व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एके काळी तुमच्याजवळ असलेला विशेषाधिकार तुम्ही पुन्हा मिळवू शकता का?

एके काळी तुमच्याजवळ असलेला विशेषाधिकार तुम्ही पुन्हा मिळवू शकता का?

एके काळी तुमच्याजवळ असलेला विशेषाधिकार तुम्ही पुन्हा मिळवू शकता का?

ख्रिस्ती मंडळीत एकेकाळी तुम्ही जबाबदारीच्या पदावर सेवा करत होता का? कदाचित सेवा सेवक किंवा वडील या नात्याने? किंवा तुम्ही एखाद्या प्रकारच्या पूर्ण वेळेच्या सेवेत होता का? या सेवेत तुम्हाला नक्कीच मनस्वी आनंद व समाधान मिळाले असेल. पण नंतर, काही कारणास्तव तुम्हाला तो विशेषाधिकार गमवावा लागला असेल.

एकाएकी घरच्यांची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे कदाचित तुम्हाला या विशेषाधिकाराचा त्याग करावा लागला असेल. किंवा मग, वाढत्या वयोमानामुळे अथवा खालावलेल्या प्रकृतीमुळे तुम्हाला असा निर्णय घ्यावा लागला असेल. पण याचा अर्थ तुम्ही कमी पडलात किंवा तुम्ही अपयशी ठरलात असा होत नाही. (१ तीम. ५:८) पहिल्या शतकातल्या फिलिप्पाचे उदाहरण घ्या. तो एक मिशनरी म्हणून सेवा करत होता, पण नंतर तो कैसरीयात स्थायिक झाला जिथे राहून तो आपल्या कुटुंबाची देखभाल करत होता. (प्रे. कृत्ये २१:८, ९) प्राचीन इस्राएलातल्या दावीद राजाने देखील उतारवयात आपला पुत्र शलमोन याच्यावर राज्याचा कारभार सोपवला. (१ राजे १:१, ३२-३५) तरीसुद्धा, फिलिप्प व दावीद या दोघांबद्दल यहोवाच्या मनात असलेले प्रेम व कदर किंचितही कमी झाली नाही. आणि आजही लोकांना त्यांच्याबद्दल तितकाच आदर वाटतो.

दुसरीकडे पाहता, तुमचा सेवेचा विशेषाधिकार तुमच्याकडून काढून घेण्यात आला असेल. कदाचित, चुकीच्या आचरणामुळे किंवा कौटुंबिक समस्यांमुळे असे करण्यात आले असावे. (१ तीम. ३:२, ४, १०, १२) तुमच्याविरुद्ध केलेली ही कारवाई तुम्हाला कदाचित अनावश्‍यक वाटली असेल. आणि त्याबद्दल तुमच्या मनात अजूनही राग असेल.

विशेषाधिकार पुन्हा मिळवता येतात

सेवेचा विशेषाधिकार एकदा गमावल्यास तो पुन्हा मिळवणे अशक्य आहे का? असा विचार करण्याचे कारण नाही. पण, पुन्हा एकदा सेवेचा विशेषाधिकार मिळवण्यासाठी तुमच्या मनात तशी प्रबळ इच्छा असली पाहिजे. (१ तीम. ३:१) पण अशी इच्छा का बाळगावी? तुम्ही देवाला समर्पण का केले होते याचा विचार करा. यहोवाबद्दल आणि त्याच्या सेवकांबद्दल प्रेम असल्यामुळेच नाही का? जर तुम्ही पुन्हा एकदा विशिष्ट सेवेत पदार्पण करण्याद्वारे तेच प्रेम दाखवण्यास तयार असाल, तर विशेषाधिकार गमावण्यापूर्वी व त्यानंतरही तुमच्याजवळ असलेल्या अनुभवाचा यहोवा उपयोग करू शकतो.

