व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन —एक ख्रिस्ती आशा?

पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन —एक ख्रिस्ती आशा?

पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन —एक ख्रिस्ती आशा?

“[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही.”—प्रकटी. २१:४.

१, २. पहिल्या शतकातील अनेक यहुद्यांना पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा होती हे कशावरून म्हणता येईल?

एक श्रीमंत, प्रतिष्ठित तरुण येशूकडे धावत जाऊन त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला: “उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे?” (मार्क १०:१७) तो तरुण मनुष्य सार्वकालिक जीवनाचे वतन मिळवण्याविषयी विचारत होता. पण, सार्वकालिक जीवन कोठे? मागच्या लेखात आपण पाहिल्याप्रमाणे, कित्येक शतकांआधी देवाने यहुद्यांना पुनरुत्थानाची व पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा दिली होती. पहिल्या शतकातही बरेच यहुदी ही आशा बाळगत होते.

येशूच्या स्नेह्‍यांपैकी असणाऱ्‍या मार्थेने आपल्या मृत भावाबद्दल असे म्हटले: “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” (योहान ११:२४) मार्थेने असे म्हटले तेव्हा ती मेलेल्यांचे पृथ्वीवर पुनरुत्थान होण्याबद्दल बोलत होती. हे खरे आहे की त्या काळातील सदुक्यांचा पुनरुत्थानावर विश्‍वास नव्हता. (मार्क १२:१८) पण, जुडाईझम इन द फर्स्ट सेंचुरीज ऑफ द ख्रिश्‍चन ईरा या आपल्या पुस्तकात जॉर्ज फुट मूर असे म्हणतात: “ख्रिस्तापूर्वीच्या दुसऱ्‍या किंवा पहिल्या शतकातील लिखाणांतून हे सिद्ध होते की एका ठराविक वेळी मेलेले लोक पृथ्वीवर जिवंत केले जातील या गोष्टीवर अनेकांचा विश्‍वास होता.” येशूजवळ आलेल्या त्या श्रीमंत मनुष्यालाही पृथ्वीवरील अनंतकालिक जीवन मिळवायचे होते.

३. या लेखात कोणत्या प्रश्‍नांची चर्चा केली जाईल?

आज, ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक पंथ आणि बायबल विद्वान, पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा ही ख्रिस्ती शिकवण असल्याचे नाकारतात. उलट, मेल्यानंतर आपण परलोकात जिवंत राहू असे बहुतेकांना वाटते. म्हणूनच, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत “सार्वकालिक जीवन” हे शब्द पाहताच ते स्वर्गातील जीवनाला सूचित करतात असे अनेकांना वाटते. पण, हे खरे आहे का? येशूने सार्वकालिक जीवनाविषयी उल्लेख केला तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? या बाबतीत त्याच्या शिष्यांचा काय विश्‍वास होता? ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची शिकवण आढळते का?

“पुनरुत्पत्तीत” सार्वकालिक जीवन

४. “पुनरुत्पत्तीत” काय घडणार आहे?

स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करण्यासाठी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना पुनरुत्थित केले जाईल असे बायबलमध्ये सांगितले आहे. (लूक १२:३२; प्रकटी. ५:९, १०; १४:१-३) पण, येशू सार्वकालिक जीवनाविषयी बोलला, तेव्हा तो नेहमी याच गटाला मनात ठेवून बोलला नाही. येशूने त्या श्रीमंत माणसाला सर्व संपत्तीचा त्याग करून आपल्याला अनुसरण्याचे आमंत्रण दिले तेव्हा तो मनुष्य दुःखी होऊन निघून गेला. त्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना काय म्हटले ते विचारात घ्या. (मत्तय १९:२८, २९ वाचा.) येशूने आपल्या प्रेषितांना असे सांगितले की ते राजे या नात्याने शासन करतील व “इस्राएलाच्या बारा वंशांचा” म्हणजे स्वर्गात राज्य करणाऱ्‍या या समूहाला सोडून पृथ्वीवरील सबंध मानवजातीचा न्यायनिवाडा करतील. (१ करिंथ. ६:२) तसेच, ‘जो कोणी’ त्याला अनुसरेल त्याला प्रतिफळ मिळेल असेही त्याने म्हटले. अशा प्रत्येक व्यक्‍तीला देखील “सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल.” हे सर्व “पुनरुत्पत्तीत” घडणार आहे.

