अविवाहित असताना आनंदी राहण्याचे गुपित

अविवाहित असताना आनंदी राहण्याचे गुपित

“मग त्यांचं लग्न झालं आणि ते सुखानं नांदू लागले.” लहान मुलांना ऐकवल्या जाणाऱ्‍या गोष्टी सहसा याच वाक्याने संपतात. प्रेमकथांवर आधारित असलेल्या चित्रपटांत किंवा कादंबऱ्‍यांमध्येही असाच संदेश दिला जातो. तो म्हणजे लग्न हीच आनंदाची गुरुकिल्ली आहे. शिवाय, अनेक संस्कृतींत तरुण मुला-मुलींवर लग्न करण्याचा दबाव आणला जातो. विशीत असलेली डेबी म्हणते, “लोक तुम्हाला असं भासवतात की जणू लग्न करण्यासाठीच मुलीचा जन्म झालेला असतो. लग्न झाल्यावरच खऱ्‍या अर्थानं तुमच्या जीवनाला सुरुवात होते असं दाखवण्याचा ते प्रयत्न करतात.”

आध्यात्मिक मनोवृत्तीची व्यक्‍ती मात्र असा टोकाचा विचार करत नाही. इस्त्राएल लोकांमध्ये लग्न करणे ही एक सर्वसाधारण गोष्ट होती. तरीसुद्धा, बायबल अशा अनेक अविवाहित स्त्री-पुरुषांबद्दल सांगते जे अतिशय आनंदी व समाधानी जीवन जगले. आज यहोवाच्या सेवकांपैकी काही जण स्वतःहूनच लग्न न करण्याचा निर्णय घेतात, तर काहींना परिस्थितीमुळे अविवाहित राहावे लागते. पण अविवाहित राहण्याचे कारण काहीही असले, तरी विचारात घेण्याजोगा एक प्रश्‍न असा आहे की अविवाहित असलेला यहोवाचा सेवक कशा प्रकारे आपल्या जीवनाचे सार्थक करू शकतो?

स्वतः येशूने लग्न केले नव्हते. त्याच्यावर जे कार्य सोपवण्यात आले होते ते लक्षात घेता हे समजण्याजोगे आहे. येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले होते की त्याच्याप्रमाणेच त्याचे काही अनुयायी देखील अविवाहित राहायचे आपणहून ‘स्विकारतील.’ (मत्त. १९:१०-१२) त्याअर्थी येशू असे सांगू इच्छित होता, की अविवाहित असताना सुखी व समाधानी होण्याकरता आपण ही जीवनशैली मनापासून, जाणीवपूर्वक स्वीकारली पाहिजे.

पण येशूचा हा सल्ला फक्‍त अशाच व्यक्‍तींना लागू होतो का, की ज्यांनी देवाच्या सेवेकरता स्वतःला पूर्णपणे वाहून घेण्यासाठी अविवाहित राहायचा निर्णय घेतला आहे? (१ करिंथ. ७:३४, ३५) जरुरी नाही. उदाहरणार्थ, अशा ख्रिस्ती व्यक्‍तीचा विचार करा जिला लग्न करण्याची इच्छा तर आहे, पण अनुरूप जोडीदार मिळत नाही. तिशीतली अविवाहित असलेली ॲना म्हणते, “अलिकडेच माझ्यासोबत काम करणाऱ्‍या, साक्षीदार नसलेल्या एकानं मला मागणी घातली. मी मनोमन सुखावले, पण लगेचच तो विचार मी मनातून काढून टाकला कारण मला फक्‍त असा जोडीदार हवा आहे, जो मला यहोवाच्या जवळ यायला मदत करू शकेल.”

ॲनाप्रमाणेच अनेक बहिणी देखील “प्रभुमध्ये” लग्न करण्याची इच्छा असल्यामुळे सत्यात नसलेल्या व्यक्‍तीशी लग्न करण्यास नकार देतात. * (१ करिंथ. ७:३९; २ करिंथ. ६:१४) देवाच्या या सल्ल्याचा आदर करत असल्यामुळे, निदान काही काळापुरते का होईना त्या अविवाहित जीवनशैली स्विकारतात. असे करण्यात त्या यशस्वी कशा होऊ शकतात?

