व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘शुभवार्ता कळविण्याच्या दिवशी’ विचलित होऊ नका

‘शुभवार्ता कळविण्याच्या दिवशी’ विचलित होऊ नका

‘शुभवार्ता कळविण्याच्या दिवशी’ विचलित होऊ नका

त्या चार कोड्यांना काय करावे कळेना. नगराच्या वेशीजवळ त्यांना कोणीही दान दिले नव्हते. शिवाय, नगरात जाण्यातही काही अर्थ नव्हता, कारण अन्‍नधान्याच्या किंमती आकाशाला भिडल्या होत्या. अरामी सैन्याने शोमरोनाला वेढा घातला होता आणि नगरातील लोकांनी नाइलाजाने शरण यावे म्हणून नगरात येणारा अन्‍नधान्याचा साठा पूर्णपणे बंद केला होता. उपासमारीने लोकांची इतकी वाईट अवस्था झाली होती, की नगरात नरभक्षणाचीही एक घटना घडल्याचे उजेडात आले होते.—२ राजे ६:२४-२९.

कोड्यांनी विचार केला, ‘अरामी सैन्याच्या छावणीत जावं का? असंही मरायचंच आहे.’ रात्रीच्या अंधाराचा आड घेऊन ते निघाले. ते सैन्याच्या छावणीजवळ येऊन पोचले तेव्हा सगळीकडे शुकशुकाट होता. एकही पहारेकरी दिसत नव्हता. घोडे, गाढवे बांधलेली होती, पण एकाही सैनिकाचा पत्ता नव्हता. त्या चौघांनीही एका तंबूत डोकावून पाहिले. तंबूत कोणीही नव्हते, पण खाण्यापिण्याच्या भरपूर वस्तू होत्या. त्यांनी जे हवे ते घेऊन पोटभर खाल्ले. त्यांना सोने, चांदी, कपडे आणि इतर मौल्यवान वस्तूही दिसल्या. त्या त्यांनी घेतल्या आणि जाऊन लपवल्या. मग, ते आणखी वस्तू घेण्यासाठी परत आले. पण, संपूर्ण छावणी अशी ओसाड का पडली होती? यहोवाने चमत्कारिक रीत्या अरामी सैन्याला एक मोठी सेना त्यांच्यावर चाल करून येत असल्याचा आवाज ऐकवला होता. आपल्यावर हल्ला होत आहे असे समजून अरामी सैनिकांनी सर्व काही तेथेच सोडले व जीव मुठीत घेऊन पळाले.

चौघे कोडी मौल्यवान वस्तू भराभर गोळा करत होते. पण, तेवढ्यात त्यांना शोमरोनातील उपाशी लोकांची आठवण झाली आणि त्यांच्या मनाला बोचणी होऊ लागली. ते एकमेकांना म्हणाले: “आपण करीत आहो ते बरे नाही; आज शुभवार्ता कळविण्याचा दिवस आहे.” म्हणून, ते लगबगीने शोमरोनाला परतले आणि त्यांनी जे काही पाहिले होते त्याची शुभवार्ता शोमरोनात कळवली.—२ राजे ७:१-११.

आज आपण ज्या काळात राहत आहोत त्यालाही “शुभवार्ता कळविण्याचा दिवस” म्हणता येईल. ‘युगाच्या समाप्तीच्या चिन्हातील’ एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल येशूने असे म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्त. २४:३, १४) या गोष्टीचा आपल्यावर कसा प्रभाव पडला पाहिजे?

चिंता-विवंचना आपल्याला भारावून टाकू शकतात

कोड्यांना इतका आनंद झाला होता की थोड्या वेळासाठी का होईना, पण शोमरोनातील उपाशी लोकांचा त्यांना विसर पडला. स्वतःसाठी काय काय घेता येईल या नादात त्यांनी दुसरा कोणताच विचार केला नाही. आपल्याबाबतीतही असेच घडण्याची शक्यता आहे का? जागोजागी पडणारे “दुष्काळ” हे दुष्ट जगाच्या नाशाकडे इशारा करणाऱ्‍या संयुक्‍त चिन्हाचा भाग आहेत. (लूक २१:७, ११) येशूने आपल्या अनुयायांना असा इशारा दिला: ‘तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित्‌ अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जातील.’ (लूक २१:३४) तेव्हा, ख्रिस्ती या नात्याने, आपल्या जीवनातील चिंता-विवंचनांमुळे आपण “शुभवार्ता कळविण्याचा दिवस” म्हटलेल्या काळात राहत आहोत या गोष्टीचा स्वतःला कधीही विसर पडू देऊ नये.

ब्लेसिंग नावाच्या एका ख्रिस्ती बहिणीचे उदाहरण विचारात घ्या. तिने आपल्या वैयक्‍तिक इच्छा-आकांक्षांना जीवनात प्राधान्य दिले नाही. तिने पायनियर म्हणून सेवा केली, आवश्‍यक शिक्षण पूर्ण केले, कालांतराने बेथेलमधील एका बांधवाशी तिचे लग्न झाले आणि ती बेनीनमधील बेथेल कुटुंबाची सदस्य बनली. ती म्हणते: “मी बेथेलमध्ये खोल्यांची साफ-सफाई करते आणि मला या कामात खूप आनंद मिळतो.” ब्लेसिंग गेल्या १२ वर्षांपासून आनंदाने पूर्ण वेळची सेवा करत आहे. आणि मागे वळून पाहताना तिला या गोष्टीचा आनंद वाटतो की “शुभवार्ता कळविण्याचा दिवस” म्हटलेल्या या काळात ती विचलित झाली नाही.