५. ‘पुनरुत्पत्ती’ म्हणजे काय?

येशूने ‘पुनरुत्पत्ती’ असे म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? ईझी टू रीड या बायबल आवृत्तीमध्ये “पुनरुत्पत्तीत” या शब्दाचे भाषांतर “नव्या युगात” असे करण्यात आले आहे. सुबोध भाषांतर या बायबल आवृत्तीत या शब्दाचे “सर्व गोष्टींचे नूतनीकरण होईल, तेव्हा” असे भाषांतर करण्यात आले आहे. येशूने या शब्दाचा वापर कोणतेही स्पष्टीकरण न देता केला, त्याअर्थी तो यहुद्यांनी शतकानुशतके बाळगलेल्या आशेच्या संदर्भातच बोलत होता हे स्पष्ट आहे. ही कोणती आशा होती? पृथ्वीवरील परिस्थितीची पुनरुत्पत्ती होईल, म्हणजेच आदाम आणि हव्वेने पाप करण्यापूर्वी सर्व गोष्टी एदेन बागेत ज्या स्थितीत होत्या त्या स्थितीत त्या पुन्हा आणल्या जातील अशी यहुद्यांना आशा होती. या पुनरुत्पत्तीमुळे, ‘नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करण्याचे’ देवाने दिलेले अभिवचन पूर्ण होईल.—यश. ६५:१७.

६. शेरडे व मेंढरे यांच्या दृष्टांतातून सार्वकालिक जीवनाच्या आशेबद्दल आपल्याला काय शिकायला मिळते?

या युगाच्या समाप्तीविषयी बोलत असताना येशूने पुन्हा एकदा सार्वकालिक जीवनाच्या आशेचा उल्लेख केला. (मत्त. २४:१-३) त्याने म्हटले: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल; त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करितो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील.” जे न्यायदंडास पात्र ठरतील “ते तर सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील; आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील.” ज्यांना सार्वकालिक जीवन मिळते ते असे “नीतिमान” लोक आहेत जे आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या ख्रिस्ताच्या ‘बंधूंना’ एकनिष्ठपणे पाठिंबा देतात. (मत्त. २५:३१-३४, ४०, ४१, ४५, ४६) या अभिषिक्‍त जनांना स्वर्गातील राज्यात शासन करण्याकरता निवडण्यात आले आहे. त्याअर्थी, “नीतिमान” म्हटलेले लोक साहजिकच त्या राज्याचे पृथ्वीवरील प्रजाजन असले पाहिजेत. बायबलमध्ये असे भाकीत करण्यात आले आहे, की यहोवाने नेमलेल्या राजाची प्रजा समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत असेल. (स्तो. ७२:८) ही प्रजा पृथ्वीवर सार्वकालिक जीवन उपभोगेल.

योहानाचे शुभवर्तमान काय म्हणते?

७, ८. येशू कोणत्या दोन वेगवेगळ्या आशांबद्दल निकदेमाशी बोलला?

मत्तय, मार्क आणि लूक यांच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे, येशूने “सार्वकालिक जीवन” या शब्दांचा वर उल्लेख केलेल्या प्रसंगी उपयोग केला. योहानाच्या शुभवर्तमानात येशूने सार्वकालिक जीवनाबद्दल जे म्हटले त्याचा सुमारे १७ वेळा उल्लेख आढळतो. यांपैकी काहींचे आपण परीक्षण करू या आणि येशूने सार्वकालिक जीवनाच्या आशेबद्दल काय म्हटले होते ते जाणून घेऊ या.

