व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सूड घेणे उचित आहे का?

सूड घेणे उचित आहे का?

सूड घेणे उचित आहे का?

सहसा असे म्हटले जाते, की सूड घेतल्यावर मनाला समाधान मिळते. कारण, आपल्याला कोणी दुखावतो किंवा इजा करतो तेव्हा आपल्या मनात त्याच्याबद्दल राग येणे साहजिक आहे. बरोबर आणि चूक याबद्दलची जाणीव आपल्या मनात जन्मतःच असल्यामुळे, आपल्यावर अन्याय होतो तेव्हा आपण न्याय मिळवायचा प्रयत्न करतो. पण प्रश्‍न येतो, की हा न्याय आपण कशा प्रकारे मिळवायचा प्रयत्न करतो?

लोकांना चापट मारली जाते, त्यांना धक्का-बुक्की केली जाते, अपमानित केले जाते, शाब्दिक हल्ला केला जातो, मारहाण केली जाते, लुटले जाते तेव्हा त्यांच्या मनात सूडाची भावना येते. वरीलपैकी तुम्हाला एखादा अनुभव आल्यास कसे वाटेल? आज अनेकांची प्रतिक्रिया कदाचित, “त्यांनी जे केले त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल,” अशीच असेल.

अमेरिकेत, अनेक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा बदला घेण्यासाठी त्यांच्याविरुद्ध खोटे आरोप लावले. आपल्या शिक्षकांनी आपल्याला विनाकारण शिक्षा दिली, असा त्यांचा खोटा आरोप होता. न्यू ऑर्लिअन्झमधील शिक्षकांच्या संघाच्या अध्यक्षा, ब्रेंडा मिशेल म्हणतात: “हा असा आरोप लावला, की शिक्षकांचे नाव खराब होते.” पण आरोप खोटा असल्याचे सिद्ध झाले तरी, शिक्षकांच्या नावावर लागलेला डाग मात्र कायम राहतो.

कामाच्या ठिकाणी अनेक कामगार, आपल्या मालकांचा सूड घेण्यासाठी कंपनीच्या कंप्युटर नेटवर्कवरील महत्त्वाची माहिती एकतर खराब करतात किंवा डिलिट करतात. इतर कामगार कंपनीची गोपनीय माहिती चोरून दुसऱ्‍यांना विकतात किंवा अशीच देऊन टाकतात. ‘नाराज झालेले कामगार, इलेक्ट्रॉनिक फाईल्स चोरण्याव्यतिरिक्‍त एक जुनी पद्धत अवलंबतात. ते कंपनीच्या मालकीच्या वस्तु चोरतात,’ असे द न्यू यॉर्क टाईम्स या बातमीपत्रात म्हटले होते. त्यामुळे अनेक कंपन्यांनी एक नवीन धोरण सुरू केले आहे. एखाद्या कामगाराला कामावरून कमी केले जाते तेव्हा त्याच्याबरोबर एका सुरक्षा रक्षकाला पाठवले जाते. कामावरून काढून टाकलेला कामगार आपल्या टेबलाजवळ जाऊन आपले सामानसुमान गोळा करून कंपनीच्या अगदी गेटपर्यंत जाईपर्यंत हा सुरक्षा रक्षक त्याच्याबरोबरच असतो. हे सर्व यासाठी केले जाते जेणेकरून कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कामगाराने सूडाच्या भावनेने जाता जाता कंपनीचे काही नुकसान करू नये.

वरील गोष्टींच्या तुलनेत, आपण ज्यांना आपले जवळचे समजतो जसे की आपली मित्रमंडळी, घरातील सदस्य यांच्यामध्ये सूडाच्या भावना सर्रास दिसून येतात. कोणी आपल्याशी उर्मटपणे किंवा अविचारीपणे बोलले तर आपल्यालाही जशास तसे उत्तर देण्याचा मोह होऊ शकतो. तुमचा मित्र तुम्हाला जरा मोठ्या आवाजात “अरे” असे म्हणाला तर तुम्ही लगेच त्याला “का रे?” असे म्हणता का? घरातल्या कोणी तुम्हाला काही कारणास्तव दुखावले तर तुम्ही त्याला धडा शिकवण्यासाठी लगेच संधी शोधू लागता का? आपल्या जवळच्या व्यक्‍तीने आपले मन दुखावले तर वर सांगितल्याप्रमाणे आपण सहज प्रतिक्रिया दाखवतो, नाही का?

