व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन —देवाकडून मिळालेली आशा

पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन —देवाकडून मिळालेली आशा

पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन —देवाकडून मिळालेली आशा

‘व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आलेली सृष्टी आशेने वाट पाहते.’—रोम. ८:२०, २१.

१, २. (क) पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा आपल्याकरता का महत्त्वाची आहे? (ख) पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाबद्दल अनेकांना शंका का वाटते?

लवकरच अशी एक वेळ येत आहे जेव्हा कोणीही वृद्ध होणार नाही किंवा मरणार नाही. उलट ते याच पृथ्वीवर सदासर्वकाळ जगतील. तुम्हाला हे पहिल्यांदाच समजले तेव्हा तुम्हाला किती आनंद झाला होता हे आठवते का? (योहा. १७:३; प्रकटी. २१:३, ४) बायबलमधून मिळालेल्या या आशेबद्दल कदाचित तुम्ही मोठ्या आनंदाने इतरांनाही सांगितले असेल. खरोखरच, सार्वकालिक जीवनाची आशा ही आपण लोकांना सांगत असलेल्या सुवार्तेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. किंबहुना, या आशेमुळे जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलतो.

ख्रिस्ती धर्मजगतातील बहुतेक पंथांनी पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाच्या आशेला आपल्या शिकवणींतून जवळजवळ वगळूनच टाकले आहे. बायबल सांगते, की मनुष्य मरतो तेव्हा त्याचे अस्तित्व मिटते, त्याचा कोणताही भाग स्वतंत्रपणे अस्तित्वात राहात नाही. पण या उलट, बहुतेक चर्चेसमधून अशी शिकवण दिली जाते, की मनुष्यामध्ये एक अमर आत्मा असतो आणि तो मृत्यूनंतरही परलोकात जिवंत राहतो. (यहे. १८:२०) या शिकवणीमुळेच पृथ्वीवर सार्वकालिक जीवन शक्य आहे की नाही याविषयी अनेकांना शंका वाटते. तेव्हा, साहजिकच आपल्या मनात असे प्रश्‍न निर्माण होऊ शकतात: पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाच्या आशेला बायबल पुष्टी देते का? देत असल्यास, देवाने मानवांना या आशेविषयी सर्वप्रथम केव्हा सांगितले?

‘व्यर्थतेच्या स्वाधीन सृष्टी आशेने वाट पाहते’

३. मनुष्याबद्दल देवाचा उद्देश मानवजातीच्या सुरुवातीलाच कशा प्रकारे प्रकट करण्यात आला होता?

मानवजातीसंबंधी असलेला देवाचा उद्देश मानवी इतिहासाच्या सुरुवातीलाच प्रकट करण्यात आला होता. देवाने आदामाला जे सांगितले त्यावरून स्पष्टपणे दिसून आले की जर आदाम देवाच्या आज्ञेत राहिला तर त्याला सदासर्वकाळ जगण्याची आशा होती. (उत्प. २:९, १७; ३:२२) मानवाने पाप केल्यामुळे तो कशा प्रकारे परिपूर्णता गमावून बसला हे आदामाच्या सुरुवातीच्या वंशजांना नक्कीच समजले असेल. याचे अनेक पुरावेही त्यांच्या डोळ्यांसमोर होते. उदाहरणार्थ, एदेन बागेत प्रवेश करण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता आणि लोक वयोवृद्ध होऊन मरत होते. (उत्प. ३:२३, २४) काळाच्या ओघात माणसाचे वयोमानही कमीकमी होत गेले. उदाहरणार्थ, आदाम ९३० वर्षे जगला. जलप्रलयातून वाचलेला शेम केवळ ६०० वर्षे जगला आणि त्याचा पुत्र अर्पक्षद ४३८ वर्षे जगला. अब्राहामाचा पिता, तेरह २०५ वर्षांचे आयुष्य जगला. अब्राहाम १७५ वर्षे, त्याचा पुत्र इसहाक १८० वर्षे, तर याकोब हा १४७ वर्षे जगला. (उत्प. ५:५; ११:१०-१३, ३२; २५:७; ३५:२८; ४७:२८) मनुष्याचे वयोमान असे दिवसेंदिवस कमी होत असल्याचे पाहून, सार्वकालिक जीवनाची आशा नष्ट झाली आहे हे अनेकांच्या लक्षात आले असावे. पण, भविष्यात मनुष्याला पुन्हा सार्वकालिक जीवन प्राप्त होईल अशी आशा बाळगण्याचा त्यांच्याजवळ काही आधार होता का?