इस्राएल राष्ट्राने स्वतःच्याच चुकांमुळे यहोवाची सेवा करण्याचा विशेष हक्क गमावला होता. पण तरीसुद्धा यहोवाने त्यांना हे आश्‍वासन दिले: “मी परमेश्‍वर बदलणारा नव्हे म्हणून याकोब वंशजहो, तुम्ही नष्ट झाला नाही.” (मला. ३:६) इस्राएलांवर यहोवाचे प्रेम होते आणि आपल्या सेवेत तो पुढेही त्यांचा उपयोग करू इच्छित होता. भविष्यात आपल्या सेवेकरता तुमचाही उपयोग करून घेण्यास यहोवा तितकाच इच्छुक आहे. पण, सध्याच्या स्थितीत तुमच्याकडून तुम्ही कोणते प्रयत्न करू शकता? सेवेचे विशेषाधिकार आपल्याला आपल्या कौशल्यांमुळे, क्षमतांमुळे नव्हे, तर यहोवासोबतच्या आपल्या मजबूत नातेसंबंधामुळे मिळतात. त्यामुळे, आता तुमच्यावर मंडळीत जास्तीच्या जबाबदाऱ्‍या नसताना आध्यात्मिकदृष्ट्या अधिक सुदृढ होण्याकडे लक्ष द्या.

विश्‍वासात ‘खंबीर होण्यासाठी’ तुम्ही ‘परमेश्‍वर व त्याचे सामर्थ्य ह्‍यांचा शोध केला पाहिजे.’ (१ करिंथ. १६:१३; स्तो. १०५:४) असे करण्याचा एक मार्ग म्हणजे प्रामाणिक मनाने प्रार्थना करणे. आपल्या परिस्थितीबद्दल प्रार्थनेत यहोवाशी बोलताना त्याच्यापाशी आपल्या भावना व्यक्‍त करा आणि त्याचा आत्मा देण्यासाठी त्याला विनंती करा. असे केल्याने, तुम्ही यहोवाच्या आणखी जवळ याल आणि खंबीर व्हाल. (स्तो. ६२:८; फिलिप्पै. ४:६, १३) आध्यात्मिकदृष्ट्या दृढ होण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे देवाच्या वचनाचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करणे. सध्या तुमच्यावर कमी जबाबदाऱ्‍या असल्यामुळे, वैयक्‍तिक अभ्यासाकडे व कौटुंबिक अभ्यासाकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ शकता. पूर्वी या गोष्टी नियमित स्वरूपाने करणे कदाचित तुम्हाला कठीण गेले असेल. पण, आता तुम्ही त्या नियमित रीत्या करण्याचा क्रम पुन्हा स्थापित करू शकता.

अर्थातच, तुम्ही अजूनही यहोवाचे एक साक्षीदार आहात. (यश. ४३:१०-१२) आपल्या सर्वांजवळ असलेला सगळ्यात मोठा विशेषाधिकार म्हणजे आपण “देवाचे सहकारी” आहोत. (१ करिंथ. ३:९) क्षेत्र सेवेत जास्त सहभाग घेणे हा तुमची स्वतःची आणि तुमच्यासोबत सेवा करणाऱ्‍या इतरांची आध्यात्मिकता दृढ करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे.

नकारात्मक भावनांवर मात करणे

सेवेचा विशेषाधिकार गमावल्यामुळे तुम्हाला खजिल झाल्यासारखे किंवा शरमिंदे वाटत असेल. त्यामुळे, आपला निर्दोषपणा सिद्ध करण्यास कदाचित तुम्ही प्रवृत्त व्हाल. पण, जबाबदार पदावर असलेल्या बांधवांनी तुमची बाजू ऐकून घेतल्यावरही तुमच्याकडून विशेषाधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतल्यास काय? तुमच्या मनात नकारात्मक भावना घर करू शकतात. आणि यामुळे सेवेचा विशेषाधिकार पुन्हा मिळवण्यास किंवा या अनुभवातून शिकण्यास तुम्हाला कठीण जाऊ शकते. नकारात्मक भावनांवर कशा प्रकारे मात केली जाऊ शकते याबद्दल आपण ईयोब, मनश्‍शे आणि योसेफ यांची उदाहरणे विचारात घेऊ या.

ईयोब यहोवाच्या उपासनेत इतरांच्या वतीने पुढाकार घेत असे. कुलपित्यांच्या काळात एक वडीलधारी पुरुष या नात्याने त्याच्या शब्दाला मान होता व तो लोकांचा न्यायनिवाडा करत असे. (ईयो. १:५; २९:७-१७, २१-२५) मग ऐन उमेदीच्या काळात ईयोबाने आपले सर्वकाही म्हणजे धनसंपत्ती, मुलेबाळे आणि आरोग्य गमावले. याबरोबरच पूर्वी त्याचा मान-सन्मान करणारे लोकही त्याला तुच्छ लेखू लागले. ईयोबाने म्हटले: “जे मजहून अल्प वयाचे आहेत, . . . ते माझी टवाळी करितात.”—ईयो. ३०:१.