सूडाचे वाईट परिणाम

बहुतेकदा असे होते, की सूड घेणारी व्यक्‍ती तिच्या मनाला झालेल्या यातना कमी करण्यासाठी सूड घेते. उदाहरणार्थ, बायबलमध्ये हिब्रू कुलपिता याकोब याच्या पुत्रांनी सूडभावनेने काय केले त्याबद्दलचा एक अहवाल दिला आहे. त्यांना जेव्हा कळाले, की कनानी असलेल्या शेखमने त्यांची बहीण दीना हिला भ्रष्ट केले आहे तेव्हा “त्यांस मनस्वी दुःख होऊन ते फार संतापले.” (उत्पत्ति ३४:१-७) आपल्या बहिणीशी गैरपणे वागल्याबद्दल याकोबाच्या दोन पुत्रांनी अर्थात शिमोन व लेवीने शेखम व त्याच्या घराण्याविरुद्ध कट रचला व त्या कनानी शहरात प्रवेश केला आणि शेखमसहित सर्व पुरुषांची कत्तल केली.—उत्पत्ति ३४:१३-२७.

इतका रक्‍तपात झाल्यावरही हा वाद मिटला का? आपल्या मुलांची करतूत याकोबाला समजली तेव्हा त्याने त्यांची खरडपट्टी काढत म्हटले: “या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी यांस माझा वीट येईल असे तुम्ही करून मला संकटात घातले आहे. . . . ते एकजूट करून मजवर येतील व माझी कत्तल करितील आणि माझा व माझ्या घराण्याचा फडशा उडवितील.” (उत्पत्ति ३४:३०) वाद सोडवण्याऐवजी याकोबाच्या मुलांनी सूडभावनेने जे केले त्याचा विपरीत परिणाम झाला; याकोबाला आणि त्याच्या कुटुंबाला त्यांच्या संतप्त शेजाऱ्‍यांपासून सतत सावध राहावे लागणार होते. याकोबाच्या कुटुंबावर हल्ला होऊ नये म्हणून कदाचित देवाने त्याला आपले कुटुंब बेथेल येथे हलवण्यास सांगितले.—उत्पत्ति ३५:१, ५.

दीनाला भ्रष्ट करण्याआधी व नंतर घडलेल्या घटनांवरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. सूडाच्या एका कृत्यामुळे आणखी चार कृत्ये घडतात; सूडाचे हे सत्र असेच चालू राहते.

सूडाचे चक्र

आपले मन दुखावणाऱ्‍या किंवा आपल्याला इजा करणाऱ्‍या व्यक्‍तीला शिक्षा कशी देता येईल यावरच आपले मन व शक्‍ती केंद्रित करणे हानीकारक आहे. याविषयी, फर्गीव्हनेसहाऊ टू मेक पीस वीथ युवर पास्ट ॲण्ड गेट ऑन वीथ युवर लाईफ नावाच्या पुस्तकात असे म्हटले आहे: “तुम्ही रागाने पछाडून जाता. तुमचे गत अनुभव मनात घोळत ठेवण्यात, ज्या लोकांनी तुमचे वाईट केले आहे त्यांचे वाईट करण्यात, तुम्ही तुमचा वेळ व शक्‍ती खर्च करता. त्यांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे कट रचत राहता.” बायबल याबद्दलचे अगदी उचित वर्णन करते. ते म्हणते: “मत्सराने हाडे कुजतात.”—नीतिसूत्रे १४:३०.

खरेच, जर एखाद्या व्यक्‍तीच्या मनात द्वेषाच्या व दुसऱ्‍याचे वाईट करण्याच्या भावना धुमसत असतील तर ती आनंदी कशी काय राहू शकेल? एका भाष्यकाराने असे म्हटले: “‘सूड घेतल्यावर मनाला समाधान मिळत’ असेल तर अनेक वर्षांपर्यंत सूडाची भावना उराशी धरून जगणाऱ्‍या लोकांचे चेहरे पाहा.”