४. आदामाने गमावलेले आशीर्वाद परत मिळतील असा विश्‍वास बाळगण्यासाठी प्राचीन काळच्या विश्‍वासू सेवकांजवळ कोणता आधार होता?

बायबलमध्ये म्हटले आहे: ‘व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आलेली [मानव] सृष्टी आशेने वाट पाहते.’ (रोम. ८:२०, २१) या ठिकाणी कोणत्या आशेविषयी सांगण्यात आले आहे? बायबलच्या सगळ्यात पहिल्या भविष्यवाणीत एका ‘संततीचा’ उल्लेख करण्यात आला, जी ‘सर्पाचे डोके फोडणार’ होती. (उत्पत्ति ३:१-५, १५, वाचा.) विश्‍वासू मानवांना संततीविषयीच्या या प्रतिज्ञेमुळे एक आशा लाभली. ती अशी की देव मानवजातीसंबंधी असलेला आपला उद्देश बदलणार नाही. या प्रतिज्ञेमुळे हाबेल व नोहा यांच्यासारख्या देवाच्या सेवकांना असा विश्‍वास बाळगण्यास आधार मिळाला की आदामाने जे गमावले होते ते देव मानवजातीला परत देईल. ‘संततीची टाच फोडली जाईल’ असे जे भाकीत करण्यात आले होते त्यावरून रक्‍त सांडले जाईल असे सूचित होते, हे देखील या विश्‍वासू सेवकांना कळाले असावे.—उत्प. ४:४; ८:२०; इब्री ११:४.

५. अब्राहामाचा पुनरुत्थानावर विश्‍वास होता हे कशावरून दिसते?

आता अब्राहामाचे उदाहरण लक्षात घ्या. तो आपली परीक्षा होत असता ‘आपल्या एकुलत्या एका [पुत्राचे] अर्पण’ करण्यास तयार झाला. (इब्री ११:१७) अब्राहाम असे करण्यास का तयार झाला? (इब्री लोकांस ११:१९ वाचा.) कारण त्याचा पुनरुत्थानावर विश्‍वास होता! अब्राहामाचा हा विश्‍वास निराधार नव्हता. कारण यहोवाने अब्राहामाची प्रजनन शक्‍ती पुनरुज्जिवित केल्यामुळे त्याला व त्याची पत्नी सारा यांना उतारवयात एक पुत्र झाला होता. (उत्प. १८:१०-१४; २१:१-३; रोम. ४:१९-२१) शिवाय, देवाने अब्राहामाला एक आश्‍वासनही दिले होते. देवाने त्याला सांगितले होते: “तुझ्या वंशाचे नाव इसहाकच चालविणार.” (उत्प. २१:१२) तेव्हा, देव इसहाकाचे पुनरुत्थान करेल अशी अपेक्षा करण्याची सबळ कारणे अब्राहामाजवळ होती.

६, ७. (क) यहोवाने अब्राहामाशी कोणता करार केला? (ख) यहोवाने अब्राहामाला दिलेल्या अभिवचनामुळे कशा प्रकारे मानवजातीला आशा मिळते?