सकारात्मक दृष्टिकोन बाळगा

आपल्याला नको असलेली एखादी परिस्थिती स्वीकारणे, न स्वीकारणे हे बऱ्‍याच प्रमाणात आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. कार्मेन नावाची चाळीशीतील एक बहीण म्हणते, “जे माझ्याजवळ नाही त्याची स्वप्नं रंगवण्यापेक्षा, जे माझ्याजवळ आहे त्यातच मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते.” अर्थात, अधूनमधून एकाकीपणाच्या किंवा वैफल्याच्या भावना मनात येणे स्वाभाविक आहे. पण जगभरातील आपल्या बांधवांपैकी अनेकांना अशाच प्रकारच्या गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे या जाणिवेमुळे जीवनात आत्मविश्‍वासाने वाटचाल करण्यास आपल्याला साहाय्य मिळते. यहोवाने अविवाहित असलेल्या अनेकांना समाधानी जीवन जगण्यास व इतर आव्हानांना तोंड देण्यास साहाय्य केले आहे.—१ पेत्र ५:९, १०.

अनेक बंधू-भगिनींच्या लक्षात आले आहे की अविवाहित राहण्याचेही काही फायदे आहेत. तिशीतली एस्टर नावाची अविवाहित बहीण म्हणते, “माझ्या मते, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असला तरी त्या परिस्थितीची जमेची बाजू तुम्हाला ओळखता आली तर तुम्ही आनंदी राहू शकता.” कार्मेन म्हणते, “लग्न होवो किंवा न होवो, जर मी देवाच्या राज्याच्या कार्याला जीवनात महत्त्व दिलं तर यहोवाकडून मला अनेक आशीर्वाद मिळतील याची मला खातरी आहे.” (स्तो. ८४:११) “मी जसा विचार केला होता तसं जरी आज माझं जीवन नसलं, तरी मी आनंदी आहे आणि पुढेही राहीन.”

बायबलमधील अविवाहित व्यक्‍तींची उदाहरणे

इफ्ताहाच्या मुलीचा अविवाहित राहण्याचा इरादा नव्हता. पण, तिच्या वडिलांनी यहोवाला दिलेल्या वचनामुळे तिला तरुणपणापासूनच मंदिरात सेवा करावी लागली. तिच्यावर अनपेक्षितपणे आलेल्या या जबाबदारीमुळे तिला नक्कीच स्वतःच्या वैयक्‍तिक आशा-आकांक्षा बाजूला साराव्या लागल्या असतील व आपल्या नैसर्गिक भावनांनाही दडपून टाकावे लागले असेल. आपले लग्न होणार नाही, व आपल्याला मूलबाळ होणार नाही याची जाणीव झाल्यामुळे तिने दोन महिने शोक केला. तरीसुद्धा, तिने या बदललेल्या परिस्थितीचा स्वीकार करून स्वेच्छेने देवाच्या मंदिरात जीवनभर सेवा केली. दरवर्षी इस्त्राएलातील स्त्रिया तिने दाखवलेल्या या स्वार्थत्यागी मनोवृत्तीबद्दल तिची प्रशंसा करायच्या.—शास्ते ११:३६-४०.

यशयाच्या काळातील नपुंसक असलेल्या काहींना आपल्या परिस्थितीबद्दल निराशा वाटली असावी. कोणत्या कारणामुळे ते नपुंसक बनले होते हे बायबल आपल्याला सांगत नाही. पण त्यांना पूर्णपणे इस्त्राएलाच्या मंडळीचे सदस्य बनता येणार नव्हते. तसेच, ते लग्न करून मुलांना जन्म देऊ शकणार नव्हते. (अनु. २३:१) तरीसुद्धा, यहोवाने त्यांच्या भावना जाणल्या व त्याच्या कराराला त्यांनी दाखवलेल्या संपूर्ण आज्ञाधारकतेसाठी त्यांची प्रशंसाही केली. त्याने त्यांना वचन दिले की तो आपल्या गृहात त्यांचे ‘स्मारक स्थापील व त्यांचे नाव करील.’ दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे तर विश्‍वासू राहिलेले हे नपुंसक, येशूच्या मशीही राज्यात सार्वकालिक जीवनाचा आनंद लुटतील. यहोवा त्यांना कधीच विसरणार नाही.—यश. ५६:३-५.