जातीय व धार्मिक कारणांवरून तणाव असलेल्या भागांचा विचार करा. सहसा असे होते, की एका हत्येमुळे आणखी हत्या होतात व यामुळे द्वेष आणि मृत्यूचे चक्र सतत चालू राहते. जसे की, अतिरेक्यांच्या एका बॉम्ब हल्ल्यात जेव्हा १८ तरुण ठार मारले गेले तेव्हा शोक करणारी एक स्त्री, “आपण त्यांचे हजार तरुण मारले पाहिजे,” असे ओरडत होती. अशा प्रकारे निर्घृणपणा वाढतच राहतो आणि या सूडचक्रात अधिकाधिक लोक अडकत राहतात.

“डोळ्याबद्दल डोळा”

आपल्या सूडबुद्धीचे समर्थन करण्यासाठी काहीजण बायबलचे उदाहरण देतात. ते म्हणतात: “बायबलमध्ये ‘डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात,’ असं नाही का म्हटलं?” (लेवीय २४:२०) वरवर पाहता, “डोळ्याबद्दल डोळा” हा नियम सूडाचे समर्थन करणारा वाटू शकतो. परंतु खरे पाहता या नियमामुळे, सूडाच्या अविचारी कृत्यांवर आळा बसला. तो कसा?

एखाद्या इस्राएलीने सहइस्राएलीवर हल्ला केला आणि या हल्ल्यात त्याचा डोळा फुटला तर नियमशास्त्रानुसार हल्ला करणाऱ्‍याला तशीच शिक्षा दिली जायची. पण, ज्याच्यावर हल्ला झाला आहे त्या मनुष्याला, कायदा हातात घेण्याची अर्थात हल्ला करणाऱ्‍याला किंवा त्याच्या कुटुंबातील कोणालाही शिक्षा देण्याची परवानगी नव्हती. नियमशास्त्रात सांगितले होते, की न्याय मिळण्यासाठी त्याने ही समस्या, नियुक्‍त करण्यात आलेल्या न्यायाधीशांकडे न्यावी. मुद्दामहून गुन्हा करणाऱ्‍याला किंवा दुसऱ्‍यांवर हल्ला करणाऱ्‍याला तशीच शिक्षा मिळेल ही जाणीवच, इस्राएल लोकांना सूड घेण्यापासून परावृत्त करण्यात प्रभावी ठरली. पण इतकेच यात गोवलेले नव्हते. यात आणखीनही काही गोष्टी होत्या.

शिक्षेच्या संबंधाने वर उल्लेखण्यात आलेला नियम देण्याआधी यहोवा देवाने मोशेद्वारे इस्राएल राष्ट्राला असे सांगितले: “आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको; . . . सूड उगवू नको किंवा आपल्या भाऊबंदांपैकी कोणाचा दावा धरू नको.” (लेवीय १९:१७, १८) तेव्हा, “डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात,” हा नियम आपण, नियमशास्त्रातील इतर नियमांच्या संदर्भानुसार समजून घेतला पाहिजे. येशूने संपूर्ण नियमशास्त्रातील आज्ञांचे सार दोनच आज्ञांत दिले: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर” आणि “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” (मत्तय २२:३७-४०) पण मग एखाद्या ख्रिश्‍चनावर अन्याय झाला असेल तर त्याने काय करावे?

शांतीचा मार्ग अनुसरा

बायबलमध्ये यहोवा देवाला ‘शांतीचा देव’ म्हटले आहे व तो आपल्या उपासकांना ‘शांतीच्या प्राप्तीसाठी झटण्याचे’ उत्तेजन देतो. (इब्री लोकांस १३:२०; १ पेत्र ३:११) पण शांतीचा मार्ग अनुसरल्याने खरोखरच काही फायदा होतो का?