अब्राहामाच्या उल्लेखनीय विश्‍वासामुळे देवाने त्याच्यासोबत त्याच्या ‘संततीसंबंधी’ एक करार केला. (उत्पत्ति २२:१८ वाचा.) या ‘संततीचा’ प्रमुख भाग येशू ख्रिस्त आहे हे कालांतराने स्पष्ट झाले. (गलती. ३:१६) तसेच, यहोवाने अब्राहामाला असे सांगितले होते, की त्याची “संतति” बहुगुणित होऊन “आकाशातील ताऱ्‍यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल.” (उत्प. २२:१७) याचा अर्थ, नेमकी संख्या किती असेल हे अब्राहामाला माहीत नव्हते. पण, नंतर ही संख्या प्रकट करण्यात आली. या ‘संततीत,’ येशू ख्रिस्त आणि मशीही राज्यात त्याच्यासोबत राज्य करणारे १,४४,००० यांचा समावेश होतो. (गल. ३:२९; प्रकटी. ७:४; १४:१) या राज्याद्वारेच “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे . . . आशीर्वादित होतील.”

यहोवाने अब्राहामासोबत केलेल्या कराराचा अर्थ त्याला पूर्णपणे समजणे अर्थातच शक्य नव्हते. तरीसुद्धा, ‘तो [मजबूत] पाया असलेल्या नगराची वाट पाहत होता,’ असे बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. (इब्री ११:१०) ते नगर म्हणजेच देवाचे राज्य. त्या राज्यातील आशीर्वादांचा उपभोग घेण्यासाठी अब्राहामाला पुन्हा एकदा जगावे लागेल. पुनरुत्थानाद्वारे अब्राहामाला पृथ्वीवर सर्वकाळ जगणे शक्य होईल. आणि हर्मगिदोनातून जे बचावतील किंवा मेलेल्यांतून जे पुन्हा जिवंत होतील त्यांना देखील सर्वकाळ जगणे शक्य होईल.—प्रकटी. ७:९, १४; २०:१२-१४.

“आत्मा मला स्फूर्ति देत आहे”

८, ९. ईयोबाचे पुस्तक केवळ एका मनुष्याच्या संकटांचा वृत्तान्त नाही असे का म्हणता येईल?

अब्राहामाचा पणतू योसेफ आणि संदेष्टा मोशे यांच्या मधल्या काळात ईयोब नावाचा एक मनुष्य राहत होता. बायबलमधील ईयोब नावाचे पुस्तक जे बहुधा मोशेने लिहिलेले होते ते सांगते, की यहोवाने ईयोबावर संकटप्रसंगे का येऊ दिली आणि यांवरून त्याच्याबाबतीत शेवटी काय सिद्ध झाले. पण, ईयोबाच्या पुस्तकात केवळ एका मनुष्याच्या जीवनात आलेल्या संकटप्रसंगांचा वृत्तान्त आढळत नाही, तर ते अशा काही गोष्टींची चर्चा करते ज्यांचा विश्‍वातल्या सर्वांवर परिणाम होतो. या पुस्तकातून हे समजते, की यहोवा अगदी न्यायीपणे आधिपत्य गाजवतो. तसेच, देवाच्या पृथ्वीवरील सेवकांची एकनिष्ठा आणि त्यांचे भवितव्य यांचा एदेन बागेत निर्माण झालेल्या वादविषयाशी फार जवळचा संबंध आहे हेही या पुस्तकातून समजते. या वादविषयाची ईयोबाला काहीच कल्पना नव्हती. शिवाय, एकनिष्ठा राखण्याच्या बाबतीत तो अपयशी ठरला असा चुकीचा विचार त्याच्या तीन मित्रांनी त्याच्या मनात घालण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या या बोलण्याचा ईयोबाने स्वतःवर परिणाम होऊ दिला नाही. (ईयो. २७:५) ईयोबाच्या या उदाहरणावरून आपलाही विश्‍वास मजबूत होतो आणि आपणही यहोवाला निष्ठावान राहून त्याच्या सार्वभौम आधिपत्याचे समर्थन करू शकतो हे समजण्यास आपल्याला मदत मिळते.