यिर्मयाविषयी पाहिल्यास, त्याची परिस्थिती अगदीच वेगळी होती. भविष्यवक्‍ता म्हणून त्याची नियुक्‍ती केल्यानंतर यहोवाने त्याला अविवाहित राहायला सांगितले. तो ज्या कठीण काळात राहात होता व त्याला जी नेमणूक देण्यात आली होती त्यानुसार हे योग्यच होते. यहोवाने त्याला म्हटले, “तू बायको करू नको व या स्थळी तुला पुत्र व कन्या न होवोत.” (यिर्म. १६:१-४) या सूचनेबद्दल यिर्मयाला कसे वाटले हे बायबलमध्ये जरी सांगितलेले नसले, तरी यिर्मया हा यहोवाच्या वचनात आनंद मानणारा होता याची ते आपल्याला खातरी देते. (यिर्म. १५:१६) नंतरच्या वर्षांत जेरूसलेमला वेढा घालण्यात आला त्या १८ महिन्यांच्या भयानक काळात, अविवाहित राहण्याच्या यहोवाच्या आज्ञेचे पालन करणे किती शहाणपणाचे होते याची नक्कीच यिर्मयाला खातरी पटली असेल.—विलाप. ४:४, १०.

तुम्हाला आपले जीवन तृप्तीदायक कसे बनवता येईल?

आता आपण बायबलमधील ज्यांची उदाहरणे पाहिली, ते सर्व अविवाहित होते पण त्या सर्वांनी यहोवाचे साहाय्य अनुभवले व त्याची सेवा करण्यात ते मग्न होते. आजही आपण अर्थपूर्ण कार्यात सहभाग घेतल्यास आपले जीवन तृप्तीदायक बनेल. सुवार्तेचा प्रचार करणाऱ्‍या स्त्रियांची एक मोठी सेना असेल असे बायबलमध्ये आधीच भाकीत करण्यात आले होते. (स्तो. ६८:११) या समूहात हजारो अविवाहित बहिणी आहेत. त्यांच्या फलदायी सेवेमुळे त्यांना यहोवाच्या आशीर्वादाने अनेक आध्यात्मिक मुले लाभली आहेत.—मार्क १०:२९, ३०; १ थेस्सलनी. २:७, ८.

चौदा वर्षे पायनियरिंग केलेली लॉली म्हणते, “पायनियरिंगमुळे माझ्या जीवनाला दिशा मिळाली आहे. अविवाहित असल्यामुळे मी माझ्या कामात नेहमी मग्न असते. माझं जीवन अर्थपूर्ण आहे व यामुळे एकाकीपणा टाळायला मला मदत मिळते. माझ्या सेवेमुळे इतरांना खरोखर मदत होते हे पाहून प्रत्येक दिवसाच्या शेवटी मी समाधानी असते. या कार्यामुळे मला खरोखरच खूप आनंद मिळतो.”

अनेक बहिणींनी नवी भाषा शिकून घेतली आहे व विदेशी लोकांना प्रचार करण्याद्वारे आपले सेवाकार्य वाढवले आहे. आधी उल्लेखलेल्या ॲनाला फ्रेंच भाषा बोलणाऱ्‍या लोकांना प्रचार करायला आवडते. ती म्हणते, “मी ज्या शहरात राहते तिथे हजारो विदेशी लोक आहेत. नवीन भाषा शिकून घेतल्याने मी त्यांच्याशी बोलू शकते व त्यामुळे सेवेचे नवे दालन माझ्यासाठी उघडले आहे व माझे प्रचार कार्य अधिकच नाविन्यपूर्ण बनले आहे.”