आपण पूर्णपणे निर्दोष आहोत असे ईयोबाला वाटत होते. आणि देवासमोर आपला निर्दोषपणा सिद्ध करायची त्याची इच्छा होती. (ईयो. १३:१५) पण, त्याने यहोवावर विसंबून राहण्याची तयारी दाखवली आणि त्यामुळे चांगला परिणाम घडून आला. त्याचा दृष्टिकोन, विशेषतः त्याच्यावर आलेल्या परीक्षांप्रती त्याची मनोवृत्ती पूर्णपणे योग्य नव्हती आणि ती बदलण्याची गरज होती याची त्याला जाणीव झाली. (ईयो. ४०:६-८; ४२:३, ६) त्याच्या या नम्र मनोवृत्तीमुळे त्याला देवाकडून विपुल आशीर्वाद मिळाले.—ईयो. ४२:१०-१३.

तुमच्या स्वतःच्या चुकीमुळे जर तुमचा विशेषाधिकार तुमच्या हातून गेला असेल तर यहोवा आणि मंडळीतले बांधव खरोखर आपल्याला क्षमा करून सर्वकाही विसरून जातील का असा विचार कदाचित तुमच्या मनात येईल. यहूदाच्या मनश्‍शे राजाचे उदाहरण लक्षात घ्या. “परमेश्‍वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्यास संताप आणिला.” (२ राजे २१:६) तरीसुद्धा, मनश्‍शे पुन्हा एकदा यहोवाची सेवा करू लागला आणि यहोवाने त्याला त्याचे राजपद परत दिले व तो शेवटपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहिला. हे कसे काय घडून आले?

मनश्‍शेने कालांतराने देवाचे ताडन नम्रपणे स्वीकारल्यामुळे असे घडले. सुरुवातीला, यहोवाकडून मिळणाऱ्‍या चेतावण्यांकडे त्याने दुर्लक्ष केल्यामुळे यहोवाने त्याच्याविरुद्ध अश्‍शूऱ्‍यांना पाठवले होते. त्यांनी त्याला पकडून बेड्या घालून दूर बॅबिलोनला नेले. तेथे मनश्‍शे “आपला देव परमेश्‍वर यास शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला. त्याने त्याची प्रार्थना केली.” मनश्‍शेने मनःपूर्वक पश्‍चात्ताप करून चांगली कार्ये केल्यामुळे यहोवाने त्याला क्षमा केली.—२ इति. ३३:१२, १३.

गमावलेले विशेषाधिकार सहसा लगेच परत मिळत नाहीत. पण कालांतराने, कदाचित लहानसहान जबाबदाऱ्‍या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. तुम्ही या जबाबदाऱ्‍या स्वीकारून त्या विश्‍वासूपणे पार पाडल्यास तुमच्यावर आणखी जबाबदाऱ्‍या सोपवल्या जाण्याची शक्यता आहे. अर्थात हे सर्व अगदी सहजासहजी घडेल असे नाही. बरेचदा निराशा होण्याचीही शक्यता आहे. तरीही, हार न मानता सोपवलेल्या जबाबदाऱ्‍या मनापासून पूर्ण केल्यास उत्तम प्रतिफळ पदरी पडेल.

याकोबाचा पुत्र योसेफ याचा विचार करा. तो १७ वर्षांचा असताना त्याच्या भावांनी त्याला गुलाम म्हणून विकले. हा खरेतर अन्याय होता. (उत्प. ३७:२, २६-२८) त्याने आपल्या भावांकडून अशा प्रकारच्या वागणुकीची अपेक्षा देखील केली नव्हती. पण, याही परिस्थितीत योसेफ जुळवून घेण्यास तयार होता. आणि यहोवाच्या आशीर्वादाने त्याला त्याच्या “धन्याच्या घरावर नेमण्यात आले.” (उत्प. ३९:२, NW) काही काळाने, योसेफाला तुरुंगात टाकण्यात आले. पण, तो विश्‍वासू राहिला आणि यहोवा त्याच्या पाठीशी होता, त्यामुळे कालांतराने तुरुंगातील कारभार त्याच्यावर सोपवण्यात आला.—उत्प. ३९:२१-२३.