ईयोबाच्या त्या तीन नाममात्र सांत्वनकर्त्यांनी आपले बोलणे संपवल्यावर “बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याने उत्तर दिले.” कशामुळे तो बोलण्यास प्रवृत्त झाला? “माझ्या मनात शब्दांची गर्दी झाली आहे. आत्मा मला स्फूर्ति देत आहे,” असे त्याने म्हटले. (ईयो. ३२:५, ६, १८, NW) अलीहूने देवाच्या प्रेरणेने जे काही म्हटले त्याची पूर्णता, यहोवाने ईयोबाला पुन्हा आशीर्वादित केले तेव्हा झाली. तरीसुद्धा अलीहूचे शब्द इतरांनाही लागू होतात. त्याच्या शब्दांतून यहोवाला एकनिष्ठ राहणाऱ्‍या सर्व लोकांना आशा मिळते.

१०. काही वेळा यहोवाने एका व्यक्‍तीला दिलेला संदेश कशा प्रकारे सबंध मानवजातीला लागू झाला?

१० काही वेळा यहोवाने एका व्यक्‍तीला जो संदेश दिला तो व्यापक अर्थाने सबंध मानवजातीसाठी होता. बॅबिलोनच्या नबुखद्‌नेस्सर राजाने पाहिलेल्या एक स्वप्नाच्या संदर्भात दानीएलाने जी भविष्यवाणी केली होती त्यावरून ही गोष्ट दिसून येते. या स्वप्नात राजा एक प्रचंड मोठा वृक्ष पाहतो जो तोडून टाकला जातो. (दानी. ४:१०-२७) हे स्वप्न नबुखद्‌नेस्सर राजाच्या बाबतीत पूर्ण झाले असले तरी ते भविष्यातील कितीतरी पटीने जास्त महत्त्वाच्या एका गोष्टीकडे संकेत करत होते. प्राचीन काळी देवाने दाविदाच्या वंशावळीतील राजांच्या राज्याद्वारे (लाक्षणिक रीत्या) पृथ्वीवरील लोकांवर आधिपत्य चालवले होते. नबुखद्‌नेस्सर राजाच्या स्वप्नावरून असे सूचित झाले, की २,५२० वर्षांच्या कालावधीनंतर देवाचे आधिपत्य पुन्हा एकदा प्रकट केले जाईल आणि या कालावधीची सुरुवात सा.यु.पू. ६०७ मध्ये होईल. * १९१४ मध्ये येशू ख्रिस्त स्वर्गात राजा बनला तेव्हापासून पृथ्वीच्या संबंधाने देवाचे आधिपत्य नव्याने प्रकट झाले. लवकरच देवाच्या या राज्याद्वारे आज्ञाधारक मानवजातीच्या आशा पूर्ण होतील!

“याला गर्तेत पडू देऊ नको”

११. अलीहूच्या शब्दांतून देवाबद्दल काय दिसून आले?

११ ईयोबाला उत्तर देताना अलीहू, ‘मनुष्याला सन्मार्ग दाखविणाऱ्‍या हजारात एक अशा कोणा मध्यस्थ दिव्यदूताचा’ उल्लेख करतो. या दिव्यदूताने ‘देवाला प्रसन्‍न करण्यासाठी त्याची प्रार्थना केल्यास’ तो ती स्वीकारेल का? अलीहू म्हणतो: “देव त्याजवर प्रसन्‍न होऊन म्हणेल, याचा बचाव कर, याला गर्तेत पडू देऊ नको; मला खंड [खंडणी] मिळाला आहे. मग त्याचे शरीर बालकाच्यापेक्षा टवटवीत होते; त्याचे तारुण्याचे दिवस त्याला पुन्हा प्राप्त होतात.” (ईयो. ३३:२३-२६) या शब्दांवरून दिसून आले, की देव पश्‍चात्तापी मानवांच्या वतीने “खंड” म्हणजेच खंडणी स्वीकारेल.—ईयो. ३३:२४.