योहानाच्या शुभवर्तमानानुसार सार्वकालिक जीवनाविषयी येशू सर्वप्रथम, निकदेम नावाच्या एका परूशी मनुष्याशी बोलला. त्याने निकदेमाला असे सांगितले: “पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीहि देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही.” स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणाऱ्‍यांनी ‘नव्याने जन्म’ घेतला पाहिजे. (योहा. ३:३-५) पण, येशू इतकेच बोलून थांबला नाही. पुढे तो सर्व जगासाठी उपलब्ध असलेल्या आशेविषयी देखील बोलला. (योहान ३:१६ वाचा.) येशू आपल्या अभिषिक्‍त अनुयायांसाठी स्वर्गातील सार्वकालिक जीवनाविषयी आणि इतरांसाठी पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाविषयी बोलत होता.

९. येशू एका शोमरोनी स्त्रीशी कोणत्या आशेबद्दल बोलला?

जेरूसलेममध्ये निकदेमाशी बोलल्यानंतर, येशू उत्तरेकडे प्रवास करून गालीलात गेला. वाटेत शोमरोनातील सूखार नावाच्या नगराजवळील याकोबाच्या झऱ्‍यापाशी त्याला एक स्त्री भेटली. त्याने तिला सांगितले: “मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीहि तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल.” (योहा. ४:५, ६, १४) हे पाणी सबंध मानवजातीला सार्वकालिक जीवन पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी देवाने केलेल्या सर्व तरतुदींना सूचित करते. जे पृथ्वीवर राहतील त्यांचा देखील यात समावेश होतो. प्रकटीकरण या पुस्तकात देव स्वतः असे म्हणत असल्याचे वर्णन करण्यात आले आहे: “मी तान्हेल्याला जीवनाच्या झऱ्‍याचे पाणी फुकट देईन.” (प्रकटी. २१:५, ६; २२:१७) अशा प्रकारे, येशू शोमरोनी स्त्रीशी केवळ राज्याच्या अभिषिक्‍त वारसांना मिळणाऱ्‍या सार्वकालिक जीवनाविषयी बोलला नाही, तर त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी ज्यांना पृथ्वीवर राहण्याची आशा आहे त्यांना मिळणाऱ्‍या सार्वकालिक जीवनाविषयीही बोलला.

१०. बेथेस्दा तळ्याजवळ एका माणसाला बरे केल्यानंतर, येशूने त्याचा विरोध करणाऱ्‍यांना सार्वकालिक जीवनाबद्दल काय सांगितले?

१० पुढच्या वर्षी, येशू पुन्हा जेरूसलेममध्ये होता. तेथे बेथेस्दा तळ्याजवळ त्याने एका रोगी माणसाला बरे केले. त्याच्या या कृत्याची निंदा करणाऱ्‍या यहुद्यांना त्याने असे सांगितले: “पुत्र पित्याला जे काही करिताना पाहतो त्यावाचून काहीहि त्याला स्वतः होऊन करिता येत नाही.” “न्याय करण्याचे सर्व काम [पित्याने] पुत्राकडे सोपवून दिले आहे,” असे त्यांना सांगितल्यावर येशूने म्हटले: “जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे [“प्राप्त होते,” NW].” येशूने असेही म्हटले: “कबरेतील सर्व माणसे [मनुष्याच्या पुत्राची] वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहा. ५:१-९, १९, २२, २४-२९) येशू आपला विरोध करणाऱ्‍या यहुद्यांना असे सांगत होता, की पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची जी आशा ते बाळगत होते ती पूर्ण करण्यासाठी देवाने त्याला नेमले होते आणि मेलेल्यांना पुन्हा उठवण्याद्वारे तो ही आशा पूर्ण करणार होता.

११. योहान ६:४८-५१ मधील अहवालात येशूने जे काही म्हटले त्यात पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा समाविष्ट आहे हे आपल्याला कशावरून समजते?