आपल्यासोबत जे घडत आहे त्यामागे एक उद्देश आहे हे योसेफाला माहीत नव्हते. तरीही, आपल्या परीने जे जमेल ते तो करत राहिला. त्यामुळे, प्रतिज्ञात संतती जिच्यातून येणार होती त्या वंशावळीचे संरक्षण करण्यासाठी यहोवा त्याचा उपयोग करू शकला. (उत्प. ३:१५; ४५:५-८) अर्थात, योसेफासारखी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडण्याची आज आपल्यापैकी कोणीही अपेक्षा करू शकत नाही, तरीही यहोवाच्या सेवकांना जे विशेषाधिकार मिळतात ते त्याच्या आशीर्वादानेच मिळतात हे या प्रेरित अहवालातून दिसते. तेव्हा योसेफाचे अनुकरण करण्याद्वारे तुम्हालाही असा आशीर्वाद देण्याची यहोवाला संधी द्या.

खडतर अनुभवांतून धडे घेणे

ईयोब, मनश्‍शे आणि योसेफ या तिघांनाही आयुष्यात कटू अनुभवांतून जावे लागले. पण, यहोवाने त्यांच्या आयुष्यात जी परिस्थिती येऊ दिली ती त्यांनी स्वीकारली आणि त्यातून ते महत्त्वपूर्ण धडे शिकले. त्यांच्या उदाहरणांवरून तुम्हाला काही शिकता येईल का?

यहोवा तुम्हाला काय शिकवण्याचा प्रयत्न करत आहे याचा विचार करा. दुःखाने बेजार झालेला ईयोब स्वतःचाच इतका विचार करू लागला की अधिक महत्त्वाच्या वादविषयांकडे त्याने डोळेझाक केली. पण, यहोवाने त्याचा चुकीचा, असंतुलित दृष्टिकोन सुधारला तेव्हा त्याने आपली चूक कबूल केली व म्हणाला: “मला समजत नाही ते मी बोललो.” (ईयो. ४२:३) विशेषाधिकार गमावल्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असल्या तरीही, ‘आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर मर्यादेने’ स्वतःबद्दल विचार करा. (रोम. १२:३) कदाचित या अनुभवातून यहोवा तुम्हाला काही तरी शिकवण्याचा प्रयत्न करत असेल, जे सध्या तुम्हाला पूर्णपणे समजलेले नसेल.

नम्रपणे ताडन स्वीकारा. मनश्‍शेला सुरुवातीला वाटले असावे, की त्याला इतके कठोरपणे ताडन करण्याची गरज नव्हती. पण, यहोवाकडून मिळालेले ताडन त्याने स्वीकारले, पश्‍चात्ताप केला आणि आपला चुकीचा मार्ग सोडून दिला. तुम्हाला मिळालेले ताडन योग्य होते की नव्हते याचा विचार करण्यापेक्षा, “प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील.”—१ पेत्र ५:६; याको. ४:१०.

नाराजी न बाळगता धीर धरा. योसेफाला जीवनात जे कटू अनुभव आले त्यांमुळे तो द्वेषभावनेला व सूडबुद्धीला सहज आपल्या मनात घर करू देऊ शकला असता. पण, त्याने विचारशील व क्षमाशील मनोवृत्ती दाखवली. (उत्प. ५०:१५-२१) तुमच्याही मनात निराशेच्या भावना असल्यास धीर धरा आणि यहोवाकडून मिळणारी सुधारणूक स्वीकारण्यास राजी असा.

तुम्ही एके काळी ख्रिस्ती मंडळीत जबाबदारीचे पद सांभाळत होता का? तर मग, भविष्यातही तुमच्यावर विशेषाधिकार सोपवण्याची यहोवाला संधी द्या. यहोवाबरोबर आपला नातेसंबंध दृढ करा. नकारात्मक भावनांवर धीराने व नम्रतेने नियंत्रण करा. तुमच्यावर ज्या काही जबाबदाऱ्‍या सोपवल्या जातात त्या स्वीकारण्यास तयार असा. आणि ‘जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून यहोवा राहणार नाही,’ याची पूर्ण खात्री बाळगा.—स्तो. ८४:११.

[३० पानांवरील संक्षिप्त आशय]

विश्‍वासात खंबीर होण्यासाठी मनःपूर्वक प्रार्थना करा

[३१ पानांवरील चित्र]

क्षेत्र सेवेत जास्त सहभाग घेणे हा आध्यात्मिकता दृढ करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे

[३२ पानांवरील चित्र]

भविष्यात तुमच्यावर विशेषाधिकार सोपवण्याची यहोवाला संधी द्या