१२. अलीहूच्या शब्दांतून सबंध मानवजातीला कोणती आशा मिळते?

१२ देवाच्या संदेष्ट्यांपैकी अनेकांना, त्यांनी जे लिहिले होते ते पूर्णपणे समजले नाही. त्याचप्रमाणे, अलीहूला देखील खंडणीचा पूर्ण अर्थ समजला नसेल. (दानी. १२:८; १ पेत्र १:१०-१२) तरीसुद्धा अलीहूच्या शब्दांतून अशी आशा मिळाली, की देव एके दिवशी मानवांसाठी खंडणी स्वीकारून म्हातारपण व मृत्यू यांपासून त्यांची सुटका करेल. अलीहूच्या शब्दांनी मानवांना सार्वकालिक जीवनाची अद्‌भुत आशा दिली. तसेच, मानवांचे पुनरुत्थान केले जाईल हे देखील ईयोबाच्या पुस्तकातून दिसून येते.—ईयो. १४:१४, १५.

१३. अलीहूच्या शब्दांचा ख्रिश्‍चनांसाठी काय अर्थ होतो?

१३ सध्याच्या जगाच्या नाशातून बचावण्याची आशा बाळगणाऱ्‍या लाखो ख्रिश्‍चनांसाठी आजही अलीहूचे शब्द अतिशय अर्थपूर्ण आहेत. या नाशातून बचावणाऱ्‍या वयोवृद्ध लोकांना पुन्हा तारुण्य प्राप्त होईल. (प्रकटी. ७:९, १०, १४-१७) शिवाय, देवाचे विश्‍वासू सेवक, त्या काळाची आनंदाने वाट पाहत आहेत जेव्हा ते पुनरुत्थान झालेल्या लोकांना पुन्हा तरुण झालेले पाहतील. अर्थात, ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवल्यानेच अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्वर्गातील अमर जीवन व येशूच्या ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ शकते.—योहा. १०:१६; रोम. ६:२३.

पृथ्वीवरून मृत्यू कायमचा नाहीसा होतो

१४. इस्राएल लोक केवळ मोशेच्या नियमशास्त्राच्या आधारावर सार्वकालिक जीवनाची आशा का बाळगू शकत नव्हते?

१४ देवाने अब्राहामाच्या वंशासोबत करार केला तेव्हा ते एक स्वतंत्र राष्ट्र बनले. त्यांना नियमशास्त्र देताना यहोवाने म्हटले: “तुम्ही माझे विधि व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यायोगे जिवंत राहील.” (लेवी. १८:५) पण, नियमशास्त्राच्या परिपूर्ण आज्ञांचे तंतोतंत पालन न करता आल्यामुळे नियमशास्त्राने त्यांना दोषी ठरवले आणि या दोषी अवस्थेतून त्यांना मुक्‍त करण्याची गरज होती.—गलती. ३:१३.

१५. दाविदाला भविष्यातील कोणत्या आशीर्वादाबद्दल लिहिण्यास प्रेरित करण्यात आले?

१५ मोशेनंतर यहोवाने बायबलच्या इतर लेखकांनाही सार्वकालिक जीवनाच्या आशेचा उल्लेख करण्यास प्रेरित केले. (स्तो. २१:४; ३७:२९) उदाहरणार्थ, सीयोन डोंगरावरील खऱ्‍या उपासकांच्या ऐक्याविषयी लिहिताना स्तोत्रकर्त्या दाविदाने त्या स्तोत्राच्या शेवटी असे म्हटले: “तेथे परमेश्‍वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.”—स्तो. १३३:३.

१६. यहोवाने यशयाद्वारे ‘अखिल पृथ्वीच्या’ भविष्याबद्दल कोणते अभिवचन दिले?