अविवाहित व्यक्‍तीवर तितक्याशा जबाबदाऱ्‍या नसल्यामुळे अनेकांनी, जेथे जास्त गरज आहे तेथे जाऊन सेवा करण्याचे निवडले आहे. परदेशात जाऊन अशा प्रकारची सेवा करणारी लिडियाना ही तीशीतली एक अविवाहित बहीण म्हणते, “मला तरी असं वाटतं की यहोवाच्या सेवेत तुम्ही जितका जास्त वेळ घालवता तितकंच तुम्हाला खरे मित्र मिळवणं व इतरांचं प्रेम मिळवणं सोपं जातं. मला वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या व वेगवेगळ्या राष्ट्रांतील मित्र-मैत्रिणी आहेत ज्यांच्यामुळे माझे जीवन समृद्ध बनले आहे.”

बायबलमध्ये सुवार्तिक फिलिप्पाच्या चार अविवाहित मुलींबद्दल सांगण्यात आले आहे, ज्या भविष्यवाणी करायच्या. (प्रे. कृत्ये २१:८, ९) त्यांच्या वडिलांसारख्या त्या देखील नक्कीच आवेशी असाव्यात. कैसरियातील सहविश्‍वासू बांधवांच्या फायद्यासाठी त्यांनी आपल्या भविष्यवाणी करण्याच्या दानाचा उपयोग केला असावा का? (१ करिंथ. १४:१, ३) त्यांच्याप्रमाणेच आजही अनेक अविवाहित बहिणी ख्रिस्ती सभांना नियमित हजर राहण्याद्वारे व त्यांत सहभाग घेण्याद्वारे इतरांना प्रोत्साहन देतात.

तसेच, फिलिप्पैतील आरंभीच्या ख्रिश्‍चनांपैकी एक असलेल्या लुदियाच्या उदारपणाबद्दल बायबलमध्ये तिची प्रशंसा करण्यात आली आहे. (प्रे. कृत्ये १६:१४, १५, ४०) लुदिया, जी कदाचित अविवाहित किंवा विधवा होती तिच्या उदार मनोवृत्तीमुळे पौल, सिलास व लूक सारख्या प्रवासी पर्यवेक्षकांच्या प्रोत्साहनदायक सहवासाचा आनंद तिला मिळाला होता. अशी उदार मनोवृत्ती बाळगल्याने आपणही असेच आशीर्वाद मिळवू शकतो.

प्रेमाची व जिव्हाळ्याची गरज भागवणे

जीवनात समाधानी असण्याकरता अर्थपूर्ण कार्यात सहभाग घेण्यासोबतच आपल्याला प्रेमाची व जिव्हाळ्याची गरज असते. अविवाहित व्यक्‍ती ही गरज कशी भागवू शकते? पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात असू द्या की यहोवाचे आपल्यावर प्रेम आहे. आपल्याला बळ देण्यासाठी व आपले ऐकून घेण्यासाठी तो नेहमी तयार असतो. दावीद राजालाही वेळोवेळी “निराश्रित व दीन” असल्यासारखे वाटायचे. पण त्याला हे माहीत होते की मदतीसाठी तो केव्हाही यहोवाकडे वळू शकतो. (स्तो. २५:१६; ५५:२२) त्याने लिहिले, “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्‍वर मला जवळ करील.” (स्तो. २७:१०) देव त्याच्या सेवकांना त्याच्या जवळ येण्याचे व त्याच्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडण्याचे आमंत्रण देतो.—स्तो. २५:१४; याको. २:२३; ४:८.