११ गालीलात, येशू चमत्कारिक रीत्या अन्‍न पुरवेल या आशेने हजारो लोक त्याच्या मागे जाऊ लागले. पण, येशूने त्यांना एका वेगळ्या प्रकारच्या भाकरीविषयी म्हणजे ‘जीवनाच्या भाकरीविषयी’ सांगितले. (योहान ६:४०, ४८-५१ वाचा.) त्याने म्हटले: ‘जी भाकर मी देईन ती माझा देह आहे.’ येशूने आपले जीवन केवळ त्याच्यासोबत स्वर्गीय राज्यात राज्य करणाऱ्‍यांसाठीच अर्पण केले नव्हते, तर त्याने ते “जगाच्या जीवनासाठी” म्हणजे तारण प्राप्त करण्यास योग्य ठरणाऱ्‍या मानवांसाठी देखील अर्पण केले होते. “ह्‍या भाकरीतून जो कोणी खाईल,” म्हणजेच जो कोणी मानवजातीचे तारण करण्याचे सामर्थ्य असलेल्या येशूच्या बलिदानावर विश्‍वास ठेवील तो सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची आशा बाळगू शकतो. खरोखर, ‘सर्वकाळ जगण्याविषयी’ येशूने जे काही म्हटले त्यात मशीहाच्या शासनादरम्यान पृथ्वीवर सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची यहुद्यांनी पूर्वापार बाळगलेली आशा समाविष्ट होती.

१२. ‘मी आपल्या मेंढरांना सार्वकालिक जीवन देतो,’ असे जेव्हा येशूने आपल्या विरोधकांना सांगितले तेव्हा तो कोणत्या आशेबद्दल बोलत होता?

१२ त्यानंतर, जेरूसलेममध्ये पुनःस्थापनेच्या सणाच्या वेळी येशूने आपल्या विरोधकांना असे सांगितले: “तुम्ही विश्‍वास ठेवीत नाही. कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात; मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो.” (योहा. १०:२६-२८) येथे येशू फक्‍त स्वर्गातील जीवनाबद्दल बोलत होता का, की पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवनाबद्दलही बोलत होता? येशूने नुकतेच त्याच्या अनुयायांचे सांत्वन करताना म्हटले होते: “हे लहान कळपा, भिऊ नको; कारण तुम्हास ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” (लूक १२:३२) पण, याच पुनःस्थापनेच्या सणाच्या वेळी त्याने असे म्हटले: “ह्‍या मेंढवाड्यातली नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीहि मला आणली पाहिजेत.” (योहा. १०:१६) त्याअर्थी, येशू आपल्या विरोधकांशी दोन्ही आशांविषयी बोलला. ‘लहान कळपासाठी’ असलेली स्वर्गातील जीवनाची आशा आणि लाखो ‘दुसऱ्‍या मेंढरांसाठी’ असलेली पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा.

स्पष्टीकरणाची गरज नसलेली आशा

१३. “तू माझ्याबरोबर नंदनवनात असशील,” असे येशूने म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?

१३ अगदी वधस्तंभावर यातना सहन करत असताना देखील येशूने मानवजातीच्या आशेची पुन्हा एकदा पक्की खातरी दिली. त्याच्या बाजूला वधस्तंभावर असलेल्या एका अपराध्याने त्याला म्हटले: “येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” येशूने त्याला वचन दिले: “मी तुला आज खचित सांगतो, की तू माझ्याबरोबर नंदनवनात असशील.” (लूक २३:४२, ४३, NW) हा मनुष्य यहुदी असल्यामुळे नंदनवनाविषयी त्याला खुलासा करून सांगण्याची गरज येशूला भासली नाही. येणाऱ्‍या जगात पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाच्या आशेविषयी त्याला माहीत होते.

१४. (क) स्वर्गीय आशेबद्दल प्रेषितांना समजणे कठीण होते हे कशावरून दिसते? (ख) येशूच्या अनुयायांना स्वर्गीय आशेबद्दल अगदी स्पष्ट समज कधी मिळाली?