वेळखाऊ गोष्टींपासून दूर राहा

आपल्या ७० शिष्यांना पाठवताना येशूने त्यांना असे म्हटले: “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत; म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा.” (लूक १०:२) कापणीत दिरंगाई केल्यास पिकांचे नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे, प्रचार कार्याकडे दुर्लक्ष केल्यास लोकांचे जीव जाऊ शकतात. म्हणून येशूने म्हटले: “वाटेने कोणाला सलाम करू नका.” (लूक १०:४, पं.र.भा.) “सलाम” असे भाषांतरित केलेल्या मूळ भाषेतील शब्दाचा अर्थ फक्‍त जाता-जाता एखाद्याला “कसंकाय?” किंवा “नमस्कार” म्हणणे एवढाच होत नाही. तर, यामध्ये मित्रांना भेटताना आलिंगन देणे आणि गप्पा मारणे हा अर्थ देखील समाविष्ट होऊ शकतो. म्हणूनच, येशूने आपल्या शिष्यांना वेळ खाणाऱ्‍या अनावश्‍यक गोष्टींपासून दूर राहण्यास व आपल्या वेळेचा सदुपयोग करण्यास सांगितले. कारण, ते घोषणा करत असलेला संदेश तातडीचा होता.

अनावश्‍यक गोष्टींमध्ये आपला किती वेळ वाया जाऊ शकतो याचा विचार करा. कितीतरी वर्षांपासून जगातील बऱ्‍याच भागांत लोकांचा बहुतेक वेळ टीव्ही पाहण्यातच वाया जातो असे आढळून आले आहे. मोबाईल फोन आणि कंप्यूटर यांच्या वापराबद्दल काय म्हणता येईल? ब्रिटनमध्ये घेतलेल्या १,००० जणांच्या एका सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले की, “ब्रिटनमधील एक सर्वसाधारण व्यक्‍ती दर दिवशी फोनवर बोलण्यात ८८ मिनिटे, मोबाईलवर बोलण्यात ६२ मिनिटे, ई-मेल पाठवण्यात ५३ मिनिटे आणि मोबाईलवरून संदेश पाठवण्यात २२ मिनिटे घालवते.” हा वेळ, एक साहाय्यक पायनियर दररोज सेवाकार्यात जितका वेळ खर्च करतो त्याच्या दुप्पटपेक्षा जास्त आहे! तुमच्या बाबतीत काय? या गोष्टींवर तुम्ही किती वेळ खर्च करता?

अर्न्‌स्ट आणि हिल्डगार्ट झेलीगर हे जोडपे आपल्या वेळेचा काळजीपूर्वक उपयोग करण्याविषयी जागरूक होते. त्या दोघांनी मिळून ४० पेक्षा जास्त वर्षे नात्सी छळ छावण्यांमध्ये आणि कम्युनिस्टांच्या तुरुंगांमध्ये घालवली होती. त्यांच्या सुटकेनंतर, पृथ्वीवरील त्यांच्या जीवनाच्या शेवटापर्यंत त्यांनी पायनियर सेवा केली.

अनेकांना त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्याची इच्छा होती. हे जोडपे दिवसातला आपला बहुतेक वेळ त्यांना आलेली पत्रे वाचण्यात आणि त्यांची उत्तरे देण्यात खर्च करू शकले असते. पण, त्यांनी यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व दिले.

अर्थात, सर्वांनाच आपल्या प्रिय व्यक्‍तींच्या संपर्कात राहावेसे वाटते. आणि त्यात काहीच गैर नाही. आपल्या रोजच्या कामांतून थोडाफार वेळ विरंगुळ्यासाठी काढणे फायद्याचे आहे. पण तरीही, सुवार्तेचा प्रचार करण्याच्या या काळात वेळ खाणाऱ्‍या गोष्टींना नियंत्रणात ठेवण्याची खबरदारी आपण घेतलीच पाहिजे.

सुवार्तेची पूर्णपणे घोषणा करा

“शुभवार्ता कळविण्याचा दिवस” म्हटलेल्या काळात आपण जगत आहोत ही आपल्यासाठी किती आनंदाची गोष्ट आहे. तर मग, ते चार कोडी सुरुवातीला विचलित झाले, त्याप्रमाणे आपण कधीही विचलित होऊ नये. त्यांनी नंतर जे म्हटले ते आठवा: “आपण करीत आहो ते बरे नाही.” त्याचप्रमाणे, आपल्या इच्छा-आकांक्षांना किंवा वेळखाऊ गोष्टींना आपण सेवाकार्यात पुरेपूर सहभाग घेण्यापासून आपले लक्ष विचलित करू दिल्यास ते योग्य ठरणार नाही.

या बाबतीत प्रेषित पौलाचे उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. त्याने आपल्या सेवाकार्याच्या सुरुवातीच्या २० वर्षांकडे मागे वळून पाहताना असे लिहिले: “मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे.” (रोम. १५:१८, १९) त्याने कोणत्याही गोष्टीमुळे आपला आवेश मंदावू दिला नाही. त्याच्यासारखेच आपणही “शुभवार्ता कळविण्याचा दिवस” म्हटलेल्या या काळात राज्य संदेशाची घोषणा आवेशाने करत राहू या.

[२८ पानांवरील चित्र]

ब्लेसिंगने स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना आपल्या पूर्ण वेळच्या सेवेच्या आड येऊ दिले नाही

[२९ पानांवरील चित्र]

झेलीगर दांपत्य आपल्या वेळेचा काळजीपूर्वक उपयोग करण्याविषयी जागरूक होते