येशू पृथ्वीवर सेवा करत असताना लोक त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्याला फटके मारले, त्याच्या शत्रुंनी त्याला छळले, त्याच्या अगदी जवळच्या मित्राने त्याला दगा दिला आणि त्याचे अनुयायी त्याला सोडून पळून गेले. (मत्तय २६:४८-५०; २७:२७-३१) मग येशूने काय केले? “त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही; तर यथार्थ न्याय करणाऱ्‍याकडे स्वतःला सोपवून दिले,” असे प्रेषित पेत्राने लिहिले.—१ पेत्र २:२३.

‘ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरता कित्ता घालून दिला आहे,’ असे पेत्राने स्पष्टीकरण दिले. (१ पेत्र २:२१) याचा अर्थ ख्रिश्‍चनांनी येशूचे अनुकरण केले पाहिजे. अर्थात, दुःख भोगताना किंवा अन्याय होत असताना तो जसे वागला तसेच ख्रिश्‍चनांनी देखील वागले पाहिजे. याबाबतीत स्वतः येशूने डोंगरावरील आपल्या प्रवचनात असे म्हटले: “तुम्ही आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे.”—मत्तय ५:४४, ४५.

ख्रिस्ताच्या प्रेमाचे अनुकरण करणाऱ्‍यांना जेव्हा अन्याय सहन करावा लागतो किंवा आपल्यावर अन्याय झाला आहे असे जेव्हा त्यांना वाटते तेव्हा ते काय करतात? “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे,” असे नीतिसूत्रे १९:११ मध्ये म्हटले आहे. ते पुढील सल्ल्याचे देखील पालन करतात: “वाइटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्‍याने वाइटाला जिंक.” (रोमकर १२:२१) ही मनोवृत्ती, आजच्या जगात सगळीकडे पसरलेल्या सूडवृत्तीपेक्षा किती उलट आहे! खरे ख्रिस्ती प्रेम, आपल्याला सूड घेण्याच्या आपल्या तीव्र इच्छेवर मात करण्यास व ‘अपराधाची गय करण्यास’ प्रवृत्त करते कारण प्रेम “अपकार स्मरत नाही.”—१ करिंथकर १३:५.

पण याचा अर्थ असा होतो का, की एखाद्या गुन्ह्यात आपण बळी ठरतो किंवा या नाही तर त्या मार्गाने आपल्याला धमकावले जाते तेव्हा आपण निमूटपणे सहन केले पाहिजे? नाही. असा याचा मुळीच अर्थ होत नाही. “बऱ्‍याने वाइटाला जिंक” असे जेव्हा पौलाने म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता, की ख्रिश्‍चनांनी हुतात्मा बनले पाहिजे. उलट, आपल्यावर हल्ला होतो तेव्हा स्वतःचे संरक्षण करण्याचा किंवा स्वतःची बाजू मांडण्याचा आपल्याला हक्क आहे. तुमची किंवा तुमच्या मालमत्तेची हानी केली जाते तेव्हा तुम्ही संरक्षणासाठी पोलिसांनाही बोलवू शकता. कामाच्या ठिकाणी अथवा शाळेत आपल्यावर अन्याय होत असेल तर आपण वरिष्ठ अधिकाऱ्‍यांकडे जाऊ शकतो.—रोमकर १३:३, ४.

तरीपण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की या व्यवस्थीकरणात आपण खरा न्याय मिळण्याची आशा बाळगू शकत नाही. पुष्कळ लोकांनी न्याय मिळण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य न्यायालयाच्या पायऱ्‍या झिजवल्या आणि जेव्हा त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तेव्हा त्यांचे मन राग व कटुतेने भरले.

सैतान याचीच वाट पाहतोय. सूड व द्वेष भावनेने लोकांनी विभाजित झालेले त्याला पाहायचे आहे. (१ योहान ३:७, ८) त्यामुळे बायबलमधील हे शब्द आपण नेहमी लक्षात ठेवणे किती महत्त्वाचे आहे: “प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभु म्हणतो.” (रोमकर १२:१९) यहोवाच्या हातात सर्व काही सोपवून देऊन आपण पुष्कळ मानसिक यातना, राग व हिंसा टाळू शकतो.—नीतिसूत्रे ३:३-६. (w०९ ०९/०१)

[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]

“तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर” आणि “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर”

[१३ पानांवरील चित्रे]

प्रेम “अपकार स्मरत नाही.”—१ करिंथकर १३:५.