१४ पण, स्वर्गीय जीवनाच्या आशेविषयी बोलताना मात्र येशूला स्पष्टीकरण द्यावे लागले. येशूने आपल्या शिष्यांना, तो त्यांच्यासाठी जागा तयार करण्यासाठी स्वर्गात जात असल्याचे सांगितले, तेव्हा त्याचे म्हणणे त्यांना समजले नाही. (योहान १४:२-५ वाचा.) त्याने नंतर त्यांना असे सांगितले: “मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत; तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल.” (योहा. १६:१२, १३) सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या वेळी भविष्यात राजे होण्यासाठी येशूच्या शिष्यांचा देवाच्या आत्म्याद्वारे अभिषेक करण्यात आल्यानंतर, त्यांची सिंहासने स्वर्गात असतील हे त्यांना समजले. (१ करिंथ. १५:४९; कलस्सै. १:५; १ पेत्र १:३, ४) स्वर्गातील जीवनाची आशा ही त्यांच्याकरता सर्वस्वी नवीन गोष्ट होती. आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील प्रेरित पत्रांमध्ये यावर भर देण्यात आला. पण, या पत्रांतून पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाबद्दल असलेल्या मानवजातीच्या आशेला दुजोरा मिळतो का?

प्रेरित पत्रांत काय सांगितले आहे?

१५, १६. पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या इब्री लोकांस पत्रातून व पेत्राच्या शब्दांतून कशा प्रकारे दिसते?

१५ इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रात आपल्या ख्रिस्ती बांधवांना प्रेषित पौलाने “पवित्र बंधुंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदारहो” असे म्हणून संबोधले. पण, देवाने ‘भावी जग’ येशूच्या अधीन केले आहे असेही त्याने म्हटले. (इब्री २:३, ५; ३:१) ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, ‘जग’ असे भाषांतर केलेला मूळ शब्द नेहमी मानवांनी भरलेल्या पृथ्वीला सूचित करतो. त्याअर्थी, ‘भावी जग’ हे भविष्यात येशू ख्रिस्ताच्या शासनाखाली असलेले पृथ्वीवरील व्यवस्थीकरण आहे. त्यावेळी, येशू देवाने दिलेले हे अभिवचन पूर्ण करेल: “नीतिमान्‌ पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तो. ३७:२९.

१६ मानवजातीच्या भवितव्याबद्दल लिहिण्यासाठी प्रेषित पेत्रालाही प्रेरणा मिळाली होती. त्याने लिहिले: “आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्‍तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.” (२ पेत्र ३:७) स्वर्गाद्वारे सूचित होणाऱ्‍या सध्याच्या सरकारांची व दुष्ट मानवी समाजाची जागा कोण घेतील? (२ पेत्र ३:१३ वाचा.) त्यांची जागा “नवे आकाश” म्हणजे देवाचे मशीही राज्य आणि “नवी पृथ्वी” म्हणजे खऱ्‍या देवाची उपासना करणाऱ्‍यांचा नीतिमान मानव समाज घेईल.

१७. प्रकटीकरण २१:१-४ मध्ये मानवजातीच्या आशेचे वर्णन कशा प्रकारे करण्यात आले आहे?

१७ सबंध मानवजात परिपूर्ण स्थितीला आणली जाईल याचे अतिशय सुंदर वर्णन बायबलच्या शेवटच्या पुस्तकात करण्यात आले आहे. (प्रकटीकरण २१:१-४ वाचा.) एदेन बागेत पहिल्या मानवाने पाप करून परिपूर्णता गमावली तेव्हापासूनच विश्‍वासू मानवांनी ती पुन्हा प्राप्त करण्याची आशा बाळगली आहे. नीतिमान लोक कधीही म्हातारे न होता पृथ्वीवरील नंदनवनात सर्वकाळ जगतील. मानवजातीची ही आशा इब्री शास्त्रवचनांवर आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांवर दृढपणे आधारित आहे. आणि ही आशा आजही यहोवाच्या विश्‍वासू सेवकांचे मनोधैर्य वाढवते.—प्रकटी. २२:१, २.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• येशूने ‘पुनरुत्पत्ती’ म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?

• येशू निकदेमाशी कशाबद्दल बोलला?

• येशूने आपल्या शेजारी वधस्तंभावर असलेल्या अपराध्याला कोणते वचन दिले?

• पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा पक्की आहे हे इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रातून व पेत्राच्या शब्दांतून कशा प्रकारे दिसते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८ पानांवरील चित्र]

मेंढरांसमान लोकांना पृथ्वीवर सार्वकालिक जीवन मिळेल

[१० पानांवरील चित्रे]

येशू इतरांशी पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाबद्दल बोलला