शिवाय, जगभरातील बंधुवर्गात आपल्याला आध्यात्मिक माता-पिता, भाऊ-बहिणी मिळू शकतात आणि ही प्रेमाची नाती आपले जगणे समृद्ध करू शकतात. (मत्त. १९:२९; १ पेत्र २:१७) ‘सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असणाऱ्‍या’ दुर्कसचे अनुकरण केल्यामुळे अनेक अविवाहित बंधू-भगिनींना खूप समाधान लाभले आहे. (प्रे. कृत्ये ९:३६, ३९) लॉली म्हणते, “मी जिथं कुठं जाते तिथल्या मंडळीत, माझ्यावर प्रेम करणारे व मी निराश असते तेव्हा मला आधार देणारे असे खरे मित्र मी शोधते. त्यांच्यासोबतची नाती घट्ट करण्यासाठी मीसुद्धा त्यांच्याबद्दल आपुलकी व आस्था दाखवते. आतापर्यंत मी आठ मंडळ्यांमध्ये सेवा केली आहे आणि माझ्यावर खरं प्रेम करणाऱ्‍या व्यक्‍ती मला नेहमीच भेटल्या आहेत. सहसा या माझ्याच वयाच्या बहिणी नसून कधी आजीच्या वयाच्या तर कधी चौदा-पंधरा वर्षांच्या मुली असतात.” प्रत्येक मंडळीत असे काही जण आहेत ज्यांना सहवासाची व प्रेमाची गरज आहे. अशा व्यक्‍तींमध्ये आस्था दाखवण्याद्वारे आपण त्यांना मदत करू शकतो. आणि यासोबतच इतरांवर प्रेम करण्याची व त्यांचे प्रेम मिळवण्याची आपली गरज देखील यामुळे पूर्ण होऊ शकते.—लूक ६:३८.

देव कधीही विसरणार नाही

या कठीण काळात जगताना यहोवाच्या सर्वच सेवकांना काही न काही त्याग करावा लागेल असे बायबल सांगते. (१ करिंथ. ७:२९-३१) फक्‍त प्रभूमध्येच लग्न करण्याच्या देवाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी जे अविवाहित राहण्याचा निर्णय घेतात, ते खरोखरच आपल्या खास आदरास पात्र आहेत. (मत्त. १९:१२) त्यांचा हा त्याग प्रशंसनीय आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की ते जीवनाचा आनंद पूर्णपणे लुटू शकत नाहीत.

लिडियाना म्हणते, “यहोवाशी माझा घनिष्ठ नातेसंबंध असल्यामुळे व त्याची सेवा करत असल्यामुळेच मी जीवनात समाधानी आहे. मी ज्या विवाहित लोकांना ओळखते त्यांच्यापैकी काही आनंदी आहेत तर काही आनंदी नाहीत. हे पाहून माझी खातरी पटली आहे की लग्न होण्यावरच माझा आनंद अवलंबून नाही.” इतरांना देणे व त्यांची सेवा करणे यामुळेच खरा आनंद मिळू शकतो असे येशूने सांगितले होते. आणि सर्वच ख्रिस्ती असे करू शकतात.—योहा. १३:१४-१७; प्रे. कृत्ये २०:३५.

आपण यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता जो काही त्याग केला आहे त्याबद्दल तो आपल्याला आशीर्वादित करेल हे आपल्याला माहीत आहे. आणि आपल्या आनंदाचे हेच सर्वात प्रमुख कारण आहे. बायबल आपल्याला असे आश्‍वासन देते: “तुमचे कार्य . . . आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्री ६:१०.

[तळटीप]

^ परि. 6 सदर लेखात ख्रिस्ती भगिनींचाच उल्लेख केला असला तरीसुद्धा यातील तत्त्वे बांधवांसाठीही तितकीच उपयुक्‍त आहेत.

[२५ पानांवरील संक्षिप्त आशय]

“जे माझ्याजवळ नाही त्याची स्वप्नं रंगवण्यापेक्षा, जे माझ्याजवळ आहे त्यातच मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते.”—कार्मेन

[२६ पानांवरील चित्र]

लॉली आणि लिडियाना जेथे जास्त गरज आहे अशा ठिकाणी आनंदाने सेवा करत आहेत

[२७ पानांवरील चित्र]

देव त्याच्या सर्वच सेवकांना त्याच्या जवळ येण्याचे आमंत्रण देतो