१६ यहोवाने यशयाला देखील पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाविषयी भविष्यवाणी करण्यास प्रेरित केले. (यशया २५:७, ८ वाचा.) ‘झाकणाप्रमाणे’ किंवा गुदमरून टाकणाऱ्‍या एखाद्या आच्छादनाप्रमाणे, पाप व मृत्यूने आजवर मानवजातीचे जीवन दुःसह केले आहे. पण, यहोवा आपल्या लोकांना आश्‍वासन देतो, की “अखिल पृथ्वीवरून” पाप आणि मृत्यू नाहीसा केला जाईल.

१७. मशीहाबद्दल भाकीत केलेल्या कोणत्या भूमिकेमुळे अनंतकालिक जीवनाचा मार्ग मोकळा होतो?

१७ मोशेच्या नियमशास्त्रात पाप वाहून नेणाऱ्‍या बकऱ्‍यासंबंधी जी पद्धत घालून देण्यात आली होती त्याचाही विचार करा. वर्षातून एकदा प्रायश्‍चित्ताच्या दिवशी महायाजक ‘आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्‍याच्या डोक्यावर ठेवून इस्राएल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध ह्‍यांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करून व ती त्या बकऱ्‍याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमिलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून’ देत असे. (लेवी. १६:७-१०, २१, २२) यशयाने भाकीत केले, की भविष्यात एक मशीहा येईल जो अशाच प्रकारची भूमिका निभावेल. तो आपल्या “व्याधी,” आपले “क्लेश” आणि “बहुतांचे पाप” वाहून नेईल व सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा करील.यशया ५३:४-६, १२ वाचा.

१८, १९. यशया २६:१९ आणि दानीएल १२:१३ मध्ये कोणत्या आशेबद्दल सांगितले आहे?

१८ यशयामार्फत यहोवाने इस्राएल लोकांना सांगितले: “तुझे मृत जिवंत होतील, माझ्या (लोकांची) प्रेते उठतील. मातीस मिळालेल्यांनो जागृत व्हा, गजर करा; कारण तुजवरील दहिवर, हे प्रभातीचे जीवनदायी दहिवर आहे; भूमि प्रेते बाहेर टाकील.” (यश. २६:१९) इब्री शास्त्रवचनांत पुनरुत्थानाच्या व पृथ्वीवरील जीवनाच्या आशेविषयी अगदी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ, दानीएल जवळजवळ १०० वर्षांचा होता तेव्हा देवाने त्याला आश्‍वासन दिले: “तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील.”—दानी. १२:१३.

१९ पुनरुत्थानावर विश्‍वास असल्यामुळेच मार्था आपल्या प्रिय भावाबद्दल येशूला असे म्हणू शकली: “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” (योहा. ११:२४) येशूने दिलेल्या शिकवणींमुळे तसेच त्याच्या शिष्यांनी देवाच्या प्रेरणेने जे काही लिहिले त्यामुळे या आशेत काही बदल झाला का? आजही यहोवा मानवजातीला पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा देऊ करतो का? या प्रश्‍नांची उत्तरे आपण पुढच्या लेखात पाहू या.

[तळटीप]

^ परि. 10 दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! (इंग्रजी) पुस्तकातील अध्याय ६ पाहा.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• “व्यर्थतेच्या स्वाधीन” करण्यात आलेल्या मानव सृष्टीला कोणती आशा आहे?

• अब्राहामाचा पुनरुत्थानावर विश्‍वास होता हे कशावरून दिसते?

• अलीहूच्या शब्दांतून मानवजातीला कोणती आशा प्राप्त होते?

• इब्री शास्त्रवचनांमध्ये पुनरुत्थानाच्या व सार्वकालिक जीवनाच्या आशेवर कशा प्रकारे भर देण्यात आला आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[५ पानांवरील चित्र]

अलीहूच्या शब्दांतून अशी आशा मिळते, की म्हातारपण व मृत्यू यांपासून मानवांची सुटका केली जाईल

[६ पानांवरील चित्र]

दानीएलाला आश्‍वासन देण्यात आले होते की तो ‘युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठेल’